टाळ

Submitted by Kiran.. on 25 March, 2012 - 09:02

भल्या पहाटे गावाबाहेरची टेकडी चढताना टेकडीशी फारकत घेऊन वळलेल्या पाऊलवाटेने भाविक घाईघाईने चाललेले दिसतात. अजून फटफटलेलं नसतं. वाट पायाखालची असते. थंड वारं चित्तवृत्ती उल्हसित करत असतं. टेकडीच्या त्या बाजूला आणखी एक उंचवटा आहे. त्यावरचं जुनं मंदीर अंधारातच जागं झालेलं असतं.

काकडारती संपून आता भाविकांचे अभिषेक चालू झालेले असतात. गावाकडं काकडआरती अशीच भल्या पहाटे असते. तिची वेळ चुकायची नाही. वातावरण मंगलमय झालेलं असतं. आणि कानाला सुखावणारे मंदिरातल्या घंटांचे आवाज येत राहतात. या घंटांचा नाद घुमत घुमत आवर्तनं तयार करतो. ही आवर्तनं विरायच्या आधी मोठा परीघ व्यापून राहतात आणि मनामधे त्याचे प्रतिध्वनी तयार होतात.

तल्लीन झालेले गावकरी, टाळकरी, माळकरी, वारकरी..
कुणाचा तरी खडा आवाज लागलेला असतो. लंगडा शिवाच तो ! गळ्यात जणू मधाचं पोळं असावं अस्सा आवाज. त्याच्या भजनाचे बोल पहाटवा-यावर आरूढ होऊन जात्यावरच्या ओव्यांना थांबायला भाग पाडतात. आसमंत कानोसा घेत राहतो म्हणून मी ही दगडावर बसतो. रोजचं हे ठरलेलं.

पण

आजपर्यंत वरची वाट सोडून देवळाच्या वाटेशी जवळीक झाली नाही. टाळ कुटायला सुरूवात झाली कि मी उठून पुन्हा चालायला लागतो. लिंबाच्या झाडाच्या काड्या तोडून खिशात टाकायच्या आणि त्यातल्याच एका काडीचा ब्रश करून दात घासायला सुरूवात केली कि ताजंतवानं वाटू लागतं. आज्ज्यानं शिकवलेलं लक्षात राहीलं हे. खुंटीला त्याची आठवण म्हणून अजून एक टाळजोडी आहे. किती वर्षं झाली आता आठवत नाही. तसा आज्जा थोडा थोडा आठवतो .. चेहरा मात्र नीट आठवत नाही म्हणा.. दादा म्हणतात साधं भोळं येडं होतं.

पण मला आठवतात ते त्याने घेतलेले मुके... जेवायच्या आधी घास काढून ठेवायची पद्धत, सणासुदीला दारात कुत्रं जरी उभं राहीलं तरी त्याला नमस्कार करून पुरणपोळी भरवायची सवय. जेवताना अन्न मागायला आलेल्याच्या झोळीत भाकरी वाढायला लावणारा माझा आज्जा कधी काळी उपासमारीने मरता मरता वाचला असं दादा सांगतात. रात्री झोपायच्या आधी डोळे बंद करून चारी दिशांना हात जोडून काहीतरी पुटपुटत रहायचा. आम्हाला खूप हसू यायचं. आज्जा कधीच रागावला नाही.

एकदा पहाटे जाग आली तीच आज्जाच्या आवाजाने. बाहेर ओसरीवर आज्जा देवळाकडं तोंड करून बसला होता. त्याच्या हाती टाळ आणि खड्या आवाजातलं त्याचं भजन ऐकायला सगळी वस्ती लोटलेली. हे एकदा झालेलं नंतर नेहमी होत होतं हे लक्षात आलं. तेव्हां आम्ही झोपेत असायचो. नंतर जेव्हा लवकर उठायची सुरूवात झाली ( दादा उठवायचेच ) तेव्हांचा आज्जाचा तो आवाज कानात साठून राहीला आहे. आकाशातल्या सर्व गंधर्वांच्या गळ्यातला अर्क काढून तो आज्जाच्या गळ्यात ओतलेला असावा असा दैवी आवाज होता तो ! खेडेगावात गावच्या शीवेबाहेर नाइलजाने वसलेल्या वस्तीला काहीच दिलं गेलं नसलं तरी गाणारा गोड गळा कसा काय मिळाला याचं नवल जाणकारांना आजही आहे. देवळात असा एक तरी गंधर्व शिवाशिवीच्या कायद्याला अपवाद होऊन भजन गाण्यासाठी मिळायचा. तर काही ठिकाणी गाणं चालायचं मात्र ते बाहेरून !

आज्जा बाहेरच्यातला होता ! खूप काही कळत नसलं तरी त्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं होतं. आवाज, नाद, लय यांच्याशी अशी कळत नकळत ओळख झाली आणि तशीच ओळख झाली ती आज्जाच्या देवळाकडं तोंड करून बसायच्या कारणाची...

खूप प्रश्न होते मनात ज्याची उत्तर कुणीच द्यायचं नाही. देवभोळ्या आज्जाला देवाच्या धर्मानं नाकारलं. देवळात त्याला प्रवेश नव्हता. देवाचं वेड होतं त्याला. त्याला म्हणे कुठंही देव दिसायचा. देव दिसला कि तिथंच मांडी घालून हात जोडून बसायचा. दोन्ही डोळ्यांतून वाहणारं पाणी त्याच्या आ वासलेल्या तोंडाला स्पर्श करून गेलं कि तारसप्तकात त्याने देवाला हाक मारलेली गावाच्या कानी पडायची. तिथच मग त्याचं भजन सुरू व्हायचं आणि बायाबापड्या, म्हातारे लगबगीने त्या आवाजाच्या दिशेने निघत. दादा अंगात शर्ट घालत आज्जाच्या नावाने ठणाणा करायचे. आज्जाला पाठुंगळी घेऊन आलेल्या दादांची चाहूल लागली कि काका चटकन ओसरीवर यायचा आणि आज्जाला अलगद उतरवून घ्यायचा.

" चालता येईना पण रोज एक उद्योग करून ठेवतंय म्हातारं.. " दादा चिडून म्हणाले कि खसखस पिकायची.

आज्जाचं हे वेड कमी झालं नाही. पडवीत मला मांडीवर घेऊन तारसप्तकातलं कुठलंसं धृपद गात बसायचा तेव्हां म्हणे माझा सूर पण त्याच्या सुरात मिसळत असे. पण... पण मला काहीच कसं आठवत नाही ? मात्र गावाला गेल्यावर आज्जाची आठवण निघाली आणि हा किस्सा बायाबापड्यांनी सांगितला नाही असं व्ह्यायचंच नाही. पहाटेला शिवाचा बाप देवळाचं कुलूप काढायला पाय-या चढत असायचा त्या वेळी आज्जा देवळाचा परिसर झाडून पुसून लख्खं करून अंधारात देऊळ उतरून खुरडत घराला पोहोचलेला असायचा. घरापुढची ओसरी आणि परिसर झाडून काढायला लागायचा. अंधारातच मग कुणी तरी "मामा द्या तो झाडू इकडं " असं म्हणत आज्जाला खाटेवर नेऊन बसवत असे. आज्जाला काहीच करता येण्यासारखा नसल्याने मग भिंतीला टेकून बसत देवळाकडे बघत बसे.

शिवाचा बा आज्जाने शिकवलेलं भजन गायचा. पण आज्जाच्या आवाजात जे काही वाटायचं ना ऐकताना, त्याचं वर्णन शब्दातीत आहे. आज्जाला काय दिसायचं हे गूढच राहीलं. पण त्याचं वेड मात्र वाढत गेलं. त्याच वेडात एकदा काकड आरतीला आज्जा देवळाच्या दिशेने गेलेला मारत्याने पाहीला आणि बोंब ठोकत तो घराला आला. दादा शर्ट न चढवताच देवळाच्या दिशेने धावले आणि काय गडबड झाली म्हणून आणखी दोघे तिघे ..

त्या दिवशी घरासमोर गर्दी होती. आज्जाच्या अंगावर पांढरीच चादर होती. आम्हाला मागच्या ओसरीवर स्थानबद्ध केलं होतं. आम्ही तिथं गजगे खेळत होतो. काहीच कळत नव्ह्तं पण रडायचे आवाज आले आणि आम्ही अस्वस्थ झालो. नेहमीचं रडणं नव्ह्तंच ते. आणि मग आज्जाला खाटेवर आंघोळ घातली गेली. फक्त पाय दिसले आम्हाला. मोठी माणसं सारखीच हाकलत होती. आज्जा आमचा होता ना ? मग ? सारखंच का डाफरावं ? त्याची लिंबाची काडी मला सापडली. आज त्याचा चहासाठी आवाज नाही .. मग घर मोकळ मोकळं झालं. घरी दोन चार लांबच्या नात्यातल्या बाया उरल्या. त्यांना काही विचारलं कि त्या डोळ्याला पदर लावत होत्या.

लिंबाच्या काडीने तोंड कडू झालं म्हणून काडी टाकून दिली. टेकडीवर बराच वर चढून आलो होतो. सह्याद्रीच्या रांगात लपलेलं गाव आणि त्याच्याशी फटकून असलेलं उंचावरचं देऊळ स्पष्ट दिसत होतं. आज्जा त्या दिवशी वेडाच्या भरात इकडंच आला होता.... लहानपणी न कळलेल्या कितीतरी गोष्टी नंतर कळाल्या. काचेला तडे गेले होते. आत्मसन्मानावर हल्ले झाले होते. त्या दिवशी दादांना पोहोचायला खूप उशीर झाला होता. देऊळ समोर होतं आणि आ़ज्जा जमिनीवर निश्चेट पडला होता. टक्क बघणा-या देवाला काही फुटांवरून रक्तरंजित अभिषेक झाला होता. जिवंत माणसांचा विटाळ होणा-या त्या देवाला सर्वांच्या अंगात वाहत असलेल्या त्याच रक्ताचा विटाळ होऊ नये म्हणून पाण्याच्या घागरी रित्या होत होत्या. दुधाचा अभिषेक करून जागा पवित्र होत होती.

आणि आज्जाचं कलेवर ताब्यात द्यावं म्हणून विनवण्या करणा-या दादांना मारहाण होत होती. कुणीतरी सांगितलं होतं त्या बिना शिराच्या धडाला अग्नी देताना दादा चक्कर येऊन पडले होते....

विहिरीवरचा बैलाचा रहाट कुणीतरी सुरू केलेला असतो. रहाटाला जुंपलेले बैल गोल गोल फिरत चाबकाचे फटके खात असतात. त्यांच्या मूक हंबरण्याचा आवाज अस्पष्टसा येतो.

"देवळाकडे जायचं नाही हं.."

कित्ती वर्ष हे वाक्य कानावर पडत होतं. टेकडी चढून दम लागल्याने थोडा विसावा घेत खाली पाहतो. फटफटत असतं. पर्वतरांगांमधून दरी ठळक होते. दूर धरणावरून येणारं वारं उंचावर थंडगार असतं. श्रम झाल्यासारखं वाटतच नाही. थकलेल्या तळपायाला गार वा-याचा स्पर्श हवासा वाटतो. दुखणं कसलंही असो इलाज पण असतोच..

आकाशात चांदणं अजूनही असतं. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी खडकावर बसतो. डोळे मिटून घेतले कि उरात श्वास भरून घ्यायचा. सकाळच्या वेळी हवेत फक्त शुद्ध ऑक्सीजन असतो. शरीराचा रोम रोम फुलून उठतो. शुद्ध हवेने अंतर्बाह्य शुद्धी होतानाची जाणीव होत राहते. उर्जेचा एक स्त्रोत आत आत शिरत असतो.

टाळ कुटले जाण्याचा लयीतला आवाज आणि शुद्ध हवेचा परिणाम म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित होतं. मेंदूत एकच आवाज .. टाळाचा येत राहतो. बाह्य जगाचा विसर पडत जातो. आत येणा-या ताज्या हवेच्या आणि बाहेर पडणा-या उच्छवासाच्या हिंदोळ्यावर मन झुलत राहतो. ध्यान म्हणतात ते हेच का ?

आणि टाळाचा आवाज बंद झाल्याने तंद्री भंग होते. पायाची बोटं हलवून पाहतो. एक संवेदना पायातून मेंदूला पोहोचते. एका अवयवाची सूक्ष्म जाणीव होते. मग तळपाय हलवून पाहतो. मग गुडघ्यातून एकच पाय... मग दुसरा असं करत करत हळूहळू हाताची बोट, हात, मान आणि नंतर डोकं..डोळे !

स्वत्वाची जाणीव होते तोच हा क्षण. स्वतःच्या शरीराची जाणीव आणि मघाची ध्यानावस्था. आपल्याला रोज काय मिळतं याची मला जाणीव नसते. वर पिठूर चांदणं पसरलेलं असतं. पूर्व किंचित गुलाबी व्हायच्या मार्गावर असते. साडेपाचची वेळ ही.. स्वत्वापासून विशाल अशा सत्याची जाणीव होते. अनंत सत्य समोर आ वासून पसरलेलं असतं. थोड्या वेळाने तेजाचा गोळा वर येईल. प्रचंड मोठा वाटतो इथून. गंमतच आहे. जे प्रचंड आहे ते ठिपके होऊन पसरलेत. सत्यामधे आणि माझ्यामधे असलेलं या अंतराने निरनिराळे भास होत राहतात. नजरेचा आवाका कमी पडतो. रात्री दुधासारखी आकाशगंगा दिसते. आपण सूर्याभोवती फिरतो, तो आकाशगंगेत फिरतो. आकाशगंगा विश्वाच्या केंद्राभोवती फिरते...

अशी सात विश्वे आहेत म्हणे. कुणी पाहीलीत ? या अनंत विश्वाचा पसारा केव्हढा ? ज्याच्या त्याच्या कल्पनेएव्हढा .........!!! अलिबाबाचा खजिना किती लुटावा ? ज्याच्या त्याच्या मुठीइतका !!

पण या सगळ्याचं एक केंद्र असेल ना ? सर्व केंद्रांच एकच एक केंद्र .. जिथं काळ थांबतो. जिथं अंत आणि आरंभ एकच असतात. जिथं अंतरं अर्थहीन होतात. आधी आणि नंतर या कल्पना फोल होतात.

ते ..ते....

लंगड्या शिवाच्या शेवटच्या हाळीने मी भानावर येतो.
खाली उतरायची वेळ झालेली असते. झपाझप पावलं टाकताना सकाळची कोवळी किरणं वेगाने वातावरणाचा ताबा घेत असतात. देवळाचा कळस त्या सोनेरी तेजात झळाळून उठलेला असतो. काहीतरी खेचून घेत असतं.. पण मी नास्तिक विचारांची भरजरी वादळं पेलत थबकून राहतो....

तिथं जायचं नाही... बस्स ही जाणीव !!

त्या निर्जीव मूर्तीशी माझं भांडण असतं. माझा आज्जा त्या दगडापायी भान हरपून पळाला होता.... रोजच्या या क्रमात कधीच चूक होत नाही.

आज्जाचा टाळ खुंटीवरून एकटक बघत असतो. दिवसामागून दिवस जात राहतात अगदी याच क्रमाने. आणि मग एक दिवस ती गोड बातमी कळाली आणि संपूर्ण घरात आनंदाला भरतं आलं. दादांचे डोळे अधूनमधून पाणावत राहीले. ते काहीही न बोलता बरेच बोलत होते... आज्जा पोटाला येणार आहे.
अंधश्रद्धाच .. पण माणूस गेल्याचं दु:खं हलकं होतं हे नक्की.

अंत आणि आरंभ .....

मन स्वतःची समजूत घालतं खरंच. आणि ज्योतीने ज्योत तेवावी तशी मनाची भाषा सर्वांना कळते आणि मूकमान्यता मिळून आधीच येणा-या पाहुण्यामधे गेलेला जीव शोधला जातो. ओळख शोधली जाते. नाही म्हटलं तरी सुखाच्या परमोच्च बिंदूवर उभं असल्याची ही जाणीव लपवता येत नाही. त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहताना आजूबाजूचं विस्मरण होतंच होतं..

अशाच एका गाफील क्षणी टेकडीवरून येतांना एकदा मंदिराकडे पाय वळाले. चुंबकाने खेचले जात असावे तसे. विरोध करण्यासाठी मनाचं ताळ्यावर असणं गरजेचं होतं. आज तो आधार डळमळीत होत होता. तसे पूर्विसारखे काही राहीलेले नसते आता. दिवस बदललेले असतात. आता देवळात गेलं तरी तसं बिघडणार काहीच नसतं.

मी एका अनामिक ओढीने खेचला जात होतो आणि अचानक देवळापासून काही फुटांवर करंट बसल्यासारखा थांबलो.. खालची माती मला रक्तवर्णी असल्यासारखी भास होतो. इतकी वर्षे गेली. कसं शक्य आहे ती जागा माहीत असणं. पण मला उचंबळून येतं. माझ्या हालचाली आता रोबोसारख्या होत असतात. ती माती मी हातात घेतो...
आणि
वेड्यासारखा कपाळाला लावतो, हृदयाशी धरून ठेवतो. माझ्या दोन्ही डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागलेल्या असतात. भानावर येतो तेव्हां लंगडा शिवा मला दोन्ही हातांनी गदागदा हलवत असतो. मी देवळाकडं गेल्याची बातमी घरात पोहोचलेली असते. घरात आज्जाचा फोटो साफसूफ होऊन झळकू लागलेला असतो. आज्जाचा स्मृतीदिन काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतो.

दोन दिवस अंगात ताप असल्याने मी फिरायला गेलो नाही. टेकडीवरच्या माळावर होणारी ती जाणीव, ती ध्यानावस्था खुणावत असते. ब्रह्मानंदी टाळीची ती अवस्था आता हवीहवीशी वाटत असते. घरात येणार असणा-या नव्या पाहुण्याच्या आगमनाने मनाला लागलेली एक अनामिक हुरहुर आणि देवळातली ती माती स्पर्शताना उचंबळून आलेल्या भावना यांच्या मिश्र संगमाने मानसपक्षी श्रावणझुले झुलत असतो.

दुस-या दिवशी भल्या पहाटे मी ओसरीवर बसलो. सवयीने श्वास आत घेतला, बाहेर सोडला. लक्ष श्वासावर केंद्रीत झालं. मनातल्या विचारांच्या वादळांना दूर सारण्याचं सामर्थ्य का क्रियेत होतं. डोळ्यासमोर येणारी ज्योत आज चटकन आली. माझ्याही नकळत मी ध्यानावस्था अथवा समाधीमधे गेलेलो असलो पाहीजे. पुढचं मला काहीच कळालं नाही. सभोवताली दिव्य तेज असल्याचा भास झाला होता.

कुणीतरी मला गदागदा हलवून उठवत होतं. अंगात ताप भरल्याची जाणीव झाली. थकवा आल्यासारखं वाटलं. भोवताली ही गर्दी जमलेली. त्या गर्दीचा गलका हळूहळू कानातून मेंदूपर्यंत पोहोचू लागला. असं कधीच झालं नव्हतं. म्हाद्या म्हणत होता "काल तू भजनं म्हणत होतास ! तुला काय बी कळत नव्हतं. जणू तुझा आज्जाच तुझ्या गळ्यातून गात व्हता. त्योच गोडवा, त्योच खडा आवाज ! "

मी त्याच्याकडे मान उचलून पाहीलं. बोलण्याचं त्राण नव्हतं. गावात बातमी वा-यासारखी पसरली होती. देवळाच्या पुजा-याला जाऊन आता कैक वर्षं उलटली होती. त्याचा थोरला मुलगा चिंतामणीही आता पुरता पिकला होता. मला खाटल्यावर ठेवलं होतं तिथं माझ्या पायाशी तो बसला होता. "मामा, माझा बाबाला ला माफ करा " म्हणताना त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. मी शुद्धीवर आल्याचं पाहताच तो पायाकडून माझ्या जवळ येऊन बसला. माझा हातात हात घेऊन बाबाला माफ करा म्हणत राहिला. मी कसंनुसं हसण्याचा प्रयत्न केला. दिव्य तेज सभोवती पसरत चाललेलं होतं. माझी शुद्ध जातानाची ती जाणीव होती.

डोळे उघडले तेव्हां पुण्याच्या मनोरुग्णालयात मला ठेवलंय इतकंच कळालं. मागच्या खेपेला दहा दिवस बेशुद्ध होतो असं बायकोने सांगितलं. तापात काहीबाही बरळत होतो. घरच्यांनी डॉक्टर, दवाखाने सगळं केलं. डॉ देशमानेंनी मानसोपचाराचा सल्ला दिला. पुण्याच्या मनोरुग्णालयात गावचाच डॉक्टर निघाल्याने इथं आणलं. वेगळी व्यवस्था जरी केली होती तरी मला इथं ठेवलेलं आईला अजिबात आवडलेलं नव्हतं. पण दादांपुढं तिचं काही चाललं नव्हतं.

आमच्या गावचे डॉ. हिरवे भेटून गेले. स्किझोफ्रेनिया वगैरे शब्द कानांवर पडले. महिनाभर ऑब्झर्वेशनखाली ठेवतो म्हणत होते. दादांनी औषधं आणि उपचार सांगा आम्ही गावाला करु म्हणून निक्षून सांगितल्यानं त्यांचा नाईलाज झाला.

ठरलेली सगळी औषधं मला वेळेवर दिली जात होती. गावातले डॉक्टरही तपासून जात होते. भरीस भर म्हणून कुणी लिंबू उतरव, कुणी "बाहेरचे" इलाज वगैरे सगळं चालूच होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणून महिनाभरातच खूप बरं वाटू लागलं. थकवा गेला. हिंडू फिरू लागलो होतो. हिच्याकडे पाहीलं. बाळाच्या चाहुलीने रसरसून जायची ती माझ्या काळजीने काळवंडून गेली होती. क्षणभर अपराध्यासारखं वाटलं.

दोन तीन दिवसांनी आराम बास झाल्यासारखं वाटलं. पहाटे उठून फिरायला जाण्यासाठी म्हणून चपला पायात सरकवणार तोच..

" देवळाकडं जाऊ नकोस रं "

चुलत्याचा आवाज आला. काही न बोलता मी नेहमीच्या वाटेवर निघालो.

भल्या पहाटे गावाबाहेरची टेकडी चढताना टेकडीशी फारकत घेऊन वळलेल्या पाऊलवाटेने भाविक घाईघाईने चाललेले होते. अजून फटफटलेलं नव्हतं. थंड वारं चित्तवृत्ती उल्हसित करत होतं. टेकडीच्या बाजूचं जुनं मंदीर अंधारातच जागं झालेलं होतं.

काकडारती संपलेली होती. कानाला सुखावणारे मंदिरातल्या घंटांचे आवाज येत होते. या घंटांचा नाद घुमत घुमत आवर्तनं तयार करू लागला. लंगड्या शिवाचा खडा आवाज लागलेला होता. त्याच्या भजनाचे बोलांचा कानोसा आसमंत घेत होतं म्हणून मी ही दगडावर बसलो. ताजंतवानं झाल्यासारखं वाटत होतं.

सवयीने श्वास आत घेतला. ताज्या हवेचा साठा छातीत भरून घेताना गात्र नि गात्र पुनरुज्जिवीत झाल्यासारखं वाटत होतं. श्वास आत, श्वास बाहेर.... आणि विचारांची वादळं विरून गेली. कानावर येणा-या सर्व आवाजांचा एकच एक नाद झाला आणि डोळ्यांपुढं तेजस्वी ज्योत आली. आजूबाजूला आभा पसरल्याची जाणिव होत होती आणि...

ता दिव्य प्रकाशात कुणीतरी उभे असल्याचा भास झाला. भास ? खचितच नाही. आज्जाला काही बाही दिसायचं. सगळे म्हणत होते. डोळे न उघडताच समोर दृश्य दिसत होतं. देवळात अभिषेक चालू असावेत. भाविकांच्या देणग्यांच्या रकमेचा केला जाणारा पुकाराही ऐकू येत होता आणि समोर देवळातला देव.. हो देवच !!
आज्जाला देव दिसत होता. समोरच्या आकृतीच्या चेह-यावर तेज होतं. डोळ्यात मिस्कील हसू असावं असा भास होत होता. नकळत हात जोडले गेले... कसं झालं हे कळालं नाही.

ही अवस्था संपू नये असं वाटू लागलं. एकाएकी दृश्य बदललं. आज्जाचा चेहरा डोळ्यासमोर आला. वेडात धावणारा आज्जा डोळ्याला दिसला. दृश्य हलत होती. क्षणार्धात पुन्हा तो दिव्य प्रकाश तर क्षणार्धात मला कळवळून काही सांगणारा आज्जा !! देवळाच्या घंटेचा टण्ण असा आवाज कानी पडला मात्र... कपाळी लावलेल्या मातीचा स्पर्श जाणवला आणि ....

" जा चालता हो इथून ! मला तुझी काही एक गरज नाही"

शुद्ध जाईपर्यंत मी घशाच्या शिरा ताणून माळावर ओरडत होतो. श्रम झाल्याने तिथेच मी पडलो असणार. अजून का परत आलो नाही म्हणून घरचे लोक शोधायला आले तेव्हां मी कुठल्या अवस्थेत सापडलो हे कुणीच सांगितलं नाही आजवर. डॉ हिरवे या वेळी घरीच आले होते. दोन दिवस येत होते.

दोन दिवसांनी मला तपासलं तेव्हां समाधानाने हसून मान डोलावली त्यांनी. "पेशंट आता पूर्ण बरा आहे, धोका टळलेला आहे " हा दिलासा देताना त्यांच्या चेह-यावर समाधान पसरलं होतं. मी एका धोकादायक आजाराच्या टोकावरून परत आल्याचा विश्वास त्यांच्या डोळ्यात होता. बायकोच्या डोळ्यात संकट टळल्याची भावना होती. दादां शक्यतो चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना भरून आल्याचं स्पष्टच दिसत होतं.

खुंटीवरचे टाळ आज समाधानी दिसत होते. क्षणभरच आज्जाचा चेहरा तिथं उमटला मात्र.. त्या दिवशी आज्जाच्या चेह-याचं रहस्य लक्षात आलं. आज्जाला देव दिसत होता. त्या वेडापायी आज्जा प्राण गमावून बसला. माझ्याबाबतीत जवळजवळ तेच होतांना आज्जा मदतीला धावून आला आणि मनातल्या भावना तीव्र झाल्या.

त्या क्षणी सगळा राग, सगळा द्वेष समोरच्या तेजावर काढताना तुझ्या सच्च्या भक्ताचा जीव वाचवू न शकणा-या त्या अस्तित्वाबद्दलचा सगळा त्वेष , अविश्वास तिथं प्रकट झाला होता. कुणाच्या तरी श्रद्धांचं प्रतिक असलेलं ते दिव्य अमूर्त स्वरूप माझ्या त्या प्रश्नाने निरुत्तर होत होत हवेत विरून गेलं होतं. अगणित श्रद्धांनी मान्य केलेला तेजःपुंज आणि सर्वशक्तिमान आकार कि एक असहाय आणि दुर्बल आभासी अस्तित्व ? कि आज्जाची त्याच्यापुरती असलेली इच्छापूर्ती ? आज्जानं देव मिळवला होता आणि त्या देवानं आज्जाला संकटात वा-याव्र सोडलं होतं. दादांनी मग देवाला सोडलं होतं. नाईलाजास्तव, परिस्थितीनुसार पण त्याला झिडकारलं होतं. आणि कायमच्या नाहीशा झालेल्या आज्जाच्या अस्तित्वातून शिल्लक राह्लेल्या भावभावना आणि पुरातन आणि अमर अशा स्कंधांना आकार घेण्यापासून मी झिडकारलं होतं. प्रचंड संघर्ष आणि केव्हढीतरी उलथापालथ तिथे झाली होती. आणि ते सगळं असह्य होऊन मी कोसळलो होतो.

टाळाकडे पाहतांना स्पष्ट आठवलं आता ते. काही न बोलता मी उठलो. खुंटीवरचे टाळ काढले , आज्जाच्या जुन्या ट्रंकेत ठेवून दिले. बाहेर येऊन बसलो. खूप हलकं हलकं वाटत होतं. आसमंत एकदम स्वच्छ झाल्यासारखा वाटत होता. खंड्या कुत्रा पायात घुटमळू लागला. त्याला भाकरी आणायला सांगितली. संध्याकाळची दिवेलागणीची वेळ होत आली होती. रानाकडून येणा-या गायीला पाहून कालवड पळत सुटली आणि ढुशा देत देत थानाला लुसू लागली. झाडावर पक्षी परतू लागले होते. जणू काही झालंच नव्हतं अशा पद्धतीने काळ त्या संध्याकाळच्या दृश्यावर विस्मरणाची चादर अलगत अंथरत चालला होता. माझं मनही घरट्यात आणि त्यात येणा-या चिमण्या बाळात परतू लागलं होतं. ट्रंकेतले टाळ आता विस्मरणात जाणार होते... कायमचेच !

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण, जिओ. अप्रतिम सुंदर लिहिलं आहेस. तुझं लिखाण वाचताना वाचनाच्या अनुभवाबरोबरच डोळ्यासमोर चित्र दिसतात, इतके तुझे शब्द सजीव असतात. फार आवडलं हे ललित ( कि कथा?)

झोपण्याआधी सहज लॉग इन केलं आणि तुझं लिखाण पहिल्या पानावर. वॉट अ ट्रीट Happy परत एकदा लिहिता झालास तर. Happy

काय भारी लिहीलंय!
अप्रतिम.
आवडलं.

!!

मित्रांनो
आपल्या प्रेमामुळेच लिहीत आलोय. तुमचं हे प्रेम नसतं तर तर या व्यापातून वेळ काढणं शक्य झालं नसतं. माझ्या या प्रकारच्या लिखाणावर प्रेम करणा-या सर्वांचे मनापासून आभार..

भारतीतै.. निवडक दहात बद्दल शतशः आभार

अप्रतिम !......... किरण, तुझं 'चैत्रातलं आभाळ' माझ्या निवडक दहात आहेच. अधुन मधुन मी त्याची पारायणे करीत असते.आजची हि कथा सुद्दा निवडक दहात समाविष्ट करण्याच्या तोडीची आहे !
खुप सुंदर आणि ह्रदयस्पर्शी लिखाण असतं तुझं ! डोळ्यांसमोर हुबेहुब दृश्य उभं करण्याची ताकद आहे तुझ्या लिखाणात ! मी तुझ्या लिखाणाची पंखी आहे. Happy

धन्यवाद सर्वांचे.
वनराई
हे कसं होतं ते खरंच सांगता येत नाही.. पण आपण निमित्त असल्याची जाणिव होते. थँक्स Happy

छान लिहिलय. Happy
आर्तस्वरात देवाला आळवणारे आजोबा डोळ्यासमोर आले. शाश्वत अशाश्वताच्या लढ्यात शेवटाला ठामपणे उभा राहणारा नायकही.
सुरेख चित्र उभ केलतं डोळ्यासमोर.

ओह - सुन्न झालो हे वाचून.....

लेखणीत जबरी ताकद आहे तुझ्या.......

आगळे -वेगळे कथाबीज...

निट सांगता येणार नाही पण कुठे तरी आत मध्ये भिडलं. >>> +१

खरंच शब्दच नाहीत काही लिहायला......

एक नंबर!
खुप शुभेच्छा!!!

Pages