अनुज बिडवेसंबंधीची बातमी मी गेले काही दिवस फॉलो करते आहे.
त्या घटनेतलं कारुण्य दुर्लक्षित करायचं नाहीच. पण तरीही परदेशात राहून शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दलचे इतर अनेक विचार डोक्यात घोळतायत. माझा मुलगा येत्या चार वर्षांत पदवीधर होईल. त्यापश्चात त्याच्यापुढेही परदेशी शिक्षणाचा पर्याय खुला होईलच. त्यामुळे तर सध्या त्या बातमीशी, संबंधित तपशीलांशी मी अधिक रिलेट होते आहे.
परदेशी विद्यापीठांतल्या प्रवेशपध्दती, त्यासाठीची अर्थयोजना, व्हिसाची तयारी या बाबींबद्दल उघड चर्चा होतात, सल्ले मिळतात. मात्र विशीच्या उंबरठ्यावरच्या मुलांच्या तिथं जाऊन राहण्यासाठीच्या मानसिक तयारीविषयी फारसं काहीच बोललं जात नाही.
यासंदर्भात आजच्या लोकसत्ता-करियर वृत्तांत पुरवणीत एक चांगला लेख आला आहे.
लेख वाचताना जाणवलं की मायबोलीवर असे अनेक आहेत की ज्यांनी परदेशात शिक्षण घेतलेलं आहे.(माझ्या नजरेसमोर पहिलं नाव आलं ते अॅंकीचं.) तर हा धागा त्यांचे अनुभव, विचार ऐकण्यासाठी आहे.
आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी मुळीच पाठवू नये असं मी आजही म्हणणार नाही. पण त्यासाठीच्या मानसिक तयारीकडे अधिकाधिक लक्ष पुरवावं हा आग्रहही धरेन.
तर,
- परदेशी शिक्षण घेऊन भारतात परतलेले
- परदेशी शिक्षण घेऊन आता अर्थार्जनासाठी परदेशातच वास्तव्य असलेले
- भारतात शिक्षण घेतलेले पण आता परदेशातल्या वास्तव्यात या प्रकारच्या बाबी संवेदनशील मनानं टिपणारे
अशा सर्वांचं मतप्रदर्शन इथे अपेक्षित आहे.
‘संशोधनक्षेत्रातले मायबोलीकर’ या धाग्यावर ज्याप्रमाणे निखळ चर्चा आणि अनुभवांची देवाणघेवाण होते, त्याच प्रकारची चर्चा इथे होईल अशी आशा आहे. (प्रतिसाद देण्यापूर्वी दिलेल्या लिंकवरचा लेख संपूर्णपणे वाचावा ही नम्र विनंती. कारण त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानंच इथली चर्चा अपेक्षित आहे.)
धन्यवाद.
'अनुज बिडवे'नंतर...
Submitted by ललिता-प्रीति on 9 January, 2012 - 01:34
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
युरोपचं माहित नाही पण
युरोपचं माहित नाही पण अमेरिकेत तरी कुटुंबसंस्थेचं अवास्तव उदात्तीकरण आपल्याइतकं नसलं तरी मी जेवढे लोक पाह्यलेत ते कुटुंबसंस्थेला मानणारे आहेत. अर्थात त्यांची कुटुंबसंस्था वैयक्तिक निर्णयांवर हावी होत नाही एवढेच.
ललीता , टवाळ + १
ललीता , टवाळ + १
माझं तेच म्हणण आहे की जास्त
माझं तेच म्हणण आहे की जास्त करुन तिकडची मुलं आर्थिक आणि सामाजिक द्रुष्ट्या स्वतंत्र असतात. त्यांना आपल्या मुलां येवढा कुटुंबाचा सपोर्ट नसतो. जेवढी मदत (कधी कधी त्या मुलाला पंगु बनवेल येवढी) आपण आपल्या मुलांना करतो, तेवढे पाश्चात्य करत नाहीत किंवा ती त्यांची संस्क्रुती नाही. ते मानसिक आणि वैयक्तीक स्वातंत्र्य प्रमाणाबाहेर मानतात. दोन्हीचा अतिरेक वाईट. आपली मुलं आपल्याला ग्रुहीत धरतात. मुलगा लांब आणि त्यातही परदेशात शिकायला जाणार ह्याची झींग काही वेगळीच असते. त्या भावनेच्या भरात कधी कधी न झेपेल अशी कर्ज काढली जातात. ( अनुज च्या वडिलांनी पण २० लाखाचं कर्ज काढलं आहे) आपण परदेशी शिक्षणाला फार महत्व देतो ( कधी कधी एखाद्या क्रेझ मुळे). परदेशात उच्चशिक्षण ही चैनीची बाब आहे. कारण त्यांच्या साठी ते महाग आहे. कारण फार थोड्या मुलांच्या शिक्षणाचा भार त्यांचे पालक उचलतात.
माझा नवरा एका प्रख्यात अमेरीकन कंपनीचा भारतातला फायनांन्सचा मुख्य म्हणुन काम पहात होता. जेंव्हा तो पहिल्या ट्रेनींगला अमेरीकेत गेला, तिकडे त्याच्या सारखे बरेच इतर देशातील मुख्य आले होते. एकंदर बघता माझा नवरा त्यांच्यात सर्वात तरुण आणि खुपच शिकलेला होता. बाकिचे बरेच ( जे युरोप, कॅनडा, दक्षिण अमेरीका, तुर्कस्तान इथुन आले होते) जण त्याच कंपनी मध्ये अनेक वर्ष घालवलेले, वर वर चढत गेलेले होते. त्यांच्या शी बोलताना हेच जाणवलं. की उच्च शिक्षण तिकडे फार कमी लोक घेतात.
>>अनेक मुल स्वतंत्र पणे आपली
>>अनेक मुल स्वतंत्र पणे आपली वाटचाल करत असतात. त्यांन्ना मॉरल सप्पोर्ट साठी मित्र मैत्रिणीं शिवाय कोणीच नसते. मग कुठे तरी भारतियांचा तिरस्कार सुरु होतो. आणि मग असे हल्ले होतात.<< माफ करा पण मॉरल सपोर्ट्चा आणि भारतीयांच्या तिरस्काराचा काही संबंध असेन असे वाटत नाही...
हा वाचा चांगला अनुभव-१
आमचे (मी आणि माझा मित्र)सहपरीवार ब्यू-माऊंटन या पर्यटन स्थळी जायचे ठरले. पण माझ्या गाडीला अपघात झाल्याने आम्ही तेव्हा 'बे'कार होतो. मग आम्ही ट्रॅव्हल्स बरोबर जायचे ठरले. बस माझ्या गावापासुन फक्त ३ स्टेशन पूढे असलेल्या कटूंबा या गावावरुन होती. त्यावेळी बायकोला ५वा महीना होता. मित्राच्या गाडीत एक जागा होती मग बायकोला त्या गाडीत कटूंबाला पाठवले. मी व माझी मुलगी ट्रेनने जाऊन त्यांना जॉईन होणार होतो. प्लॅट्फॉर्मवर मुलीशी गप्पा मारत, गाडीत चढलो. तीला सांगतोय 'अरे ही गाडी नेहमीपेक्षा वेगळीच आहे' २-३ मिनिटातच टि़कीट्चेकर जवळ आला, टिकीट हातात घेऊन नसती चौकशी करू लागला. मला पण राग आला, अन माझा आवाज पण वाढला. पण त्याने मात्र शांत पणे सांगितले, की तुम्हाला जी ट्रेन पकडायची होती ती ही नव्हे, तीला अजुन ३ मिनिटे अवकाश होता. ही ईंटरस्टेट ट्रेन असुन तीला कटूंबाचा स्टॉप नाही.
मग मात्र माझे तोंड पडले, मूलीशी बोलण्याच्या नादात ३ मिनिटांचा अवधी लक्षात आला नव्हता.
चेकरने मात्र शांत पणे सूचना केली की या जागेवरून हलू नका, मी येतोच. ३-४ मिनिटातच तो परत आला, आणि सांगू लागला "मी ही ट्रेन कटूंबाला थांबवण्याची व्यवस्था केली आहे, संबंधीत ट्रेन स्टेशनला त्याबाबत कळवले आहे. आता माझ्या मागे केबिनमधे या, फक्त माझ्या केबिनचे दरवाजे उघडतील, तूम्ही ऊतरलात की लगेच ट्रेन मार्गस्थ होईल"
हे सांगतांना ना आवाजात ऊपकार, त्रासिकपणा जाणवला ना चेहर्यावर! अगदी हसत खेळत आम्ही निरोप घेतला. (जातांना त्याला २-३ वेळा धन्यवाद दिलेच पण मनातून किमान ५० वेळा)
कुठेही गेलाततरी तेथील local
कुठेही गेलाततरी तेथील local मुलांशी मैत्री करावी.
facebook किंवा orkut वर खरीखुरी माहिती कळत नाही. फक्त त्यावर अवलंबून राहू नये.
पाकिटात student ID card ठेवावे. बरेच भुरटे विद्यार्थीदशापाहून सोडून देतात.
चंबू, हेच जर तुमच्या जागी
चंबू, हेच जर तुमच्या जागी एखादा विद्यार्थ्यांचा ग्रूप असता तर तो प्रसंग असाच घडला असता का? संसारी पुरूष, सोबत एक मुलगी म्हटल्यावर दोन्ही पार्ट्यांचा बोलण्याचा सूर निराळा होतो. त्याच जागी कॉलेजविद्यार्थी असते तर बाचाबाची अधिक झाली असती, गरम रक्तापायी तोंडातून काही अद्वातद्वा शब्द बाहेर पडले असते तर मग त्याचं पर्यवसान कशात झालं असतं ते सांगणं कठीणच आहे.
म्हणूनच मी वरती हेडरमधे लिहिलंय की विशीच्या उंबरठ्यावरच्या मुलांची मानसिक तयारी हा मुद्दा कळीचा ठरतो.
एक व्यक्ती अन समूदाय, दोहोंचा
एक व्यक्ती अन समूदाय, दोहोंचा एकत्रीत विचार करणं चूकीचं होईल. समूदाय ही जर एक entity धरली तर तीला अक्कल नसते (माझे मत!). पण व्यक्ती म्हणून आपण आपण त्यात कितपत सहभागी व्हायचे हे भान असायलाच हवे नाही का? माझ्या ठिकाणी जरी एखादा विद्यार्थी असला असता तरी विशेष फरक पडला नसता हे नक्की, तथापी, याच ठिकाणी एखादा विक्षिप्त गोरा जरी असला असता तर मात्र नक्कीच वाद झाला असता. वयापेक्षा वेळेचे/ बोलण्याचे/ त्या जागेच्या रितीरीवाजाचे तारतम्य महत्वाचे. म्हणुन विशीच्या उंबरठ्यावर आल्यावर मानसिक तयारीची गोष्ट करण्यापेक्षा अगदी टिनएज पासुनच सुरवात केलेली बरी. मुलांना समाजात योग्य तेवढे रूळवले असले पाहीजे. मग नंतर घरा बाहेर पडले की आपोआप या गोष्टींचे आकलन होऊ लागते. मला इथल्या कॉलेज जीवनाचा खुप जवळचा संबंध नाही पण तरी मला वाटते की कॉलेजचा विद्यार्थी म्हणजे गरम रक्त असा सरसकट नियम लावता कामा नये.
सुखद अनुभव हे विद्यार्थी
सुखद अनुभव हे विद्यार्थी म्हणून परदेशात असताना आलेलेच लिहायचेत ना?
नीधप, मूळ लेखाची तळटीप ३ व
नीधप, मूळ लेखाची तळटीप ३ व प्रतिक्रीया "त्याचबरोबर काही सुखद अनुभवही हवे आहेत", यावरून वरचा अनूभव सांगितला आहे.
नीरजा, हो. तू तुझे विद्यार्थी
नीरजा, हो. तू तुझे विद्यार्थी असतानाचे अनुभव टाक ना अजून.
आत्ता अँकीचाही फोन आला होता. त्यालाही लिहायला सांगितलंय.
वाचते आहे.. काळजी वाटते हे
वाचते आहे..
काळजी वाटते हे मान्यच. पण जगाच्या पाठीवर कुठेही तसा थोडासा धोका असतोच ना? अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही?
एवढ्या तरूण मुलांना आता गांधीजींच्या मातेसारखं वचन द्यायला थोडंच लावणार.
आम्ही कॉलेजात होतो त्यावेळेला म्हणत की रात्री डेक्कनवर अमली पदार्थ विकत मिळतात. आणि आम्ही हॉss असे म्हणून ऐकत असू. खखोदेजा.
ऐकायला कसंतरी वाटतं पण वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे simply wrong place at the wrong time.
दरवेळेला सावधान/सतर्क राहणे कोणाला शक्य नसते, पण हो... मधुन मधुन चेतावनी आवश्यकच.
आणि देशातही तेच लागू पडते.
देशातही समजा कोणाचा पाय लोकलमधून घसरला, एकट्या मुलीवर हल्ला झाला, कॉलेजातील गँगच्या मारामार्यात कोणी जखमी झाले, वाईट संगतीत पडले, फार कशाला रॅगींगचे शिकार झाले, प्रेशर/ कॉम्पीटीशन सहन झाले नाही.. कित्तीतरी गोष्टी होऊ शकतात.
थरकाप होतोच पण याला देश हा घटक कितीसा कारणीभूत असणार (अगदीच वांशिक संघर्षाच्या देशांचा अपवाद वगळता).
ओके.
ओके.
वर सगळ्यांनी बरेच मुद्दे
वर सगळ्यांनी बरेच मुद्दे लिहिलेच आहेत.
अनुज बिडवे जिथे होता तिथून थोड्या अंतरावरच्या गावात मी ३-४ वर्ष नोकरी केली आहे. हा भाग बेरोजगारी, गरीब आणि मादक पदार्थांची देवाण्घेवाण याबद्द्ल कुप्रसिद्ध आहे. त्यातून मँचेस्टर सारख्या जवळच्या मोठ्या शहरात पाकिस्तान समुदायाची वस्ती खूप आहे. काही काही भागात तर अक्षरशः हा इंग्लंडचा भाग आहे हे जाणवत नाही.
घेटोगिरी करणं टाळावं, सगळ्यांशी मिळून मिसळून असावं. त्याच्बरोबर बिइंग फ्रेंडली आणि बिइंग फ्रेंड्स विथ यामधला फरक समजून व्यवहार करावेत. भीक देणं टाळावं ( टीनएजर्स ला तर अजिबात देउ नये ) . 'किती वाजलेत' या प्रश्नाचं उत्तर बर्याचदा मोबाइल मधे वेळ बघून दिलं जातं ...टाळावं .
नको तिथं ( ट्रेन, बस इ. सार्वजनिक ठिकाणी ) आपली कितीही योग्य वाटत असली तरी राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक मतं ठासून मांडू नयेत....इतर कोणी मांडलं तर अॅग्रेसिव्हली रिअॅक्ट होउ नये, योग्य शब्दात प्रतिवाद करावा ( तेही नेहमीचा ग्रुप असला तर ). आपल्या वागण्यातून टॉलरंस दाखवणं गरजेचं आहे. याचा अर्थ वाटेल ते ऐकून घेणं नव्हे तर अॅटलिस्ट समोरचा काय म्हणतोय ते ओपन माइंडनं ऐकून घ्यावं. लिव्ह अँड लेट लिव्ह अॅटिट्यूड ठेवावा, लोकांच्या वैयक्तिक भानगडीवर भाष्य्/चर्चा करू नयेत.
आपली चूक जर कोणी नजरेस आणून दिली तर 'तो माणूस रेसिस्ट आहे' असा उगीचच समज करून न घेता विचारपूर्वक कृती / भाष्य करावं.
पाश्चिमात्य देशांतील कुटुंब व्यवस्थेबाबत भारतात जसं चित्र प्रदर्शित केलं जातं ती अतिशयोक्ती आहे.
ललिता जी..... अतिशय उत्तम
ललिता जी.....
अतिशय उत्तम धागा काढला आहे आणि परदेशात शिक्षण घेउन आता मी इथे नोकरी करत आहे त्यामुळे हे माझे काही विचार.....
१. ज्या भागात आपण रहात आहोत तिथे crime rate website वर पहाणे....
२. रात्री उशिरा फक्त आत्यंतिक गरज असतानाच बाहेर पडणे.
३. महागड्या वस्तू रात्र्री जवळ न बाळगणे.......
४. काही प्रमाणात रोख रक्कम सदैव जवळ ठेवणे........ (हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. जरी कोणी लुटायला आले तरी अशी थोडीफार रक्कम देता येते व जीव वाचवता येतो)
५. लुटायला कोणी आले तरी आपल्या जवळचे सर्व काही देणे........प्रतिकार/भांडण मुळीच करू नये......
अनुजची हत्या जिथे झाली तिथे माझा सख्खा भाऊ १ १/२ वर्षे शिकायला होता (salford university )....... त्याला तिथे racism चा अत्यंत त्रास झाला. माझ्या वाहिनीला देखील फार त्रास झाला......
माझ्या प्रतिसादातील गृपमध्ये
माझ्या प्रतिसादातील गृपमध्ये बोलण्याचा (बाहेर न बोलण्याचा) अर्थ वेगळा घेतला गेला आहे असे जाणवले.
माझ्यावेळीस तरी अगदी नावालाही कोणी भारतीय विद्यार्थी नव्हते (किंवा ते वेगळ्या कोर्सेसना असतील). माझ्या कॉलेजची वेळ रात्रीची असल्याने व कॉलेज हे जंगलात असल्यासारखे होते (आहे). कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त एकटीने पाच दहा मिनिटं गप्पा मारत रात्री उभी रहात नसे एवढेच म्हणायचे होते. बाहेर हाय आणि हॅलो म्हणायच्या वेळेस मान फिरवून जात नसे. सगळा गृप हा योगायोगाने फक्त अमेरिकन विद्यार्थ्यांचाच होता. तुम्ही कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता, कॉलेज गावाच्या कोणत्या भागात आहे, तुमचा येण्या जाण्याचा मार्ग कोणता आहे,कॉलेजची वेळ, देशातील/ परदेशातील बदलते सिझन्स यावरही गोष्टी काहीप्रमाणात बदत असतात.
चिमण चा प्रतिसाद आवडला. रैना
चिमण चा प्रतिसाद आवडला.
रैना अनुमोदन. देश काय परदेश काय कोणत्याही नविन ठिकाणी गेल्यावर तिथल्या परीस्थितीप्रमाणे कॉमन सेन्स बाळगणे जरूरीचे आहे. परीस्थिती माहित असुनही कधी कधी चुका होतात. त्याला काय करणार? सतत १००% सतर्क रहाणे अवघड आहे. अपघात, मारामार्या तर काय पुण्या मुंबईत पण होतात, बाकी ज्याचे त्याचे नशिब.
रैना, अगदी बरोबर. काळजी,
रैना, अगदी बरोबर.
काळजी, थरकाप यांपेक्षाही संभाव्य धोके आणि ते टाळण्याचे उपाय हे identify झाले पाहिजेत असं मलाही वाटतं.
जसं तू - देशातही समजा कोणाचा पाय लोकलमधून घसरला, एकट्या मुलीवर हल्ला झाला, कॉलेजातील गँगच्या मारामार्यात कोणी जखमी झाले, वाईट संगतीत पडले, फार कशाला रॅगींगचे शिकार झाले, प्रेशर/ कॉम्पीटीशन सहन झाले नाही. - हे मुद्दे identify केले आहेस, तसेच.
शिवाय मला असंही वाटतं की धोके म्हणजे निव्वळ जिवावरचे धोकेच असं नव्हे. मनमोकळं वातावरण नसणं हा सुध्दा एक indirect धोकाच आहे की. किंवा वर निशदे यांनी म्हटल्याप्रमाणे racismचा त्रास.
बहुतांश भारतीय लोकांच्या तनामनात जशी जातपात भिनलेली आहे, त्याचप्रमाणे पाश्चात्यांच्या तनामनात वर्णद्वेष भिनलेला आहे (का?)
तर अशा indirect धोक्यांना identify करणंही मला तितकंच महत्त्वाचं वाटतं.
लले, २५००० पौण्ड हा अख्ख्या
लले, २५००० पौण्ड हा अख्ख्या वर्षाचा पगार आहे. महीन्याचा वाटण्याची शक्यता वाटली म्हणून मुद्दाम लिहीलं. त्यातून टॅक्स, घरभाडं (जे लंडनमधे आठवड्याला १०० पौंडापासून असतं), रोजच्या कम्युटिंगचा पास, वीज आणि गॅस बिलं, घरखर्च इ. इ. घालवलं तर फारसं काही उरत नाही.
चांगला धागा ललिता, चर्चाही
चांगला धागा ललिता, चर्चाही चांगली चाललेय . वाचतेय, खुप उपयोगी माहिती जमा होतेय, धन्स सगळ्यांनाच.
>>बहुतांश भारतीय लोकांच्या
>>बहुतांश भारतीय लोकांच्या तनामनात जशी जातपात भिनलेली आहे, त्याचप्रमाणे पाश्चात्यांच्या तनामनात वर्णद्वेष भिनलेला आहे (का?)
नाही. इथे अमेरिकेत तरी ठरावीक हेट ग्रुप्स सोडले तर मुद्दाम भारतीय वंशाचे म्हणून सामान्य नाकरीकांचा त्रास होत नाही. खरे तर एकीकडे रेसिझम रेसिझम म्हणून ओरड करणारे भारतीयच इथल्या आफ्रिकन वंशाच्या लोकांचा उल्लेख स्वतःच्या ग्रुपमधे कल्लू असा करतात. होलीअर दॅन दाऊ अशी अॅटिट्युड ठेऊन इथल्या लोकांपेक्षा आपली संस्कृतीच कशी महान, आम्हालाच काय त्या फॅमिली व्हॅल्युज असे वागले तर इतरांकडूनही होस्टाइल प्रतिक्रिया येऊ शकते. तसेच अमेरिकेचे प्रो-पाकिस्तानी वाटणारे डिसिजन होतात तेव्हा त्याचा दरवेळी भारताच्या विरोधात अमेरिका असा व्हू घेऊन ग्रुपमधे कॉमेंट्स पास केल्या तर गैरसमज/वाद वाढतात.
माझा नवरा इथे साऊथ डाकोटात शिकला. युनिव्हर्सिटी टाऊन इतके सेफ की घराला कुलूपही लावायचे नाहित. १९८७ च्या क्रॅशमुळे आर्थिक परीस्थिती खूप बिकट होती पण कधी त्रास झाला नाही. उलट स्टोअर क्लर्क ही मुलं नेमक्या पैशात भागवायचा प्रयत्न करतात हे कळल्यावर मुद्दाम फोन करुन क्लिअरन्स/ सेलची आगावू सुचना द्यायचे. वस्तू बाजूला राखून ठेवायचे. माझ्या नवर्याला अॅक्सिडेंट झाला तर एकंदरीत इंज्युरी बघता अँब्युलन्ससाठी न थांबता मेडिकल टेक्निशियनच्या सुचना पाळत लोकांनी माझ्या नवर्याला हॉस्पिटलला हलवले.
इथे इंडियानात नोकरीसाठी आल्यावर कंपनीच्या प्रेसिडेंट पासून कार डिलर पर्यंत अनेक जणांनी मदत केली. त्या जून्या दिवसांची आठवण म्हणून लोकांनी उदारपणे दिलेल्या फर्निचर पैकी एक एंड टेबल आणि एक छोटे डायनिंग टेबल आम्ही अजून वापरतो. अर्थात सगळेच काही रोझी नाही. केकेके चा काही काळ त्रास झाला. मात्र त्याचे कारण फक्त वंश नव्हते तर युनियन हे ही एक कारण होते. इंडियानातच एक वर्ष एका युनिव्हर्सिटी टाऊन मधे राहिलो. मी तेव्हा इथे अगदी नविन होते. कधीच असुरक्षित वाटले नाही. बसने बिंधास फिरायचे. बरेचदा बस ड्रायव्हर्स स्टॉप नसला तरी थांबून चौकशी करायचे. अर्थात बहूतेक गावात असतो तसा काही भाग असुरक्षित होता. त्या भागात स्थानिकही जाताना दक्षता घ्यायचे.
माझा मुलगा इथेच वाढला. रेसिझमचा त्रास नाही उलट 'आपला रिशी' म्हणून जिव्हाळा आहे. आज इमर्जन्सी आली तर मी पहिले ४ फोन कुणाला करीन असा विचार केला तर त्यातली ३ नावे अमेरिकन आहेत.
अजुन वर्षभराने माझा मुलगाही शिक्षणासाठी बाहेर पडेल. सर्वसाधारण अमेरिकन पालकांप्रमाणेच आमच्याही मनात कॅंपस सेफ्टी हा काळजीचा मुद्दा आहे. पण भारतीय वंशाचा म्हणून वेगळी अशी काळजी नाही.
स्वाती२ + १००
स्वाती२ + १००
स्वाती, छान,आश्वासक लिहिलंत.
स्वाती, छान,आश्वासक लिहिलंत.
स्वाती(२)चा प्रतिसाद आवडला.
स्वाती(२)चा प्रतिसाद आवडला.
स्वाती२, खरंच अतिशय आश्वासक
स्वाती२, खरंच अतिशय आश्वासक पोस्ट.
आज इमर्जन्सी आली तर मी पहिले ४ फोन कुणाला करीन असा विचार केला तर त्यातली ३ नावे अमेरिकन आहेत. >>> हे फार आवडलं. मुळात हा क्रायटेरियाच खूप भावला.
स्वाती२.. खुप छान..!
स्वाती२.. खुप छान..!
स्वाती२ चा प्रतिसाद आवडला.
स्वाती२ चा प्रतिसाद आवडला. जुने टेबल ठेवायचे कारण खुप भावले.
स्वाती२ छान लिहिले आहे.
स्वाती२ छान लिहिले आहे. आम्हाला सुद्धा इथे पॉझिटिव्हच अनुभव जास्त आले आहेत. या देशाविषयी जिव्हाळा वाटतो तो त्यामुळेच.
किंबहूना आपले देशी लोकच इथल्या देशाच्या रिती भाती , शिस्त वगैरे जर सुद्धा आत्मसात करायला तयार नसतात असे अनुभवास आले आहे. काही काही लोक तर इथे जन्मापासून असूनही मनाने त्यांना या देशाविषयी जराही प्रेम-भावना नाहीत असेच बघितलय. (अर्थात अपवाद नक्कीच असतील. )
स्वाती२ , प्रतिसाद
स्वाती२ , प्रतिसाद आवडला.
सीमा +१
स्वाती२ यांचा प्रतिसाद आवडला.
स्वाती२ यांचा प्रतिसाद आवडला. आमचेही अगदी जिवाभावाचे म्हणावेत असे अमेरिकन दोस्त आहेत.
सीमा, सहमत. काही लोक सतत नावं ठेवताना पाहिलेत. आधी आपल्या देशाला ठेवतात नंतर अमेरिकेला नावं ठेवतात. सर्वगुणसंपन्न असा देश अजून निर्माण व्हायचाय हे माहित नसल्यासारखे.;)
लले... परवा म्हणालो आणि आज
लले... परवा म्हणालो आणि आज मुहूर्त लागला...
अनुज बिडवे चं वाचल्यावर लगेच आठवला तो माझ्या लंडनमधल्या अगदी सुरुवातीच्या दिवसातला एक किस्सा...
लंडनमधे पोचून ईन मीन तीन दिवसही झाले नव्हते... इंडक्षन प्रोग्रॅम मधे नुकत्याच थोड्या थोड्या ओळखी होत होत्या... मी आणि दोन देशी मुली असा एक त्यातल्या त्यात बरा ग्रूप जमत होता... म्हणून आम्ही तिघांनी एक-मेकांची घरं पहायचं ठरवलं... अजून पब्लिक ट्रान्स्पोर्ट वगैरेचे डीटेल्सही नव्यानी कळत होते... शेवटचं घर पहायला आम्ही जरा लांबच्या भागात गेलो होतो... उशीर झाला म्हणून तिकडेच खाऊन निघालो... त्यात ११ वाजून गेले होते... घर ते स्टेशन जाणारी बस येईना म्हणून शेवटी मी अन एक मुलगी चालत स्टेशनवर निघालो... बस मधून वाटलं त्याच्यापेक्षा बरच लांब निघालं... स्टेशनवर पोचलो तर एंट्रन्स समोर ५-६ काळी पोरं-पोरी फुल टल्ली होऊन कल्ला करत होती... २-३ पोरं जबरी सांडूकांत होती... आमची टर्कीफाय... तेवढ्यात दुसर्या बाजूचा सब-वे दिसला... तिकडून स्टेशनवर पोचलो तर एक ट्यूब निघत असल्याची शिट्टी झाली... आम्ही प्लॅटफॉर्म १-२ मधे धावल्यावर ३ ची ट्यूब गेली... मर्फीज लॉ... स्टेशनवरच्या एका इसमाकडून पुढली ट्यूब शेवटची आहे असा नवाच शोध लागला... (लंडन म्हणजे काय महाराजा... तिकडे सगळं सगळ्या वेळेला उपलब्ध असणार असा समज करून गेलेला मी धाडकन वास्तवात आलो...) त्या ट्यूबमधे बसल्यावर आम्ही ठरवलं की जर कुणी कल्लू डब्यात घुसले तर पुढच्या स्टेशनला उतरून लगेच डबा बदलायचा... (डबे आतून कनेक्टेड असतात हे ही माहित नव्हतं इतकी नवलाई होती...) नशीबानी तसं काही न होता नीट पोचलो... पण नंतर लोकांनी सॉलिड झाडलं होतं भलतं काहितरी केल्याबद्दल...
तर असं परदेशात सगळं सेफ असतं... लंडनमधे तुम्ही रस्ता चुकून हरवूच शकत नाही... वगैरे डोक्यात भरून गेल्यामुळे बरेचदा लोकांकडून नस्तं धाडस होत असेल... सगळेच काही सुदैवी ठरत असतीलंच असं नाही... तेंव्हा कुठलीही अनोळखी जागा ही इतर कुठल्याही ओळखीच्या जागेइतकीच सुरक्षित अन असुरक्षित असते हे कायम डोक्यात ठेवायला हवं...
Pages