एक्स्पायरी डेट - भाग २

Submitted by विस्मया on 8 January, 2012 - 18:57

याआधीचा भाग इथं वाचा.

प्रकरण तीन

२०११
नवं वर्ष सुरू होतानाच उठायला उशीर झाला. डोकं प्रचंड जड वाटत होतं. काहीच करावंसं वाटेना म्हणून सरळ नेटवर बसले. माझं आवडतं मराठी संकेतस्थळ उघडलं तर तिथंही शुकशुकाटच. बहुतेक कालचा हॅंगओव्हर असेल किंवा पार्ट्या, आऊटिंग असणार. मग अगदी निवांतपणे आण्हिकं उरकताना दोन तास गेले. भूकेची जाणीव झाली म्हणून ब्रेकफास्टसाठी फ्रीज उघडला तर काहीच नव्हतं.

आज कूकला सुट्टी ! विसरलेच होते. काल पार्टीमुळं त्याला सूचना द्यायच्या राहील्या. आता काही बनवण्यापेक्षा बाहेरच नाश्ता करावा असा विचार केला, गोल्डन एकरला जावं आणि मेहतांकडे समोसा आणि चहा घ्यावा हा प्लान केला. नंतर तिथंच भटकण्याचं ठरवलं.

कालचे विचार झटकण्याचा हा सर्वोत्तम मार्ग होता.

गोल्डन एकरच्या वरच्या रस्त्यालगतच्या पार्किंगमधे गाडी पार्क करून मी खाली आले. गोल्डन एकर म्हणजे जमिनीच्या वर आणि खाली पसरलेलं प्रशस्त शॉपिंग प्लेस ! २८ मजली स्कायस्क्रॅपर आणि जमिनीच्या खाली दोन मोठे मॉल्स आणि अनेक दुकानं, पोस्ट ऑफीस, पब्लिक युटीलिटीज आणि खवय्यांसाठी सोयी यामुळं इथं वर्दळ असायचीच. वॉटर फ्रंट आणि गोल्डन एकर या दोन ठिकाणी वेळ कसा जातो कळतच नाही. रस्ता ओलांडून गेलं कि अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन होतं. हा परिसर देखील भटकायला छानच होता.

बेसमेंटला आले तेव्हा चौकातल्या एका मोक्याच्या कॉर्नरला इंडियन स्नॅक्सचा एक छोटासा स्टॉल होता. हेच मेहता अंकलचं दुकान. केपमधे ज्या काही मोजक्या ठिकाणी समोसे मिळायचे त्यातलं लोकप्रिय झालेलं दुकान म्हणजे मेहता स्नॅक्स. तासाभरातच समोसे संपत असल्याने दुकान उघडायच्या वेळीच ददींची गर्दी तिथं असायची. स्थानिकांमधेही समोसे लोकप्रिय झालेले असल्याने भारतीयांनाच कधी कधी समोसे मिळायचे नाहीत. सुरूवातीला स्थानिकांचा खूप राग यायचा. वर मॅकडोनाल्ड असताना इथं आमच्या हक्काच्या प्युअर व्हेज खाद्यपदार्थांवर हे अतिक्रमण करतात असं वाटायचं. मॅकडोनाल्ड मधले पदार्थ तुम्हाला चालतात ना ? असं त्यांना विचारावंसं वाटे. पिझ्झा व्हेज असला तरी तो कसा बनवतात हे चांगलं माहीत असल्याने मी कधीच मॅकडोनाल्ड मधे गेले नव्हते. सुरूवाती सुरूवातीला एकटं राहण्याची सवय होण्यासाठी कपनीने सेंट जॉर्जजवळ रूम घेऊन दिली होती तेव्हां उपासमार व्हायची. एकतर मला स्वतः काहीच बनवता येत नव्हतं ( अजूनतरी कुठं येतं खूपसं? ) . पण नंतर मेहता अंकलचं हे दुकान सापडलं आणि त्यांच्याशी चांगलीच मैत्री झाली ती आजपर्यंत टिकून आहे.

समोसे संपल्यावर मेहता अंकल हाक मारून बोलावून घेत आणि आत बसायला सांगून गुपचूप मला समोसे देत. हा खास लोकांसाठी राखून ठेवलेला स्टॉक असे. प्रत्येकाच्या धंद्याच्या काही न काही क्लुप्त्या असतात. त्यातली ही एक. आज नवं वर्ष असल्याने असेल शॉपिंगसाठी चांगलीच गर्दी उसळलेली होती. मेहता अंकलकडे चहा समोसे झाल्याने बरं वाटू लागलं होतं. फ्रेश वाटावं म्हणून मी इकडं तिकडं फिरत बसले.

सकाळपासून तीनदा नंदिनीला बोलावून घ्यायचा मोह झाला होता. पण तिला त्यावेळी सुनावलं असल्यानं आता तिला कसं बोलवावं असा प्रश्न पडला होता. तिने सांगितलेलं बरंचसं खरं निघालं होतं.

पुन्हा नकोत ते विचार ! कदाचित याचसाठी नंदिनीला मी टाळलं होतं.

आज कंपनीतले किंवा ओळखीचे भारतीय कुणीच भेटू नयेत यासाठी मनोमन मी देवाकडे प्रार्थना करीत होते. कुणी भेटलं कि कालच्या प्रसंगाची उजळणी अपरिहार्य होती. नव्या वर्षाच्या सुरूवातीला तोंड लपवायचा प्रसंग माझ्यावर आला होता आणि यासाठी राहुलला मी कधीच माफ करू शकणार नव्हते.

पण असं एकटं तरी किती फिरायचं ना ?

एरव्हीचं ठीक आहे. काही वाटत नाही. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. त्यातच काल घडलेला प्रसंग. एकट्याने फिरणं हे काही घडलेल्या घटनांवर औषध नव्हतं. उलट मन नको त्याच गोष्टींकडे धाव घेतं याचा प्रत्यय येत होता.

इतक्यात कुणी तरी मला हाक मारतंय असं वाटलं. वळून पाहीलं तर सार्जंट जॉन ! या कृष्णवर्णीय जॉनची आणि माझी चांगली ओळख होती. बरेचदा त्याची आम्हाला मदत होत असे. आता डिटेक्टीव्ह होऊ घातला होता तो.

"हाय ! हॅपी न्यू इयर !"

"हाय जॉन.. हॅपी न्यू इयर !"

" वर गाडी पाहीली तुझी आणि तुला शोधत आलो "

" अरे वा ! मग उद्या ऑफीसमधेच का नाही येत ? तुझं गिफ्ट तयार आहे बरं का... जॉन "

" ओह..! म्हणजे मी फक्त त्यासाठी तुझ्याकडे आलो असं वाटलं का ? न्यू इयर विश करायचं होतं. एनीवे , आता तू आग्रह करतेच आहेस तर उद्या चक्कर टाकतो. बरंच लांब आहे पण तुझं ऑफीस "

"हम्म. मोक्याची जागा आहे ना "

"हम्म ! सी यू . भेटूयात उद्या. आज खूप कामं आहेत. नम्रताला सांगून ठेव उद्या मी येतोय "

त्याला बाय बाय करून मी वर आले. वॉकिंग स्ट्रीट वरून पलिकडच्या गल्लीत शिरले. इथं देखील रेल्वे स्टेशनलगतच्या गल्लीत चांगली दुकानं होती. आधीचा रस्ता बंद करून त्यावर ब्रीकवर्क केलेलं असल्याने वाहनांचा त्रास नव्हता. मी एका छोट्याशा डायमंड शॉपमधे शिरले. टाईमपाससाठी अशी दुकानं बरी असतात.

कधी कधी कठीण प्रसंगातून आपोआपच सुटका होत असते. मी हि-यांचे दागिने बघत असतानाच नंदिनी तिथं आली आणि मागून हात लावून शेजारी येऊन उभी राहिली.

मी वळून तिच्याकडे बघताच दोघीही आनंदाने चित्कारलो. जगाच्या पाठीवर कुठंही दोन मैत्रिणी भेटल्या कि त्यांची भेटण्याची हीच पद्धत असते. अर्थात आता तिच्यापेक्षा मलाच जास्त आनंद झाला होता. नव्या वर्षाचं एकमेकींना विश करून झाल्यावर दोघी खिदळायला बाहेर पडलो. इथून पुढचे क्षण आनंदाचे जाणार होते.

गाडी तिथंच ठेवून आम्ही पायीच सेंट जॉर्ज परिसरात आलो. दोघींनी पायीच भटकंती करायचं ठरवलं होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर नंदिनीने माझा मूड पाहून कालच्या पार्टीचा विषय काढला. त्याबरोबर माझं तोंड कडवट झालं.

काल काहीतरी झालं असलं पाहीजे याचा तिला अंदाज आला. तिला सांगावं कि न सांगावं याचा माझ्या मनात विचार चालला होता तर मला निर्णय घ्यायला वेळ द्यावा असा तिच्या मनात विचार चालला होता. मी तिच्याशी नक्कीच कालचं शेअर करणार याची तिला खात्रीच दिसत होतीच.

शेवटी मी तिला सगळं सांगून टाकायचं ठरवलं. आणि एकदाचं ओकून टाकलं सगळं. तिच्या रिअ‍ॅक्शनसाठी तिच्याकडे पाहीलं. ती अधूनमधून मंद स्मित करत होती तर मधूनच गंभीर होत होती. अचानक कसल्याशा आठवणीने झुरळ झटकावं तसा तिच्या अंगावर शहारा येऊन जात होता. पण तिच्या डोळ्यात कुठेही हेवा, इर्ष्या, मत्सर या भावनांना स्थान नव्हतं. ती माझी खरी मैत्रीण होती.

माझं सगळं ऐकून घेतल्यावर ती बराच वेळ गप्प होती. कदाचित शब्द जुळवत असावी.

" अवघडच झालं गं सगळं. सिंगसरांच जाऊ दे गं, मी शहाअंकलचा विचार करतेय. "

" मी तर त्यांना विशसुद्धा केलेलं नाही आज " रडवेल्या आवाजात मी तिला सांगितलं.

माझे हात हातात घेत ती फक्त " आय अंडरस्टँड " इतकंच म्हणाली आणि मला रडूच फुटलं. असं पब्लिक प्लेसमधे रडू आल्याने ती देखील कावरीबावरी झाली आणि मी ही रूमालात चेहरा झाकून घेतला. मग उठून दोघी चालत चालत केपच्या बंदरावर आलो. वारं खूप जोरात वाहत होतं. ब-याच दिवसांनी असं खूप चालल्याने बरं वाटत होतं.

" उद्या सिंगसरांकडे काय होईल हा विचारही करवत नाही " नंदिनी गंभीर होत म्हणाली.

" त्यात काय विचार करायचाय . तो मूर्ख असेल, मनोरूग्ण असं मला स्वप्नादेखील वाटलं नव्हतं. सिंग फॅमिलीला वाईट वाटलं असेल आणि त्याबद्दल त्यांच्याशी काही दिवसांनी बोलावं असं मी ठरवलंय "

"ऐक जरा ! त्यावेळी तुला सांगेन सांगेन म्हणत होत्ते, पण तू कधी संधीच दिली नाहीस बघ "

" कशाचं ? "

" राहुल नॉर्मल नाहीय्ये. "

" हम्म. ते आलंच काल लक्षात "

" तसं नाही. तो वेगळा आहे. इतर मुलांपेक्षा वेगळा. इतर मुलांना तरूण मुलगी सोबत असेल तर एकांत हवा असतो नाही का ? "

"हम्म "

" याला मी स्वतःहून एकांतात घेऊन गेले तरी त्याच्याकडून कसलाच प्रतिसाद नाही. "

" नंदिनी....!"

" ऐक आधी ! जणू काही अशा नाजूक भावनांना त्याच्या आयुष्यात स्थान नसावं. काल तुला आलाच असेल ना अनुभव ?"

" हो गं .. काल मी त्याला बोलतं करायचा किती प्रयत्न केला ! पण तो अगदी यंत्रवत वाटला मला "

" बघ. तुझ्यासारख्या सुंदर मुलीची डेट मिळावी म्हणून इथले गोरेदेखील एका पायावर तयार असतात. आणि तू स्वतःहून त्याला डेटवर घेऊन गेलीस तरी त्याला काहीच नाही त्याचं .. कळतंय का मी काय म्हणतेय ते ? "

मला चांगलंच कळत होतं. डेट ! नंदिनी किती सहन बोलून गेली. माझी सगळी धडपड तिने योग्य शब्दात मला उलगडून दाखवली होती. पण आता संपलं होतं ते सगळं. राहून राहून अपमानास्पद वाटत होतं.

" आणि ऐक.. सिंग सरांच्या घरी त्याने जे सांगितलं त्याने आपल्या अडचणी वाढणार आहेत. त्याचे अंदाज सहसा चुकत नाहीत "

आणि मग पुढचे दोन तीन तास ओफीसमधल्या सहका-यांना आलेले अनुभव मला सांगण्यात गेले. कुणाच्या न घरी त्याने भविष्याचा अंदाज वर्तवलेला होता आणि ते खरं झालं होतं. काहींच्या बाबतीत मात्र त्याने थेट मृत्यूचा अंदाज वर्तवला होता. तो त्याला एक्सपायरी डेट म्हणत असे. ज्यांची एक्सपायरी डेट वीस पंचवीस वर्षांपेक्षा दूर होती त्यांना काहीच वाटलं नाही पण वर्षा सहा महिन्यात किंवा काही दिवसांच्या फरकाने ज्यांच्या मृत्यूचा अंदाज त्याने वर्तवला होता ते खरं होताना प्रत्येकाने पाहीलं होतं.
दोघा तिघांच्या बाबतीत ते खरं झालंही होतं. विशेष म्हणजे ज्यांच्या बाबत हे खरं झालं ती माणसं शहासरांच्या जवळची माणसं होती असं तिचं म्हणणं होतं. त्यांची खास माणसं होती.

म्हणजे काकांच्या कानावर सगळं गेलं होतं कि काय ? पण नंदिनीने ती शक्यता ठाम नाकारली.

एरव्ही सगळे चांगले गुण असले तरी हा कसला गुण म्हणायचा ? लोकांच्या मरण्याचं भविष्य आणि ते ही अचूक सांगायचं. लोक टाळतील नाही तर काय ?

बाप रे ! तिच्या म्हणण्याचा अर्थ भयानक होता. आणि तिचं म्हणणं खरं असेल तर माझ्या सोबतीने त्याने वर्तवलेलं भविष्य खरं ठरल्यास त्याचा त्रास मला आणि माझ्यामुळे आमच्या कंपनीला पर्यायाने शहाफॅमिलीला होण्याची शक्यता होती. २०११ म्हणजे बेरीज ४.. शी ! कुठल्या दिशेने चाललेत विचार !
नंदिनीला हा विषय इथंच थांबवण्याची सूचना करून शहाकाकांकडे जाऊन वातावरण पाहून ये अशी मी विनंती केली. तिचा साफ नकार असतानाही केवळ मैत्रीखातर म्हणून ती हे दिव्य पार पाडायला तयार झाली. आता ती उद्याच भेटणार होती मला.

मी गाडी काढून केप ऑफ गुड होपला जाऊन बसले. माझं आवडतं ठिकाण ! मन थोडंसं शांत झाल्यासारखं वाटलं.

******************

रात्री मी सरळ गेस्टहाऊसला गेले असल्याने दुस-या दिवशी सकाळी बरीच तारांबळ उडाली. ऑफीसला उशिराच पोहोचले. सगळे आपापल्या कामात गर्क होते. मायकेल आपल्या केबीनमधे जात होता तो मला पाहून थबकला. मला पाहून घड्याळ पाहण्याचा अभिनय करत माझ्या उशिरा येण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. मी काय कधीही आले तरी कोण विचारणार होतं म्हणा ! पण मायकेलला कळवल्याशिवाय कधी उशिरा आले नव्हते. आणि मायकेल मला काहीही बोलू शकत होता. त्याला सगळं माफ होतं. कंपनीचं हित कशात आहे हे त्याला चांगलं कळत होतं म्हणूनच मी नसताना त्याच्यावर विश्वास टाकता येत होतं. नम्रता आणि मायकेल हे माझ्यापेक्षाही जुने असल्याने त्यांना कंपनीचे बरेचसे बारकावे माहीत होते. ऑक्टोबर २००९ ला दिवाळीच्या मुहूर्तावर या नव्या जागेत कार्यालय सुरू झालं ते या दोघांच्याच मेहनतीमुळे. त्याआधी बरेच दिवस या जागेचा व्यवहार चालला होता. आधीच्या जागेत मी मॅनेजमेंट ट्रेनी होते तीन चार वर्षं. नव्या ऑफीसची नवी कारभारीण म्हणून माझी नेमणूक झाली होती पण शहाकाकांची ही खास माणसं दिमतीला होतीच.

मी चेंबरमधे जाऊन बसले तशी नंदिनी आत शिरली. शहाकाकांकडचा रिपोर्ट ऐकायची मला भीतीयुक्त उत्सुकता होती. ते प्रचंड नाराज असल्याचं नंदिनीचं म्हणणं ऐकताच मला घामच सुटला. पण नंदिनीने परिस्थिती छान हाताळली. शहाकाकांना थोडंसं हसवत, गप्पा मारत त्यांचा मूड ठीक झाल्यावर तिने माझा विषय काढला. माझी चूक कशी नव्हती हे तिने ज्या हुषारीने काकांना सांगितलं त्याबद्दल मी तिची आजन्म ऋणी झाले होते. शहाकाकाही वेगळ्या अँगलने आता झालेल्या घटनांबद्दल विचार करू शकणार होते.

डिटेक्टिव्ह जॉन आल्याची वर्दी रिस्पेशनिस्टने दिली तेव्हा नंम्रताला त्याला त्याचं पुडकं देऊन बोळवण करायच्या सूचना मी देतच होते इतक्यात तोच एखाद्या वादळासारखा माझ्या चेंबरमधे शिरला.

"इतक्या लांब बोलावलंस ते फक्त गिफ्ट द्यायला का ?"

आल्याआल्याच गडगडाटी हसत त्याने प्रश्न टाकला. आज साहेब निवांत दिसत होते म्हणजे माझा बराच वेळ खाणार तर.. जॉन तसा चांगला होता पण समोरच्याच्या वेळेची कदर त्याला नव्हती. पोलीसी मग्रुरी आणि चांगुलपणा असं अजब कॉम्निनेशन त्याच्या ठायी होतं. मेंदू देखील अतिशय तल्लख आणि डाबरमन सारखं नाक होतं असं त्याच्याबद्दल बोललं जायचं.

जॉनशी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तिथं आलेल्या नम्रताला पाहून त्याने डोळा मारायची खूण केली.

" तपास चालू आहे "

"हम्म. आपण पलिकडे बसू बोलूयात "

या तपासाबद्दल मी अनभिज्ञ होते. आधी या जागेवर जी कंपनी होती तिथं कसलातरी अपघात झाला होता त्यासंदर्भात चौकशी चालू होती. त्यातच आम्ही ही जागा घेतल्याने जॉनचा मोहरा आमच्याकडे वळणं स्वाभाविक होतंच. अर्थात पोलिसांचा विनाकारण त्रास नको म्हणूनच त्याला या भेटी दिल्या जात होत्या. भेटी घेऊन कर्तव्यात कसूर करण्याचा रिवाज इथं नव्हता. मात्र त्या बदल्यात इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टीत जॉन आणि त्याच्या वरिष्ठांची मदत होत होती इतकीच कल्पना मला देण्यात आली होती.

-------------------------------------------------------------------------------

केस नं ४०१
मिस रचना जोशी

प्रो. डॅनीएल व्हॅटमोर

" जॉन, तुझ्याबद्दल लिहीलेलं बरोबर आहे ना ? "

प्रोफेसर हसून विचारत होते. आतापर्यंत रचना जोशीची केस वाचण्यात गढून गेलेला डिर्टेक्टिव्ह जॉन त्यांच्या या प्रश्नाने हसला. इथं प्रोफेसर व्हॅटमोर यांनी काढलेली टिपणं संपत होती.

" हिने तर सगळंच लिहून ठेवलंय कि "

" नोटांचं पुड्कं ?" डोळे मिचकावत प्रोफेसर म्हणाले. त्यावर जॉनने गडगडाटी हास्य केलं.

" धन्यवाद प्रोफेसर तुमच्या या सहकार्याबद्दल. तुमच्या टिपणांची खूपच मदत झाली. रचनाची डात्=यरी म्हणजे असंबद्ध लिखाण आहे नुसतं. कुठे तारखा नाहीत, कुठे आत्मकथन तर कुठे कॉमेण्टी "

" जॉन.. असंबद्ध म्हणू नकोस. तिच्याशी अनेकदा बोलून मग घटनांची सुसंगती लावून ही टिपणं माझ्या असिस्टंटने तयार केली आहेत. पुढच्या वेळी परत येशील तेव्हां २०११ मधे काय झालं त्याचा उलगडा तुला होईल "

" अच्छा. आभार त्यासाठी. मला हे सगळं पुरावा म्हणून जवळ ठेवावं लागेल प्रो. ! "

"नक्कीच ! पण त्या आधी मला तुझी मदत लागेल जॉन. इथं या केसमधे तुझंही नाव असल्यानं मला तुलाही बरेच प्रश्न विचारायचेत "

" हा हा ! चांगलं आहे. एकाच केसचं दोघांकडून इन्व्हिस्टिगेशन ! तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हांला विचारतो "

हसून प्रोफेसरांनी त्याला खुर्चीत बसायची खूण केली. रचना जोशीची केस खूप गुंतागुंतीची होत चालली होती खरीच...

इथून पुढे वाचा.

गुलमोहर: 

गोष्ट चांगली आहे. हा प्लॉट आधी वाचला आहे. रत्नाकर मतकरींची गोष्ट आहे," चमकत्या डोळ्यांचा मुलगा" त्यातही हाच प्लॉट आहे. घरी गेल्यावर कथासंग्रह कोणता ते लिहिते. त्यात तो मुलगा अनाथ असतो आणि एका समारंभात शीरतो. तिकडे तो अनेकांचे म्रुत्यु भविष्य सांगतो. शेवट मी सांगत नाही. तुमच्या शी जुळणारा असेल तर उगाच इतर वाचकांचा विरस नको.

मागे ई टीव्ही वर "गहिरे पाणी" म्हणुन रत्नाकर मतकरींची मालिका झाली होती. त्यातही ह्या गोष्टीवर एक भाग होता.

पण तोच प्लॉट तुम्ही वेगळ्या अंगाने फुलवला आहे. पुढे तो कसा फुलवता ते वाचायची उत्सुकता आहे.

धन्यवाद सर्वांचे !

मोहन कि मीरा.. गोष्ट पूर्ण होऊ द्या.. कदाचित तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल Happy नंतर शक्य झाल्यास काही आफ्रिकन दंतकथांबद्दलही माहीती घेऊयात आपण...

मोहन कि मीरा.. गोष्ट पूर्ण होऊ द्या.. कदाचित तुमच्या सर्व शंकांचे निरसन झाले असेल नंतर शक्य झाल्यास काही आफ्रिकन दंतकथांबद्दलही माहीती घेऊयात आपण...>>>>>

मला शंका काहीच नाहीत. मी फक्त लिहीले की असाच एक प्लॉट मतकरींन्नी पण आधी वापरलेला आहे. तुम्ही ही कथा छानच फुलवत आहात. त्या कथेचा आणि मतकरींच्या कथेतील साम्य जे मला वाटले ते मी लिहीले. त्यात तुमच्या गोष्टीला कुठेही बाधा आणायचा विचार नाही. गैरसमज नसावा.

अफ्रिकन दंत कथां बद्दल वाचायला आवडेल.