मी: नमस्कार. आपण बनसोडे बोलताय का ?
बनसोडे: बोला.
मी: मी संरजामे. आपण सर्पमित्र, प्राणीमित्र वगैरे असल्याचं ऐकलं. आमच्या बाल्कनीत..
बनसोडे: ते सर्पमित्र वेगळे ! ते छंद वगैरे जोपासतात. लोकसेवा वगैरे. आपला व्यवसाय आहे, आधीच सांगतो !
मी: सांगा ना.
बनसोडे: च्च. तसं नै. लोक नंतर पैशे द्यायला कटकट करतात. म्हणून आधीच सांगतो. लोकांनी पैसे नाय दिले ना तर मग पकडलेला साप तसाच सोडून येतो आपण. मग बसा बोंबलत !
मी: काय सांगताय ?
बनसोडे: मग ? स्वच्छ व्यवहार असतो आपला. क्याश ऑन डिलिवरी !
मी: यू मीन पिक अप ?
बनसोडे: तेच तेच. असं बघा, पकडायचे रेट ठरलेले आहेत. बिनविषारीचे २०० रुपये. विषारीचे ४०० रुपये. पिल्लांचे ५० रुपये..
मी: पिल्लांचे ५० रुपये. विषारी की बिनविषारी ?
बनसोडे: दोन्ही साठी. काये, आपला कुटूंबप्रमुख पोत्यात जाताना पाहून पिल्लं गपगार बसतात, गडबड करत नाहीत असा आपला अनुभव आहे..
मी: म्हणजे गल्लीतल्या दादाला पोलिस व्हॅनमधे बसताना पाहून पंटर लोक कसे संत होतात तसचं.
बनसोडे: करेक्ट. त्यामुळे पिल्लं पकडण सोपं आहे. तर पिल्लं ५० रुपये. झालंच तर मग अजगराचे ५०० रुपये !
मी: मगरीचे किती घेता ?
फोन पडल्याचा आवाज आला. कदाचित बनसोडेही पडला असावा.
काही क्षणानंतर..
बनसोडे: (आवाजात कंप) तुमच्या.. तुमच्या बाल्कनीत मगर आहे ?
मी: नाही हो. जनरल माहिती म्हणून विचारलं. तसं आमच्या बाल्कनीत काय एकूणच आमच्या सोसायटीत कधी कोण आढळेल काही सांगता येत नाही. परवाच ‘किंकाळी’ सिरियलचा स्टार रुपेश कुमार आला म्हणून लोक जमा झाली. खर म्हणजे समोरच्या ‘शिवानी प्युअर व्हेज’ मधून पावभाजी पार्सल मागवल होतं कुणीतरी, ते द्यायला त्यांचा पो-या आला होता. पण दिसत होता डिट्टो रुपेशकुमार. बरं, अजून कशाचे काय चार्जेस आहेत.
बनसोडे: बाकी काही नाही. पकड्यातच सोडणं पण आलं बरं का..
मी: पैसे दिले तरी ?
बनसोडे: च्च.. तसं नै. जिथून पकडला तिथे नव्हे हो.. ते पैसे दिले नाहीत तरच ! हे मी दूर, जंगलात सोडून यायचे चार्जेस म्हणतोय.
मी: सोडायचे चार्जेस पण त्यातच पकडता का ? छान ! बर आमच्या कडे या ना पकडा पकडी खेळायला..
बनसोडे: आ ?
मी: नाही. आय मीन पकडायला. फक्त तुम्ही पक्षीमित्र पण आहात ना ?
बनसोडे: का?
मी: नाही, बाल्कनीत आमच्या एक कबूतर आलयं.
बनसोडे: क्क्याय ? मघाशी मगर म्हणालात !
मी: अहो ते मी अवांतर माहितीसाठी विचारलं.. माणसं कशी दुकानात काजू कतली, डबल डेकर बर्फी, स्पेशल मलई बर्फी वगैरे सगळी चौकशी करतात मग पाव किलो बाकरवडी नेतात, तसं ! तुमचा व्यवसाय आहे. सवय हवी अशा गोष्टींची !
बनसोडे: अहो पण कबूतर बाल्कनी मधे येणारच..
मी: हो ना.
बनसोडे: हो ना काय ?
मी: येण्याचा प्रश्न नाही. अहो पण ते जात नाहीये.
बनसोडे: का ?
मी: एक मिनिट होल्ड करता का ?
बनसोडे: का ?
मी: कबूतराला विचारून येतो !
बनसोडे: चेष्टा ? व्यवसायाची वेळ आहे ही माझी आणि चेष्टा ?
मी: मग ? आता ते जात का नाही ते कस सांगू ! बरं, एक मिनिट होल्ड करा.
बनसोडे: नको. कशासाठी होल्ड ?
मी: अहो होल्ड करा हो फोन. फोन पकडायचे चार्जेस नाहीत ना वेगळे ?
बनसोडे: पुन्हा चेष्टा ? माझी व्यवसायाची वेळ आहे. फोन ठेवा.
मी: अहो. नको एक मिनिटात बघून आलो आहे का गेलयं कबूतर.. पण ना खरंच तुमची मदत.. नाही, म्हणजे सेवा.. म्हणजे सशुल्क सेवा हवी आहे.
बनसोडे: कबूतर पकडायला ?
मी: हो.
बनसोडे: मी सरपटणारे प्राणी पकडतो !
मी: आणि सरपटणारे पक्षी ?
बनसोडे: क्क्याय ?
मी: अहो, त्याला बहुतेक काहीतरी झालंय. उडता येत नाही आहे बिचा-याला. इकडून तिकडे सरपटत फिरतंय बाल्कनीत गेले अर्धा तास.
बनसोडे: कितव्या मजल्यावर रहाता तुम्ही ?
मी: पाचव्या.
बनसोडे: पाचव्या मजल्यावर सरपटत वर चढलं का कबूतर ?
मी: होल्ड करता का ?
बनसोडे: नको.
मी: अहो, कबूतराला नाही विचारायला जात आहे. बेल वाजलीये.
बनसोडे: हं करतो होल्ड..
मी: (एक मिनिटाने) हा बोला आता
बनसोडे: बोला काय ? किती वेळ लावलात.
मी: अहो पलिकडच्या ‘विंग’मधले साळवी होते. सातव्या मजल्यावरून त्यांना आमच्या बाल्कनीत काहीतरी फिरताना दिसलं. ते आले होते विचारायला. साळवी म्हणजे आय टेल यू. कावळ्यासारखी नजर आहे.
बनसोडे: कावळा सोडा हो. कबूतर पकडा.
मी: नाही, तुम्ही पकडा ना. तुमचा धंदा आहे ना.
बनसोडे: व्यवसाय ! व्यवसाय म्हणा !
मी: हो. व्यवसाय म्हटलं की प्रशस्त वाटतं ना. आजकाल बाल्कनीला म्हणूनच बिल्डर लोकं टेरेस म्हणतात. म्हणजे स्क्वेअर फूट तेव्हढेच. पण प्रशस्त वाटतं ना !
बनसोडे: हे बघा. तुम्हाला नक्की माहीत आहे ते कबूतर आहे ?
मी: गुड पॉईंट. होल्ड करा.
बनसोडे: नको हो. होल्ड नको. तुम्ही कुठेही हलू नका. फक्त उत्तर द्या.
मी: अं… अहो, आवाज करत नाहीये गुटर्गू वगैरे. उडत नाहीये. फक्त रस्त्यावर किंवा वाण्याच्या दुकानासमोर येरझा-या घातल्यासारखं फिरतयं बाल्कनीत. तेव्हढं सोडलं तर बाकी कबूतराचं कुठलंच लक्षण नाहीये.
बनसोडे: देन हाव डु यू नो इट इज अ कबूतर.
मी: मी लहानपणापासून अज्ञात बेटावर राहतोय का बनसोडे ? आसपासचे सगळे प्राणीपक्षी नीट ठावूक आहेत मला. तुमच्यासारखा सशुल्क प्राणिमित्र नसलो म्हणून काय झालं ? आता त्याला दिसत नाहीये का इजा झालीये हे मला कसं कळणार. तसं आत्तापर्यंतही कुंड्यांना धडकलं नाही एकदाही येरझा-या घालताना.
बनसोडे: कुंड्या ?
मी: बाल्कनीतल्या. लवकर या हो तुम्ही. साळवींनी आत्तापर्यंत सोसायटीत काय काय सांगितलं असेल. त्यांची नजर कावळ्याची आहे आणि जीभ जिराफाएवढी ! आत्तापर्यंत सोसायटीत मीच आमच्या बाल्कनीत सरपटतो आहे अशीही आवई उठली असेल.
बनसोडे: बरं बरं येतो. पत्ता सांगा.
मी: सांगतो. अं.. काय हो. पकडलेलाच साप पकडायचे किती चार्जेस असतात तुमचे ?
बनसोडे: क्क्याय ?
मी: नाही पकडलेला एखादा साप घेऊन या ना येताना. ‘सरंजाम्यांच्या बाल्कनीत कबूतर पकडलं’ हे ऐकायला कसं प्रशस्त वाटत नाही ना ! त्या ऐवजी ‘सरंजाम्यांच्या बाल्कनीत साप पकडला’ हे कसं भारदस्त वाटेल ना लोकांना ऐकायला. पब्लिसिटी स्टंटची फॅशनच आहे आजकाल. तुम्ही लपवून आणा साप आणि मग मिरवत मिरवत नेऊ बाहेर गेटपर्यंत तो ‘पकडलेला’ साप. तेव्हढीच पब्लिसिटी. काय ?
बनसोडे: अहो क.. काय काय..
मी: टिव्ही चॅनलला पण सांगू कुठल्या तरी. असं करा, अजगरच आणा ! अजगर उडत आला असं सांगू आणि कबूतर सरपटत..
पुन्हा एकदा जोरात फोन (किंवा बनसोडे) पडल्याचा आवाज आला आणि… नंतर फोन बंदच झाला.
- राफा
जबरदस्त पकडापकडी
जबरदस्त पकडापकडी
वर बघा वर बघा कबूतर, रंग बाई
वर बघा वर बघा कबूतर,
रंग बाई गोरा काय बाई तोरा !
मस्तय !! 'फू बाई फू'ला
मस्तय !!
'फू बाई फू'ला पाठवा... तिथे गरज आहे असल्या अस्सल मजकुरांची...
हीही हीही,,,, धम्माल एकदम
हीही हीही,,,, धम्माल एकदम
(No subject)
राफा
राफा
मस्ताय....
मस्ताय....
राफाच्या आधीच्या विनोदी
राफाच्या आधीच्या विनोदी लेखनाचा तुलनेत हे डावं वाटलं.
माफ करा, पण अपेक्षेइतकी मजा नाही आली वाचायला.
मस्तच.. 'फू बाई फू'ला
मस्तच..:)
'फू बाई फू'ला पाठवा... >>>> +१
कैच्याकै सरंजामेंनी काही
कैच्याकै
सरंजामेंनी काही 'पर्सनल स्कोअर सेटल' करण्यासाठी बनसोडेंना फोन केला होता का? आपणच फोन करून आपणच फिरकी का घेतली बरं? असा प्रश्न पडला. काहीतरी पार्श्वभूमी हवी होती- ही बालकी खाल समज
मजा आली वाचताना..
मजा आली वाचताना..
धमाल.
धमाल.
(No subject)
छान
छान
मस्त.
मस्त.
नेहमीप्रमाणेच भन्नाट
नेहमीप्रमाणेच भन्नाट
प्रत्यक्ष सीन पाहताना जास्त
प्रत्यक्ष सीन पाहताना जास्त मजा येईल असं वाटतंय.
‘किंकाळी’ सिरियलचा स्टार
‘किंकाळी’ सिरियलचा स्टार रुपेश कुमार >>>
जबरा लिवलय रव!
राफ्या, शॉलेट.....
राफ्या, शॉलेट.....
मस्त ..................
मस्त ..................
भन्नाट....नेहेमीप्रमाणेच भारी
भन्नाट....नेहेमीप्रमाणेच भारी !
राफा रॉक्स भन्नाट पकडापकडी
राफा रॉक्स
भन्नाट पकडापकडी
"मी: एक मिनिट होल्ड करता का
"मी: एक मिनिट होल्ड करता का ?
बनसोडे: का ?
मी: कबूतराला विचारून येतो !"
बापरे... कसला जमलाय लेख... एक एक संवाद वाचता वाचता फार मोठमोठ्याने हसले.
(No subject)
धमाल.... बाल्कनीत
धमाल....
बाल्कनीत मगर...अजगर... कैच्याकै
मस्त
मस्त
कसलं लिहीलंयस.. भयंकर छान
कसलं लिहीलंयस.. भयंकर छान फ्लो.. नॉक आऊट पंचेस.. योग्य जागी.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसू पण आलं खूप.. :p
छान लिहलय!
छान लिहलय!
बनसोडे: दोन्ही साठी. काये,
बनसोडे: दोन्ही साठी. काये, आपला कुटूंबप्रमुख पोत्यात जाताना पाहून पिल्लं गपगार बसतात, गडबड करत नाहीत असा आपला अनुभव आहे..
मी: म्हणजे गल्लीतल्या दादाला पोलिस व्हॅनमधे बसताना पाहून पंटर लोक कसे संत होतात तसचं.
मस्तच !!!!!!!!!!!
बापरे... कसला जमलाय लेख... एक
बापरे... कसला जमलाय लेख... एक एक संवाद वाचता वाचता फार मोठमोठ्याने हसले>>>>सहमत. फरक एवढाच कि शेजारील कलीग घाबरला .......काय झाला काय ओ म्हणून ओरडला मागचा साउथ इंडियन चक्क उठून आला सुद्धा मला बघायला कि अचानक मला एवढ हसायला काय झाले म्हणून
Pages