आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार. दर सोमवारसारखी आजही माझी घाई उडाली होती. कालच्या रविवारचा सो कॉलड हॅंगओवर अजूनही बाकी होता. त्यामुळे सकाळी उठणे म्हणजे ओढूनताणून उघडलेले डोळे.. आजपासून सहा दिवस परत कामाचा भडीमार ह्या कल्पनेनेच नको होते. त्यातच उशीरा उठल्यामुळे सगळेच लेट.. लेट स्वयंपाक.. लेट आंघोळ.. अन लेट ट्रेन.. म्हणजे लेट ट्रेन असे नाही तर मी ट्रेनसाठी लेट.. अन मग मला धडा शिकवण्यासाठी ट्रेनही लेट.. कसेबसे आवरून घराबाहेर पडले. नशीब आमचा पेपरवाला तरी वेळेवर येतो. रोजचा ट्रेनचा प्रवास पेपरातल्या बातम्या वाचूनच तर कटतो. पेपर तसाच बॅगमध्ये कोंबून मी कुलुप लावले अन धावतच स्टेशनचा रस्ता पकडला. माझी ८.५७ ची वाशी लोकल नक्की चुकणार ही खात्री झाली तशी आपोआप पावले जरा धीमी झाली. नंतरच्या पनवेल ट्रेनला गर्दीमुळे सोडावेच लागणार होते. त्यामुळे पुढच्या वाशी ट्रेनची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. स्टेशनवर पोहोचले तसे पाच-दहा मिनिटातच माझी ट्रेन आली. मस्त वार्याची खिडकी मिळाली. मग रोजच्या रूटीनप्रमाणे पेपर उघडला. पहिल्या पानांवरच्या ठळक बातम्यांवर एक नजर टाकली आणि पाने पलटायला घेतली. अचानक एका बातमीवर नजर खिळून राहिली. "२६ वर्षाच्या मातेची आपल्या दोन वर्षाच्या मुलासह आत्महत्या." - वाचून हळहळले.. अरेरे!! काय हे.. जराही त्या बाईला अक्कल नाही.. मरायचेच होते तर स्वता मेली असती ना.. त्या चिमुरड्या जीवाने काय केले होते? त्याचा का प्राण घेतला? आई होती की वैरीण? त्या बिचार्या पोराने दुनिया बघण्यापूर्वीच तिचा निरोप घेतला. देव त्या बाईला कधीही माफ नाही करणार.. बरेच विचार मनामध्ये येऊ लागले. मला त्या बाईचा फार राग आला होता. इतके काय झाले होते जे तिला मरायचेच होते.. बरे तिला मरायचेच होते तरी स्वताच्या पोटच्या पोराला मारताना तिला काहीच कसे नाही वाटले? ज्याला तिने नऊ महिने पोटात सांभाळले, नंतर दोन वर्षांपर्यंत त्याचे सारे बालहट्ट पुरवले, लाड केले, त्याचाच बळी घेतला. आजकालच्या बायका-मुलींना झालेय तरी काय? अश्या आईने आपल्या मुलासह आत्महत्या केल्याच्या बातम्या हल्ली पेपरमध्ये वरचेवर येतात. जेव्हा जेव्हा या अश्या काही बातम्या वाचते तेव्हा असेच विचार मनात येतात. आजही काही अपवाद नव्हता. बातमीवर पुन्हा एक नजर टाकली आणि पुढची पाने चाळू लागली.
ऑफिसमध्ये पोहोचले अन जरा चहापाणी घेऊन कामाला लागले. मध्येच मोबाईल वाजू लागला. नाव बघितले आणि एकदम खूप आनंद झाला. "सरू" - सरिता - माझी कॉलेज मैत्रीण. बर्याच दिवसांनी तिचा फोन आला होता. लगेच उचलला आणि बडबड सुरू, "सरू, अग कुठे आहेस? कशी आहेस? किती दिवसांनी फोन केलास, विशाल कसा आहे? सध्या कुठे आहेस? नकुल (तिचा १ वर्षांचा मुलगा) कसा आहे? घरी सगळे कसे आहेत?"... जुन्या मित्रमैत्रीणींचा बर्याच दिवसांनी फोन आला की त्यांना विचारले जाणारे सारे प्रश्न.. पण माझ्या प्रश्नांचा भडीमार संपला तरी सरू मात्र शांतच होती. मला वाटले मी हिला बोलायची सवडच दिली नाही. म्हणून मग मी तिला म्हणाले की, चल बाई दे आता एकेक करून सार्या प्रश्नांची उत्तरे मग मी देते.. तरीही सरू शांतच.! मला जरा भिती वाटली. मी विचारले, " सरू, अग सगळे ठीक आहे ना??" "प्लीज मला सांग नीट काय ते?" केविलवाण्या स्वरात मी तिला परत विचारले तेव्हा कसाबसा आवंढा गिळत ती मला म्हणाली, "अस्मी आजचा पेपर वाचलास का??" मी हो म्हणताच तिने परत विचारले, "नीट वाचलास?" मी परत हो म्हणाले. "सरू, त्या बाईने तिच्या मुलासह बिल्डिंगवरून उडी मारलेली न्यूज वाचलीस?" मला हे संभाषण कुठे जात आहे काही कळतच नव्हते. मग एक जोरदार हुंदका देऊन सरू म्हणाली, "अस्मी, ती बाई दुसरी-तिसरी कोणी नसून आपली विधी होती ग, आणि तो विधीचा मुलगा यश होता..."
तिचे हे अनपेक्षित उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर भोवळ आल्यासारखे झाले. काहीच कळत नव्हते. सरुच्या बोलण्यावर बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. ती.. ती स्त्री.. ती तरुणी... जिला मी सकाळी मनातल्या मनात चार शिव्या घातल्या होत्या.. ती विधी होती.. विधी पटेल.. विधी देसाई.. माझी मैत्रीण विधी.. माझी जिवाभावाची सखी विधी.. अजूनही मन मानायलाच तयार नव्हते.. सगळेच शून्य झाले होते. भानावर आले ते सरूच्या घाबरलेल्या आवाजाने, "अस्मी ठीक आहेस ना? काय झाले? बोल माझ्याशी.. काहीतरी बोल.." भानावर येऊन मी तिला ठिक असल्याचे सांगितले. थोड्या वेळाने फोन करते म्हणून फोन ठेऊन दिला. खरे तर माझे मलाच रडू आवरता येत नव्हते. पटकन पेपर काढला आणि मगाशी उडत उडत वाचलेली ती बातमी पुन्हा नीट सविस्तर वाचायला घेतली - "२६ वर्षीय विधी देसाई नामक तरुणीने आपल्या २ वर्षीय मुलासह इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कारण - सासरच्या जाचाला कंटाळून. एका कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या या शिकलेल्या तरुणीने असे पाऊल उचलले त्यामुळे आजकालच्या पिढीचा वाढता असंतोष, स्पर्धा, वाढणार्या अपेक्षा, एक दुसर्या बरोबर तुलना, एकत्र मिळणारा कमी वेळ.. सार्या गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. सासरच्या लोकांनाही अटक केल्याचे वाचले.
पेपर बंद केला आणि मनातल्या पुस्तकाची मागची पाने चाळू लागले. तो दिवस आजही आठवतो मला.. बारावीमध्ये चांगले गुण न मिळाल्यामुळे माझे डॉक्टर बनायचे स्वप्न भंगले. अन ईंजिनीअर कोण बनणार? गणितात जराही रस नव्हता. म्हणून मग फार्मसीमध्ये आले. हे नक्की काय क्षेत्र आहे याची फारशी कल्पना नव्हती, पण औषधनिर्माण शास्त्र असल्याने मेडीकलच्याच जवळचे समजून प्रवेश घेतला. माझा स्कोअर फार्मसीच्या मानाने बराच चांगला होता, म्हणून सर्वात बेस्ट कॉलेजमध्ये लगेच अॅडमिशनही मिळाले. आमची स्वारी भलतीच खूष होती. पाच दिवसांनी कॉलेज सुरू होणार होते. मी राहायला वाशीला आणि कॉलेज माटुंग्याला, म्हणून वडाळयावरून जाणे उत्तम असे वाटले. पहिल्या दिवशी दहाचे लेक्चर होते म्हणून ८.३० लाच घरातून बाहेर पडले. वडाळ्याला पोहोचले आणि इस्ट-वेस्ट असा काही प्रकार असतो माहीतच नव्हते. आमच्या वाशीला असे काही नसते ना. पूलावरून खाली उतरले आणि चालत चालत भलत्याच दिशेला गेले. परत कोणाला तरी विचारले तर कॉलेज विरुद्ध दिशेला आहे असे समजले. परत पुलावरून उलट आले. खूप दमले होते. पहिल्याच दिवशी लेट होणार ही भिती पण होती. टॅक्सीने जाण्याचा विचार केला तर त्याही भरलेल्या.. इकडून तिकडून टॅक्सीच्या मागे पळू लागले. तेवढ्यात एक टॅक्सी माझ्यासमोर थांबली. त्यात एक गोड मुलगी बसली होती. गोरी, काळेभोर केस, बारीक बांधा, सुंदर अन नाजूकशी.. माझ्याकडे बघून गोड हसली. तिने विचारले, "किधर जाना है?". "UDCT", मी उत्तर दिले. तशी ती लगेच खूश होऊन म्हणाली, "Good Yaar, मै भी वही जा रही हू, तुम चलो मेरे साथ." लगेच मी देखील तिला "Thanks" वगैरे बोलून पटकन टॅक्सीत शिरले. तिने मग स्वताची ओळख करून दिली, "My Name is Vidhi - Vidhi patel, अभी ही अॅडमिशन हुआ है, F.Y. B Pharm मे.." मी पण लगेच खूश होऊन म्हणाले, "अरे same here, I am Asmita Naik & also in F.Y. B Pharm. लगेच अश्या काही गप्पा सुरू झाल्या जश्या दोन खूप वर्षांच्या मैत्रीणी भेटत होत्या.
बघता बघता कॉलेजही आले. पहिल्याच दिवशी एक मस्त फ्रेंड मिळाल्याने खूप आनंद झाला होता. नवीन ठिकाण, नवीन अभ्यासक्रम यामुळे आम्ही दोघीही जरा मनातून धास्तावलो होतोच. अन त्यावर कॉलेजमध्ये सिनिअर्स रॅगिंग करतात हे ही ऐकून होतो. त्यामुळे जरा दबकत दबकतच कॉलेजमध्ये प्रवेश केला. पण त्यातल्या त्यात आम्ही दोघी असल्याचा दिलासा होता. आम्ही आमचा वर्ग शोधून बसलो. अजूनही बरेच विद्यार्थी होते. पहिलाच दिवस त्यामुळे सगळेच एकमेकांसाठी अनोळखी होते. कोणी कोणाशी फारसे बोलत नव्हते. पण आमच्या तोंडाचा पट्टा मात्र असा चालू होता की सगळ्यांना आमच्याकडे बघून वाटत होते आम्ही बालमैत्रीणीच आहोत. थोडयाच वेळाने प्रोफेसर आले. पहिलाच दिवस असल्याने दिवसभरात दोनच लेक्चर्स झाली. एकमेकांशी ओळख, प्राध्यापकांशी ओळख, नवीन विषयाशी ओळख यातच दिवस गेला. दिवस संपता संपता आम्ही बाहेर पडू लागलो तसे काही मुले आमच्या वर्गात शिरली. त्यांच्याकडे बघूनच आम्हाला समजले की ते आमचे सिनिअर्स होते जे आमची रॅगिंग घ्यायला आले होते. मनामध्ये पुन्हा भिती निर्माण झाली पण सारे सिनिअर्स खूप चांगले निघाले. त्यांनी फक्त आमचे Introduction विचारले आणि तुम्हाला या कॉलेजमधील पहिला दिवस का लक्षात राहील हे सांगा म्हणाले. सर्वांनी काही ना काही सांगितले, कॉलेजचे भव्यदिव्य रूप, लेक्चरर्स, पहिल्या लेक्चरचा अनुभव, कॅंटीन, लायब्ररी, कॉलेजच्या मध्यभागी असलेले गार्डन... विधीची वेळ आली तशी तिने माझ्याकडे एक नजर टाकली आणि चटकन म्हणाली, "मला आज एक नवीन आणि खूप छान मैत्रीण मिळाली." त्याक्षणी किती मस्त वाटले सांगू.. त्या दिवसापासून आमची मैत्री इतकी पक्की झाली की काही दिवसातच कॉलेजमध्ये आम्हाला जय-वीरू म्हणून ओळखू लागले. आमच्या जोडीचे नावही मस्त पडले, "अवि"... अ-अस्मिता अन वि-विधी.. रोज कॉलेजला आम्ही एकत्र यायचो, एकत्र अभ्यास करायचो, लायब्ररी असो वा कॅंटीन सार्या ठिकाणी आम्ही एकत्रच असायचो.
विधी चेंबूरला राहायची. श्रीमंत गुजराती परीवारातील लाडकी लेक. एक मोठा भाऊ, वहिनी, आई-वडील असा परीवार. घरातील सर्वात लहान म्हणून लाडावलेली. अभ्यास, परीक्षा, जर्नल कंप्लीशन, फिरणे, पार्ट्या.. सार्या ठिकाणी पुढे.. आणि तिच्या जोडीला आता मी देखील. आमच्या घरच्यांनाही आमच्या मैत्रीचे फार कौतुक वाटायचे. अभ्यासाच्या निमित्ताने आम्ही बर्याचदा एकमेकींच्या घरी राहायचो. असेच धमाल मस्ती करत आयुष्यातील चार वर्षे भुरकन उडाली अन आम्ही B Pharm Graduate झालो. शेवटची परीक्षा संपली तेव्हा आम्ही दोघींनी मिळून मस्त सेलिब्रेट केले अन दिवस संपता संपता एकमेकींच्या गळ्यात गळे टाकून रडलोही. कारण आता हे क्षण परत येणार नव्हते. त्यानंतर मग जॉबसाठी फिरणे सुरू झाले. दोघींनाही चांगला जॉब मिळाला, पण वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे भेटणे हळूहळू कमी होऊ लागले. पण फोनवर मात्र निरंतर गाठीभेटी असायच्या. दर सुट्टीच्या दिवशी आम्ही मस्त भेटायचो, फिरायचो, धम्माल करायचो. असेच एक वर्ष उलटून गेले अन एक दिवस विधीचा फोन आला. म्हणाली, "आज भेटूया. काही सांगायचे आहे". आवाजावरून खूप खुष दिसत होती.
संध्याकाळी जेव्हा भेटली तेव्हा तिने मला घट्ट मिठीच मारली अन म्हणाली, "अस्मी माझे लग्न ठरले आहे." मी चाटच पडले. पण तिच्या चेहर्यावरील आनंद पाहून मी ही खूप खूष झाले. विधीने सांगितले की त्याचे नाव विराज देसाई, एका लग्नात त्यांची भेट झाली होती. विराज सॉफ्टवेअर ईंजीनीअर होता अन अमेरीकेत प्रोजेक्टसाठी ३ वर्षे जाणार होता. त्या आधी लग्न करायचे होते. कोणालाही हेवा वाटावे असे स्थळ होते पण मला खरेच विधीसाठी खूप आनंद झाला होता. थोड्याच दिवसात तिचा साखरपुडा झाला अन लवकरच लग्नही उरकले. लग्नात विधी एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. मला भेटली तेव्हा घट्ट मिठी मारून रडू लागली. मलाही अश्रू आवरत नव्हते. मोठ्या जड अंतकरणानेच विधीला निरोप दिला.
दहा-बारा दिवसांनी विधी अमेरिकेला गेली. तिथूनही बर्याचदा फोन वा नेटद्वारे आमचे बोलणे होत असे. रोज ती नवीन नवीन ठिकाणी फिरायला जायची आणि त्याचे वर्णन मला सांगायची. हळूहळू हे ही कमी होऊ लागले. बहुतेक आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात व्यस्त झाली असावी. वर्षभरातच विधीचा यश जन्माला आला. मला अधूनमधून त्याचे फोटो पाठवायची. एक दिवस तिचा फोन आला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. विधी भारतात परत आली होती. जागतिक मंदीमुळे विराजचा प्रोजेक्ट थांबला होता. त्याची नोकरीही गेली होती. हे सारे सांगताना तिला हुंदका आवरत नव्हता. मी तिला कसाबासा फोनवर दिलासा द्यायचा प्रयत्न केला पण ती खूप चिंताग्रस्त वाटत होती. जेव्हा मी तिला प्रत्यक्ष भेटले तेव्हा दचकलेच. ज्या विधीला मी ओळखत होते ती विधी कुठेतरी हरवली होती. माझ्यासमोरची विधी खूप बारीक, काळजीने चेहरा निस्तेज झालेली, वयापेक्षा बरीच थोराड झालेली भासली. तिला पाहताक्षणीच एक घट्ट मिठी मारली. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या पण विराजबद्दल काहीच बोलायला तयार नव्हती. माझ्यापासून काहीतरी लपवत होती. खोदून खोदून विचारल्यावर सरते शेवटी तिने तोंड उघडले. जे झाले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विराज देसाई हा एक सॉफ्टवेअर ईंजीनीअर होता पण अमेरीकेत त्याने बरेच फ्रॉड केले होते. परीणामी कर्जबाजारी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सारे काही सुरळीत चालले, पण मग हळूहळू त्याचे खरे रूप समोर येऊ लागले. विराज रोज रात्री घरी दारू पिऊन यायचा. दारूच्या नशेत त्याने विधीला मारहाण करणेही सुरू केले होते. तिने याबाबत आपल्या आईवडीलांना सांगितले पण त्यांनीही उलट तिलाच कॉम्प्रोमाईज करायचा सल्ला दिला. त्यातच विधीला दिवस गेले. त्यामुळे तो आणखीनच संतापू लागला, कारण विराजला हे मूल नको होते. म्हणून त्याने तिला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. तो मुद्दाम विधीच्या चारीत्र्यावर संशय घेऊ लागला. आणि विधी हे सारे निमूटपणे सहन करत होती..
अश्यातच यशचा जन्म झाला. विधीला वाटले आतातरी गाडी रूळावर येईल. पण बिचारीच्या याही अपेक्षा फोल ठरल्या. विधीबरोबर विराज यशचाही राग करू लागला. विराजची नोकरी गेली तसे त्याचे पिणे आणखी वाढू लागले. आणि विधीला होणारा त्रासही. घरच्यांच्या सांगण्यावरून मग ते सर्वजण भारतात परतले. इथे येऊनही विराजचे वागणे काही बदलले नव्हते. त्याचे आईवडीलही त्याचीच साथ देत होते. विराज नवीन बिजनेस काढायचा विचार करत होता आणि त्यासाठी तो आणि त्याच्या घरचे आता विधीच्या मागे माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावू लागले. पण विधीला काही हे पटत नव्हते. कारण ती विराजला पुरते ओळखून होती. सध्या ती स्वताच नवीन नोकरीच्या शोधात होती. हे सगळे ऐकत असताना माझे मन विधीसाठी रडत होते. एवढ्या लहान वयात तिला काय काय सहन करावे लागले होते. शब्दांनीच मी तिला धीर दिला. त्या दिवशी माझे मन कशातही लागत नव्हते. सारखा तिचाच विचार मनात येत होता.
दोन दिवसांनी विधीने मला फोन केला की तिला एका कॉलेजमध्ये लेक्चररचा जॉब लागला. तिच्या आवाजातील उत्साह बघून जरा हायसे वाटले. दिवस सरत गेले. आमचे फोनवर बोलणे होतच होते. हल्ली विधी माझ्यापासून काहीही लपवायची नाही. विराज दिवसेंदिवस जास्तच बिघडत होता. विधी नोकरी करते हे ही त्याला सहन नाही व्हायचे. याचा राग तो यशवरही काढायचा. वेळप्रसंगी दोघांना मारहाण करण्यापर्यंत त्याची मजल जायची. यशला कधीच त्याने प्रेमाने जवळ घेतले नव्हते. सतत तिच्यावर संशय घ्यायचा. मी विधीला बर्याचदा विराजपासून वेगळे व्हायचा सल्ला दिला. पण विधीच्या घरच्यांचा याला पाठींबा नव्हता.
दहा-एक दिवसांपूर्वीच तिचा फोन आला होता. तेच आमचे शेवटचे बोलणे ठरेल असे कधी वाटलेही नव्हते. खूप अपसेट होती. एकसारखी रडत होती. म्हणाली, "अस्मी माझे कोणी नाही ग या जगात, माझ्या यशचे काय होणार याची मला खूप चिंता लागून राहिली आहे. कोणालाही काही सांगू शकत नाही. विराजचीही हल्ली फार भिती वाटू लागली आहे. जगणे नकोसे झालेय. पण माझ्यामागे यशचे काय.. त्याच्यासाठी म्हणून जगतेय ग.." अगदी हमसून रडत होती. तिला नक्की कोणत्या शब्दात समजवावे हे कळत नव्हते. समोर असती तर निदान तिला कुशीत घेऊन थोपटले तरी असते. शेवटी तिनेच फोन ठेऊन दिला. परत आलाच नाही. माझाही उचलत नव्हती. पुढचे चारपाच दिवस मी सतत तिला फोन लावायचा प्रयत्न करत होते. पण ती उचलत नव्हती. आणि आज अचानक ही बातमी... मला जगावेसे वाटत नाही असे बोलणारी विधी प्रत्यक्षात असे पाऊल उचलेल हे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. खरे तर मलाच अपराध्यासारखे वाटू लागले की मी माझ्या मैत्रीणीला वाचवू शकले नाही, यातून बाहेर काढू शकले नाही.. डोळ्यांसमोर राहून राहून तिचाच चेहरा येत होता. का झाले असे? कोणी का मदतीला धाऊन आले नाही तिच्या? समाजाच्या भितीने तिच्या स्वताच्या आईवडीलांनीदेखील तिला आधार देऊ नये? आपल्या पोटची पोरगी आणि तिच्या चिमुरड्या पोराला मरणाच्या दारात ढकलताना त्यांना काहीच कसे वाटले नाही? तिला तिच्या पिल्लाची काळजी होती म्हणूनच तर तिने हे पाऊल उचलले. हे सारे करताना तिला किती यातना झाल्या असाव्यात, ती स्वता किती वेळा मेली असेल हे तिचे तिलाच ठाऊक.. आणि या सार्याला जबाबदार कोण? आपण की आपला समाज? एकानेही जर तिच्या पाठीशी उभे राहायची हिंमत दाखवली असती तर.... तर आज विधी या जगात असती. विधीबरोबर अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. जर आणि तर यांच्यामध्ये दोन जीव बळी पडले.
आपण जर आजूबाजूला नजर टाकली तर अश्या अनेक विधी दिसतील. आता हे आपल्यालाच ठरवायचे आहे की आपण त्यांना मदतीचा हात देणार की हात बाजूला सारून त्यांना असेच मरण्यासाठी सोडून देणार... अश्या बर्याच विधी आहेत ज्यांना मनात आणले तर आपण वाचवू शकतो...!!
- अस्मिता नाईक
चांगली कथा आहे, पहिलाच
चांगली कथा आहे, पहिलाच प्रयत्न खूप चांगलाच जमलाय ,अभिनंदन
पु ले शु
पहिला प्रयत्न चांगला जमला
पहिला प्रयत्न चांगला जमला आहे. थोडी छोटी असती तर अजुन छान वाटली असती.
चांगली जमलेय कथा. १ सांगू का?
चांगली जमलेय कथा.
१ सांगू का? आधी त्या बातमीबद्दल लिहीलयं त्यात विधीच्या मुलाचं नाव चिराग लिहीलय आणि मग पुढे यश असा उल्लेख आहे. कदाचित टायपिंग एरर असावी.:) पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
अस्मिता, सर्वप्रथम तुझे
अस्मिता, सर्वप्रथम तुझे अभिनंदन की मनातील विचार कागदावर उतरवायला सुरुवात केलीस आणि ते प्रसिद्ध देखील केलेस.
आता एक वैयक्तिक मत - तू शीर्षकात किंवा प्रस्तावनेमध्ये "लिखाणाचा पहिलाच प्रयत्न" असे नसते लिहिलेस तरी चालले असते. याने होते काय, प्रामाणिक प्रतिक्रिया येत नाहीत.
"पहिलाच प्रयत्न छान जमलाय" याच छापाच्या प्रतिक्रियाच जास्त वाचाव्या लागतील मग आता.
त्यापेक्षा, "कथा काही जमली नाही" किंवा "मस्तच, सुरेख कथा आहे" यापैकी एखादी प्रतिक्रिया घेणे योग्य नाही का..
असो, माझा प्रतिसाद देखील आता कदाचित तुझे हे पहिले लिखाण होते हे डोक्यात ठेऊन येणार,
पण तुला ज्या भावना लोकांशी शेअर करायच्या होत्यास त्या तू नक्कीच पोहोचवल्यास.
सुंदर लिखाण, आणि यापुढेही लिखाण करणे, करत राहने अपेक्षित.
छान.
छान.
अभिनंदन...चांगली कथा
अभिनंदन...चांगली कथा आहे....पु ले शु
मस्त
मस्त
छान लिखाण
छान लिखाण
सहि
सहि
आवडली कथा..
आवडली कथा..
अतिशय सुन्दर माहिती आणि ती पण
अतिशय सुन्दर माहिती आणि ती पण सोप्या शब्दात!!
कथा छान. ते चिराग - आणि यश
कथा छान.
ते चिराग - आणि यश बदला.
सर्वच वाचकांचे एकत्रच आभार
सर्वच वाचकांचे एकत्रच आभार मानते.
टाईप करताना झालेल्या चुका ध्यानात आणून दिल्याबद्दलही धन्यवाद.
@ तुमचा अभिषेक, आपली सूचना अंमलात आणली.
तुम्ही ही खरी स्टोरी लिहिली
तुम्ही ही खरी स्टोरी लिहिली आहे की निव्वळ ऐकीव घटनेवर स्वरचित कथा?
मागच्या वर्षी मार्च मध्ये निधी गुप्ता नामक एका विवाहितेची बातमी पेपर मध्ये वाचून मन सुन्न झाले होते. खूप दिवस बेचैनीत काढले होते. तिच्या चिमुकल्या मुलाचा आणि मुलीचा फोटो पाहून काळजात कालवाकालव झाली होती. तुमची कथा राहून राहून त्याच बातमी भोवती फिरतेय असे वाटले. खरंच तुमची मैत्रीण होती का?
मी अस्मिता, तुमची कथा खरी
मी अस्मिता,
तुमची कथा खरी वाटते.
माझ्या एका परिचित समवयस्काने आत्महत्या केली होती. माझ्यासोबत कॉलेजात होता. १२ वीत अपेक्षित यश न लाभल्याने पार जगातूनच कलटी मारली. तो माझा मित्रबित्र नव्हता, पण डोळ्यासमोरचा होता.
आत्महत्येच्या दोनेक आठवडे आधी कॉलेजला भेटला होता. त्याला अचानक तिथे बघून थोडा आनंदाश्चर्यचकित झालो. नंतर विसरूनही गेलो. सुमारे महिन्याभराने त्याच्या (त्यातल्यात्यात जवळच्या) मित्राकडून कळलं. तेव्हा उलगडा झाला की शेवटचं म्हणून तेव्हा कॉलेजात आलेला असणार.
विधी निदान आपलं दु:ख उघडपणे मांडत होती. याच्या मनाचा थांग शेवटपर्यंत कुणालाही लागला नाही. अगदी त्याच्या जवळच्या मित्रालाही! कसा त्याला मदतीचा हात देणार?
आ.न.,
-गा.पै.
गामा पैलवानजी, आमच्या
गामा पैलवानजी,
आमच्या बिल्डींगमध्येही आमच्यातल्याच एका मुलीने बारावीची परीक्षा नापास झाली म्हणून आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता.. जो सुदैवानेच यशस्वी होता होता वाचला होता..
मला स्वताला बारावीत घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा म्हणा किंवा माझ्या अंगातील हुशारीपेक्षा फारच कमी मार्क आले होते.. घरचे माझ्या मनात असले काही वेडेवाकडे विचार येऊ नयेत म्हणून जे जपत होते ते मला आजही आठवतेय.. आणि कदाचित त्याची जाणीव ठेऊन, त्यांच्या व्यवस्थित सांभाळून घेण्यामुळे, मी परत दहावीच्या मार्कांवर डिप्लोमाला प्रवेश घेतला आणि वीजेटीआय मधून डीग्री वगैरे करून आज माझे व्यवस्थित चालूय.. अर्थात ते तसे नसते झाले तरी मी माझ्या लाईफचे काही ना काही केले असते, पण आत्महत्या तर दूर कधी नैराश्याचे विचारही मनात आणले नसते.. कारण आपले आयुष्य हे केवळ आपले नसते हे माझ्या मनावर तेव्हापासून ठाम बिंबले आहे.
निंबुडा, गामा
निंबुडा, गामा पैलवान
धन्यवाद
मी सुद्धा मागे वर्षभरापूर्वी पेपरात अश्या दोन-तीन बातम्या वाचल्या होत्या. त्याच मनात घोळत होत्या. त्यावरूनच कथा लिहिली. माझ्या मैत्रीणीची कथा नसली तरी ही आपल्या समाजात घडणारी सत्यकथाच आहे.