‘ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!
ढडाढाण…टडाढाण… ढडाढाण…टडाढाण…
ढडाढाण…टडाढाण… ढाण्ण !!!’
ढोलाचा असा आवाज कानात रूंजी घालू लागला की जाणवतं, आता गणपती येणार मन आठवणींच्या राज्यात रमतं.
फ्लॅश बॅक – पुणे
गणपतीच्या आठवणींची सुरुवात अगदी लहानपणापासून होते. गणेश चतुर्थीला घरोघरी उकडीचे मोदक. वाफेभरला मोदक फोडून, त्यावर साजूक तुपाची पातळ धार धरायची आणि मग गट्टम !! कसं माहीत नाही पण दुपारी मोदकांचं जेवण झाल्यावरही थोड्याच वेळात क्रिकेट किंवा टेबल टेनिस खेळण्याचा उत्साह त्या वयात असायचा.
अगदी लहानपणी आम्ही सगळी पोरं एक मात्र कटाक्षाने पाळायचो ते म्हणजे गणेश चतुर्थीला रात्री चुकूनही चंद्राकडे बघायचे नाही. लहानपणी ऐकलेली गोष्ट अशी होती की एकदा गणपती मूषकावर स्वार होऊन निघाला होता. काहीतरी गडबड झाली आणि गणपती खाली पडला. नेमके ते चंद्राने पाहिले आणि गणपतीच्या फजितीला तो हसला. गणपतीला आला राग आणि त्याने चंद्राला दिला शाप,”जो कुणी गणेश चतुर्थीला तुझे दर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आळ येईल आणि तुझ्यावर कायमचा डाग राहील”. तेंव्हापासून चंद्रावर, अगदी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रावरही, डाग पडले ते कायमचेच !!!
पुण्यातल्या आमच्या ‘बॅंक ऑफ इंडिया सोसायटी’मधे सोळा घरं आहेत. त्यापैकी बहुतेक सर्वं घरांत गणपती यायचे. आमच्या घरचा गणपती अप्पांच्या जन्मगावी पालघरला असतो. त्यामुळे आमच्या घरी पुण्याला गणपती आणत नाहीत पण आई मोदकाचा नैवेद्य वगैरे साग्रसंगीत करते. कधी कधी खूप वाटायचं आपल्या घरीही गणपती असावा. आमच्या सोसायटीत मात्र ही उणीव बऱ्याच प्रमाणात भरून निघायची. रोज संध्याकाळी प्रत्येक घरी आरतीला जायचो. ‘सुखकर्ता, दु:खहर्ता..’ सुरु व्हायचं आणि ‘घालीन लोटांगण…’ पर्यंत अंगात एक छान ताल भिनायचा. ‘त्वमेव माता च, पिता त्वमेव..’ काय छान ओळी आहेत ना? आरत्यांनंतर सुरु व्हायची धीरगंभीर ‘मंत्रपुष्पांजली’. आरती कुणाकडेही असली तरी फुलं वाटायचं काम आम्हा मुलांचं. गणपतीसमोर आरतीचं तबक घेऊन उभे असलेले काका ते तबक सगळ्या गर्दीतून फिरवायचे. मंदपणे तेवणाऱ्या ज्योतीवर आई किंवा आजी तिच्या हातांचे तळवे फिरवायची. लगेच ते ऊबदार हात आमच्या चेहऱ्यावरून अलगद फिरायचे. आरतीची ती ऊब वेगळीच असते. तीर्थं पिताना दोन थेंब डोळ्यांना लावले की मिळणारा गारवाही वेगळाच असतो ना! हाती एक फूल घेऊन शांतपणे ‘ओssम यज्ञेssन यज्ञsमयजंssत देवाss…’ मधे आपला सूर मिसळायचा आणि सरतेशेवटी फूल बाप्पांच्या पायाशी ‘अर्पणमस्तु’. एकाएकी कुणीतरी ओरडायचं, “गणपती बाप्पाsss”. आम्ही सगळी पोरं मग बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडायचो, “मोरयाssss”. अर्थात बालवयाला अनुसरून, एक डोळा ‘आज प्रसाद काय मिळणार?’ ह्यावर असायचा.
आमच्या कॉलनीतील नाटकांमध्ये भाग घ्यायचा, कविता म्हणायचा किंवा नकला करायचा उत्साह दांडगा असायचा. आमची बॅंक ऑफ इंडिया सोसायटी, समोरची एल. आय. सी. कॉलनी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया सोसायटी असे सगळे मिळून कॉलनीमध्ये मोकळ्या मैदानावर गणपतीच्या निमित्त २/३ हिंदी सिनेमा आणायचो. जमिनीत दोन मोठे बांबू रोवून त्यांना मोठ्ठा पांढरा पडदा ताणून बसवायचे. समोरच्या बाजूने प्रोजेक्टरवर रीळे बसवून सिनेमा लावायचे. थोड्या थोड्या वेळाने रीळ बदलावे लागे आणि पुढचा भाग सुरू होण्याआधी पडद्यावर आकड्यांचा ‘count down’ यायचा. त्यावेळी DVD / VCR तर सोडाच पण T.V. सुद्धा चैनीची गोष्ट होती. मोकळ्या ग्राउंडवर सतरंजीवर बसून, अंगाभोवती चादर गुंडाळून पाहिलेले ‘जंजीर’, ‘सीता और गीता’, ‘शंकर-शंभू’ वगैरे चित्रपट वाऱ्याचा गारवा, गवताचा वास आणि मित्रांचा सहवास ह्यांसकट मनात ताजे आहेत.
गणपतीच्या दिवसांत पुण्याचे गणपती पहायला जाणं म्हणजे आनंद असायचा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे देखावे असायचे. कुठे ‘दशावतार’ तर कुठे ‘तुकारामांचे सदेह वैकुंठगमन’. कुठे ‘कीचक-वध’ तर कुठे ‘कालिया मर्दन’. अगदी ‘आग्र्याहून सुटका’, ‘अफझलखान वध’ असायचंच पण ‘चले जाव’ चळवळ किंवा ‘मिठाचा सत्याग्रह’ सुद्धा असायचे. सगळ्यात मजा यायची ती हिराबागेचा गणपती पहायला. कित्येक वर्षांपर्यंत फक्त हिराबागेसमोर हलता देखावा असायचा. ते हलणारे अवाढव्य पुतळे आणि मोठ्ठया स्पीकर्समधून ऐकू येणारे संवाद परत कधी अनुभवता येतील?
काही वर्षांनंतर आमचा सख्खा काका डेक्कन जिमखाना इथे एका वाड्यात राहू लागला. वाड्याच्या मध्यभागी एक चौक होता. त्याचे छत म्हणजे एकदम मोकळं आकाशच. त्या चौकात वाड्याचा सार्वजनिक गणपती असायचा. कधीकधी आरती करताना पावसाचा हलका शिडकवा व्हायचा आणि सचैल स्नानात आरती व्हायची. सगळा वाडा संध्याकाळच्या आरतीला हजर असायचा. सुरेशभाई आणि प्रवीणभाई हे शहा बंधू असले की आरती अजूनच खुलायची. वरच्या पट्टीत ‘येsssई ओsss विठ्ठलss माssझेss माsssऊssलीss येssss’ म्हणत ताना लांबवताना मजा यायची. ‘गणपती बाप्पा, मोरयाsss’ चा गजर झाल्यावर प्रवीणभाई हमखास चढ्या आवाजात ‘मोरया…मोरया… मोरया…मोरया…’ असं बराच वेळ एका दमात म्हणायचे. त्यांच्याबरोबरीनं म्हणताना दम निघायचा पण जाम धमाल असायची.
अनंत चतुर्दशी म्हणजे तर मजाच मजा असायची. शोभाआत्याकडे अनंताची पूजा असते. माझे आजोबा आणि शाळकरी मी अशी जोडगोळी चित्र्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दरवर्षी आत्याकडे पूजेला जायचो. दुपारी जेवण झालं की लगबगीनं आत्याच्या बाजीरावरोडवरच्या घरून निघायचो. तीन वाजता अलका टॉकीजच्या चौकात पोलीस ट्रॅफिक अडवायचे. आम्ही मग रिक्शातून उतरून लकडीपुलावरून वन-टू, वन-टू करत काकाच्या घरी जायचो. पांढरा शुभ्र लेंगा, लांब बाह्यांचा शुभ्र सदरा आणि कोनदार पांढरी गांधी टोपी घातलेले, झपझप पावले टाकत चालणारे आजोबा तस्सेच डोळ्यांपुढे येतात. आजोबा एके काळी हौस म्हणून संगीत नाटकांमधून काम करायचे. चालताना ते कधी-कधी छानपैकी ’प्रभू अजि गमला…’ सारखं एखादं नाट्यगीत गुणगुणायचे. ते ऐकत मी माणसांच्या गर्दीतून वाट काढायचो. लकडी पुलावर फुगेवाले, भेळवाले जमू लागत. त्यात ‘व्यास भेळ’ ही पाटी दरवर्षी हमखास दिसायची. बासरी, पिपाणीवाले म्हणजे तर खास आकर्षण होते. साधारण चार वाजण्याच्या सुमारास मानाचे पाच गणपती लकडी पुलावरून विसर्जनासाठी जायचे. पहिला असायचा – पुण्याचं ग्रामदैवत – कसबा गणपती. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा असे एकापाठोपाठ जायचे. रस्त्याच्या दुतर्फा हीsss गर्दी असायची. मानाच्या गणपतींसमोर ‘ज्ञान प्रबोधिनी’ शाळेचं पथक असायचं. त्यांचं लेझीम बघताना आपोआप पाय ताल धरायचे. काय लयीत पडायची त्यांची पाऊलं !! असं वाटायचं जणू प्रत्येकाचं अंग म्हणजे एक-एक लेझीमच झालंय. पथकाच्या पुढे एक जण झेंडा उंच उंच उडवत असायचा. शिवाय प्रत्येक मंडळाच्या गाडीसमोर ढोल आणि मोठ्या झांजांचा तो वेडावणारा आवाज, “ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!! ढडाढाण…टडाढाण…ढाण्ण !!!” दुपारी विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी मिरवणूक संपेपर्यंत तो आवाज कानात घुमत राहयचा.
संध्याकाळी काकाच्या वाड्यातल्या गणपतीचं विसर्जन. आरत्या झाल्या की मस्तपैकी नाचत-नाचत, गुलाल उधळत आणि लाल रंग मिरवत नदीपर्यंत जायचं. “गणपती बाप्पा, मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना आमचे आवाज टिपेला जायचे. मध्येच अप्पा मुलायम आवाजात गायचे, “मार्गे हळू-हळू चाला, मुखाने गजानन बोला” आणि मग आमचेही आवाज संयत व्हायचे. नदीवर पुन्हा एकदा आरत्या, पण मोजक्याच. मग दोन-तीन लोक चांगल्या कंबरभर पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उभे राहयचे. बाप्पांना तीन वेळा पाण्यात स्नान करवून नदीबरोबर द्यायचे. विसर्जन झाल्यावर पाटात नदीवरची थोडी वाळू भरून घ्यायची. परत येतान पावलं ओढल्यासारखं व्हायचं. वाड्यात आल्यावर बाप्पांच्या रिकाम्या मखराकडे पाहताना कससंच व्हायचं. आता भारतातून चार-सहा महिन्यांसाठी आलेले वडिलधारे परत गेले की त्यांना एअरपोर्टवर सोडून घरी आल्यावर त्यांची रिकामी खोली पाहताना तसंच वाटतं.
थोड्या वेळाने वाड्यात कोरड्या भेळीचा कार्यक्रम ठरलेला असायचा. गुलालाचे लालभडक हात धुतल्यासारखं करायचं आणि भेळ हवी तेव्हढी झणझणीत करून घ्यायची. रात्री थोडा वेळ परत लकडी पुलावर गणपतीची मिरवणूक पहायला जायचं. आतापर्यंत तिकडे गर्दीचं रूपांतर जत्रेत झालेलं असायचं. “चर्र…’ आवाज करत भजी-बटाटेवडे आपल्या गाडीकडे बोलावू पहायचे. ओळखीचा एखादा मोठा मुलगा एन.सी.सी.च्या ड्रेसमध्ये गर्दी सांभाळताना दिसायचा. गर्दीत न हरवता, काकाच्या घरी परतायचं आणि आंघोळ करून थोडा वेळ झोप काढायची. पहाटे काकी किंवा वंदनाआत्या उठवायची, “चला, चला..लायटींगचे गणपती आले.” मग झोप झटकून मी आणि मंदार त्यांच्याबरोबर निघायचो. हे गणपती म्हणजे ज्यांच्या मिरवणूक रथावर लायटींग केलेले असायचे ते. रात्रीच्या अंधारात एक एक मिरवणूक रथ रोषणाईने नुसता उजळललेला असायचा; पण त्या सगळ्यांचा राजा म्हणजे ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती’. तो रथ म्हणजे जयपूर, उदयपूर वगैरे ठिकाणच्या एखाद्या राजवाड्याची प्रतिकृती असायचा. त्यावर छोटे छोटे जणू लक्ष लक्ष पिवळे दिवे उजळलेले असायचे. ‘झगमगाट’ ह्या शब्दाचा अर्थं समजण्यासाठी दगडूशेठ हलवाईचा रथ नक्की बघावा. दगडूशेठ हलवाईचा गणपतीची ’नवसाला पावणारा’ अशी ख्याती आहे आणि त्या मूर्तीचं दर्शनही अतिशय प्रसन्न करणारं आहे.
दुसऱ्या दिवशी पहावं तर गरवारे पूल, लकडी पूल, टिळक रोड, लक्ष्मी रोड वगैरे गुलालाच्या सड्यांनी आणि फुलांच्या पाकळ्यांनी नुसते रंगलेले असायचे.
कॉलेजमध्ये असतानाच्या तर आठवणी अशाही छान असतात. त्यातही गणपतीच्या आठवणी काय सांगाव्या? एक तर कॉलनीच्या सार्वजनिक गणपतीचा मांडव घालणे वगैरे असायचं. वर्गणीसाठी सगळीकडे विनासंकोच फिरणं असायचं. चार ठिकाणी चौकशी करून हव्या त्या वस्तू घ्यायच्या. मांडव घातल्यावर मांडवाखाली, मोकळ्या जागेत गप्पांच्या रात्री जागवायच्या. आता वळून पाहताना जाणवतं की सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे नकळत ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’चे धडे गिरवणं होतं. फारसे रिसोर्सेस आणि फ़ंडिंग हाताशी नसताना, सगळे गोंधळ अणि वाद निस्तरत, क्वॉलिटी प्रॉडक्ट योग्य खर्चात आणि मुख्य म्हणजे वेळेत तयार करायचं. हो ना..नाहीतर गणपतीचा मांडव आणि आरास अनंत चतुर्दशीला तयार होऊन काय उपयोग? ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ तरी काय वेगळं असतं?
कॉलनी किंवा कॉलेजच्या मित्रांबरोबर रात्र-रात्रभर गणपती बघत फिरणे म्हणजे धमाल असायची. खिशात फार पैसे नसायचे. त्यामुळे ‘चैतन्यकांडी’ (पुणेरी भाषेत) ओढणाऱ्यांसाठी पैसे उरावे म्हणून अर्ध्या चहातही आनंद असायचा. ‘रॉंव..रॉंव’ करत बाइक्सवरून बुंगाट जाण्यात धुंदी होती. गणपती पहाण्यापेक्षा इतर ‘प्रेक्षणीय’ स्थळांकडे नजर जास्त वळायची. डेक्कन किंवा योग्य ठिकाणी, म्हणजे जे पहायचे ते नजरेच्या टप्प्यात आपसूक दिसेल तिथे, गाड्या लावून धत्तिंग करण्यात चहाचे ग्लास संपायचे. अर्थात मित्रांबरोबरच मैत्रिणीही असतील तर त्यांना गर्दीतील हुल्लडबाजांकडून त्रास होत नाही ना ते सांभाळलं जायचं.
कॉलेजमध्ये असताना मग मुंबईला आणि पालघरला चक्कर व्हायची. अंधेरीला भाईमामा किंवा मुलुंडला दिलीपमामाकडे आलटून पालटून गणपती असत. दुपारी जेवणं झाली की गाणी, गप्पा आणि मिमिक्रीची मैफल व्हायची. दुसऱ्या दिवशी सकाळी मग मुंबईहून पालघर गाठायचं. कधी बरोबर आतेभावांपैकी श्रीराम किंवा निलेश असायचे तर कधी मी एकटाच. पालघर जवळ येतंय हे आजूबाजूच्या दृश्यातल्या बदलानेच कळायचं. मोठ्या नदीवरून ट्रेन धडधडत जायची. पाण्यात पैसे टाकण्यासाठी खिडकीजवळ गर्दी व्हायची. नुकत्या सरलेल्या श्रावणाची हिरवाई दूर दूर पर्यंत दिसायची. मध्येच, जणू छोटे पांढरेशुभ्र डोंगर दिसणारी, मिठागरे असायची. सकाळी साडेनऊच्या सुमारास पालघर यायचं. कधी कोवळं ऊन असायचं तर कधी नुकत्या पडलेल्या पावसामुळे आसमंत छान कुंद असायचं. स्टेशनसमोर एक यू.पी.वाल्या भैय्याचं ‘स्वीट मार्ट’ टाइप रेस्टॉरंट होतं. मस्त गरमागरम कचोरी, समोसे मिळायचे. गरम कचोरी आणि समोसे फोडून त्यात चिंचेची आंबट-गोड चटणी, हिरव्या मिरच्यांची तिखट चटणी भरायची, त्यावर पिवळीधम्मक कुरकुरीत बारीक शेव घ्यायची आणि जोडीला वाफाळता चहा. अहाहा…सुख!!! आबाकाकाचं नाव रिक्षावाल्यांना सांगितलं की ते डायरेक्ट काकाच्या घरी सोडायचे. घरच्या गणपतीची आरती वगैरे झालं की बाजारातून काही ना काही आणायला काकाबरोबर त्याच्या बुलेटवरून रूबाबात गावात चक्कर मारून यायचं. जाणारे-येणारे काकाला हात करायचे. तो ही दमदार आवाज द्यायचा, ’दर्शनाला येऊन जा’, किंवा ’आप्पाचा मुलगा आलाय’!!! तेव्हा कळायचं अप्पांनी पालघर सोडून इतकी वर्षं झाली तरी अजून कितीतरी लोक त्यांच्या आठवणी काढतात. दुपारी जेवण करून दोनच्या गाडीने मुंबईला परत. पालघर तेव्हा निवांत गाव होतं. दुपारी दोनला गाडी गुजरातहून पालघरला यायची तर काका दोन-पाच, दोन-दहाला कुणाला तरी पिटाळायचा, ”जा रे , बघ जरा गाडी कधीपर्यंत येईल?” मग गाडी यायच्या वेळेला तिथल्या तीन काकांपैकी कुणीतरी एक बुलेटवर बसवून स्टेशनवर सोडायचा. जातानाही वाटेत भेटणाऱ्यांना आवाज द्यायचे, “जरा आप्पाच्या मुलाला सोडून येतो!!”
मुंबईहून मग पुण्याला घरी परत.
पुण्यातल्या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य महणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलेचेल. अगदी गल्लीपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत काही ना काही चालू असायचं. काही वर्षांनंतर ‘पुणे फेस्टिवल’ सुरु झाला आणि ह्या कार्यक्रमांत भरच पडली. पुण्यातल्या गणपती उत्सवाने असंख्य कार्यकर्ते, नेते घडवले. कित्येक कलाकारांना लोकांनी डोक्यावर घेतलं.
मला विशेष आठवणारा एक कार्यक्रम म्हणजे मल्लिका साराभाईंच्या नृत्याचा. एक पांढरा पडदा स्टेजवर आडवा टाकून त्यावर त्यांनी नृत्य केलं. नृत्य करताना अधूनमधून त्या हातातले रंग पडद्यावर टाकत होत्या. शेवटी जेंव्हा पडदा उभा केला तेंव्हा आम्ही सगळे चक्रावून पहात होतो की त्यांनी नृत्य आणि रंग ह्या मिलाफातून पडद्यावर गणपती चितारला होता !!
असेच लक्षात राहणारे कार्यक्रम झाले ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’ गणपतीच्या शताब्दीपूर्तीवेळी. दहा दिवस रोज शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत्या आणि त्याही विनामूल्य. सारसबागेजवळच्या मैदानात प्रचंड मोठा मांडव टाकला गेला होता. एका रात्री पं. हरिप्रसाद चौरसिया ह्यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम होता. ‘जा तो से नहीं बोलू कन्हैया’ – हरिजींचा प्रसिध्द ‘हंसध्वनी’ सुरु झाला आणि काही श्रोत्यांनी तालावर टाळ्या वाजवायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीत मनापासून आवडणारे आम्ही काही लोक इतरांना खुणा करू लागलो की प्लीज टाळ्या थांबवा. सगळा प्रकार अगदीच असह्य झाल्यावर हरिजी वाजवायचे थांबले आणि शांत आवाजात त्यांनी चक्क खडसावलं, “यहॉं मदारी का खेल नहीं चल रहा !!”. क्षणात सगळीकडे शांतता पसरली. त्यानंतर मात्र हरिजींनी श्रोत्यांना अगदी मनमुराद बासरी ऐकवून धुंद करून टाकले.
त्याच ठिकाणी दोन/तीन दिवसांनंतर कार्यक्रम होता स्व. उ. विलायत खॉंसाहेबांचा. रात्री ११ ते पहाटे जवळपास ४:३० पर्यंत खॉंसाहेब वाजवत होते. रात्री उशिरा आम्ही कॉलेजच्या मैत्रिणींना पटकन त्यांच्या घरी सोडायला गेलो. बाकीचे मित्रही घरी गेले आणि मी परत कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. आता मांडवात अगदी तुरळक लोक होते पण आम्ही सगळे जणू बेहोष झालो होतो. गायकी अंगाने वाजणाऱ्या सतारीचे सूर जास्त गोड होते की वाजवताना खॉंसाहेब मधूनच बंदिश गायचे ते जास्त मधाळ होतं हे ठरवताच येत नव्हतं. मी मांडवात मागच्या बाजूला उभा राहून ऐकत होतो. खॉंसाहेबांनी पहाटे “भैरवी” सुरु केली. काळजाचा ठाव घेणारी ती अजोड ‘भैरवी’ ऐकता-ऐकता डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. वादन संपल्यावर भानावर येऊन पाहिलं तर आजूबाजूचे लोकही त्याच अत्यानंदाच्या अनुभूतीने डोळे पुसत होते.
माझं भाग्यं मोठं म्हणून गणपती उत्सवात त्यादिवशी मी देवाची सतार अनुभवली.
-----------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी : गणेश चतुर्थी, २००७
-----------------------------------------------------------------------------
अप्रतिम
अप्रतिम वर्णन!
सगळे साक्षात नजरेसमोर उभे राहिले!
असन्ख्य आठवणी जाग्या झाल्या!
आम्ही आता हा उत्सव चुकवतोच आहोत पण आमची पुढची पिढी देखिल चुकवत आहे! दुर्दैव त्यान्चे!
एनिवे.... जिथे आहोत तिथे साजरा करतोच ना!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
मस्त!!
मस्त!!
छान रे ! >>>
छान रे !
>>> माझं भाग्यं मोठं म्हणून गणपती उत्सवात त्यादिवशी मी देवाची सतार अनुभवली.
वा !!
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
संदीप्.....अर
संदीप्.....अरे खूप खूप छान !! अगदी आठवणींच्या गावातून मस्त फिरवून आणलंस..... सगळं डोळ्यापुढे तरळून गेलं....... मनापासून आवडला तुझा लेख.
>>‘घालीन
>>‘घालीन लोटांगण…’ पर्यंत अंगात एक छान ताल भिनायचा. ‘त्वमेव माता च, पिता त्वमेव..’ काय छान ओळी आहेत ना?
अगदी अगदी. nostalgic का काय ते केलंस बघ. खूप छान.
>>ढडाढाण…टड
>>ढडाढाण…टडाढाण
आवाज घुमला कानांत..
मस्तच लिहीले आहे!
मस्तच.
मस्तच. माझ्या माहेरी अगदी जोरात असतो गणपती. वर्षातला सगळ्यात मोठ्ठा सण असतो आमच्याकडे. इथल्या मुलांना समजणं कठीण आहे. मी एकदा मुलगा लहान असताना अनंतचतुर्दशीला पुण्याला नेल होतं मुद्दाम.
मस्तच.
मस्तच.
छानच
छानच संदिप..
मुंबईत (जुनी मुंबई - जिथे प्रवासी रीक्षा नाही..) आम्ही सायकली वरून रात्र रात्र फिरायचो.
नरे पार्क, तेजूकाया मेंन्शन, गणेश गल्ली, लालबागचा राजा, रंगारी बदक चाळ, चिंच्पोकळी, करी रोड, संत गाडगे महाराज चौक, सगळ्या खेतवाड्या आणि असे बरेच बरेच गणपती, देखावे.. मन तृप्त व्हायचं नाही. आमच्या केशवजी नाईक चाळीतल्या गणपतीला इतिहास असल्याने प्रसिद्धि खूप आहे उत्सवाला.
उत्सवात स्पर्धा, सहस्त्रावर्तन (मसाला दूध आणि खिचडी), ब्राह्मण सभेमधले कार्यक्रम.. सगळं आठवलं की वाटतं खूप समृद्ध गेलं आपलं बालपणं..
विसर्जनाच्या मिरवणुकीत मुंबईत एक तर कच्ची असते (ढोल, पिपाणी) किंवा लेझीम किंवा मग नाशिक बाजा.. बरीच लेझिम पथक ही राजगुरुनगर, पुणे इथून आलेली. धुंदी असते वातावरणात. लालबागचा राजा जेव्हा आमच्या गिरगाव रोडला येतो तेव्हा साधरण रात्रीचा एक दीड वाजलेला असतो पण मुंगी शिरायलाही जागा नसते रस्त्यावर आणि फूटाफूटांवर हार गणपतीला. लोकांच प्रेम आणि श्रद्धा पाहून अगदी भरून येतं.
तुझा लेख वाचताना पुन्हा त्या सगळयातून फिरून येता आलं मनाने..
संदीप, खरच
संदीप, खरच खुप छान लिहिलं आहे. घरचा (माहेरी गौरी-गणपती जोरात असतात पुण्याला)आणि पुण्यातला गणेशोत्सव फारच आठवतोय. तुझं लेखन वाचून बर्याच आठवणी ताज्या झाल्या.थोडं बरं वाटलं, आणि सगळ्या आठवणी येऊन जरा मन जड पण झालं.
येस येस
येस येस बरोबर. येई हो विठठल ला तो येइ हो... जो कोणी ज्यास्त धरतो त्याच्यकडे आम्ही पोर एकदम कौतकाने बघायचो. नंतर निढळावरी कर् .... ला तो 'र' ओढून धरायचा. आरतीला चक्क ३ वर्षाचे कारट्यापासून ते ७० वर्षाचे आजोबा असत अगदी शेवटच्या घराची आरती होईपर्यन्त.(बहीणीची मुलगी चार वर्षाची पहिल्यांद्दा देशात गेली गणपतीत इतकी लोक घरी बघून नुसती रडायची. आरती सुरु झाली की आवाजाने घाबरायची. तीचे घाबरून रडणे पाहून आम्हालाच वाईट वाटायचे)
आमचा सारस्वत कॉलनीत तर जाम मजा. खरोखर आरतीची जी मजा आम्ही लहानपणी मुंबईला असताना अनुभवली ती इथे नाही. जवळजवळ प्रत्येक घरात अर्धा ते पाऊण तास १२ -१३ आरत्या चालायच्या. नंतर रात्रीचे सगळे गणपती बघायचे. कुठे गोड शीरा तर कुठे गोड शेवया तर पंजाबी चौकात हमखास मिळणारी शेवेची बर्फी प्रसाद म्हणून खूप छान लागायची. आणखी काही प्रसाद खात खात तोंड चालवत ३ -४ ला पहाटे घरी परत नी शाळेला दांडी मारण्याचे सगळी कारणे सकाळी शोधत. त्याआधी कित्येक वेळ सकाळी उठून घरच्या गणपतीला मनापासून प्रार्थना केली आहे मी की आईचे मन वळूदे नी शाळेत नको पाठवूदे.
मग घरात सगळे cousins मिळून गोंधळ. गणपतीसमोर्र शोभेला ठेवलेल्या खव्याच्या मोदकांचा सारखा बकाणा,कीचनमधून येणारा सर्व पदार्थांचा सुंगध. पप्पाची चालणारी पहाटे पूजा कारण ऑफीसला सर्व दीवशी सुट्टी नसायची. त्यात येणारे काका,मामा,मामी,इतर पाहूण्यांची रांग....
संदीप मस्त आठवण लिहिलीस....
लेख
लेख अप्रतिम.....................................
"वाड्यात आल्यावर बाप्पांच्या रिकाम्या मखराकडे पाहताना कससंच व्हायचं. आता भारतातून चार-सहा महिन्यांसाठी आलेले वडिलधारे परत गेले की त्यांना एअरपोर्टवर सोडून घरी आल्यावर त्यांची रिकामी खोली पाहताना तसंच वाटतं." ............... खर आहे.............!!!
संदीप,
संदीप, अगदी आठवणी जागविल्यास रे..
विसर्जन करून आल्यानंतरची सुनी आरास अगदी बघवायची नाही. नदीत गणपती नेल्यानंतर तिथली वाळू प्रतीगणपती म्हणून घरी आणायचो, मग त्या वाळूची आराशीत ठेऊन शेवटची आरती. अगदी दाटून यायचं. खुप लहान असताना चक्क रडायचोही..
आता तेवढं वाईट वाटत नाही, याचं फार वाईट वाटतं. आताही दरवर्षि नेमाने गणपती घरी येतो. पण सकाळी कसंबसं आवरून आरती करून सगळे कामाला निघतात, ते बाप्पाला एकटा घरात टाकून. दगड झालोय आताशा. ती बाप्पाच्या बदल्यात आणलेली नदीतली वाळू तरी थोडी मऊ असेल आपल्यापेक्षा, असे वाटते..
..ओम यज्ञेन यज्ञमयजंता देवा...
आपल्यासारखे पवित्र आपणच, असं वाटायचं हे म्हणताना. आरती झाल्यावर लाल टिळा लावून घ्यायची स्पर्धा लागायची..
संदीप..
संदीप.. अप्रतिम लिहिलयस... जमून आलय.....
अगदी नॉस्टॅल्जिक... खरच ...पुन्हा एकदा.. अलका च्या चौकातून आपण गणेशोत्सव अन मिरवणूक अनुभवतोय असं वाटलं...
खरच खुप
खरच खुप सुन्दर पन आता ते सगल फार बद्लल्य अस वाट्त.
संदिप,
संदिप,
सुरेख रे. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.
- अनिलभाई
संदीप, फार
संदीप, फार छान लिहिलं आहेस.
संदीप, हे
संदीप, हे वाचलच नव्हतं. फारच सुरेख लिहिलं आहेस.
वर्गणीसाठ
वर्गणीसाठी सगळीकडे विनासंकोच फिरणं असायचं >>> अगदी
खूप छान वाटले वाचुन. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मस्तच लेख.
होमसिक,
होमसिक, नॉस्टॅल्जिक सगळं एकदम झालो हे वाचून, काय मस्त लिहीलं आहे! जवळजवळ दर वर्षी एकदा दहा दिवसांत व एकदा मिरवणूक बघायला जायचो तेव्हाची बरीच दृष्ये एकामागून एक आठवली!
हिराबाग, खडकमाळ आळी, बाबू गेनू चौक, जिलब्या मारूती, हत्ती गणपती, मानाचे पहिले पाच, मंडई व दगडूशेठ, खजिना विहीर बर्याच दिवसांत बघितले नाहीत.
जायला पाहिजे पुन्हा एकदा हे सगळे बघायला - रात्री ९-१० वाजता कुंभारवाड्यापासून सुरूवात करून सोमवार पेठ, अपोलो चा परिसर, रास्ता पेठ असे करत लक्ष्मी रोड वरून मग तिकडे हिराबाग, खडकमाळ आळी असे करत पहाटेच्या सुमारास मंडई व श्रीमंत दगडूशेठ हलवाई... मधे वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य पदार्थ खात व चहा पीत.
धन्स
धन्स मायबोलीकरांनो,
मलाही असं वाटतंय की एका वर्षी परत एकदा खास गणपतीसाठी पुण्याला जाऊन यावं