झुंज

Submitted by बेफ़िकीर on 19 April, 2012 - 07:14

जेमतेम वाहणार्‍या नदीकाठी बसून गढूळ पाण्यात आणि आपल्यात किती साम्य आहे याचा विचार करत असावी सुनिला! प्रवाह आहे तसे आपले आयुष्य आणि पाण्याचा रंग जसा गढूळ तसे आपले अनुभवविश्व!

दोन मनांमध्ये इतके जाड आणि अमोज पडदे का असावेत हे तिला समजत नव्हते. आजच दुपारी प्राथमिक शाळा सुटायच्या वेळी शाळेत झालेला प्रकार तिला अजून मनातून बाहेर फेकून देता येत नव्हता.

असहाय्य नक्कीच नव्हती ती, पण जख्मी होती, हर्ट! झुंजायला नुसतीच तयार होती असे नाही तर झुंजतच आजवर जगली होती. 'किती झुंजणार मी'असा विचार एकदाही मनात आलेला नव्हता आजवर, आजही नव्हता आला. पण आता खरेच थोडे थांबून स्वतःच्या इतस्ततः विखुरलेल्या अस्तित्वखुणांचा आढावा घ्यायला हवा होता. मी जे करत आहे त्याची दिशा काय, मुक्काम कोणता आणि मी कोठे पोचलेली आहे. सगळेच बघायला हवे होते. या आडगावात दुसरा पर्याय नव्हता नदीकाठी येऊन बसण्याशिवाय! तशी एक टेकडी होती, देवळे होती, एक लहान बागही होती, खुद्द शाळाही होती. पण सर्वत्र माणसे असायची. नदीकाठी डास असल्यामुळे फारसे कोणी तिथे यायचे नाही. 'बाई' नेहमी इथे येत असतात हे माहीत असल्यामुळे सुनिला येऊन बसली तरी कोणाला काही वाटायचे नाही.

वयाच्या बाविसाव्या वर्षी देवळे नावाच्या परजातीतील मुलाबरोबर सुनिला पळून गेली. पळून जाण्याआधी तिने घरातल्या सगळ्यांना स्वच्छपणे सांगितले होते. मनोहर देवळे आमच्या कॉलेजमधला एक मुलगा आहे, आमचे प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. तुमचा विरोध असला तर माझ्या लनाची कोणतीही जबाबदारी मी तुमच्यावर टाकणार नाही. कदाचित मी त्याच्याबरोबर पळूनही जाईन. माझ्यावर लक्ष वगैरे ठेवायला लागलात तर मी आत्ताच निघालेली बरी.

खूप मार खाल्ला वडिलांचा आणि मोठ्या भावाचा! मोठ्या भावाचे लग्न झालेले होते. त्याची बायको मधे पडून सुनिलाला वाचवण्याच्या प्रयत्नाचे नाटक करत होती, पण तिच्यामुळेच सुनिलाचे हे प्रकरण घरात समजलेले होते. तसेही सुनिला ते लवकरच स्वतःहून सांगणार होतीच, पण जरा घरातल्या मोठ्यांचा मूड कसा आहे हे बघून त्यावर बोलणार होती ती! ज्या संध्याकाळी मार खाल्ला त्या रात्री एक वाजता सुनिला घरातून पळून गेली. हे घरातल्यांना पहाटे पाचला समजले. इतका मार खाल्ल्यावर ती पळण्याचा प्रयत्न तर सोडाच, देवळे या मुलाचा विचारही सोडेल याबद्दल त्यांना खात्री होती. पण सुनिला पळाली. मूर्ख नव्हती ती. देवळेचे विचार आणि पॉलिसीज त्याही वयात तिला आकर्षक वाटत होत्या. खुद्द देवळे कुरूप होता, पण त्याचे संभाषण चातुर्य आणि विचार हे खरच बावनकशी होते. त्याच्यावर सुनिलाचे आणि त्याचे सुनिलावर निस्सीम प्रेम होते. पण ज्या दिवशी सुनिला पळाली त्या दिवशी ती पळून आपल्याकडे येईल हे देवळेलाही माहीत नव्हते. देवळे महार होता. गावाबाहेर असलेले त्याचे घर सहसा कोणी बघायलाही जायचे नाही. सुनिलाला पहाटे दिड वाजता आपल्या दारात पाहून देवळेच्या बापाने देवळेला जागे करून काठीने ठोकून काढले. देवळे बोंबलत असताना सुनिला मधे पडायचा प्रयत्न करू लागली की देवळेचा बाप घाबरून बाजूला व्हायचा आणि म्हणायचा...

"ओ ताई... अव जा घरला..काय करून र्‍हाईलाय... आमी म्हार होत..."

हे ऐकून सुनिला काही बोलणार तोच देवळेचा बाप देवळेला आणखीन एक तडाखा देत म्हणत होता...

"बामनाची पोरगी भुलीवत्योस व्हय भोसडीच्या.. जीव घेत्याल आपला ... ये ताई.. निघ तू बाई..."

दोघांनीही आज मार खाल्लेला होता... आणि... आज... दोघेही आपापल्या घरातून निसटले...

कित्येक वर्षे गुरे चरायला नेणार्‍या देवळेला मध्यरात्रीही पायाखालची वाट, रानवाटा, ढोरवाटा सगळे पाठ होते... अंधारात तो सुसाट जात होता आणि उजव्या हातात धरलेला सुनिलाचा डावा हात ओढत होता... सुनिलाला असल्या वाटांची सवय नव्हती.... पण आपला हात ज्या भरभक्कम हातात आहे त्यावर सगळे सोपवून ती त्रास सहन करत खेचली जात जात धावत सुटलेली होती... एक चप्पल तुटली.. . देवळेच्या डोक्यात एक फांदी बसून रक्त आले.. मधेच काही चित्रविचित्र आवाज आले... पण एक संपूर्ण रात्र... सूर्यनारायणाच्या खुणा स्पष्ट होईपर्यंत दोघेही एक संपूर्ण रात्र नुसते चालत होते... धावत होते...

पहाटे एका देवळात थांबले... हे गाव कोणते ते देवळेला माहीत होते... सुनिलाला नव्हते माहीत..

देवळे म्हणाला...

"हितून गाडी जातीया म्हवर्‍यास... "

सुनिला चमकलीच. देवळे दिशाहीन फिरत नव्हता हे तिला जाणवले.. म्हवरे गावाला देवळेचा मित्र होता आबाजी... तो श्रीमंत होता.. त्याच्याकडे नेणार बहुधा देवळे आपल्याला.. क्षणभर सुनिलाच्या मनात आले.. असे कसे भलत्यांच्या दारात जाऊन उभे राहायचे??? आबाजीला सुनिला नीट ओळखत होती.. आबाजी तालीम करायचा.. त्याला चार बहिणी होत्या... ही एवढी जमीन... आई म्हणजे लक्ष्मी आणि वडील म्हणजे संत.. आबाजीच्या भरल्या घरात आश्रय मिळेल हे सुनिलाला माहीत होते... पण संकोच वाटत होता..

एस्टी मधून देवळे तिकिटाविना कसा काय आपल्याला म्हवर्‍यापर्यंत आणू शकला हे काही केल्या सुनिलाला समजेना.. पैसेच नव्हते दोघांकडेही.. ती खोदून खोदून देवळेला विचारत होती... कंडक्टरने पैसे का नाही मागीतले?? देवळेने शेवटी तो कंडक्टर मित्र आहे आणि नंतर पैसे देईन त्याला असे सांगितले...

आबाजीच्या घरात सुनिलाचे आदरपूर्वक स्वागत झाले... आबाजी कुलवंत मराठा होता.. दिलदार होता.. त्याच्या बहिणी आणि आईंनी सुनिलाचे कौतुक केले.. तिला नवी साडी दिली नेसायला.. .

आणि वरच्या मजल्यावरून सुनिला खाली आली तेव्हा आबाजीचे वडील देवळेला सगळ्यांदेखत खणखणीत आवाजात म्हणत होते...

"म्हवर्‍यास राहण्यापरीस वीरला जा... तिथल्या शाळंत आरक्षण आहे.. आम्ही लावतो तुला तिथे शिक्षक म्हणून.. काय हो आबाच्याई??"

सगळं कामच झालं होतं. आबाच्या वडिलांचा आधार मिळाल्यामुळे दोघांवर असलेला त्यांच्या घरच्यांचा राग त्या लोकांना मुकाट गिळावाच लागला. करणार काय, दहा गावातला मोठा माणूस यांच्या पाठीशी.

एखाद लहानसं मुल असावं तसं देवळेवर सर्व काही सोपवून सुनिला वीर गावात आली.. लग्नच झालेलं नव्हतं अजून.. पण सांगितलं आपलं खोटच सगळ्यांना... आमचं लग्न झालेलं आहे असं...

पाटलांनी धाडलेल जोडपं म्हंटल्यावर वीरमध्ये खोली मिळाली... शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली देवळेला..

घरच्यांचे राग निवळले... वर्षादोन वर्षात घरचे वीरला येऊन जाऊन राहायला लागले.. जावईबापूंना मूळ गावी मान मिळू लागला.. सण होऊ लागले.. देवळेला शिक्षकीचा पगार दोन हजार... पण ते दोन लाख असल्याप्रमाणे वाटावेत असे सुनिलाने घर ठेवले होते.. मग देवळे घरातही क्लास घ्यायला लागला... इकडे सुनिलाच्या मागे मूल हवं म्हणून दोन्ही घरचे आग्रह धरू लागले...

देवळेलाही मूल हवं होतं.. होत नव्हतं इतकंच...

पण तीन वर्षे झाली आणि देवळेने प्रकार करून दाखवला... लांबच्या गावची एक महार तरुणी सरळ घरात येऊन राहू लागली.. ही कोण आणि का आली विचारलं की देवळे अचानक संतापायचा.. ती बाई तर सुनिलाशी बोलायचीच नाही...बाकी काम वगैरे एकदम लख्ख करायची..अगदी सुनिला नको म्हणेल इतकी मदत करायची...

आणि मग एक दिवस देवळेने स्पष्ट सांगितले.. हिचं आणि माझं लग्न लहानपणीच आमच्या आज्यानं ठरवलेलं होतं.....ही माझी दुसरी बायको आहे... आमच्यात असतात दोन बायका..तू बोलू नकोस.. तुला सुखात ठेवणारच.. आपल्या जातीतलीही एक बायको असावी म्हणून हिला इथे आणून ठेवलीय..

सुनिलाने घर सोडण्याची धमकी दिली... देवळेचा मूळ रंग आज दिसला.. त्याने तिला बडवून काढली.. ती दुसरी बायको मधे पडली नाही.. सुनिला आपल्या घरी हा प्रकार सांगून आली.. घरचे देवळेच्या बापाकडे गेल्यावर त्याने त्यांनाच दम भरला... कोयत्याने एकेकाला तोडीन म्हणाला.... जातीप्रमाणे वागावच लागतं म्हणाला..

मग आबाच्या वडिलांना मधे घालायच म्हणून सुनिला तिकडे धावली तर त्यांनी कानावर हात ठेवले.. म्हणाले तुम्हाला आजवर इतकी मदत केली.. पण तुम्ही लग्नच केलेलं नव्हतंत हे आम्हाला सांगितलं नाहीत... फसवलंत आमच्यासारख्यांना..

शेवटी कळवळून सुनिला त्या बाईशीच बोलायला बसली... म्हणाली अगं मी ह्यांच्याबरोबर रात्री पळून आलीय घरातून.. ती मुलगी तशी गरीब होती स्वभावाने.. रडायला लागली.. तर सुनिला तिलाच थोपटू लागली... तसे त्या मुलीने एका पिशवीत ठेवलेले मंगळसूत्र दाखवले.. आम्ही मंदिरात लग्न केलं म्हणाली बामणासमोर... तुमचेच लग्न झालेले नाहीये म्हणाली... देवळे आल्यावर त्याला सारा प्रकार सांगितला त्या मुलीने... देवळेने सुनिलाला स्पष्टपणे सांगितले...

"तू माझी बाई न्हाईस.. हिच्च आन माझं लग्न झालेलाय.. बामनासामने.. तवा नीट र्‍हा.. तोंड उघाडलास तर ठेचून मारंन... "

मात्र हा सगळा प्रकार पाहणार्‍या आजूबाजूच्यांना देवळेचा संताप आलेला होता... त्यांच्यात सर्वच जातीचे लोक होते.. महारही होते... ब्राह्मणही होते आणि मराठाही होते.. हा प्रकार पाहून त्यांनी देवळेला घराबाहेर काढून बुकलला.. तेव्हा मात्र ती मुलगी मधे पडली आणि आक्रोश करू लागली.. सुनिलाला काय करावे हे समजेना.. देवळे अंगभर मार खाऊन घरात आला आणि त्याच्या डोक्यात बसले... या बामनाच्या पोरीमुळं आपल्याला जगानं मारलंन... त्याने त्याही परिस्थितीत तिच्या अंगावर एक पातेले फेकले.. नशिबाने फार लागले नाही सुनिलाला..

सुनिला तेही घर सोडून निघाली.. थेट माहेरी आली तर मोठ्या भावाच्या बायकोने दारातून हाकलून दिले.. म्हणाली तुझी भाची वयात आलीय आणि स्थळ पाहणार आहोत आता आम्ही तिला.. तुझा इतिहास ऐकून नवरा मिळेल का तिला?? भावाला आणि बापाला टिपूस काढावेसे वाटले नाही डोळ्यातून..

सुनिला सरळ सासरी पोचली.. बामनाची बाई आलेली पाहून सगळे एकदम अ‍ॅलर्ट झाले आणि तिचा आदरसत्कार झाला घरात.... पण तिने काढलेला विषय ऐकून मात्र सगळ्यांनी तिलाच सुनावले.. तुझ्यामुळे आमच्या प्वाराने मार खाल्ल्याला हाये.. र्‍हायचं तं र्‍हा त्यासंगं तशीच न्हाईतं जीव द्ये...

अवघ्या जगात एकटी पडलेली सुनिला दयेची भीक मागत देवळेकडे परतली.. तिची कुचंबणा आणि मजबूरी जाणून देवळेने तिला खूप मारले.. आज मात्र आजूबाजूचे मधे पडले नाहीत.. करायचंय काय नाही त्या लफड्यात पडून असा विचार केला सगळ्यांनी..

एकाच खोलीत तिघे राहू लागले... तोंड दाबून बुक्क्यांचा मार तसे सुनिलाला त्या पोरीचेही काम आता करायला लागू लागले.. देवळे आता पगार त्या पोरीच्या हातात द्यायचा.. ती शहाणी झाली.. येताजाता सुनिलाचा पाणउतारा करायला लागली... हे सहन न होऊन सुनिलाने एक दिवस तिलाच बडवले...ते पाहून देवळे सुनिलाचा खून करायला धावू लागला.. लोकांनी त्याला अडवले.. पंधरा दिवस सुनिला एका बाईंच्या आश्रयाला राहिली..

शेवटी एकटे राहायचा निर्णय घेतला तिने... गावच बदलायचे... शहरात जायचे.. खड्ड्यात गेला भूतकाळ आपला.. अजून आपण फार तर पंचवीशीच्या आहोत.. आपणही शिक्षक होऊ... नोकरी करू... नाहीतरी देवळेशी आपले लग्न झालेलेच नाहीये.. आपण खरेखुरे लग्न करू शकू...

सुनिला असा विचार करून चार दिवसांनी वीर सोडून निघणार तर सकाळी सकाळी देवळे त्या घराच्या दारात... गयावया करू लागला.. म्हणाला..त्या पोरीला दिवस गेलेले आहेत.. तू घरी थांब.. त्या मुलाची तू आई हो.. आयुष्यात तुला मारणार नाही... काय एकेक तर्‍हा... सुनिला बावळट निघाली.. थांबली .. पुन्हा देवळेकडे जाऊन राहू लागली.. आता त्या पोरीची परिस्थीती अवघडलेली असल्याने ती सुनिलाला मोठ्या बहिणीचा मान देऊ लागली.. तिकडे नवीन बाळ येण्याची कुणकुण लागल्यावर सुनिलाच्या देखत देवळेकडच्यांनी उत्सव साजरा केला.. मूक अश्रू ढाळत सुनिला तिथेच राहिली.. इतकेच की आता तिला एक ओळख नक्की होती... देवळेची पहिली बायको अशी ओळख.. निपुत्रिक का असेनात... पण जगात एकटीने वावरण्यापेक्षा हा निर्णय सेफ आहे असे तिला वाटत होते... देवळेपासून त्या मुलीला दिवस गेले म्हंटल्यावर सुनिलात दोष आहे हे सगळ्यांनी मनातच मान्य केले.. देवळे रात्री एकाच खोलीत एकीसमोर दुसरीबरोबर बिनदिक्कत झोपायचा.. कधी सुनिला कधी ती दुसरी मुलगी.. सुनिलाला वाटायचे याच्या डोक्यात दगड घालून याला ठार करावे... पण तोवर ती मनाने बळकट झालेली नव्हती.. हाच तिचा प्रॉब्लेम होता...

मुलगा झाला... आनंदोत्सवांना उधाण आले.. मुलगा तीन चार महिन्यांचा झाल्यावर सुनिलाची अडहण होते हे त्या दोघांना नव्याने जाणवू लागले... नाहीतरी बिनलग्नाचीच आहे... देवळेने भांडणे उकरून काढायला सुरुवात केली... आता मात्र सुनिला पेटली... तिने दुसर्‍या बायकोदेखत देवळेला आणि देवळे देखत त्या दुसर्‍या बायकोला काठीने बदडले.. भडकलेला देवळे पुन्हा सुरा घेऊन धावू लागल्यावर पुन्हा लोकांनी अडवले आणि सुनिला गाव सोडून निघून गेली..

दिड वर्ष ती शहरात एका दुकानात काम करत होती.... एका धर्मशाळेसारख्या ठिकाणी सुरक्षितपणे राहात होती... तर एकदा अचानक देवळेचे आई बाप तिथे प्रकटले..

त्यांनी डायरेक्ट तिचे पायच धरले.. हा काय प्रकार सुनिलाला समजेना... ते म्हणाले ती पोरगी चवचाल निघाली.. पोराला घेऊन पळून गेली मुंबईस.... आमच्या पोराचा अपघात झाल्यावर ती फार काम पडेल म्हणून थांबली नाही घरात... कोणालातरी गाठून वश करून त्याचा हात धरून पळून गेली.. आता आमचा पोरगा तडफडतोय नुसता.. बघायला कोणी नाही... आमच्या घरी यायला तयार नाही.. म्हणतो माझी शान मी घालवणार नाही पुन्हा गावी येऊन... माझ्या बाई... चल परत घरी... माफ कर आम्हाला.. फार वाईट वागलो आम्ही... आमचा पोरगा कोणीच त्याच्याकडे बघत नसल्यामुळे तडफडून मरेल.. आम्ही त्याच्याकडे राहू शकत नाही कारण आम्हाला आमच्या घरचं बघाव लागतं... त्याच्या पाठीवर दोन भाऊ एक बहिण आहे...चल..

कुठलेतरी पूर्वीचे. प्रेमाच्या आणाभाका देण्याचे दिवस आठवून सुनिला सन्मानाने घरात परतली... देवळेचे दोन्ही पाय अपघातात लुळे झालेले होते... लोळागोळा झालेला देवळे हात जोडून सुनिलाची माफी मागत होता... ढसाढसा रडत होता... एका कॉमन स्त्री प्रमाणे सुनिलाने त्याला थोपटले.. तिथे राहू लागली..देवळे ज्या शाळेत शिकवायचा त्या शाळेत देवळेची जागा तिला मिळाली.. पगार थोडा कमी होता...पण देवळे आणि तिच्यापुरता पुरायचा...समाधान इतकेच की आता नवरा मारूही शकत नाही आणि घालवूही शकत नाही...

पण हे होईपर्यंतही सुनिला मनाने स्ट्राँग झालेली नव्हती... सर्वसामान्यच राहिलेली होती... पुरुषप्रधान संस्कृतीत आधाराच्या गरजेने कोणीही काहीही चूक केली तरी ती पोटात घालणारी एक स्त्री होती ती अजून...

पण पालटली... मुळापासून बदलली... देवळेची दुसरी बायको अचानक प्रकट झाली... म्हणे मुलाला कोणी पळवून नेले आहे... मला समाजात घेत नाहीत.. इथे ठेवा मला..देवळेदेखत सुनिलाने तिच्या मागच्या शंभर पिढ्यांचा उद्धार केला.. देवळेचाही केला.... गांडीवर लाथ घालून हाकलून दिले तिला... त्याक्षणी सुनिलाला समजले.. ती आता एक बावळट, गरीब स्त्री ठरून चालायचे नाही.. जग ओरबाडत बसेल.. तिने देवळेवर जरब बसवली... त्याच्या जेवणाखाण्याचे करायची मायेने... पण बोलण्यात अशी जरब आणली की देवळे निपचीत असायचा...

पण हे कुठवर?? काही लिमिट? शाळेतले शिक्षक सुनिलाकडे 'बिनमालकीचा माल' या नजरेने पाहू लागल्याचे तिला दुसर्‍याच महिन्यात जाणवले.. लाळघोटेपणा सुरू झाला होता.. तिने आजवर सोसलेल्या घटनांचा जाहीर उल्लेख करून सहानुभुती व्यक्त करणे सुरू झालेले होते... एकाने एक दिवस तिला इंप्रेस करण्यासाठी सरळ गजरा आणला.. त्याला नकार देतानाही आपल्याला ठामपणे बोलता आले नाही यामागे आपला एकटेपणा आहे याचा सुनिलालाच राग आला.. खाली मान घालून चाललो तरी लोक खाणाखुणा करून एकमेकांना हासवतात हे लक्षात यायला लागले..

देवळेला खायला प्यायला भरपूर द्यायची ती.. अगदी आधार देऊन बाथरूमपर्यंतही न्यायची.. पण त्याच्याशी शब्द बोलायची नाही.. बोललीच तर कडवटपणे.. देवळे रोज तिला पाहून मलूलपणे हात जोडून तिचे उपकार मान्य करायचा.. क्षमा मागायचा...

पण आता सगळेच असह्य झालेले होते. सुनिलासमोरचा एकमेव प्रश्न हा होता.. की मी सुनिला... इतकीच माझी ओळख कोणी मान्यच का करत नाही??? मी नोकरी करत आहे.. गुरांढोरांच्या नशीबी येणार नाहीत असले प्रसंग सोसलेले आहेत... आजही मी क्षमाशीलपणे नवर्‍याला आधार देत आहे...

माझी इतकीच ओळख जगाला पुरेशी का नाही??? मला कायम प्रश्नच का सतावत असायला हवेत?? कायम भीती का वाटावी?? या बाईंची तहान मिटत नाही कधी असली वाक्ये मला का ऐकायला लागावीत... जे झाले त्यात माझीच काहीतरी चूक असणार असे माझ्याही माहेरच्यांना का वाटत असावे??? आज तर हद्द झाली.. एका महांबरे नावाच्या जुन्या पोक्त शिक्षकाने सरळ आपल्यादेखत इतरांना अश्लील विनोद सांगितला.. त्याला तीन मुली आहेत.. लग्न व्हायची आहेत त्यांची.. कोणताही माणूस कोणत्याही क्षणी निखळ का नसतो.... ही बाई एक तर कोणाची तरी होऊन जावी नाहीतर माझी व्हावी इतकेच का वाटते सगळ्यांना.. ती एकटीच असावी.. आहे तशी राहावी असे का वाटत नाही??? मी तरी काय अवतार दिसते आता.. वजन अवढलेले आहे... आरसा पाहावासा वाटत नाही अशी स्कीन झाली आहे रापलेली.. भर सत्ताविशीत कानाजवळचे केस रुपेरी व्हायला लागलेले आहेत.. तरीही चालेन मी... मी सत्तर वर्षांची झाले तरी या लांडग्यांना चालेन... माझ्याशी आजूबाजूच्या बायकाही प्रेमाने का वागत नसाव्यात??? त्यांचे काय घोडे मारले मी?? उलट आदर्श निर्माण करतीय कर्तबगारी आणि क्षमाशीलतेचा..

ही समोरची नदी.... ही नदी जितकी गढूळ त्याहून मी गढूळ..माझ्याबाबतीतले विचार गढूळ.. माझे अस्तित्व गढूळ व्हावे अशीच इच्छा ज्याची त्याची.... ही नदी उतार असेल तिकडे वाहते.. मीही.. तिच्यात जेमतेम पाणी उरलेले आहे ... मागे दोन धरणे आहेत ना.. माझ्यात एकटीने झुंजायची जेमतेम ताकद उरलेली आहेत... मागे इतके सोस झालेले आहेत ना... पण मी झुंजणार.. माझी ओळख वेगळी असायलाच हवी... कोणाचीच नसलेली.. प्रत्येकाला हवी असलेली.. अशी माझी ओळख मला नको आहे...

सुनिला उठली आणि घरी गेली.. देवळे नजर रोखून तिच्याकडे पाहात होता.. त्याची नजर वेगळीच भासली तिला..

"काय झालं???"

सुनिलाने काहीसे धमकीच्या टोनमध्ये तर काहीसे स्वतःच घाबरत विचारले.. देवळेच्या चेहर्‍यावर एक घाणेरडे स्मितहास्य आले....त्याची इच्छा सुनिलाला समजली.... तिला धक्काच बसला.. या माणसाची अजून आपल्याला स्वतःची हक्काची बायको मानण्याची हिम्मत कशी होतीय??? पण त्याच्या मर्यादा ठाऊक असल्याने सुनिलाच्या चेहर्‍यावर आयुष्यात पहिल्यांदाच एक अत्यंत तुच्छ, कुत्सित स्मितहास्य आलं...

"आता विसरायचं... मी इथे राहतीय तेच फार समज... तेही तुझ्यासाठी राहात नाहीये मी.. हे माझं घर आहे.. माझ्यासाठी ही खोली आबाच्या वडिलांनी सांगितल्यावर मिळालेली होती... आणि दोन्ही पाय गेलेले असताना तू काय ताकद दाखवणारेस मला? फोडून काढत नाहीये तुला हे उपकार समज.. "

हरामखोर देवळे भीक मागीतल्यासारखे हावभाव करून सरकत सरकत जवळ आला.. शहारून लांब झालेल्या सुनिलाने त्याला जरबयुक्त आवाजात लांब व्हायला सांगितले..

तसा भडकून देवळे उद्गारला..

"का?? साळंतले मास्तर खाज भागवतात व्हय??"

हेच नेमके नको होते सुनिलाला! हेच नको होते. प्रश्न हा नव्हताच की मास्तर खाज भागवतात की नाही आणि ते देवळेने बोलावे की नाही. प्रश्न हा होता की याशिवाय काही विचारलेच का जात नाही? इतर काही विचार मनातच का येत नाहीत? इतर काही प्रॉब्लेम्स असू शकतील हे डोक्यात घुसत कसे नाही?

आजवर इतका छळ सहन करून मी पुन्हा इथे नुसतीच राहात नाहीये तर या नराधमाला जिवंतही ठेवतीय. त्याला मारणे सहज शक्य असून ते तर करतच नाहीये उलट जगवतीय. खायला घालतीय. औषध लागले तर देतीय. का करतीय मी हे? तर माझ्या माझ्या नवर्‍याबरोबर मी आहे हे जगाला मान्य व्हावे म्हणून. कोणालाही माझ्याकडे वाकडे पाहावेसे वाटू नये म्हणून. मुळात मी इथे परत आले ही माझीच चूक आहे हेही ठीकच, पण याही अवस्थेत या देवळेनेही हाच विषय काढावा? ही मानसिकता कसली आहे? मी दुसरे लग्न करू शकत असताना मी केले नाही याचे कारण हेच होते की ज्याच्यावर निस्सीम प्रेम केले तोच असा निघाला तर त्याच्याकडून मी बाहेर फेकली गेल्यानंतर दुसरा तसाच निघणार नाही याची काय शाश्वती? वय न झालेल्या स्त्रीला केवळ आणि केवळ हाच एक प्रश्न का भेडसवावा? कोणी असे का विचारत नाही की रोज नवर्‍याची सेवा करून तू कशीबशी जगतीयस त्यात तुला कोणी मानसिक आधार देतो का गं? तुला पगार पुरतो का गं? सणासुदीला काही गोड करू शकतेस का गं? घरच्या माणसांपैकी कोणी तुला मायेचा ओलावा दाखवतात का गं? माहेरी आता स्वीकारले आहे का गं? सासरचे लोक उपकार मान्य करतात का गं? पण नाही. हे नाही कोणी विचारत. मी कोणाच्याही बरोबर न झोपता कशी काय राहू शकते हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात! मग ती बाई असो नाहीतर पुरुष, प्रत्येकाला हेच संकट की मी 'खाज' कशी भागवते. जनावरे नुसती. पोट भरले की पोटाखालची आठवण येणे इतकेच आयुष्य ह्या जनावरांचे! माझ्यादेखत अश्लील विनोद करतोय म्हातारा, मी ऐकावा म्हणून! मला गजरा आणतोय तो हरामखोर! आणि प्रत्येकाला फाट्यावर मारणारी मी, पण हा पांगळा नवरा विचारतोय खाज कशी भागवतेस. श्श्शी! तुमच्या आया बहिणींनी कशी भागवली असती? तशीच भागवतीय.

हा प्रश्न मी आत्महत्या करून संपणार नाही. दुसरी बाई याच प्रश्नाला सामोरी जाईल. या नराधम देवळ्याला मारून हा प्रश्न संपणार नाही. हजार देवळे आहेत जगात. पण म्हणून हा प्रश्न माझ्या आवाक्यातलाच नाहीये असे नाही. निदान माझ्यापुरता तरी माझ्या आवाक्यात आहेच आहे.

मी काय करू?

निर्लज्ज होणे हा उत्तम उपाय आहे. आपण निर्लज्ज झालो की बरोबर छळणार्‍याला लाज वाटू लागते. ओढ सुनिला त्या हरामखोराला...

ओढ आणि ने घराबाहेर..सगळ्या जगासमोर ने त्याला...

सुनिलाने दोन्ही निर्जीव पायच धरले देवळेचे... पाय धरल्यामुळे सुनिलापर्यंत देवळेचे हात पोचेनात... नुसताच ओरडायला लागला.. त्याला वाटले ही आता मारणार.. म्हणून मदतीसाठी किंचाळायला लागणार तर सुनिला त्याला बाहेरच घेऊन जात होती... या काय प्रकार ते देवळेला समजेना... हळूहळू लोक जमू लागले.. ही बाई हे काय करतीय ते विचारू लागले.. त्यांच्यातच एक जवळ राहणारा तरुण शिक्षक होता.. तो त्याच शाळेत होता... तोही सुनिलाची कोणी थट्टा केली की हळूच हासायचा...

बर्‍यापैकी लोक जमल्यावर सुनिलाने सगळ्यांकडे पाहिले...

"माझा नवरा आहे.. लग्न नाही केलं माझ्याशी.... नुसतीच पळवून आणली मला.. आणि नंतर लग्नाची बायको दुसरीच करून आणली मेल्याने... मला मारायचा... शिव्या द्यायचा.. तुम्ही सगळे पाहिलेले आहेत.. मला हाकलून द्यायचा... छळ करायचा माझा... आता मी काय करतीय?... त्याच नालायकाला जगवतीय.. का??? तर माझ्यात माणूसकी आहे म्हणून.. आणि हा मला काय विचारतोय??? तर आता माझा यार दोस्त कोण आहे म्हणून... कारण हा झाला नपुंसक... म्हणून मी बाटणारच असे याला वाटते.. तो हरामखोर बघा... ती त्याची सोन्यासारखी बायकोय त्याच्या घरात... पण शाळेत येऊन माझ्याकडे बघतोय.. त्याचं काय करू मी??? मी त्याला फटके लावले तर तुम्हीही लावाल आणि नंतर काय म्हणाल??? या बाईतच काहीतरी खोट असणार... उगाच बाईची परवानगी असल्याशिवाय कोणी छेडेल का तिला? सांगा मी कशी जगू?? काय चुकलंय माझं?? मी तुमच्यातली एक नाही?? याच माणसाच्या दुसर्‍या बायकोचं मी सगळं केलेलं तुम्ही पाहिलेलं नाहीत??? मग मला हे प्रश्न का यावेत??? का मला असली माणसे भेटावीत?? या हरामखोराला घरात बांधून ठेवला आणि उपाशी ठेवला तर तसाच मरून जाईल... पण मी जगवतीय तर मलाच विचारतोय तुझा यार तुला पुरतो वाटतं म्हणून.. याला ठेचू का तुमच्यासमोर दगडांनी?? करू याचा मर्डर?? द्याल माझी साथ?? की तुम्हाला सगळ्यांनाही असंच वाटतं की अपंग माणसाची बायको म्हणजे फुकटातला माल आहे???"

आपापले कुटुंबीय तेथे उपस्थित असल्याने सर्वांच्याच नजरा खाली गेल्या होत्या. पण त्यातील काहींनीही तीच नजर ठेवलेली होती कधी ना कधी सुनिलाकडे बघताना...

हा प्रश्न संपणारा नव्हता.. सुनिलाला माहीत होते ते... मोडलेल्या पायांप्रमाणे कोसळत ती खाली बसली... मूकपणे तोंड गुडघ्यात खुपसून रडू लागली. पण अचानक कसला तरी आवाज झाला... कोणा एका बाईने देवळेला जोरात दगड मारला होता... देवळे जीवाच्या आकांताने किंचाळला कारण तो दगड बरोब्बर त्याच्या डाव्या कानावर आपटला होता.. अती विस्फारलेल्या आणि संतापलेल्या नजरेने सुनिला 'कोणी दगड मारला' असे विचारू लागली... मात्र तेवढा वेळ दुसर्‍या कोणालातरी हातात दगड उचलून घेऊन देवळेकडे फेकायला पुरला.. अचानक ते पाहून सुनिला देवळेच्या अंगावर आडवी होऊन त्याला वाचवू पाहू लागली... पण लोक चिडलेले दिसत होते..

सुनिलाला ती स्वतः कसले रसायन आहे हे समजत नव्हते.... ज्याचा खून करावासा वाटत होता त्याची कीव येत होती... ज्याने छळले होते त्याच्या दुसर्‍या बायकोच्या मुलाच्या जन्मासाठी मदत करावीशी वाटली होती..

स्त्रीत्व अगम्य असते हेच खरे... सुनिलाच्या मनात विचार आला..

सुनिला कर्कश्श आवाजात ओरडली...

"थांबा.. फक्त त्याच माणसाने याला दगड मारा.. जो स्वतःच्या बायकोला घरातून घालवेल आणि मला त्याची बायको म्हणून स्वीकारेल... याचे कारण मला घालवून या देवळेने दुसरी बायको आणली होती ते तुमच्या सगळ्यांच्याच समोर... तुमच्याच साक्षीने.. तेव्हा मी शिव्या दिल्यावर या देवळेने मला फरफटत बाहेर आणून तुमच्याकडे न्याय मागीतलेला नव्हता... त्याने स्वत:ने त्याच्यामते जे न्याय्य होते ते केलेले होते... मला हाकलून दिलेले होते छळ करून.. तेव्हा तुमच्यातील एकालाही या देवळेला अक्कल शिकवावीशी वाटली नाही.... आज दगड मारायला सगळे पुढे..."

"अरे मी का आणलं माहितीय याला बाहेर फरफटत??? कारण मला इतकंच दाखवायचं होतं की मी स्वभावाने चांगली आहे हे म्हणणे तर दूरच पण हा राक्षस माझ्यावरच संशय बोलून दाखवतोय... असा दृष्टिकोन का ठेवता तुम्ही? मी कोणाला त्रास दिलाय?? मी कोणाकडे मान वर करून बघितलंय??? उधारी केलीय??? नवर्‍याला वार्‍यावर सोडून ऐश करतीय एकटी??? आज मी बोंब मारल्यावर माझी दु:खे समजली?? आजवर माझा झालेला छळ तुमच्या मनात ठिणगी पेटवू शकला नाही?? अरे फक्त आपल्याच संसारातले नका बघू... डोळे उघडे ठेवा... असतील असे काही जण ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे... घरातल्या घरात बरेच काही घडत असते...त्या किंकाळ्या बाहेर ऐकू येत नसतीलही... घरातली बाब म्हणून तुम्हाला त्यात पडता येत नसेलही.. अरे पण कधीतरी तरी मधे पडा??? .. नका होऊ देऊ दुसर्‍याच्या घरात असे काही... माणसासारखे व्हा... अडवा बायकांना छळणार्‍यांना.. म्हातार्‍यांना छळणार्‍यांना.... त्यांच्यावर टीका करा... त्यांची निंदा करा... त्यांना सुधारा.... हीसुद्धा एक जबाबदारी आहे... "

सुनिला देवळेला ओढत आत नेत असताना अनेक जण माना खाली घालून घरी परतत होते...

पण खाली घातलेल्या मानांच्या पुढे असलेल्या ओठांवर स्मितहास्यच होते... कुत्सित स्मितहास्य...

कसं जगासमोर रडावं लागलं या बाईला... या अर्थाने

===============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

नाही पटली सुनिला. ह्यात काही झुंजच वाटली नाही. जो कणखर पणा तिने देवळे बरोबर पळुन जाताना दाखवला, त्याच्या १० टक्के सुध्धा नंतरच्या आयुष्यात दाखवला नाही. आपणच जर कणखर नसाल तर देवळे काय, महांबरे काय, इतर पुरुष काय... भेटतच रहाणार. त्यात नवल काय. हा जो पुरुष प्रधान समाज निर्माण झाला आहे तो निर्माण व्हायला अशा बायकाच कारणीभुत आहेत. त्यांचं उद्दात्ति करण वाटलं ह्या सुनिला मध्ये.

तिची झुंज स्वतःशीच आहे. नवरा काय लायकीचा आहे हे माहिती असुन माणुसकी करायला जाताना ती नकळत पणे स्वतःचाच इगो सुखावत होती. बघा मी कशी बिचारी. नवरा हा असा, माझं लग्न झालं नाही त्याच्याशी, तरी मी एकनिष्ठ, बघा कसे नालायक पुरुष आजु बाजुला आहेत.... हा कांगावा कशाला?

माझ्याशी आजूबाजूच्या बायकाही प्रेमाने का वागत नसाव्यात??? त्यांचे काय घोडे मारले मी?? उलट आदर्श निर्माण करतीय कर्तबगारी आणि क्षमाशीलतेचा..>>>>
ह्यात कसली आली आहे कर्तब्गारी? मार खाण्याची? का सोसत रहाण्याची? क्षमाशीलतेचा आदर्श? कोण ही सुनिला? छे अजिबात पटत नाही. जिच्या घरी रोज काहीतरी राडा होतो, जीच्या शी कसे वागावे कळत नाही अशा बाई शी कोण आणि कसे नॉर्मल वागु शकेल? आपण वागु शकु? सगळे म्हणतिल नको ती भानगड. एकदा गावातल्यांनी त्याला मारुन तिच्या बाजुने उभे राहुन दाखवले होते. पण हीच बाई परत त्याच नवर्‍याचे पाय धरायला आली . गाव आणि बायका काय करणार? इतकं करुन त्याच बायका वाईट?

मोहन की मीरा +१

फारच चमत्कारिक आणि विचित्र घटनांची मालिका आहे ह्या कथेत... त्यातून काही विशेष कथानकही नाही. नाही आवडली.

बकवास गोष्ट. घाईत लिहिलीये का?
काहीही झालं तरी स्वतः खमकेपणा दाखवल्याशिवाय स्वतःच्या आयुष्यात कैच फरक पडत नै. या कथेच्या नायिकेला समाजाला दाखवायला म्हणा नवरा हवाच आहे असं जाणवतं. दुसर्‍यावर कुणी फुकट असे उपकार करत नाही.

भंकस! म्हणे कर्तबगारीचा आदर्श बिदर्श ठेवतीय, नवर्‍याच्या हातचा मार खाऊन, घरातून हाकलले जाणे, सवतीची उष्टीखरकटी काढणे , चार लोकांमध्ये नवर्‍याला नालायक आहे हे ओरडून सांगितल्यावर लोक त्याला मारायला धावले तेव्हा बावळटासारखे त्याला वाचवणे आणि वर इत्का अपमान होऊनसुद्धा बेअक्कलपणे अन निर्लज्जासारखे परत त्याच घरात येऊन राहणे ह्यात कसला आलाय पराक्रम.? Uhoh

शीर्षक पाहून खुप अपेक्षा वाटल्या होत्या कथेच्या सुरूवातीला, पण फुसका बार निघाला हा तर. लेखकांस एक फुकटचा सल्ला : वेळ जात नाही म्हणून भारंभार लिखाण करण्यापेक्षा वाचकांना लाभ होईल असे लेखन करावे, कृपयाच!

नाराज आहात काय साहेब्???

"भुक्कड" साठी इतक्या विनवन्या करुन तो काय येत नाहीय.

पुढचा भाग सुचत नसेल तर ठिक आहे.

कथेत भडकपणा आहे. लोकांसमोर मारझोड वगैरे. तो सोडल्यास बाकीची कथा प्रत्यक्षात घडू शकेलसे वाटते. आमच्या घरी काम करणार्‍या मोलकरणीच्या बहिणीची गोष्ट साधारण याच वळणाने जाते. शेवटी तिने असह्य होऊन स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. रेशनवर रॉकेल मागत हिंडत होती. आमच्याकडूनही नेलं होतं. Sad

स्त्री क्षमाशील असते. मात्र आपला क्षमाशीलपणा कुठवर ताणावा हे तिला कळलं पाहिजे. याअर्थी मोहन की मीराला अनुमोदन!

-गा.पै.

@ टोकूरिका

माफ करा, मी आपल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणे योग्य की नाही माहीत नाही, पण आपण रोखठोक प्रतिक्रियेच्या नावाखाली आपल्याच भाषेत जो वर फुकटचा सल्ला दिला तो आपणास वैयक्तिक खरडवहीतही देता आला असता असे मला वाटते.

मी इथे नवीन असलो तरी बेफिकीरजी यांचे इतर लेखन वाचले आहे, खूप चांगले लिहितात, पण एखादा लेख फसूही शकतो, अश्यावेळी वाचक म्हणून आपलीच निराशा होते, तरी ती नापसंती व्यक्त करून किंवा कथेवर टीका करून व्यक्त करता येते.

असो, मी सुद्धा एक हौसेने लिहिणारा आहे, बेफीसारख्यांना जर एखादी कथा जमली नाही तर अशी प्रतिक्रिया, तर लवकरच मलाही अश्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागेल अशी भिती वाटल्याने हा आगाऊपणा केला.. समजून घ्याल अशी अपेक्षा.. Happy

चू.भू.घे.दे.

तुमचा अभिषेक

टोकुरिका,

आपण इथे केलेली चिकित्सा वाचली. एक प्रश्न विचारावासा वाटतो.

माझं एक गृहीतक आहे : कथा चांगली असेल तर पात्रचिकित्सा करावीशी वाटते. तर मग आपल्याला ती करावीशी वाटली यातच कथेचा सकसपणा अधोरेखित होत नाही काय? तसं असल्यास आपण दिलेला फुकटचा सल्ला माझ्या गृहीतकाशी विसंगत ठरतो का?

एखादी कथा खूप आवडणं किंवा पराकोटीची नावडणं दोन्ही केवळ सकस कथेच्या बाबतीतच घडू शकतं. हे कितपत बरोबर बोललो मी? आपले विचार जाणून घ्यायला आवडतील.

आ.न.,
-गा.पै.

<देवळे महार होता. >महार समाज खरच असा असतो कहो बेफिकीरजी.आंबेडकरहि ह्याच समाजाचे होते, त्यांनी राज्यघटना लिहिली.

Pages