हा भारत माझा - परीक्षण

Submitted by फारएण्ड on 3 January, 2012 - 06:04

'हा भारत माझा' हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असा आहे. अण्णा हजारेंच्या लढ्याला पाठिंबा देणारे लोक स्वतः जेथे तेथे नियम तोडण्यात पुढे असतात अशी टीका कायम केली जाते. या चित्रपटाचा विषय हाच आहे. सुमित्रा भाव्यांच्या मुलाखतीत हा चित्रपट कसा बनला याची आणखी माहिती आहे.

काळ साधारण ऑगस्ट २०११ चा, म्हणजे अण्णांचे उपोषण जोरात चालू होते, सगळ्या मीडिया मधे त्याची चर्चा चालू होती, लोकांचाही यातून भ्रष्टाचाराविरूद्ध काहीतरी केले जावे या भावनेतून या सगळ्याला प्रचंड पाठिंबा होता तेव्हाचा. अशा वेळेस एका मध्यमवर्गीय कुटुंबात आपली समस्या सोडवण्यासाठी भ्रष्टाचार करायचा की नाही, असा पेच निर्माण होतो. घरात रोज भ्रष्टाचाराविरूद्ध बोलणे चालू असताना प्रत्यक्षात मात्र आपण पैसे देऊन आपला फायदा करून घेऊन मोकळे व्हावे की योग्य पर्याय निवडून ती संधी सोडून द्यावी असा प्रश्न उभा राहतो. त्यातून निर्माण होणारे प्रसंग हेच मुख्य कथानक.

लोकांना एखाद्या कायद्याची माहिती देताना एक अत्यंत हलकाफुलका चित्रपट बघितल्याचा अनुभव देणारा "एक कप च्या" बघितल्यापासून सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे आशियाई चित्रपट महोत्सवात 'हा भारत माझा' चा शो आहे हे कळाल्यावर लगेच गेलो. त्यात हा ही सामाजिक विषयावर आहे हे कळल्यावर बघायचाच होता. 'हा भारत माझा' ही सामाजिक संदेश देताना मनोरंजन ही करतो, त्याची डॉक्युमेंटरी होऊ देत नाही. त्याचबरोबर हे विनोद उगाच केलेले नाहीत, ते विषयाशी संबंधित प्रसंगातून आलेले, अशा प्रसंगात सामान्य लोक जसे वागतात त्यातूनच घडलेले असे आहेत. अण्णा हजारे आणि विक्रम गोखलेंचेही यात नाव अण्णाच, पण त्यावरून निर्माण होणारे विनोद एका मर्यादेपर्यंतच ठेवलेले आहेत, हे ही आवडले.

कलाकारांचा अभिनय ही याची एक मोठी जमेची बाजू आहे. विक्रम गोखले, उत्तरा बावकर, रेणुका, देविका दफ्तरदार, किशोर कदम, अश्विनी गिरी, जितेन्द्र जोशी या नावाजलेल्या लोकांबरोबरच ओंकार गोवर्धन व आलोक राजवाडे यांचेही काम अगदी जमून गेलेले आहे. माझ्या दृष्टीने रेणुका दफ्तरदारचा 'ताई' चा रोल यातील सर्वोत्कृष्ठ असावा. तिला इतरांच्या मानाने संवाद कमी आहेत पण अगदी बोलक्या चेहर्‍याने दिलेले शॉट्स तिचे विचार बरोबर दाखवून जातात. विक्रम गोखलेंचा रोलही अप्रतिम. अग्नीपथ पासून एक तत्त्वांशी कसलीही तडजोड न करणार्‍या व्यक्तीच्या रोलची इमेज त्यांच्याबाबतीत डोक्यात राहून गेलेली आहे. त्यापेक्षा वेगळा असलेला रोल त्यांनी अतिशय सुंदररीत्या केलेला आहे. उत्तरा बावकरांचा रोल एकदम सहज आहे, घरातील इतर लोकांचे दुर्लक्ष झाले तरी मुख्य प्रश्नावर कायम असलेले त्यांचे लक्ष पूर्ण भूमिकेत त्यांच्या चेहर्‍यावर दिसते. दुधाची पिशवी भिंतीवर चिकटवणे, बाळासाठी असलेल्या बाईने खाडे केल्यामुळे तिला विचारायला गेल्यावर तिची गरज जाणवल्यानंतर तिलाच उलटे पैसे देणे, मुलीच्या दृष्टीने मोठा असलेला प्रश्न त्यांना क्षुल्लक वाटणे हे प्रसंग अगदी सहज आलेले वाटतात.

घरातील तरूणाची भूमिका म्हणजे सहसा "तो नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे" अशा वाक्यात परीक्षणात असंख्य वाचलेल्या आहेत. तत्त्वनिष्ठ आई/वडिलांना "तसे राहून तुम्हाला काय मिळाले" वगैरे विचारणारा असा तरूण गेली कित्येक वर्षे बघितलेला आहे. या चित्रपटात विक्रम गोखले व आलोक राजवाडे यांच्यात पुन्हा तसेच काहीतरी दाखवतायत की काय अशी भीती वाटत होती. पण दोघांचेही रोल या गेल्या काही वर्षांतील रूढ फॉर्म्युल्यापेक्षा एकदम वेगळे आहेत, त्यामुळेही जास्त आवडले. ओंकार गोवर्धनचा रोलही तितकाच आवडला. संवादांत कोठेही नाटकीपणा, आक्रस्ताळेपणा नाही, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूण मुले जसे बोलतील तसेच हे बोलतात.

किशोर कदम बद्दल तर काय बोलावे? 'एक कप च्या' पासून मी पाहिलेला त्याचा प्रत्येक रोल मला आवडला आहे. येथेही छोट्या रोलमधे धमाल करून जातो. तो, अश्विनी गिरी व जितेंद्र जोशी चा प्रसंग अफलातून आहे. किशोर कदम ची व्यक्तिरेखा त्याच्या गळ्यात अगदी उठून दिसणार्‍या सोन्याच्या चेनमुळे लगेच आपल्यापर्यंत पोहोचते. अश्विनी गिरीला मात्र तिच्या सहज अभिनयामुळे अजून थोडा रोल हवा होता असे वाटले. जितेंद्र जोशीचेही काम सुंदर आहे.

चित्रपटाची कथा पुढे जात असताना पार्श्वभूमीवर कायम अण्णा हजार्‍यांचे उपोषण, त्यावरील प्रतिक्रिया, पुण्यातील सभा हे सतत दिसत असते. कथेतील पात्रांच्या त्यावरील प्रतिक्रिया आपल्या आजूबाजूला जे दिसते त्याप्रमाणेच दाखवल्या आहेत. अण्णांना पाठिंबा, त्यात आपण काहीतरी करायला पाहिजे ही जबाबदारीची जाणीव, पण स्वतःचे/कुटुंबाचे प्रश्न- चित्रपटातील एक संवाद आहे त्याप्रमाणे- "समाजाने केलेल्या कायद्यानुसार" सोडवण्यासाठी चालू असलेले प्रयत्न, यातील विरोधाभासाची जाणीव झाल्यावर आपल्या वागण्याचे इतरांसमोर समर्थन करण्याचा प्रयत्न किंवा ते चूकच कसे नाही हे स्वतःला समजावण्याचा प्रयत्न या मार्गाने चाललेले त्यांचे विचार -हे प्रत्यक्ष समाजात जसे होत असते तसेच आहे.

एकूण सर्वांशी संबंधित असलेला विषय, जबरदस्त अभिनय, हलकेफुलके पण विचार करायला लावणारे प्रसंग या सगळ्याचे जमून आलेले मिश्रण आहे. चित्रपट अजून रिलीज न झाल्याने यापेक्षा कथा जास्त देणे योग्य होणार नाही. हा कमर्शियली रिलीज व्हायलाच हवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायलाच हवा. अमराठी प्रेक्षकांनाही सहज समजेल असा आहे.

हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. अजिबात चुकवू नका. हा पाहण्याची एक संधी १२ ते १९ जानेवारी दरम्यान होत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, छान लिहिलं आहे. मायबोलीवर आलेल्या पहिल्या लेखापासूनच हा चित्रपट पाहावासा वाटतो आहे Happy

अरे वा! यात ओंकार गोवर्धन पण आहे का? तो माझा क्लासमेट.. चित्रपट कधी बघता येईल कोण जाणे.. Sad पण परिक्षणाबद्दल धन्यवाद!

छान परीक्षण.

मायबोलीवर आलेल्या पहिल्या लेखापासूनच हा चित्रपट पाहावासा वाटतो आहे >>>>>+१

परीक्षण - मस्त . .

घरातील तरूणाची भूमिका म्हणजे सहसा "तो नव्या पिढीचा प्रतिनिधी आहे" अशा वाक्यात परीक्षणात असंख्य वाचलेल्या आहेत. तत्त्वनिष्ठ आई/वडिलांना "तसे राहून तुम्हाला काय मिळाले" वगैरे विचारणारा असा तरूण गेली कित्येक वर्षे बघितलेला आहे. या चित्रपटात विक्रम गोखले व आलोक राजवाडे यांच्यात पुन्हा तसेच काहीतरी दाखवतायत की काय अशी भीती वाटत होती. पण दोघांचेही रोल या गेल्या काही वर्षांतील रूढ फॉर्म्युल्यापेक्षा एकदम वेगळे आहेत, त्यामुळेही जास्त आवडले. >>+१

हलकेफुलके पण विचार करायला लावणारे प्रसंग >>+१ प्रत्येक दॄश्य काहितरी बोलत असते . 'उगाच काय काहितरी ?/' . असे १दा पण वाटत नाही.