ब्लड डायमंड - रक्तरंजित हिर्‍यांची कथा सांगणारा चित्रपट

Submitted by दिनेश. on 5 January, 2012 - 05:55

काल मी Edward Zwick दिग्दर्शीत ब्लड डायमंड नावाचा एक चित्रपट बघितला. तसा हा २००६ सालचा आहे. त्यावर्षी त्याला ऑस्करमधे ५ नामांकने मिळाली होती (पण एकही ऑस्कर मिळाले नव्हते.)

अगदी शाळेत असल्यापासून आपल्याला आफ्रिकेत हिरे मिळतात हे वाचून माहीत असते. पण ते नेमके कसे मिळतात, त्याचा व्यापार कसा चालतो याचे थेट चित्रण हा करतो.

हि कथा खरी आहे असा दावा केलेला नाही, तसेच आताही परिस्थिती तशीच असेल असे नाही ( खास डी बीयर्स कंपनीच्या आग्रहावरुन) असे विधान करण्यात आले आहे.

सिएरा लिओन मधे सुरु होणारी हि कथा. सध्याच्या झिम्बाब्वे मधे जन्मलेला एक गोरा
Leonardo DiCaprio त्या गावातला एक कोळी Djimon Hounsou आणि त्यांना भेटलेली अमेरिकन पत्रकार Jennifer Connelly हे मुख्य कलाकार.

लिओनार्दोला हिर्‍यांची तस्करी करताना पकडलेले असते तर डिजमॉन ला जबरदस्तीने हिर्‍यांच्या खाणीत राबवायला लावलेले असते. जेनीफर शोधपत्रकारीता
करत असते.
डिजमॉन ला एक मोठ्या आकाराचा गुलाबी हिरा सापडतो, तो तो अत्यंत शिताफिने लपवतो. पण हा हिरा एका आर्मीतल्या माणसांने बघितलेला असतो.. आणि पुढची सर्व कथा या हिर्‍यापोटी घडते.

या कथेला अनेक पदर आहेत. या अनुषंगाने आफ्रिकेत जन्मलेले गोरे, अमेरिकन पत्रकार, स्थानिक लोकांना हिर्‍यांबद्दल असणारी घृणा, तथाकथित क्रांतीकारी, लष्कराच्या कारवाया, लहान मुलांना करायला लावलेला हिंसाचार, हिर्‍यांचा व्यापार (त्यात भारताचाही सहभाग आहे) हिर्‍यांच्या किंमती खाली येऊ नयेत म्हणून केलेली चलाखी... असे अनेक विषय आलेत आणि त्या प्रत्येकाचे नेमके चित्रण झाले आहे.

कथा अर्थातच अँड दे लिव्हड हॅपीली देअरआफ्टर अशी नाही पण अगदी निराशाजनकही नाही.

चित्रीकरण जबरदस्त आहे, त्यातले पळापळीचे सीन्स इतक्या अप्रतिमपणे टिपलेत कि
आपणच त्या हिंसाचारात सापडलोय कि काय असे वाटत राहते.
चित्रीकरणासाठी निवडलेली ठिकाणे अप्रतिम आहेत. निसर्गसौंदर्यासाठी नाही म्हणत मी (तो तर आहेच) पण भूगोलाच्या दृष्टीने ती अप्रतिम आहेत. काही सेंकदापुरता दिसणारा एक निर्वासितांचा कँप, अप्रतिम टिपलाय. जंगलसुद्धा खरेच आहे.

या चित्रपटाचे पार्श्वसंगीतासाठी देखील ऑस्कर नामांकन झाले होते, विषयानुरुप संगीत कसे असावे याचे उत्तम उदाहरण वाटले मला हे.

मुख्य दोन्ही कलाकारांची कामगिरीही अव्वल आहे (दोघांचेही नामांकन झाले होते.)
लिओनार्दोचा अभिनय तर अजिबातच चूकवू नये असा. टायटॅनिकमधला चित्रकार तो हाच का, असे वाटेल एवढा त्यांनी आपल्यात बदल केला आहे.

आणि एकंदर हिर्‍यासाठी किती रक्तपात होतो ते बघितल्यावर, मला तरी हिरा खरेदी करायची इच्छा होणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आणि एकंदर हिर्‍यासाठी किती रक्तपात होतो ते बघितल्यावर, मला तरी हिरा खरेदी करायची इच्छा होणार नाही.

अगदी अगदी दिनेशदा. हा सिनेमा माझ्या ऑल टाईम फेव्हरेट्स मधे आहे. अप्रतीम सिनेमा.
मुख्य म्हणजे लिओनार्डॉचं खास अभिनंदन हा सिनेमा स्वीकारल्याबद्दल.

ह्या चित्रपटाबद्दल बरंच ऐकलं होतं. आज हा चित्रपट नक्की पाहणार आणि उद्या ह्यावर सविस्तर लिहिणार. लिओचा फॅन आहे .. त्याचा दि अ‍ॅविएटर हा जबरदस्त सिनेमा आजही तितकाच ताकदवान वाटतो.

मंदार, इतिहासाच्या एका टप्प्यावर हे काळे लोक भाबडेपणाने वागले आणि कायम गुलामगिरीच्या चक्रात सापडले. पण मूळात हे लोक आनंदी, समाधानी आणि भाबडे होते. (आजकालची त्यांची आक्रमकता हि केवळ असुरक्षिततेच्या आणि कदाचित सूडाच्या भावनेतून आली असेल.)

काय नाही या खंडात ? तीन कोपर्‍यात तीन मोठी वाळवंटे तरी सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवू शकेल एवढी सुपीक जमीन, काही देशांत दुष्काळ असला तरी वर्षभर दुथडी भरून वाहणार्‍या नद्या, (झांबिया/ झिम्बाब्वे मधला व्हिक्टोरिया धबधबा उंचीने आणि विस्तारानेही नायगारापेक्षा मोठा आहे. पण त्याचे नावच बदलण्यापासून सगळे आक्रित घडलेय. ) उत्तम हवा, उत्तम समुद्रकिनारे, खनिजे आणि आता पेट्रोलियम देखील.. पण सामान्य लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची.

आपण भाग्यवान, आपल्याला इंग्रजांनी शिक्षणासाठी अडवले नाही, या लोकांना तर तेही मिळाले नाही, जाताजाता टोळीटोळीत दूजाभावाचे विष आणि धर्माची अफू मात्र पाजून गेले.

हा सिनेमा माझ्या ऑल टाईम फेव्हरेट्स मधे आहे. अप्रतीम सिनेमा.....>> अनुमोदन.

एकदा पहायला सुरूवात केली की संपेपर्यंत उठायची ईच्छाच होत नाही. ३-४ वेळेस तरी पाहिलाय आणि शक्य होईल तेव्हा पुन्हा पाहिल.

अप्रतिम चित्रपट ....

व्वा छान चित्रपट, आणि वास्तववादी लोकेशन.
हा लेख पाहील्यावर, लगेचच नेटवरून हा चित्रपट डाऊनलोड करून पाहीला. आणि लगेच हा प्रतिसाद पण दिला.

धन्यवाद दिनेशदा, इथे माहीती करून दिल्या बद्दल.

मस्त पिक्चर आहे हा.

दिनेशदा - परीक्षण चांगलेच आहे, पण आणखी डीटेल्स असतील असे वाटले होते. तुम्ही तेथे (आफ्रिकेतील काही देशात) राहिल्याने तेथील चित्रण, लिओनार्डो व इतरांचे उच्चार हे किती अस्सल वाटली, वगैरे. तुमची नंतरची पोस्ट आवडली.

फारेण्डा,
ते उच्चाराबाबतचे राहिलेच. वरच्या क्लीपमधे लिओनार्दो च्या घश्यातून निघणारे आवंढे, घोगरा आवाज त्याने त्या सीनमधे किती मेहनत घेतलीत ते दाखवतातच,

दुसरे म्हणजे खास करुन पश्चिम आफ्रिकेतील देशात, इंग्रजी उच्चारांची एक वेगळी पद्धत आहे. उदा Son चा उच्चार ते सोन असा करतात. तसेच या देशांतील बहुतेक लोकांना, इंग्रजी येतेच आणि गोरा माणूस समोर असल्यावर ते आवर्जून एकमेकांशीही इंग्रजीतच बोलतात. याचे उत्तम उदाहरण या सिनेमात, जेव्हा आई बाबांना, आपला मुलगा पळवून नेला, असे सांगते त्या सीनमधे आहे.

यातला साऊंडट्रॅक हा मुद्दाम वेगळा ऐकण्यासारखा आहे. त्या गाण्यातला जोश, तालातला जोश आणि पडद्यावरची दृष्ये यांचा तो तोल साधलाय तो हि खासच.

शेवटी ज्यावेळी दोघे, लपवलेला हिरा शोधायला निघतात, त्यावेळी तो कोळी आणि गावातला म्हातारा यांचा संवाद ऐकण्यासारखा आहे. तो कोळी त्या म्हातार्‍याला म्हणतो, सगळ्या गोर्‍यांसारखा तो पण हिर्‍यासाठी वेडा झालाय, त्यावर तो म्हातारा म्हणतो, तरी बरं, या लोकांना इथे तेल नाही सापडलं.. चरचरीत भाष्य आहे हे.

सगळा सिनेमाच सुंदर आहे. अवश्य बघण्याजोगा.

सगळा सिनेमाच सुंदर आहे. अवश्य बघण्याजोगा.
>> अगदी सहमत. शेवट पण खुप सुंदर.
मध्यंतरी नाओमि कम्प्बेल ही सुपर मोडेल ह्या ब्लड डाय्मंड च्या चक्रात अडकली होती. तिला हे डायमंड भेट देण्यात आले होते

खरंच 'सर्वांगसुंदर' म्हणावा असाच सिनेमा आहे हा ! हॉलीवूडच्या सुवर्णयुगाची आठवण करून देणारा !!
<< काय नाही या खंडात ? >> दिनेशदा, ... शिवाय, खनीजं, ज्याच्यासाठी 'मर्सीनरीज' वापरून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यानी तिथं धुमाकूळ घातला व घालताहेत [ याची भयानकता दाखवणारी एक कादंबरी वाचली होती , नांव आत्तां आठवत नाही ]; आणि हो, दारिद्र्य असूनही तिथल्या सामान्यांचं उपजत शरीरसौष्ठव, ज्याच्याबद्दल कुणीतरी म्हटलंय " अशा शरीरयष्टीच्या माणसांच्या चेहर्‍यावर दिसणारी हताशता व लाचारी ही जगातली सर्वांत भयानक विसंगती असावी ! "

गेल्या महिन्यातच पाहिला.
माझ्यापण आवडत्या चित्रपटांच्या यादीत जमा झालाय.