गेल्या दोन महिन्यात घडलेल्या असंख्य घडामोडी आणि धावपळीनंतर आत्ता कुठे तिला जरा शांतता, फुरसत मिळाली होती. म्हणजे अजून तसा प्रवास संपलेला नाहीच आहे. पण तरीही सकाळपासून रेल्वेचा प्रवास, मग एअरपोर्टवर सिक्युरिटी वगैरे नाटकं संपवून पॅरिसच्या 'चार्ल्स डे गॉल' विमानतळावर ती पुढच्या विमानाची वाट पाहात थांबली होती. दगदग, गडबड होती तरी हातात घेतलेली सगळी काम यथायोग्य पार पडली या विचारानीच तिला शांत वाटत होतं. असं दमून-भागून शांत, स्वस्थ झाली की कायम बसल्या बसल्या 'काय काय घडून गेलं' याची उजळणी, त्यावर विचार करायची तिची नेहेमीची सवय. हातात आवडीची कॉफी घेऊन, त्या कॉफीच्या कपाचा गरम उबदार स्पर्श अनुभवत तिनं डोळे मिटले आणि मनातले विचार आवरायला घेतले.
रेनोच्या ह्या कॉन्फरन्सला जायची आलेली संधी, फ्रान्सच्या व्हिसाच्या अक्षरशः दहा मिनीटाच्या फ्रेंच कॉन्सुलेट मधल्या कामासाठी केलेला बारा तासाचा ड्राइव्ह... पॅरीस ते रेनो या प्रवासात अवघ्या आठ दिवसापूर्वी अनुभवलेला युरोरेलचा अनेक वर्ष 'स्वप्नवत' असलेल्या प्रवासाचा मस्त सुखावणारा अनुभव, मनाला विलक्षण भुरळ पाडणारं ते रेनो हे लहानसं गाव आणि त्याहीपेक्षा अद्भुत अनुभव देऊन गेलेली रेनो ची कॉन्फरन्स आणि मिटींग. गेली आठ्-दहा वर्ष या क्षेत्रात रिसर्च करताना ज्या दिग्गज लोकांचे पेपर्स वाचले, ज्यांचा रिसर्च फॉलो केला अशा काही लोकांबरोबर बसून गेले ३-४ दिवस आपण सायन्स बद्दल बोललो, गप्पा मारल्या ह्याची नुसती आठवण तिला खूप समाधान देऊन गेली. आपल्या गाईडला आणि जुन्या सहकार्यांना आवर्जून कळवायला हवं ह्या पॅरिस ट्रीप बद्दल.....
पॅरिस...
... आणि या शब्दानी अचानक तिच्या मनातल्या विचारांनी वेगळंच वळण घेतलं. धावपळ, टुर डे फ्रान्स, रिसर्च, कॉन्फरन्स, प्रवास सगळं सगळं विचारात अचानक खूप मागे पडलं आणि ती बसल्या जागेवरून उठली. अचानक सैरभैर झाली.. तिची नजर 'चार्ल्स डी गॉल' विमानतळावर काही शोधू लागली. अवघ्या आठ दिवसांपूर्वी काही काळ का होईना आपण ह्याच विमानतळावर थांबलो होतो.. बॅग घेऊन ट्रेनकडे जाण्यासाठी.. पण तेव्हा हा अनुभव नव्हता आला आपल्याला! तेव्हा हे अजिबातच जाणवलं नव्हतं ! ती परत परत त्या अनुभवाबद्दल साशंक होऊन स्वतःलाच प्रश्ण विचारत होती.
मग आत्ताच असं वेगळं, कधी न अनुभवलेलं कसं काय अनुभवतोय आपण? कसं शक्य आहे हे? आपल्याबाबतीत....?
तिला जाणवलं आत्ता जरा निवांत डोळे मिटून शांत बसलेली असताना एक एक घटना आठवत तिच्याही नकळत ती 'चार्ल्स डी गॉल' विमानतळावरच्या 'त्या' प्रसंगापर्यंत अलगद येऊन पोचली होती.
* सन १९५८
फेड इन
गुरुदत्त च्या चित्रपटांसाठी त्याच्याबरोबर लेखनसहाय्य करणारा, सुप्रसिद्ध आणि नावाजलेल्या 'साहेब बीबी और गुलाम' या चित्रपटाचा दिग्दर्शक अबरार अल्वी आणि गुरुदत्त लंडनला जाणा-या विमानात बसतात.
ह्याच विमानात नुकत्याच गाजलेल्या 'मदर इंडिया' च्या यशानं झळाळणारी नर्गिसही आहे.
प्रवासात त्या तिघांमधे सिनेमाजतातल्या विविध विषयांवर मस्त, दिलखुलास हसतखेळत गप्पागोष्टी चालल्या आहेत. या गप्पांवर प्रत्येकाच्या खास व्यक्तीमत्वाची, उत्तम वाचनाची आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याच्या वृत्तीची खास छाप जाणवतीये.
आता पॅरिसला दोन तासांचा स्टॉप-ओव्हर.
अल्वीची ही पहिलीच परदेशवारी. आधीच अल्वी उंची अत्तरांचा शौकीन आणि त्यात पॅरीस उत्तमोत्तम उंची अत्तरांसाठी विशेष प्रसिद्ध. एखाद्या लहान मुलासारख्या उत्साहात अत्तराच्या विविध बाटल्यांचे आकर्षक आकार पाहून अल्वी अनेक प्रकारच्या अत्तरांची खरेदी करतो.
नर्गिस थोडा वेळ हे सगळं दुरुन शांतपणे पाहात आहे.
पण एक क्षण असा येतो की अल्वीने कोणताही विचार न करता, अतिउत्साहाच्या भरात केलेल्या ह्या अत्तरांच्या खरेदीनं अस्वस्थ होऊन शेवटी न राहवून नर्गिस सगळ्या खरेदीचा ताबा घ्यायचं ठरवते.
नर्गिस (अतिशय संयमीत राहून) - अबरार, आत्तापर्यंत तू खरेदी केलेली ही सगळी अत्तरं स्त्रीयांसाठी असलेली आहेत. त्यांचा तुझ्या वापरासाठी काहीच उपयोग नाही. तुला ती वापरता येणार नाहीत.
अल्वी (उत्सुकतेने) - अत्तरांमधे स्त्री, पुरुष असा लिंगभेद असतो?
नर्गिसच्या चेह-यावर एक प्रसन्न हास्य उमटतं आणि ती अबरार अल्वीला अत्तरं बनवण्यामधलं शास्त्र, त्यातली कला, त्यातली अभिरूची, अत्तरांमुळे निर्माण होणारी वातावरणनिर्मिती, त्यांचा माणसाच्या मानसिक स्थितीवर होणारा प्रभाव अशी खूप सारी माहिती सांगते. स्त्री आणि पुरुषांनी वापरायच्या अत्तराच्या गुणधर्मात असलेला फरक सांगून, वर्षानुवर्षांच्या अभ्यासानंतर आणि कलात्मक विचारसरणीनुसार, स्त्री आणि पुरुषांसाठी असलेली अत्तरं कशी वेगळी असतात ते समजावून सांगते.
अल्वी (नर्गिसला उद्देशून) - बरं मग तूच मला माझ्यासाठी कोणतं अत्तरं योग्य आहे हे सुचवं बर?
नर्गिस (अल्वीकडे विचारपूर्वक पाहात) - Crepe de Chene.
अल्वीने Crepe de Chene खरेदी करतो.... त्यानंतर तो परत परत Crepe de Chene खरेदी करतो....
पॅरिस विमानतळावरच्या ह्या प्रसंगानंतर अबरार अल्वी आयुष्यभर फक्त आणि फक्त Crepe de Chene हे अत्तरंच वापरतो.
कट.
......
... आणि आता पॅरिस विमानतळावर उभं राहून ती Crepe de Chene च्या अस्तित्वानं सुगंधित झालेली जागा शोधत होती.. गंमत म्हणजे तो सुवास, गंध तिला जाणवत होता, आकर्षित करत होता. तिला त्या अज्ञात जागेकडे खुणावत होता. एका अनामिक ओढीनं ती त्या सुगंधाचा माग काढत होती.. त्याचा शोध घेत होती...
आणि तिला सगळ्यात जास्त आश्चर्य याच तर गोष्टीचं वाटत होतं !
जिथे आपल्या हातातल्या इतक्या स्ट्रॉग कॉफीचा वासही जिला जाणवत नाहीये तिथे Crepe de Chene चा तो मंद, दरवळणारा सुगंध आपल्याला कसा काय जाणवतोय, मोहित करतोय?
शेवटचा 'गंध' आपण केव्हा अनुभवला हे ही खरं तर तिला आता आठवेनासं झालंय. स्वयंपाक करताना साधा कांदा परततानाही 'आला का वास? गेला का नीट कांदा परतला?' असं आजूबाजूच्या कोणाला विचारावं लागतं तिला. रिसर्च लॅब मधे एखाद्या अतिशय तीव्र आणि उग्र वास असलेल्या केमिकलच्या बाटलीचं नुसतं क्षणभर झाकण जरी उघडलं तरी दिवसभर हैराण होणारे लोक नक्की कशामुळे हैराण होतात हे तिला कळत नाही. इजिप्त मधल्या सर्वात उंची अत्तरांच्या दुकानात लोक नक्की कोणते वास, सुगंध येत आहे म्हणुन इतके प्रफुल्लित झालेले, आनंदी झालेले तिनं पाहिले त्याचं कारण तिला आजही उमगलेलं नाही... .
पूर्वी असं नव्हतं. एकेकाळी चांगले, वाईट, गोड, आंबूस, तीव्र, आकर्षित करणारे, दूर लोटणारे, सुखावणारे, दु:खाची जाणीव करून देणारे सगळे सगळे 'गंध' ती अनुभवू शकत होती...पण...शेवटचा कोणताही गंध आपण कधी अनुभवलाय हे आता तिलाही आठवत नव्हतं. नाही म्हणायला 'कोड आलेल्या व्यक्तीच्या शरीराला' येणारा वास तिला हमखास खूप लांबूनही जाणवतो... इतकाच काय तो तिच्या आयुष्यात उरलेला गंध.
पण आज... आज इथे काही वेगळंच घडत होतं. आज पॅरिस विमानतळावर ती चक्क Crepe de Chene चा सुगंध अनुभवत होती... तिच्या मनाला तो वास प्रसन्न करत होता.
तिच्यासाठी कोणताही गंध अनुभवायला मिळणं हाच मुळात एक विलक्षण अनुभव होता.
त्या Crepe de Chene च्या वासानं तिच्या 'अगंधित आयुष्याला' निदान काही क्षणांसाठी तरी नक्कीच सुगंधित केलं होतं.
Crepe de Chene चा गंध तिच्या मनात भरून राहिला होता..
...आठवणींनाही 'गंध' असतो असं म्हणतात ते खरंच असावं !
------- समाप्त --------------
* The Life and Times of Nargis by TJS George या पुस्तकातील काही भागाचे मराठीमधे रुपांतर करुन.
मस्तच. गंधाची तहान लागलेली
मस्तच. गंधाची तहान लागलेली असली की येतात असे गंध अनुभवता.
छान लिहिलयस
छान झाले आहे रुपांतर. आवडले.
छान झाले आहे रुपांतर. आवडले.
बी, (एक खुलासा) सगळा लेख
बी, (एक खुलासा) सगळा लेख रुपांतरीत नाही आहे. केवळ तो नर्गिस आणि अबरार अल्वी यांच्यात घडलेला प्रसंग रुपांतरीत आहे.
मस्त!!
मस्त!!
खुप छान
खुप छान लिहिलय्....मसतच्...माला पण अत्तरची खुप आवड आहे....
ठीकच लेख. नेहेमीसारखा नाही
ठीकच लेख. नेहेमीसारखा नाही वाटला.
ठीकच लेख. नेहेमीसारखा नाही
ठीकच लेख. नेहेमीसारखा नाही वाटला.>>> +१
क्लिशे पण वाटतोय.
मस्तच
मस्तच