'हा भारत माझा' - डॉ. आनंद नाडकर्णी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 May, 2012 - 06:10

'हा भारत माझा'ची निर्मिती प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून मी पाहिली आहे. माझी भूमिका एका आस्वादक प्रेक्षकाची आहे या प्रक्रियेत. या दिग्दर्शकद्वयीनं नवीन काही लिहिलेलं वाचून दाखवताना मी तिथे असतो. 'हा भारत माझा'चं कथानक वाचून दाखवलं, तेव्हा ते आंदोलनाच्या विषयाशी अगदी घट्ट बांधलेलं होतं. चित्रपट प्रेक्षकांसमोर येईपर्यंत आंदोलनाचा जोर टिकेल का, असं मला वाटत होतं. पण तरीही कुठल्याही सर्जनशील माध्यमात काम करणार्‍याच्या दृष्टीनं ते सगळं वातावरण टिपणं, हेदेखील खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आंदोलनाशी निगडीत तरीही वैश्विक पातळीवरचं कथानक लिहिलं जायला हवं, असं मला वाटत होतं. कथानकात या दोन्हीही गोष्टींचा समावेश आहे.

माणसाचा स्वभावधर्म पाहता, नि:स्वार्थी होणं हे फार कठीण असतं. पण एखाद्यावेळी अशी लाट येते जी तुम्हाला स्वतःच्या स्वार्थापलीकडे जायला प्रवृत्त करते. त्या लाटेचा तुमच्यावर परिणाम होऊन तुमचा स्वार्थ आणि ती लाट यात संघर्ष होऊ लागतो. तो संघर्षच या चित्रपटात दाखवलेला आहे. हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला अत्यंत तरल संघर्ष आहे. मला हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य वाटतं. हा कुठल्याही विशिष्ट व्यक्तीचा नसून तुमचा-आमचा संघर्ष आहे, त्यामुळे चित्रपटाला वैश्विक परिमाण मिळालं आहे. भ्रष्टाचार हा फक्त राजकीय पातळीवरचाच नसतो, तर कुटुंबातल्या नात्यांच्या शोषणाचाही असतो. कुटुंबातले प्रश्न सोडवताना होणारं नात्यांचं शोषण हा मोठा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारात अशा खूप सूक्ष्म पातळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या पातळ्या वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे. समोरची व्यक्ती प्रतिकार करु शकणार नाही, हे माहीत असूनही नात्यांचं शोषण चालू राहतं. पण त्यात सदसद्विवेक आणि करावी लागणारी तडजोड यांचा संघर्ष सुरु होतो. आंदोलनाचं वातावरणही त्या सदसद्विवेकाला जागवणारं असतं काही काळापुरतं. त्या पार्श्वभूमीवर कथा पुढे जाते. प्रत्यक्ष जीवनातही अशा वातावरणाची गरज आहे का?, आपण स्वतःच आपला विवेक जागृत नाही का ठेवू शकत?, असे अनेक प्रश्न हा चित्रपट उभे करतो. यातल्या नायकाला, इंद्र सुखात्मेला नि:स्वार्थीपणा जपायचा असेल तर त्याने काय करावं?, असं हा चित्रपट विचारतो. यात तरुण मुलांचे प्रश्न, पालक आणि या मुलांमधले गुंते असंही चित्रण येतं.

हा अतिशय कमी खर्चात निर्माण केलेला चित्रपट आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण एखादी कलाकृती निर्माण करायला अमाप पैसा घालायलाच हवा असं नाही, माध्यमाशी तडजोड न करता अशाप्रकारे सर्जनशील प्रतिक्रिया व्यक्त करता येते, हे त्यामुळे सिद्ध होतं. तसंच, या चित्रपटाला स्वतःची अशी संथ लय आहे. बरेचदा वेगवान पटकथा किंवा संकलन यांत गुंतून आपण आपली विचारशक्ती बाजूला ठेवतो, याउलट अशी संथ लय असलेले चित्रपट आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. त्यामुळेच व्यावसयिक चित्रपटासारखा वेग नसूनही हा चित्रपट खिळवून ठेवतो.

A3_3_0.gif
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users