तिखटाचे भानोले, लसणाचे आक्षे - शेफ विष्णू मनोहर यांच्या पाककृती

Submitted by चिनूक्स on 6 September, 2008 - 00:33

मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
---------------------------------------------------------------

. तिखटाचे भानोले

लागणारा वेळ :
१५ मिनिटे

साहित्य :
बारीक चिरून वाफवलेल्या मिश्र भाज्या
(गाजर, फ्लॉवर, मटार, फरसबी इ. ) - १ वाटी
नारळाचे दूध - १ वाटी
बेसन - १ वाटी
तांदुळाची पिठी - अर्धी वाटी
आमसुलाची पेस्ट - पाव चमचा
आलं-लसूण पेस्ट (हवी असल्यास) - अर्धा चमचा
धणे-जिरे पूड - पाव चमचा
मीठ
साखर
कोथिंबीर

कृती :
नारळाच्या दुधात बेसन, तांदुळाची पिठी, मीठ, साखर, आमसुलाची पेस्ट, धणे-जिरे पूड, आलं-लसूण पेस्ट घालून नीट एकत्र करावे.
मग या पिठात वाफवलेल्या भाज्या घालून त्याचे जाडसर दोसे करावे.
हे भानोले खोबरं-कोथिंबीरीच्या हिरव्या चटणीबरोबर खावयास द्यावेत.

वाढणी :
२ माणसांसाठी

---------------------------------------------------------------

. लसणाचे आक्षे

लागणारा वेळ :
५-७ मिनिटे
तयारीसाठी १५ मिनिटे

साहित्य :
हिरवा लसूण - २ जुड्या
तांदूळ - २ वाट्या
मुळा - १ (मध्यम आकाराचा)
जिरे - १ चमचा
कोथिंबीर (चिरलेली) - १ चमचा
मीठ

कृती :
तांदूळ नीट धुऊन १ तास भिजत ठेवावेत.
नंतर त्यात मुळा, हिरवा लसूण, जिरे, मीठ, कोथिंबीर घालून वाटून घ्यावे.
तव्यावर तेल गरम करून, या मिश्रनाचे साधारण जाडसर दोसे घालावेत.
डाळीच्या चटणीबरोबर खायला छान लागतात.

वाढणी/प्रमाण :
२ माणसांसाठी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत या पाककृती... दोन माणसांसाठी व काम करणार्‍या गृहिणीसाठी इतक्या सोप्या आणि कमी वेळांत, पुन्हा चवीष्ट! परदेशातही सहज बनवता येतील.

'भानोले' आणि 'आक्षे' ही नावंही कधी कानी पडली नाहीत. कृती सोप्या आणि साहित्य देखिल हाताशी सहज उपलब्ध होणारं! करून बघायला हव्यात. नारळाच्या दुधाऐवजी काय घालता येईल?

छान वाटतायंत कृती...
हिरवा लसूण कुठे मिळेल यूएसमध्ये?

क्ष -
ताजा हिरवा लसूण (पातीचा लसूण) खूप क्वचित मिळतो. गोठवलेला हिरवा लसूण बाराही महिने इंडियन स्टोअर्समधे मिळतो (न्यू जर्सीत तरी !).
-- (माझ्या बायकोने दिलेल्या माहितीप्रमाणे :))

क्ष,
तुमच्याजवळ जर फार्मर्स मार्केट असेल तर तिथे जाउन पहा. हिरवा लसूण मिळेल.

नारळाच्या दुधाऐवजी काय घालता येईल? >> राणी rice milk घालून बर्यापैकी हीच क्रुती वापरून भानोले करते ग. In fact ते skip मारूनही मला तरी काही फरक जाणवला नव्हता.

आसामी, थँक्यु! हा पर्याय माहिती नव्हता. मी दही, ताक असलं काही घालणार होते. पण राईस मिल्क पण घालून बघते.

In fact ते skip मारूनही मला तरी काही फरक जाणवला नव्हता.<< (आयतं मिळालं हातात की फरक जाणवला तरी गप्प बसावं असं माझं मत्त आहे! Happy )

आयतं मिळालं हातात की फरक जाणवला तरी गप्प बसावं >> Lol