मुंज करावी का?

Submitted by chaukas on 28 January, 2012 - 10:28

मुंज, मौंजीबंधन, व्रतबंध अथवा तत्सम नावांनी ओळखला जाणारा विधी करावा का? आणि का करावा?

'आपण' ('आपल्यात' हे करतात) आणि 'ते' ('त्यांच्यात' हे करत नाहीत; इथे एक विशिष्ट जात सोडून बाकी सर्व जाती आणि धर्म एकत्र 'त्यांच्या'त ढकलले जातात) असा फरक त्या कळत्या-नकळत्या वयातच मनावर बिंबवण्याखेरीज त्या विधीतून काय साध्य होते?

दुर्गा भागवतांनी एका लेखात म्हटले आहे की त्यांना मावळातील शेतकरी पीक कापणीला येण्याच्या काळात शेतात मध्यभागी एक काटकी पुरताना दिसले. दुर्गाबाईंनी त्या प्रथेचा शोध घेतला तेव्हा असे कळले की फार पूर्वी त्या हंगामात पिकांवर येणाऱ्या पाखरांना हाकलण्यासाठी शेतात एक मोठा खांब पुरत आणि त्यावर त्यावर एक कावळा (अथवा तत्सम पक्षी) मारून टांगत असत, ज्यायोगे इतर पक्षांना दहशत बसावी. कालांतराने त्या खांबाची काटकी झाली.

तसेच या विधीचेही झालेले आहे असे वाटत नाही काय?

ज्याला ह्या विधीतून जावे लागते ते रत्न बहुतेक वेळेला ('बहुतेक' हा एक सर्वसाधारण शब्द आहे; नक्की किती टक्के ही आकडेवारी मजपाशी नाही) कुठल्यातरी ख्रिश्चन 'संता'च्या (या ख्रिश्चन संतांचे मूळ पाहिले तर वेगळीच मजा येईल; 'संत' झेवियर यांचे कर्तृत्व काय तर त्यांनी गोव्यावर 'हिंदू' चालून आले असता त्यांना पळवून लावले आणि ख्रिश्चन 'धर्मगुरूंचे' बाटवाबाटवीचे उद्योग निर्विघ्न चालू ठेवण्यास मदत केली) नावे चालवलेल्या शाळेत विद्या ग्रहण करत असतो. त्यांना संस्कृतचा 'स' अथवा परंपरेचा 'प' देखिल माहीत नसतो. अशा वेळेला त्यांच्या एका विशिष्ट जातीत जन्मलेल्या आई-बापांच्या मनातील कुठलातरी गंड शमवण्याकरता हा विधी करावा का? हा विधी करून कुणी खरेच 'गुरुकुलात' गेल्याचे एक तरी उदाहरण आपल्याला आजच्या २०१२ साली दिसेल काय? ज्याची मुंज झाली आहे तो मुलगा लग्न होईपर्यंत 'ब्रह्मचर्याश्रम' पाळेल याची खात्री कोणी देईल काय?

हे सर्व आक्षेप लहान ठरतील असा मोठा आक्षेप - थोडक्यात म्हणजे स्त्रिया आणि इतर जातींतील लोक यांनी विद्याग्रहण करू नये असेच गृहीतक या विधीतून ठसवण्याचा निंदनीय प्रयत्न या विधीतून बिनबोभाट होत नाही काय? बाकीच्यांचे सोडा, पण या समारंभात ज्या नथी आणि शालू घालून मिरवतात अशा स्त्रियांना हे खटकत नाही काय?

हा 'हिंदू धर्मावर' हल्ला आहे असा गळा काढणाऱ्यांनी आधीच थांबावे. हा केवळ एका जातीतल्या एका लिंगाच्या जुनाट कर्मकांडाविरुद्धचा आक्षेप आहे. आणि 'आम्ही आमच्या घरी काय वाटेल ते करू' म्हणू इच्छिणाऱ्यांनी आपण जे करतो आहोत त्यामुळे समाजात दुहीचा संदेश जात नाही ना याचा विचार करायला नको का? आणि हे कुणाच्या 'घरी', इतरांना नकळत होत नसून चारचौघात सर्वांना कळेल अशा थाटात होते.

समाज सुरळीत चालू रहावा यासाठी काही विधी आवश्यक असतात. लग्न हा त्यातीलच एक. त्यामुळे हे आक्षेप लग्नाला घेता येत नाहीत. कारण लग्न सर्वांचे (करू इच्छीणारांचे) होते. जन्म सर्वांचाच होतो आणि मृत्यूही सर्वांचाच होतो. त्यामुळे ते विधी या चर्चेत आणत नाही. अन्यथा या चर्चेचा पट फारच विस्तारेल आणि हा प्रश्न अलगद नगण्य होऊन जाईल. कृपया प्रतिसाद देताना ते टाळावे.

'आमचा पैसा आम्ही कसा खर्च करू हे इतरांनी सांगू नये' हे खुसपट मान्य. ते मी सांगूही इच्छीत नाही. फक्त तो अशा विकृत मार्गांनी खर्च करू नये असे वाटते.

शेवटी, आम्ही मुलींचीही मुंज करायला तयार आहोत असा खुळचट प्रतिसाद देण्याआधी मानवजातीतल्या सर्वांची मुंज करायला (स्व-खर्चाने नव्हे) तुमची तयारी आहे का? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळात ह्या विधीला काही अर्थ आहे काय? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

तळटीप: माझा धर्म आणि जात वरील लिखाण वाचताना गौणच नव्हे तर निरर्थक मानावी. तसेच हे लिखाण कोणाही व्यक्तीला नजरेसमोर ठेवून केलेले नाही याची खात्री बाळगावी.
मतभेद असू शकतील, नव्हे असतीलच. मतभेद असणे हेच तर 'जिवंतपणाचे' लक्षण. त्यातून विचारशक्तीचा पट विस्तारावा एवढ्याच हेतूने हे लिखाण झाले.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

तुम्ही मुंज करावी की करु नये असा साधा प्रश्न विचारला असता तरी चाललं असतं त्याला विकृत मार्ग म्हणायची गरज काय ?

एखाद्या लिंगासाठी विधी असणे यात गैर काय आहे? इतर धर्मातही एका लिंगासाठी सुंता करतात की. विधी हा आपल्या भल्यासाठी करायचा.. एकाच लिंगाला का, एकाच जातीला का असली खुस्पटं काढायची असतील तर तुम्ही करु नका.. कॉन्वेंट शाळेचा आणि मुंज न करण्याचा काय संबंध कळला नाही... उद्या एखादा परधर्मीय पतंगरावांच्या शाळेत शिकला तर त्याने सुंता करायची नाही का?

आपल्याच धर्माबाबत बरळल्यामुळे तुम्ही आधुनिक आहात हे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल तुम्चे अभिनंदन . Proud

फक्त तो अशा विकृत मार्गांनी खर्च करू नये असे वाटते.

गुरुजींची दक्षिणा पाच पन्नास रुपये, आलेल्या लोकाना जेवणावळ, एक दोन बारकी संध्येची पुस्तके आणि धार्मिक विधीसाठी चार शेणी, लाकडाच्या ढलप्या, तूप, दर्भ आणि जानव्याची दोरी... यातला कोण्ता खर्च विकृती या सदरात तुम्ही टाकला हे तुम्हालाच ठाऊक ! Proud

Light 1

मुंज करावी का? हो जरूर करावी अन आमच्यासारख्यांना जेवणाला जरूर बोलवावे.

पुर्वी मुंज हा विधी कोणा एका जातीकरता मर्यादीत नव्हता.

चौकस,

आपण हे विधी का करतो ?

पूर्वजांनी केले म्हणून.
शास्त्रात सांगितले म्हणून.
करावेसे वाटतात म्हणून.

कोणाची आणखीनही कारणे असू शकतील.

मला स्वत:ला हा विधी आवडतो कारण, ह्यात बटूला विद्याभ्यासासाठी विधीपूर्वक तयार केले जाते. तो गुरुगृही नसेल जात, पण आता ईथून पुढे स्वत:ला काया वाचा मने अभ्यासावर केन्द्रीत केले पाहिजे हे तर आपण त्याला समजावतो आहोत.

हा विधी फक्त काही जातीतच केला जातो कारण पूर्वी विद्याभ्यास ही त्याच जातींची मक्तेदारी होती. मला नाही वाटत की एखाद्याने मुंज केल्याने बाकीच्यांना चुकीचा किंवा निगेटीव्ह संदेश जातो.

व्रतबंधन, मौजीसंस्कार हे शब्दही संस्कार, बंधन ह्याच गोष्टी अधोरेखीत करतात. शेवटी हा संस्काराचा भाग आहे. ज्याला पटत असेल त्याने करावा, ज्याचा विश्वास नसेल त्याने करु नये.

माझ्यामते मुंज करावी. तशी आम्ही मुलाची मुंज केलीही.
जातीपातीचा मुद्दा आपण मध्ये आणला तर असतो.
तसेच मुंज साध्या पद्धतीनेही करता येते, म्हणजे खर्च आटोक्यात ठेवून.
आमच्याकडच्या मुंजीला सगळ्या जातीधर्माचे आमचे मित्र आनंदाने आले होते.
खरं सांगायचं तर पूर्वी मुंज हा विधी सगळ्यांकडे असायचा असे ऐकून आहे.
एका आजीबाईंना (अमराठी, अमहारष्ट्रीयन, सिंधी) पत्रीका, आमंत्रण देतेवेळी त्यांनी हे मला सांगितले.
लग्नाच्या आधी सोडमुंज असते. त्यांच्याकडे एक दिवस आधी मुंज, लगेच सोडमुंज करतात.
मुंजामुलाला सगळ्या विधींमधले किती कळते? फारसे नाही. पण सर्वसाधारणपणे गायत्रीमंत्र जरी शिकता आला तर वाईट काय? तसेही लग्नाच्या विधींमधले किती कळते? तरी बरीच लग्ने अजूनही गुरुजींना बोलावून, देवळात, चर्चमध्ये इ. केली जातात ना?
प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे, नातलग, मित्रमंडळींना बोलावून मुंजच असे नाही एखादा दुसरा कार्यक्रम केला तर भेटीगाठी होतात. आम्हाला शालू, पैठण्या नेसायला मिळतात.;) आजीआजोबा डोळ्यात पाणी आणून नातवाला बघतात. यात काय बिघडले? हेच लग्नातही होत असते.

>>> 'आमचा पैसा आम्ही कसा खर्च करू हे इतरांनी सांगू नये' हे खुसपट मान्य. ते मी सांगूही इच्छीत नाही. फक्त तो अशा विकृत मार्गांनी खर्च करू नये असे वाटते.

मुंज करणे या कार्यक्रमातील खालीलपैकी नक्की कोणते विधी (किंवा सर्वच विधी) तुम्हाला विकृत वाटतात ते जरा सोदाहरण स्पष्ट करावे.

१) मुंज लागण्याच्या आधी बटू इतर मुलांबरोबर जेवतो.
२) बटूचा घेरा करणे.
३) पुरोहीत काही मंत्र म्हणून प्रत्यक्ष मुंज लावणे.
४) जानवे परिधान करणे.
५) गायत्री मंत्राचा उपदेश घेणे.
६) नातेवाईक व इतर मित्रमंडळींबरोबर जेवणावळ.
७) भिक्षावळ
८) निमंत्रितांकडून बटूला आहेर

वरील पैकी विधी क्रमांक (२) आणि (७) ची आता फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. बाकी इतर विधी बर्‍याच प्रमाणात पार पाडले जातात.

वरीलपैकी कोणते विधी विकृत आहेत?

मुंजच काय आणि हिंदुच काय, सर्वच प्रथा नव्या चश्म्यातून पाह्यला हव्यात (आणि डिस्टॉरशन्स दुरुस्त करायला हवेत).
तुमच्या लिखाणाला अनुमोदन.

आम्ही आमच्या मुलाची मुंज करायची नाही हे ठरवले तेंव्हा दोन्हीकडच्या नातेवाईकांना कारणांचे एक पत्र लिहीले होते. ते बहुदा मायबोलीवर कुठेतरी आहे - शोधून टाकतो.

फुकाच्या गर्वाबद्दल मागे थोडे लिहीले होते, त्याचा हा दुवा:
http://aschig.blogspot.com/2007/01/on-racial-pride.html

मुंज हा कालबाह्य विधी आहे याबद्दल अनुमोदन्.दुसरी गोष्ट ही की कालबाह्य होण्याचे कारण म्हणजे शिक्षण पध्दती बदलली व जसे सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे सर्व समाजास समाविष्ट न केल्याने तो फक्त जातीसापेक्ष राहिला .बहुतेक बाबतीत हा गेट टुगेदर वा शो ऑफ साठी एक समारंभ राहिला आहे.जे लोक यामागील भूमिका समजून अजूनही हा विधी करतात त्यांची मी माफी मागतो.बाकी ठिकाणी मुंजा मणी सकाळी विधी करवून घेतो व सायंकाळी आई वडिलांच्या संमतीने चिकन बर्गर खातो.परखड मताबद्दल ( तथ्यांवर आधारीत) क्षमस्व.

चिकन बर्गर कुणीतरी खातो म्हणून सर्वासाठी विधी कालबाह्य.. हेही काही कळले नाही.

ऑफिसला जाताना टाय घालणे हादेखील निरुपयोगी आणि बिनकामाचा विधी आहे. तो का नाही बंद करत? टायचा माणसाला काय उपयोग असतो?

जानवेदेखील किल्ली अडकवायला उपयोगी पडते. Happy ( पण म्हणून त्याच्यासाठी मुंज करावी हा आमचा दावा नाही. )

मला तर टाय घातलेला प्रत्येक माणूस सेल्समन किंवा एम.आर. वाटतो... जामोप्या तुमच्याकडे येत असतील ना भरपूर एम.आर... Lol

एकाच लिंगासाठी विधी मुलींसाठीही होता... मुली वयात यायच्या तेंव्हा.

लिंबु भाऊ लवकर या..................................................................................

बर मग समजा रजिस्टर्ड मुंज केली तर ठिक ना ? खर्च नाही, गेट टुगेदर नाही, काही नाही, आणि तरी मुंज केल्याचे समाधान पण.

खर्च कसा नाही? रजिस्टर लग्न केल्यावर संध्याकाळी पार्टी नाही का करत तशी पार्टी मागणारच लोक... Wink

आणखीन एक टीपीचं कुरण?

दिवाळी, गणपती, नवरात्री, ख्रिसमस, ईद, बुद्धपौर्णिमा असे एका धर्मापुरते सण तरी कशाला साजरे करावेत? हेही कालबाह्यच ना मग? उगाचच दुही माजेल ना त्यानही!
कायच्या काय..

आणि मुंज फक्त ब्राह्मण मुलाची होऊ शकते हा मोठाच गैरसमज आहे.

आणि ही विकृती वाटत असेल तर जातीच्या नावे होणारी संमेलनं (हो, ही सगळ्या जातींची होतात) हे जास्त घातक वाटतं मला. धर्माच्या/जातीच्या नावानं संस्था असणं आणि त्यांनी इतर जाती-धर्मांविरुद्ध गरळ ओकणं - ही अती जास्त विकृत.
हॅलोविन म्हटलं की 'वा वा' (सजवा सोंग आणि खाउ मागत फिरु द्या) आणि सर्वपित्री अमावस्या, संक्रात, दसरा म्हणजे 'अरारा' - असं काही असतं का?

असो.. ही पोस्ट म्हणजे नको त्याचा टीआरपी वाढवणंच आहे.

इतर जाती-धर्मांविरुद्ध गरळ ओकणं

ते त्यानी वर केलेलं आहेच... ख्रिस्चन संताला चर्चकडून पगार मिळतो म्हटल्यावर तो त्याच्याच धर्माचा प्रसार करणार ना? यात त्याचं काय चुकलं? मुंजीच्या धाग्यात हा फादर का आला?

हॅलोविन म्हटलं की 'वा वा' (सजवा सोंग आणि खाउ मागत फिरु द्या) आणि सर्वपित्री अमावस्या, संक्रात, दसरा म्हणजे 'अरारा' - असं काही असतं का? >>> नानबा त्याशिवाय आपण किती पुढारलेलो ( पाश्चाळलेलो ) आहोत हे लोकांना कसं कळेल ? Proud

नानबाशी सहमत.
नुकतेच एके ठिकाणी लावलेल्या फलकावरून तिथे विशिष्ठ जातीचा मेळावा असल्याचे समजले.
पुढे गेल्यावर 'त्या मेळाव्यास अबक जातीबांधवांतर्फे शुभेच्छा' अजून एका कोपर्‍यात 'एक्सवायझी जाती कडून शुभेच्छा' असे वाचले. हसू आल्याशिवाय रहात नाही. इतरवेळी याचेच राजकारण करून भांडता. आता त्या शुभेच्छांवर विश्वास कसा बसणार?
मुंज करा किंवा नका करू, हेतू चांगला असला की आनंददायी समारंभ आपण करू शकतो.

चौकस... छान लिहले आहे... अर्थातच अनुमोदन... Happy
याच नाही तर अश्या सर्व कालबाह्य रुढी आणी अंधश्रद्धा सर्वच जाती धर्मातुन हद्दपार व्हाव्यात ही सदिच्छा..:)
मी माझ्या मुलाची मुंज केली नाही... माझ्या लहाणपणी माझी मुंज झाली होती पण तेंव्हा मला काय योग्य काय अयोग्य ते कळत न्हवते.. Sad
जाताजाता ....आता या बाफ ला मनुवादी लोक येउन झोडपणार.. इतर धर्मात किंवा जातीत चालणार्‍या प्रथा तुम्हाला कशा चालतात मग आमच्या याच विधीला का नावे ठेवता असे आक्रमक प्रतिसाद येणार... आणी या बाफ ला विधीवत टाळे लागणार..:P

आणि मुंज फक्त ब्राह्मण मुलाची होऊ शकते हा मोठाच गैरसमज आहे.

मुंज फक्त ब्राह्मण मुलाची होऊ शकते.
बाकी चालूद्यात.

तुम्ही मुंज करावी की करु नये असा साधा प्रश्न विचारला असता तरी चाललं असतं त्याला विकृत मार्ग म्हणायची गरज काय ?>> +१

सध्या आमच्या घरातही हाच विषय चालु असतो, तेव्हा मुलगा विचारतो की मुंज करायची म्हण्जे नक्की काय करायचे? मग सई ची पण करायची का? आणि त्याच्या ईतर मित्रांची का नाही केली? , एक ना दोन. आणि उत्तरे देताना जुने रेफरन्स दिले कि विचारतो " मग मला घराबाहेर जावे लागेल का, मुंज झाल्यावर?
मुलाच्या मनातले प्रश्न मलाही लॉजिकल वाटतात. gen. next. लॉजिक पटल्याशिवाय काही करायला तयार होत नाहीत.

Pages