अंगावरची शाल आणि स्वेटर दोन्ही एका झटक्यात काढून फरशीवर फेकून देऊन रचनाने निलयकडे पाहिले.
"मला समजत नाही की तू इतक्या पावसाळी थंडीत अशी कशी बसू शकशील? पुरुषासारखा पुरुष असून मला ते सहन होत नाही आहे.. शाल घे ती अंगावर"
क्षणभर रचनाच्या डोळ्यात आलेली काहीशी संतापाची तिडीक त्या बजबजलेल्या अंधारातील सूक्ष्म प्रकाशाची तिरीप देणार्या बल्बच्या सहाय्याने निलयला दिसली आणि त्याच्या मनात त्या तिडिकीची कारणमीमांसा करण्याची वैचारिक प्रक्रिया सुरू व्हायच्या आत ती तिडीक नष्ट होऊन त्या जागी एक दगडी निर्जीवता व पोकळीशी साधर्म्य साधणारी देहबोली रचनाने स्वीकारल्याचेही त्याला समजले.
इतक्या वेगात ठसठशीत वाटतील इतके स्पष्ट विचार व्यक्त करण्याची कुवत त्याच्या मनात असली तरी जिभेत नसल्याने तो संताप, असहाय्यता आणि कवित्व या तीन दगडांवर मनाची चूल पेटवून तिच्याकडे बघत बसला.
पावसाचे आत येत असलेले तुषार ती चूल अधिकच प्रज्वलीत करत होते.
"रचना, प्लीज शाल घे"
रचनाने शांतपणे तिच्या ग्लासमध्ये स्टरर हालवत टीचर्सचा एक भला मोठा घोट घेतला आणि निलयकडे पाहिले.
"तुझ्या या आत्ताच्या वाक्यात आपली संस्कृती दडलेली आहे निलय"
"सो यू आर इन मूड ऑफ पोएट्री अॅन्ड अर्ग्यूमेन्ट्स अं?"
"माणूस असा बदलू शकतो? पाहिजे तेव्हा मैत्रिण, पाहिजे तेव्हा कवी, पाहिजे तेव्हा सून, आई, बहिण, शरीर, पत्नी, मुलगी वगैरे?"
"रचना, ग्रेन स्ट्रक्चर एकच असते, त्याचे आविष्कार परिस्थितीप्रमाणे नवनवे असतात"
"तरीही बद्धच .... हो ना?"
"काय म्हणायचे आहे?"
यशोधनचा कॉल आला रचनाला! यशोधन स्टेट्सला होता गेले दोन महिने! तसाही इथे असता तरी काय फरक पडला असता म्हणा? त्याला रचनाच्या कवितांचा तिरस्कार आणि पत्नी म्हणून प्रेम, तिला त्याच्या अती व्यस्त शेड्यूलचा तिरस्कार आणि पती म्हणून ..... पती म्हणूनही खरे तर!
"हाय यश"
"हे हाय रचना... व्हॉट्स अप लव्ह?"
"नथिंग रिअली... आय अॅन्ड निलय आर अॅट द फार्म हाऊस"
"नि... य....यू मीन यू अॅन्ड हिम आर... देअर????.. अलोन??"
"यॅ... अलोन... "
"आय मीन... आय मीन.. रचना... आय डोन्ट नो... बट... आय मीन..."
" यू डोन्ट लाईक दॅट"
"हाऊ कॅन यू... हाऊ कॅन यू बी देअर अलोन विथ हिम रचना ?? तुला कळतंय का की याचा अर्थ काय होऊ शकतो?"
"काय होऊ शकतो? आमचे संबंध आहेत असे समाज आणि तू म्हणू शकता, मी ते नाकारू किंवा स्वीकारू शकते, यशोदाला खरे काय ते माहीत असू शकते, ती माझ्याच खोलीत झोपणार असते म्हणून, ल्हान्यालाही खरे काय ते माहीत असू शकते, तो निलयच्या खोलीत झोपणार आहे म्हणून, पण त्या दोघांनाही फसवून किंवा तुला किंवा कोणालाच न सांगण्याचे पैसे वगैरे देऊन आम्ही एकमेकांबरोबर रात्र काढू शकतो, मी आत्ता या क्षणी हेही म्हणून शकते की निलय इथे आहे असे सांगून मी तुझी गंमत केली, तो नाहीच आहे, मी एकटीच आहे इथे, मग तुला जेव्हा केव्हा भारतात यावेसे वाटेल तेव्हा आल्यावर तू येशू किंवा ल्हान्याला खोदून खोदून विचारू शकतोस कारण ल्हान्या तुमच्याकडे तू जन्माला यायच्या आधीपासून आहे कामाला! तो तुला नक्कीच खरे सांगणार हे मला आत्ताच माहीत असू शकते. याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुझ्या गडगंज संपत्तीच्या सहाय्याने मी माझे छंद आणि इच्छा तिसर्याच माणसाकडून भागवून घेतीय... आणि याचा असाही अर्थ असू शकतो की केवळ आणि केवळ कवितेवर बोलायचे म्हणून आणि पूर्ण शुद्ध अंतःकरणाने आम्ही आज फक्त गप्पा मारणार आहोत आणि त्याची मला काहीही लाज वाटत नाही... तुला हवा तो अर्थ घेऊन टूसॉनच्या थंडीत तू थंडीने आणि हेव्याने कुडकुडू शकतोस... आय डोन्ट केअर"
"व्वा रचना... मस्त ऐकवलंस अगदी... बाय हनी... हॅव अ ग्रेट नाईट ... बोथ ऑफ यू..."
"बाय... गूड मॉर्निन्ग टू यू..."
यशोधनचा शब्द अन शब्द त्या पावसाच्या आवाजातही निलयला ऐकू आला होता आणि तो पूर्ण गार पडलेला होता. पूर्ण गार पडून तो रचनाकडे पाहात होता. मधेच ल्हान्या येऊन भाजलेले चिकन ठेवून गेला.
"तू.. तुला थंडीही वाजत नाही आणि यशोधनची भीतीही नाही वाटत?"
खाडकन निलयच्या या प्रश्नाचे उत्तर म्हणून रचनाने त्याच्याकडे मान वळवली आणि ती बोलू लागली.
"निलय, तुझी ती ओळ कुठली रे? त्या ओळीमुळे माझे आणि तुझे झालेले ते वाद! ज्या वादांना कविताबाह्य व्यक्ती अव्वल दर्जाचा मूर्खपणा समजू शकेल ते वाद आणि ती ओळ! 'निसर्ग झाला तयार करण्या स्त्रीत्वाचा गौरव आता,'! हीच ना? प्रश्न हा नाही आहे निलय की कोणाला काय वाटायला हवे आणि कोणी कसे वागायला हवे! प्रश्न हा आहे की तुम्ही विरघळता की नाही? तुमचा कण अन कण या आजूबाजूच्या हवेत मिसळत मिसळत विश्वाला व्यापायची इच्छा धारण करतो की नाही? माणसाचा जन्म काही रात्रींचा! दिड इंच योनीसाठी सत्तर वर्ष घालवणारा सजीव! आपण या विश्वाचा एक भाग कधी मानणार स्वतःला? पावसाने आपण भिजू नये म्हणून आपण या व्हरांड्यात असे सुरक्षित होऊन बसायचे आणि लांबून मजा पाहायची रात्रीच्या थंडीत कुडकुडणार्या नाजूक वेलींची आणि डोंगरी झाडांची! एखादा थेंब घसट करून गेलाच आपल्याला तर पक्षी पंख फडफडवतात तसे त्वचेला फडफडवायचे! का? मुक्त कधी व्हायचे? पुनर्निमीत कधी व्हायचे? बदलायचे कधी? विरघळायचे कधी? लहानपणी आई मला नेहमी म्हणायची. काय बावळटासारखी रात्र रात्र पंकज उधासच्या गझलांची कॅसेट लावून ऐकत बसतेस आणि बाहेरच्या निर्मनुष्य रस्त्याकडे पाहात बसतेस, यामुळेच तुझे डोळे खोल गेले आहेत आणि तू रसरशीत दिसत नाहीस. मी तिला सांगायचे, आई.... वो रोज रोज जो बिछडे तो कौन याद करे... जो एक रोज न आये तो याद आये बहुत... ही ओळ ऐकून तुला काय वाटते? मग आई नि:शब्द होऊन आवरायला घ्यायची़... तिचे स्वतःचे... भर चाळिशीतही पंचविशीची दिसण्यासाठी... अचाट प्रयत्न करायची... ऑर्केस्ट्रामध्ये गायला जायची... आम्ही दोघीच राहायचो.. तिच्यामुळेच गायची सवय लागली... छंद नाही निलय... सवय... पण गाणे ही केवळ सवयच राहिली... छंद लागला तो कवितेचा... पंकज उधासने गायलेल्या गझलांचा... कठिन है राहगुजर... थोडी दूर साथ चलो... बहुत कडा है सफर... थोडी दूर साथ चलो... राही अनेकदा आईकडे यायचा... प्रेम होते दोघांचेही एकमेकांवर... राही खूप गायचा... पण मी पंकज उधास लावला की गप्प बसून राहायचा... दर वेळी माझ्यासाठी काहीतरी आणायचाच.. मुलगी मानायचा मला.. राही आईहून लहान होता... पण तिचेही त्याच्यावर खूप प्रेम होते... पण तो मेला.. तोही त्याच ऑर्केस्ट्रात गायचा.. तो मेल्यावर एकदा घरी आई रात्रभर रडली... वडील गेल्यावरही इतकी रडली नसेल... पण राही गेल्यावर रडली... मला म्हणाली... बेटा.. प्रेम आणि नाते खूप वेगळे असते... आजवर राहीने मला हातही लावला नाही... पण राही हा माझ्या मनाचा राजा होता... आणि तुझ्या वडिलांनी तुला जन्म देण्यास मला पात्र ठरवले ही एक गोष्ट सोडली तर काहीही चांगले केले नाही... पण त्यांना मला पती मानावेच लागते.. मेले असले तरीही... निलय...प्रेम आणि नाते वेगळे असते.. खरे बोलण्याची हिम्मत असावी लागते... आयुष्य हे जगण्यासाठी असते निलय.. माणूस प्रत्येक क्षणाला मरत असतो... माणसाचा मृत्यू कधी सुरू होतो माहितीय का? तो जन्माला आलेल्या क्षणापासून! प्रत्यक्ष मरणे ही फक्त फॉर्मॅलिटी! मग जगतो कधी माणूस? जेव्हा तो खरे बोलतो तेव्हा! जितके क्षण माणूस खरे बोलला तितकेच क्षण तो जगला असे मान नेहमी! हा पाऊस बघ, तो खरा आहे, त्याच्यात जो जाईल त्याला तो भिजवतोच... गेला की मग पडत नाही... त्याला खोटे बोलण्याची गरज नाही.. हा दिवा बघ... टन्ग्स्टन फिलामेन्ट पेटले की तो प्रकाश देतोच... बंद केला की बंद... हे सगळे खरे आहेत. खोटे फक्त तू, मी, ल्हान्या आणि येशू आहोत... "
निलयने शांतपणे बाहेरच्या काळोखाकडे पाहायला सुरुवात केली. कवी दोघेही होते. पण निलयमधील कवी जागृत व्हायला तासनतास लागायचे. रचनामधील कवी झोपायचाच नाही.
सत्य म्हणजे काय? हा प्रश्न प्रचंड वादग्रस्त होता. दोघेही मूढावस्थेत स्वतःला जाणवत राहिले काही क्षण!
भिजलेल्या हवेला शरीराच्या डोहात प्रवेश करायला परवानगी होती.
ओलसर शांततेला येशूच्या किचनमधील हालचाली तडे देत होत्या. रात्रीचे सव्वा दहा!
"आपणच खोटे कसे रचना?? आपणही खरे आहोतच की?"
रचनाने अंतर्बाह्य हादरल्यासारखा चेहरा करून बाहेर पाहायला सुरुवात केली.
"नको रे जिवंत माणसांना खरेपणाची लेबले देऊस! भीती वाटते. टूसॉनला आत्ता आंघोळ करत असताना यशोधन मला शिव्या देत असेल. त्याची खरेपणाची व्याख्या वेगळी, माझी वेगळी, तुझी वेगळी! सापेक्षतेला मर्यादा येतात त्या सत्याचा शोध घ्यायचा हेतू असूदेत आज रात्रीचा... "
"नवीन कविता ऐकवू?"
"नको... "
"का?"
"तुझी कविता मला कविता वाटत नाही..."
"मग कोणाची कविता तुला कविता वाटते? तुझी स्वतःची?"
"नाही... कविता अस्तित्वात नसते..."
"अच्छा... मग आपण करतो ते काय असते?"
"शब्दांच्या असहाय्यतेवर आपण बलात्कार करतो..."
"बलात्कार तर प्रत्येक क्षणही आपल्यावर करतच असतो..."
"मस्त बोललास... आवडले.. हे वाक्य कविता ठरायला माझी हरकत नाही..."
"तुला थंडी वाजत नाही आहे खरंच?"
"खूप वाजतीय... हे बघ मी कूडकुडतीय... "
"मग??"
"मग काय? उगाच काय शाली अन स्वेटर्स... "
"तू तरी ऐकव कविता..."
"हं... ऐक..."
"......"
"विराट विश्वा... धगधगत्या कणांच्या समुदायातील एक क्षुल्लकता स्वीकारताना.. तुझ्या विराटतेचा हेवा मनात होता येथेच नाळ तुटली तुझी अन माझी..."
"ही ऐकलेली आहे..."
"मग दुसरी ऐक... माझ्या हातावरची लव... माझ्या कुरुपतेला संपन्न करते तेव्हा ..."
"ऐकलेली आहे..."
"ओके... मग ही ऐक.. आज रात्री सत्यतेच्या गूढ आवरणाला एकदाच स्वीकारू... पुन्हा नाही... कारण पुन्हा हे असित्व नसेल.. ही रात्र नसेल.. हे सत्याचे आवरण नसेल... पुन्हा बघायला गेलीस तर फक्त असेल... एक बोचरेपणाने समृद्ध झालेला स्मृतीचा व्रण.... जो काळाला शरण जाईल..."
"हम्म्म्म्म...."
"निलय... मला या थंडीत घाम फुटला आहे..."
"का?"
"कारण सत्याची भीती वाटत आहे..."
"मग??"
"मी भिजते..."
"आत्ता ??"
"मग कधी भिजू?? उद्या? जेव्हा टीचर्सच्या हॅन्गओव्हरने डोके जड झालेले असेल... तू पहाटेच निघून गेल्याची बातमी देत येशूने दोन कप चहा आणलेला असेल.. हा पाऊस विधवेसारखा मूक रडून सासरी राबायला गेलेला असेल... आणि सेकंदाला साठ कोटी टन हायड्रोजन जाळून सूर्य आपल्या अस्तित्वाला पोळून काढत असेल... तेव्हा भिजू?"
"नाही... भिजण्याचा क्षण आत्ताच आहे.. कबूल..."
रचना उठली... उरलेला पेग एका दमात घशाखाली ओतून तिने व्हरांड्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला तेव्हा तिच्या सपाता कच्चकन ओल्या झाल्या. मूळापासून परिवर्तनाला सुरुवात व्हावी आणि आवेगात क्रांती होऊन जावी तसे रचनाचे पातळ वरवर भिजत गेले... शिरशिरीचे कुडकुडणे आणि कुडकुडण्याची वीज व्हावी तशी रचना पावसात दिसत होती...
"तूही ये की?"
"वेडीयस का?.. आय अॅम एन्जॉयिंग हिअर.."
"मी माझ्या बेंबीवर पावसाचे थेंब झेलतीय..."
"का?"
"सत्याशी नाळ जोडायला..."
"विनोदी बोलतेस..."
खदहदून हासत रचनाने पदर सरकवला...
"पावसाचा हेवा वाटतोय मला.."
"मला कुठेही स्पर्शतोय म्हणून???"
"हम्म्म..."
"पावसालाही तुझा वाटत असेल..."
"का?"
"भिजवणे शक्य असूनही मला भिजवत नाहीस आणि हे तुला जमू शकते याचा... ए येशू???????"
बाहेर आलेली येशू हतबुद्ध होऊन आणि लाजून ते दृश्य पाहू लागली. खरे तर तिला ते दृष्य पाहायचेच नव्हते.
अंगावर पदर नसलेल्या बाई पावसात शांतपणे उभ्या आहेत आणि निलयसाहेब त्यांच्याकडे बघत बसलेले आहेत. येशूला ते सहन होईना! उद्या साहेब आल्यावर त्यांना हे कळले तर त्यांना काय वाटेल? असली कसली ही श्रीमंत माणसे! आजच रात्री ल्हान्याला म्हणजे आपल्या नवर्याला ती सांगणार होती की हे काम आपण सोडून देऊ!
"काय बाई?"
" तू कधी अशी भिजलीयस??"
"आत या बाई... सर्दी होईल..."
"सांग ना.. तू कधी अशी भिजलीयस???"
"स्वैपाक करतीय मी बाई... मला जाऊदेत... तुम्ही आत येऊन बसा..."
येशू निघून गेली तशी रचना बाहेरूनच म्हणाली...
"बघितलीस असत्याची पुटे जी पिढ्यानपिढ्या मनांवर राज्य करतात??? तिला नाही सहन झाली ही कल्पना! तिच्यात आणि माझ्या विचारांमध्ये असलेला फरक ही कविता!"
"म्हणजे???"
"कवितेने हा फरक नष्ट करण्याचे काम करावे! "
"बरीच भिजलीस रचना... आता आत ये खरंच..."
रचना भिजतच राहिली... कुडकुडत राहिली...निलय तिला पाहात पाहात ड्रिंक घेत राहिला..
कितीतरी वेळ!
ओघळलेले लावण्य घेऊन रचना आत आली आणि अंगाचा कणही न पुसता खुर्चीवर बसली...
"काय मिळवलंस??"
"विरघळले... सत्याच्या प्रपातात... मेले मी... लाजेने नव्हे.. वाहून गेल्यामुळे.... तू कोरडाच राहिलास.. येशू भिजली... पण भीतीने... की आता काय पाहायला मिळणार... रीपीट द ड्रिंक प्लीज... बेभानतेला स्तनांच्या पोकळीत बंद करून आत आलीय... तिला आतून आधार मिळायलाच हवा... "
"फालतूपणा!"
"होय! ही रात्र, ही दारू, हे वातावरण... हा सगळा फालतूपणा अनुभवायलाच तर आपण आज इथे आलो... माझ्या नुसत्या एका एसेमेसवर तू तुझी गाडी काढून पार परगावातून स्वतःच्या बायकोशी खोटे बोलून इथे येणे आणि मी उपलब्ध असतानाही दूर राहणे हा तुझ्यातला फालतूपणा मला फार फार आवडतो..."
"आपल्यात तसे रिलेशन आहेच कुठे??"
"हो... पण खरं सांग ना... मला आज असे बघताना तुला काय वाटले??"
"किळस"
"धिस इज द ट्रूथ... की किळस आली... कारण तुझ्या मनात असलेल्या प्रतिमेला तू सत्य मानत होतास आणि तिला तडे गेले तेव्हा तुला किळस आली... हे सत्य आहे.. "
"चीअर्स.."
"चीअर्स... मी अशीच बसणार आहे... "
"उद्या अॅडमीट होशील... "
"मस्त वाटेल अॅडमीट व्हायला.."
"डोकं तरी पूस..."
"म्हणजे मग मेंदू कोरडा होत जाईल... आणि शरीर भिजलेले.... किती विचित्र...."
"तुला आज काय झालंय??? "
"मला आज काहीही व्हायला नको आहे निलय... मला आज कोणताही वैचारिक बुरखा नको आहे.. कोणताही मुखवटा नको आहे.. मी निर्वस्त्रही व्हायला तयार आहे... पण माझ्याकडे टाकला गेलेला कटाक्ष वासनिक नको आहे... खरे तर त्यात कोणतीही भावना असायला नको आहे... मी आज रात्रभर जागायलाही तयार आहे... पण मला या रात्रीचा अंत एका सकाळीमध्ये व्हायला नको आहे.. मी आज मरायलाही तयार आहे... पण माझे प्रेत कोणालातरी मिळाले आणि त्याने अंतसंस्कार केले असे व्हायला नको आहे... मी मेले हे कळल्यामुळे यशोधनने भारतात परतायला नको आहे.. माझे प्रेत असेच पडून राहावे आणि एक दिवस कणाकणाने नष्ट होत संपावे असे वाटते आहे... मी आज तुझ्या बायकोलाही फोन करायला तयार आहे... हेही सांगायला तयार आहे की तू माझ्याजवळ असून माझ्याशी संबंध ठेवत आहेस... तुझा संसार बरबाद करायलाही मी तयार आहे... पण मला त्याची उद्या उत्तरे द्यायची नाही आहेत... जे आहे ते आजच संपायला हवे... "
"व्वा"
"लावतेच गौरीला फोन.... "
निलय ताडकन उभा राहिला. रचना हासली तसा खाली बसला.
"बरबाद केलं असतंस खरच माझं आयुष्य..."
"निलय.. मी ते कधीच केलं नसतं रे... पण प्रश्न तो नाही आहे... प्रश्न काय आहे माहितीय का? की तुला इथे तर यावंसं वटतं... पण ते गौरीला सांगावसं वाटत नाही... मी माझ्या नवर्याला सांगितलं तर मात्र तुला ते दिलचस्प वाटू लागतं... तुझ्या वाटण्यावर माझं काहीही नियंत्रण नसलं तरी मला एक विचारायचंच आहे.. गौरीला न सांगता इथे असणं आणि माझ्याबरोबर राहणं हे तू एन्जॉय कसा करू शकतोस??? "
"संसार आणि खासगी आयुष्य या दोन गोष्टी भिन्न आहेत... "
"का बरे? हेच मला केव्हापासून कोणालातरी विचारावेसे वाटत आहे.. कोणाला विचारू? कोणी असे नाहीच जे खरे बोलते... म्हणजे नुसते बोलणे खरे असू शकेलही एखाद्याचे... पण वागणे नसते... वागणे खोटेच... तुला माहीत आहे? समोर एक खूप खोल दरी आहे... ????"
"हो... का???"
अचानक येशू आली अणि तिथे एक शेगडी ठेवून गेली... जाताना खाली पडलेली शाल रचनाच्या अंगावर पांघरून गेली...
"मला थंडी वाजत आहे याची तिला काळजी आहेच... पण खरी काळजी ही आहे की तू मला असे बघू नयेस... "
"तुझ्यात आहे काय बघण्यासारखं???"
"ऐक ना? ... गौरीमध्ये काय आहे?"
"खरे तर... काहीही नाही..."
"आणि दोन मुले होण्याआधी काय होते???"
"...आता विचार केला तर वाटते की... काहीही नाही...."
"तरी त्या संसाराची आणि तो 'बरबाद' न होण्याची काळजी आहेच..."
"कारण प्रेम...."
"आणि मग आपण हे जे इथे आत्ता बसलेलो आहोत ते काय आहे???"
"मैत्री..."
"मैत्री आणि प्रेम यात फरक काय???"
"मैत्री आणि प्रे.......फ.."
निलय चमकला होता खरे तर! रचना गूढ हासत होती.
"तुला सांगू निलय? प्रेम आणि मैत्री यात फरक हा आहे की प्रेम इतके महत्वाचे असते की ते कधीच तुटू नये असे वाटत असते आणि मैत्री ही तुटली तरी चालेल या सदरात मोडते....."
"मान्य आहे.."
"मग जा की निघून????"
"म्हणजे???"
"तुटले तरी चालेल असे आपले नाते आहे ना??? मग थांबतोस कशाला??? मला नाही इन्टरेस्ट अशा नात्यात"
"फाईन... निघतो..."
रात्री पावणे अकराच्या सुमारास रचनाला 'बाय'ही न करता निलय निघून गेला.
येशू आणी ल्हान्या बघतच बसले.
रचना मात्र ओल्याच अंगाने व्हरांड्यात बसून होती. आता मात्र तिला सर्दी झालेली होती. निलय निघून गेलेला पाहून येशूने पटकन येऊन रचनाचे डोके पुसायला सुरुवात केली. तोंडाने काहीतरी पुटपुटत होतीच. कशाला भिजायचे, सर्दी झाली आणि तापबिप आला तर काय वगैरे!
सव्वा अकराला ल्हान्याने जेवणाचे ताट समोर आणून ठेवले.
चिकन करी, पोळ्या , दही कांदा आणि एका लहान ताटलीत भात! इतकेच! निलयसाहेबांचा आवडता मेन्यू!
पुतळ्यासारखी रचना अंधारात कोसळणार्या पावसाकडे बघत बसली होती. विखुरलेले केस ओलसरपणामुळे गालावर चिकटून बसलेले होते. तापलेली शेगडी आणि रचनाचे मन यांची समांतरता निसर्गाला जाणवत राहिली.
बर्याच वेळाने रचनाला एक फोन आला. यशोधनचा!
"रचना... आय अॅम सिरियस... तुझे आणि त्या निलयचे.. एक्झॅक्टली काय रिलेशन आहे ते मला आत्ता.. या क्षणी समजायलाच हवे.. आय अॅम रिअली सिरियस नाऊ... हे जर असेच चालणार असेल तर आय मस्ट थिंक अगेन...."
"सेक्शूअल रिलेशन्स आहेत..."
"रचना... आय मेड अ मिसटेक आय ट्रस्टेड यू.."
"येस... इट वॉज जस्ट वन मोर मिसटेक ऑफ यूअर्स..."
"आय ... आय कॅन नॉट कन्टिन्यू...."
"आय नो... यू कॅन नॉट कन्टिन्यू व्हॉट नेव्हर स्टार्टेड..."
" म्हणजे काय??? ल्हान्या कुठे आहे???"
"तो घरी आहे... मी आणि निलय इथे दोघंच आलोयत..."
"गो टू हेल.."
"शुअर... इफ यू आर नॉट गोइन्ग टू मीट मी देअर... हा हा हा "
रचनाने खट्टकन फोन बंद केला.
आपण काय करत आहोत, काय करायचे आहे आणि का करत आहोत या विचारांपलीकडे ती गेलेली होती. दारूमुळे मुळीचच नाही. आयुष्यामुळे आणि प्रश्नांमुळे! का मान्य होत नाहीत काही काही संज्ञा कोणालच, काही काही संकल्पना का तुच्छ समजल्या जातात? यक्तीत्वाला फोफावू देण्याचे औदार्य का नाही कोणातच?
बाहेरच्या पावसाची आत येण्याची हिम्मत नसली तरीही तो थिल्लर दु:खांचे पापुद्रे भिजवून भिजवून ओरबाडत काढून टाकू लागला. हा आत्ताचा क्षण हे एकच सत्य होते. कोणीही नाही. आपणही नाही. हा पाऊस, हा अंधार, हा मिणमिणता बल्ब, ही शेगडी, ही टीचर्स आणि हे शरीर! सगळे एकच! फक्त अणूरेणूंचे वैविध्यपूर्ण आविष्कार, मानवाला स्तिमित करण्यासाठी!
ल्हान्या बर्याच वेळाने पाहून गेला तेव्हा ताटातील एक घासही रचनाने खाल्लेला नव्हता. त्याने आत जाऊन येशूला सांगीतले. येशू लगबगीने बाहेर आली.
"बाई... जेवून घ्या ना... दोन घास पोटात गेले की बरे वाटेल..."
रचनाने येशूकडे पाहिले. ग्रामीण गोडवा असलेले सौंदर्य! त्यात फक्त ठळकपणे जाणवणारी रोखठोकता! आयुष्य कसे जगावे हा प्रश्नच नाही डोळ्यांमध्ये! माझ्याच मनात का मग हे असले बिनबुडाचे प्रश्न आणि स्वतःचे लौकीक आयुष्य बरबाद करण्याची घाणेरडी प्रवृत्ती? सुख दुखतंय?
"येशू... तू आणि ल्हान्या झोपा... मला आता बोलून त्रास देऊ नका..."
रचनाचा कडक आवाज ऐकून चपापून आत जायला वळलेल्या येशूला पुन्हा हाक ऐकू आली.
"येशू???.. एक मिनिट इकडे ये... इथेच बस...."
येशू चाचरत आली. व्हरांड्यात खाली बसणे शक्यच नव्हते कारण भलतीच ओल होती. त्यामुळे घाबरत घाबरत निलयच्याच खुर्चीमध्ये बसली. दारूचा वास इतका जवळून आल्यामुळे नाक मुरडावेसे वाटले तरी मुरडले नाही.
"येशू.. तुला काय वाटते??? माझे काय चुकले??"
"कसलं बाई???"
"आज माझं काय चुकलं??.. एक मैत्रिण म्हणून बोल... कामवाली म्हणून नाही..."
"तुमचं काय चुकलंय माहितीय बाई???"
अचानक येशूच्या आवाजात एक निर्भीडता आली होती. ल्हान्याही मागच्या दरवाजात येऊन उभा राहिला होता आणि येशूला तशी बसून बोलताना पाहून अवाक झाला होता. नाव ल्हान्या असले तरी तो खुद्द यशोधनपेक्षाही मोठा होता वयाने!
"काय चुकलं येशू?"
"तुमचं हे चुकलं बाई... की तुमचं काय चुकलं हे तुम्हाला मला विचारायला लागलं... माझ्यासारखीला.."
खाडकन तोंडात बसावी तसे झाले रचनाला! व्यथित नजरेने पाऊस पीत ती मूकपणे बसून राहिली. येशू टीपॉय आवरत राहिली. पदराने पुसत राहिली.
येशू निघून गेल्यावर कितीतरी वेळ झाला असेल! तोंडाची चव घालवण्यासाठी गार झालेल्या रश्श्याची एक चमचाभर चव रचनाने जिभेवर उतरवली. झिणझिण्या आल्या. एकदम उबदार्वाटू लागले तशी तिने ती वाटीच संपवून टाकली.
पावसाचा जोर अचानक वाढला.
भुरभुर, रिमझिम, सर ... ही स्टेशने मागे टाकून 'कोसळणे' या स्टेशनावर पाऊस पोचला...
साडी वाळलेली होती... आत मात्र सर्वत्र मगाशीच भिजल्याच्या जाणिवा तशाच होत्या...
त्या सहन होईनात! आत एक आणि बाहेर एक ही अवस्था नाकारण्यासाठीच आज ती इथे आली होती...
तिला अचानक जाणवले. कविता रचताना एखादी कल्पना अत्यंत चपहल शब्दात उतरली की संभोगाचेच सुख मिळते. पंकज उधासच्या गझला ऐकताना जे सुख मिळते तेच भिजल्यानंतर मिळते! सर्वच मार्गांवरहे परमोच्च सुख एकच शारीर जाणीव देऊन जाते. तो क्षण विविध मार्गांनी मिळवता येतो. पण जी जाणीव शारीर नसते ती कशी मिळवणार?
आत एक आणि बाहेर एक!
ही अवस्था नाकारण्यासाठी पुन्हा कोसळीत गेली ती पावसाच्या! आता पाऊस मगाचसारखी अरेरावी करत नव्हता तर साम्राज्य करत होता. निथळवत नव्हता तर स्वतःचा एक थेंबच बनवत होता जो भिजेल त्याला!
ल्हान्या आणि येशू झोपून बराच वेळ झालेला असावा. फार फार लांबून आल्यासारखा ल्हान्याच्या घोरण्याचा आवाज कोठूनतरी येत होता.
मधेच लाईट गेले.
तो मिणमिणता बल्ब बंद पडला. पण भीती नाही वाटली तिला! कारण आता ती अनेक झाडांसारखीच एक झाड झालेली होती. तिच्या त्वचेवर पडणारे उग्र थंड थेंब त्वचेच्या आत जाऊण रक्तातल्या टीचर्समध्ये मिसळत इची नशा हवेत पसरवत होते. रोमारोमातून वाफा याव्यात तसे झाले होते तिला! तिची नजर अंधाराच्या गडदतेला आणखी गडद करत होती.
कसलातरी आवाज झाला.
हा आवाज तिच्या सेलफोनचा नव्हता. पण सेलफोनचाच आहे हे समजत होते.
ओह माय गॉड!
निलयचा सेल इथेच राहिला की काय????
धावत आत आली ती शेगडीच्या प्रकाशावर नजर ठेवून! त्यामुळे दिशा चुकली नाही. टीचर्सचा उरल्ला पेग तसाच होता हे आठवून तिने तो तोंडाला लावला आणि स्वतःच्या फोनच्या प्रकाशात निलयचा फोन शोधून काढला.
एसेमेस आला होता. नंबर ओळखीचा होता. मग लगेच आठवले. अरे? हा नंबर तर आपल्या सेलफोनमध्ये 'यशोधन' या नावाने सेव्ह्ड आहे नाही का??? काय एसेमेस पाठवला यशोधनने ???
हं!
"डिअर निलय.. माझ्या मनोरुग्ण पत्नीला प्रेमात फसवल्याचे खूप खूप आभार! मी तिला सोडणार होतोच... तुमच्या तिच्यावरच्या प्रेमामुळे तो मार्ग खूपच सोपा झाला... थॅन्क यू अगेन.. यशोधन"
मार्ग सोपा झाला!
मोबाईल इतकीच निर्जीव झालेल्या रचनाने दहा वेळा तो एसेमेस वाचला.
आपण मनोरुग्ण आहोत. खरच की! विसरून कसे गेलो आपण? कितीकदा फिट्स आलेल्या आहेत. असो! यशोधन काही खोटे बोललेला नाही. त्याच्यावर कशाला रागवायचे??
हे पुढचे सगळे... अरे????? हे पुढचे सगळे एसेमेस... निलयने त्याच्या बायकोला.. म्हणजे गौरीला केलेले एसेमेस आहेत... नालायक हरामखोर.... वाचू तरी किती प्रेम आहे त्यांचे ते...
अंहं!
अगदी वरचा प्रथम नको. खालपासून वाचू! म्हणजे आपल्यासारख्या मनोरुग्ण व्यक्तीला बरोब्बर लिंक लागेल.
"पोचलो.. प्रवास छान झाला... तू ठीक आहेस ना?"
"हो... ठीक आहे... लवकर झोप..काळजी घे... पुन्हा सकाळी निघणार आहेस म्हणून झोप आवश्यक...हं?"
"नक्की गौरी... बर चल.. आता गुड नाईट..."
"का? मैत्रिणीसमोर मला एसेमेस करायला नको वाटते? हा हा हा"
"नाही गं.. तसं नाही.. पण तुला माहीत आहे ना? की मी तिच्यावर प्रेम करतो ते.."
"आणि माझ्यावर?"
"दोघींवर प्रेम असणे हा काही गुन्हा नाही हे तुला केव्हाच पटलेले आहे ना गौरी?"
"हो रे बाबा, बर चल गुड नाईट.. मला तुझा राग नाही येत निलय.. प्रेमात राग वगैरे भावना नसतातच"
"मेनी थॅन्क्स.. पण खरे तर... मला तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही वाटते.."
"असेल असेल... चल आता भरपूर गप्पा मारा आणि तरी लवकर झोपा.. मला माहीत आहे की तुझे तिच्यावर'तसे' प्रेम नाही आहे ते"
"असं काही नाही.. वेळ पडली तर 'तसेही' प्रेम करेन..."
"हं... आला लाडात... चल बाय..."
"बाय डार्लिंग.."
"कुठे आहे ती???"
"आत आहे.. येईल थोड्या वेळाने...बाय.."
"नक्की ना??"
"हो गं बाई..."
"चिडला शेवटी.. चल बाय... "
"बाय..."
रचनाच्या अंगावरून निथळणार्या पाण्याच्या थेंबांनी सेलफोन भिजला निलयचा! तिच्या डोळ्यातले पाणी पावसाला खारट करण्याच्या निष्फळ प्रयत्नात वाहून गेले.
आता रिटर्न जर्नी सुरू झाली होती पावसाची. कोसळ या स्टेशनावरून तो पुन्हा 'सर'या स्टेशनाकडे निघाला होता.
रचनाला जाणवले. की पाऊस नंतर रिमझिम, भुरभुर या स्थानकांना मागे टाकत पसार होईल! मग काहीच उरणार नाही. त्याच्या खुणांशिवाय!
आणि आपल्याशिवाय!
आपण म्हणजे काय?
आपण म्हणजे नक्की काय? येशूनी दाखवलेली चूक म्हणजे आपण ???
यशोधनने सोडलेला मानसिक विकार म्हणजे आपण?
निलयने गौरीला केलेला एक एसेमेस म्हणजे आपण?
हा खोल खोल भिजवणारा पाऊस म्हणजे आपण?
हे शरीर???
हे शरीर पुन्हा उरलेल्या पावसात नेऊ!
पावसाचा उलटा प्रवास पाहू. पावसाला मरणासन्न वृद्धाप्रमाणे क्षीण होताना पाहू.
आह!
काय मस्त वाटते आहे. आता पाऊस आपल्या अंगाशी झोंबताना त्याचा दिमाख विसरलेला आहे. एखादा थेंब केसातून मानेवर येताना वाळवंटातून गावात प्रवेशणार्या घोडेस्वारासारखा थकलेला आहे. आता सुरू होत आहे माझा दिमाख! माझ्या दिमाखदार शरीराचा, प्रतिभासंपन्न मेंदूचा दिमाख!
अजून एक पाऊल! अजून एक पाऊल! इकडून निलय गेला... इथे लॉन आहे... व्वाह... लॉन संपली... कुंपण...
कैकदा तारेतून आपण अशा पलीकडे गेलो आहोत... दरी बघायला... आजही जाऊ... हे काय????
गेट??? गेटचा आवाज??? कोण आले??? ओह... फोन घ्यायला निलय आला की काय??? अं???
हो... तीच ती निळी मारुती... आला की??? आता पुन्हा कुंपण ओलांडून आत जायचे??
आज त्याला मिठी मारूयात?? मारूयात?? नको... त्यांच्या एसेमेसचा दर्जा घसरेल... त्यातील सत्य संपुष्टात येईल...
मला सत्य शोधायचे आहे... नष्ट करायचे नाही आहे...
शारीर जाणिवा सगळ्याच घेऊन झाल्या... आता मानसिक जाणिव हवी आहे...
पंकज उधास... गा ना रे???? गा प्लीज... फॉर हेवन्स सेक गा... गातोस???
ये एक शबकी मुलाकातभी गनीमत है
किसे है कलकी खबर... थोडी दूर साथ चलो...
वा वा... थोडी दूर साथ चलो रचना... जस्ट अगदी थोडी दूर...
काय हा पिसाट वारा...
लाईट आले??? अरे बाप रे... किती लांबवर तो निलय उभा आहे आणि बहुधा स्वतःचा फोन हातात घेऊन मेसेजेस वाचतोय... त्याला आपण दिसणे शक्यच नाही...
पंकज उधास... गा ना रे??? गा?????
तू जा रहा है तो तनहाईयाँभी लेता जा
ये ताल्लुकातकी परछाईयाँभी लेता जा
आह!
गार वार्याला आपली उब हवी आहे... पावसाला आपली शुष्कता...
इतीतरी गोष्टी आहेत या मनोरुग्ण स्त्रीकडे ज्या कितीतरीजणांना हव्या आहेत... यशोधनला नको असल्या तरी... येशूला चूक वाटल्या तरी...
दर्दकी बारिश सही मद्धम जरा आहिस्ता चल
दिलकी मिट्टी है अभीतक नम... जरा आहिस्ता चल...
"ल्हान्या...... बाईसाहेब कुठायत???"
शी:! किती किंचाळतो हा निलय! दरवाजाही किती जोरात आपटतोय! का घाबरला आहे इतका?
उठला वाटते ल्हान्या! येशूही! बावळट कुठले! एका वेडीला शोधतायत!
मला रडू येतंय की हसू?
काय होतंय मला????
हेच ते... हेच ते पाऊल.. बहुतेक... बघू बरं??? हं... हेच... यापुढे काही नाही...
एक नीरव शांतता.... भयाण वार्याचा भयाण आवाज... भयानक एकांत... आणि सुंदर अंत...
ये दुनिया.. ये मैफिल.. मेरे कामकी नही....
विराट विश्वा... तुझ्या धगधगद्त्या क्षुल्लकतेचा स्वीकार मी का करावा??
मानसिक जाणिवेच्या निर्घृण आकर्षणा... मीच होतीय आता तुझे आकर्षण!
टाकले पाऊल!
पहिल्यांदा घसरले... मग पूर्णच तोल गेला... मग ठेचकाळले.. भिरकावले जात आहे.. किती सुंदर...
सगळे संपत असतानाचे सुखही त्या सर्वोच्च सुखासारखेच का असते????
आह!
आता कुठे खरी हवेत फेकले गेले... आता कुठेतरी पडेन... आणि मग... नष्ट होण्याची सुखद प्रक्रिया अनुभवेन...
बाय यशोधन!
==========
-'बेफिकीर'!
मी पहिला .. कथा मस्त जमली
मी पहिला .. कथा मस्त जमली आहे. पु.ले.शु.
२० पेक्षा जास्त ओळी आहेत
२० पेक्षा जास्त ओळी आहेत
खुप च मस्त !!!
खुप च मस्त !!!
स्पीचलेस.
स्पीचलेस.
नन्ना + १
नन्ना + १
कथा अतिशय आवडली.
कथा अतिशय आवडली.
अजून एक मानवी गुंतागुंत
अजून एक मानवी गुंतागुंत दाखवणारी गृहशोभिका छाप बायकी कथा
आह! सुरेख!!!
आह!
सुरेख!!!
अगदीच घिसापिटा एंड
अगदीच घिसापिटा एंड केलात....नाही आवड्ली...प्रचंड प्रेडिक्टेबल...
रचना आनी यशोधन मधील नाते
रचना आनी यशोधन मधील नाते भावनिक रित्या कसे होते ते समजले नाही. रचनाच्या अशा वागन्यामागचे कारन कलले नाही.
लोक्स काहिही
लोक्स काहिही म्हणोत्....आपल्याला lai आवड्ली.....
मनातील गुंतागुंत शब्दात
मनातील गुंतागुंत शब्दात बरोब्बर पकडणं महाकठीण्..पण हे कसब बेफिंना अप्रतिमपणे साधलंय..
कथा म्हणून नाही आवडली पण उससे क्या फरक पडताय..
अर्थहीन वाटली. तुमची ही पहिली
अर्थहीन वाटली.
तुमची ही पहिली कथा असेल जी मला नाही आवडली.
माणुस जेव्हा खूप आत्मकेंद्री होतो ना तेव्हा तो रचना सारखा वागायला लागतो.
अशा मानसाला समाज सहसा जवळ करत नाही. आणि करावही का?
तुमची रचना ही फक्त एक विक्रुती वाटते.
अर्थात हा माझा कथेविषयीचा द्रुष्टीकोन आहे. एक वाचक म्हणून.
माझ्या मनाला खुप भावली. कारण
माझ्या मनाला खुप भावली. कारण मला असे वाटतेय कि जी व्यक्ती मनोरुग्ण असते ना, तिचे विचार हे स्वैर आणि असंयमी असतात. स्त्रीयांचे जे भावनिक जग असते ना ते एक स्त्री ही समजु शकत नाही तर कोणत्या पुरुषांनी ह्या भावना समजणे फार कठिण आहे. अशक्यचं आहे. बे.फि. नी त्या खुप चांगल्या समजुन घेतल्या आणि जाणिव ह्या कथेतुन मांडल्या त्याबद्दल त्यांचे शतःशा आभार.
ज्या नवर्याला आपल्या बायकोला नक्कि काय हव आहे हे जेव्हा समजते ना, तेच खरे सुखी दांपत्य म्हणुन जीवन कंठु शकतात. ९८% नवर्यांना कधी कळतचं नाही कि त्यांचा बायकांना नक्कि कधी काय हवं आहे.
पु.ले.शु.
लिहित राहा........... वाचत राहु...............!
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
बे.फि. जि मि तुमच्या लिखानाचा
बे.फि. जि मि तुमच्या लिखानाचा फ्यान आहे !
पन लिखान थोडे आति उच्च आसावे आसे वाटले!
कारन सर्व सामान्य वाचकाला बरेचसे समाझले नाहि !
आसे माला वाटते ! राग मानु नका !
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
(बे.फि.चा.पंखा..........)
चातक | 15 January, 2012 -
चातक | 15 January, 2012 - 19:53 नवीन
धन्यवाद!!!...........???????
कथा..छानै!!! आवडली
नाही आवडली.
नाही आवडली.
आवडली व न आवडली या सर्व
आवडली व न आवडली या सर्व दिलखुलास व प्रामाणिक प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार!
-'बेफिकीर'!
आवड्ली. रचना चे प्रेमबद्दल
आवड्ली. रचना चे प्रेमबद्दल असलेले पहिले भाशण फारच खरे जाणवले!
धन्यवाद! शाम यांच्या 'एक
धन्यवाद! शाम यांच्या 'एक पान... गळालेलं' वरून ही कथा आठवली म्हणून वर आणली.
शाम | 16 January, 2012 -
शाम | 16 January, 2012 - 08:44
चातक | 15 January, 2012 - 19:53 नवीन
धन्यवाद!!!...........???????<<<
शाम, तुम्ही मायबोलीवर यायच्या आधीची ही बाब असावी, की मी लेखन प्रकाशित केले म्हणून चातक धन्यवाद द्यायचे. ते दुबईत असतात. त्यांचा फोन नंबर माझ्याकडे आहे. तो हवा असल्यास देतो. तो माझा आय डी नाही. काहींनी तसे काहींच्या विचारपुशीत आणि स्वतःच्या धाग्याखाली म्हणून आरोप करायचा प्रयत्न केलेला होता. पण चातक हे गगोकर असून अनेक गगोकर त्यांना व्यवस्थित ओळखतात.
खुप छान
खुप छान
कथा आवडली. रचना मनोरुग्ण
कथा आवडली.
रचना मनोरुग्ण असेलही.पण मनोरुग्ण झाले म्हणून भावना खोट्या नाही ठरत.
एखादी गोष्ट मनाला खूप खोलवर झोंबून जाते, तेव्हा माणूस मनोरुग्ण होत असेल.
रचनाची काही वाक्य जळजळती आहेत,पण खरी आहेत.
मुखवटे घेऊन फिरणारी माणसं आपण सगळी.
तोंडावर एक आणि मनात एक
आणि त्याहून वाईट गोष्ट हि कि,आपण हे मान्य करायला हि तयार होत नाही.
असो.
कथा आवडली.मस्त
तुमच्या पंख्यात अजून एक पंखा वाढला.
धन्यवाद
धन्यवाद
बरीच वाक्यं कोट करण्यासारखी
बरीच वाक्यं कोट करण्यासारखी आहेत.
तुमच लिखाण डोक्यान वाचल तर दिग्मुढ व्हायला होत नि मनानी वाचल तर हतबल !
हॅटस ऑफ टू यू.
>>भयानक एकांत... आणि सुंदर
>>भयानक एकांत... आणि सुंदर अंत...
कथेचाही ,कथानकाचाही.
कथा आवडली.
ही कथा वाचली नव्हती... कथा
ही कथा वाचली नव्हती...
) पण प्रचंड आवडली...
कथा पटली नाही (बर्याच कथा पटत नाहीच बर्याचदा ...हताश शेवटामुळे
कातील गझल.... एकटेपण, पाऊस.... हे कॉम्बीनेशनच जीवघेणं आहे आणि ती त्यामागची आर्तता सहीसही उतरलेय...
रचना आणि निलयचा संवाद (त्याहीपेक्षा जास्त रचनाचं निलय समोर असतानाचं स्वगत) फार आवडलं
बेफि... तुमच्या बर्याचशा कथा, लेख पटत नाहीत... (मी कदाचित ऑर्थोडॉक्स असेन
) पण त्याच वेळी त्यातल्या काही प्रचंड आवडून जातात
अजब आहे 
निवडक १० त. धन्यवाद !
निवडक १० त.
धन्यवाद !
ज्या नवर्याला आपल्या बायकोला
ज्या नवर्याला आपल्या बायकोला नक्कि काय हव आहे हे जेव्हा समजते ना, तेच खरे सुखी दांपत्य म्हणुन जीवन कंठु शकतात. >>
आणि जेन्व्हा बायकोलापण समजते ना कि 'आपल्या' नवर्याला काय पाहिजे ..... तेन्व्हा ते खरे समाधानी होतात !!!
बाकि चालु दे....प्रत्येकाला वाटते आपले ते खरे. मग मिच का अपवाद असावे.
Pages