फ्रुट पराठा, पालक पोळी - शेफ विष्णू मनोहर यांच्या पाककृती

Submitted by चिनूक्स on 9 September, 2008 - 22:13

मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
---------------------------------------------------------------
. फ्रुट पराठा

लागणारा वेळ :
१५ मिनिटे

साहित्य :
पपई, अननस या फळांचे तुकडे - १ वाटी
मिक्स फ्रुट जॅम - ४ चमचे
मैदा - २ वाट्या
दूध - १ वाटी
बेकींग पावडर - अर्धा चमचा
मीठ , साखर - चवीनुसार

कृती :
मैद्यात कोमट दूध, बेकींग पावडर, मीठ, साखर, तेल घालून, घट्टसर भिजवून घेणे.
फळांमध्ये २ चमचे साखर मिसळावी.
भिजलेल्या गोळ्याची पारी लाटून त्यावर फ्रुट जॅम पसरावा.
त्यावर २ चमचे फळांच्या फोडी घालून त्यावर जॅम लावलेली दुसरी पारी ठेवावी.
हा पराठा तुपावर मंद आचेवर भाजून घ्यावा.
दह्यात मीठ, साखर, तिखट घालून त्याबरोबर हा फ्रुट पराठा खायला द्यावा.

वाढणी :
२ माणसांसाठी

---------------------------------------------------------------

. पालक पोळी

लागणारा वेळ :
१० मिनिटे

साहित्य :
ताजा पालक - १ जुडी
ओला नारळ (खवलेला) - ३ चमचे
कोथिंबीर - ४ चमचे
हिरवी मिरची (बारीक चिरलेली) - १ चमचा
पोळ्या - ४
२ लिंबांचा रस
मीठ, साखर, तेल

कृती :
पालक निवडून, नीट चिरून घ्यावा.
त्यात ओला नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून हे मिश्रण नीट एकत्र करावे.
हे मिश्रण पोळीवर पसरून, पोळीचा रोल करून तव्यावर मंद आचेवर भाजावा. वाटल्यास मधून तेल सोडावे.
हे रोल गरम असतानाच कापून टोमॅटो केचपबरोबर खायला द्यावेत.

वाढणी :
२ माणसांसाठी

---------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, शेफच्या सगळ्याच रेसिपीज छान, सोप्या आणि कमी वेळ लागणार्‍या आहेत. आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल आभार.

ही पालक पोळी, आणि तशीच मेथी पोळी ( ठेपल्या टाईप) हा माझाही आवडता खाद्य प्रकार आहे. सोबत मस्त पैकी शेंगदान्याची दही टाकुन केलेली चटनी पण मस्त लागते.

रेसिपीज छान आहेत पण त्या फ्रूट पराठ्याबद्दल एक शंका...
जी फळं घ्यायची आहेत त्यांना पाणी सुटणार नाही कां? आणि पाणी सुटल्यावर तो लाटायचा कसा?

या व इतर पाककृतींबाबतच्या शंकांचं निरसन मी श्री. विष्णू मनोहर यांना विचारून करेन. अजून ४ पाककृती शिल्लक आहेत. Happy

त्या पालकपोळी बद्दल अजुन एक शंका,
हे मिश्रण पोळीवर पसरून, पोळीचा रोल करून तव्यावर मंद आचेवर भाजावा.
--- म्हणजे पुर्ण भाजलेली तयार पोळी का, की फक्त लाटलेली कच्ची पोळी ज्यात ते मिश्रण भरुन मग पोळीचा रोल भाजायचा?

<<म्हणजे पुर्ण भाजलेली तयार पोळी का, की फक्त लाटलेली कच्ची पोळी ज्यात ते मिश्रण भरुन मग पोळीचा रोल भाजायचा?>>
पूर्ण भाजलेली तयार पोळी परत मंद आचेवर भाजायची.
पाककृती लिहून घेताना मी हे विचारलं होतं.