श्रद्धा अंधश्रद्धा भाग 2

Submitted by अनिल तापकीर on 22 February, 2012 - 09:22

खिशातून रुमाल काढून त्याने चेहरा पुसला. घड्याळ पहिले बारा वीस, त्याला धक्का बसला होता. कारण त्याला वाटले होते कि, एक तास पूर्ण व्हायला फार फार तर पाच-सात मिनिटे राहिली असतील. परंतु तास पूर्ण व्हायला अजून चाळीस मिनिटे बाकी होती. आणि त्याचेच दडपण यायला लागले होते. वेळ सरता सरत नव्हता. मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्यासाठी त्याने डोके झटकले नि पुन्हा सिगारेट पेटवली. जरा शांत झाला. उगाच घाबरलो आपण घाबरण्यासारखे काहीच घडले नव्हते.
सिगारेट संपली, पुन्हा तीच अस्वस्थ करणारी शांतता..... त्या गच्च अंधारात एक एक मिनिट एका एका तासाप्रमाणे भासत होता. काहीही कृती न करता बसल्यामुळे पुन्हा मागचेच विचार त्याच्या डोक्यात यायला लागले होते. तो जेवढे विचार थोपवत होता त्याच्या दुप्पट वेगाने तेच विचार पुन्हा पुन्हा येत होते. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आजच का आठवत्तात हे त्याला समजत नव्हते.
विचार करता करता त्याला रंग पहिलवानाचा किस्सा आठवला.
त्याच्या गावाच्या नि शेजारच्या गावाच्या मध्ये डोंगरांची रांग होती दोन्ही गावात ये जा करण्यासाठी रस्ता एका खिंडीतून जात होता. खिंड खूपच अरुंद नि उंच होती. त्याच खिंडीत बर्याच वर्ष्यापुर्वी तीन मुडदे सापडले होते. दोन पुरुष नि एक महिला यांना कोणीतरी मारून टाकले होते. तेव्हापासून त्या खिंडीविषयी नाना प्रकारच्या दंतकथा तयार झाल्या होत्या. काही किस्से घडले होते कि नाही माहित नाही परंतु रंगवून सांगितले जात.
कोणी म्हणे एकदा एक जण (तो एक जण कोण होता कुणालाच माहित नव्हते ) तर तो रात्रीच पलीकडच्या गावातून अलीकडे यायला निघाला त्याच्या पाहुण्यांनी त्याला रात्रीचे निघायला विरोध केला होता. पण पठ्या लयच डेरिंगबाज कोण खातंय बघतो म्हणाला नि निघाला अकरा वाजले होते. झपाझप चालत खिंडीजवळ आला. खिंडीत शिरण्याअगोदर तंबाकू मळून तोंडात टाकली नि शिरला बिनधास्त, निम्मे अंतर गेल्यावर त्याला आवाज आला.
'
ओ पावनं थांबा जरा येउद्या मला.'
दचकून त्याने मागे बघितले एक उंच माणूस झपाझपा चालत येत होता. जवळ येताच तो माणूस म्हणाला
काय घाबरलो होतो राव, बरं झालं तुमची सोबत मिळाली.
कोणत्या गावाचं पावनं
आवो मी लांब कोकणातला हाय.
मग इकडं कुणाकड वाट चुकला
पावनं थोडी तंबाकू द्या राव लय तलाप झालीय मग सांगतो सगळं चालता चालता.
ह्याने तंबाकू काढून दिली, तो मळू लागला
नि ह्याच लक्ष्य त्याच्या तंबाकू मळनार्या हाताकडे गेले नि त्याचे धोतर पिवळे झाले.
तंबाकू मळणारे हात उलटे होते.
तेव्हापासून खिंडीत एक फेटे वाले भूत आहे हे सगळीकडे झाले. त्या किस्स्यानंतर असे किस्से अनेकदा घडत गेले. पाच नंतर त्या खिंडीतून कोणी जायचे धाडस करीना
त्याच खिंडीत रंगा पहिलवान लागीराला होता,
गावाच्या पारावर जेव्हा तो आला तेव्हा त्याची स्थिती खूपच वाईट होती. पूर्ण अंगावर फक्त एक फाटलेली अंडरवेयर होती. अंगावर खूप जखमा होत्या. धावत येऊन तो पारावर निपचित पडला होता. मधूनच उठून मोठ्याने ओरडायचा नि खिंडीकडे हात करून म्हनायचा डोळे पांढरे करून त्याची नि माझी कुस्ती झाली. पण तो लय मोठा होता. त्याचे हात पाय उलटे होते. अशी बडबड करून तो पुन्हा बेशुध्द पडायचा.
आख्ख्या गावाला वाटले नक्कीच खिंडीतल्या भुताने रंगा पहिलवानाला झपाटले असणार
हा लहान असताना रंगा पहिलवानाचा तो अवतार ह्याने स्वतः पाहिला होता.
आणि आज नको असताना त्याला स्मशानातच तो रंगा पहिलवानाचा किस्सा आठवला होता. रंगा पहिलवानाचा तो घाबरलेला नि वाईट अवस्था झालेला चेहरा त्याला आठवला नि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला.
शहरात शिकायला गेल्यापासून ह्या सर्व गोष्टी तो विसरला होता. नवीन आधुनिक विचारांचा पगडा त्याच्या मनावर होता. परंतु आज काय झाले होते कुणास ठाऊक ते नवीन विचार त्याला आठवत नव्हते. लहानपणी ऐकलेल्या लोकांनी रंगवून सांगितलेल्या भुतांच्या गोष्टीच तेवढ्या त्याला आठवत होत्या. आणि जसजश्या त्या आठवत होत्या तसतशी त्याच्या छातीची धडधड वाढत होती.
बारा चाळीस झाले, वातावरणातील भयानकता वाढली. विचार करून करून त्याच्या मेंदूला बधीरपणा यायला लागला होता. त्याला कधी घाम येत होता तर थोड्याच वेळात थंडी वाजत होती. वातावरण नक्की थंड आहे कि गरम हेच काळात नव्हते.
आता अंधार अधिक गडद झाला. हा सुन्नपणे बसून होता. छातीतील धडधड चालूच होती. राहिलेली वीस मिनिटे केव्हा पार पडतात असे त्याला झाले होते.
तेवढ्यात तो बसला तिथे धप्पकन आवाज झाला. नि तो मोठ्याने ओरडला. आवाज कश्याचा आला हे सुध्दा त्याने पहिले नाही. तो जो पळत सुटला, पळता पळता दोन तीन वेळा पडला चांगलाच मार लागला. तरी सुद्धा लागलेल्या माराची परवा न करता त्याने पार गाठला. पारावर आल्या आल्या मित्रांनी गराडा घातला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: