सॉरी डॅडी...

Submitted by ज्ञानेश on 1 February, 2012 - 10:18

=========================

चालत गेलो भिन्न दिशेला, सॉरी डॅडी
बुटात तुमच्या पाय न गेला, सॉरी डॅडी..

जरी भूमिका उदार होती तुमची सारी,
माझ्यावरती मदार होती तुमची सारी,
मी तुमचा हिरमोडच केला, सॉरी डॅडी !
चालत गेलो भिन्न दिशेला.. सॉरी डॅडी..

तुमच्या स्वप्नांवरती विरजण पडले होते
तुमच्या हातावर जेव्हा वण पडले होते,
तेव्हा माझ्या हाती पेला.. सॉरी डॅडी
चालत गेलो भिन्न दिशेला, सॉरी डॅडी..

सावरणार्‍या हातांना मी पाश समजलो
खिडकीमधल्या तुकड्याला आकाश समजलो,
तोल जरासा माझा गेला.. सॉरी डॅडी
चालत गेलो भिन्न दिशेला.. सॉरी डॅडी..

तुमच्या फोटोपाशी थोडे बसल्यानंतर
आज अचानक प्रदीर्घशा त्या मौनानंतर
शब्द निघाला अडखळलेला.. सॉरी डॅडी
चालत गेलो भिन्न दिशेला.. सॉरी डॅडी..

काळ पुन्हा त्या वळणावरती नेतो आहे,
माझासुद्धा मुलगा मोठा होतो आहे !
माझ्यामधला बाप म्हणाला- सॉरी डॅडी !
चालत गेलो भिन्न दिशेला.. सॉरी डॅडी..

-ज्ञानेश.
===========================

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सावरणार्‍या हातांना मी पाश समजलो
खिडकीमधल्या तुकड्याला आकाश समजलो,
तोल जरासा माझा गेला.. सॉरी डॅडी
चालत गेलो भिन्न दिशेला.. सॉरी डॅडी..

वा... Happy

सावरणार्‍या हातांना मी पाश समजलो
खिडकीमधल्या तुकड्याला आकाश समजलो,
तोल जरासा माझा गेला.. सॉरी डॅडी
चालत गेलो भिन्न दिशेला.. सॉरी डॅडी..

ग्रेट...

खिडकीमधल्या तुकड्याला आकाश समजलो,>>>क्या बात है !

काळ पुन्हा त्या वळणावरती नेतो आहे,
माझासुद्धा मुलगा मोठा होतो आहे !
माझ्यामधला बाप म्हणाला- सॉरी डॅडी !
चालत गेलो भिन्न दिशेला.. सॉरी डॅडी..>>>सर्वानी लक्षात घ्यावे असे,
मस्तच.

सुंदरच, बरेच दिवसांनी आपल्या काव्याचा लाभ झाला.

सर्वच ओळी आवडल्या. खिडकीतल्या तुकड्याला आकाश आणि पाश अधिकच आवडल्या.

डॅडी हा शब्द घेण्यामागे काही खास प्रयोजन (म्हणजे नवीन पिढीचा संदर्भ) की तसे काही नाही? (म्हणजे 'बाबा' असे नसण्याचे काही खास कारण असेल का असे विचारावेसे वाटले).

अजून येऊद्यात.

आपला मित्र

-'बेफिकीर'!

ज्ञानेशजी नमस्कार .तुमची कविता खुप आवडली..असचं सुंदर लिहीण्यासाठी तुम्हाला खुप शुभेच्छा..

<<सावरणार्‍या हातांना मी पाश समजलो
खिडकीमधल्या तुकड्याला आकाश समजलो,<<<

किती अचुकतेने सांगितलेत हे कडवे सत्य!! Sad
क्षणभर डोळ्यात पाणी तराळले... खरच नि:शब्द केलत!

घट्ट आकृतीबंध, गहरा आशय, सरळ सोपी शब्दरचना आणि
जीवनात धडा मिळावा अशा घटनेने झालेले सुंदर समापन यामुळे कविता सुरेख रंगली आहे. आवडली!

काळ पुन्हा त्या वळणावरती नेतो आहे,
चुकणार्‍याला संधी पुन्हा देतो आहे
सावध होतो, म्हणणाराही गाफिल राही
दत्तचित्त होणारा पुढती जातो आहे