माणदेशीची सफर
(भुषणगड, मायणी, वारूगड आणी संतोषगड)
शनिवारी (१५ मार्च २००८) ला कोठेतरी ट्रेक ला जायचेच ह्या निर्धाराने आगोदर पासुनच पुर्वतयारी सुरु केली होती. भोर जवळील वरंधा घाटातील मंगळगड - शिवथरघळ - कावळा हा एक पर्याय तर दुसरा साता-या जवळील भुषणगड, पाटेश्वर - औंध. आम्ही जी.एस., आरती, तात्या, नचिकेत आणी मी (सचिन) भुषणगड ला जायचा पर्याय निवडला. संध्याकाळी सात वाजता पुणे सोडले. २ तासाच्या आतच साता-यातुन रहिमतपुर कडे जाणारा रस्ता पकडला, रहिमतपुर पासुन पुढे चोरडी मागे टाकत मासुर्णॆ गावाजवळ पोहोचलो रात्रीचे १० वाजुन गेले होते. सभोवताली गर्द झाडी आणी काळोखाचे साम्राज्य, आणी त्या शांततेला छेद देत मार्गक्रमण करणारी आमची गाडी पुढे जात होती. विजेचे होणारे भारनियमा मुळे दुरपर्यत कोठे गाव आहे हे कळत नव्हते. अचानक एक वस्ती दिसली आणी काही लोक गप्पा मारत असताना दिसले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर आपण मासुर्णे गावात पोहोचल्याचे लक्षात आले. होळीचा गाव हे भुषणगडाच्या पायथ्याचे गाव. मासुर्णे पासुन साधारण पणे ५ ते ६ किंमी च्या असावे. मासुर्ण्याहुन डावीकडे होळीच्या गावाकडे जाणारी सडक पकडली. रस्ता थोडा कच्चा आणि त्यावरुन होणारे रहदारीचे प्रमाणही कमी असावे, कारण रस्त्यावरच तण वाढले होते जसजसे पुढे जात गेलो तशी रस्त्याची अवस्था अतीशय बिकट होत चालली होती. आता गडावरील आणी पायथ्याच्या गावातले दिवे दिसत होते. पण हिच वाट गडापर्यत जाईल याची खात्री वाटत नव्हती आणी रस्त्याची अवस्था अधीकच बिकट झाली होती. म्हणुन त्या आंधारात गाडी तिथे थांबवली. रस्त्याची खात्री करुन घेण्याच्या हेतुन ने तात्या आणी नचिकेत विजेरी घेउन थोडे पुढे चालत गेले आणी उरलेले आम्ही तिघे तिथेच आंधारात रेंगाळलो. अष्टमीच्या चंद्रचीच काय ती सोबत होती. मी त्याचे काही फोटो काढायचे प्रयत्न केले. तात्यानी विजेरी चालु बंद करुन काहीतरी इशारत केली. तितक्यात बाजुच्या शेतातुन कोणीतरी शिट्टी वाजवल्याचा आवाज आला. पण आंधारात कोण दिसत नव्हते त्यामुळे आम्ही घाइनेच गाडीत बसुन थोडी गाडी पुढे घेतली तर शेतातुन एक-दोन माणसे आमच्या दिशेने पळत येताना दिसली. सावधानता बाळगत गाडी थांबवली, त्या लोकांनी आमची चौकशी करुन त्यांना आमच्या पासुन काही धोका नसल्याची खात्री करुन घेतली, आमचेही थोडे असेच चालु होते. भारनियमनामुळे आणी दिवसाच्या कडक उन्हामुळे शेतीला पाणी देण्याचे काम रात्रीत केले जाते. आता थोडेच अंतर राहीले असुन पुढे एक पक्की सडक असल्याचे त्या शेतक-यानी सांगीतले. ११ वाजता होळीच्यागावात पोहोचलो.
पायथ्याला एका शाळेपाशी गाडी लाऊन गडाकडे कुच केले. पायथ्यापासुन वरपर्यंत पाय-या आणि लाईटची व्यवस्था केलेली आहे, पायथ्या पासुन फारशी उंची ही नाही. अर्ध्या तासातच गडावर पोहोचलो. गडावर हरणाई मातेचे मंदिर असुन २५-३० लोक आरामात बसु शकतील एवढे बंदिस्त सभागॄह आहे. बाजुला असलेल्य जागेत फरशी टकलेली असुन परिसराची नियमीत स्वच्छता राखली जाते. देवळासमोर एक मोठा तुरीचा निष्पर्ण वुक्ष आहे. पटापट डबे उघडले गेले आणी भरपोट जेवणाचा कार्यक्रम पार पडला. हवेतील थोडा गारवा जाणवू लागला होता. तिथेच मोकळ्यावर पथा-या पसरल्या. झोपणार तेवढ्यात काहीतरी किडा पळताना दिसला, निट पाहीले तर विंचु, माझी तर झोपच उडाली. तरी आपले पांघरूण घेउन झोपण्याचा प्रयत्न करत होतो. झोप लागली असे तोच कानंवर आवाज आला " ए चला रे उठा," तात्या नी नेहमी प्रमाणे आम्हाला झोपेतुन उठवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सकाळाचे पावणे सहा वाजले होते. उजाडले होते पण सुर्योद,य मात्र आजुन झालेला नव्हता, आभाळही ढगाळ होते. देवीचा पुजारी आला त्यांना आधी सांगीतल्यास तुमच्या जेवणाची रहाण्याची व्यवस्था ते करु शकतात असे त्याने सांगीतले. गड प्रदक्षिणा सुरुवात केली. किल्ल्यावर दोन पाणी साठ्याच्या जागा असुन एक टाके पुर्ण कोरडे पडले आहे. दुसरे टाके मात्र व्यवस्थीत बांधलेले असुन त्यात पाणी साठा आहे, पण टाके उघडे असल्यामुळे त्यात बराच कचरा पडलेला आढळला मुख्यत्वे करुन उदबत्तीच्या पुड्यांचा. गडाची उभारणी शिवपुर्वकालीन असुन गडाच्या इतिहासाबद्दल फारसा तपशील उपलब्ध नाही. गडाची चिरेबंदी तटबंदी आणी भक्कम बुरुज शाबुत आहे. गडाचे प्रवेशद्वार मोडकळीस आलेले आहे. दरवाज्याची रचना ही इतर किल्ल्यांप्रमाणे दरवाज्यावर शत्रुच्या तोफांचा थेट मारा होणार नाही अश्या पद्धतीने केली आहे. गडावर टिकोमा का कसल्याशा झुडपांचे रान माजले आहे. गडावर नविन बांधकाम केलेल्या खोल्या आढळल्या. तटावरुन फिरताना गडाचे महत्व लक्षात आले. सबंध परीसरात दुर-दुर पर्यंत भुषण गडा खेरीज एकही डोगर, टेकडी दिसत नाही. दिसतात ते थेट सज्जनगड व तेथील पवनचक्क्या प्रकल्प. औंध चा यमाईचा डोंगर, आणी मायणी चा तलाव. २०-२५ मिनीटातच गड उतरलो.
साता-या पासुन हा किल्ला ३० ते ४० किमी वर आहे, त्यामुळे पाटेश्वर ला जाण्याचे रहीत करुन इथपर्यंत आलोच आहोत तर माणदेशाची सफर करण्याचे ठरवले. फलटण जवळ गिरवी गावा नजीक वारूगड नावाचा डोंगरी किल्ला आहे. निमसोड मागे टाकत काही वेळातच मायणी गावात पोहोचलो. मायणीला ५६ हेक्टर परीसरात पसरलेले तळे आणी पक्षी आभयारण्य पहाण्यासारखे आहे. जाताना वाटेतच विविध प्रकारचे पक्षी दिसुलागले. तलाव परीसरात पक्ष्यांच्या १०० हुन अधीक प्रजाती दिसु शकतात असे जाणकारांचे मत आहे. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा सकाळचे १० वाजले होते. उन्ह तापु लागली होती तरी तळ्याच्या काठी फिरुन काही पक्ष्यांचे फोटो घेता आले. तिथे न्याहारी केली आणी तासभर ईकडे तिकडे हिंडुन फलटण च्या दिशेने प्रवास सुरु केला मायणी ते फलटण ३५ किमी आहे. जाताना वाटेत एक छोटा घाट रस्ता आपल्याला महादेव डोंगर रांगेच्या पलीकडील बाजुला घेउन जातो. दहिवडी-फलटण रस्त्यावरील गिरवे गावापासुन ५ किमी वर असलेले जाधववाडा हे वारुगड पायध्याचे गाव. गडाला घेउन जाणा-या पायवाटेला सुरुवात होते तेथेच रस्त्याच्या कडेला गाडी लावली. ह्या आडवाटेवरच्या किल्ल्यावर जाण्यासाठी मात्र पाउल वाटेचे बंधन नाही बे धडक पणे कोठुनही चढण्यास सुरुवात करता येईल असे वाटते. आम्ही चढायला सुरवात केली ते भर दुपारी आणी किल्ल्यावर सावली देऊ शकेल असे बालेकिल्ल्यावरील तटबंदीवर वाढलेले वडाचे एकमेव झाड. अर्ध्यापर्यंत चढून गेल्यावर आपण पहील्या तटबंदीपाशी पोहोचतो. इथे मात्र पाउलवाट शोधावी लागते नाहीतर अधिक उत्साह असेल तर २०-२५ फ़ुट उंचीचा खडा कातळ चढण्याची संधी येधे आहे. प्रवेशद्वाराची रचना दरवाजाचे संरक्षण करणारीच. पहिली तटबंदी ओलांडली आणी डाव्या बाजुने बालेकिल्ला चढायला सुरुवात केली. बालेकिल्ल्यावरुन खालपर्यत येणारी एक तटबंदी ची पडकी भिंत आपल्याला थेट गडावर घेउन जाते. बालेकिल्ल्याला सुद्धा मजबूत तटबंदी आहे. गडावर पाण्याची दोन टाकी असुन एक बाले किल्ल्याच्या पायथ्याला असुन दुसरे बाले किल्ल्यावर आहे, आणी ते ६० ते ७० फुट खोल असुन त्यामधे सध्या चिंचेचे एक मोठे झाड वाढले आहे. गडाच्या मागील बाजुला डोकावले तर गडावर एक छोटे गाव वसलेले दिसले, तिथपर्यत एस. टी. बसची सोय झाली आहे. महादेव डोंगर रांगेतील वेगळ्या झालेल्या एका भागावर शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची उभारणी केली आहे. गडावरुन दिसणारा परीसरही ह्या दिवसात फारसा सुखावह नाही, गिरवी, फलटण दिशेला थोडीफार हिरवाई दिसते बाकी सगळा प्रदेश ओसाड आहे. रखरखत्या उन्हात त्या तटबंदीवर वाढलेल्या झाडाच्या छायेखाली बसणे हा एक सुखावह अनुभव घेतला. २ वाजता गड उतरायला सुरुवात केली. अर्ध्या तासातच पायथ्याला पोहोचलो व लगेचच फलटण च्या दिशेने परत प्रवास सुरु केला. जी. एस ने आता आपल्याला ह्या डोंगर रांगेतील जवळच असलेल्या संतोषगड ला जायचा प्रस्ताव मांडला आणी तो एकमताने संमत करुन घेतला. फलटण ला एक ठिकाणी थोडे खाल्ले आणी पुसेगाव च्या दिशेने गाडी नेली जाताना ताथवडे ह्या गडाच्या पायथ्याच्या गावी ४ वाजे पर्यत पोहोचलो, आणी लगेच गड चढायला सुरुवात केली. इथे जरा थोडा जास्त चढ जाणवला तरी अर्ध्या तासाभरातच आपण गडाचा दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. दरवाजाचे बांधकाम पुर्णपणे कोसळलेले असुन त्याला लागुन असलेली चौकीदाराची खोली मात्र शाबुत आहे. वारुगडा प्रमाणेच ह्याही किल्ल्यावर एक मोठा खड्डा आहे आणी त्यातही एक मोठे झाड वाढले आहे. खड्डयाचे निट निरीक्षण केले असता त्यामधे एक गुहा दिसते पण तिधे उतरण्याचे धाडस केले नाही. गडाच्या मागील बाजुस असणारी नक्षीदार डोंगर रांग विलोभनीय आहे. गडावरुन दिसणारे गाव सुद्धा छान दिसते. गड उतरुन खाली आलो तोपर्यत ५.३० वाजुन गेले होते. सुर्य पच्शिमेला झुकला होता. वाटेत दिसलेला सुर्यास्त तर अतीशय लोभसवाणा होता.
पुढे पुण्याकडे येण्यासाठी लोणंद शिरवळ मार्गे रात्री १० वाजे पर्यत पुण्यात पोहोचलो.
महादेव डोंगररांगेमधील किल्ले हे फारसे उंची नसलेले, आणी एक ते दोन दिवसात ह्या भागातील वारूगड, संतोषगड, वर्धनगड आणी महीमानगड तसेच सितामाईचा डोंगर आणी धुमाळवाडी चा पावसाळी धबधबा पाहुन होतो. पावसाळ हा याभागात फिरण्यासाठी योग्य कालावधी होऊ शकेल. बहुतांश भागात पाण्याचे दुभिक्ष्या आहे. तर ह्या किल्ल्यांवर किंवा जवळच्या परीसरात जेवण्या खाण्याची विशेष सोय नाही. इथली गावे, वस्त्या मात्र निटनेट्क्या, एकाच गुलाबी रंगाने रंगवलेली घरे, आणी ग्रामस्वच्छतेचे महत्व अंगभुत करण्याचा गावक-यांचा प्रयत्न प्रामुख्याने दिसुन येतो.
phdixit, तुम्हा
phdixit,
तुम्हाला मायबोली गणेशोत्सव २००८ या गृपचे सदस्यत्व घेवुन ही प्रवेशिका प्रवासवर्णन स्पर्धेत पाठवावी लागेल. सध्या तुम्ही सदस्य नसल्यामुळे ती प्रवेशिका स्पर्धेत दिसत नाहीये.
फोटो आणि
फोटो आणि वर्णन छान आहे.. वर संयोजकांनी म्हंटल्याप्रमाणे ते योग्य ठिकाणी पोस्ट करा म्हणजे स्पर्धेत दिसेल.