याआधीचा भाग इथं वाचा.
प्रकरण चार
संध्याकाळपर्यंत मी शांत झालेले होते. राहुलबद्दलही नाराजी असली तरी ती कामाच्या ठिकाणी काढायची नाही या दृष्टीने दिवसभर जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. त्याच्या चेह-यावर अपेक्षेप्रमाणेच कसलेही भाव नव्हते आणि माझ्या मनात चाललेलं त्याला सगळं कळणार असल्याने एक प्रकारे ते बरंच झालं असं वाटत होतं . जॉनला जाताना टाटा केला आणि बर वाटलं. स्वारी खुषीत दिसत होती. नम्रताने त्याला पटवलेलं दिसत होतं. पटवायचं काय म्हणायला, खिसा जड झाला होताच कि. मी सरळ काम सोडून नम्रताकडे जाऊन बसले.
"काय गं, हा जॉन कसला तपास करतोय ?"
"सांगितलं ना , आपल्या आधी व्होरांच्या कंपनीत अपघात झाला होता "
"अपघात कसला होता पण ?"
तिने माझ्याकडे अविश्वासाने पाहीलं. जसं काही मला माहीत होतं आणि मी मुद्दामच विचारत होते..
"असं काय पाहतेस ? "
"नाही.. तुला सांगावं कि न सांगावं .."
"सांग कि, त्याने काय फरक पडणार आहे ? "
" त्यापेक्षा तू असं का नाही करत ? "
"कसं ? "
" शहासरांनाच का नाहीस विचारत ? "
" हं, म्हणजे सांगायचं नाही म्हण कि "
" वा ग ! शहासरांना विचार म्हटलं कि लगेच सांगायचं नाही म्हणे ! तू लाडकी पुतणी ना त्यांची ? मग घाबरायचं कशाला ? " नम्रता हसून विचारत होती.
" हुं ! लाडकी म्हणून तर म्हणून तर आदर करते त्यांचा. याला घाबरणं म्हणतात होय ? त्यांनी एकदाच सांगितलं कि पुन्हा नको त्या प्रकरणात रस घेऊस म्हणून नाही विचारत त्यांना. एक तर ते वयाने मोठे आणि अनुभवाने पण ! पण काय गं, तुला कसला प्रॊब्लेम आहे मला सांगायला ? "
" शहाकाकांनी मनाई केलीये समज " ती खळाळून हसत म्हणाली.
म्हणजे ही काही ताकास तूर लागू देणार नव्हती.
मायकेल पाघळतो का ते पहायला पाहीजे. अवघडच होतं ते. मायकेल आणि ही नम्रता. शहाकाकांच्या खास ट्रेनिंगमधे तयार झालेले होते दोघेही.
अनावश्यक माहीती ठेवू नये असं बाबांनी लहान असताना शिकवलेलं तर आईने त्याच्या उलट जाऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल अद्ययावत माहीती ठेवल्याने कसं सावध राहता येतं हे समजावून सांगितलं होतं. काही काही वेळा ती अंधश्रद्ध आणि भोळसट वाटली तरी शहाणपण तिच्याकडे भरपूर असल्याचं कळून यायचं. बाबांसारखी ती हुषार नसेल कदाचित, पण बाबांना जेव्हापासून आईचे शहाणपण लक्षात आलं आणि तिचे सल्ले घ्यायला त्यांनी सुरूवात केली तेव्हाच कदाचित बाबांच्या हुषारीचं सोनं झालं होतं. मी हे एकदा आईकडे बोलून दाखवलं तेव्हा मात्र तिने स्वत:च्याच गालात मारून घेतलं होतं. आई म्हणजे आईच होती.
आज दोन तारीख...
सकाळपासून कसलं टेण्शन होतं काही कळत नव्हतं. डोक्यात घण बसल्यासारखं येणार फीलिंग आज पुन्हा येत होतं. गेल्या काही महिन्यांपासून ढोल वाजल्यासारखं वाटायचं आणि डोकं प्रचंड दुखायचं. त्या ढोल वाजल्याच्या आवाजाने प्रचंड अस्वस्थ व्हायला होत होतं. कालही ते आवाज ऐकू आले असावेत. आणि त्यानंतर ते भास. मी गाडी लावते. कुठल्याशा गेटमधून बाहेर पडते आणि एक पोरगेलासा तरूण पळत जाताना मला धडकतो . मी तोल सावरत असतानाच आणखी काही जण त्याच्या मागे जाताना दिसतात. अरे त्याला वाचवा.. मी ओरडत असते.
आजचा दिवस जरा वेगळा असल्याचं जाणवत होतं. इतरांकडे पाहीलं तर सगळं नॊर्मल चाललं होतं. प्रत्येकाच्या दुनियेचा केंद्रबिंदू तो स्वत:च असल्याने प्रत्येकाचं वर्तुळ वेगळं. एकमेकांत मिसळलेल्या वर्तुळात मात्र एकाच्या आवर्तनांची झळ दुस-याला बसत असते. त्याप्रमाणे माझ्या टेण्शनमुळे इतर कुणाला फरक पडत नव्हता. मात्र त्याच वेळी नंदिनी माझ्याकडे आवर्जून येऊन बसली होती.
" काय गं रच्यू ! टेण्शन बिन्शन घ्यायचं नाही हं. "
मी कसंनुसं हसले.
"टेण्शन, लेनेका नही देनेका "
तिने उगीचच जोक मारला. तिच्या ब-याच अयशस्वी प्रकरणात तिच्य़ा हाती अशी वाक्यं लागलेली होती. कधीकधी तिच्या या बिनधास्तपणाचं, बेफिकिरीचं कौतुक वाटायचं. पण नाही, ती जशी दाखवते तशी ती नव्हती. बारीक विचार करायची, पण ते फक्त दुस-यांच्याबाबतीत !
आज पुन्हा जॉन आल्याची वर्दी मिळाली तेव्हा त्याला मजेत सुनवायचा विचार केला होता मी. कालच तर त्याला पुडकं मिळालं होतं ना ? तो आल्याची खबर मिळाल्याने नम्रताही कपाळावर आठ्या पाडत आली.
" हाय मिस रचना ! कशी आहेस "
चेंबरमधे घुसलेल्या त्या सहाफुटी वादळाने आत शिरतानाच प्रश्न केला.
" जॉन ! काल बोललो ना आपण ? काही राहीलं का ? चल पुन्हा कॊन्फरन्स रूममधे बसून बोलूयात "
" अंहं.. आज मला फक्त मिस रचना जोशीशी बोलायचंय .."
मिस रचना जोशी.. असा उल्लेख करताना त्याचा स्वर थोडासा करारी झाल्यासारखा वाटला.
" काय प्रॊब्लेम आहे जॊन "
" नम्रता, मला माझी ड्युटी करू दे "
त्याच्या स्वरात आता जरब होती. त्यावर नम्रता ओशाळली.
" तर मिस रचना जोशी, मी तुला काही प्रश्न विचारले तर चालतील ना ? कि लेडी डिटेक्टिव्हला बोलवायचं ?"
" नाही त्याची काही गरज नाही "
" मी म्हणालो मला रचनाशी बोलायचंय हे तुला कळत नाही का नम्रता ? "
" आय अॅम सॉरी ! "
" हं , दॅटस बेटर ! आता इथं आपल्या दोघांशिवाय कुणीही थांबता कामा नये. नाहीतर मला नाईलाजाने कारवाई करावी लागेल "
त्याच्या अधिकारांची जाणीव होताच वातावरणात तणाव निर्माण झाला. नम्रता आणि नंदिनी निघून गेल्या.
" हं बोल आता रचना. काय झालं थर्टीफर्स्टच्या रात्री ?"
" म्हणजे ?"
" तू भारतीय उच्चायुक्त सिंग साहेबांच्या पार्टीला त्यांच्या घरी गेली होतीस ना ?"
" हो. "
" मग मला सविस्तर सांग बघू. तू गेटच्या बाहेर गाडी लावलीस तिथून पुढे सगळं नीट सांग. काहीही हातचं राखून ठेवू नकोस.. "
"पण मला कळेल का ही चौकशी कशासाठी ते ? "
" अरे ! मी सांगितलंच नाही का ? तुझा हक्कच नाही का तो जाणून घ्यायचा... पण तुला माहीत नाही खरंच ?"
" काय ?"
" अच्छा ! मीच सांगायचं असेल तर... काल श्री सिंग यांचा मृत्यू झालाय "
"क्काय ? "
माझ्या डोळ्य़ासमोर माझं चेंबर गोल फिरत होतं.
" ऐकलं नाहीस का ? "
" हे कसं शक्य आहे ?"
" शक्य झालंय आणि ते कसं झालंय हे जाणून घ्यायलाच मी तुझ्याकडे आलोय "
"यू मीन ! मी काही केलंय ? "
त्यावर नापसंती दर्शवत त्याने खांदे उडवले
" हं ! मी अजून असा काहीही आरोप केला नाही. तू स्वतःच तसं म्हणतेहेस ! "
आता याला कसं सांगू कि श्री. सिंग नाही तर त्यांच्या बाळाची एक्स्पायरी डेट राहुलने सांगितली होती.
"त्या दिवशी तू पार्टीला गेलेलीस. बाहेर पडण्यापूर्वी सिंगसाहेबांशी काहीतरी बोलत होतीस. "
" हो पण मला कसं माहीती ना, असं काही होणारेय ते ? ते ही दोन दिवसांनी ? आणि मीच का , त्यावेळी कितीतरी जणं होते कि तिथं !"
" तू तिथून अचानक बाहेर पडलीस. नंतर पुन्हा आत आलीस. सर्वत्र फिरलीस. काहीतरी शोधत असल्यासारखी आणि मग वेगाने बाहेर पडलीस. बरोबर ? "
" हो पण... "
" तू बाहेर पडलीस त्याच्या आधी काही तरी घडलं होतं. "
" काय ? "
"आता मात्र मला सगळ सगळं सविस्तर सांग. टेक युवर ओन टाईम "
मी मनाशी शब्दांची जुळवाजुळव करत होते. शहाकाकांच्या कानावर घालावं का ? नम्रताशी बोलावं का ?
मग मीच त्याला मला नम्रताशी बोलायचंय असं सांगितलं. त्यावर त्याच्या चेह-यावर पुन्हा एकदा नापसंतीदर्शक भाव उमटले.
" तू काही केलेलं नाहीस ना ? मग कशासाठी कुणाची मदत हवीये ? माझं ऐक ! जे काही आत्ता मला सांगशील ते तुझ्याच फायद्याचं असेल "
" मृत्यूचं कारण काय म्हणे ? "
" हार्ट अॅटॅक ! मरण्यापूर्वी ते कशाला तरी घाबरलेले होते. म्हणूनच ही चौकशी "
मला खूपच वेळ लागत होता निर्णय घ्यायला. तशी जॉनची नजर संशयी होत चालली होती. अशा वेळी मनाचा कौल लावायचा असतो. मन काय इशारे देतंय याकडे लक्ष द्यायचा मी प्रयत्न केला. मी सहज बाहेर पाहीलं, राहुल माझ्याकडे एकटक बघत होता. आत्ताची त्याची नजर !
डोक्यात प्रचंड घण .. ढोल वाजण्याचा आवाज !
मी गेटमधून आत शिरतानाच तो पोरगेलासा तरूण मला धडकतो..
पुन्हा तो भास !
इथं ब-याच घटना अशा होत्या ज्याबद्दल मी अनभिज्ञ होते. मनाला कसले तरी इशारे मिळत होते. पण त्याचबरोबर मी कुठल्यातरी शक्तींच्या नियंत्रणात चालली असल्याची जाणीव होत होती. माझ्या चेह-यावर चित्रविचित्र भाव उमटत असले पाहीजेत. मी अनावश्यक भाग टाळून इयर एण्डचा प्रसंग जॉनला सांगायचा निर्णय घेतला.
मी एखादं स्क्रीप्ट वाचून दाखवावं तसं थर्टी फर्स्टच्या त्या नाईटबद्दल सांगत होते. डोळे मिटून जॉन ऐकत होता.
माझं सांगून संपलं तेव्हाच त्याने डोळे उघडले.
" तुझा ब्लॅक मॅजिकवर विश्वास आहे ?"
" हा काय प्रश्न झाला ? "
" अच्छा ! बदलून विचारतो. तुला ब्लॅक मॅजिकमधे रस आहे ? "
" असं का विचारतोस जॉन ? "
" मग त्या फ्ली मार्केटमधल्या त्या बाईकडे तुझं जाणं येणं कशासाठी आहे ? "
मला काहीच सुचेना. एकतर थर्टीफर्स्टच्या नाईटबद्दल मी विचारात असतानाच अचानक हे प्रश्न आल्याने मी अगदी गोंधळून गेले होते. गडबडून गेले होते. मी उत्तर द्यायला नकार दिल्यावर खांदे उडवत जॉन निघून गेला.
पण त्या प्रश्नांमुळं एक बरंच झालं. माझं डोकं दुखायचं थांबलं होतं.
.................................................................
" जॉन ! तिच्या म्हणण्याप्रमाणे तू तिची चौकशी केलीस..?" मधेच जॉनला थांबवत प्रोफेसर म्हणाले.
" हं. खरंय ते "
" काय सांगितलं तिने ? "
" ते लिहीलंय नाही तिने .. नाही का ? का बरं असं ? "
" हं. तेच तर हवंय तुझ्याकडून. "
" प्रोफेसर ! माझं काम प्रश्न विचारायचं आहे, उत्तरं द्यायचं नाही "
" अच्छा ! तर मग तू तुझ्या पद्धतीने तपास चालू ठेव. भेटूयात "
" ओहो प्रोफेसर! नाराज झालात एकदम. मी माझ्या मर्यादा सांगितल्या तुम्हाला. तपासादरम्यान झालेली मतं आणि तपासाचे डिटेल्स मला वरिष्ठांच्य़ा परवानगीशिवाय कुणाकडेच व्यक्त करता येत नाहीत. प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड "
" मी केवळ तपासाला मदत म्हणून माझ्या व्यवसायामधली नैतिकता बाजूला ठेवून केसचे डिटेल्स तुला दिले. आता माझा उपयोग करून घेताना मधल्या मिसिंग लिंक्स मला मिळाल्याच नाहीत तर मी तरी काय करू शकणार आहे ? "
" हं.. खरंय! मी आजच डोनाल्डशी बोलतो. माझा बॉस ! आज मी मेल करणारच होतो त्याला "
प्रोफेसर काहीच बोलले नाहीत.
"या नव्या नोटस राहू देत माझ्याकडे. "
जॉन फोन करण्यासाठी म्हणून बाल्कनीत गेला. बराच वेळ त्याचं संभाषण चालू होतं. खरं तर आता त्याने प्रोफेसरांच्या प्रश्नांना उत्तरं दिली असती तरी बिघडलं काहीच नसतं. पण तो कृष्णवर्णिय, बॉस ब्रिटीश रक्ताचा. म्हणूनच हाताखालच्या माणसाने न विचारता घेतलेले डिसीजन्स त्याला चालले नसते. म्हणजे जोपर्यंत सुरळीत चाललंय तोपर्यंत ठीक , पण काही विपरीत घडलं तर मात्र बॉसला का नाही विचारलं, स्वतःच निर्णय कशासाठी घ्यायचे वगैरे ! या अशा नियमावलीत स्वतःच्या डोक्याने कोण काम करणार ? अजूनही नियम तेच असल्याने इथल्या पोलीस खात्याबद्दल तसा आनंदच होता. पण एक आहे ब्रिटीश होते तोपर्यंतएक बरं होतं, कायदा आणि सुव्यवस्था चांगली होती आणि भ्रष्टाचार हाताबाहेर गेलेला नव्हता. आता मात्र संध्याकाळच्या वेळी परदेशी नागरिकांनी एकटंदुकटं बाहेर पडू नये अशा सूचना द्यायची पाळी इतर देशांच्या वकिलातींवर आली होती. लुटालूट आणि गुन्हेगारी खूप वाढली होती.
" प्रो ! खूषखबर. बॉसने परवानगी दिलीय तपासाचा आवश्यक तितका भाग तुम्हाला डिस्क्लोज करायची. तसंच एक समिती बनतेय या केससाठी. तुम्ही, मी आणि डोनाल्ड आहोतच त्यात, शिवाय एक इंडियन लेडी आहे सायकॉलॉजीचा अभ्यास असलेली. सायबर क्राईमवाली. डिटेक्टिव्ह संदीपा बॅनर्जी . तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तिला घेतलंय."
"तपास चालू आहे " जॉन त्याचं आवडतं वाक्य सवयीने बोलून गेला.
" जॉन तुझं मत सांगायला आता काहीच हरकत नसावी . त्याआधी या सगळ्या प्रकरणाची प्रार्श्वभूमी तू मला सांगणारेस "
" ओके. रचनाने संगितलेल्या कहाणीचे डिटेल्स माझ्या डोक्यात फिट्ट बसले होते. महत्वाच्या नोंदी लिहून ठेवायची मला सवयच आहे. कंपनीकडून तिला माझ्याशी जास्त बोलू दिलं जात नव्हतं. मी तिची माहीती काढली. ती शहांच्या मित्राची मुलगी. शहांचा डायमण्डचा बिझनेस सर्वदूर आहे. भारतात डायमण्डसच्या ज्या कंपन्या आहेत त्यातल्या साठ टक्के त्यांच्याच आहेत. रचना तशी मध्यमवर्गीय फॅमिलीतली. पण तिच्या वडिलांना उजव्या पक्षाकडून मिळालेल्या तिकिटावर ते निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहीलं नाही. शहांच्या मोठ्या पुतण्याच्या लग्नाच्या वेळी सरकारकडून बेहिशेबी संपत्तीचं प्रदर्शन केल्याच्या आरोपाखाली त्यांना बराच त्रास झाला होता. तेव्हां रचनाच्या बाबांनी, मि. जोशींनी त्यांना मदत केली होती. पुण्यातली एक नामांकित सराफी पेढी त्यांच्या नात्यातली . त्यांच्याकडे शहांच्या कंपनीसाठी रदबदली करण्यासाठी त्यांना मोठं कमिशन देण्याची तयारी शहांनी दाखवली. तेव्हां उत्सुकता म्हणून मि. जोशींनी या व्यवसायातल्या प्राप्तीबद्दल विचारलं आणि जे आकडे त्यांनी सांगितले ते ऐकून त्यांनी स्वतःच या व्यवसायात उडी घेतली. फक्त सात वर्षात आज भारतातल्या प्रमुख शहरात जोशी डायमण्डसची आउटलेटस आहेत. याशिवाय शहांच्या मसाल्याच्या व्यापारात त्यांची भागीदारी आहे. शहांना पैसे मिळवून देणारा मुख्य धंदा मसल्याचा व्यापार हाच आहे"
प्रोफेसर ऐकत असतानाच जॉनने एक पॉझ घेतला.
" शहांच्या व्यवसायाची माहिती करून घेण्यासाठी त्यांनी रचनाला दक्षिण आफ्रिकेला पाठवले. प्रशिक्षणासाठी म्हणून पाठवतोय असं त्यांनी सांगितलेलं. पण शहा धूर्त माणूस. मैत्री असली, भागीदारी असली तरी कायम सावध असणारा. या कानाचं त्या कानाला कळू न देणारा पाताळयंत्री मनुष्य ! अर्थात वाईट कामं केल्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत पण त्यांनी वाईट कामं केलेलीच नाहीत असं म्हणता येणार नाही "
"दक्षिण आफ्रिकेत नव्याने उभारी धरलेलं आणखी एक बिझनेस हाऊस म्हणजे व्होरा फॅमिलीचं परिमल इंडस्ट्रीज. त्यांचा धंदा बंद पडावा म्हणून शहांनी जंग जंग पछाडलं. पण व्होरा तयारीचे होते. पण व्होरांचं दुर्दैव म्हणा किंवा शहांचं सुदैव म्हणा, एयरपोर्ट रस्त्यावरच्या त्यांच्या फॅक्टरीत एक अपघात झाला आणि चार जण जागेवरच गेले. वृत्तपत्रात त्यावर गदारोळ झाल्याचं आठवत असेलच. ते सगळे कृष्णवर्णिय असल्याने प्रकरण पेटलं. हॅन्सी कोनिए प्रकरणाचा राग इथल्या मेडीयाला आहेच आहे. व्होरांना धंदा करणं अवघड झालं. त्या जागेवर ब-याच जणांचा डोळा होता. पण नम्रता आणि मायकेल या शहांच्या खास माणसांनी व्होरांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन, त्यांना कायदेशीर कटकटीतून सोडवण्याचा दिलासा देऊन तो प्लॉट घशात घातला. पण शहांनी शब्द पाळला नाही. व्होरा होत्याचे नव्हते झाले तेव्हाच त्यांनी हे प्रकरण बंद होईल याची काळजी घेतली. मला तर या सर्वांमागे शहाच असल्याचा दाट संशय होता. ते प्रकरण सगळ्याच भारतियांविरूद्ध पेटायला हवं होतं पण तसं झालं नाही . याच जागेत नव्याने कंपनी उघडून तिची धुरा रचनाकडे सोपवताना त्यांनी एका दगडात बरेच पक्षी मारले होते प्रोफेसर !"
" परिमल कंपनीत जो अपघात झाला त्यात चार जण जागीच गेले असले तरी तिथं पाच जण होते असं तपासात पुढे आलं. तो पाचवा एक पोरगेलासा भारतीय तरूण होता. विशेष म्हणजे त्याला कुणीच ओळखत नव्हतं, तसंच त्याची बॉडी सापडली नाही. कंपनीचे डॉक्युमेंटस मी ताब्यात घेतले. त्यात कुठेही त्याचं नाव नाही. मग तो तिथं काय करत होता हे गूढच आहे. तो वाचला असेल तर आश्चर्यच म्हणायचं इतका भयंकर स्फोट तिथं झाला होता. सुबोध एण्टरप्रायजेस नावाची एक कंपनी फ्रान्समधे आहे. शहांचा मुलगा सुबोध तिचा मालक आहे. एक्स्प्लोजिव्हच्या ऑर्डर्समधे मिळणारं प्रचंड कमिशन हे शहांच्या सगळ्या धंद्यापेक्षा जास्त आहे प्रो ! "
" तो जो भारतीय वंशाचा मुलगा होता त्याच्या शरीराचा काही अंश मिळतोय का हे पाहीलं. पण कसल्याच खुणा नाहीत. जर तो जिवंत असेल तर या केसमधे तो अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. पण तो मला कधीच भेटला नाही. स्फोट होताना पाहीलेला तो एकमेव असावा. मी ज्या साक्षी नोंदवल्या त्या स्फोटाच्या आवाजाने पळत आलेले स्टाफचे लोक यांच्या. गेटवरचा त्या दिवशीचा सिक्युरिटीवालाही दुर्दैवाने त्या स्फोटात मरण पावला आणि त्याचं रजिस्टरही गहाळ झालेलं होतं. स्फोटकांच स्वरूप, त्याचा अहवाल याबद्दल आता जास्त विचारू नका. त्याची गरज नाही . तुम्हाला हवी ती माहीती मिळालीय हे मी गृहीत धरतो "
" जॉन ! तुझे आभार या माहितीबद्दल. विशेषतः रचनाच्या पार्श्वभूमीबद्दल दिलेल्या माहीतीचा खूप उपयोग होणार आहे . तुझा तपास आणि तुझी तपासाची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. तू जसजसा तुझ्याकडची माहिती देऊन मला अपडेट करशील तसतसा या सगळ्या घटनांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोण निश्चित बदलणार आहे. "
" गुड ! प्रो. , समितीचं काम चालू होऊन तपासाचा विचका होण्याआधी आपल्या दोन तीन बैठका होणं गरजेचं आहे. आज रात्री डोनाल्डला मेल करण्यासाठी तुमच्या नव्या नोटस मला हव्यात. "
" काही हरकत नाही "
" आणि उद्या मी परत येईन तेव्हा तुमचा नवा दृष्टीकोण मला ऐकायचा आहे "
"पाहूयात ! " प्रोफेसर हसत म्हणाले.
जॉनने फाईल गाडीत टाकली आणि तो त्याच्या ऑफीसकडे निघाला. आता निवांत बसून त्याला रचना जोशी केस वाचायची होती.
*************************
रचनाने दिलेल्या साक्षीत आणि या नोंदीत असलेल्या फरकामुळे जॉन रचनावर चिडला होता. मूर्ख मुलगी ! तिला किती वेळा सांगितलं होतं काहीच लपवू नकोस असं त्याच्या मनात येत होतं. नंदिनी, राहुल हे तिच्या इतक्या जवळचे असताना त्यांच्याबद्दल तपासादरम्यान ती काहीच बोलली नव्हती. कंपनीत पुन्हा एकदा चक्कर मारायचं त्याने मनात निश्चित करून पुढे वाचायला सुरूवात केली. सिंगसरांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास त्याला माहीतच होता. पुढे पुन्हा तिचा दिनक्रम आणि इतर काही घटना होत्या ज्याची नोंद त्याला घ्याविशी वाटली नाही. काही ठिकाणी तोचतोचपणा येत होता. प्रोफेसरांना ते महत्वाचं वाटलं असेल कदाचित. त्याला प्रोफेसरांचा या केसशी कसा संबंध आला ते जाणून घ्यायचं होतं. राहुलबद्दल त्याच्याही मनात औत्सुक्य होतंच.
डोनाल्डचं त्याला एका बाबतीत कौतुक वाटलं. संदीपाला समितीत घेतल्यानं पुढचा भाग समजून घेण्यासाठी त्याला मदतच होणार होती. बॉस आपण समजतो तसे मूर्ख नसतात नेहमीच ! जॉन स्वतःलाच बजावत राहिला.
क्रमश :
चौथा आणि अंतिम भाग टंकून झालं
चौथा आणि अंतिम भाग टंकून झालं कि लगेच पोस्ट करते.
नताशा की नम्रता?
नताशा की नम्रता?
सायो थँक्स केला बदल
सायो थँक्स
केला बदल
सही ग.. मधे थोडीशी क्लॅरिटी
सही ग.. मधे थोडीशी क्लॅरिटी गेल्यासारखी वाटली (ते प्रोफेसर, जॉन आणि रचना)
पण एकूण मस्त चाल्लीये..
आवडला, उत्सुकता आहे
आवडला, उत्सुकता आहे
अतिशय अभ्यासपूर्ण
अतिशय अभ्यासपूर्ण लेखन.....मांड्णी सुरेख.....सायो+१....पुढच्या भागाची वाट पाहतेय........पुलेशु...
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत .....
छान
छान
मस्त!..... गुंतागुंत वाढली
मस्त!..... गुंतागुंत वाढली आहे ह्या भागात....पण मस्तच रंगते आहे कथा
उत्कंठा वाढली आहे ह्य भागाने.
उत्कंठा वाढली आहे ह्य भागाने. छान कथा.
प्रचंड उत्कंठावर्धक!! अजून
प्रचंड उत्कंठावर्धक!!
अजून काहीच अंदाज बांधता येत नाहीये... सुपर्ब!
मस्त गुंतागुंत वाढली आहे.
मस्त गुंतागुंत वाढली आहे. आवडली.
का कोण जाणे, पण मला तर हा
का कोण जाणे, पण मला तर हा अनुवाद वाटतोय.....
कथा रहस्यमय वाटते आहे.
कथा रहस्यमय वाटते आहे. आवडतेय.
कथा फॉलो करीत असलेल्या
कथा फॉलो करीत असलेल्या सर्वांचे मनापासून आभार
मी तुमच्या प्रतिसादाला कॉम्प्लिमेंट समजू का ? किंवा सरळ सरळ प्लीजच ओरिजिनल कथेची लिंक अथवा पुस्तकाचे नाव इथं द्या. माझे लिखाणाचे, रेफ्रंस शोधण्याचे आणि डोकं शिणवण्याचे कष्ट तरी वाचतील
प्रवासात आहे सध्या. लवकरच पूर्ण करतेय कथा.
किंग ऑफ नेट
मैत्रेयी, पुढचा भाग कधी
मैत्रेयी, पुढचा भाग कधी टाकणार?
नानबा प्रवासात होते गं..
नानबा
प्रवासात होते गं.. डोक्यात फिट्ट आहे. लिहायला सुरूवात केलीये. पण खूपच वेळ लागतोय टायपायला.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
मस्त वाढली
मस्त वाढली गुंतागुंत........... शेवट पण असाच मस्त करा.......
अरे आजच अपघाताने वाचली.
अरे आजच अपघाताने वाचली. अप्रतिम कथाबीज. खिळवून ठेवतेय. नानबा ला अनुमोदन मधे थोडिशी पकड गेल्या सारखी वाटली. पण सुंदर भाषा, आणि बांधणी. पुढ्च्या भागाची वाट पहात आहे.
मैत्रेयी, मला तुमच्या
मैत्रेयी,
मला तुमच्या लिखाणाची शैली अनुवादासारखी वाटली.
>>>>मी तुमच्या प्रतिसादाला कॉम्प्लिमेंट समजू का ? किंवा सरळ सरळ प्लीजच ओरिजिनल कथेची लिंक अथवा पुस्तकाचे नाव इथं द्या. माझे लिखाणाचे, रेफ्रंस शोधण्याचे आणि डोकं शिणवण्याचे कष्ट तरी वाचतील
हो,कॉम्प्लिमेंटच समजा. तस नसत तर कथेची लिंकच दिली असती ना??
पु. ले. शु.