वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[७]

Submitted by दामोदरसुत on 18 February, 2012 - 02:06

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[७]

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[५] http://www.maayboli.com/node/32686
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[६] http://www.maayboli.com/node/32754

[*] अनर्थंम अक्षरं नास्ति, नास्ति मूलम अनौषधम||
अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः||

पाठभेद- अमंत्रम अक्षरं नास्ति, नास्ति मूलम अनौषधम||
अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः||

मला स्वत:ला 'अमंत्रम' पेक्षा 'अनर्थम' हा पाठभेद आवडतो कारण 'मंत्र', त्यांचे सामर्थ्य इ.बद्दल मला काहीही माहीत नाही. पण अ, आ , इ, ई इत्यादींना काही ना काही अर्थ आहे हे मात्र सर्वांना माहीत आहे.
अर्थ- अर्थहीन असे अक्षर नाही. औषध नाही असे (वनस्पतीचे) मूळ नाही. (सर्वस्वी ) अयोग्य (उपयुक्त नसलेला) असा माणूस नाही. दुर्भिक्ष आहे ते (योग्य कारणासाठी योग्य निवड करणार्‍या ) योजकाचे.

आयुर्वेदाने मुळेच काय पण वनस्पतींच्या पान, फूल, फळ, खोड, साल इ. सर्वच भागांचा अभ्यास करून उपयोग केला आहे. उच्च अधिकार्‍यांना व नेत्यांना अनेक जबाबदार्‍या पार पाडायच्या असतात. आपल्या सहकार्‍यांचे स्वभाव, गुणदोष आणि शहाणपण लक्षात घेऊन जे कामे वाटून देतात( म्हणजे योजकता दाखवतात ) तेच चांगली कामगिरी करून दाखवतात. श्रीकृष्ण, शिवराय, थोरले बाजीराव, लोकमान्य ही उत्तम योजकांची कांही ठळक उदाहरणे!
आता विज्ञानाची घोडदौड पाहिल्यावर कोणतीच गोष्ट या जगात टाकाऊ नाही असेच म्हणावे लागेल.

[*] व्यवहारी जगात दुर्बलांच्याच वाट्याला पुन्हा पुन्हा दैन्य, दु:ख आणि अन्याय येतात हा वारंवार येणारा अनुभव आहे. शरीरबळ, सत्ताबळ, संख्याबळ आणि आर्थिकबळ यांपैकी कांहीना कांही ज्याला आपल्या बाजूने उभे करता येत नाही त्याचा अगदी आजच्या लोकशाहीत देखील बळी दिला जातो. नामवंतांनी दारूच्या नशेत अपघात करून लोक मारले तरी ते पाप कोणा दुर्बलाच्या माथ्यावर ढकलून सहिसलामत सुटलेले लोक आपण पाहातो. मोठमोठ्या रकमेच्या भ्रष्टाचारातही मोठे मासे सहिसलामत सुटून जातात आणि कोणाला तरी बळीचा बकरा केला जातो. (मनुष्याच्या कल्पनेतील) देव आपले रक्षण करतो ही सर्वसामान्य श्रद्धा असली तरी हा देव देखील सबलांचाच रक्षणकर्ता कसा आहे ते अतिशय समर्पकपणे खालील सुभाषितात सिद्धच केले आहे. 'देवो दुर्बल घातक:' हे वचन सर्वत्र उद्धृत केले जाते ते यामुळेच. पूर्ण सुभाषित असे :
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रो बलिं दद्यात् देवो दुर्बल घातक:
||

अर्थ - घोड्याला (बळी) देतात? नाSही. हत्तीला (बळी) देतात? नाSही. वाघाला (बळी ) देतात? (अरे बापरे!)नाSहीच नाSही. (अहो ) बळी द्यायचा बोकडाSचा! देव (देखील) दुर्बलांचाच घात करतो.

देवाने संकटमुक्त करावे, त्याने प्रसन्न व्हावे यासाठी बळी देण्याची प्रथा जुन्या काळापासून आहे. आता हा बळी कोणाचा द्यायचा? प्रसन्न होण्यासाठी काय हवे हे जर देवानेच ठरवले असेल आणि तशी मागणी केली असेल तर त्याने घोडा, हत्ती, वाघ असे बलवान प्राणी बळी द्या अशी मागणी का बरे केली नाही? तोही दुर्बळ बोकडाच्याच जिवावर उठला ना? मग का म्हणू नये की देव (देखील) दुर्बलांचाच घात करतो.
निसर्गनियम या सृष्टीचे नियमन करतात (हाच देव.) असे विज्ञानवादी मानतात. निसर्गात जे त्या त्या परिस्थितीला टक्कर देण्यास सक्षम असतात तेच टिकतात (survival of the fittest!). याप्रमाणे देखील दुर्बलांच्या नष्ट होण्याची शक्यताच अधिक. मग का म्हणू नये कि 'देवो दुर्बल घातक:'

[*] 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडितः|' हेही वचन तडजोड करतांना मार्गदर्शक म्हणून व्यवहारात नेहमी वापरले जाते. किंबहुना आपल्या अंतर्मनात ते असतेच. याच्या उत्तरार्धासह ते असे आहे-
सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडितः|
अर्धेन कुरुते कार्यम् सर्वनाशो न जायते ||

आपल्या जवळचे सर्वच्या सर्व जाण्याची वेळ आली तर शहाणी माणसे सर्वच्या सर्व जाऊ देण्याऐवजी निदान निम्मे तरी वाचविण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात. कारण निम्मे वाचले तर त्याच्या बळावर काम पुढे चालू तरी राहाते. सर्वच गमावल्यावर करणार काय?
शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंहाशी तह करतांना हाच विचार केला असणार. ती रणनीति किती अचूक होती तेही पुढे सिद्ध झाले आहे. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने फ्रान्स्-इंग्लंड च्या सैन्याचा फ्रान्समध्ये पराभव केल्यावर सैन्य आणि युद्धसामग्री असे सर्वच जर्मनीच्या हाती लागण्याची वेळ आली. तेव्हा इंग्लंडने युद्धसामग्री तिकडेच सोडून दिली आणि डंकर्क येथून सैन्य कसेबसे परत आणले. पुढे काय झाले ते सर्वज्ञात आहे.
वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील असे प्रसंग येतातच. अशावेळी 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम् त्यजति पंडितः|' हे वचन आपल्या मदतीला आहेच.

गुलमोहर: 

अतिशय सहज, सोप्या भाषेत उदाहरणासहित संस्कृत श्लोक दिल्यामुळे पटकन अर्थ कळतो. वाचायला हि मजा येते. असेच लिहित रहा.