भुताच्या गावात अन बाराच्या भावात . . !
तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणी साधीसुधी कथा नाही तर एक रहस्यमय अशी भयकथा आहे. मुळात ही कथा नसून आम्हाला आलेला एक अनुभव आहे जो तुम्हालाही विस्मयचकीत करून जाईल. "विस्मयचकीत" हा शब्द जर चुकला असेल तर तसे सांगा हा. कारण असा अनुभव या आधी आयुष्यात कधी आम्हाला आला नव्हता ना, तर नक्की काय म्हणतात हे ठाऊक नाही. आता तुम्ही म्हणाल आम्हाला म्हणजे कोणाला? तर आम्ही म्हणजे मुंबईच्या द.ग.डु. अका दयाराम गजानन डुगडुगकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला असलेल्या आणि वर्गाच्या अंतिम बाकावर बसणार्या सात-आठ टवाळ पोरांचे टोळके. आमची अभियांत्रिकीची चार वर्षे आम्ही एकही गटांगळी न खाता कशी पूर्ण केली यावर एक वेगळी कथा बनेल, पण ती पुन्हा कधीतरी. पण हे अंतिम वर्षही तसेच सुटणार याची खात्री असल्याने शेवटचा पेपर झाला तसे आम्ही दरवर्षीप्रमाणे मौजभ्रमंतीचा म्हणजे पिकनिकचा बेत आखायच्या तयारीला लागलो. आता आमच्या ग्रूपमध्ये चार पोरे गरीबाघरची असल्याने उरलेल्या चार खात्यापित्या घरच्या पोरांना यांच्या खाण्यापिण्याचा खर्चही मैत्रीखात्यात उचलावा लागत असल्याने आमची सहल शिमला-कुल्लू-मनाली सारख्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. आणि तसेही हे शेवटचे वर्ष असल्याने परीक्षा पास होण्यासाठी जी सेटींग की काय लावावी लागली होती तिचाही खर्च अंदाजापेक्षा जास्त झाला होता. त्यामुळे पिकनिकचे बजेट तंगच होते. पण म्हणतात ना, "हिंमते मर्दा तो मदते खुदा.." हो ना करता कशीबशी जुळवाजुळव करून आमचा गोव्याला जायचा बेत ठरला.
त्याचे झाले असे, आपल्या बंड्याचे गाव कोकणात दूरवर कुठेतरी होते. गोव्यापासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर. "मौजे येडगाव", गावाचे नावही कधी ऐकले नव्हते. पण गावाला समुद्रकिनारा मात्र भला मोठा लाभला होता. म्हणजे मौजे येडगावला मुक्काम केला तर तिथून गोव्याला ये-जा करणेही परवडले असते आणि त्याचाही वैताग आला असता तर गावच्या समुद्रकिनारीच धमाल करता आली असती. तर या बंड्याचे चुलत चुलत काका जे सध्या मुंबईतच राहत होते, त्यांनी तिथे एक घर बांधून ठेवले होते. पण ते घर त्यांना मानवले नव्हते म्हणून सध्या तसेच खाली पडून होते. ज्याचा आता पुढचे चार दिवस आम्ही ताबा घेणार होतो.
कोकणकन्या एक्सप्रेस मुंबई छत्रपती टर्मिनसवरून रात्री दहाला सुटणार होती. आम्ही सारे मात्र नऊलाच जमलो होतो. आठ-दहा तासांचा प्रवास म्हणजे जागा पकडणे जरूरी होते. तसा आमचा झोपायचा काही प्लॅन नव्हता. उलट पक्या आणि बाबू सारखी अतरंग कार्टी बरोबर असताना आजूबाजूच्या लोकांनाही झोपायला देऊ की नाही ही शंका होती. पक्याच्या पोटात दोन पेग टाकले आणि त्याला चावी दिली की रात्रभर मनोरंजनाची हमी. कोणी ढोलकीवर थाप मारायचा अवकाश की याची भजन-गाणी सुरूच म्हणून समजा. आजही काही वेगळे चित्र नव्हते. गाडीमध्ये मदिरापान निषिद्ध असल्याने तो आधीच बंड्याच्या जोडीने एकेक खंबा मारून आला होता. रात्री तीन वाजेपर्यंत गाण्यांची मैफिल रंगली. जे पिणारे नव्हते त्यांनाही एक प्रकारची झिंग चढली होती. मित्रांच्या सोबत अश्या रात्री रोज रोज थोडी येतात. आज कोणाचाही झोपायचा मूड दिसत नव्हता. गाणी गाऊन थकलो तशी गप्पांची मैफिल सुरू झाली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर बंड्यानेच विषय काढला, "उद्या आपण जिथे मुक्कामाला जाणार आहोत तो भाग ‘भुताची वाडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. "आईच्या गावात..", पक्याची सर्वप्रथम प्रतिक्रिया. पाठोपाठ एक कचकचीत शिवी. बंड्याच्या एका वाक्याने पक्याची सारी नशा उतरली होती. पक्या घाबरला तसा त्याचा जोडीदार बाबूही घाबरला. पण आम्ही सारे मात्र यामागचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुकता दाखवली. आजच्या जमान्यात कोणीही भुताच्या गोष्टी सांगाव्यात आणि आम्ही त्यावर सहज विश्वास ठेवावा एवढे पण काही आम्ही हे नव्हतो. कसेबसे काठावर पास होणारे का असेना, द.ग.डु.ची पोरे होतो.
बंड्याने सांगायला सुरूवात केली, अगदीच काही तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती. पण बंड्याच्या खापरपणजोबांच्या काळातील होती. बंड्याचे खापरपणजोबा म्हणजे त्या गावचे जमीनदारच म्हणा ना.. कै. विष्णूपंत मोरोजी राणे, सहा फूटांच्या वर धिप्पाड शरीरयष्टी, करारी मुद्रा, त्याला साजेश्या अश्या पिळदार मिश्या.. जमीनदाराला शोभेलसा पेहेराव, कडक इस्त्रीचा कोट आणि पांढरे धोतर. हातात काठी पण आधारासाठी नाही तर एखाद्यावर उगारायला घेतली आहे असे वाटावे. बंड्या त्यांच्या तैलचित्रावरून त्यांचे वर्णन सांगत होता आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांची प्रतिमा उभी राहत होती. खरी खोटी देव जाणे पण गावात त्यांचा भला मोठा वाडा होता. नाही, नाही.. त्या वाड्यात मुक्काम करणे आमच्या नशिबी नव्हते. तो तर केव्हाच बंद करून टाकला होता, कडीकुलुपे लाऊन.. विष्णूपंतांच्या आकस्मिक मृत्युनंतर.. कोणी म्हणतात की पाय घसरून पडले तर कोणी म्हणतात की ढकलून दिले. पण त्यांच्या मृत्युनंतर सार्या गावाला अवकळा आली. विस्मयकारकरीत्या एकेवर्षी पूर तर एके वर्षी दुष्काळ, असा सलग दोन वर्षे फटका बसला. गावावर उपासमारीची वेळ आली. परीणामी गावातल्या पोरीबाळींची लग्ने ठरेनाशी झाली. मोठ्या मुश्किलीने गावच्या सरपंचाने आपल्या मुलाचे लग्न जमवले. वरात वाड्यावरूनच निघणार होती, आणि तिथेच घात झाला. बघता बघता वाड्याच्या प्रांगणात बांधलेल्या मंडपाने पेट घेतला. काय झाले, कसे झाले, कोणालाही समजले नाही, आणि ते सांगायला त्या सार्यांपैकी एकही जण जिवीत उरला नाही हे ही एक कोडेच होते. बस्स.. त्या नंतर एकेकाने हळूहळू गाव सोडायला सुरूवात केली. बघता बघता सारा परीसर निर्जन झाला. काही वर्षे उलटली. लोकांची भिती चेपली. मधल्या काळात फारसे अघटीत असे काही घडले नाही. परत एकदा गाव वसायला सुरूवात झाली. पण त्या वाड्याच्या वाटेला जायची आजतागायत कोणाची हिंमत झाली नव्हती. आता याला धाडस म्हणा की मुर्खपणा पण आम्ही तोच करायला चाललो होतो. बंड्या ज्या घराची चावी घेऊन आला होता ते घर वाड्याच्या अगदी समोर बांधलेले होते. बंड्या कितीही म्हणत असला की नुसत्या अफवांनी तो वाडा कुप्रसिद्ध झाला आहे तरी त्या वाड्यासमोरच्या घरात राहणार्या लोकांना काहीतरी वेडावाकडा अनुभव आला असणार जे आता तिथे कोणी राहायला तयार नव्हते. बंड्यावर चिडावे की रडावे ते कळत नव्हते. परत मुंबईला फिरावे तर हसे झाले असते. थेट गोवा गाठावा किंवा कुठेतरी खाजगी विश्रामगृहात मुक्काम करावा तर तेवढे पैसे बरोबर नव्हते. हो ना करता कशीबशी मनाची समजूत काढली. काहीजण अजूनच पिल्यातच होते त्यांनी आमच्या हो ला हो मिळवली. आणि सरते शेवटी आम्ही भुताच्या वाड्यावर स्वारी करायला सज्ज झालो.
कोकणरेल्वेच्या कुडाळ स्टेशनवर आम्ही उतरलो. मौजे येडगावला जाण्याचे हे सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन होते. ते ही सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर. सात-आठ जण आणि सोबत सामान, बसपेक्षा रिक्षाचाच पर्याय सोयीस्कर होता. स्टेशनच्या बाहेर पडल्यापडल्या रिक्षांची भली मोठी रांग समोर दिसली पण एक रिक्षा मिळेल तर शप्पथ.. ज्याला विचारावे तो त्या गावाचे नाव ऐकून नकारार्थी मुंडी तर हलवायचाच वर उलट आम्ही कुठून आलो आहोत याची अशी काही चौकशी करायचा की आमचे काही बरे वाईट झाले तर तो आमच्या घरी निरोप पोहोचवणार होता. आतापासूनच सारे संकेत असे मिळत होते जे आमचे खच्चीकरण करत होते. पण हे सारे आमच्या भल्यासाठीच होते हे समजायची अक्कल त्या दिवशी आम्ही गहाण टाकली होती. शेवटी एका रिक्षावाल्याचा सांगण्यानुसार आम्ही स्टेशनपासून रिक्षाने बसस्टॅंडपर्यंत जायचे ठरवले. आणि तिथून मग पुढचा प्रवास एस.टी. च्या लाल डब्यातून होणार होता.
लाल डबा कसला, कळकट मळकट, धुळीने माखलेला काळाकुट्ट लोखंडी सांगाडा होता तो. दिवसभरात एकच बस होती जी वर्सोली फाट्यावरून डाव्या हाताला वळून पंधरा किलोमीटर आत वसलेल्या मौजे येडगावपर्यंत जायची. आणि का नसावी, कारण गाव येईयेईपर्यंत तिच्यात फक्त आम्हीच शिल्लक राहिलो होतो. तसे नाही म्हणायला एक धोतरवाले मामा होते, पण ते कुठल्या गावाला उतरणार याची काही कल्पना नव्हती. पुढे रस्ता खराब असल्याचे कारण सांगत बस गावच्या वेशीवरच येऊन थांबली. खाली उतरून पाहिले तर रस्ता तसा थोडाफार खडबडीत होता पण बसची हालत पाहता नक्कीच त्यामानाने चांगला होता. तरी वाद घालण्यात अर्थ नव्हता. इथून पुढे कसे जायचे याची कल्पना नव्हती. म्हणून विष्णूपंतांनाच विचारायचे ठरवले. अरे हो, विष्णूपंत म्हणजे बंड्याचे खापरपणजोबा नाही बरे का, तर मगासचे ते गाडीतले आजोबा. त्यांचा पेहराव पाहता एव्हाना आम्ही त्यांचे विष्णूपंत असे नामकरण करून त्यावरून बंड्याला चिडवून झाले होते. आम्ही त्यांना विचारणार त्या आधी त्यांनीच आम्हाला भुवया ताणून इशार्यानेच "कुठे?" असे विचारले. "भुतांची वाडी", बंड्या उत्तरला. "बरं बरं..", सकाळपासून मौजे येडगाव आणि भुताची वाडी ही नावे ऐकल्यावर ही पहिली थंड प्रतिक्रिया होती. जरासे हायसे वाटले. जर या आजोबांनीही डोळे वटारले असते तर इथूनच परतलो असतो अश्या मनस्थितीला येऊन पोहोचलो होतो. पण आता मात्र त्यांनीच दाखवलेल्या रस्त्याने जायचे ठरवले.
रस्ता खूप सोपा होता. झर्याच्या काठाकाठाने अर्धा पाऊण तास चालत जायचे होते, ते ग्रामदेवतेचे मंदीर येईपर्यंत. तिथून पुढे उजव्या हाताला एक पायवाट जी थेट भुताच्या वाडीला जाते. पावसाळा सुरू व्हायला अजून अवकाश होता तरी झरा मात्र आपल्याच नादात खळखळाट करत होता. पायातले बूट काढून त्या थंड पाण्यात उतरलो तसे दिवसभराचा क्षीण गेल्यासारखे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदांची जाळी पसरली होती. बंड्याने लगेच पानांचे द्रोण बनवले आणि त्यात करवंदे भरून घेतली. एवढे रसाळ फळ आजवर कधी चाखले नव्हते. मे महिन्याची दुपार, डोक्यावर आलेले उन, रात्रभराच्या ट्रेनच्या प्रवासाने आणि जागरणीने थकलेले शरीर, पाठीवर सामानाचे ओझे आणि तरीही आम्ही मस्त शीळ घालत चाललो होतो. खरेच या परीसरात एक प्रकारची जादू होती. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवले होते या जागेला. ग्रामदेवतेचे मंदीर तर पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. भिंती भंगल्या होत्या पण खांबांवरची नक्षी त्या काळच्या अप्रतिम कारागिरीची साक्ष देत होती. त्यावर पसरलेल्या वेलबुट्ट्या त्याच्या सौंदर्यात नकळत भर टाकत होत्या. मंदीराच्या आवारात पसरलेला हिरवागार गालिचा, मधोमध असलेले तुळशी वृंदावन, कुंपणापलीकडे चरणार्या गाई आणि सोबतीला पक्ष्यांच्या किलबिलाटाचे पार्श्वसंगीत. अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारे वातावरण. निसर्गाचे हेच रूप टिपण्यासाठी तर आम्ही कॅमेरे बरोबर आणले होते याची आम्हाला अचानक जाणीव झाली आणि पुढचा अर्धा पाऊण तास छायाचित्रणातच गेला. अश्या पवित्र आणि मंतरलेल्या परीसरात भूत काय भुताची सावली देखील असणे शक्य नव्हते. ग्रामदेवतेसोबत असलेल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. आता आम्ही पुन्हा एकदा सहलीच्या मूडमध्ये आलो होतो. मगाशी ज्यांचा उच्चार करायलाही घाबरत होतो त्या भुतांच्या नावाने आता आमची थट्टामस्करी चालू झाली होती. गप्पांच्या नादात कधी पोहोचलो समजलेच नाही. पहिलेच दर्शन झाले ते पंतांच्या एकमजली वाड्याचे. जळाल्याच्या खुणा अंगावर मिरवत दिमाखाने आमच्याकडे पाहत उभा होता. त्याच्यासमोर आमचे मुक्कामाचे घर एखाद्या पर्णकुटीसमान भासत होते. वाड्याचे मुख्य फाटक टाळे लाऊन बंद केले होते. तरी कुंपणाच्या भिंतीची मात्र जागोजागी पडझड झाली होती. एखादे कुत्रेही आरामात त्यावरून तंगडे टाकून जाऊ शकत होते. तरीही वाड्याच्या आसपास एकाही जनावराचा लवलेश दिसत नव्हता, ना मगासची पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. एक प्रकारची नीरव शांतता होती या भागात. तरी तिला भयाण म्हणता आले नसते. अजून रात्र होणे बाकी होते, पण आता तरी आम्हाला त्या वाड्याने भुरळ घातली होती. आम्ही सारे एकमेकांकडे सूचकतेने पाहू लागलो तसे बंड्या ओरडला, "कोणीही जादा हुशारी करायची गरज नाही, पुढचे चार-पाच दिवस आपण या वाड्यापासून दूरच राहणार आहोत." बस, आमच्यासाठी हा विषय इथेच संपला. आमच्यापैकी कोणीही दिवसा किंवा रात्री त्या वाड्याच्या जवळपासही फिरकणार नाही हा ठराव एकमताने पास झाला. कारण कोणी कबूल नाही केले तरी एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात होतीच.
बंड्याच्या काकांचे घर बरेच दिवसांपासून बंद असावे. घरभर पसरलेल्या जळमटांवरून हे समजत होते. तरी घरातील भांडीकुंडी मात्र इतरस्त्र पडली होती. कदाचित अधूनमधून कोणी इथे राहायला येत असावे. काही का असेना, आम्हाला त्या घराची साफसफाई आणि आवराआवर करण्यात जराही रस नव्हता. होस्टेलवर राहायची सवय असल्याने आम्हाला त्या पसार्यात राहण्यात जराही अडचण नव्हती. घरही दोन खोल्यांचेच होते. एक बाहेरची मोठी खोली, आणि आतले स्वयंपाकघर, ज्याच्या कोपर्यातच एक मोरी बनवली होती. अंगावरचे ओझे काढून ठेवले तसे दिवसभरात पहिल्यांदा भुकेची जाणीव झाली. पण त्यासाठीही हातपाय झाडणे गरजेचे होते. बरोबर काही कडधान्ये, तांदूळ, अंडी आणि नूडल्सची पाकिटे घेऊन आलो होतो. सद्य परिस्थितीत झटपट बनेल असे नूडल्सच होते. बंड्याने कोपर्यातील अडगळीतून स्टोव्ह आणि एक-दोन टोप शोधून काढले आणि सर्वांसाठी एकत्रच मॅगी बनवायला घेतली. जेवण झाले तसे सारे जण जागीच लुडकलो. डोळ्यांवर झापड होतीच. बघता बघता सार्यांचा डोळा लागला. वेळ काय झालीय याचे कोणालाही भान नव्हते, ना कोणाला पर्वा होती. उठलो तेव्हा सगळीकडे अंधार पसरला होता. संध्याकाळ उलटून गेली असावी. एकाला जाग आली तसे एकेक करून सारे उठले. जे अजूनही सुस्तावून पडले होते त्यांनाही लाथा घालून उठवले. बंड्यानेच मग लाईट लावली. स्विचबोर्डजवळ दोन पाली नजरेस पडल्या तसा दचकून मागे सरकला. घरभर नजर फिरवली असता दिसून आले की इथे तर पालींचे साम्राज्य पसरले होते. पालीही कसल्या, तर त्यांचा आकार पाहता भिंतीवरचे सरडे वाटावेत. एक बरे होते की सार्याजणी निपचित पडून होत्या. आम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले. निदान या परीसरात आपण सोडून आणखीही कोणी सजीव प्राणी वास करून आहे यातच समाधान मानले.
पक्याने सर्वांसाठी चहा टाकला. जेवायला मिळो न मिळो, पण सकाळ संध्याकाळ दोन वेळ तल्लफ आली की चहा हा हवाच या हिशोबाने आठवडाभर पुरेल इतकी चहा आणि दूधपावडर बरोबर घेतली होती. पण सध्या त्यापेक्षाही जास्त गरज वाटत होती ती आंघोळ करण्याची. त्याशिवाय प्रवासाचा शीण काही गेला नसता. मोरीमध्ये पाण्याने भरलेला पिंप होता पण त्यावरती पसरलेला धुळीचा जाडसर पापुद्रा पाहता ते पाणी कधीचे असावे याची कल्पना येत होती. तशी पाण्याची काही चिंता नव्हती. घराजवळच एक विहीर होती. अंगणात लावलेल्या बल्बच्या दिव्याचा प्रकाश तिथवर पोहोचत होता. आंघोळीचा कार्यक्रम आम्ही विहीरीच्या काठावरच उरकायचे ठरवले. पाणी काहीतरीच थंडगार होते. प्रत्येकाने कसेबसे दोन तांबे अंगावर ओतून आटोपले. खरे तर आधीची मूळ विहीर वाड्याच्या आतल्या बाजूला होती. पण बंड्याच्या काकांनी ती बुजवून ही बाहेरच्या बाजूला बांधली होती. वाड्याचा जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा तेव्हा एक कुतूहल निर्माण व्हायचे पण एक अनामिक भितीही मनात दाटून यायची. सर्वांच्या आंघोळी उरकल्यावर अर्धेजण जेवायच्या तयारीला लागले तर आम्ही तीन-चार जण तिथेच बसून राहिलो. पुरेशी झोप झाल्याने बर्यापैकी फ्रेश वाटत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पक्याने सिगारेट शिलगावली. दोन-चार वेळा धूर आतबाहेर केला तसे जरा तरतरी आली. वातावरणातही एक वेगळीच धुंदी जाणवत होती. थंडावा हळूहळू वाढत होता. पण गप्पाही रंगात आल्या होत्या, त्यामुळे कोणी परतायचे नाव घेत नव्हते. गप्पांच्या ओघातच विष्णूपंतांचा विषय निघाला. "थेरडा मेला आणि सारा गाव बदनाम करून गेला", पक्या सहज म्हणाला तसे एका बोक्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या कुंपणाच्या भिंतीवर एक पांढर्या रंगाचा, पण मानेभोवती गडद राखाडी रंगाचा पट्टा असलेला बोका आमच्यावरच नजर लाऊन होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या मानेच्या काळपट रंगामुळे त्याचे शीर आणि धड एकमेकांपासून वेगवेगळे असल्याचा भास होत होता. गुरगुरण्याची वेळही त्याने अशी साधली होती की नाही म्हणालो तरी सारे थोडे चरकलोच. तरी पक्या हिंमत करून म्हणाला, "या विष्णूपंत या, तुम्हीही दोन झुरके मारा आमच्याबरोबर." पक्याचा हेतू जराशी गंमत करून वातावरणातील ताण हलका करण्याचा असला तरी त्यानंतर बोक्याचे गुरगुरणे जास्तच वाढले. त्याला ‘शुकशुक’ करून हाकलायचा निष्फळ प्रयत्न केला पण त्याचे लाल होत जाणारे डोळे आम्हालाच तिथून शहाणपणाने जाण्याचा सल्ला देत होते. "चल मरू दे त्याला, जाउया, खूप भूक लागली आहे", बाबू म्हणाला तसे सारे जण पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिथून निघालो.
आम्हाला खाली हात परतलेले पाहून बंड्याने आंघोळीच्या बादल्या बरोबर घेऊन नाहीत का आला याची चौकशी केली. तसे आम्ही पुन्हा चरकलो. डोळ्यासमोर परत तोच बोका आला. तिथे आता परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काहीतरी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषयाला बगल देऊ लागलो तसे बंड्याही काय ते समजला. त्यानेही मग विषय ताणून धरला नाही. जेवण तयार झाले होते. टोपावरचे झाकण बाजूला सारले तसे दालखिचडीचा खमंग वास नाकात शिरला. बरोबर उकडलेली अंडी आणि बंड्याने घरून आणलेले लोणचे होते. दिवसभराचा थकवा म्हणा किंवा गावच्या वातावरणाची जादू म्हणा, सारे जण अधाश्यासारखे जेवणावर तुटून पडलो. जेवण झाल्यावर बंड्याने सर्वांसाठी लिंबू सरबत केले. एवढे लिंबू कुठून आले याची विचारणा केली तर म्हणाला की स्वयंपाकघरातील फडताळावर सापडले. "एवढे जुने असूनही रस चांगला निघाला रे", बाबूने सहज शंका उपस्थित केली. तसे सारेजण चपापले. खरेच विचार करण्यासारखी गोष्ट होती. घराची अवस्था पाहता गेले काही महिने तरी इथे कोणी फिरकले असावे असे वाटत नव्हते. साधे दरवाजा उघडतानाही कुलुपावरची धूळ झटकावी लागली होती. तरीही कधीचे ते लिंबू मात्र अजून सुकले नव्हते. अर्धे सरबत पोटात ढकलून झाले होते, उरलेले तसेच मोरीत ओतले. यावर कोणीही पुढे काही चर्चा केली नाही. सारे जणू काही एका अलिखित नियमाचे पालन करत होते की अश्या कोणत्याही संशयास्पद गोष्टीवर चर्चा करून मनात वेडेवाकडे विचार येऊ द्यायचे नाहीत. रात्री दिवे मालवायच्या आधी घरभर एक नजर फिरवली. संध्याकाळच्या सार्या पाली तशाच आपापल्या जागी निपचित पडून होत्या. अंधार झाल्यावर मात्र सार्या घरभर फिरत आहेत असा भास होत होता. पण उठून दिवा लावायची हिम्मत काही झाली नाही.
सकाळ झाली ती मांजरीच्या आवाजानेच. उठून पाहिले तर बर्यापैकी उजाडले होते. स्वयंपाकघरातील खिडकीवाटे तीन-चार मांजरींनी घरात प्रवेश केला होता. पुन्हा तो कालचाच बोका आठवला. पण या मात्र फार सौम्य वाटल्या. उलट डोक्यावरून हात फिरवून कुरवाळाव्यात अश्या गोजिरवाण्या होत्या. ज्यांना कालच्या बोक्याचा अनुभव नव्हता ते त्यांच्याशी मस्त खेळतही होते. पक्याने मात्र संधी मिळताच एकेकीला अलगद उचलून घराबाहेर काढले.
सर्वांची आंघोळ नाश्ता उरकेपर्यंत अकरा वाजले होते. त्यामुळे आजचा गोव्याला जायचा बेत रद्द झाल्यातच जमा होता. कारण या गावातून बाहेर पडायला एकच काय ती एस.टी. होती जी एव्हाना गेली असावी. तसेही ती एस.टी. पकडण्यासाठी गावच्या वेशीपर्यंत पाऊण-एक तास तंगडतोड करत जाणे भाग होते. आणि एवढे करून जर तिची आणि आमची चुकामुक झाली असती तर तेवढीच परतीची पायपीट. म्हणून आता उद्याच पहाटे उठून वेळेच्या आधी निघायचे ठरवले. आज दिवसभर जो काही धुमाकुळ घालायचा होता तो गावातच घालुया म्हणून तयारीनिशी बाहेर पडलो. नक्की कुठे जायचे याची काही कल्पना नव्हती. आणि कोणी मार्गदर्शकदेखील सोबतीला नव्हता. पण पश्चिम दिशेला, वाड्याच्या उजव्या हाताने सरळ चालत गेलो तर पंधरा-वीस मिनिटात समुद्रकिनारा लागेल एवढी टीप बंड्या आपल्या काकांकडून घेऊन आला होता. तसा वाड्याच्या डाव्या बाजूनेही एक रस्ता थेट समुद्रकिनारी जात होता, पण तो चुकूनही न वापरण्याची सक्त ताकीद मिळाली होती. कदाचित काकांनी शॉर्टकट सुचवला असेल असा निष्कर्ष काढून जास्त विचारमंथन न करता आम्ही उजव्या रस्त्याला वळलो. रस्ता म्हणजे एक रुंदशी पायवाट होती. दोन्ही बाजूंनी झाडीझुडपे आणि त्यापलीकडे लपलेली, गेरूच्या लाल रंगात माखलेली, कोकणातील टिपिकल कौलारू घरे. त्या समोर शेणाने सारवलेले आंगण, छोटेसे तुळशी वृंदावन.. सारी घरे याच पठडीतील आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत होती. दोन घरांच्या मध्ये असलेले बांबूंच्या काटक्यांचे कुंपण ते काय त्यांना वेगळे करत होते. पण या सार्यातही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून येत होती आणि ती म्हणजे सारी घरे ओस पडली होती. अंगणात सुकत घातलेले कपडे, भांडीकुंडी, एखाददुसरी बाज हे सारे तिथे वस्ती असल्याची चिन्हे दर्शवित होते पण त्यात जिवंतपणा असल्यासारखे काही वाटत नव्हते. आणि याचे कारण म्हणजे आतापावेतो एकही मनुष्य नजरेस पडला नव्हता. काही घरांची दारे सताड उघडी होती तर काही पर्णकुट्या दाराशिवायच होत्या, तरी त्यांच्या आत कोणी दिसत नव्हते. तसे पाहता काल वेशीवर भेटलेल्या आजोबांनंतर मनुष्यप्राणी बघून आम्हाला तब्बल चोवीस तास उलटून गेले होते. एखादी नरभक्षक आदिवासींची जमात जर इथे राहायला आली तर उपासमारीने मरेन अशी सारी परिस्थिती होती. अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर आम्ही सरते शेवटी समुद्रकिनारी पोहोचलो. खरे तर त्या एकसारख्या दिसणार्या रस्त्यावर जागीच चालत आहोत आणि हा रस्ता कधीच संपणार नाही असे वाटत होते. पण अचानक रस्त्याने एक वळण घेतले आणि नजरेस पडला तो अथांग महासागर. फेसाळणार्या पांढर्याशुभ्र लाटा आणि सुर्यप्रकाशात चकाकणार्या वाळूचा किनारा. मौजे येडगावला निसर्गाची एवढी मोठी देणगी लाभली होती याचा क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. खरेच एक शापित गाव होते हे..
किती वेळ पाण्यात डुंबून होतो ठाऊक नाही, पण कोणालाही तहानभुकेची, वेळकाळाची जाणीव नव्हती एवढे मात्र नक्की. क्रिकेट आणि फूटबॉल खेळण्यासाठी म्हणून बरोबर बॅट-बॉल वगैरे घेऊन आलो होतो. पण कोणाचीही पाण्यातून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. शेवटी बंड्यानेच आवाज देऊन सार्यांना बाहेर काढले. बाहेर येऊन किनार्यावर नजर टाकता लक्षात आले की खेळायच्या नादात किनार्याच्या बर्याच डाव्या बाजूला आलो होतो. कदाचित हवेच्या आणि लाटांच्या वाहण्याच्या दिशेमुळे ओढले गेलो असावो. वरच्या बाजूने नजर टाकली तर इथूनही एक वाट दिसत होती जी वर शिखरावर असलेल्या वाड्याकडे जात होती. कदाचित वाड्याच्या डाव्या बाजूने जाणारा रस्ता हाच असावा. आणि हा तुलनेने छोटा वाटत होता. तसेही आम्हाला परत त्या कंटाळवाण्या रस्त्याने जाण्यात जराही रस नव्हता. म्हणून सामानासोबत असलेल्या दोघाजणांना इथेच बोलावले.
हा रस्ता आधीच्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. आतापर्यंत डोळ्याला सतत सुखावणारा हिरवेगारपणा कुठेतरी लुप्त झाला होता. कोकण सोडून कुठल्याश्या भलत्याच रुक्ष प्रदेशात आल्यासारखे वाटत होते. पायाखाली वाळू पसरली असल्याने पाऊलेही मोठ्या मुश्कीलने उचलत होती. थोड्याच वेळात दमायला झाले. तरी मध्ये कुठे क्षणभर विश्रांती घ्यावी अशी सोय नव्हती. शिखरावरचा वाडा अजून तेवढाच दूर दिसत होता जेवढा की सुरूवातीला. चालता चालता एका मोकळ्या जागी येऊन पोहोचलो. दुपारची वेळ असूनही हा भाग काहीसा अंधारून आल्यासारखा वाटत होता, पण खरे तर सुर्याच्या किरणांना जमिनीवर पोहोचण्यास रोखायला फारशी झाडेही या परिसरात नव्हती. तरीही इथे मानववस्तीच्या खुणा होत्या. नुसत्या खुणा नाही तर चक्क माणसेही होती. आम्हाला पाहिले तसे एकेक जण आपापल्या घरातून बाहेर पडू लागला. सारे जण आमच्याकडे संशयास्पदरीत्या बघत होते. खरे तर मनातून थोडेसे चरकलोच, तरीही भुतांपेक्षा माणसे परवडली असा विचार करून त्यांच्याशी संवाद साधायला सुरूवात केली. आम्ही मुंबईहून खास त्यांच्या गावाला फिरायला म्हणून आलो आहोत हे त्यांना समजले तसे सारे आमच्याशी मोकळे झाले. त्यांच्या या दुर्लक्षिल्या गेलेल्या गावाला भेट द्यायला एवढ्या दूरून ते ही मुंबईसारख्या शहरातून कोणीतरी येते आणि त्यांच्या गावाच्या परीसराची तारीफ करते ही गोष्ट नक्कीच त्यांना सुखावणारी होती. फणसासारख्या बाहेरून सख्त आणि आतून गोड असणार्या कोकणी माणसांच्या पाहुणचाराबद्दल ऐकले होते पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. तशी त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम वाटत होती तरी आम्ही त्यांच्या घरचे पाहुणे असल्यागत जेवायचा आग्रह करत होते. आम्ही नकार दिला तरी आंबे, काजू, फणसाचे गरे आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ आणून आमच्या समोर ठेवले. सारेच पदार्थ रुचकर होते. जरी आम्ही जेवणाला नकार दिला असला तरी भूक मात्र प्रत्येकाला सडकून लागली होती. प्रत्येकाने पोट भरेपर्यंत ताव मारला. त्यानंतर त्यांनी ताडीने भरलेले मडके आमच्यासमोर धरले. आतापर्यंत चाखलेल्या पदार्थांची चव पाहता ही देखील सोमरसापेक्षा कमी नसणार याची प्रत्येकाला खात्री होती, तरी बंड्याने इशारा केला तसे सावधगिरी म्हणून आम्ही तिची चवही घेणे टाळले. त्यांचा निरोप आणि दुसर्या दिवशीचे जेवणाचे आमंत्रण घेऊन आम्ही तिथून निघालो.
मुक्कामाच्या जागेवर पोहोचेपर्यंत अंधारून आले होते. गेल्या गेल्या दिवा लावला. कालच्या सार्या पाली तश्याच आपापली जागा पकडून स्थितप्रज्ञासारख्या बसल्या होत्या. त्यांना मनातल्या मनात नमस्कार करून आम्ही जेवायच्या तयारीला लागलो. उद्या गोव्याला जायचे होते म्हणून आज दारूचा उरलासुरला स्टॉक संपवून टाकायचे ठरवले. नेहमीचा शेव-फरसाणचा चकणा होताच, जोडीला सुके बोंबीलही भाजले. जेवणात अंड्याचे कालवण आणि भात केला होता. सारेच मटणमच्छी खाणारे असल्याने काही प्रश्नच नव्हता. आज कोणाला भूक जास्त नव्हती तरी लवकर उरकून घेतले. उद्या सकाळी गोव्याला जाण्यासाठी लवकर उठायचे होते ना.. घरातले पाणी संपले होते. रात्रीचे बाथरूमला वापरायला म्हणून थोडेतरी पाणी हवेच या हिशोबाने विहीरीवर गेलो. अर्थात तिघे चौघे मिळूनच. पक्या आणि बाबू होतेच. तेवढाच त्यांना सिगारेटी ओढायचा मौका. गेल्या गेल्या पहिला सभोवताली नजर फिरवली. एक नजर वाड्याच्या कुंपनावरही टाकली. कालचा बोका कुठेच दिसला नाही. पक्याने मग सिगारेटचे पाकीट बाहेर काढले. बाबूने हंडा विहीरीत सोडला आणि माचिस काढून सिगारेट शिलगावली. दोन झुरके मारून सिगारेट पक्याच्या हातात दिली आणि हंडा वर खेचायला घेतला. वजन जरा जास्तच भासले. जणू काही आत दगडे भरली असावीत. कसाबसा खेचून वर आणला तसा क्षणार्धात हलका झाला. उपडा करून पाहतो तर पाण्याचे दोन थेंब काय ते ओघळले. चक्रावून परत आत टाकला. आम्ही काय झाले विचारले तर काही बोलला नाही. परत दुसर्या खेपेलाही तेच. हंडा वर खेचायला नेहमीपेक्षा जास्त ताकद लावावी लागत होती. पण बाहेर काढला तो परत एकदा रिकामाच. आम्हाला वाटले, बाबूची काहीतरी गडबड होत आहे, म्हणून पुढच्या खेपेस पक्याने स्वता हंडा आत सोडला. यावेळी तर खेचायला आम्हा दोघांना ताकद खर्च करावी लागली. वर येईपर्यंत दोर हातातून सटकतो की काय नाहीतर आम्हालाच आत खेचून नेतो की काय असे वाटू लागले. एक शेवटचा जोरदार हिसका देऊन खेचला तसे हंडा दोरीतून सुटून तीनताड उडाला. टण टण टण आवाज करत वाड्याच्या कुंपणावरून आत जाऊन पडला. आतमध्ये जाऊन हंडा आणायचा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही. तरी हंड्याचे नक्की काय झाले हे बघण्याची उत्सुकता आम्हाला कुंपणापर्यंत घेऊन गेली. टाचा वर करून आत डोकावून पाहिले पण आत पुरेसा प्रकाश पोहोचत नसल्याने काही दिसायला मार्ग नव्हता. एकाएकी आत काहीतरी हालचाल झाल्यासारखी जाणवले. आवाजाच्या दिशेने पाहिले तसे काही समजायच्या आत एक पांढरी आकृती वीजेच्या वेगाने आमच्या अंगावर झेपावली. तिने पक्याच्या मस्तकाचा वेध घेतला तसे त्याने झटका बसल्यासारखे तिला पकडून दूर भिरकावून दिले. हवेतून अलगद जवळच्या झाडीत पडताना जाणवले की तो कालचाच बोका होता. झाडीत कुठे गडप झाला समजले नाही. एकटक त्याच दिशेने बघत राहिलो तसे हळूहळू अंधारात दोन लाल-पांढरे डोळे चमकू लागले. बघता बघता दोनाचे चार, चाराचे आठ... आकडा वाढतच होता. नक्की किती श्वापदे तिथे दडली होती देव जाणे.. त्यानी एकसाथ आमच्यावर हल्ला केला तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती. दहा-बारा बोक्यांशी एकवेळ झुंजलोही असतो, पण जर यामागे एखादी अमानवीय शक्ती असेल तर तिच्यापुढे आमचा काय निभाव लागणार होता. अचानक झालेल्या प्रकाराने तिघेही पुरते हादरून गेलो होतो. कसेबसे अंगातले त्राण एकवटून तिथून पळ काढला. घरापर्यंतचे पन्नास पावलांचे अंतर पन्नास मैलांचे भासले. सतत पाठीमागे कोणीतरी लागले आहे असा भास होत होता. धापा टाकतच आत शिरलो. दोनच मिनिटात सार्या शरीराला पाणी सुटले होते. काही न विचारताच बंड्याने सर्वप्रथम आतली कडी लाऊन घेतली. कोणालाही आमचा अनुभव खरा खोटा करायचा नव्हता की त्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता. दुसर्या दिवशीच इथून निघायचे असे सर्वांनी एकमताने ठरवले. जमल्यास गोव्याला जायचे किंवा थेट मुंबई गाठायची. फक्त आजची रात्र निर्विघ्नपणे पार पडू दे आणि पडल्यापडल्याच झोप लागू दे अशी प्रार्थना करून आम्ही दिवा मालवला.
सकाळी उजाडले तसे आम्ही आवरायला घेतले. रात्रभर कोणाचा डोळ्याला डोळा लागला असेल असे वाटत नव्हते. तरीही सारे आळस झटकून निघायच्या तयारीला लागले होते. आजची बस चुकता कामा नये हे सार्यांना ठाऊक होते. चालताना सर्वांच्याच डोक्यावर एक प्रकारचा ताण होता. येताना याच रस्त्याने आलो होतो पण आता मात्र तेव्हासारखे सभोवतालच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटणे जमत नव्हते. पक्यानेच मग सर्वांचा ताण हलका करायला एक शीळ घातली आणि गोव्याच्या समुद्रकिनार्यावर वीतभर कपड्यात बागडनार्या ललनांचा विषय काढला. तसा अचानक सार्यांचा नूर पालटला. ही देखील एक निसर्गाचीच किमया होती. वेशीपर्यंत तर पोहोचलो पण बस आली की गेली की कधी येणार हे समजायला काही मार्ग नव्हता. वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. तेवढ्यात तिथे विष्णूपंत अवतरले. म्हणजे ते पहिल्या दिवशी दिसलेले धोतरवाले आजोबा आले. त्यांच्याकडून समजले की आज बस काही येत नाही. काल रात्री बसच्या रस्त्यात असलेल्या नदीवरील पूल तुटला होता. म्हणजे आता पुढचे चार-पाच दिवस तरी बस किंवा कोणतेही वाहन इथे फिरकणार नव्हते. या गावातून बाहेर पडायला दुसरा कोणता मार्ग आहे का म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली तसे त्यांनी वर आकाशाकडे बोट दाखवले. त्यांच्या या कृतीचा काहीच अर्थ लागला नाही. आणि लावण्याचा भानगडीतही आम्ही पडलो नाही. परत मागे फिरण्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता. आता फक्त एकच आशेचा अंधुकसा किरण दिसत होता आणि ते म्हणजे काल भेटलेले गावकरी.
महादेवाला नमस्कार करून आम्ही परत घरच्या दिशेला फिरलो. गावाकडे जाणारा रस्ता परत त्या विहीरीसमोरूनच जात होता. दिवसाची वेळ होती तरी एकमेकांचा हात धरून साखळी करूनच चालत होतो. कालचे झाडीमागून लुकलुकणारे डोळे, गुरगुरण्याचा आवाज, अजूनही आम्ही विसरलो नव्हतो. गावात पोहोचलो पण गावकर्यांचा कुठे पत्ता नव्हता. दिवसा हे सारे गावकरी जातात कुठे हा प्रश्नच होता. निदान बाईमाणसे तरी घरी असावीत, तर ती ही कुठे दिसत नव्हती. सारी वाडी निर्मनुष्य पडली होती. कदाचित यावरूनच भुतांची वाडी हे नाव पडले असावे. दिवस उतरू लागला तसे सारे कासावीस होऊ लागलो. सकाळपासून फारसे काही खाल्ले नव्हते. पण चिंता भूकेची नव्हती तर इथून सुटका कशी करून घ्यायची याची होती. आणि हे दिवस मावळायच्या आधीच शक्य होते. चारच्या सुमारास समुद्रकिनार्याच्या दिशेहून सारे गावकरी परतताना दिसले. चौकशी करता समजले की दर शुक्रवारी त्यांच्यात दर्यावर जाऊन मासेमारी करून किनार्यावर शिजवून खायची प्रथा होती. सारे काही अजबच होते पण आमची जेवणाची सोय मात्र झाली होती. त्यांचे बर्यापैकी जेवण उरले होते जे आम्हाला पुरेसे होते. गावातून बाहेर पडायला आणखी एक मार्ग होता. गावच्या दक्षिणेला असलेल्या वडाच्या पारावरही दिवसाला एक एस.टी. यायची पण ती दुपारी बाराची असल्याने आता आम्हाला आणखी एक दिवस मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सकाळी आम्हाला कोणी आणखी एक रात्र थांबण्याबद्दल सांगितले असते तर आम्ही तो सल्ला तेव्हाच धुडकावून लावला असता. पण आता गावकर्यांच्या दिलाश्याने थोडीफार हिंमत आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सारे आमच्या मनाचे खेळ होते. आम्ही आधीच या गावाची अपकिर्ती ऐकून इथे आलो होतो. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे संशयाच्या नजरेनेच बघत होतो. खालच्या वाडीतील माणसे चार दिवस जत्रेला गेली होती म्हणून आम्हाला काल त्यांची घरे खाली दिसली होती, ज्याचा आम्ही वेगळाच अर्थ काढला होता. येथील हवामान देखील बरेच लहरी होते. कधी थंडी पडते तर कधी उकडायला लागते. तर कधी अचानक जोरदार वारे वाहायला लागतात. उन-सावलीचा खेळ तर चालूच असतो. या सार्यालाही आम्ही भुताटकी समजत होतो. गावच्या ठिकाणी बोके आणि रानमांजरे असणे काही विशेष गोष्ट नव्हती. हातात एक काठी घेतली असती किंवा त्यांच्या दिशेने एक दगड भिरकावला असता तरी कधी आमच्या वाटेला गेली नसती. इतकेच नाही तर त्यांच्यामते काल विहीरीवर घडलेल्या प्रसंगामागेही मांजरीच होत्या ज्या रात्रीच्या पाणी प्यायला विहीरीत उतरतात आणि पाणी उपसायला कोणी हंडा टाकला की त्याला धरून वर यायचा प्रयत्न करतात. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला असे वाटू लागले की गेले दोन दिवस आम्ही आमची तर्कबुद्धी गहाण टाकली होती की काय.. सर्वांनी अजून एक नाही तर गावकर्यांच्या आग्रहाखातर अजून दोन-चार दिवस राहायचा निर्धार करून कोलंबीचा रस्सा आणि तळलेल्या बांगड्यांवर ताव मारायला सुरूवात केली.
गावकर्यांचा निरोप घेऊन निघालो. वाटेत पुन्हा विहीर लागली. नाही म्हणाले तरी मनावर थोडेफार दडपण होतेच. रात्री परत विहीरीवर यायची हिम्मत होईल ना होईल, आणि झालीच हिम्मत तरी का विषाची परीक्षा घ्या. त्यापेक्षा अंधार पडायच्या आतच आम्ही पाणी भरून घ्यायचे ठरवले. आजचा सारा दिवस फुकटच गेला होता. काही न करता उगाच दमछाक झाली होती. त्यात सकाळी लवकर उठलो होतो, म्हणून लवकर झोपायचे ठरवले. तेवढीच रात्रही छोटी झाली असती. घरी परतलो आणि पाहिले तर अंगणातील बल्ब फुटून त्याच्या काचा दारापाशी विखुरल्या होत्या. आता हे आणि कोणाचे काम असावे मांजरीचेच की आणखी एखादे जनावर, की अचानक वाहणार्या जोरदार वार्याने झाले असावे. आणखी किती गोष्टींचा तर्क लावावा लागणार होते देव जाणे. एवढा वेळ आणलेले उसने अवसान गळून पडते की काय असे वाटायला लागले. घरात शिरलो तर अंदाजाप्रमाने पाली आधीच बस्तान मांडून बसल्या होत्या. यांच्याबद्दल मगाशी गावकर्यांना विचारायचे राहिलेच. या अश्याच गावभर पसरलेल्या होत्या की आमच्याच नशीबी होत्या. पण खरे तर या पालींची आम्हाला भिती वाटण्याऐवजी सोबतच वाटू लागली होती.
गावकर्यांसोबत पोटभर जेवण झाले होते, त्यामुळे आता रात्रीच्या जेवणाची चिंता नव्हती. दारूचा स्टॉक संपला होता पण शेव-फरसाण बर्यापैकी बाकी होते. भूक लागलीच तर झटपट मॅगी नूडल्स करता येणे शक्य होते. आतासे कुठे आठ वाजत होते. मुंबईच्या पोरांनी आदल्या रात्री कितीही जागरण केले असले, दिवसभरात कितीही थकले असले तरी त्यांना आठ-नऊ वाजता झोप येणे शक्य नव्हते. म्हणून मग पत्त्यांचा डाव रंगला. पत्ते खेळताना आम्हाला कोणाला स्थळकाळाचे भान उरायचे नाही. परीक्षेचा अभ्यास करायचा बहाणा करून होस्टेलमधील एखाद्या मित्राच्या रूमवर सारे पत्ते कुटत बसायचो. आताही तसाच माहौल तयार झाला होता. रात्र चढू लागली तसे एकेक जण पेंगू लागला. शेवटी आम्ही नेहमीचे तीनचार हौशी कलाकार उरलो. पण अचानक वातावरणात एक प्रकारची शांतता जाणवू लागल्याने आम्हीही आता झोपणेच शहाणपणाचे समजले. लाईट काढून किती वेळ पडून होतो माहीत नाही पण झोप लागत नव्हती. मनात उलटसुलट विचार येत होते. अजूनही बर्याच गोष्टी पटल्या नव्हत्या. लहान असताना रामसे बंधूंच्या भयपटात असेच सारे पाहून खूप घाबरायचो. प्रत्येक वेळी सिनेमा बघताना नकळत स्वताला त्या कलाकारांच्या जागी ठेऊन हे असेच आपल्याशी घडले तर काय होईल असा विचार मनात आल्याने ही भिती वाटायची. नंतर जसेजसे मोठे झालो तसे हे सारे खोटे असते, प्रत्यक्षात असे काही घडत नाही असा विश्वास आल्याने अश्या सिनेमांनी घाबरवायचे बंद केले. कालांतराने ते कंटाळवाणे किंवा विनोदी वाटू लागले. आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. जोपर्यंत हे सारे झूठ आहे, निव्वळ मनाचेच खेळ आहेत हा विश्वास येणार नव्हता तोपर्यंत मन घाबरणारच होते. उद्या कदाचित आम्हीच या सार्या प्रकारावर हसत असू. पण अजून तो उद्या उजाडायचा होता. त्या उद्याचीच आतुरतेने वाट बघत असल्याने झोप येत नव्हती.
छतावर काहीतरी वाजल्याचा आवाज झाला. कदाचित वार्याने झाडाची फांदी वगैरे तुटून पडली असावी. थोडावेळ अंदाज घेऊन डोळे मिटले तसे पुन्हा कौले वाजली. यावेळी आवाज जरा मोठा होता. कोणीतरी दणकन उडी मारल्यासारखा. चपापून आम्ही दोघेतिघे एकमेकांकडे बघू लागलो. आता हे काय नवीन संकट उभे ठाकलेय याचीच चिंता सार्यांच्या डोळ्यात दिसत होती. टपटप करून आवाज वाढू लागला. जणू काही माकडांची एखादी टोळी कौलावर चढली होती. कोकणात माकडे असणे अशक्य नसले तरी मुंबईहून निघाल्यापासून अख्ख्या प्रवासात आम्हाला एकाही माकडाने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे अचानक त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावणे "तर्कात" बसत नव्हते. एव्हाना आवाजाने सारे उठून बसले होते. बंड्याने नेहमीसारखे घरमालकाच्या हक्काने पहिला उठून दिवा लावला. नक्की काय गोंधळ चालू असावा काही कल्पना येत नव्हती. दार उघडून बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. पाच-दहा मिनिटांनी आवाज थांबला. पण तो केवळ जाहीरातींचा ब्रेक घेतल्यासारखा. थोड्याच वेळाने पुन्हा टपटप सुरू झाली. मध्येच आवाज काही काळासाठी थांबायचा आणि आता पुन्हा येणार नाही असा विश्वास येताच परत सुरू व्हायचा. येथील हवामान कितीही लहरी असले तरी मे महिन्यात इथे गारा नक्कीच पडणार नव्हत्या. आणि खरोखरच पडत असल्या तरी अशी आवाजाची उघडझाप करत पडल्या नसत्या. दार उघडून बघायचीही सोय नव्हती. बाहेरचा दिवाही फुटला असल्याने अंधारच नजरेस पडला असता. नाही म्हणायला एक टॉर्च जवळ होता पण त्याचा प्रकाशही जेमतेम दहा पावलांवर जाऊन थांबेल एवढाच होता. दुष्काळात तेरावा महिना, आगीतून फोफाट्यात या आशयाच्या सार्या म्हणी एकाच वेळी आठवल्या जेव्हा बाबूने सांगितले की त्याच्या पोटात कळ मारतेय आणि त्याला त्वरीत परसाकडे जाणे गरजेचे आहे. थोड्याच वेळात सार्यांचे नाक चुरचुरले तसे जाणवले की तो सांगतोय त्यात खरेच तथ्य आहे. आता खरी पंचाईत झाली. बाथरूमला जायची सोय आत होती पण संडास मात्र बाहेर होता. बाबूनेही धमकी दिली की जर काही मार्ग नाही काढला तर तो आत मोरीतच करेन. आणि हे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते. बाबूला आता भुताच्या बापाचेही काही पडले नव्हते. त्याच्यासाठी कोणत्याही परीस्थितीत हलके होणे गरजेचे होते.
कौलांवरचा आवाज गेले पाच-दहा मिनिटे थांबला होता. तरी कोणत्याही क्षणी पुन्हा सुरू होईल याची खात्री नव्हती. त्या आवाजापेक्षाही याची भिती होती की आम्ही दार उघडायची वाट बघत बाहेर कोणी दबा धरून तर बसला नसेल. शेवटी तयारीनिशी बाहेर पडायचे ठरवले. बंड्या हातात टॉर्च घेऊन सर्वात पुढे होता. पाठीमागे दोघे तिघे काठ्या घेऊन. सार्यांनी प्रत्येकाकडे देवाचे चिन्ह असलेली एखादी चैन, अंगठी यासारखी वस्तू जवळ असल्याची खात्री करून घेतली. बंड्याने दरवाजा उघडून पहिला चारही दिशेने टॉर्चचा प्रकाश फेकून जवळपास काही संशयास्पद तर दिसत नाही ना हे बघितले. बंड्याचे खरेच कौतुक वाटत होते. तसा तो मुळातच धाडसी होता, पण इथे आपल्यामुळे बाकीचे सारे संकटात सापडले आहेत तर सोडवणेही आपलेच कर्तव्य आहे याची जाण ठेऊन तो प्रत्येक वेळी पुढाकार घ्यायचा. बंड्याने ग्रीन सिग्नल दिला तसा एकेक करून साखळी बनवूनच आम्ही बाहेर पडलो. प्रत्येकाने आपला मोबाईल बरोबर घेतला होता. त्याचा जेमतेम प्रकाश एकेमेकांचे चेहरे तरी दाखवत होता. छताकडे बघायची कोणाची हिंमत नव्हती. तसाही तिथे अंधारच पसरला होता. टॉर्चचा प्रकाश कदाचित तिथे थोडाबहुत पोहोचला असता पण बंड्याने तो संडासाच्या दिशेनेच रोखला होता. अर्थात तेच आमचे लक्ष्य होते. तोच एक गड काबीज करायचा होता आणि परत फिरायचे होते. बाबू आत शिरला. अर्थात दरवाजा उघडाच ठेवला होता. तो आत जीव मुठीत धरून बसला होता आणि आम्ही सारे बाहेर नाक मुठीत धरून उभे होतो. कोणाला काय बोलावे सुचत नव्हते पण शांतता जास्त भयप्रद वाटत असल्याने मध्येच कोणीतरी उगाच एखादे वाक्य फेकून तिचा भंग करायचा प्रयत्न करत होता. एकेक क्षण युगासारखा भासणे म्हणजे नक्की काय याची प्रचिती येत होती. अश्याच काही सहस्त्र क्षणांनंतर बाबूचे कार्य आटोपले तशी आणखी एकदोघांना हुक्की आली. मनात खरे तर लाखो शिव्या येत होत्या पण नकार द्यायचीही सोय नव्हती. एकदा घरात परतलो तर पुन्हा बाहेर यायची हिंमत होणार नव्हती. त्यापेक्षा एकदाच काय ते सार्यांचे उरकून जाऊ दे असा विचार केला. सारा वेळ मनात धाकधूक होतीच की आता परत आवाज सुरू होईल, आता कोणीतरी अंधारातून अंगावर झेपावेल. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. जसे शिस्तीत आम्ही बाहेर आलो तसेच परत आत गेलो. दाराची कडी लावली ती आता थेट सकाळी उघडण्यासाठीच.
पण अजून रात्र संपणे बाकी होते. थोडावेळ डोळा लागतो न लागतो तोच पुन्हा दारावर थपथपवण्याच्या आवाजानेच. फार मोठा आवाज नव्हता पण शांततेचा भंग करून आमच्या मनात धडकी भरवण्याइतपत पुरेसा होता. पुन्हा एकदा बंड्यानेच धीर एकवटून "कोण आहे?", म्हणून आवाज दिला. पण काहीच प्रत्युत्तर नाही आले. परत काही विचारायची आमची हिंमत झाली नाही आणि पुन्हा तो आवाजही नाही आला. पानांची सळसळ मात्र बराच वेळ ऐकू येत होती. आता पुन्हा डोळा लागणे कठीण होते. तसेही तीन वाजले होते. उरलेली रात्र आम्ही तशीच पडल्यापडल्या जागून काढली.
उजाडल्या उजाडल्या सर्वात पहिले दरवाजा उघडून छतावर नजर टाकली. सारी कौले जागच्या जागी होती. त्यावर साधे पानही पडले नव्हते. रात्री नक्की काय चालू होते माहीत नाही पण जे काही होते त्याची एकही निशाणी दिसत नव्हती. आता आणखी या गावात राहण्यात काही अर्थ नव्हता. गेल्या तीन दिवसात मौजमजा कमी आणि भितीचेच अनुभव जास्त घेतले होते. काल गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी बाराची एस.टी. होती. पण ती जिथून पकडायची होती तिथवर जायला किती वेळ लागतो हे माहीत नव्हते. बरे गावकरी देखील दिवसा जागेवर सापडतील की नाही याची खात्री नव्हती. फारसा विचार न करता पटापट आवरून गावच्या दिशेने निघालो. सारे सामान बरोबरच घेतले होते. परतायची सोय झाली तर तिथूनच परस्पर निघायचे ठरवले. सुदैवाने गावकरी भेटले. त्या क्षणाला ते आम्हाला खरेच देवदूतासमान भासत होते कारण आता तेच आम्हाला या भुताच्या वाडीतून बाहेर काढू शकत होते. कालचा सारा वृत्तांत त्यांना सांगितला तरी अजून त्यांचे हेच म्हणने होते की आम्ही आणखी चार दिवस इथे राहावे. काल जे आमच्या छतावर नाचत होते ती गावातीलच माकडे होती ज्यांना अधूनमधून असा दंगा करायची लहर येते, तरी आजपर्यंत त्यांनी कोणाला त्रास दिल्याचे ऐकीवात नव्हते. पण दारावर थाप कोणी मारली असावी याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. तरीही आम्ही आमचा विचार बदलावा म्हणून गावकरी सातत्याने मनधरणी करत होते. आम्ही मात्र आमचे मन बनवून आलो होतो. त्यांचा आग्रह केवळ औपचारीकता म्हणून ऐकून घेत होतो. त्यांच्या जागी ते योग्यच होते. आम्ही असा इथून पळ काढणे म्हणजे त्यांच्या गावावर बसलेला बदनामीचा शिक्का आणखी गहिरा होणार होता. पण आमच्या दृष्टीने विचार करता, आता कोणत्याही किमतीत या "भुताच्या गावात राहून बाराच्या भावात जाण्यापेक्षा" इथून पळ काढण्यातच सार्यांचे भले होते. सार्यांबरोबर आठवण म्हणून एक फोटो काढायची इच्छा होती, पण त्यांनी नाराज होऊन यास नकार दिला. म्हणाले की पुढच्या वर्षी परत याल तेव्हा नक्की काढू. वाद घालण्यात किंवा हट्ट करण्यात अर्थ नव्हता आणि पुढच्या वर्षी परत येण्याचा प्रश्नच नव्हता.
सात-आठ गावकरी बरोबर घेऊन आणि बाकी सार्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. इथून आता परत बरेच चालावे लागणार असे वाटले होते. पण एक छोटेसे टेकाड ओलांडले आणि दहा मिनिटातच इच्छित जागी पोहोचलो. एक भलामोठा वटवृक्ष आडवाउभा पसरला होता, ज्याच्या बुंध्याशी आम्ही उभे होतो. वर शेंड्याला शेकडो वटवाघुळे लटकली होती. बरेच जुने खोड दिसत होते. कदाचित विष्णूपंतांच्या काळातील असावे. जाताजाताही विष्णूपंतांची आठवण यावी... कधी एकदा बस येते आणि या गावापासून आणि त्याच्या विचारांपासून दूर जातोय असे वाटू लागले. गावकर्यांनी पुन्हा एकदा विचारणा केली.. शेवटचीच.. पण आमचाही निर्धार ठाम होता. इतक्यात बस आली. हिरमुसलेल्या गावकर्यांना शेवटचा रामराम करून आम्ही बसमध्ये चढलो. बस सुटली तरी आमची नजर गावकर्यांवरच लागली होती. मागच्या खिडकीतून आम्ही त्यांना हात दाखवू लागलो तशी एक "विस्मयकारक" घटना घडली. झूप.. झूप.. झूप.. करून सारे गावकरी आम्हाला हात दाखवतच हवेत उडाले. आणि बघता बघता त्यांची वाघुळे बनून झाडाला लटकली. आमचा क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना. गेले दोन दिवस आम्ही यांच्याबरोबर राहिलो, यांच्याकडचे खाणे खाल्ले, यांच्या आग्रहाखातर एक ज्यादा दिवस थांबलो, आणि तरी समजू शकलो नाही. या आपल्या मुर्खपणावर रडावे की एवढे होऊनही आपण मुंबईला सुखरूप जात आहोत याबद्दल देवाचे आभार मानावेत हे समजेनासे झाले. पण थांबा... अजून तरी आम्ही कशावरून सुखरूप होतो. बसमध्ये एक नजर फिरवली तर सार्या नजरा आमच्याकडेच लागल्या होत्या. कंडक्टर मात्र आपल्याच नादात पुढे बसला होता. अजूनही तो आमच्याजवळ तिकीटाची विचारणा करायला आला नव्हता. पुढचा मागचा विचार न करता आम्ही सरळ बेल वाजवली आणि गाडी थांबली तसे सरळ खाली उतरलो. शेवटचा मुलगा उतरला तशी बस आपल्या मार्गाने निघून गेली. आम्हीही त्याच वाटेने पुढे चालू लागलो. मागे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पंधरा-वीस मिनिटांनी एक बसस्टॅंड दिसला. चौकशी करता समजले की अर्धा-पाऊण तास झाला पण या वाटेवरून एकही बस गेली नाही. आता आमची बस कुठे गेली असावी याचा अंदाज लावणे आमच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. ती सुद्धा अशीच झाडाला लटकली असावी किंवा पाताळात शिरली असावी. आम्हाला आता त्याची फिकीर नव्हती. सरतेशेवटी आम्ही आपल्या माणसात म्हणजे मनुष्यप्राण्यात आलो होतो. जे काही आम्ही अनुभवले त्याची या अनोळखी लोकांत वाच्यता करून आम्हाला आमचे हसे करून घ्यायचे नव्हते, ना आम्हाला त्यांच्या सहानुभुतीची गरज होती. गोव्याला जायचा बेत कधीच रद्द झाला होता. सर्वांना मुंबईचे वेध लागले होते.
तर मित्रांनो, गोव्याला आम्ही गेलो असतो तर तिथे काय धमाल केली असती यावर पुढच्या वेळी नक्कीच एखादी काल्पनिक कथा लिहेन, पण या सत्यघटनेवर मात्र आपला विश्वास बसला असेल अशी अपेक्षा करतो. बाकी ज्यांचा नसेल बसला ते स्वता भुताच्या वाडीला भेट देऊन याची खात्री करू शकतात. आणि हो, जमल्यास गावकर्यांबरोबर एखादा फोटो काढायला विसरू नका, आमचा जरा राहिलाच... चला तर मग, जगला वाचलात तर भेटू इथेच.. राम राम..!!
-------------- xxx -------------------------- xxx ------------
अहो वाईच थांबा की, स्टोरी अजून बाकी आहे मंडळी,
मित्रांनो, मी स्वता कोकणातील आहे. त्यामुळे या कथेचा उद्देश कोकणात भुते असतात असा गैरसमज पसरवणे नक्कीच नव्हता. उलट कथेची मांडणी कोणी भुतांवर विश्वास ठेऊ नये आणि घाबरू नये अशीच ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोकण काय जगाच्या पाठीवर कुठेच भूत नसते या ठाम मताचा मी आहे. भूत कुठे असते तर ते आपल्याच मनात असते. म्हणून एवढेच सांगू इच्छितो की द्या कुठेतरी भिरकावून त्या आपल्या मनातल्या आयच्या घोवाक भुताला आणि बिनधास्त आमच्या गावाक येवा.. कोकण आपलाच असा ..!
-- x --- ० --- ० --- x --- समाप्त --- x --- ० --- ० --- x --
. . . तुमचा अभिषेक
भारी लिहिलय...
भारी लिहिलय...
@ चिमुरी.... १७ मिनिटांत कथा
@ चिमुरी.... १७ मिनिटांत कथा वाचून प्रतिक्रिया पण दिलीस धन्य आहेस.. म्हणून खास धन्यवाद..
थ्रील मस्त उभा केलाय.
थ्रील मस्त उभा केलाय.
छन आहे.. मी सुद्धा जाऊन आले
छन आहे.. मी सुद्धा जाऊन आले भुताच्या वाडी ला तुमच्या सोबत..
मस्त !!! लेखन शैली चांगली
मस्त !!! लेखन शैली चांगली आहे.
आवडेश
आवडेश
मस्त थ्रिलिंग ..
मस्त थ्रिलिंग ..
छान कस म्हणू रे याला? जाम
छान कस म्हणू रे याला?
जाम घाबरवलस मला
आता कसची जातेय मी कोकणात पुन्हा
ते शेवटी लिहिलस त्यावरुन हे तरी कळल की हे सगळ खोट आहे
या अशा गोष्टी ना
वाचाव्याश्या पण वाटतात आणि भिती पण वाटते जाम
मस्त भयंकर आहे.
मस्त भयंकर आहे.
वा छान आहे की कथा.. मज्जा
वा छान आहे की कथा.. मज्जा आली..
उत्तम
उत्तम
कथा आवडली.
कथा आवडली.
आतापर्यंत आलेल्या सार्या
आतापर्यंत आलेल्या सार्या प्रतिक्रियांचे एकत्रित आभार मानतो.
धन्यवाद,
@ प्रिया,
अग माझा कोणाला घाबरवण्याचा हेतू नव्हता ग, तरी कथा वाचून उगाच माझ्या बायकोच्या स्वप्नातही बोका येऊन ती दचकली होती. तरी अशी सवय असेल तर तेवढी मात्र काळजी घे.
बाकी घाबरून कोकणला कधीच न जाण्याचा निर्णय घेशील तर नक्कीच तेथील निसर्गसौंदर्याला मुकशील आणि याचे पाप उगाच माझ्या माथी येईल.. म्हणून कधीतरी नक्की जा..
आवडली, पण शेवट थोडा वेगळा
आवडली, पण शेवट थोडा वेगळा करता आला असता असं वाटल
कथा शेवट येईपर्यंत आवडली.
कथा शेवट येईपर्यंत आवडली. शेवट मात्र फारच सौम्य आणि साधा वाटला........
पुलेशु........
भारीचं! मजा आ गया!
भारीचं! मजा आ गया!
नानुभाऊ धन्यवाद शापित गंधर्व
नानुभाऊ धन्यवाद
शापित गंधर्व आणि निशदे, धन्यवाद आणि आपल्या मताशी काही अंशी सहमत, खरे तर कथा लिहिताना विष्णूपंत आणि त्यांच्या वाड्यामध्ये आम्ही पोरे हिंमत करून शिरतो आणि... वगैरे वगैरे.. काही होते तेव्हा डोक्यात.. पण कथेच्या मध्यावर आल्यावर मला कथा त्या गूढ अंगाने न्यावीशी वाटली नाही म्हणा किंवा जे सुचले होते ते फारसे दमदार वाटले नाही म्हणा पण मी मध्यावरूनच या कथेचा ट्रॅक बदलला.
ज..ब्..र्..द्..स्त!
ज..ब्..र्..द्..स्त!
>>कथा शेवट येईपर्यंत आवडली.
>>कथा शेवट येईपर्यंत आवडली. शेवट मात्र फारच सौम्य आणि साधा वाटला........
अनुमोदन
खुप मस्त वर्णन केल आहे..छान
खुप मस्त वर्णन केल आहे..छान आहे ..आवडली
लय भारी
लय भारी
व्वा. भन्नाट.
व्वा. भन्नाट.
वा छान आहे की कथा.. मज्जा
वा छान आहे की कथा.. मज्जा आली.. >>>>>>>>>>>..+++++++++
कल्पु-स्वप्ना_राज-अनुसया-अनिल
कल्पु-स्वप्ना_राज-अनुसया-अनिलभाऊ-अंजली-शृष्टी.. थँक्यू थँक्यू..
कथा चांगली लिहिलियं .
कथा चांगली लिहिलियं .
कथा मस्त जमली, आणि आवडली..
कथा मस्त जमली, आणि आवडली..
श्री अन कौशी, धन्यवाद..
श्री अन कौशी, धन्यवाद..
कथा मस्त आहे. हे खरं असेल तर
कथा मस्त आहे.
हे खरं असेल तर त्या गावचा पत्ता द्या. कसं जायचं ते सांगा. मला जायचंय.
मंदारजी, धन्यवाद... नाही हो,
मंदारजी, धन्यवाद... नाही हो, भुताचे काहीच खरे नाही.. पण हा भुताच्या भितीने आम्ही एका गावी (वेंगुर्ल्याजवळचे) सारे मित्र एकत्र बाथरूमला गेलो होतो एवढे मात्र त्यात खरे आहे.. या एका अनुभवावरून बाकी सारे काल्पनिक जोडले..
Chan aahe. ekdum mast.. Pan
Chan aahe. ekdum mast.. Pan mala ekda tari bhut baghyache aahe nakki kay aste te.. aata paryant nuste aikle aahe.. aata anubhav ghyacha aahe..;-)
Pages