माझ्या लग्नाची गोष्ट

Submitted by मी मराठी on 13 April, 2012 - 09:55

नमस्कार माबो कर..
हा कथालेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे...
------------------------------------------------------------------------------------

आज बरोब्बर १ महिना राहिला कु. विशाखा प्रकाश महाजन ची सौ. विशाखा अमित चौधरी होण्यास…
खरतरं लग्न हा विषयच फार गोड, सुंदर, मह्त्त्वा्चा अन् तितकाच जबाबदारीचाही…! सगळचं खरं सांगायचं तर अनेक कारणांमुळे माझ्यासाठी फारसा उत्सुकतेचा नसलेला…! आपल्या योग्य अशी व्यक्ती कुणी असेल हा विचारही अनेकदा गंमतीचा वाटलेला…!असो..! पण २५ वर्षे वयाच्या माझ्यासारख्या विवाहयोग्य वयोगटातील कन्येचे माता-पिता मात्र सुयोग्य वरसंशोधनाच्या विचारांत होते. त्यामुळे त्यांना कधीच “नाही” न म्हणणार्‍या “मी” त्यांना याही गोष्टीसाठी होकार दिला.. आणि माझ्या आयुष्यात फार उत्सुकतेचा नसलेला ‘हा’ विषय माझ्या आयुष्यात प्रवेशता झाला.
“तुझ्या इच्छेविरुद्ध तुझे लग्न होणार नाही”, असा शब्द मातोश्री-पिताश्रींनी स्वतःहून दिला.आणि वरसंशोधनाच्या कार्यात ते दोघे मग्न झाले. जुळ्या भगिनीला समीरजिजाजींच्या रुपाने सुयोग्य वर लाभून त्यांचा साखरपुडा झाल्याने माझ्यासाठीच्या कार्याने चांगलाच वेग घेतला. असे असूनही माझे मन अतिशय शांत, निवांत अन् Emergency Medical Course च्या hospital rotation, log book complition, prelim & final exam preparation च्या कामातच रमलेले होते. आणि जून महिन्यात १ आठवड्याच्या अंतराने २ स्थळे पाहण्यास (‘मला’) आली.
मला त्यातील एकही फारसे विशेष रुचले नव्हते. आणि जून अखेरीस होऊ घातलेल्या prelim exam मध्ये आणि private practice च्या patients’ साठीच्या नवीन treatment मध्ये माझे मन रमले होते. खरेतर परीक्षेपूर्वी हा ‘बघण्याचा’ कार्यक्रम नका करु असे, आई-बाबांना सांगावेसे वाटत होते. पण, त्यांच्या मनःस्थितीचा विचार करून गप्प बसले. पण स्वतःचे त्या स्थळांविषयीचे मत मी मोकळेपणाने मांडले. तेही माझ्याशी सहमत होते. परंतु, योगायोगाने दोन्हीकडून दुसर्‍याच दिवशी होकार आल्याने आई-बाबांना माझ्या मनाची जास्त काळजी वाटत होती. म्हणूनच तुझे मत तू स्पष्ट सांग, असा आग्रह त्यांनी, मामाने केला. आणि ते माझ्याशी सहमत असल्याचे त्यांनी मला सांगितल्यावर मला जरा हायसे वाटले. पुन्हा एकदा आई-बाबा त्यांच्या कार्यात मग्न झाले. Prelim संपली होती. आणि final exam १ महिन्यावर आली होती. त्यात घराच्या renovation च्या त्रासाने कंटाळलेल्या मला परीक्षेचे टेन्शन आले होते. घराच्या कामासोबत परीक्षा, आई-बाबांची शाळा–ऑफीसची कामे, भावाची १२वी, बहीणीची जॉब मिळवण्याची धडपड, माझ्या पेशंट्सना handover करण्यासाठी चांगली therapist मित्र/मैत्रिण शोधण्याचं टेन्शन, या सगळ्या विचारांमध्ये एकाग्रता साधणार कशी? हा मोठ्ठा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी मला माझ्या पेशंट्स आणि परीक्षेपेक्षा दुसरी कुठलीच गोष्ट जास्त महत्त्वाची वाटत नव्ह्ती. मी अभ्यासाच्या तयारीला लागले. मित्र-मैत्रिणींच्या मदतीने पेशंट्सचा प्रश्न सोडवला. आणि अभ्यासाच्या टेन्शन मधून हळूह्ळू मन अभ्यासात स्थिरावू लागले होते. Final exam ला दोन अडीच आठवडे उरले होते. आणि १७ जुलैला तुला परवा म्हणजे १९ जुलैला पाहायला येणार आहेत मुलाचे आई-वडील असे, आई-बाबांनी मला सांगितल्यावर मला प्रचंड धक्काच बसला. आता final exam झाल्याशिवाय ‘हा’ कार्यक्रम होणार नाही निदान माझी अवस्था बघून ते तो नंतरच ठरवतील, अशा समजूतीतच मी होते. Prelim exam वेळेस एक वेळ हे ठीक होते, पण हे आताच? असा प्रश्न मला पडला. आणि मी भांबावून आईला विचारले की, फक्त आई-वडीलच येणार आहेत का? आणि आताच ‘हा’ कार्यक्रम व्हायला हवा का? मुलगा नंतर येणार आहे तो इथे ऑगस्ट मधे यायच्या आत जर आई-वडिलांची पसंती असेल, तर त्याला तसं कळवून त्याच्या येण्याबाबत ठरवायला वेळ मिळेल. आणि म्हणून ‘हा’ कर्यक्रम आताच व्हायला हवा, असे उत्तर आईने दिले. आणि मी अजूनच टेन्शनमधे आले. मी आईला बरं ठीक आहे म्हटले खरे! पण मन अजिबात तयार नव्हते. त्यात मुलाची आई माझ्या आईची सख्खीचुलत मामेबहीण म्हणजे माझी मावशी लागत असल्याने मनावरचा ताण अजूनच वाढला होता. त्या नाव ऐकलेल्या पण बघितल्याचं मला अजिबात आठवत नसलेल्या मावशी+मुलाची आई, बाबा आणि भाऊ यांचं दर्शन सुभाषकाकांकडे घडण्याचं ठरलं. मनावर या नात्यात नात प्रकाराने अजूनच ताण वाढला होता. पारंपारिक कांदेपोहे कार्यक्रम या आधीही दोनदा झाल्याने मी तशाच तयारीत होते. अन् सगळ्यांना पोह्यांच्या डिश देऊन होत असतानाच… ”अगं काय हे?”, असे उद्गार मुलाच्या मातोश्रींच्या मुखातून बाहेर पडताच आत जायला वळलेली मी थबकले. खरं सांगायचं तर त्याक्षणी जिवाचा थरकाप उडाला. शांत मन आणि चेहरा ठेवण्याचा प्रयत्न करत मी उलट फिरले. “तू पण बस ना पोहे खायला! असं काय परक्यासारखं? आपणच सगळे तर आहोत घरातले…मग कशाला फॉरमॅलिटी?” असे आग्रहोद्गार ऐकताच मी शांत शांत झाले. फक्त हसून हो म्हटलं. तर ‘तू काही टेन्शन घेऊ नकोस बस आरामात आमच्याबरोबर!’ या त्यांच्या पुढच्या उद्गारासरशी नाही मी टेन्शन नाही घेत म्हणत मी खरचं एकदम relax झाले. अन् मग शशीमामा, मुलाचे आई-बाबा,भाऊ सगळ्यांनी मोकळेपणाने एकदम जाणवण्याइतपत खुल्या दिलाने माझ्याशी गप्पा मारल्या. ’तो’ बघण्याचा कार्यक्रम आहे हे मी विसरूनच गेले होते. निघताना त्यांनी बाबांना मोबाईल नंबर द्या आम्ही तुम्हाला आमचा निरोप नंतर कळवतो असे म्हणताच ‘तो’ बघण्याचा कार्यक्रम होता हे मला आठवले. आणि मी गोंधळून गेले होते. आता final exam व्हायच्या आधी आई बाबांना असा कुठलाही कार्यक्रम करू न देण्याचं मी माझ्यापुरतं ठरवलं. त्यानंतर २-३ वेळा आईने सांगितलेली एकच गोष्ट मला अतिशय खटकली की, मुलाची आई म्हणाली की, पण रंगाने माझा अमित काही हिच्यासारखा नाही, काळा सावळाच आहे. आणि मुलाच्या आईनेही ही गोष्ट माझ्या आईला २-३ वेळा सांगितली. आणि विशाखाला हे सांगण्यास सुचवले. आणि रात्री आमची हरकत नाही म्हणून आता अमित आल्यावर काय ते अमित आणि विशाखाने ठरवावे असा निरोप त्याच दिवशी १९ जुलैला मिळाला. आईच्या तोंडून तो रंगपुराणाचा निरोप ऐकल्यावर मी चिडले. वैतागले.
आईला म्हटलं, ‘तुला चांगलचं माहिती आहे की, माझ्यासाठी त्याचा स्वभाव महत्त्वाचा आहे रंग नाही…तरी तू हे मला कशाला सांगतेस?’ ‘आता तो आला की, मी त्याला बघेन,त्याच्याशी बोलेन आणि मगच काय ते ठरवेन! तोपर्यंत परत आता हे रंगपुराण मला सांगायचे नाही.’ आणि मी अभ्यासाच्या तयारीत आकंठ बुडाले. माझ्या अशा उत्तराने मातोश्री हसत सुटल्या आणि मग म्हणाल्या, ‘हे बघ, तुला पूर्ण कल्पना दिली नव्हती, तुला माहित नव्हते, असं होऊ नये आणि याआधी आपण कुणीच अमितला बघितले नसल्याने त्याची आई असे सांगून गेली असेल.’ हे ऐकल्यावर मी ठीक आहे म्हणून गप्प बसले. अन् निदान काही दिवसांपुरता हा विषय माझ्यासाठी बंद झाला. अन् हाती उरलेल्या दिवसांत स्वतःला सगळा गोंधळ असूनही शांत ठेवत ते कुणालाही जाणवू न देता अभ्यास सुरू झाला. मन त्यात रमायला लागलं. रिनोवेशनच्या कामाचा ठाकठूक, लादी पॉलिशिंगचा कर्णकटू आवाज अन् तोंडीलावण्यासारखा काम करणार्‍या लोकांचा आवाज यांचा खरतरं मनस्ताप होत होता. पण मग तेच Enjoy करत अभ्यास केला तर… अशा विचाराने एकाग्रता वाढली, कुठल्याच गोष्टीने मग काहीच वाटत नव्हतं. २ थिअरी आणि ३ प्रक्टिकल अशी परीक्षेची विभागणी २ दिवसांत केलेली होती. २ थिअरी पेपर एकाच दिवशी पार पडले अन् पहिला पेपर चांगला अन् दुसरा अवघड गेल्याने टेन्शन जरा आणखीनच वाढले. १ आठवड्याने प्रॅक्टिकल परीक्षा होती. पुण्यात स्वाईन फ्लुचे प्रमाण धोकादायक झाले होते. परीक्षादेखील पुण्यातच होती. त्यातच ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलले. स्वाईन फ्लुचा धोका लक्षात घेऊन आवश्यक त्या मास्क, निलगिरी तेल अशा तयारीत मी पुण्यात पोहोचले. तिथे गेल्यावर परीक्षा केंद्र बदलल्याचे समजले. दुसर्‍या दिवशी परीक्षा होती. काही स्थानिक मित्रमैत्रिणींना कसे जायचे विचारले तरी माहित नसलेल्या ठिकाणी एकटीने पोहोचण्याचे आणि परीक्षेचे असे दुहेरी टेन्शन होते. आई-बाबांशी याबाबत बोलले. नशिबाने पुण्याच्या लोकलचे टाईमटेबल (पुणे-लोणावळा/तळेगाव) जवळ होते. त्यानुसार बसने जाण्यापेक्षा लोकल योग्य वाटत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी योग्य ते कर पण फक्त काळजी घे, असे त्यांनी समजावले. फोन ठेवला अन् ४-५ वर्षांपूर्वी बाबांनी त्यांच्या वाढदिवशी सांगितलेला विचार आठवला…आयुष्यात माणसाला नेहमी एकट्यानेच पुढे जायचे असते. शांत, संयमी राहिले तर कुठलीही गोष्ट सहजसाध्य असते. याच विचाराला अनुसरत पुन्हा शांतपणे अभ्यास केला आणि परीक्षेच्या वेळेपूर्वी एक दिड तास आधी व्यवस्थित पोहोचले. अन् नेहमीच डळमळत असलेला आत्मविश्वास स्थिर झाला. प्रॅक्टिकल परीक्षा मस्तच झाली. मनसेचे आंदोलन, बस –रिक्षाचे प्रॉब्लेम याची कसरत करत अनोळखी भागातून (खडकी) सुखरूप पुणे रेल्वेस्टेशनला पोहोचले. नेहमीची डेक्कन मिळाल्याने खुश झाले. अन् लगेच दुसर्‍या दिवसापासूनचे clinic, visits चे टाईमटेबल आखणे सुरू झाले. मन जरा निवांत होऊ लागले. आणि २५ ऑगस्टला अमित भारतात येतो आहे,अशी आठवण आईने मला करून दिली. निवांतपणे सगळं ऐकत होते. कधी नाही ते मी अचानक मला त्याचे सगळे details सांग, असे आईला म्हटले. याआधी दोन्हीवेळी मी असे स्वतःहून काहीच विचारले नव्हते त्यामुळे माझे मलाच आश्चर्य वाटले. पण मन अजूनही शांत, निवांत होते. याबाबत मी काहीच विचार करत नव्हते. बाकी रूटीन सुरू होते.२३ ऑगस्टला गणेशचतुर्थी आणि हरतालिका होती. कधीच हरतालिकेचा उपवास केला नव्हता. जुळी बहीण म्हणाली, सुयोग्य पती मिळावा म्हणून करतात ना हा उपवास? आधी तर कधी केला नाही निदान आता मिळाला आहे म्हणून तरी करते… मग तिच्याबरोबर मीदेखील हरतालिकेचा उपवास केला. अन् दुसर्‍या दिवशीपासून नवीन visit सुरू झाल्याने खुश होते. फक्त clinic चा अपवाद वगळता बाकी visits मी २५ ऑगस्टच्या दिवशी cancel केलेल्या होत्या. २५ ऑगस्ट २००९ ला सकाळी ११.३० च्या आसपास अमित, त्याचे आई-बाबा, भाऊ, शशीमामा यांचे आगमन झाले. पोहे वगैरे देऊन झाले अन् मी शांतपणे सगळ्यांबरोबर बसले. सगळ्यांचा संवाद सुरू झाला. अन् ४-५ वेळा पाहूनही अमितचा चेहरा नीट डोक्यात येत नव्हता.५ वेळा मी observe केल्यावर चेहरा नीट लक्षात आला. त्याचं मनमोकळ बोलणं, मोकळेपणाने स्वतःबद्द्ल सगळं सांगणं योग्य वाटत होतं. स्वतःहून मी सांगितलेल्या माझ्या क्षेत्राव्यतिरिक्त ते जाणून घेण्यात त्यानं जास्त रस दाखवला. सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित सांगत होता. इतकेच नव्हे तर तिथे कुठले चलन वापरले जाते व रुपया, डॉलरशी त्याचे कसे comparison आहे हेदेखील अगदी सहजपणे सांगितले! अन् अचानक कुणाच्याही ध्यानी-मनी नसताना माझ्या आधीच्या २ अनुभवांत तर विलासिनीच्या (बहीण) ४ अनुभवांत न विचारला गेलेला प्रश्न, “तुला स्वयंपाक येतो का?” त्याने मला विचारला. प्रश्न ऐकताक्षणी मी थक्क झाले कारण त्याने दिलेले स्पष्टीकरण…!ते होते की, मला बर्‍यापैकी येतो म्हणून out of curiosity मी असं विचारतोय…! यावर माझ्या उत्तराची अजिबात वाट न पाहता ‘येत नसेल तरी हरकत नाही, नंतर शिकशील हळूहळू’, अशी प्रतिक्रिया देत अमितच्या मातोश्रींनी मला तू टेन्शन घेऊ नकोस असे सांगितले. त्या दोघांमुळे मी गोंधळून गेले पण स्वतःला सावरत पोळ्या सोडून बाकी थोडे-थोडे जमते, पण माझ्या आईसारखी मी एक्स्पर्ट नाही, असे प्रामाणिक उत्तर दिले. मग शशीमामाने एकट्याने काही बोलायचे आहे का? असे विचारले. इतका वेळ जॉब, शिक्षण याबाबत त्याने दाखवलेला रस, स्वतःबद्दल प्रामाणिकपणे सांगितलेली माहिती आणि याही व्यतिरिक्त स्वयंपाकाचा विचारलेला प्रश्न यामुळे मनात १-२ प्रश्न असतानाही मी खूश झाले होते, हे माझे मलाच जाणवले.
महाजनसरांची नात, प्रतिभामावशीची मुलगी यापलीकडे जाऊन विशाखा म्हणून मला जाणून घेण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न मनाला स्पर्शून गेला. आणि केवळ म्हणूनच मी, हो मला एकट्याने बोलायचे आहे, असे शशीमामाला सांगितले. एकटीने बोलताना माझ्या आवडींमध्ये त्याला असलेला रस, त्याचा प्रामाणिकपणा मनावर कोरला गेला. अन् त्याच्याशी बोलतानाच हा मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे, असं सुप्त मनाने जागृत मनाला जाणवून दिलं. आमचं बोलणं झाल्यावर ते सगळे घरी गेल्यावर आई-बाबांनी माझ्याशी चर्चा केली. अन् आमचा सर्वांचा एकमताने त्या मुलाला होकार होता. दुपारनंतर अमितच्या बाबांचा त्यांचा होकार आहे, तुमचे काय मत आहे? असे, विचारणारा फोन आला. माझ्या बाबांनी त्यांना आमचा निरोप कळवला. आणि संध्याकाळी अमितच्या घरी हे लग्न पक्के झाले अन् २ सप्टेंबर ला साखरपुडा करण्याचे ठरले. दुसर्‍या दिवशी सकाळी मागणी घालण्याचा कार्यक्रम झाल्यावर लगेचच साखरपुड्याची तयारी, खरेदी सुरू झाली. आणि अवघ्या ९ दिवसांत माझे सारे भावविश्वच बदलून गेले. दि.२ सप्टेंबर २००९ ला साखरपुडा झाला. त्याच्या तयारीत माझ्या मदतीला माझ्या माहेरच्या लोकांबरोबर सासरचे लोकही आले. अशा वातावरणाने मन प्रसन्न झाले. अचानक लाभलेला आनंद सहन करता येत नव्हता. प्रथमच केलेल्या हरतालिकेच्या उपवासाचा हा मोठ्ठा चमत्कार मला अनुभवायला मिळाला. ३ सप्टेंबरला आमच्या अमितसाहेबांनी बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम अचानक ठरवला. अन् ध्यानी –मनी नसतानाही माझ्या मनातली फर्स्ट डेटची संकल्पना माझ्या नकळत अमितने जशीच्या तशी प्रत्यक्षात उतरवली. अन् माझ्या आयुष्यातली ती एक सुंदर संध्याकाळ ठरली. ५ सप्टेंबरला अमित साऊथ कोरिआला परत गेले आणि जाताना मला वेडं करून गेले. सुरुवातीचे १-२ आठवडे फोन-ईमेल-चॅटवरून गप्पांमधून छान गेले. तेव्हाच EMS च्या Exam चा Result २१ सप्टेंबरला लागणार होता. आणि खुषीत असतानाच थोडं टेन्शन मनावर दाटून आलं. शेवटी एकदाचा Result आला. आणि First class मिळाला कळल्यावर मन एकदम शांत, निवांत झालं. Clinic, visits वगैरे चालू होत्या. आता स्वयंपाकघरात मनापासून डोकवावसं वाटू लागलं. स्वयंपाक शिकावासा वाटू लागला. मी प्रयत्न करायला लागले. पण आख्खा दिवस पेशंट्सच्या मागे गेल्यावर कधी वेळ मिळणार? म्हणून शेवटी दिवाळीनंतर सारे काही बंद केले. घरात काही गोष्टी शिकत होते. कु. विशाखा प्रकाश महाजनच्या आयुष्यातले हे स्वच्छंद असे शेवटचे २ महिने पुरेपूर जगण्याचा प्रयत्न करत होते. पण हे सारं होत असताना मनाचं कासावीस होणं जाणवू लागलं. अमितविना करमेनासं होऊ लागलं. तासभर फोनवर बोलूनही, ईमेल-चॅट करूनही मनाचं समाधान होईनासं होऊ लागलं. आठवड्याअखेरीस समीरजिजाजी-विलासिनीला बाहेर जाताना बघून उगीच कुठेतरी काळीज तुटल्यासारखं होऊ लागलं. आणि जाणवलं शहाण्या विशाखाला अमितने वेडं लावलं. मनाला त्यांची ओढ लागली. त्यांची थट्टा-मस्करी, त्यांचं जीव वेडा करून टाकणारं प्रेम, समजूतदारपणा, तर कधी त्यांच्या वेडेपणामुळे माझा झालेला त्रागा, त्यांनी केलेली मस्करी न कळल्यामुळे फुटलेलं रडू अशा अनेक गोष्टींमुळे हरखून गेलेली मी. शेवटचा १ महिना उरला आणि तू WEBCAM शैलेशमामाकडे आहे ना? मग तिथून online येशील का? असं त्यांनी विचारल्यावर त्यांना ‘हो’ म्हटल्यावर आणि WEBCAM वरून मला समोर बघितल्यावर खुश झालेला त्यांचा स्वर कानात तसाच घुमत राहिला. अन् शेवटचा महिना दर रविवारी WEBCAM वर सगळ्या तांत्रिक अडचणींवर मात करत भेटत राहिलो. पण, मला मात्र फक्त फोटो पाहावा लागत होता. कारण, त्यांच्या कडे WEBCAM नव्हता. WEBCAM वरून बोलत असताना मी ६ डिसेंबरला भारतात येईन तेव्हा कितीही उशीर झाला तरी तुला भेटायला येईन असे, स्वतःहून प्रॉमिस केले. मध्यंतरी दिवाळीच्या आसपास साड्या आणि दागिन्यांची खरेदी माझ्या व विलासिनीच्या मनासारखी झाली. दोघींचे लग्न एकाच दिवशी १० डिसेंबर २००९ ला करण्याचे ठरले.
लग्नाच्या कपडे-दागिन्यांची खरेदी म्हणजे आम्हा दोघींच्या आयुष्यातली अतिशय विलक्षण गोष्ट होती. खरंतर मुलीची जात म्हटल्यावर दागिने-कपड्यांचा सोस, हौस ही खूप स्वाभाविक गोष्ट…! पण आम्हा दोघींनाही यागोष्टींची आवड असली तरी हौस, ओढ अशी नसल्याने असेल की, आम्हाला साड्या-दागिने यातले प्रकार, वैविध्य याबद्दल काहीच ज्ञान नव्हते. (म्हणजे आता खूप आहे अशातला भाग नाही. असो…!) आणि आमच्या दोघींच्याही सासूबाईंनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत स्वतःहून choice करायला सांगितले. दादरच्या भरतक्षेत्र, आसोपालवमधून साड्या अन् डोंबिवलीच्या वामन हरी पेठेतून दागिने अशी माझी खरेदी झाली. दोन्ही ठिकाणी गेल्यावर तिथल्या साड्यांच्या रंगसंगती, प्रकार तर दागिन्यांच्या डिझाईन स्टाईल्स पाहून मी थक्क झाले. अन् हळूहळू सावरत दोन्ही खरेदी पूर्ण केल्या. साखरपुडा झाल्यावर कोरिआला जाण्यापूर्वीच अमितची लग्नाची खरेदी घाईतच करावी लागली. कारण लग्नापूर्वी १-२ दिवस आधी काय खरेदी करणार?
पण या सगळ्या दिवसांमध्ये माझ्यात खूप फरक पडला. ९ महिने फक्त Professionalist होण्याच्या मार्गावर असलेल्या, स्वतःला हरवण्याच्या मार्गावर असलेल्या मला अमितने थांबवले. त्यांच्या येण्याने नकळत मनाला फुटलेला बहर जाणवत राहिला. थांबलेले कवितालेखन परत सुरू झाले. माझ्या नकळत कवितेचे विषय, शब्द, त्यांची तीव्रता बदलली. जादू, मोहिनी या शब्दांना अर्थासकट अनुभवले केवळ अमितमुळे…! त्या थोड्या काळात लाभलेला त्यांचा सहवास, Airport वर त्यांना सोडायला गेलेलो असताना सगळ्यांसमोर आत जाताना अचानक त्यांनी मारलेली मिठी…. सारं सारं एका क्षणात मनावर कोरलं गेलं. नंतर नंतर तर त्यांच्या आवाजाची उजळणी केल्याशिवाय झोपच लागेनाशी झाली. ईमेल, चॅट, video chat सारं सारं करताना दरवेळी काहीना काही problem व्हायचाच….!!! अन प्रत्येक वेळी संयमाचे महत्व अधोरेखित होत गेले. आम्ही दोघेही एक एक दिवस मोजत होतो. कोरियाची संस्कृती, लोक, खाद्यसंस्कृती, भाषा इत्यादीची माहिती मला कळत होती. माझ्या आयुष्यातील कदाचित ती पहिली आणि शेवटची वेळ होती ज्यावेळी फक्त मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या अवती-भवती होत्या आणि त्याही सगळ्याच्या सगळ्या एकाच वेळी अस्तित्वात होत्या. काही दिवस तर फार कठीण होते माझ्यासाठी! जेव्हा आई-बाबा,भाऊ आणि अमित असे दोन्ही विचार मनात यायचे. मग जन्मापासून नेहमीच सगळ्यात जास्त जवळ असलेली बहिणच सगळ्यात मोठा आधार वाटायची. ती पण सेम कंडीशन फेस करत होती ना..! पत्रिका छापणे, वाटणे इत्यादी कामे देखील आटोपत आलेली होती. त्यापूर्वी जेवणाचे ' कॉनट्रक्ट ' नाख्येना द्यायचे ठरले. मोठा हॉल , मंगल कार्यालय मिळत नसल्याने शेवटी बाबांनी सावित्रीबाई फुले कलामंदिर हे नाट्यगृह विवाहस्थळ म्हणून निश्चित केले. बाकी आमची देखील ब्युटी पार्लर वगैरेची तयारी पूर्ण झाली. दरम्यानचा काळ एकदम गोड होता अशातला काहीच भाग नव्हता. खूप टेन्शनमध्ये आम्ही दोघेही होतो. पहिले अमितना ऑफिसमधून १४-१५ दिवस सुट्टी मिळेल की नाही? याचे टेन्शन होते. पण अनपेक्षितपणे ज्यादिवशी सुट्टीसाठी त्यांनी अर्ज केला त्याच दिवशी त्यांची सुट्टी पूर्णपणे त्यांना हवी तशी मान्य करून त्यांचे तिकीटही त्यांना मिळाले. माझा पासपोर्ट मिळायचा होता. तोही एकदाचा मिळाला. मी लगेच त्याची कॉपी अमितना इमेल केली. आम्ही दोघेही खूप खुश होतो. पण...थोडे टेन्शन मध्ये होतो कारण अमित लग्नानंतर आधी एकटे कोरियाला जाणार अन् मग “मॅरेज सर्टिफिकेट" चे काम झाल्यावर व्हिसा मिळाल्यावर मी एकटी कोरियाला जाणार. त्यामुळे माझ्या प्रवासाचे टेन्शन होते. माझी पासपोर्ट कॉपी मिळाल्यावर अमितनी ऑफिसमध्ये ती सब्मिट केल्यावर त्यांच्या विमानाचेच माझेही कोरियाचे तिकीट कंपनीने बुक केले. म्हणजे आता फक्त व्हिसा मिळाला की झाले....मी देखील अमितसोबत कोरियात येणे शक्य होते. पण....हा 'पण' फार मोठा असतो. आणि हा पण.. दरवेळी मध्ये येत होता. कारण आपल्या भारतात “मॅरेज सर्टिफिकेट" ८-१० दिवसात मिळते. आणि आम्हाला ते २ दिवसात मिळाले तर २ दिवसात व्हिसा मिळून लग्नानंतर ९ व्या दिवशीचे विमानाने आम्ही दोघे एकत्र कोरियाला जाणे शक्य होते. पण...जोपर्यंत असे घडत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही
आणि कोरियन लोकांसाठी विवाह हि एखाद्या रविवारची फॉर्मल रिंग सेरीमनी अशी आणि फक्त तेवढचं महत्त्व असलेली गोष्ट. त्यामुळेच सुट्टी मिळेल न मिळेल असे टेन्शन होते. नंतर या इतर सगळ्या गोष्टी. त्यामुळे मधले काही दिवस फारच विचित्र होते आणि कोरियात सगळ्या गोष्टी ऑफिस वर्कच्या सुद्धा पटापट होतात त्यामुळे त्या लोकांना हे सारं फार सोपं वाटतं. त्यामुळे तिथे असताना यांचा सुटणारा संयम अन् होणारी चिडचिड आणि .... हे सार काही समजत असताना मी काहीच करू शकत नसल्याने माझा मनातल्या मनात होणारा कोंडमारा......आणि यातलं काहीच न समजू शकणारे, फक्त मला चिडवणारे मित्रवर्ग अन आप्तवर्ग ! शेवटी बाबांचा मित्रवर्ग मदतीला धावून आला. अन् बाबांच्या मित्राने सारे ऑफिस वर्क व्यवस्थित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास दिला, अन् बाबांनी माझी तगमग पाहून 'शांत हो! रिलॅक्स राहा !' असे सांगितले. शेवटी मी शांतपणे स्वतःला अन् अमितना समजावले की जर खरचं आपण दोघे एकत्र जावे अशी आपली इच्छा असेल आणि ती खूप 'स्ट्रॉंग' असेल तर तसेच होईल. आता परत या विषयावर आपण बोलायचे नाही. बाबा काय ते पाहतील आणि होता होता ६ डिसेंबरचा दिवस उजाडला. अमित भारतात संध्याकाळी पोहोचणार होता. हॉंगकॉंग मार्गे येत असताना, 'मी आता हॉंगकॉंगहून निघतोय ' असा फोन केला. आणि माझे सगळे लक्ष घड्याळाकडे लागले होते. आमितना घ्यायला गेलेली गाडी मध्येच बंद पडल्याने तासभर उशिरा पोहोचली. त्यामुळे ७.३० - ८ च्या सुमारास अमित मुंबई एअरपोर्ट वरून निघाले. अन कदाचित उशीर होईल म्हणून मी आज न येता तुला उद्या भेटायला येइन असे मला फोनवर सांगितले. मी ठीक आहे म्हणाले. शहाण्या विशाखाला त्यांचे म्हणणे पटले होते की एवढा प्रवास करून आल्यावर उशीर झाल्यामुळे न येणे स्वाभाविक आहे. पण, वेडी...अमित वेडी विशाखा दुःखी झाली. आज प्रत्यक्ष समोर बघेन या इच्छेवर पाणी फिरले होते. अमितनी तुला काय झाले? आवाज वेगळा का वाटतोय ? असे विचारले देखील. पण मी उत्तर दिले नाही. ती संध्याकाळ तशीच गेली. अन रोज १ - १.३० पर्यंत जागी असणारी मी, घरातले सगळे ११ - ११.३० लाच झोपायच्या तयारीत होतो. सगळे झोपले होते. मी बेडवर आडवी होते असतानाच ११.४५ होऊन गेलेले असताना अमितचा फोन आला. काय करतेस? म्हणाले. म्हटल्यावर झोपतेय असे त्रोटक उत्तर मी दिले. आणि अमित ताडकन उसळून म्हणाले खोट बोलू नकोस. रोज १ - १.३० पर्यंत जागी असतेस ना तू? खर सांग. वेडे,मी तुज्या घराजवळ आहे. दोन मिनिटात पोहोचेन. बाकी लोक पण झोपलेत का? खर सांग मग मी घरी परत जातो. त्यांचे बोलणे ऐकून मी दचकले. आम्ही सगळेच धडपडून उठून बाहेर आलो तर खरच अमित घरी येताना दिसले. त्याक्षणी मला अमित वेड्या विशाखाला झालेला आनंद खरोखर गगनात मावेना. एकदम बावरून
गेले होते. त्यांना लग्नासाठी केलेली कपडे खरेदी दाखवली. अन् अचानक ते सारे बाजूला ठेवत अमितनी एक पिशवी माझ्या हातात ठेवली अन हे घालून बघ असे सांगितले. पिशवीत एक सुंदर पोपटी रंगाचा पोलो नेक असलेला पूर्ण बाह्यांचा टी शर्ट होता. अंदाजे आणलेला...पण माझ्या परफेक्ट मापाचा...! खूप मस्त दिसत होता मला. मग बऱ्याच गप्पा झाल्या अन् १.३० वाजता अमित घरी परत गेले. निघताना कोरियन चोकलेट देऊन गेले. रस्त्यात असताना फोन करून म्हणाले सांगितले होते न मी तुला ...कितीही उशीर झाला तरी मी तुला भेटायला येइन. चित्रपटातला स्वप्नवत प्रसंग अमितने माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात उतरवला. मग दोन दिवस आम्ही फिरायला गेलो पाणीपुरी-दहीपुरी, गप्पा खूप मज्जा केली. त्यानंतरचे
दोन दिवस मेहेंदीचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम खूप गडबडीत गेले. लग्नाच्या आदल्या दिवशी माझी खूप विचित्र अवस्था झाली होती. दुसऱ्या दिवशी लग्न होते लवकर उठायचे होते त्यामुळे लवकर झोपणे आवश्यक होते पण डोकं चांगलाचं ठणकत होत. मनावर नकळत ताण आला होता त्यामुळे झोप आली असूनही लागत नव्हती. शेवटी माझे दोघे भाऊ हेरंब आणि हर्षद मला आलटून-पालटून थोपटत बसले. मग केव्हा तरी मला झोप लागली. परीक्षेशिवाय उठवूनही सहज न उठणारी मी १० डिसेंबरला म्हणजे लग्नाच्या दिवशी आपणहून सकाळी ४.१५ ला उठले आणि घरातल्या सगळ्यांना उठवले. भराभर आवारा-आवर सुरु झाली. ठरल्याप्रमाणे ५ वाजता
ब्युटी पार्लर वाल्या कदम काकू आल्या. अन् विशाखाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या अंकासाठी मेकप सुरु झाला. तयार होऊन हळदीच्या साडीत लग्न स्थळी 'सावित्रीबाईफुले कालामंदिरात' पोहोचलो. आमच्या नवरोबांचे ( मी आणि विलासिनीच्या) आगमन झालेले होते. दोन्ही जोड्यांचे फोटो असलेली रांगोळी आमचे सर्वांचे स्वागत करत होती. नंतर दोन्ही जोड्यांचे फोटोसेशन,
उपवासाचा फराळ करून विवाहपूर्व विधींना सुरुवात झाली. मग लग्नासाठी नऊवारी साडी, दागिने इत्यादी तयारीला सुरुवात झाली. जस-जशी तयारी पूर्ण व्हायला लागली तशी हृदयातली धडधड खूप स्पष्ट ऐकू येऊ लागली. पोटात फुलपाखरांची किलबिल चांगलीच सुरु होती. त्या सौभाग्य अलंकारांना परिधान केल्यावरची मी मला स्वतःलाच खूप वेगळी भासू लागले. आणि
१०.१८ वाजता सगळ्या आप्त,स्नेही, देव-ब्राह्मण अन अग्नीच्या साक्षीने कु. विशाखा प्रकाश महाजन ची सौभाग्यवती विशाखा अमित चौधरी झाले. वरमाला घालण्यापूर्वी अंतरपाटातून मिस्कील हसत एकटक पाहणाऱ्या अमितला पाहून मी मोहरून गेले होते. त्याच्या खोडकर नजरेला नजर देणे जमत नव्हते अन लाजेने मान खाली जात होती. मंगलाष्टके संपत आली असताना मोठ्या हिमतीने मी अमितकडे पहिले. अन इतका वेळ मिस्कीलपणे हसणारा अमित पटकन म्हणाला ,'ए, मान खाली करून झोपू नकोस !' आणि मला जे खुदकन हसू फुटले ते मी कधी विसरू शकणार नाही. अंतरपाट खाली होताच थोडासा लाजरा-बुजरा वाटणाऱ्या अमितने एक क्षण ही न जाऊ देता सर्वां देखत मला डोळा मारला अन् लाजेने हसून-हसून गाल दुखू लागले अन त्याच्या मस्करीला स्वीकारून मी माझ्या मोहक कृष्णाच्या गळ्यात वरमाला घातली. सर्व विधी यथासांग पार पडले. आई-बाबांनी विलासिनीचे तर सुभाषाकाका-विजयामावाशीने माझे कन्यादान केले. नंतर शालू, कोट असे कपडे बदलून सर्व आप्तांना भेटलो. त्यांचे आशीर्वाद अन शुभेच्छा घेऊन आम्ही जेवण करण्यास गेलो. एरवी पोटभर जेवणाऱ्या अन् गोड, आईस्क्रीम खूप आवडीने खाणाऱ्या मला जेवण नीट जात नव्हते .मनात एकीकडे आई-बाबा, भाऊ, विलासिनी यांचे विचार काहूर माजवत होते तर दुसरीकडे अमितचा सहवास मनाला सुखावत होता. खूप कष्टाने स्वतःला सांभाळून भावनांना बांध घालून मी जेवायचा प्रयत्न करत होते. जेवण, फोटो झाल्यावर लग्नाच्या प्रमाणपत्रासाठी अर्जावर सह्या झाल्या. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु झाला. मनाला सांभाळून हसऱ्या चेहऱ्याने उठले. अन् अचानक बाजूलाच हसतमुख उभ्या असलेल्या विलासिनीने गच्च मिठी मारली आणि रडू लागली. इतका वेळ आवरून धरलेला मनाचा बांध फुटला. तिला मिठीत घेतल्यावर डोळ्यांना पूर आला. शिस्त शिकविणाऱ्या, प्रेम करणाऱ्या, रागावाणाऱ्या, कष्ट उपसणाऱ्या आई-बाबांना सोडून जावसं वाटेना. हळव्या मनाचे अमित अन् समीर तिथे उभे राहवेना म्हणून बाहेर पडले. जिवाभावाच्या नातेवाईकांना पाहून स्वतःला सावरणे जमेना. आई-बाबांच्या मिठीत शिरून खूप रडावसं वाटत होतं. मन माझ्या लाडक्या चिऊ अन् हर्षदला शोधू लागले. हर्षद घरी गेल्यामुळे भेटला नाही. चिऊला पाहून थक्क झाले. माझ्या पेक्षा तब्बल ९ वर्षांनी लहान असूनही मोठ्या भावाच्या मायेने हसत येऊन बिलगला अन् त्याच्या दोन्ही तायांना थोपटत राहिला. चेहऱ्यावर दुख असूनही त्याने अजिबात डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. त्याचा समजुतदारपणा पाहून आम्ही स्वतःला आवरून गाडीकडे निघालो. गाडीत अमित डावीकडे अन सीमावाहिनी (माझ्या चुलत जाऊबाई) उजवीकडे बसले. ते दोघे ही माझी समजूत घालत होते. गाडी पुढे
सुजित(माझा दीर ) अन शब्बीर (अमितचा मित्र) बाईकवरून एस्कॉर्ट करत होते. आमच्या मागून सगळ्या नातेवाईकांची बस येत होती.
यंदाच्या १० डिसेंबरला २ वर्षे होतील लग्नाला… पण त्या गोड आठवणी जशाच्या तशाच आहेत…त्या आठवणी तशाच जपणारा अमितसारखा छान नवरा अन् रिद्धी ही गोंडस कन्या यांच्यारुपाने आशीर्वाद देणार्‍या परमेश्वराचे आभार…!

गुलमोहर: