काव्य स्वयंवर... फ़िरंगी.. ’बहू’ढंगी..
आटपाट नगर होतं... (मला कुणी सांगेल का हे आटपाट काय असतं?)
आटपाट कसलं हो चांगलं थाटमाट नगर होत, म्हणजे आपला राणीचा देश हो. त्या नगरात होती एक राजकन्या (एकच?..अर्र..)
(एक अस्सल मायबोलीकर: आणि ऐकावं ते नवलच! राणीच्या राज्यात राज्यकन्या कुठे, दोन राजपुत्र आहेत..)
कशावरुन राज्यकन्या नाही आहे? राजघराण्यातला पुरूषांवर इतका विश्वास..? ते पण राणीच्या राज्यातल्या?
आहे म्हणतो ना... राजपुत्रांची मानस बहीण आहे... तुम्हाला काय माहित? उगा चौकशा.. तुम्हाला सांगतो राजघराण्यातले पुरूष लहान असताना मुलींना बहीणपण मानत असत, त्यातलीच ही एक (एकच?).
असो मुद्दा तो नाही आहे.. मुद्दा आहे की ती राजकन्या भारताच्या प्रेमात पडली आहे आणि भारतीयांच्या सुद्धा.
अरे हो लगेच राष्ट्रगीत चालू करु नका.. आयला सगळ्या उपवरांना आपण भारतीय असल्याची एवढी तीव्र जाणीव पहिल्यांदाच झाली आहे वाटतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिला भारताची संस्कृती, इकडची सुंदर मंदिरं (मंदिरा म्हणायचंय का हो ?), देवळातली सुबक शिल्पं(शिल्पा असेल हो), भारतीय खाद्य संस्कृतीही खूप आवडते. ती राजकन्या तिच्या ह्या प्रेमापोटी तडक भारतात येउन पोहचली आहे. अहो नुसती भारतात नाही तर महाराष्ट्रात पोहचली आहे.. आहात कुठे?
महाराष्ट्रात पोहोचताच तिच्या लक्षात आलं, की हे नुसतंच नावचं महाराष्ट्र नसून खर्या अर्थाने महा S राष्ट्र आहे. इथे पावलागणिक हवा बदलते, वारा बदलतो, माती बदलते, दगड बदलतात, माणसं बदलतात, भाषा बदलते, संस्कृती बदलते, खाणं बदलतं, पिणं बदलतं (ओ पिणं नाय बदलत, हां ) इतकच काय पण शिव्या सुद्धा बदलतात.
बिचार्या राजकन्येला मात्र काय करावं कळेना... तिला सगळेच चांगले वाटतात. अख्ख्या महाराष्ट्रानेच मोहिनी घातली.
( ओ... त्यात काय टेंशन घ्यायच? येवढ्या बदलत्या महाराष्ट्रात तिला नवरा पण बदलता येईल की.. आपला पण नंबर लागेल ना..)
तिला सांगितलं हो मी ..भाईंचं 'तुम्हाला कोण व्हाय़चय?' ते वाच ना..(कोण आपला मुंबईचा भाई.. तो म्हन्तो आपल्याला डॉन व्हायचंय)
अरे बंबईय्या भाई नाही रे आपले पु.ल.भाई..
तर मंडळी इथे सुरु होते एक आगळीवेगळी कहाणी..
कहाणी एका आगळ्या वेगळ्या स्वयंवराची.
तरुणाई म्हटलं की प्रेम आलं आणि प्रेम म्हंटल की काव्य.
ज्ञानोबा माऊलींपासून ते संत तुकाराम मग गदिमा, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, ग्रेस... ते अगदी संदिप खरें पर्यंत चालत आलेली ही काव्य पंरपरा वेग घेऊ लागली... जोम धरु लागली.
स्वयंवर म्हंटलं की लग्न आणि लग्न म्हंटलं की दोन परिवार. दोनच का? काका-काकी, मामा-मामी, आत्या, मावश्या कोण कोण कुठले नातेवाईक येतील याचा काही नेम नाही आणि ह्या कहाणीमधे तर प्रश्न दोन देशांचा आहे.
तर ह्या आगळ्या वेगळ्या सोह्ळ्याला अगत्य येण्याची कृपा करावी. गुण प्रदर्शन करावे( गुण उधळावेत) आणि शक्कल लढवावी ( अहो सरळ अक्कल पाजळावी म्हणाना..)
लग्न समारंभ आहे म्हणजे सगळं कसं अगदी रिती-भातीने व्हायला नको का?. प्रत्येक समारंभ हा टप्प्याटप्प्याने पार होतो.
समारंभाच्या रिती आणि विधी असे आहेत.
१)काव्यस्वयंवरातील प्रत्येक काव्य हे उत्स्फूर्त स्वरचित असायला हवे.
२)स्वयंवरातील प्रत्येक काव्य मराठी शैलीत हवे.
३)मराठी भाषेला अनुसरून कोणताही काव्यप्रकार चालेल.
उदा.
वन बॉटल टू ग्लास,
टिंबटिंब राव फ़स्ट क्लास..
हे जरी ईंग्लिश असलं तरी.. उखाणा हा मराठी काव्यप्रकार आहे, म्हणून असे काव्य ग्राह्य धरले जाईल.
४)काव्य स्वयंवरात जास्तीजास्त टप्पे टाकून आणि प्रत्येक टप्प्यात जास्तीत जास्त कविता रचून समारंभाची रंगत वाढवावी.
५)ह्या समारंभाची सांगता राजकुमारीच्या विवाहाने होईल.
समारंभाची सुरवात आम्ही प्रस्तावनेने करुन देऊ आणि सुरवातीच्या टप्प्यांची रुपरेषा ही काहीशी अशी असेल....
टप्पा क्र.१) तर मंडळीनो, राणीच्या राज्यातून राजकन्या भारतात पोहचली आहे. तिला आता काय वाटतंय? तिला जोडीदार कसा हवा आहे? स्त्रीसुलभ भीती तर तिच्या मनात आहेच आणि ह्या तिच्या भावनांना गुणगुणत सुरु होईल आपला पहिला टप्पा.
टप्पा क्र.२) काव्य स्वयंवरात निर्वाचित आणि नवोदित कवी आपली ओळख करुन देत आपल्या प्रादेशिक शैलीतल्या कवितांनी ह्या रुप सम्राज्ञीला कशी काय भुरळ घालतील ते पाहूच.
टप्पा क्र.३) मग देशातल्या मुलींचं म्हणजेच धरणीपुत्रींचं काय हो ? त्याचं मत ही आलच की.
टप्पा क्र.४) मग लग्नाचा विषय म्हणजे अगदी दूरच्या नातेवाईकाला मतदानाचा हक्क आहेच.
~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~
आमंत्रण पत्रिका
|| श्री मायबोली प्रसन्न ||
आमचे येथे श्री ऍडमिन कृपेकरून,
चि. सौ. कां. डायना २ हिचे स्वयंवर आयोजिले आहे.
विवाहाचा शुभमुहूर्त मायबोली पंचांगानुसार...
अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध १४, शके १९३० ह्या मंगल समयी तुम्हा सर्वांच्या साक्षीने,
सनई चौघड्यांच्या गजरात पार पडणार आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी अगत्य
येण्याची कृपा करून उभयतांस शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.
डायना २ च्या लग्नासाठी स्वागतोत्सुक...
समस्त मायबोली परिवार आणि आप्तेष्ट.
आमच्या आत्याच्या लग्नाला यायचं हं...
रॉड्रिक्स, पिटर, हेन्री ५ वा, एलिझाबेथ १० वी, चार्ल्स ८ वा ते ११ वा.
~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~
: विवाहस्थळ :
काव्य स्वयंवर (पद्य एस. टी. वाय.)
गणेश मंडळ पटांगण,
मायबोली गणेशोत्सव २००८,
मायबोली.कॉम
: प्रीती भोजन :
पाककला विभाग, T.T.Gh.(तुमच्या तुमच्या घरी )
मायबोली.कॉम
टीप : हळदी समारंभ, साखरपुडा व सर्व विधी विवाहस्थळीच होतील.
पुष्पगुच्छ व भेटवस्तू बहू आनंदे स्वीकारल्या जातील.
~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~~'~
चला तर मग... लागा टायपायला
तर ह्या काव्यकथेची प्रस्तावना काहीशी अशी आहे...
राणीच्या देशातुन आली सुंदर राजकुमारी
का पोरांनी लाळ गाळली पाहुन कांती गोरी
गोरी फ़िरली बघत रोजरोज नव्या गावच्या पोरां
का पोरांचा श्वास कोंडला पाहुनी तिचा तोरा?
पण पोरांना ठावुक नव्हते ती होती एक बिचारी
कधी फ़िरली एसीमधुनी कधी करुनी रि़क्षा
पण सांगा कुणी कसा होईना पास वर परीक्षा
कोकण, घाट, पठार, खानदेश, फ़िरली प्रांत चारी
तिला कळेना का लोकांनी प्रांत असे पाडावे
पण भाषेच्या अमृत स्पर्शी सर्व कसे जोडावे
प्रत्येक प्रांतामध्ये होती आपुलकीही न्यारी
राणीच्या देशातुन आली सुंदर राजकुमारी
का पोरांनी लाळ गाळली पाहुन कांती गोरी
(मुंबईकर: आयला कांती म्हणजे.. सरळ चमडी म्हणा ना..
नागपुरकर: अबे गोरी पोट्टी म्हण बे..
पुणेकर: दुग्धवर्णी ललना म्हणा ना राव.
बेळगावकर : पाप गाय की हो ती. गोरी गाय म्हणतो मी )
- डॅफोडील्स२३, सत्यजित_एम
>> (मुंबईकर:
>> (मुंबईकर: आयला कांती म्हणजे.. सरळ चमडी म्हणा ना..
>> नागपुरकर: अबे गोरी पोट्टी म्हण बे..
>> पुणेकर: दुग्धवर्णी ललना म्हणा ना राव.
>> बेळगावकर : पाप गाय की हो ती. गोरी गाय म्हणतो मी )
---------
भन्नाट कन्सेप्टलय ....
डायनाकुमा
डायनाकुमारी गाते:
नको प्यारिस चा फाकडू
नको इंग्लंड चा आखडू
गोर्या रंगाला विटले ह्या
नवरा मला हवा बस्स मेड इन इंडिया
निळे डोळे फसवे भारी
आज ही तर उद्या ती प्यारी
अंगठी मला पप्पी तिला अरे हट मेल्या
नवरा मला हवा बस्स मेड इन इंडिया
हृदयी
हृदयी प्रेमाचा गोफ बांधूनी अन् मनात घेऊनी पल्ल्वती आशा
लाडकी युवराज्ञी डायना पहा निघाली जावया दूर दूरच्या देशा
'येते हो' म्हणत निघण्यापूर्वी पडली साश्रूनयनी जेव्हा राणीच्या पाया
राणी होती ब्लडी मेरीचे घोट रिचवण्या दंग बकिंगहॅमच्या पायथ्या
वीस तासांचा प्रवास पहिला, जीव तिचा जरी सर्वथा शिणला
योगा, चिकन करी अन् ताजमहालाची ओढ भारी तिजला
होते माहित ऐकूनी तिजला कलकत्त्यातील टेरेसा अन् टॅगोर
तसेच होती ओळखीची बुद्धा आणिक गांधींची शिकवण थोर
अशी नवखी परि प्रज्ञावंत ललना आली जेव्हा सहार विमानतळा
शोधूनही कोणीच दिसेना पडावया तिजला तेथे प्रेमपूर्वक गळा
श्वास कोंडता अचानक अन् घामाने थबथबू लागता नकळत अवघे शरीर
झटकन आली हाती डिझायनर फेल्ट हॅट क्षणभराचाही न होता उशीर
तरीही आली प्रसन्नचित्ते सुहास्यवदने डायना सुखरुप विमानतळा बाहेर
चित्र पाहता पलिकडले तिला भासे रॉयल गार्डनमधे फुलली जणू कण्हेर
लिहा आता पुढे तिला काय चित्र दिसले ते!
LOL..
LOL.. !!!!!!!!!!!!!!
मैत्रेयी , चाफा लई भारी..
मुंबईकर,
मुंबईकर, पुणेकर, नागपुरकर आले, अगदी परराज्यातले बेळगावकर पण आले आणि औरंगाबादकर / लातुरकर यांचा उल्लेख पण नाही? त्रिवार निषेध!!!
असो ..भन्नाट कल्पना आहे ..
(पोवाडा
(पोवाडा स्टाईल)
अहो दिसला तिला तिचा ओळखीचा, पांढरी टोपीवाला हा हा हा हा..... जी जी जी जी
अहो दिसला तिला तिचा ओळखीचा, पांढरी टोपीवाला
लंडनची वारी केलेला पांडू डब्बेवाला ! हा हा हा हा जी जी जी जी
पाहुन त्या भोळ्या चेहर्याला
जीव तिचा हो भांड्यात पडला
ती सरसावली आलिंगनाला
बघणार्यांचा श्वास अडकला
जळले सगळे त्याच्या नशीबाला
पण साधा भोळा पांडू जोडुनी हात, काढुनी दात बोलता झालान, "वेल्कम टु आमच्या इंडियाला..."
हो हो हो हो, लंडनची वारी केलेला पांडू डब्बेवाला !
तिला बशीवली त्यानं बग्गीत
बग्गी निघाली अशी दौडत
जवळ गोरी मेम थाटात
चलबिचल ह्याच्या मनात
आता बोलु की नकु म्हंता म्हंता, तिनंच त्याचा हात, तिच्या हातात अस्सा घेतला ,
हो हो हो हो, लंडनची वारी केलेला पांडू डब्बेवाला !
दोघं येकमेका बघती
मनी दाटून आली पिरती
फुलं फुलली अवतीभवती
धन्य झाली हो धरती
वर्ण कुठे हो, धर्म कुठे हो, देश कुठे हो - या सार्यांच्यापेक्षा मोठा प्रेमाचा बोलबाला
हो हो हो हो, लंडनची वारी केलेला पांडू डब्बेवाला !
-------------------------------------------
कन्ह्यार्
कन्ह्यार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
अयाई गं!
(लावणीचा ठेका)
आयला आसं काय झालं, अचानक माझ्या काळजात
काय आगळीक घडली, येईना डोचक्यात
गाडीच्या माझ्या चाकात हवा आन् पोटात तॅल भरूनी
आलो बिगीन उठूनी इमानतळामार्गा वरूनी
येईल आता आभाळातुन इमान
भुईवर येईल अलगद त्य यान
प्याशेंजर संबाळीत आपलं सामान
त्यास्नी ठेसनावर सोडायचा केवढा तो मान!
वाट बघता अशी, येई इचार माझ्या मना
कवा येईल का अशीच माझ्या मनातली मैना
व्हट तिजं डाळींबावानी
गालावर गुलाबी पेरूची लाली
अंग तिजं गोरं गोरं केवड्यावानी
साडीवरची खडी जणू दहीवरावरचं पानी
बसवीन.. फुडच्या..... शिट.... वर....... अलगद......... उ....च....लू....नी........
आयाई गं
(आतार हिच्या... आर तिकडं त्यो मुंबैचा डबंवाला आसा का बावारलाय? मला - कोल्हापुरी फट्ट्याला - तथं जाऊन बघायाच हवं!!!!!! )
आफताब!
आफताब! अरेरे! डब्बेवालाच एकदम!


जिडी!
पण बसली की ती डबेवाल्याच्या बग्गीत! तुमी नुस्तेच उभारलाय हिकडं!
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
डबेवाला
डबेवाला पांडु का रिक्षेवाला धोंडू?
सांगा माझ हार्ट मी कुठ कुठ सांडू ?
पांडु तुझ्या डब्याला पडलय भोक
धोंडु मिटर दाखावत मागतोय रोख..
गॉड जाणे पांडुच्या डब्यात काय?
धोंडु तुझ्या रिक्ष्येत तेलच न्हाय...
मला हवा सुकुमार, मला हवा राजकुमार
स्वप्नातल्या घोड्यावर होउन येईल स्वार
जो सुखान ठेवेल, जो मुक्यानं बोलेल
ही लंडनची राजकन्या त्यालाच वरेल...
बाकीचे गाववाले घाबरले का मला
की बायकांच्या गावात आले वर शोधायाला..?
अरे काय
अरे काय कोणीच नाही....???
महागुरुंच
महागुरुंच्या 'धडक' ( चालू घडामोडीचा परीणाम अन काय
)कृतीला मोदक!!! निषेध! निषेध!! निषेध!!!
बाकी सत्यजीत, गजानन,आफताब जबरी
.... लगे रहो!!!
काहि ओळी
काहि ओळी माझ्या तर्फेही..
नको रोमवाला नको बॉनवाला |
वराया वराला चला भारताला ||
मला आवडे तो गुणी बाळ ऐसा |
कळा बडवुनी खास मिळवील पैसा||
असे 'भूमि'ती रे बरी भारताची |
तयारी करा हो तुम्ही सिध्दतेची ||
म्हणे डायनाही असे ड्रेस भावी |
जरा पाचवारीच नेसून घ्यावी ||
मी मुंबईचा
मी मुंबईचा पिटर लग्नाला झालो स्टॅंड
खारचा कोलीवाडा गाव माझं बँडस्टॅंड
ही गोरी गोरी पोरी माझी होनार नवरी
ही बंदरावरची पोरं पन भावखाते कवरी
असेल हिचा बाप मोठा ईंग्लंडचा राजा
पन दर्यावर चालुतुया माझाच गमजा
नाकात नथनी, पायात पैजन, केसात गजरा फुलांचा....
चाफ्याची फुला देउन मी तिला, काटलाय पत्ता पोरांचा
मला लगिन कराव पायजे
मला ईंग्लंडची मैना पायजे.....
मला लगिन कराव पायजेल
गोरी गोरी नवरी पायजेल...
माझा लगिन लावतास काय?
सोपान आला
सोपान आला बगा कोल्हापुरचा रांगडा गडी..
सोपान :
चला व्हा समदी बाजूला .. जाउ दे मला म्होरं
टक्कूरं फोडतो एकेकाचं.. थांबायचं हिथं कव्हर ?
असचिल तु म्हमईचा पिटर
म्या हाय कोल्हापूरातला पंटर
हीचा नाद सोड ही गोरी मेम..
उगा कशाला करतोस गेम..
डायना डार्लींग डोन्ट लिसन टू हिम..
आय यम युवर र्किंग आन तू माझी क्विन..
हिथली पापलेटं शिळिच हाय
तांबड्या पांढर्या रश्श्याची चव त्याला न्हाय..
आमचं कोल्हापूर ऐसपेस हाय
म्हमईची हवा तुला सोसायची न्हाय...
ही बग आली महालक्ष्मी एक्स्प्रेस..
रंकाळ्याव्ररली मंडळी लई व्हतिल इंप्रेस..
चल तुला माझ्या घरला नेतो
ह्या पिटरला एक ठोसाच देतो
कशाला सटर फटर पिटर
मी आहे ना सोपानराव पंटर...
डायना :
सोपान डार्लिंग यु आर म्हणिंग राईट !
असाच हसबंड आय वॉन्ट परफेक्ट फिट !
ये लवकर होल्ड माय हॅन्ड
जाउ सोडून हा बँड स्टॅन्ड....
गेली बघा डायना कोल्हापुरात सोपान्यासंगती....
लिव्हा आता काय व्हतिल त्या गमती जमती ...
कोल्हापुर
कोल्हापुरात गेली डायना
पाहायला मर्दानी बाणा
कंटाळली त्या पैलवानांना
पुरे झाला म्हणे आडदांडपणा
रंकाळ्यावर फिरता फिरता
एके दिनी तिला 'राम' दिसला
त्याच्याकडे पाहाता पाहाता
मन मोहूनी तिचा श्वास हरपला
सरळ धारदार नासिका
भव्य कपाळ बुद्धीमत्ता दाखवणारे
अन् त्याहिपेक्षा विलक्षण
तीक्ष्ण डोळे मनाचा वेध घेणारे
भानावर येताच तिने प्रश्न केला
हे राजकुमार, कुठून आली आपली स्वारी?
स्निग्धमधुर स्वरात तो उत्तरला,
देवी, सर्व गावात श्रेष्ठ अशी 'पुण्यनगरी'
ऐकता ते
ऐकता ते उत्तर - 'पुण्यनगरी'
काहीतरी झाले ललनेच्या उरी!
काय बरे हे?
असे का वाटे ओळखीचे?
आवाज त्या युवकाचा की
नाव त्या नगरीचे?
क्षणात सावरली ती बाई (:P)
पुण्यनगरीत जायची झाली भारी घाई!
हेच ते, हेच ते HG करांचे
नाव असे त्या 'विशिष्ट नगराचे!'
वाचता येता-जाता मायबोली
मनी कामना ती जागी झाली
नगरीतल्या त्या फेरफटक्यांची
पाहण्या गम्मत त्या वाचलेल्या किश्श्यांची!
गोरी आता
गोरी आता कोल्हापुरातुन पुण्याच्या प्रवासाला निघाली आणि वाटेत तिला गाव लागला सातारा... आन
तिची गाठ पडली सातारी सर्जेरावाशी.... पुढ काय घडल म्हणता?.... ऐका सर्जेरावाच्याच तोंडुन....
गोरी चालली सोडुन सोपान्याला
वाट धरली तिन पुण्या जायाला
मध्ये लागला तिला अजिंक्येतारा
गाव भारी त्याच्या पायी सातारा
धाबा बघुन सोडली तिन शिदोरी
पिझ्झा नाही होती त्यात भाकरी
सॉस नव्हता संग त्याच्या कंचा
लावला तोंडी तीनं जरासा ठेचा
भाजली जीभ उडली तिची त्रेधा
संधी साधुन भरवला म्या पेढा
पेढा गोड लै सातारी कंदी
गोरी आली आक्षी जाळ्यामंदी
घेतली तिला फटफटीवरती
दावला 'कास' आन 'चारभिंती'
म्या सोडली पुडी खाल्ला थोडा जर्दा
भाळली गोरी म्हणली मला मर्दा
आता नाही जायच मला कुठ
तुझ्यासंग र्हाते मी हिथं
हारकलो म्या धरला तिचा हात
नेली गाडी थेट दारात
आईबापाला दिल्या मी हाळ्या
नका म्हणल बघु आता पोरी काळ्या
ही बघा म्हणल तुमची सुन....
गोरी पडली पाया वाकुन...
हां पण आस सगळ ग्वाड ग्वाड झाल तर म्होरल्या गावाना संधी कशी मिळायची....
तवा आता लिवा आता काय तरी खानदानची इज्जत वगैरे..... आणि फिरवा हे यार्न!