“तू माझ्यासाठी जे काय करतो आहेस त्यासाठी मी तुझा खरेच आभारी आहे. नाहीतर तू मला पोलिसांच्या ताब्यात देऊन हात झटकू शकला असतास. तेच तुझ्यासाठी बरं होते..”
“बरे असणे हे सर्वोत्तम असतेच असे नाही” मी माझ्या एका जून्या मित्राचे, मार्क्विसचे वाक्य त्याच्या तोंडावर फेकले. त्याला ही अशी वाक्ये तयार करायचा छंद होता. ते वाक्य उच्चारल्यावर मला अगदी बरे वाटले. खरे तर काहीच कारण नव्हते. माणसाचा ईगो कशाने सुखावला जाईल हे सांगता येत नाही.
विलफ्रेडने एक मोठा आवंढा गिळला आणि थरथरत्या हाताने तो लिफाफा घट्ट धरून तो उभा राहिला.......
“चल जाऊया” तो म्हणाला.
पुढे.........................
एंजला हॉलमधे आमची वाट बघत होती. ती आम्हाला घेऊन हॉलमधे गेली. हे सगळे आता जरा फारच औपचारिक वाटत होते. तिने पांढराशूभ्र स्कर्ट घातला होता आणि त्याचे पिवळ्या रंगाचे पट्टे मागे घट्ट बांधले होते. आम्ही मुख्य दरवाजा पार करत असतानाच मला दरवाजावर मोठमोठ्या थापा मारल्याचा आवाज ऐकू आला.
“सदस्य ?” मी विचारले. विलफ्रेड बिचारा अजून भीतीने थरथरत होता.
“नाही ते तर सगळे आलेत”. एंजला.
विलफ्रेडने घाईघाईने मगाच्या खोलीशी माघार घेतली. तो आत गेला नाही पण दरवाजात त्याचे ते पाकीट घेऊन उभा राहिला.
एंजलाने दरवाजाची ती जाडजूड सेफ्टी चेन लावली आणि दरवाजा उघडला. दोन इंच पडलेल्या फटीतून बाहेर बघत तिने विचारले
“कोण आहे?”
“पोलिस” अत्यंत रूक्ष आवाजात उत्तर आले.
“पोलिस ? काय काम आहे?”
“तुझी आई आहे का घरी ?
“नाही”
“वडील?”
“ते कामावर आहेत”
“आम्ही विलफ्रेड अर्ना नावाच्या एका माणसाच्या शोधात आहोत. तुला माहिती आहे का तो ?’
“हो ! मला माहिती आहे मि. अर्ना. ते १२ व्या मजल्यावर राहतात”
“आम्ही आत येऊ शकतो का ?”
“मी एकटी असताना कोणालाच आत घेऊ शकत नाही”
“तुला वॅनिटा कझीन नावाची मुलगी माहिती आहे का ?”
“ती माझी मैत्रीण आहे. १९व्या मजल्यावर रहाते”
“आमचे असे म्हणणे आहे की तिने एक खून होताना बघितला आहे”
“ऑफिसर, गेले कित्येक आठवडे मी तिला बघितलेलेही नाही. माझ्या आई-वडिलांना आमची मैत्री आवडत नाही. ते म्हणतात तिची संगत वाईट आहे”
“का बरे ?”
एंजलाने खांदे उडवले पण काहीच उत्तर दिले नाही.
“आम्ही आत येऊ का ?”
“नाही”
दरवाजावर बरेच धक्के मारल्याचे आवाज आले पण मिलानने ती चेन मजबूतपणे कॉंक्रीटमधे बसवली होती.
“वॅनिटा कझीन आत आहे का तेथे?”
“नाही.”
“पोलिसांची खोटे बोलेणे हा गुन्हा आहे माहिती आहे ना ?”
“हो ! पण मी तुम्हाला आत घेऊ शकत नाही कारण तसा माझा वडिलांचा नियम आहे. मला तो नियम पाळावाच लागेल”
थोडावेळ या संभाषणामधे खंड पडला आणि तेथे शांतता पसरली. एंजलाने त्या फटीतून बाहेर बघितले पण तिच्या चेहर्यावर कसलाही भाव उमटला नाही. तेवढ्यात आवाज आला
“तुझे वडील केव्हा येतील ? पोलिसांने विचारले.
“उशीरा रात्री येतील ते. ते आणि आई चर्चला जाणार आहेत”.
“ते तर कामावर आहेत ना?”
“माझी आई त्यांना तेथे भेटणार आहेत मग ते चर्चला जातील. दर बुधवारी ते असंच करतात”.
परत एकदा स्तब्धता.
“आम्ही येऊन गेलो हे त्यांना सांग” पोलिस.
“हो ! निश्चित”.
“विसरू नकोस.”
“नाही असे म्हणून तिने दुसर्याच क्षणी ते दार ढकलले आणि खट्ट आवाज करत ते बंद झाले.
एंजला तशीच काही क्षण भिंतीला टेकून उभी राहिली. सावरल्यावर तिने हॉलमधून परत चालायला सुरवात केली. विल्फ्रेडही माझ्या मागून चालायला लागला आणि आम्ही त्या हजरजबाबी मुलीच्या मागे चालायला लागलो.
४
आम्ही तेथे गेलो तेव्हा त्या हॉलमधे एकूण नऊ माणसे बसली होती. रंगीत सोफ्यावर डावीकडे मिलान बसला होता, त्याच्या शेजारी ती त्याची शहाणी मुलगी बसली होती तर सुतकी चेहरा करून वॅनिटा कझीन खोलीच्या दुसर्या टोकाला बसली होती. मिलानच्या शेजारच्या चॉकलेटी रंगाच्या सोफ्यात सिला सॅंन्डर्स बसला होता. मला वाटते तो सगळ्यात वयस्कर होता. बाकीचे त्या सोफ्याच्या समोर अर्धवर्तुळात घडीच्या खुर्च्या टाकून बसले होते.
“तुम्ही...तू... रॉबर्ट..नाही मि. वेन तुम्ही तिथे बसा” एंजला मला म्हणाली तेवढ्यात माझी नजर वॅनिटाकडे गेली तर ती विलफ्रेडकडे भयंकर रागारागाने बघत होती आणि तो बिचारा तिची नजर चुकवत होता.
मला ज्या खुर्चीवर बसायला ती सांगत होती त्याला एका पांढर्या शूभ्र चादरीचे आवरण चढवले होते. ही मिलानचीच कल्पना असणार. त्याने ती चादर कोणाकडूनतरी उसनी आणली होती. या खुर्च्या त्या कोचाच्या बरोबर समोर मांडल्या होत्या. मी केन्या ब्रॉडहाउसच्या शेजारी जागा घेतली. तिच्या हातात तिचे बाळ पहुडले होते आणि इकडे तिकडे मजेशीरपणे टुकटुक बघत होते. एका खुर्चीवर तिसर्या गल्लीत असलेल्या चर्चमधे काम करणारा मिलो स्टोन बसला होता, त्याच्या शेजारी विल्फ्रेडने जागा घेतली.
या मिलो स्टोनचा रंग कोळशाला लाजवेल असा होता. विलफ्रेडकडे बघून तो म्हणाला “कसा काय आहेस तू बाळा ?”
विल्फ्रेडने नुसतीच मान हलवली आणि तो परत त्याच्या हातातील त्या लिफाफ्याकडे बघायला लागला. मिलानने त्याच्या मोठ्या डोळ्यांनी सर्वांकडे एक नजर टाकली. ती त्याच्या उजवीकडे बसलेल्या एंथनी पोर्टर आणि जिना गोअरवर स्थिरावली. टोनी एका औषधाच्या दुकानात काम करतो. मध्यमवयीन असलेल्या या माणसाने सहा वर्षे खूनासाठी तुरूंगात काढलेली आहेत हे कोणाला सांगूनही खरे वाटले नसते. पुढची २० वर्षे तो पॅरॉलवर बाहेर रहाणार आहे. जिना अपंग आहे. इस्पितळात तिच्या मुलाला जन्म देताना चुकीच्या औषधामुळे खरे तर ती मरायचीच पण अपंग झाली आणि तिचे ते बाळ मेले. तिची आणि टोनीची गाठ त्याच्या दुकानात पडली आणि ते आता एकत्र राहतात.
या गोलाकार मांडलेल्या खूर्च्यांमधे टोनीच्या समोर बडबड्या, बेल्स नावाचा तरूण बसला होता. त्याचे खरे नाव काय होते कोणास ठाऊक ! हा अनाथ मुलगा त्या वस्तीत अनेकांकडे वारावर जेवून मोठा झाला. लहानपणी तो, मला आठवतय, लष्करात भरती होण्याबद्दल किंवा एखादी बॅंक लुटण्याबद्दल सतत बोलायचा. वस्तीत मुली त्याच्यावर लाईन मारायच्या. त्याचे शाररीक वय २० होते आणि मानसिक असेल एंजेलापेक्षा तीन चार वर्षाने कमीच. बेल्सच्या शेजारी बसला होता रेग्गी सीम्स. याचा सेंटरींगच्या प्लेट्स ठोकायचा धंदा होता. वस्तीजवळच्या मजूर अड्ड्यावर रोज सकाळी जाऊन मेक्सिकन वंशाचे सत आठ मजूर गोळा करायचे आणि कामावर घेऊन जायचे हा त्याचा दिनक्रम होता.
“मी बोलतो, मेक्सीकन मजूरांकडे ताकद आहे आणि बिल्डरकडे पैसा, मग काय प्रश्न आहे” असे तो म्हणायचा. त्यातील खरी गोम अशी होती की हे बेकायदा निर्वासीत जर उघडकीस आले तर त्या बिल्डरला सुळावर जायला कोणीतरी संन्याशी पाहिजे होता. अर्थात त्याला त्याची फिकीर नव्हती. त्याच्या मते तो एक धंदा करत होता आणि पोलिसांची भीती हा त्या धंद्यातील एक भाग होता.
सगळ्यांचे लक्ष वेधत मिलान म्हणाला “आपण इथे का जमलो आहोत हे तुम्हाला माहितीच आहे. तरीपण मी परत एकदा सांगतो.
“जी ६ नंबरच्या खोलीतील लार्क थाईन्सचा आज पहाटे साधारणत: ३.३० वाजता खून झाला. तो प्रत्यक्ष पहाणारी व्यक्ती आणि ज्यानी तो खून केला हे दोघेही आपल्याला मिळाले आहेत. मी सुचवतो की आपणच हा खटला चालवावा”.
“आपण काही पोलिस नाही. या भानगडीत आपले नाक खुपसावे असे मला मुळीच वाटत नाही.” रेग्गी म्हणाला. हे म्हणताना त्याचा चेहरा जास्तच कठोर झाला असा मला भास झाला.
“आपण पोलिस नाही हे मान्य पण आपण नागरीक आहोत. पोलिस अटक करतील, वकील फिया उकळतील खटले लढवतील पण आपल्या समाजाच्या बाजूने कोण बोलणार आहे ?” मिलान
“न्यायालय बोलेल ना !” खूर्चीत चुळबुळ करत तो म्हणाला. त्याचे वाक्य किती निरर्थक आहे हे त्याचे त्यालाच क्षणात उमगले.
“पोलिसांनी या लार्कला सात वेळा अटक केली होती” सिला म्हणाला “आणि सात वेळा न्यायालयाने त्याला सोडून दिले. आता ती बिचारी जोसेट्टे पण नाही आणि तोही मेला आहे. अरे बाबा पोलिस खटला कसा उभा करतात त्यावर सगळे अवलंबून असते”.
“त्या साल्याला आपण दोषी ठरवले तर काय करणार आहात तुम्ही ? बेल्सने उद्धटपणे विचारले. “समजा आम्ही म्हटले त्याला फाशी द्या तर तुम्ही देणार आहात का ? त्याच्या चेहर्यावर तिरस्कार उमटला.
“कारे बाबा तुला खटका ओढायचा आहे का ? कोणाला तरी ठार मारायचे आहे का तुला ?’” मिलानने शांतपणे त्याला विचारले.
“नाही नाही मी आपले विचारले” बेल्सने तो प्रश्न त्याने गंभीरपणे विचारला नव्हता हे सिद्ध करायचा प्रयत्न केला.
“बरं विचारलच आहेस म्हणून सांगतो. जर आपण सगळ्यांनी ठरवले की त्याला मारलेच पाहिजे तर मी त्याला ठार करेन” मिलानने प्रत्येक शब्दावर जोर देत सांगितले.
’तू कशाला मीच, मीच त्याला गोळी घालेन” वॅनिटा किंचाळली.. “माझ्या लाडक्याला मारणार्याला मीच गोळी घालेन !”
एवढे बोलून ती स्फुंदत स्फुंदत रडायला लागली. ते बघून एंजेलाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या कानात ती काहितरी सांत्वनात्पर बोलली असावी.
त्याच वेळी मी विलफ्रेडकडे नजर टाकली. त्याची मान अजूनच शरमेने खाली झुकली होती आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ठिबकत होते.
“या खटल्याचे पहिले काम हे आहे की हा खटला चालवायला आपण लायक आहोत का नाही हे ठरवायचे.” मिलान म्हणाला.
त्याने सगळ्यांकडे ते काहितरी बोलतील या अपेक्षेन बघितले.
“मी या इमारतीमधे गेले १७ वर्षे रहातोय.” मिलो स्टोन खास त्याच्या चर्चच्या आवाजात म्हणाला. त्याने तो मुद्दाम काढला असे मला म्हणायचे नाहीए पण अशा प्रसंगी तो असाच धीरगंभीर आवाजात बोलायचा “या येथे इतकी तरूण माणसे मरतात ही शरमेची बाब आहे. येथे गोळ्या चालवल्या जातात, भोसका भोसकी होते, माणसे मरतात, हे सर्व कशासाठी होते हे माझ्या समजण्याच्या पलिकडचे आहे. माझ्या चर्चमधे आपली बदनामी होते ते वगळेच ! पोलिस तर म्हणतात त्यांचे आपण ऐकले तर आपल्याला न्याय मिळेल. न्यायालये म्हणतात ते सगळे ठीक करतील. राजकारणी म्हणतात आम्हाला मत द्या. पण येथे तर तरूणांचे मुडदे पडतच आहेत. मला वाटते मिलान म्हणतो ते एकदा करून बघायलाच पाहिजे”.
“अजून कोणाला काही सांगायचे आहे ?” मी विचारले.
“तुझे काय मत आहे ?” रेग्गीने विचारले.
“मी येथे आलो आहे यातच माझे उत्तर आहे. मी विलफ्रेडचे वकीलपत्र घ्यायला तयार आहे. मी तर म्हणेन आपणच कायदा आहोत, आपणच न्यायालये आहोत कारण मला माहिती आहे की पोलिस आणि काळया डगल्यातील माणसे न्याय देऊ शकत नाहीत.
“मान्य आहे !” सिला म्हणाला.
टोनी आनी जिना या दोघांनी मान हलवूनच होकार भरला.
“कमीत कमीत त्यांचे ऐकायला काय हरकत आहे ?” केन्या ब्रॉडहाऊस म्हणाली. तिचा आवाज ऐकून इतक्यावेळ गप्प असलेल्या तिच्या बाळाने भोकाड पसरले.
“ठीक आहे तर मग ! सुरवात करूया” मिलान म्हणाला.
५
“रॉबर्ट, कसा चालवावा रे हा खटला ?” मिलानने मला विचारले.
“तो का ठरवणार ?” बेल्सने तुसड्यासारखे विचारले.
“कारण राज्यशास्त्र या विषयात त्याचे पदवीपूर्व शिक्षण झाले आहे.” एंजेलाने परस्पर उत्तर दिले.
खूर्चीत मागे टेकत बेल्स म्हणाला “मग काय झाले ?” त्याची जीभ फारच वळवळत होती. पण ते उत्तर ऐकताच मी भानावर आलो. माझ्या लक्षात आले की मी या खटल्यात इतका गुंतून गेलो होतो की मला वस्तुस्थितीचे भान उरले नव्हते.
“मला वाटते पहिल्यांदा आपण आरोप काय आहेत ते ऐकावेत आणि मग युक्तिवाद ऐकावेत. त्यानंतर प्रत्यक्ष काय पुराव आहेत ते बघावेत. त्यानंतर आपण सगळे मिलून निर्णय घेऊयात अर्थात या सगळ्यात विलफ्रेडही आला.”
“तो ? त्याने तर माझ्या लार्कला मारले” वॅनिटा किचाळली. हिला पुढच्यावेळी समजावयाला पाहिजे मी मनात म्हणालो.
“कारण तो स्वत: माझ्याकडे आला म्हणून. आणि वॅनिटा, बारा पैकी फक्त एकच मत त्याचे असणार आहे हे विसरू नकोस” मिलान म्हणाला.
“फारच लाड चाललेत भडव्याचे !” वॅनिटा त्याच्याकडे बघून थुंकली. विलफ्रेडने तिच्याकडे बघायचा प्रयत्न केला पण तिच्या जागी आंधळा करणारा सूर्य असल्यासारखे त्याने आपले डोळे मिटून घेतले.
“एक मिनीट बॉब, मी येथे येऊन हे सगळे ऐकेन असे म्हटले खरे, पण लक्षात घे त्याचा अर्थ असा होत नाही की मी हे सगळे पोलिसांना कळवणार नाही. तुला माहिती आहे हे सगळे बेकायदा आहे. आपण सगळे बेकायदेशीर न्यायाधीश आहोत.” रेग्गीने आपली बाजू मांडली.
“तरी सुद्धा आपण रोज न्याय करतोच की” मिलानने शांतपणाने, आपल्या आवाजावर काबू ठेवत उत्तर दिले.
“याचा काय अर्थ होतो ?” बेल्सने पिरपिरत विचारले.
“याचा अर्थ मी सांगतो. इथे रेग्गी रोज बेकायदा मेक्सिकन मजुरांकडून काम करून घेतो, त्यांचा पगार करतो. त्यांचे रक्षण करतो कारण तो त्यांना पोलिसच्या ताब्यात देत नाही. हा त्याचा बेकायदा न्यायच झाला नाही का ?” मी म्हणालो.
“अरे तो माझा धंदा आहे” रेग्गीने तक्रार केली.
“मग ही वस्ती आपल्या मुलांसाठी सुरक्षीत ठेवणे हे आपले कर्तव्य नाही का ?” सिला म्हणाला.
केन्याने आणि जिनाने होकारार्थी मान हलविली.
“मी माझे फक्त मत मांडले” रेग्गीने माघार घेतेली.
“मिलान, चल तर सुरवात करूयात “ मी.
“कशी ?” मिलान
“पहिल्यांदा आरोप ऐकणे जरूरीचे आहे” मी म्हणालो. हे ऐकल्यावर मिलान उठला. त्याने त्याच्या खाकी विजारीतून एक कागद काढला व त्यावर एक नजर टाकून झाल्यावर त्या कागदाची घडी घालून तो परत खिशात सारला..
“आज पहाटे साडेतीन वाजता आरोपी विल्फ्रेड अर्नाने जी ६ नंबरच्या घराचे दार ठोठावले, लार्कला त्याने ड्रग्ज पाहिजेत असे सांगितले. दार उघडून लार्क थाईन्स मागे वळाला तोच विलफ्रेडने त्याच्यावर सात वेळा गोळ्या झाडल्या. पिस्तुलातील गोळ्या संपल्यावर त्याने ते परत भरले आणि त्याच्यावर परत सात गोळ्या झाडल्या.” मिलान म्हणाला.
ते ऐकून वॅनिटा किंचाळली जणू काही कोणी तिच्यावरच आत्ता गोळी झाडली आहे. मिलानने तिच्याकडे शांतपणे बघितले.
“चौदा वेळा ?” टोनी पोर्टरने विचारले.
“हो ! चौदा वेळा” मिलानने सांगितले.
“आणि यावेली लार्क थाईन्सकडे पिस्तुल होते का ?”
“नाही !” वॅनिटा परत किंचाळली “त्याच्याकडे त्यावेळी विलफ्रेडने मागितलेले कोकेन होते”.
“नव्हते” मिलानने दुजोरा दिला. “न्यायालयात याला थंड डोक्याने ठरवून केलेला खून म्हणतात”
टोनीने खाली मान घालून बसलेल्या विलफ्रेडकडे बघितले.
“बस एवढेच ?”
“हो !”
तेवढ्यात विलफ्रेड काहितरी पुटपुटला.
काय म्हणालास ?” रेग्गीने विचारले.
“त्याने जोसेट्टेला ठार मारले....” विलफ्रेडने जरा मोठ्या आवाजात सांगितले.
“खोटे आहे ते !” वॅनिटा परत किंचाळली. “त्याने कोणाचाही खून केला नाही की कोणाला ठार मारले आहे”
“तो तिला कोकेन विकायचा. जेव्हा तिला त्याचे पैसे देणे अशक्य झाले तेव्हा त्याने तिला धंद्याला लावले. त्याने तिला कोकेनसाठी लाचार बनवले आणि मग तिला वार्यावर सोडून दिले. त्याने तिला गच्चीवरून ढकलूनही दिले असते”
“तो तिच्या जवळपासही नव्हता” वॅनिटा त्या गरीब कामगारावर फिस्कारली. तिच्या डोळ्यात त्याचा मृत्यू आत्ताच दिसत होता.
“खरे काय झाले विलफ्रेड ?”
“तो भडवा काय सांगणार ? त्याने लार्कला ठार मारले हेच खरंय !”
“आम्ही त्यालाही बोलून देणार आहोत वॅन” मी म्हणालो.”त्याचीही बाजू ऐकून घ्यावीच लागेल. त्याचे बोलणे झाल्यावर तुलाही काय झाले हे सांगायची संधी मिळणारच आहे”.
एंजेलाने तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात तिचे हात टाकले आणि तिला शांत केले.
“विलफ्रेड बोल लवकर”
तो उठला आणि त्याने माझ्या डोळ्याला त्याची नजर भिडवली. त्याच्या पुढची कहाणी त्याने मलाच माझ्याकडे बघत सांगितली...............
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
लवक्र संपव रे
लवक्र संपव रे बाबा..................