अपराधी

Submitted by तेजूकिरण on 3 April, 2012 - 03:48

गाडी लावतानाच स्वाती ला घरात वाजणाऱ्या फोन चा आवाज आला. घरातला फोन ? कोण असेल बरं ? नवरा , मुली , मैत्रिणी सगळे च मोबाईल वर फोन करतात. घरी वाजणारा फोन म्हणजे telemarketer चा नाहीतर असाच कुणाचा तरी , not so important , विचार करतच स्वाती नेहमीप्रमाणे , गाडीतलं सगळ सामान घेत सावकाश घरात शिरली. तेव्हड्यात फोन answering machine ला जावून cut झाला आणि पुन्हा वाजायला लागला. "कोण असेल ?" जरा कंटाळतच स्वाती ने फोन उचलला. तिने "hello" म्हणताच समोरून उत्साहाने भ्ररलेला एक तरुण आवाज
"hello Dr. स्वाती फाटक आहेत का , I mean मे I talk to Dr. Swati Phatak?"

स्वाती भांबावून नुसती ऐकताच राहिली , एकतर इतक्या वर्षांनी कुणीतरी शुद्ध मराठी मध्ये आणि तेही स्वाती फाटक ? हे तिचं नाव ती स्वतःच विसरून गेली होती. "yes , this is she" अजूनही संभ्रमात ती तशीच फोन धरून उभीच .

"आयला , काय स्वाती मावशी , ओळखलाच नाही तुझा आवाज , अगं मी , मी रिया , सुरेखा ची, म्हणजे तुझ्या ताईची मुलगी" स्वाती चा कानांवर विश्वास च बसेना. ती तशीच ऐकत उभी राहिली खुळ्यासारखी.

"अगं मावशी ऐकते आहेस ना ? मी येतेय New York ला next week मध्ये. तुझा फोन नंबर घेतला मेघना मावशी कडून. म्हटलं तुला भेटल्याशिवाय भारतात यायचच नाही परत, काय? ,Hello , Hello , मावशी".

भानावर येत स्वाती कशीबशी बोलायला लागली

"अगं , ये ना नक्की , आम्ही Pennsylvania मध्ये रहातो , तुला घ्यायला येईन मी"

"चालेल मी तुला फोन करून नक्की तारीख , वेळ कळवते. मला एखादा weekend नक्की जमेल तुझ्या घरी यायला. मला तर तुला बघितल्याच आठवतच नाही कधी. मेघना मावशी कडे कधीतरी फोटो बघितले आहेत तुझे आणि तुझ्या मुलींचे, कसल्या गोडू आहेत ग दोघी , अगदी American आहेत ना , गोऱ्या गोऱ्या. मला खूप आवडेल भेटायला त्यांना. by the way, मी तुला सांगितलेच नाही , मी पण medicine करतेय, इथे New York ला मला एका conference साठी sponsor केलेय माझ्या college ने. "
घडा घडा , एखाद्या धबधब्या सारखं ती बोलतच राहिली , स्वाती नुसताच 'हु हु " करत होती , शेवटी "बरं मग, तुझा वेळ घेतला बराच , ठेवते आता आणि तिथे पोचल्यावर करेन फोन , OK" म्हणत तिने फोन ठेवला ही!

जेमतेम पाच मिनिटांचे संभाषण , स्वाती चा मेंदू अगदी बधीर करून गेलं. बऱ्याच वेळाने , तिने उठून कॉफी करून घेतली आणि बाहेर येवून बसली. खूप पूर्वी ती अशीच इथे बसून सगळ्यांची आठवण काढत असे. हल्ली हल्ली , कामात आणि मुलींमध्ये ती इतकी व्यस्त होवून गेली होती कि आठवण आली तरी ती कुरवाळत बसायला वेळच नसायचा. शिवाय तिकडूनही कुणाचे फोन , पत्र यायचा प्रश्नच नव्हता , तेव्हा हळू हळू तिला सवयच झाली आठवणी मनातल्या मनात पुरून टाकायची. आज रियाच्या फोन ने पुन्हा तिला भूतकाळात नेलं.

स्वाती , भोपाळ मधल्या डॉक्टर फाटक दाम्पत्याची सर्वात धाकटी मुलगी. सर्वात मोठी सुरेखा , म्हणजे तिची ताई आणि मधली मेघना. तीनही मुलींमध्ये सात सात वर्षांचं अंतर. मम्मी , पप्पा हॉस्पिटल मध्ये व्यस्त , घरात नोकर चाकर कामाला आणि आजी , आजोबा मायेला. स्वाती आणि सुरेखात अंतर होत १३-१४ वर्षाचं , त्यामुळे ती जणू स्वातीची आईच झाली. तिचा स्वभावाच होता तसा, प्रेमळ आणि वात्सल्यपूर्ण . मधली मेघना तशी घुमीच , आपण बरं कि आपली पुस्तकं बरी. सतत वाचत असायची. मम्मी -पप्पा , ताई , आजी-आजोबा सगळ्यांची लाडकी होती , छोटीशी , गोड दिसणारी , चुणचुणीत आणि लाघवी स्वाती. ताईची तर ती जणू बाहुलीच. सतत बरोबर असायची तिच्या. ताई खूप सुंदर गाणं म्हणायची , तिने संगीता मध्येच शिक्षण घेतलं , आणि ती MA करत असतानाच तिला पप्पांच्या मित्राच्या मुलासाठी , Dr. विलास पाटील , यांच्याकडून मागणी आली.

ताईच्या लग्नात स्वाती होती ९-१० वर्षांची , पण अजूनही तिला काही प्रसंग जसेच्या तसे आठवतात. १७-१८ वर्षांची मेघना छान साडी नेसली होती आणि खूपच सुंदर दिसत होती, येणारा जाणारा तिचं कौतुक करत होता, आणि छोट्या स्वातीला या गोष्टीचा खूप राग येत होता. दाताना तार लावलेली , घट्ट वेण्या घातलेली स्वाती हॉल मधली सर्वात कुरूप मुलगी आहे असंच तिला वाटत होतं. खरंतर , स्वाती आणि ताई दोघींनीही हुबेहूब त्यांच्या आईच रूप उचललं होतं. अतिशय आकर्षक आणि लाघवी. कुणालाही बघताच आपलसं करणारं. पण स्वाती ची त्या लग्नात खूपच चिडचिड चालू होती. ताई दूर जाणार आहे हे तिच्या खरंतर ध्यानातच नव्हतं. पण सगळ्यांनी तिच्या चीडचिडीचा तोच सोईस्कर अर्थ लावला, अपवाद एकाचा, नवरा मुलगा. ताईच्या नवऱ्याने मात्र बरोबर ओळखलं ,आणि जेवणाच्या पंगतीत सर्वांसमोर सांगितलं की "मला खर तर डॉक्टरांची सर्वात धाकटी मुलगीच पसंत होती , पण वयात खूपच अंतर म्हणून , शेवटी सुरेखाशी लग्न करतोय. सगळ्यांनी हसून हसून तिची खूप थट्टा केली आणि तिची कळी खरच खुलली. बस , तिथेच जीजू तिचे सर्वात favorite झाले , ताईपेक्षा थोडे कमी अर्थातच !

ताई आणि जीजू लग्नानंतर इंग्लंड ला गेले , जीजूंच्या शिक्षणासाठी ! आणि इथे स्वातीचं आयुष्य पुन्हा शाळा, घर मैत्रिणी यात रमून गेलं. इंग्लंड वरून जीजू आठवणीने सर्वांना पत्र पाठवत , ताई मात्र कंटाळा करत असे. आणि इकडे , मम्मी -पप्पा कडून उत्तर द्यायची जबाबदारी स्वाती वर आली. मग तिची आणि जीजूंची पत्र-मैत्री सुरु झाली. जीजून्मध्ये तिला जणू एक भाऊ , एक मित्र , एक सल्लागार , सगळे मिळाले. तिची लहान सहान गुपितं ती ताई-जीजूंच्या पत्रात लिहित असे. त्यांनी उत्तर पाठवले कि , येवढा मोठा माणूस आपल्या problems ना महत्व देतोय हे बघूनच तिला खूप बरं वाटायचं.

काही काळाने ताई - जीजू भारतात परत आले आणि मुंबईत स्थायिक झाले. जिजूनी स्वतःचं nursing home सुरु केलं, आणि ताई छोट्या आदित्यला वाढवण्यात गुंतून गेली.स्वातीची बारावी झाली आणि अपेक्षेप्रमाणे उत्तम मार्क्स हि मिळाले , medical ला जायचे हे ठरलेलेच आणि तिला मुंबईत admission देखील मिळाली. ताई तिथेच असताना , मुंबईत शिकायला जायला कुणाचीच काहीच हरकत नव्हती. शिवाय आता मम्मी-पप्पा पण थकले होते , हॉस्पिटल कुणालातरी चालवायला देवून जगाचा दौरा करायच्या विचारात होते. मेघना आधीच अमेरिकेला पत्रकारितेचा अभ्यास करायला गेली होती. तेव्हा स्वाती भोपाळ वरून , मुंबईत आली. नवीन शहर , नवीन जग , बघता बघता चार , साडेचार वर्ष भर्रकन निघून गेली. कधी होस्टेल मध्ये तर कधी ताई कडे असा मुक्काम करत स्वाती पक्की मुंबईकर झालीसुध्धा! internship करायची वेळ आली तेव्हा , जीजूनी ठामपणे सांगितलं कि स्वाती केवळ आपल्याच हॉस्पिटल मध्ये नोकरी करणार. तीही तयार झाली. आणि मग रोज तिला जीजूंकडून बरेच काही शिकायला मिळू लागले. त्यांचा रुबाब , petient शी बोलायची आपुलकीची लकब, senior डॉक्टरांशी बोलतानाचा आदर , सगळ सगळ ती अगदी जवळून आत्मसात करायचा प्रयत्न करायची. जीजू तिचा आदर्श होतेच आता तिचे गुरु पण झाले.
याच सुमारास , सदाशिव तिच्या आयुष्यात आला. Dr. सदाशिव माळी, हा जीजूंच्या हॉस्पिटल मध्ये junior डॉक्टर होता. दिसायला देखणा आणि बुद्धीने अतिशय तल्लख . सदाशिव खरतर , एका माळ्याचा मुलगा, दोघेही आई वडील बंगल्यांमध्ये माळीकाम करीत आणि हा मुलगा , झाडाखाली बसून अभ्यास करी. दहावी , बारावी बोर्डात आल्यावर त्याची ही कथा सगळ्या वर्तमान पत्रात छापून आली होती. आता डॉक्टर बनून तो नोकरी करत होता आणि पुढच्या शिक्षणासाठी पैसे जमवत होता. ती सदाशिव च्या बुद्धीवर आणि जिद्दीवर भाळून गेली. त्याच्या प्रेमात कधी पडली ते तिलाच कळले नाही. खरं तर विरोध वैगैरे व्हायचा तसा प्रश्न नव्हता , ताई सुध्धा सदाशिव ला चांगली ओळखत होती आणि तिलाही तो आवडला होता. पण जीजूंनी नाराजी दाखवली. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय , तुला परदेशात जावून शिक्षण घायचं असेल तर अशी distractions उपयोगी नाहीत वगैरे , वगैरे. आणि आयुष्यात प्रथमच तिने जीजूंच्या विरोधात जावून सदाशिव बरोबर लग्न देखील केलं.

सुरवातीचे काही दिवस सगळं सुरळीत होतं , पण जसजसे दिवस जायला लागले तसतसा तिला आपल्या निर्णयाचा पश्चाताप व्हायला लागला. तिच्या आणि सदशिवाच्या आयुष्यात जमीन आस्मानाच अंतर होतं. ती एका अतिशय सुखवस्तू घरात , लाडात वाढलेली आणि तो परिस्थितीचे चटके खावून कडवट झालेला. तिच्या साठी जग म्हणजे एक शिकायची प्रयोगशाळा नाहीतर गुंगून जायचा सागर किनारा . त्याच्यासाठी जग म्हणजे केवळ एक स्पर्धा , जास्तीतजास्त लवकर सर्वांच्या पुढे जावून सगळ्यांना काहीतरी धडा शिकवायचा अशी एक वेडी ईर्शा. त्याचे अडाणी आई - वडील होते खूप प्रेमळ , पण तिच्या भावनिक तणावात ते बिचारे अपुरेच पडत. शेवटी दोन वर्ष व्हायच्या आतच ती सगळं संपवून परत आली. आयुष्यातला एक खूप मोठा धडा शिकून. खूप काही अनुभव गाठीशी बांधून. सगळ्यांनी तिला प्रेमाने जवळही घेतली , तिची चूक पाठीशी घातली. तिच्या ताईने तिला आपल्याच घरात राहायला यायचा आग्रह धरला. पण आता शहाणी झालेली स्वाती स्वतंत्र राहायला उत्सुक होती. तिने एक छोटासा block भाड्याने घेतला आणि नवीन आयुष्य सुरु केलं.

आयुष्यातलं एक वादळ मिटत होतं , घटस्पोट , कोर्ट, कचेरी संपत आलं होतं आणि दुसरं वादळ सुरु झालं. या वादळाने सगळ्यांनाच उध्वस्त केलं.

स्वाती ला एकदम थकल्या सारखं वाटलं. तिने घड्याळाकडे बघितलं , मुली यायची वेळ झाली होती. ती उठली आणि त्यांच्या खाण्याची तयारी करू लागली. थोड्याच वेळात चिमण्या चिवचिवत घरात आल्या आणि स्वाती ला घट्ट मिठी मारून पापा देत "hungry. hungry" ओरडू लागल्या. स्वाती ला एकदम भोपाळ ची आठवण आली , तीही अशीच शाळेतून येवून ताईच्या गळ्यात पडायची. अचानक डोळे भरून आले. मग ती अश्रू लपवत , मुलींमध्ये रमायचा प्रयत्न करत राहिली. यांना सांगूया का , यांची मावस बहिण आहे , ती येणार आहे इकडे? का नको? , आधी Mark ला सांगू , काय म्हणेल तो ? त्याने कधीच नाही कुणाला बघितले इतक्या वर्षात. सुरवातीला म्हणायचा, आपण जावूया असं, पण मग स्वाती चा ठाम निर्णय बघून मग त्यानेही सोडून दिलं.

आज Mark ची तिसरी शिफ्ट आणि तो सकाळीच येणार होता , मुलींना झोपवून ती सवयीप्रमाणे पुस्तक घेवून बिछान्यावर पडली , पण लक्षच लागेना कशात. डोळ्यासमोरून पुन्हा तोच चित्रपट सरकू लागला.

मेघना एव्हाना अमेरिकेत शिक्षणाला जावून तिथेच एका पंजाबी मुलाशी लग्न करून स्थायिक झाली होती. कधीतरी यायची भेटायला सगळ्यांना. स्वातीच्या divorce च्या वेळेला आवर्जून आली होती , सतत स्वाती बरोबर राहिली होती. प्रथमच दोघी बहिणी एवढ्या जवळ आल्या होत्या , पण मग ती निघून गेली अमेरिकेत आणि स्वाती आपल्या स्वतंत्र विश्वात रमत गेली, हॉस्पिटल , MD चा अभ्यास , ताई , जीजू , आदित्य आणि अगदी मोजक्या मैत्रिणी. कधीतरी लहर आली तर भोपाळला मम्मी कडे जायची.

ताईला आदित्य च्या वेळेला खूप त्रास झाला होता म्हणून त्यांनी दुसऱ्या मुलाचा चा विचारच केला नव्हता, जीजू मोठ्ठ हॉस्पिटल काढायच्या कामात खूप busy होते तेव्हा, tensions सुध्धा खूप घ्यायचे , स्वातीला काळजीच वाटायची. आणि अश्यातच ताईला पुन्हा दिवस गेले , अगदी कळल्या दिवसांपासून bed-rest सांगितली होती. खूपच नाजूक परिस्थिती होती. मम्मी स्वतः ob-gyn होती , ती लगेच मुंबईला आली. घरात सतत काळजी , त्यात आदित्य ची जबाबदारी , जीजू खूपच तणावात दिसत होते. स्वाती , मम्मी , पप्पा , जीजूंचे नातेवाईक जमेल तेव्हडी मदत करतच होते. सारखी सगळी येवून जावून असत.

जीजूंना आपल्याच घरात एकांत मिळेनासा झाला , त्यातच हॉस्पिटलच tension , ते आणखीनच चिडचिड करू लागले , drinks ही वाढली होती. ताईला सगळ दिसत होतं पण ती अगदीच बिचारी झाली होती. स्वातीला हे सगळं बघून अगदीच राहवेना तेव्हा तिने एकदा जीजूंना आपल्या घरी नेवून शांतपणाने बसवून ड्रिंक्स बरोबर चिक्कार गप्पा मारल्या आणि दोघानाही खूप बरं वाटलं. लहानपणी ती जीजूंना तिच्या तक्रारी पत्राने कळवायची आणि मग ते तिची समजूत काढायचे , तशीच आता ती जीजूंची समजूत काढू लागली, आणि मग ते एक रुटीन झालं. रोज संध्याकाळी ते तिच्याकडे येवू लागले. हळूहळू दोघानाही याची सवयच झाली , ती रोजची duty संपवून , ताईकडे जावून तिथे थोडी मदत , आदित्यचा अभ्यास वगैरे घेयून मग आपल्या घरी यायची आणि मस्तपैकी स्वयंपाक करून जीजूंची वाट बघायची. मग ते drinks घेत , मनापासून जेवत आणि गप्पा मारून आपल्या घरी निघून जात.

आणि मग ती रात्र आली, धो धो कोसळणारा पावूस , चमचमत्या विजा आणि बाल्कनीत शांतपणाने बसलेले जीजू. तिने धावत जावून खिडकी बंद केली आणि पडदा ओढून जीजूंकडे पहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू .. ती जवळ गेली त्यांच्या आणि हळूच डोक्यावरून हात फिरवू लागली. स्त्री स्पर्शाला परावृक्त झालेला त्यांच्यातला पुरुष आणि पुरुषाच्या स्पर्शाला मुकलेली तिच्यातली स्त्री जागे झाले आणि , त्या वेळी ते दोघेही सगळ सगळ विसरले आणि नको ती चूक करून बसले. सकाळ व्हायच्या आताच ते निघूनही गेले. तिला धड अपराधी ही वाटेना. उगीचच कसलं तरी समाधान वाटत राहिलं. आपल्या आवडत्या माणसाला आपण हवं ते देवू शकलो याचं समाधान ? कोण जाणे?

त्यानंतर चे काही दिवस दोघांमध्येही खूप विचित्र तणावाचे गेले. त्यांच्या डोळ्यात एक अपराधाची , क्षमा मागण्याची भावना सतत असायची. आणि तिला त्याचा खूप त्रास व्हायचा. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे येण सुरु केलं, आणि आता त्यांच्यातला दुरावाही नाहीसा झाला. आता ते हक्काने तिच्याकडे हवं तेव्हा येत , राहतही रात्रीचे. घरी सांगत हॉस्पिटलच काम आहे. आता मात्र तिला खूप घुसमटल्या सारखं वाटू लागलं. आपला वापर केला जातोय असं वाटू लागलं. तरीही ती थांबवू शकत नव्हती. ती स्वतःच लाचार झाली होती स्वतःपुढे.

ताईच्या समोर जायचं ती टाळू लागली. शक्यतो बाहेरच्या बाहेरच निघून जायची आणि तरीही घरी येवून त्यांच्या येण्याची वाट बघत रहायची. या नात्याचं भवितव्य काय ? उद्या ताई बाळंत होईल मग, हिंडू फिरू शकेल , मग काय ? तिला विचार करायची पण भीती वाटायची.पण तिने विचार नाही केला तरी व्हायचं ते झालच.

ताईला ICU मध्ये ठेवण्यात आलं , तिचं BP, sugar high झालं अचानक , ती coma तच जायची , पण नशिबाने वाचली. C-section ने चार पौंड वजनाची छकुली जन्माला आली , ताई दोन आठवडे हॉस्पिटल मध्ये राहून घरी आली आणि बाळ आलं महिन्यानंतर. सगळ्यांचीच खूपच धावपळ झाली होती या वेळात..

ताई घरी आली खरी पण खूप गप्प गप्प असायची. स्वातीशी बोलायचं सोडा पण तिच्याकडे बघायचं पण टाळायची, स्वातीची खूपच कठीण परिस्थिती झाली. या अवस्थेत ताईला विचारणार तरी काय ? अपराधाची बोच खोलवर रुतत जायची. ताई न बोलताच तिला काय ते सांगत होती जणू. शेवटी असह्य झालं तेव्हा तिने मम्मीकडे मन मोकळं केलं. मम्मीला तर धक्काच बसला. तिने ताबडतोब दोघींनीही तिथून भोपाळ ला जायचा निर्णय घेतला. तडकाफडकी ती स्वातीला घेवून भोपाळ ला गेली सुध्धा. ताईने त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही नाही केला. तिला काय कळलं होतं कोण जाणे ?
जीजू तेव्हा गावाबाहेर गेले होते. त्यांना येताच हा प्रकार कळला. त्यांनी थेट भोपाळ गाठलं. मम्मी - पप्पा ची क्षमा मागितली आणि एक विचित्र प्रस्ताव समोर ठेवला "मी स्वातीशी लग्न करायला तयार आहे, माझं प्रेम आहे तिच्यावर , मी सुरेखा ला ही दूर नाही करणार. दोघींचीही काळजी घेईन" स्वातीला हा एक जबरदस्त धक्का होता. काही दिवसाचं मूल घेवून याची बायको अंथरुणाला खिळली आहे , आत्ता मरणातून वाचली आहे आणि हा म्हणतोय कि माझं स्वाती वर प्रेम आहे. तिला वाटलं आता पप्पा तरी या माणसाला चांगलं खडसवतील , पण झालं वेगळंच , झाल्या प्रकारचं खापर स्वातीच्या नादान पणावर फोडलं गेलं. तिचे आई-वडील जीजूंची माफी मागत होते आणि त्यांना परत ताई कडे जायची विनंती करत होते. स्वाती ला आम्ही अमेरिकेत मेघना कडे पाठवू मग ती तुमच्या संसारात नाही येणार" स्वातीचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. "असेल माझी चूक , आहे कबूल मला, म्हणून काय या माणसाची काहीच चूक नाही ?" समाजाने नेहमीप्रमाणे बाईला दोषी ठरवून एकतर्फा निकाल दिला होता.

त्यानंतर मग तिने घर सोडलं ते कायमचंच. मेघना कडेही नाही गेली ती , अमेरिकेत एका मैत्रिणीकडे राहून, नोकऱ्या करून हळू हळू शिक्षण पूर्ण केलं. तेव्हाच तिला भेटला मार्क , डॉक्टर मार्क. न तिच्या जातीचा , न धर्माचा , न तिच्या वर्णाचा कि तिच्या समाजातला. तरीही त्याने तिला एक माणूस म्हणून समजून घेतले , तिच्या आयुष्यातल्या चुकांवरून तिच्या व्यक्तिमत्वाची गोळाबेरीज नाही मांडली. तिला एक स्त्री म्हणून अधिकच सन्मान दिला आणि तिला एक सच्चा साथीदार मिळाला. त्याच्याबरोबर त्याची मॉम आणि धाकटी बहिण ही तिला आपले मानू लागले. मग तिने एक नवीन आयुष्य सुरु केलं मार्क बरोबर. त्यांनी लग्न करायचं ठरवलं तोपर्यंत तिचे आई-वडील या जगात च नव्हते. मेघना आली होती तिच्या नवरा आणि मुलाला घेवून. नंतर मग ती आणि मेघना फक्त समारंभांना एकमेकींकडे जात एव्हडच. तिने सगळी कवाडं बंद करून टाकली होती गेली १९ वर्ष. आणि आज या रिया ने पुन्हा सगळं समोर लख्ख उभं केलं.

ती रियाला भेटायला गेली तेव्हा मार्क ला मुद्दामच नको येऊस म्हणाली , वाटलं , कधी भेटलो नाही आपण हिला. कशी असेल कोण जाणे? आपल्याबद्दल काय विचार करत असेल ? काही माहित असेल तिला कि नसेल काहीच माहिती ? उगीचच मार्क समोर नको त्या गोष्टींचा उहापोह. तरीही , इतक्या वर्षांनी ताईची खुशाली कळेल , आदित्य केवढा मोठठा झालं असेल नाही आता ? रिया कडे फोटो असतील सगळ्यांचे ? स्वाती चे विचार आठवणींचे धागे पकडून चारी दिशांना धावत होते. गाडीतून उतरताच समोर हसऱ्या गोड चेहऱ्याची रिया उभी , अगदी ताईची छबी जणू . स्वातीला एकदम जाणवलं कि रिया तिला नमस्कार करते आहे. सवयच गेली होती या सगळ्यांची , तिने रियाला हातांनी धरून उभं केलं आणि तिच्या कपाळाच चुंबन घेतलं. काय नव्हतं त्या एका स्पर्शात ? शब्दात वर्णन न करता येण्यासारखी एक भावना स्वातीच्या उरातून शिरशिरून गेली आणि समोरचं सगळं धुकं धुकं दिसायला लागलं. हळूच अश्रूंचा निचरा करू देत , स्वाती पुन्हा पुन्हा रिया कडे बघत राहिली. स्वातीच्या नजरेने थोडीशी लाजून रिया लगेच म्हणाली
"हे काय ग? किती उशीर ? मला जाम भूक लागली आहे. चल काहीतरी खावू आधी. मी म्हटलं एव्हडी अमेरिकन मावशी येणार आहे तेव्हा पोट रिकामाच ठेवूया म्हणजे चांगलं काटता येईल कि नाही?"
"चल, चल , बघू किती खातेस ते ", स्वाती आणि रिया आता अगदी जन्मोजन्मीच्या मैत्रिणी असल्यासारख्या वागायला लागल्या. स्वातीच्या सगळ्या शंका एका क्षणात मिटून गेल्या.
मग ती रिया ला घरी घेवून आली आणि रियाने काही तासांमधेच मार्क आणि मुलींशी मैत्री केली. अगदी तशीच प्रेमळ , लाघवी आणि वागण्यात माधुर्य ... तिला ताईच आठवायची रियाला बघून. दिवसभर दंगा करून दमून मग ती पोर्च वरच्या झोपाळ्यावर पडून राहिली, कसला तरी विचार करत. स्वाती हळूच तिच्या जवळ गेली "झोप आली तर सांग , तुझी रूम तयार आहे."
"तू तिला न भेटताच निघून का गेलीस ?" रियाच्या अचानक प्रश्नाने स्वाती गडबडून गेली.
"कोणाला ? काय बोलते आहेस ?"
"तू आईला का नाही भेटलीस ? तिला खूप सांगायचे आहे तूला. ती स्वतःला तुझी खूप अपराधी मानते"
"रिया, काय बडबडते आहेस ? तूला काही माहित नाही, खूप लहान आहेस तू अजून "
"नाही मावशी, माझ्या आईने मला सगळं सांगितलं आहे, जेव्हा मी तूला भेटल्याशिवाय येणारच नाही असं ठरवलं तेव्हा तिने आपलं मन प्रथमच माझ्याकडे मोकळं केलं, मला हे पत्र दिलं आहे तुझ्यासाठी"
स्वाती ने थरथरत्या हाताने पत्र घेतलं आणि वाचायला सुरवात केली.
"प्रिय स्वाती,
काय लिहू? तुझी खूप अपराधी आहे ग मी.
झाला प्रकार जेव्हा यांनी मला सांगितला त्याच रात्री मला हॉस्पिटल मध्ये admit केलं आणि मग सगळ्या गोष्टी एवढ्या वेगात घडल्या कि मला विचार करायलाच मिळाला नाही. तू निघूनच गेलीस , आणि मी मात्र काहीही निर्णय न घेता एखाद्या त्रिशंकू सारखी लोम्बतच राहिले. माझ्याशी प्रतारणा करणाऱ्या नवऱ्याला दोष देवून मी खरंतर निघून जायला हवं होतं, तुझ्यावरचा कलंक तरी पुसला गेला असता थोडासा. पण हिंमतच नाही झाली ग! मी , माझी मुलं यांचाच विचार करत राहिले. सगळा स्वाभिमान गिळला आणि त्याच प्रेमहीन संसारात राहिले , केवळ भौतिक सुखांसाठी. खूपच लहान झाले ग मी. कधीकधी वाटायचे , सगळे सोडून मुलांना घेवून जावे , संगीताच्या शिकवण्या करून पोट भरावे , पण हिंमतच नाही झाली कधी. शेवटी स्वार्थ आणि मुलांची सुरक्षितता यांचा बहाणा करून निर्लज्ज पणाने राहिले तिथे. समाजातल्या खोट्या प्रतीष्टेसाठी आणि सुखासाठी तूला दरोदारच्या ठोकर खायला लावल्या मी. स्वतःला कधीही माफ नाही केलं मी. आजही मी फक्त माझ्या मुलांसाठीच जगतेय , आणि कधी काळी तू मला माफ करशील या वेड्या आशेवर

सुरेखा,"

हातातून पत्र गळून खाली पडलं तेव्हा स्वाती भानावर आली , डोळे भरून आले होते आणि मन विविध भावनांनी तुडूंब भरलं होतं.
"रिया , मी येते तुझ्याबरोबर भारतात , माझ्या ताईला भेटायला" स्वाती म्हणाली आणि रियाने तिला मिठीच मारली.

-- तेजूकिरण

गुलमोहर: 

मायबोलीवर लिखाण टाकताना थोडीशी धाकधूक मनात होतीच. तुम्हा चोखंदळ वाचकांच्या आणि लेखकांच्या प्रतिक्रिया काय येतील याबद्दल खूप उस्तुकता होती. पण माझं मनापासून स्वागत केल्याबद्दल आणि सूचनांबद्दल मनःपूर्वक आभार.