पालक पराठा आणि हिरवी करी
पराठे बनवण्यासाठी लागणारा वेळ : साधारण अर्धातास.
पराठा साहित्य :
दोन जुडी पालक
१० पाकळ्या लसुण
अर्धा इंच आले किसुन
धण्या जिऱ्याची पुड १ छोटा चमचा
हळद, मीठ, तिखट चवीनुसार
गव्हाचे पीठ दीड वाटी,
बेसनाचे पीठ अर्धी वाटी
पाणी आणि तेल/ तुप
पालक धुवुन बारिक चिरावा. लसुण आणि आले मिक्सरमध्ये बारिक करुन घ्यावे. गव्हाचे पीठ आणि बेसनाचे पीठ व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे त्यात तिखट, मीठ, हळद, धण्याजिऱ्याची पुड, लसुण आल्याची पेस्ट आणि शेवटी चिरलेला पालक घालावा. पाणी न घालता मळुन घ्यावे. आता गरजेनुसार पाण्याचा हात लावावा. थोडे तेल घालुन कणकेचा गोळा करुन ठेवावा. याचे पराठे बनवुन तुपात किंवा तेलात भाजावे. ( तुपातले पराठे अर्थातच चवीला जास्त चांगले लागतात.)
करीचे साहित्य :
१ वाटी हिरवे (सबंध/ शाबुत) मुग,
अर्धी वाटी काळे उडीद
लसुण ठेचलेला १ टेबलस्पून
आल्याची पेस्ट १ छोटा चमचा
जिरे १ चमचा
४ ते ५ हिरव्या मिरच्या,
मीठ चवीनुसार,
हळद अर्धा चमचा,
तेल/ तुप चवीनुसार
पाणी १/२ ग्लास
हिरवे मुग आणि उडीद चार तास कोमट पाण्यात भिजवावे. कढईत तेल गरम करुन त्यात जिरे टाकावे. नंतर त्यात ठेचलेला लसुण टाकावा. लसुण खुप वेळ परतावा. ब्राऊन झाल्यावर त्यात आल्याची पेस्ट, बारिक चिरलेली हिरवी मिरची आणि हळद घालावे. आता यात भिजवलेले मुग आणि उडीद घालावे. थोडा वेळ परतवुन मग त्यात पाणी टाकावे. १५ ते वीस मिनिट शिजल्यावर गॅस बंद करा आणि आता गरम गरम पराठ्याबरोबर याचा आस्वाद घ्या. हिरवे पराठे आणि हिरवी करी पाहुनच मन प्रसन्न होते
हाय
हाय प्रिन्सेस,
काय solid recipie आहे गं
वाचुनच तोंडाला पाणी सुटलं
मला जरा पार्सल कर ना पराठे!!
वा! सहीच
वा! सहीच आहे हे हिरवेगार जेवण!
दोघांसाठी..
दोघांनी मिळून, दोघांसाठीच हे पदार्थ केले तर ३० मिनिटात होतील. ~D ~D
साधारण वेळ लिही गं.
(स्पर्धेचे नावच फक्त '३० मिनिट मील्स' आहे, ते ३० मिनिटात झाले पाहिजे असा काही नियम नाही. )
पण रेसिपी छान आहे.
-लालू
लालु :)
अग ३० मिनिट मील आहे हे लक्षातच नाही आले मला :ड
पण एकटीने केले तरी ४० ते ४५ मिनिटात होते ग. आणि पुर्वतयारी असेल तर एवढाही वेळ लागणार नाही. पटकन होईल. दोघांनी करुन बघण्याचा अनुभव नाही मला :प.
-प्रिन्सेस...
एक शंका
एक शंका आहे. मूग आणि मसूर नुस्ते भिजवून सरळ गॅसवर ठेवले तर शिजतात? प्रेशरकूक करायला लागत नाही?
पीएसजी...
नाही ग प्रेशर कूक करायची मुळीच गरज नाही. गॅसवर व्यवस्थित शिजतात. प्रेशर कुक करायचे असेलच तर (घाई असल्यास) ५ ते ७ मिनिटापेक्षा जास्त वेळ करु नये. नाहीतर भाजीचा रंग बदलतोच शिवाय मुग आणि उडीद चुकुन जास्त शिजलेत तर भाजी अगदी गुळगुळीत होउन जाते. हे सांगु शकतेय स्वानुभवामुळेच
-प्रिन्सेस...
मस्त आहे
पुनम, एकदम छान वाटतेय ही कृती. करुन बघेन आता लवकरच. फक्त माझा स्वयंपाकाचा (शुन्य) अनुभव बघता ३०-४० मी. मध्ये हे करुन होइल असे वाटत नाही.