लेखक : चिंतामण त्र्यंबक खानोलकर
प्रकाशक : मौज प्रकाशन
किंमत : रुपये १३३/- फ़क्त
साधारण कॉलेजच्या दुसर्या वर्षाला असताना वाचली होती ही कादंबरी.
'चिंतामण त्र्यंबक खानोलकर' हे नाव तसे अनोळखीच होते माझ्यासाठी. त्यांची सर्वात प्रथम वाचलेली कादंबरी म्हणजे 'अजगर'. या कादंबरीवर अगदी आचार्य अत्र्यांनीही खरपुर टीका केली होती असे ऐकुन आहे. पण 'अजगर' मुळेच मी चिं.त्र्यं. च्या प्रेमात पडलो. त्यानंतर साहजिकच 'रात्र काळी घागर काळी' वाचनात आले. मग चिं.त्र्यं. वाचण्याचा सपाटाच लावला आणि मग वाचता वाचता, चिं.त्र्यं. ना शोधता शोधता कुठल्यातरी एका क्षणी समजले की हा माणूस आपल्याला अनोळखी नाहीये. कारण चिं.त्र्यं. ना ओळखत नसलो तरी 'आरती प्रभूंनी' कधीच माझ्या मनावर गारुड केलेले होते.
ये रे घना, ये रे घना
न्हावूं घाल, माझ्या मना ... या गीताने कधीच वेड लावलेले होते.
नाही कशी म्हणु तुला, तो एक राजपुत्र (चानी), लव लव करी पात (निवडुंग), कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे (सामना) ही आणि अशी अप्रतिम गीते लिहीणार्या 'आरती प्रभूंचेच' नाव चिंतामण त्र्यंबक खानोलकर आहे हे समजल्यावर आनंदाश्चर्याचा धक्काच बसला होता. लहानपणापासून कवितेत आकंठ बुडालेला हा माणूस ' रात्र काळी घागर काळी' सारखी अफाट कादंबरी लिहीतो आणि आपल्याला ते माहीतही नसावे याबद्दल स्वतःचाच प्रचंड राग आला होता त्या वेळी.
आता थोडेसे "रात्र काळी घागर काळी" बद्दल...
खरेतर या कादंबरीचे परिक्षण लिहीणे मला या जन्मीतरी शक्य होणार नाही. या कादंबरीचा, कथेचा आवाका प्रचंड आहे आणि तो पेलण्याइतकी माझी कुवत नाही. पण तरीही मला जे जाणवलं ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणलं तर ही एका दुर्दैवी स्त्रीची शोकांतिका आहे. म्हटलं तर हे अगम्य अशा स्त्रीस्वभावाचे चित्रण आहे. म्हणलं तर नियतीच्या विलक्षण खेळाची कहाणी आहे. प्राक्तनाने एकाच व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या दोन विलक्षण स्त्रीयांची ही गोष्ट आहे. सर्व सामान्याला अप्राप्य असं दैवी सौंदर्य सहजगत्या पदरात पडूनही त्याचं तेज सहन न झाल्याने स्वतःच राख होणार्या एका दुर्दैवी जिवाची ही कथा आहे.
तसं पाहायला गेलं तर 'यज्ञेश्वरबाबांची' दैवी सौंदर्य लाभलेली कन्या 'लक्ष्मी' ही या कथेची नायिका आहे. या कथेत आणखी एक तितकेच महत्वाचे पात्र आहे ते म्हणजे 'जाई' , लक्ष्मीपासून दुर जावू पाहणारा तिचा पती 'दिगंबर' जिच्यात गुंतलाय ती 'जाई' गावातल्या एका भाविणीची मुलगी ! तसं बघायला गेलं तर कथेत या दोन रुढार्थाने नसल्या तरी नियतीने एकमेकीच्या सवती बनवलेल्या स्त्रीयांच्या परस्परांतर्गत संघर्षाची कहाणी यायला हवी. पण इथे पुन्हा लक्ष्मीच नायिकेबरोबर, प्रतिनायिकाही बनते. आपली पत्नी गेल्यावरही अतिशय सौम्यपणे' "नशिबवान होती, सवाष्णपणाने गेली" इतकी निर्विकार आणि विरक्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे यज्ञेश्वरबाबा आपली लेक समोर आली की मात्र त्यांच्या विरक्त डोळ्यात आईची वत्सलता दाटते.
उच्च आणि रौद्र स्वरात लागलेला दिगंबराचा 'रुद्र' ऐकून यज्ञेश्वरबाबा कमालीचे प्रभावीत होतात आणि दिगंबराचा काका 'दास्या' याच्याकडे दिगंबराला आपली मुलगी देण्याची इच्छा व्यक्त करतात. 'दास्या'ला ती अतिशय आनंदाची, अभिमानाची गोष्ट वाटते. प्रत्यक्ष यज्ञेश्वरबाबांसारख्या तेजपुंज व्यक्तीची देखणी कन्या आपल्या घरात सुन म्हणून येणार ही कल्पनाच त्याला विलक्षण सुखावून जाते. पण लक्ष्मीचे सुन म्हणून त्या घरात येणे त्याच्या आयुष्यात किती मोठी उलथापालथ करणार आहे याची त्याला कल्पनाच नाही. इथे 'दास्या' हा एक पराभुत, कायम दुसर्यावर अवलंबून असलेल्या एका लाचार, असहाय्य आणि मानसिकदृष्ट्या पंगु मनोवृत्तीचं प्रतिक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या जिवलग मित्रावर 'अच्युत'वर अवलंबून असणारा 'दास्या' हे ही एक विचित्र च्यक्तीमत्व आहे. प्रत्येक कामासाठी त्याला अच्युतचा आधार लागतो, तरीही संधी मिळताच अच्युतच्या निपुत्रिक असण्यावर टोमणे मारायला तो कमी करत नाही. पुढे जेव्हा लक्ष्मी आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी अच्युतकडे द्यायचे ठरवते तेव्हा सर्वस्वी अच्युतवर अवलंबून असणारा दास्या 'माझा नातु वांझेच्या वाईट सावलीत वाढायला नको' असे म्हणून अच्युतच्या दुर्दैवी पत्नीची अवहेलना करतो. यामुळे दुखावला जावूनही त्याला दुर न सारणारा 'अच्युत' जेव्हा 'दास्या तरी काय, लहान मुलच आहे माझ्यावर अवलंबुन असलेलं' असं म्हणतो तेव्हा नकळत तो आहे त्यापेक्षा खुप मोठा बनत जातो. स्वतःला मुल नसलेल्या अच्युतचं मित्रप्रेम, दिगंबरावर केलेली निर्व्याज माया, दास्याच्या त्याच्यासारख्याच अर्धवट मुलाला 'वामन'ला अच्युतने लावलेला जिव या सगळ्याच गोष्टी अतर्क्य अशा मानवी स्वभावाचे सुरेख उदाहरण म्हणून आपल्या समोर येत जातात.
आपल्या कथेची नायिका, यज्ञेश्वरबाबांची सौंदर्यवती कन्या 'लक्ष्मी' हा 'रात्र काळी.....' चा मुळ कणा आहे. एका विरक्तीकडे वळलेल्या संन्यस्त गृहस्थाच्या घरात जन्माला आलेली ही लोकविलक्षण, अद्वितीय म्हणता येइल असे सौंदर्य लाभलेली निरागस आणि निष्पाप मुलगी. बाबांच्या इच्छेखातर, किंबहुना त्यांच्या डोळ्यातली वात्सल्याची भावना टिकवण्याखातर ती त्यांनीच ठरवलेल्या दिगंबरशी लग्न करते. पण अगदी उच्च स्वरात, खणखणीतपणे तेजस्वी रुद्र म्हणणारा दिगंबर मानसिकरित्या अगदीच दुर्बळ निघतो. तिच्या दैवी सौंदर्याचीच त्याला भिती वाटायला लागते. एवढं अफाट सौंदर्य लाभलेली स्त्री शुद्ध असुच-राहुच शकत नाही असा विचित्र गैरसमज त्याच्या या न्युनगंडातून जन्माला येतो. या न्युनगंडामुळे दिगंबर तिच्या सौंदर्याला भुलत नाही पण घाबरतो जरूर. पण त्याच्या "तू शुद्ध आहेस का?" या प्रश्नाने मनोमन प्रचंड दुखावली गेलेली लक्ष्मी जेव्हा त्याच्यातल्या पुरुषाला डिवचते तेव्हा चवताळून तो तिच्यावर लाक्षणिक अर्थाने बलात्कार करतो आणि " चुकार बीज पेरलं जातं ". पण जेव्हा ती फणा काढून उभी राहते तेव्हा मात्र तो गलितगात्र होवून पळुन जातो. " हे शंभर नंबरी सोनं नव्हेच " असं त्याला वाटतं आणि तो जाईकडे (भाविणीच्या मुलीकडे) वळतो. त्यामुळे लक्ष्मी मुळातूनच कापल्यासारखी होते. जे सुख पत्नी (एका ऋषितुल्य व्यक्तीची पोर असूनही) म्हणून तिला नाकारलं गेलं तेच सुख एका भाविणीच्या पोरीला विनासायास मिळालं याची चीड तिच्या मनात कायम राहते. अर्थात मनाने कमजोर असलेला दिगंबर जाईकडेही टिकु शकत नाही. ऐन वेळी अच्युतने त्याला जाईबरोबर पकडल्यानंतर तो घर सोडून पळूनच जातो. लक्ष्मीचं सौंदर्य मात्र नेहमीच लोकांना तिच्याकडे आकर्षित करत राहतं. यातुन दिगंबरचा मानलेला काका ’अच्युतही’ सुटलेला नाहीये. अच्युतच काय पण तिचा सासरा ’दास्या’देखील तिच्या मोहात पडतो. पण मुळातच मनाने पंगू असलेला दास्या, त्याच्यात तीही हिंमत नाही. तो आपली वासना केवळ लक्ष्मीच्या साडीच्या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न करतो. कादंबरीतला हा प्रसंग तर विलक्षणच आहे. चिं.त्र्य. अगदी साध्या शब्दात पण अतिशय प्रभावीपणे दास्याच्या मनाची ती उलाघाल शब्दबद्ध करतात. पण हे पाहून लक्ष्मी मात्र दुखावली जाते. तिच्यातली बंडखोर, मानी स्त्री दास्याचं घर सोडून दुसर्याच एका व्यक्तीचा आसरा घेते.
चिं.त्र्यं.ची सगळीच पात्रं विलक्षण आहेत या कथेतली. एका दर्शनात 'लक्ष्मीसाठी' वेडे झालेले 'केमळेकर' वकील तिला आपल्या घरात आश्रय देतात. सर्व सुख-सोयी पुरवतात. अगदी 'दास्या'च्या घरासमोरच तिला एक टुमदार घरही बांधून देतात. पण जिच्यासाठी एवढं सगळं केलं ती लक्ष्मा सहजसाध्य असतानाही तिच्या दैवी सौंदर्याला स्पर्शही करण्याची त्यांची हिंमत होत नाही. लक्ष्मीचं सौंदर्य दैवी असलं तरी तिच्या स्वत:साठी मात्र ते अशा रितीने शापित बनत जातं. केमळेकरांच्या सांगण्यावरुन तिला वाणसामानाचा पुरवठा करणारा गावातला वाणी ’दाजी’ देखील लक्ष्मीकडे आकर्षित झालेला आहे. पुरुषसुखाला वंचीत झालेली ’लक्ष्मी’ या दाजीला देखील जवळ करण्याचा प्रयत्न करते. पण तिच्या शापित सौंदर्याला स्पर्श करण्याचे धाडस दाजीतही नाहीये. तो फ़क्त दुरुनच लक्ष्मीला पाहण्यातच आपले समाधान मानतो.
लक्ष्मीचं पात्र म्हणजे एक प्रचंड गुंतागुंत आहे. मानवी मनाच्या अगम्य गुंत्याचं, अवस्थांचं एक विलक्षण प्रतीक आहे लक्ष्मी. जिच्यामुळे आपला नवरा आपल्यापासून दुर गेला त्या ’जाई’ला मात्र तिचा दिगंबरपासून राहीलेला गर्भ आपोआपच जिरून गेलाय हे कळाल्यावरही ती जाईला जवळ करतेय. आपल्या मुलाला ’सदाला’ ती जाईच्या मायेत वाढवते. इथेच कथेत अजुन एका पात्राचा प्रवेश होतो. अच्युतकाका एक दिवस त्याला नदीकाठी सापडलेली एक तान्ही पोर घेवून लक्ष्मीकडे येतो आणि तिला सांभाळण्याची विनंती करतो. लक्ष्मी त्या बेवारस मुलीला सांभाळते, तिला ’बकुळ’ हे नाव देते. इथे मात्र ती अच्युतच्या सांगण्यावरून बकुळला आपल्या एका अनामिक मैत्रीणीची मुलगी म्हणून वाढवते. पण केमळेकरांनी दिलेले ते घर तिला शापित वाटत असते, आपला मुलगा ’सदा’ इथे वाढायला नको म्हणून ती त्याला अच्युतकडे देते. "वांझेची अपवित्र सावली माझ्या नातवावर नको’ या आपल्याच मित्राच्या वाक्याने हादरलेला अच्युत मग लक्ष्मीची समजुत काढुन सदाला दास्याच्या घरीच ठेवायला तिच्या मनाची तयारी करतो. स्वत: जातीने सदाचा सांभाळ करायचे वचन तो लक्ष्मीला देतो. इथे नकळत ’दास्याला तरी काय मीच सांभाळतोय ना’ हे त्याचे वाक्य त्याच्या मनाच्या मोठेपणाला अजुन उजाळा देते.
पुढे मोठा झाल्यावर आजोबाच्या घरी वाढलेला सदा नकळत बकुळवर प्रेम करायला लागतो. बकुळही त्याच्या प्रेमात पडते. पण हे लक्षात आल्यावर मात्र ’लक्ष्मी’ मनोमन हादरते. कारण सदाबरोबरच तीने बकुळलाही आपले दुध पाजून वाढवलेले आहे. त्या दोघांना एकमेकांपासुन दुर करण्यासाठी ती ’बकुळ’ला खोटेच सांगते की बकुळ ’जाईची’ म्हणजे एका भाविणीची मुलगी आहे. या बातमीने अंतर्बाह्य कोसळलेल्या बकुळचे लग्न ती दास्याच्या अर्धवट मुलाबरोबर वामन्याबरोबर लावून देते. वर पुन्हा सदा आणि बकुळ एकमेकांसोबत येवु नयेत म्हणून ती अर्धवट वामन्याला एक मंत्र देते....
"दाजी येइल अधुन मधुन बकूळकडे, त्याला अडवु नको"
कधी अतिशय प्रेमळ, तर कधी विषयोत्सुक. कधी चाणाक्ष तर कधी धुर्त, कधी विलक्षण करारी तर कधी कमालीची हळवी अशी लक्ष्मी प्रत्येक वेळी वाचकाला कोड्यात पाडत राहते एवढे मात्र नक्की. पुढे काय होते? सदा आणि लक्ष्मीच्या नात्याचे काय होते? सदा आणि बकूळचे काय होते? गायब झालेला दिगंबर त्याचे पुढे काय झाले? मुळात लक्ष्मीच्या आयुष्यात अजुन काय उलाढाली, दिव्ये लिहीलेल्या आहेत. या सर्व गोष्टी पुस्तकात वाचण्यातच गोडी आहे.
कादंबरी लिहिताना कोकणातले जे पुरातन, सनातन गूढ वातावरण खानोलकरांनी निर्मीले आहे की वाचताना आपण मनोमन चिं. त्र्यं. ना मनमो़कळी दाद देवुन जातो. त्यांनी वर्णनात्मक शैलीचा अवलंब केल्याने कादंबरी प्रवाही झाली आहे. इतकी प्रवाही की बरेचदा ती वाचणार्याला स्वत:बरोबर फरफ़टत नेते. जेव्हा कादंबरी संपते तेव्हा मनासकट बरच काही सुन्न होतं. संवेदना या शब्दाची फोड कशी होते ठाऊक नाही पण सह-वेदना काय असू शकते याचा प्रत्यय येतो.अगम्य, अतर्क्य अशा मनाच्या काळोख्या डोहात लपलेल्या अनेक वादळांची, उद्रेकांची कहाणी म्हणजे ’रात्र काळी घागर काळी’ !
एकदातरी वाचायलाच हवी आणि संग्रहात तर हवीच हवी.
चिं.त्र्यं.खानोलकरांचे चे इतर गद्य लेखन...
अजगर (कादंबरी, १९६५)
अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
अभोगी (नाटक)
अवध्य (नाटक, १९७२)
आपुले मरण
एक शून्य बाजीराव (नाटक, १९६६)
कालाय तस्मै नमः (नाटक, १९७२)
कोंडुरा (कादंबरी, १९६६)
गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
रखेली (नाटक)
राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
श्रीमंत पतीची राणी (नाटक)
सगेसोयरे (नाटक, १९६७)
सनई (कथा संग्रह, १९६४)
विशाल कुलकर्णी
विशाल, मस्त आढावा फक्त
विशाल,
मस्त आढावा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त ह्याला पुस्तक परीक्षण असे न म्हणता "पुस्तक परीचय" म्हणणे जास्त समर्पक होईल कारण परीक्षणात पुस्तकातल्या कमतरतांचाही विचार केला जातो.
मान्य विदीपा, बदल केलाय
मान्य विदीपा, बदल केलाय
धन्यवाद !
इतकी प्रवाही की बरेचदा ती
इतकी प्रवाही की बरेचदा ती वाचणार्याला स्वत:बरोबर फरफ़टत नेते. >>>> अगदी अगदी....
इंट्रेस्टिंग.
इंट्रेस्टिंग.
एकदातरी वाचायलाच हवी आणि
एकदातरी वाचायलाच हवी आणि संग्रहात तर हवीच हवी.>>>>>>> नक्कीच आणणार नी वाचणार
मस्त लिहिलय विशाल.
रैना + १
रैना + १
विशाल, छान पुस्तक परिचय करून
विशाल, छान पुस्तक परिचय करून दिलाय. वाचण्याची उत्सुकता लागलेय.
मस्त रे भौ. बघतो मिळते का
मस्त रे भौ. बघतो मिळते का ऑनलाईन.
सुरेख कोकणातल्या एका छोट्या
सुरेख
कोकणातल्या एका छोट्या गावात हॉटेल चालवणारा माणुस आपले चंबुगबाळे आवरुन मुंबैत येतो काय!
आणि आपल्या छोट्याश्या आयुष्यात आणि अत्यंत गरिबीत असे जबरदस्त साहित्य लिहितो काय!
खानोलकरांच्या लिखाणात , कवितेत जागोजागी असा गुढ भाव आणि अलंकार इतक्या सहजतेने प्रकट होतात. क्या बात है!
परदेशात राहुन सतत हुरहुर रहाते हे नक्षत्रांचे देणे पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहोचणार.
परदेशातच कशाला आपल्याच देशात नव्या पिढीला हे लिखाण समजत नाही कारण गोष्ट ऐकली तरी
ते भाव त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. श्याम बेनेगलनी डायरेक्ट केलेला कोंडुरा काही महिन्यापुर्वी परत पाहिला, माझ्या बहिणीच्या मुलाला (वय वर्षे १८) ही सर्व पात्रे मुर्ख वाटतात आणि मला हे खटकते कारण त्यांनी त्याकाळचे कोकण अनुभवले नाही त्यांना हे कळणे कठीण.
समईच्या शुभ्र कळया आज परत ऐकिन. नशीबाने खानोलकरांच्या कविता समजल्या नाहित तरी ऐकायला सर्वांनाच आवडतात.
सुंदर परिचय!
सुंदर परिचय!
विशाल, छान परिचय करुन दिलास.
विशाल, छान परिचय करुन दिलास. वाचणारच.
संग्रहात तर हवीच हवी. >>
संग्रहात तर हवीच हवी. >> अगदी. त्यांच्या गद्य लिखानात कोंडुरा नंतर मला रात्र काळी फार आवडते.
अगम्य, अतर्क्य अशा मनाच्या
अगम्य, अतर्क्य अशा मनाच्या काळोख्या डोहात लपलेल्या अनेक वादळांची, उद्रेकांची कहाणी म्हणजे ’रात्र काळी घागर काळी’ ! >> अगदी समर्पक! क्या बात है!
तुम्ही शापित सौंदर्याचा उल्लेख केलाय. खानोलकरांच्या प्रत्येक कृतीमध्ये ते पदोपदी जाणवतच राहतं. कदाचित ते स्वत:ही तसेच होते असं म्हणता येईल. सरोवरातल्या पाण्यावर चंद्राचं सुरेख प्रतिबिंब असावं आणि पकडायला जावं तर ते आपल्याच कल्लोळामुळे लाटांवर नाहीसं व्हावं असं मला त्यांच्या अशा व्यक्तिरेखांकडे बघताना नेहमी वाटतं. हातात येईल येईल असं वाटता वाटता काहीतरी अतर्क्य, गूढ घडून निसटून जातात. त्यामुळेच ती परत परत वाचताना खूप मजा येते. असो, हे थोडं अवांतर झालं असेल तर क्षमा करा, पण खानोलकर म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय.
'रात्र काळी' सुद्धा याचसाठी मला सर्वात जास्त भावतं.
सगळ्यांचे मनापासून आभार
सगळ्यांचे मनापासून आभार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भास्कराचार्य तुमचे खास
मस्त परिचय केला आहेस! नियती
मस्त परिचय केला आहेस!
नियती आणि नियतीशरणता, शरीरवासना आणि तिचा जन्माशी असलेला अपरिहार्य संबंध, एकाचवेळा कणखर आणि तरीही व्हल्नरेबल स्त्री, गोंधळलेला, दुर्बल पुरुष हा चिंत्र्यंच्या अनेक लेखनातील पॅटर्न. त्याची मुळे व्यक्ती म्हणून कशात असतील ते तेच जाणोत.
एकाचवेळा गोनिदा, पेंडसे आणि चिंत्र्य अशा टोकाच्या शैलींनां सामावणारी कोकणाची पार्श्वभूमी अद्वितीय आहे!
रात्र काळी... किती वेळा वाचली
रात्र काळी...
किती वेळा वाचली तरी नव्यानं झपाटणारी.
यज्ञेश्वरबाबा, लक्ष्मी, दास्या, केमळेकर, दाजी... कादंबरीतलं प्रत्येक पात्रच या ना त्या अर्थानं 'शापित'.
ती पडवी, जाईची खोली....अगदी तो रोज दिवेलागणीला गावात फिरुन खांबावरचे तेलाचे दिवे लावणारा 'उंचबाबा' देखील शापितच !
काय जबरदस्त लिखाण, वातावरण निर्मिती... माझी आवडती कादंबरी !
प्रत्येक पात्र आजूबाजूच्या निसर्गातून, वातावरणातून, त्याच्या माणसाच्या मनावर होणार-या परिणामातून जन्माला आलंय असं वाटावं इतकी मानवी स्वभावाची रुपं आहेत या कादंबरीत.
ह्यावर मला एकदा लेख लिहायचाय गेली अनेक वर्ष.. .पण खानोलकर, दळवी, पेंडसे यांच्या लिखाणातून दिसणारं कोकण हे मला कधीच सुंदर, निसर्गरम्य, हिरवगार वाटलं नाही. त्या सुपिक मातीला, त्या समृद्धीला कायम सुपिकतेचा, समृद्धीचाच 'शाप' आहे असा मला वाटत आलंय.
बाहेरच्या जगाशी संपर्क नाही, संध्याकाळी दिवेलागण झाली की झपाटणा-या माडाच्या सावल्या, गर्द झाडी, साप्-जनावरं, घोंघावणारं वारं.... गावात घडणा-या प्रत्येक घटनेबाबात उलट्-सुलट चर्चा... आणि मनात कायम स्वप्न आणि सत्य यात चाललेला झगडा...माणसाच्या मनात विकृत वाटण्याइतके भलतेसलते विचार निर्माण करण्यात या निसर्गाचा, ह्या वातावरणाचा, त्या कुंद, पावसाळी हवेचा, दाटलेल्या आणि कोसळणा-या ढगांचा, माडीतून 'माणसं बोलताहेत" असा भास निर्माण करत वाहणा-या वा-याचा, त्या खोल्-गर्द काळ्या, अंधा-या विहिरींचा खूप वाटा आहे असं कायम मला वाटत आलंय - ह्या लेखकांच्या कादंब-या वाचताना !
ह्या अश्या वातावरणात आपण राहिलो तर आपणही कदाचित असाच विचार करायला लागू, ह्या माणसांसारखेच वागू - असा अनेकदा मला विचार करायला प्रवृत्त करणा-या, झपाटणा-या ज्या कथा, कादंब-या आहेत त्यातली एक म्हण्जे 'रात्र काळी...' !
खानोलकरांच्या एकूण कादंबरी लेखनात एक 'त्रिशंकु' मात्र जमली नाही आहे असं मला वाटतं.
अजगर, कोंडुरा बद्दल बोलावं तितकं कमी आहे. त्रास लेखन आहे सगळं.
कोंडुरा कादंबरी आणि चित्रपट हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. पण 'कोंडुरा' कादंबरी म्हणून आणि म्हणूनच मला जास्त आवडली... कारण 'कोंडुरा' हीच मुळात प्रत्येकानी वैयक्तीकरित्या, स्वतंत्रपणे अनुभवायची गोष्ट आहे. ती एक गुढ शक्ती आहे, आणि वाचताना आपण त्या गुढतेचा शोध घेत जातो, हिच 'कोंडुरा' च्या लिखाणातली खरी ताकद आहे.
खूप लिहिलं गेलं असेल आणि विषयांतर झालं असेल तर क्षमस्व.
वाह, सुंदर प्रतिसाद रार
वाह, सुंदर प्रतिसाद रार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजगर, कोंडुरा बद्दल बोलावं तितकं कमी आहे. त्रास लेखन आहे सगळं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोंडुरा कादंबरी आणि चित्रपट हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. पण मला 'कोंडुरा' कादंबरी म्हणून आणि म्हणूनच मला जास्त आवडली... कारण 'कोंडुरा' हीच मुळात प्रत्येकानी वैयक्तीकरित्या, स्वतंत्रपणे अनुभवायची गोष्ट आहे. ती एक गुढ शक्ती आहे, आणि वाचताना आपण त्या गुढतेचा शोध घेत जातो, हिच 'कोंडुरा' च्या लिखाणातली खरी ताकद आहे. >>>> प्रचंड सहमत
rar यांच्या पोस्टशी
rar यांच्या पोस्टशी बर्यापैकी सहमत. कोंडुरासारखी कलाकृती इतर (आणि मराठीसुद्धा) भाषिकांच्या लक्षात यावी, कोणीतरी त्या भाषांतराचं / रूपांतराचं शिवधनुष्य उचलावं असं मला नेहमी भाबडेपणाने वाटतं. पण ते तसं खूप कठीण आहे. त्या पहिल्या नुसत्या विवराचं वर्णन वाचताना गर्भगळित व्हायला होतं. अचाट आहे ते.
मला अजगर खूप घाईघाईने
मला अजगर खूप घाईघाईने वाचल्यामुळे त्यात थोडंसं काहीतरी कळायचं राहून गेलंय असं सारखं वाटत राहतं. आधीच खानोलकर वाचणं म्हणजे दोराच्या गुंतवळ्यातून एकेक दोर वेगळा करायचाय असं वाटतं. पण मला अजगर मध्ये पात्रं तितकीशी स्पष्ट दिसत नाहीत. कोणी त्यावरही लिहिल्यास मला वाचायला खूप आवडेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विकु या लेखाने खुप काही दिलस
विकु या लेखाने खुप काही दिलस मित्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१.खानोलकरांची ओळख करून दिलीस.२. इतका सुरेख अन सुटसुटीत परिचय करून दिलास की मै ये कादंबरी वाचनेपर मजबूर हो गयी
३. ती शेवटी दिलेली लिस्ट म्हणजे, अजून वाचायच्या राहिलेल्या पुस्तकांच्या यादीत भर घातलीस. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान परिचय..मला सुद्धा प्रचंड
छान परिचय..मला सुद्धा प्रचंड आवडली होती.. तू पेंडसेंच्या कादंबर्या वाचल्या आहेत का? नक्की वाच त्यांचे पण लिखाण असेच वेड लावते..
<<पण खानोलकर, दळवी, पेंडसे यांच्या लिखाणातून दिसणारं कोकण हे मला कधीच सुंदर, निसर्गरम्य, हिरवगार वाटलं नाही. त्या सुपिक मातीला, त्या समृद्धीला कायम सुपिकतेचा, समृद्धीचाच 'शाप' आहे असा मला वाटत आलंय.>> rar किती समर्पक...
लंपन, काही वाचल्या आहेत, जमेल
लंपन, काही वाचल्या आहेत, जमेल तशा मिळवून वाचेनच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मंडळी
कोंडुरासारखी कलाकृती इतर (आणि
कोंडुरासारखी कलाकृती इतर (आणि मराठीसुद्धा) भाषिकांच्या लक्षात यावी, कोणीतरी त्या भाषांतराचं / रूपांतराचं शिवधनुष्य उचलावं असं मला नेहमी भाबडेपणाने वाटतं.
>>
मला वाटते कोंडुरा वर श्याम बेनेगल की गोविन्द निहलानीनी हिन्दी चित्रपट (आर्ट फिल्म)काढला होता.
त्यातल्या परीक्षणात कोंडुरा धबधब्याची कादम्बरीतील भव्यता चित्रपटात पकडता आली नाही समीक्षकांचा आक्षेप आठवतोय . म्हातार्याच्या भूमेकेत अमरीश पुरी होते बहुधा...
कर्नाडानी कथेचे कानडीकरण केलेले दिसते (फिल्म हिन्दि होती)
http://www.imdb.com/title/tt0077818/
आजच वाचुन संपली. लेखातील
आजच वाचुन संपली. लेखातील वाक्यावाक्याला सहमत.
लक्ष्मी गारुड करुन राहीलीय मनावर.
अत्यंत अॅप्ट परीचय विशालदा
अत्यंत अॅप्ट परीचय विशालदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिं. त्र्यं. लक्षात रहायला त्यांचं असं गद्य वाचावं लागतं, आरती प्रभू नकळत्या वयातच माहित झाले होते. गेले द्यायचे राहून ही कविता आणि गाणे सुद्धा तू उल्लेखलेल्यांमध्ये समाविष्ट असायला हवी. त्यांच्या चाफा या लघू कादंबरीवर महाराष्ट्र कल्चरल सेंटर ने एक नाटक केलं होतं. ते सुद्धा छान आहे...
कोकणची पार्श्वभूमी, जुना रूढी परंपरांचा पगडा असलेला काळ, वेगवेगळी प्रतिकं वापरून मानवी मनाचा गुंता, स्वभाव, भावभावनांची मांडणी आणि कितीही तीव्र असलं तरिही ते दु:ख अगदी अलगद समोर मांडणार्या साहित्यिकांपैकी चिं.त्र्यं. एक आहेत असं मला वाटतं.
छान परिचय विशालजी. रारशी
छान परिचय विशालजी.
रारशी सहमत. त्रास लेखन.
पेंडसे, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. -या त्रासाची चढती भाजणी..