जयतुनबी

Submitted by निरंजन on 22 April, 2012 - 00:50

जयतुनबी

बदली झाली की नविन गाव कस असेल याची उत्सुकता व जुनं गाव सोडताना वाईट वाटणं दोन्ही असायचच.

गाव सोडताना मित्र येऊन भेटत. खुप रडु यायच. गावानी केलेल प्रेम, शाळॆत शिक्षकांनी दिलेली शिकवण. सर्व आठवायच. शेजारी झालेल्या ओळाखी, आपंण लावलेली झाड, पाळलेले प्राणी सर्व त्याच गावात सोडुन जाव लागायच. अशी किती गावं पाहिली किती प्रकारचे लोकं भेटले. साधारणपणॆ या लोकांची व माझी परत भेट झाली नाही. एखाद्या माणासाची भेट गाठ झाली की सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. कोण कुठे आहे काय करतोय या सर्वाची चौकशी होते.

नविन गाव आपल्याला सामाऊन घेईल का नाही. याची एक धाकधुक मनात घेऊनच प्रत्येक गावात प्रवेश केला आणि आश्चर्य म्हणजे आज तागायत नीट स्वागत झाल नाही अस कधीच झाल नव्हत.

असच जेव्हा आमची बदली खोताच्यावाडिला झाली तेव्हा याच मनस्थितीत आम्ही गावाजवळ पोहोचलो. रात्रीची वेळ होती आणि मीट्ट काळोखात बसनी आम्हाला खोताच्यावाडिला सोडल होत. सामान आधीच गेस्ट हाऊसवर पो्होचल होत. आम्ही कंडक्टरनी सांगीतलेल्या दिशेनी चालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात एक टांगा आला आणि टांगेवाला उतरुन धावतच आला. त्याला पोचायला उशीर झाला होता. आम्हाला उतरवायची व्यवस्था त्याच्या कडे होती.

त्याच नाव इस्माईल. त्यानी आमच सामान घेतल व टांग्यात ठेवल. बाबा त्याच्याशी बोलत होते व मी आणि आई मागे बसलो होतो.

टांगा गेस्टहाऊसपाशी रस्त्यावर थांबला व आम्ही चालायला सुरुवात केली. तशी खेड्यापाड्याची आम्हाला सवय होतीच, त्यामुळे पायाखालची पायवाट साधारण दिसली तरी पुष्कळ होत. जेवणाखाण्याची व्यवस्था इस्माईलनी चोख ठेवली होती. मी तर न जेवता तसाच झोपुन गेलो.

सकाळी उठलो तेव्हा या गावाच दर्शन खर्‍या अर्थी घेतल. इस्माईलचा मुलगा रुस्तुम त्याच्या झोपड्या बाहेर आला आणि माझ्याकडे पाहुन हासला. हाच माझा त्या गावातला पहिला मित्र. रुस्तुम हा या गावात शोभणारा नव्हताच. तो व त्याची आई जयतुनबी खुप गोरे व सुंदर होते.

रुस्तुमनी मला सर्व गाव दाखवला, शाळा, दवाखाना, आठवड्याचा बाजार, गावात असलेल मनुच एकुलत एक दुकान. तासाभरात सर्व गाव दाखवुन झाल. हातात डबडी घेऊन जाणार्‍या मुलांशी ओळाखी झाल्या आणि खेळायला तळ्यावर येण्याच मला आमंत्रणसुद्धा मिळाल. थोडक्यात एका दिवसात मला गावानी आपलस करुन घेतल होत. माझ्यासाठी इतक आपलस करुन घेण पुष्कळ होत. बाकी गोष्टी आई बाबा बघणार होते.

घर मिळुन स्थिरस्थावर व्हायला आठवडा लागला. त्या आठ दिवस आम्ही गेस्ट हाऊसवर राहात होतो. इस्माईलची झोपडी गेस्टहाऊस जवळ होती.

आम्ही आमच्या घरी राहायला आलो तरी माझी व रुस्तुमची मैत्री तशीच होती व मी त्याच्याशी खेळायला जायचो. जयतुनबी कोंबडी कापली की मला जेवायला थांबवूनच घ्यायची. काय मस्त चव होती त्या रस्याची. आजही माझ्या जिभेवर ती चव आहे.

या गावात मी सर्वात जास्त मजा केली. तळ्यात पोहोण, चिंचा, बोर, करवंद खाण आणि गावभर हुंदडणं. याच गावात मी साप पकडायला शिकलो. एका हातानी त्या सापाला खेळवायच व दूसर्‍या हातानी त्याच्या मानेजवळ पकडायच आणि एका झटक्यात त्याला उचलून धरायच. त्याच्या शेपटीला दूसर्‍या हातानी पकडायच की झालं. कितीही जहाल साप असला तरी तो काही करु शकत नाही. पाऊस सुरु झाला आणि साप जास्तच झाले की मग कोण कोती साप पकडतो याची स्पर्धाच चालू झाली. रुस्तुम यात वाकबगार होता. त्याला कोणत्या भागत जास्त साप मिळतील हे माहिती असायच.

एक दिवस आम्हाला खेळाताना निरोप आला की "पाट्लांच नव शेत लावायच आहे. त्यासाठी पाटलांनी बोलावलय"
झालं खेळ लगेच थांबवून आम्ही पाटलांच्या नव्या शेतावर गेलो. आमच्या आधी अर्धा गाव तीथे पोहोचला होता. तरी आम्ही सर्वांनी पुढे घुसुन सर्वात पुढच्या जागा पटकवल्याच. शेताच्या बांधावर आम्ही सर्व बसलो. नविन शेत लावायच म्हणजे काय, मला तर सर्व नवच होत. प्रकार असा होता. आधी शेताची पुजा केली जायची. गुरव शेंदूर गुलाल फ़ुलं सर्व शेताला वाहायचा. काही मंत्र पुटपुटत असायचा.

शेताच्या रखवालदाराला (प्रत्येक शेतात एक रखवालदार असतो असा समज आहे. तो कोणत्याही रुपात असतो. कधी सापाच्या तर कधी देवाच्या तर कधी चक्क भुताच्या)

"महाराजा ! या शेताच्या मालकाला या शेतातुन यश येऊ दे महाराजा S S S !
काम करताना कोणाला इजा होऊ नको देऊस महाराजा S S S !"

अस त्या रखवालदाराला आळवलं. मग धणॆ व गुळ हा प्रसाद दिला. मला हा प्रसाद फ़ार आवडला.
मग सर्वात आधी पाटिल व पाटलीण शेतात उतरले. त्यांनी शेतातला चिखल तुडवला आणि मग मुलांना चिखल लावला. या दिवशी हा चिखल फ़ार पवित्र मानला जातो.

गावकर्‍यांनी पाटलिणीला नाव घ्यायचा अग्रह केला. पाटलीणीनी हो नाही करत उखाण्यात आणि मोठ्या आवाजात नवर्‍याच नाव घेतल. मग एक एक करत सर्व मजुर शेतात उतरले. जयतुनबीसुद्धा शेतात उतरली. मीच ओरडुन "जयतुनबी नाव घे " म्हणालो. आणि गावानी उचलुन धरल. जैतुनबी तयारच नव्हती. शेताच्या बांधावर उकिडवा बसलेला इस्माईल म्हणाला "ले न जैतुन. इतना बच्चा बोल रहा है, और गांव भी बोल रहा है" पाटलिणबाई म्हणाल्या "घे न नाव जयतुन" आता जयतुनबीला काहीच इलाज नव्हता.

ती शेतात उतरली. त्या चिखलात हात धुतला. एक टिळा स्वतःच्या कपाळावर लावला. आणि तो चिखलाचा हात माझ्या व रुस्तुमच्या गालावरुन फ़िरवला. जयतुनबीच्या गोर्‍या रंगावर तो चिखल काय मस्त दिसत होता.
परत जयतुनबी ओणवी झाली. चिखलात हात धुत तीनी उखाणा घेतला

"सोनेका बर्तन ! गुलाबका पानी !
हात धोती ! इस्माईलकी रानी !! "

वा काय मस्त उखाणा घेतला होता. मस्त उपमा. ज्या शेतात आपण काम करणार व ज्या शेतातुन धान्य पिकवणार, त्या शेताला सोन्याच्या भांड्याची उपमा व त्यात असलेल्या चिखलाच्या पाण्याला "गुलाबका पानी". मी माझ्या नकळत टाळ्या वाजवल्या. आणि माझ्या पाठोपाठ सार्‍या गावानीसुद्धा. जयतुन्बी इस्माईलकडे व इस्माईल आपल्या या राणीकडे अशा प्रेमळ नजरेनी बघत होते की ती नजर मी विसरुच शकत नाही.

जयतुनबीच्या राजाची लुंगी फ़ाटली होती त्यातुन त्याची मांडि व फ़ाटलेल्या बनियन मधुन पोटाचा खड्डा दिसत होता. त्याच्या राणीच्या गोर्‍या चेहर्‍यावर लागलेला चिखल तीच सौंदर्य आणखिनच खुलवुन टाकत होत. चेहर्‍यावरच्या तृप्त भावांनी तीच्या चेहर्‍याला एक तेज आल होतं. चमकणारे डोळे व गोड हासणं. जयतुनबी गावात सर्वांत सुंदर होती.

गावात टवाळखोर असतातच. कोणीतरी इस्माईलला म्हणाल.

" इस्माईल तू चार शादी कौ नही करता ? "

इस्माईल म्हणाला "मै खानदान मुसलमान हु. हम लोग एकही शादी करते है और आखिरतक उसको निभाते है"

जयतुनबीनी रुस्तुमसाठी गोल मुसलमानी टोपी विणली. मी पण मागे लागलो "मला पण कर" ती म्हणाली "तू जा आईला विचारुन ये" आई म्हणाली तुला आवडली तर घाल. मग मला पण तशीच टोपी विणली व त्या मुसलमानी टोप्या घालून मी व रुस्तुम गावात फ़िरुन आलो. कोणीतरी जयतुनला म्हणाल.

"जयतुन, ये बम्मनके पोट्टॆको तू बाटव्या क्या ?"

जयतुनबी उखडलीच

"अरे पागल, तू मुझे क्या समजता रे ? तो पोट्टा मुझे मेरे पोट्टे जैसा है. और टोपी घालनेसे कोई मुसलमान होता क्या ? उसके लिये नमाज पडना पडता ...."

जयतुनबीच धर्माबाबत ज्ञान जेमतेमच होत. खरच आपण मुसलमान म्हणजे काय तीला व इस्माईलला माहितीच नव्हत.
ईस्माईल म्हणाला

"क्या जयतुन, मै कभी नमाज पडता क्या ? पर मै मुसलमान है न. मुसलमान जनमसे होता ."

जयतुनबीनी व विचारणार्‍या गावकर्‍यानी सोडुन दिल. कोणालाच धर्मात फ़ारसा रस नव्हता.

जेव्हा आमची परत बदली झाली. तेव्हा मी रुस्तुमला मिठी मारली व आम्ही दोघेहि खुप रडलो होतो.

जयतुनबीनी मला जवळ घेतल व तीसुद्धा रडली होती. फ़ार माया लावली होती या घरानी.

अनेक दिवसांनी मी आज गावात आलो होतो.

मी गावात पोहोचलो. हेच ते गाव का ? कुठे गेली सर्व झाडं ? त्या टेकड्या ते तलाव. माझ्या सर्व आठवणी पुसल्या गेल्या होत्या. टेकड्या माती काढुन पार सपाट केल्या होत्या. काही ठिकाणी टोलेजंग ईमारती होत्या. तलाव बुजवले गेले होते. मला महिती सांगणारा माणुस सांगत होता. "साहेब आता गाव पहिल्यासारख नाही, खुप सुधारल आहे. पूर्वी गावात जायला बस नव्हती. भिवंडीला जाणारी बसच हायवेवर सोडायची . आता दर १५ मिनीटांनी बस आहे. गावात शाळा कॉलेज, हॉस्पिटल आहे "

अरे ही कसली सुधारणा. त्या जुन्या पायवाटा, झाडं, तलाव सर्व नाहीसे झालेले होते. करवंदांच्या जाळ्या, जांभळाची झाडं. चिंचा बोरं कुठे गेल सर्व ? लहान लहान वाड्य़ा, लहान झोपड्या. त्यांच्या समोर असलेल तुळाशी वृंदावन. कुठे गेल सर्व ? चौथी पर्यंत असलेली माझी शाळा मोठी झालेली होती. पण ते जीव तोडुन शिकवणारे शिक्षक, ते कुठे आहेत ? त्या शिक्षकाला "मास्तर हे तांदुळाच पोत आणलय कुठे ठेऊ" म्हणून त्याला घरपोच तांदूळ पोहोचवणारे शेतकरी कुठे गेले ? देवळात कशाचीही आपेक्षा न करता आपल्यासाठी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणारे पुजारी व त्या पुजार्‍याला महिनाभर पुरतील इतके तांदूळ देणारे शेतकरी कुठे गेले. सकाळी गाणं गाऊन ऊठवणारे पक्षी ऊडुन गेले. साप पळुन गेले.

नाही हे माझ गाव नाहीच. मी कुठे तरी भलती कडेच आलो होतो.

एक तरुण माणुस भिक मागत होता. माझ त्याच्याकडे लक्षच नव्हत. माझ्या आठवणीच्या गावात भिकारी कधी उपाशी राहिलाच नव्हता. त्याला पायलीभर तांदूळ दिले जात होते. त्यानी घरी जास्त माणस आहेत म्हणलं तर दोन पायल्या तांदूळ जास्त दिले जात होते. "मेहनत करुन का नाही कमवत ?" अस जास्तीत जास्त १ रुपया त्याच्या हातावर टेकवणार्‍या शहरातल्या लोकांसारखे हे लोक नव्हते. मी खिशात हात घातला हाती लागलेली नाणी त्या भिकार्‍याला दिली. त्याच्या लाचार चेहर्‍याकडे बघीतल. या गावात इतका लाचार माणूस कधी दिसलाच नव्हता.

पलिकडे मुलं क्रिकेट खेळत होती. कमजोर दिसत होती ती. मला माझे मित्र आठवले, गावभर हुंदडुन मजबुत झालेली मुल होती ती. माझ्या बरोबर आलेल्य़ा लोकांना जेवायला हॉटेलमधे जायच होत. त्यांना तीथेच सोडुन मी माझ्या लहानपणीच्या आठवणी शोधत गावात फ़िरायला निघालो. गावात फ़ेरी मारली आणि एका हॉटेलपाशी थांबलो. याच ठिकाणी पाटालांचा वाडा होता. आता उंच इमारत उभी होती आणि तळमजला संपूर्ण रेस्टॉरंट झालेल होत.

मी आत गेलॊ आणि काउंटरपाशी उभा राहिलो. काउंटरच्या मागे एक मोठा फ़ोटो लावला होता. तो एक फ़ोटो फ़क्त मला ओळाखीचा वाटला. गावचे पाटिल होते ते. त्या रुबाबदार फ़ोटोकडे पाहिल आणि मला तो करारी माणुस आठवला. गावाचा पालकच होता तो. कॊणीही कधीही त्याच दार ठोठवाव. मदत करायला सदा तयार.

काउंटरवरच्या मॅनेजरनी काय हव विचारल.
मी म्हणालो "या फ़ोटोतले पाटिल अथवा त्यांची मुल असतील तर मला त्यांना भेटायच आहे. मी या गावात खुप दिवसांनी आलोय"

मला लिफ़्टनी दूसर्‍या मजल्यावर नेल. पार थकलेले पाटिल सोफ़्यावर बसले होते. मला पाहिल्याबरोबर त्यांनी ओळखल.

मग जुन्या खुप गप्पा गोष्टी झाल्या आणि मी विचारल की

"पाटिल; इस्माईल, जयतुनबी व रुस्तुम कुठे आहेत."

थोडावेळ पाटिल थबकलेच व सांगायला लागले.

गाव जसं सुधारत गेल, तशा गावात रिक्षा यायला लागल्या. इस्माईलचा टांग्याचा धंदा चालेना. त्याला त्याच्या तालुक्यातल्या मित्रांनी रिक्षा घ्यायचा सल्ला दिला. एका मित्रानी त्याला एका काझीकडे नेल ते कर्ज द्यायचे. त्यांच्या कडुन त्यानी कर्ज घेतल व रिक्षा घेतली.

हे काझी व त्यांचे काही मित्र इस्माईलकडे वरचे वर यायचे. आता इस्माईलसुद्धा तालुक्यात शुक्रवारी नमाज पडायला जायचा. एकदा त्याच्याकडे काही मोठी धार्मिक मंडळी आली. अचानक आलेल्या या मंडळींचा अदरसत्कार नीट व्हायला हवा होता. इस्माईल लगेच मटण आणायला निघाला. मटणाच दुकान लांब होत. त्याची रिक्षा त्यादिवशी रिपेरिंगला गेलेली होती. तो पायीच निघाला.

घरी आलेल्या पाहुण्यांनी रुस्तुमला विड्याची पानं आणायला पिटाळल. त्यांना पाहिजे होत ती पान गावात मिळण शक्यच नव्हत. त्यांनी जे दुकान सांगीतल ते जरा लांबच होत. रुस्तुम शॉर्टकटनी सुसाट वेगात धावत निघाला. पानं घेऊन तसाच परत आला. पाहतो तर घराच दार बंद होत. आत जयतुनबीच्या किंचाळाण्याचे आवाज येत होते. त्यानी धावत जाऊन गावातल्या लोकांना बोलावल. गावच्या लोकांनी दार तोडल. जयतुन करत होती त्या भाकर्‍या इतस्तथा पसरलेल्या होत्या. भाकरी करायला चुलीपाशी बसलेल्या जयतुनला खेचडत त्या लोकांनी बाहेरच्या खोलीत आणाल होत. तीचा पदर जळलेला होता. आणि पाठ पूर्ण भाजुन गेली होती. त्यांच्या साठिच केलेल्या भाकर्‍या जयतुनच्या रक्तानी माखल्या होत्या. जयतुन्बी गयावया करत होती. रडत होती. धर्मावर खुप बोलणार्‍या पण मनातुन पशु असलेल्या या लोकांना कशाचच सोईर सुतक नव्हत. त्यांनी जयतुनबीवर पाशवी बलात्कार केला होता.

गावच्या लोकांनी त्या लोकांना खुप मारल. इस्माईल परत आला. त्याला सर्व समजल. त्यानी त्या काझीला लाथा घातल्या. सर्वांना पोलिस पकडुन घेऊन गेले.

रात्री जयतुनबीनी विहिरीत उडी मारुन जीव दिला.

लक्ष्मीपुढे न्यायदेवता नतमस्तक झाली. पुराव्या अभावी आरोपी सुटले व इस्माईल थोड्याच दिवसात वेडा झाला. रुस्तुम कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही.

सांगताना पाटलांचे डोळे भरुन आले. या पुढे बोलण्यासारख व ऎकण्यासारख काहीच नव्हत.

आल्या गेल्याच आदरातिथ्य करणार्‍या इस्माईलला व जयतुनबीला त्यांच्याच धर्माच्या लोकांकडुन जबरी शिक्षा मिळाली होती..

ऎकल आणि मन सुन्न झालं. तसाच बाहेर पडलो. आता गावात माझं म्हणाव अस कोणीच नव्हत.

पाटलांच्या शेताला वळासा घालुन रस्ता जात होता. त्याच शेताजवळ आलो. जीथे जयतुनबीनी उखाणा घेतला होता. तीच्या त्या सोन्याच्या भांड्याकडे बघितल. मला त्यातल्या गुलाबाच्या पाण्यात जयतुनबी दिसली.

मला म्हणत होती. "विसरुन जा मला". मला जयतुनबीची खुप खुप आठवण आली. आणि मी एकटाच त्या शेताच्या बांधावर बसुन हमसाहुमशी रडु लागलो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आईगं... इतक्या चांगल्या कुटूंबाची अशी दशा..
तुम्ही अगदी ह्रदयस्पर्शी लिहिलंय.... आवडलं

एका स्वप्नातल्या गावाची, कुटुंबाची परवड... वाताहात.
अतिशय सुंदर शब्दांत मांडलीये, निरंजन. खूप आवडली.

काका तुम्ही खरा शेवट अर्धवट लिहिला असला तरी कथेच्या शेवटी थोडक्यात खरे काय ते लिहायला हवे होते असे मला वाटते. जर एखादी अशी घटना आपल्या समाजात घडू शकते तर ती लोकांसमोर आली पाहिजे.

कथा उत्तम. लिखाणही सुरेख.

एक विचार - <<जयतुनबीच्या राजाची लुंगी फ़ाटली होती त्यातुन त्याची मांडि व फ़ाटलेल्या बनियन मधुन पोटाचा खड्डा दिसत होता. त्याच्या राणीच्या गोर्‍या चेहर्‍यावर लागलेला चिखल तीच सौंदर्य आणखिनच खुलवुन टाकत होत. चेहर्‍यावरच्या तृप्त भावांनी तीच्या चेहर्‍याला एक तेज आल होतं. चमकणारे डोळे व गोड हासणं.>>
हा परिच्छेद जरा लहान मुलाच्या वर्णनामधे बसत नाही असे वाटते. वेगळ्या रितीने हे लिहिले तर जास्त साजेशे होईल. उदा. मोठ्या माणसाच्या तोंडून हे वर्णन कथेमधे येउ शकते.

फार वाईट. होप ही एक सत्यघटना नाहिये.>>>>> अनुमोदन......
मांड्णी उत्तम पण फारच हृदयस्पर्शी, दु:खदायक कथा..