नाचे मन मोरा मगन...

Submitted by दिनेश. on 1 January, 2012 - 12:27

माझे काहि आफ़्रिकन मित्र, भारतीय हिंदी सिनेमांचे चाहते आहेत. त्यांना त्यात नेमके काय आवडते
असे मी विचारल्यावर, ते म्हणाले कि आम्हाला गाणी आणि नाच आवडतात. (अर्थात ढिशुम ढिशुम
फायटींग पण खुप आवडते.)
मला जरा नवल वाटले कारण आजकाल जे सपाटीकरण झालय त्यात, कुठल्याही देशांतील नाचात
फारसा फरकच राहिलेला नाही. अगदी खरं सांगतो, आफ़्रिकेतील लोकनृत्ये आणि आजकालच्या
हिंदी चित्रपटातील नाच, यात भाषा सोडली तर फार फरक नाही. उलट आपले कलाकारच जोशपूर्ण
हालचाली करण्यात कमी पडतात असे वाटते.

नवीन संकलनाचे तंत्र आणि कुशल नृत्यदिग्दर्शक आल्यामूळे हिंदी चित्रपटातील नृत्ये, देखणी
झालीत यात वादच नाही. काहि सेकंदाचेच शॉट्स असल्याने, कलाकारांना फारसे प्रयास पडत
नसावेत आणि संकलनात ते नृत्य अतिवेगवान दाखवता येते.

माधुरी, श्रीदेवी, मिनाक्षी, जयाप्रदा, ऐश्वर्या या कुशल नर्तिकाच असल्याने प्रश्न नव्हता, पण या तंत्राने
सुनील शेट्टी
आणि संजय दत्त पण नाचू शकले. पण गंमत म्हणजे माझ्या मित्रांना त्यापेक्षा जून्या चित्रपटातील
नृत्ये जास्त आवडतात. त्यानीच मला जी उदाहरणे दिली, त्यावरुन मला असे वाटले कि आपले
रागदारी संगीत आणि शास्त्रीय नृत्य यांचे त्याना आकर्षण वाटते. (मी सरसकट विधान करत नाही
फक्त माझ्या काहि मित्रांबद्दलच लिहितोय.)

ते निमित्त झालं आणि मला अनेक गाणी आठवली. हि गाणी श्रवणीय तर आहेतच पण प्रेक्षणीय
देखील आहेत. फक्त आपल्याला काही वेगळे चष्मे लागतील.
यातली बहुतेक गाणी काळ्या पांढरी आहेत. काळाच्या ओघात काहिंचे चित्रीकरण धूसर झालेय.
पण शब्द, संगीत आणि गायन यांचा दर्जा मात्र उच्च आहे. आणि या लेखाचे निमित्त असलेले
नृत्य आणि अभिनय तर दर्जेदार आहेच. या गाण्यांकडे बघताना, कलाकारांना असलेले गायनाचे
भान, दिर्घ शॉट्समूळे प्रखरपणे जाणवणारे नृत्य कौशल्य, यांकडे अवश्य लक्ष्य द्या.
(मी या लेखात केवळ श्रवणीय आणि प्रेक्षणीय गाण्यांचाच उल्लेख करतोय. निव्वळ श्रवणीय
असणारी गाणी, पण आहेतच. पण त्यासाठी वेगळा लेख लिहिन)

तसेच मी शक्यतो शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांचा उल्लेख करतोय. खरे तर हे विधान
थोडेसे गैरलागू आहे, श्रवणीय असणारे कुठलेही गाणे, एखाद्या रागावर आधारीत असतेच.
(अगदी टशन मधले, दिल डान्स मारे हे गाणेसुद्धा भैरवी वर आधारीत आहे) पण तरीही.

१) नाचे मन मोरा मगन

तेरी सूरत मेरी ऑंखे मधले रफ़ीने गायलेले हे गाणे. पडद्यावर आहे आशा पारेख. अशोककुमार
दिसायला कुरुप असतो, पण त्याचे गायन मात्र दर्जेदार असते. आशा पारेख त्याला तो न्यूनगंड
सोडण्यासाठी मदत करते.
हे गाणे आहे भैरवी रागावर आधारीत. यात आधी केहरवा आणि मग त्रिताल आहे. पण यात
तबला प्रचंड आडवातिडवा (अर्थात चांगल्या अर्थाने) वाजवलाय. असे वादन असताना गायक
आणि नर्तक, दोघांनाही आव्हान असते. आशा पारेख कुशल कथ्थक नर्तिका आहेच आणि तिने
इथे सादर केलेय ते त्याच शैलीतले नृत्य आहे. पण साधारणपणे द्रुत तालावार कथ्थक मधे
तत्कार केला जातो, इथे तर तिला काहि हस्तमुद्राही कराव्या लागल्या आहेत. पण तरीही
तिने गाण्याला न्याय दिलाय असे वाटते. रफ़िच्या गायनाबद्दल काय लिहायचे. या गाण्यात
शेवटी आशा पारेख लाईट ऑन करते आणि अंधारात बसलेल्या अशोककुमारच्या चेहऱ्यावर
प्रकाश पडतो, त्यावेळी अचानक आनंदी मूडमधले हे गाणे भय रसात जाते. हि किमया
कशी साधलीय ते ऐकाच.

२) मोसे छल किये जाय

लटकी तक्रार करायची असेल तर साधारणपणे बागेश्री रागाची योजना केली जाते, त्याची
उदाहरणे आपण बघणार आहोतच. पण गाईडमधल्या या गाण्यासाठी मात्र सचिनदेव बर्मन
यांनी, झिंझोटी या रागाची योजना केलीय. हा राग गंभीर प्रकृतीचा असल्याने, साधारण
भक्तीरसपूर्ण रचना, या रागात केल्या जातात. (आपण शाळेत जे वंदे मातरम म्हणायचो,
ते या रागात असे.) पण चित्रपटातील प्रसंग बघता, हाच राग योग्य वाटतो. या गाण्यापुर्वी
वहिदाला, देव आनंदने केलेल्या अफ़रातफ़रीबद्दल कळलेले आहे. आणि ती वेदना सतत तिच्या
चेहऱ्यावर आहे. यातले शब्द हे लटके नसून, खरेच आहेत.
तिने जरी भरतनाट्यम शैलीचा उपयोग केला असेल तरी मनातला ताण, नाचातही जाणवतोय.
गोल्डीने, याच चित्रपटातले पिया तोसे नैना लागे रे, पण साधारण अश्याच शैलीत चित्रीत केले
असले तरी दोन गाण्यांचा, वेगवेगळा मूड अगदी, सहनर्तिकांचा हालचालीतही जाणवतो.
यात लता जी सरगम गातेय, त्यातल्या तीन सा वर, त्या दोघांचे विद्ध चेहरे बघाच.

३) ना बनाओ बतिया अजि काहेको झूठी

हा एक प्रसिद्ध दादरा आहे. त्यावर आधारीत जिद्दी या चित्रपटात सचिनदेव बर्मन यांनी हे
गाणे, भैरवी रागात बांधलेय. चित्रपटाचा नायक देव आनंद होता (पण या गाण्यासाठी
मी त्याची कल्पनाही करु शकत नाही.)
हे गाणे मेहमूद वर चित्रित झालेय. तो नाचलेला नाही, पण त्याच्या चेह-यावरचे भाव
कथ्थकच्या तोडीचेच आहेत. मन्ना डेनी जितक्या सुरेलपणे हे गाणे गायलेय, त्याला
तेवढीच अभिनयाची साथ मेहमूदने दिलीय. दिग्गजांशी तुलना करत नाहीत, पण
बिच्छु महाराज किंवा केलुचरण महापात्र सारखे नर्त्क जेव्हा स्त्रीपात्र रंगवतात, त्यावेळी
त्यांच्या रंगरुपापेक्षा त्यांचा अभिनय भारी असतो. असाच काहीसा अनुभव शाहिर विठ्ठलराव
उमप देत असत. इथेही मेहमूदच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच लोभस आहेत.

४) जा रे बेईमान तूझे जान लिया

हे ही रुढ अर्थाने नृत्य नाहीच. गाणे मन्ना डे नीच गायलेय आणि अशोककुमारवर चित्रित
झालेय. अशोककुमार, राज कपूर, दिलीप कुमार हे सर्व स्टाईलबाज अभिनयात माहीर होते.
आपणही बहुतांशी त्यांच्या तशाच भुमिका बघितल्या आहेत.

पण बागेश्री रागातली हि रचना मन्ना डेनी जितक्या नजाकतीने गायलीय तितक्याच
नजाकतीने ती पडद्यावर अशोककुमारने पेश केलीय. कथानक मला माहित नाही, पण
बहुतेक हे गाणे वेशांतर करुन गायलेय असे वाटतेय. जे काही सोंग घेतले आहे, ते किती
उत्तमरितीने वठवलेय ते बघा. (या गाण्यात काहि सेकंदांपुरती जयश्री गडकरही दिसतेय)
यामधली जी सरगम आहे, ती सुद्धा अगदी सहज गुणगुणावी अशी आहे.

५) नैन से नैन मिलाये रखनेको

मी काही लिहिण्यापुर्वी हे गाणे बघाच.
अगदी सुरवातीपासूनचा वाजलेला एकतालाचा ठेका, पुढे अधिकाधिक जोरकस होत जातो
आणि शेवटी त्रितालात बदलतो.
नृत्यही तसेच अभिजात कथ्थक वर आधारीत आहे. दरबारी कानडा हा राग आहे.
या रागात सहसा गंभीर रचना असतात. हि बंदीश पारंपारीक वाटतेय.
गायन उत्तम आहेच.
नवलाची गोष्ट म्हणजे हे गाणे एका पाकिस्तानी चित्रपटातले आहे, कलाकारांची नावे
कळली नाहीत. पण हे सांगेपर्यंत आपल्या मनातही हे येणार नाही, एवढे नक्की.

६) ओ गोरी तोरी बांकी

अगदी पहिल्यापासून ठेका धरायला लावणारे हे गाणे आहे. भैरवी रागावर आधारीत आहे,
आणि केहरवा तालात आहे. पण त्याचा एकंदर लहेजा बघता, ते पाश्चात्य असेल असेच
वाटत राहते.

चित्रगुप्त हा थोडासा विस्मरणात गेलेला संगीतकार, पण त्यांनी काही अप्रतिम संगीतरचना
केल्या होत्या. या गाण्यात आगा आणि चक्क आपला मादक सौंदर्याचा अॅाटमबॉंब पद्मा
चव्हाण आहे.

७) कान्हा जा रे

केदार हा तसा एक प्रसन्न राग आहे. हि पण चित्रगुप्त यांचीच रचना. लता आणि मन्ना डे
चे सूरेल गायन.
यावर आगा, सुधीर आणि कुमकुम दिसताहेत. कुमकुम हि पण एक निपुण नर्तिका होती,
पण ती कायम दुय्यम भुमिकांतच दिसली. यावर तिने केलेले सुंदर नृत्य, लताच्या
गाण्याला उत्तम न्याय देतेय असे वाटते.
लता आणि मन्ना डे यांचे गाणे ऐकताना नेहमीच, ते एकसूरात गाताहेत असे वाटते,
इथेही हा अनुभव येतोच.

८) दिया ना बुझे री आज हमारा

केदार हा प्रसन्न राग असेल तर बिलासखानी तोडि हा गंभीर राग आहे. असे म्हणतात कि
तानसेन मृत्यूशय्येवर असताना, त्याचा मुलगा बिलासखान याने या रागाची रचना केली.
यातल्या बंदिशी (उदा. अब मोरे कांता) असाच भाव दाखवतात.
सन ऑफ़ इंडिया मधले लताचे हे गाणे, लताच्या अप्रतिम तानांपुढे हे नृत्य थोडे फ़िके
पडतेय हे मला मान्य आहे, तरीपण एकंदर प्रभाव सुंदरच आहे.
इथे पण नृत्यांगना कुमकुमच आहे, पण इथेही ती दुय्यम नायिकाच होती (मुख्य
नायिका सिम्मी) हा राग आणि हे गाणे माझे अत्यंत आवडते.

९) गीत गाया पत्त्थरोंने

शांताराम बापुंच्या चित्रपटातील नृत्यगीते हि खास कल्पनारम्य रित्या चित्रीत केलेली असत.
(आज ती बटबटीत वाटतील कदाचित). हे गाणे गायलेय किशोरी अमोणकर यांनी आणि
दूर्गा रागावर आधारीत आहे.
यावरचा नृत्याविष्कार बहुतेक बाली देशातील लोकनृत्यावर आधारीत वाटतोय. राजश्रीचा
पेहराव, मेकप त्याच धर्तीवरचा आहे. काहि गैरसमजामूळे दुरावलेले नायक नायिका एकत्र
येतात असा हा प्रसंग आहे. स्त्रीशक्ती वगैरे विषय आहे.
चित्रपटात राजश्रीने एका श्रीलंकन मुलीचे रुप घेतलेले असते. या गाण्यांनर किशोरी अमोणकर
यांनी थेट स्वत: संगीत दिलेल्या दृष्टी चित्रपटापर्यंत, चित्रपटासाठी गायन केले नाही.

१०) जाओ जाओ नंद के लाला तूम झूटे

वैजयंतीमालाचा हा एक प्रसन्न नृत्याविष्कार. लताचा आवाज आणि बागेश्री राग. तिने जरी
राधेचे रुप घेतले असल तरी बरेचसे नृत्य भरतनाट्यम प्रकारातले आहे.
या गाण्याचे शब्द, (कैसा तिलक कहाकी माला, तन काला तेरा मनभी काला) अगदी धीट आहेत
आणि असे शब्द, कृष्णाला उद्देशून केवळ राधाच उच्चारू शकत होती.
पण तरीही हा सगळा लटका रागच आहे बरं का, खरतर हे कौतुकच आहे, आणि तो भाव नेमका
वैजयंतीमालाने चेहऱ्यावर अचूक पकडलाय.

११) घायल हिरनीया मै बनबन डोलू

चंद्रकंस अशा फारश्या प्रचलित नसणाऱ्या रागातले हे गाणे. लताने अप्रतिम गायलय. याची
रेडीओवर जी रेकॉर्ड लागायची, ती संक्षिप्त रुपात होती.
सुरवातीचा वाद्यमेळ आणि शेवटची लताची अप्रतिम सरगम, त्यात नव्हती. भयभीत होणे,
हे स्वरातून दाखवण्याचा एक अनोखा प्रयोग इथे केलाय. (आणि माझ्या ऐकीवातला तरी तो
एकमेव आहे.)
नलिनी जयवंतचा अभिनय आणि पडद्यावर दिसणारे बाकीचे घटक पण योग्य तो परिणाम
साधताहेत.

१२) जा मै तोसे नाही बोलू

अनिल विश्वासने, लता आणि आशाकडून हे अप्रतिम गाणे गाऊन घेतलेय. सौतेला भाई
हा सिनेमा मी दूरदर्शनवर फार पुर्वी बघितला होता, तेव्हापासून या गाण्याच्या मी
प्रेमात पडलोय.
हे गाणे रेडीओवर मी क्वचितच ऐकलेय. यातल्या दोघींच्या अदा अगदी, दाद देण्यासारख्या
आहेत. लता आणि आशा देखील समरसून गायल्यात.
यातला पुरुष कलाकार, माझ्या आठवणीप्रमाणे (दक्षिणेकडचा) राजकुमार आहे.

१३) अरे जा रे हट नटखट

शांतारामबापूंचे हे पण एक कल्पनारम्य गाणे. नवरंग सिनेमातले. पहाडी रागात बांधलेले.
या गाण्यांच्या शद्बात, शृंगापत्ती नावाचा अलंकार आहे.
चल जा रे हट नटखट, ना छु रे मेरा घुंघट
पलटके दूंगी आज तूझे गाली रे,
मत समझो मुझे भोलीभाली रे
या तिच्या धमकीवर तो उत्तर देतोय

आया होली का त्योहार, उडे रंग की बौछार
तू है नार नखरेवाली रे, आज मिठी लगे है तेरी गाली रे.

म्हणजे तिच्यापुढे पेच आहे कि नाही ?
असो गाण्यात हा भाव न दिसता, दिसतोय तो संध्याचा भन्नाट नाच. आधी दोन वेगवेगळ्या ड्रेसमधे
असणारी ती शेवटी डोक्याच्या मागे मुखवटा लावून नाचलीय.
पुढे गाण्यात येणारा हत्ती, मग तिच्या अंगातून उडणारे कारंजे, याची लहानपणी मजा वाटायची.
नवरंग मधली बहुतेक गाणी हि स्वप्नगीतेच आहेत. तरीही त्या काळात, असे ड्रेसेस घालून
असे नाच करायचे धाडस तिच्या अंगी होते एवढे खरे.

१४) मधुबनमे राधिका नाचे रे

हमीर रागातली हि रचना. दूरदर्शन वर रफ़ी ने हे गाणे, नौशादच्याच उपस्थितीमधे गायले
होते. या गाण्यात सगळे घटक कसे जमून आलेत. दिलीप कुमार सतार वाजवताना
अगदी अस्सल सतारीया वाटतो.
आणि इथेही कुमकुम आहेच. प्रत्येक ओळीला तिने न्याय दिलेला आहे. तिला नाचासाठी
मिळालेला अवकाश फार तोकडा आहे, तरीही तिने उत्तम नाच केलाय.

१५) लागा चुनरी मे दाग

भैरवी मधली हि रचना, आणि त्यातला तराना इतक्या अवीट गोडीची आहे, कि आजही
तरुणांच्या तोंडी ती आहे.
गाण्यातले शब्द आध्यात्मिक आहेत, आणि अर्थ कळल्यावर नाचायचे, अशी नर्तकीला
म्हणजेच रत्नाला अट घातलेली असते. दिल हि तो है, ची नायिका नुतन होती.
या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन सरोज खान ने केले होते (तिचा पहिलाच चित्रपट.
याच चित्रपटातल्या, निगाहे मिलाने को, या कव्वालीत ती सहनर्तिकाही आहे.)
पण मला या गाण्यातला, राज कपूरचा अभिनही आवडतो. त्याच्या त्या गेटपमूळेही
मजा आलीय.

१६) तेरे नैना तलाश करे जिसे

तलाश सिनेमातले हे छायानट रागावर आधारीत गाणे. हे गाणेही नायिका, शर्मिलावर
चित्रीत झालेले नाही. (मला नाही वाटत ती एवढी नृत्यकुशल होती.) यातली
नर्तिका आहे मधुमती.
मधुमती पण बहुतेक दुय्यम भुमिकातच वावरली. तिच्या आणि हेलनच्या चेहऱ्यात
बरेच साम्य होते. तिने काही मराठी चित्रपटातही भुमिका केल्या.

मन्ना डे च्या गायनाला, शाहु मोडक यांनी योग्य तो न्याय दिलेला आहेच.
या गाण्यात तबला, मृदुंग, सतार आणि सरोद यांचा अप्रतिम वाद्यमेळ जमलाय.
सरोद अर्थातच झरीन दारुवाला यांनी वाजवलाय.

१७ ) तोरा मन बडा पापी सावरिया रे

पहाडी रागावर आधारीत हे गाणे आहे, गंगा जमुना चित्रपटातले. लताच्या इतर गाण्यांपुढे
आशाचे हे गाणे काहीसे मागे राहिले.
कॅबरे नाचणारी हेलेन ती, हिच का असा प्रश्न पडेल इतके सुंदर नृत्य तिने पेश केलय.
कथ्थक मधला चक्र हा प्रकार तिने पेश केलाय, खास गिरकी घेऊन तिने मारलेली
बैठक पण सुंदर आहे. आशाने जसे जीव तोडून हे गाणे गायलेय त्यावर साजेसा
मुद्राभिनयही तिने केलाय.
कॅबरे नाचण्यापुर्वी हेलनने अशी अनेक शास्त्रीय नृत्यांवर आधारीत गाणी पेश केली
होती.

१८ ) हम गवनवा न जैबे-- विकल मोरा मनवा

सुचित्रा सेनचा ममता सिनेमा जर तूम्ही हल्लीच बघितला असेल तर हे गाणे, खरे
तर रागमालिका, त्यात आहे असे आठवणार नाही. मी अगदी पहिल्यांदा ज्यावेळी
तो बघितला त्यावेळी हे गाणे होते, नंतर ते उडवले गेले.
फार सुंदर रित्या चित्रीत झाले होते, असे नाही म्हणणार मी, पण अत्यंत श्रवणीय
आहे एवढे मात्र नक्की.
तीन वेगवेगळ्या मूडमधली ही ३ गाणी लताने अप्रतिम गायलीत, हे वेगळे लिहायला
नकोच, या गाण्यात सुचित्रा सेन वयस्कर होताना दाखवली होती. या गाण्याचा व्हीडिओ
नेटवर मला सापडला नाही, कुणाला सापडला तर अवश्य लिंक द्या.
यातली दुसरी रचना बहार रागात आहे तर तिसरी पिलु मधे (पहिल्या रचनेचा राग ?)

१९) बसंत है आया रंगीला

स्त्री / शकुंतला अशा नावाचा हा शांताराम बापुंचा संध्यापट. यात ते स्वत: दुष्यंताच्या
भुमिकेत तर संध्या, शंकुतलेचा भुमिकेत होती. परिचीत कथानक असूनही, हा चित्रपट
मला तरी आवडला नव्हता.
यात मुमताज पण शकुंतलेच्या सखीच्या भुमिकेत होती तर राजश्री केवळ या नाचापुरतीच
होती. बसंत रागातले हे गाणे, आशाने सुंदरच गायलेय. बाकीची गाणी, लताची होती.
( ओ निर्दयी प्रितम ) हा चित्रपट मराठीतही होता आणि हे गाणे मराठीतही याच
चालीवर होते.
या गाण्यावर राजश्री सुंदर नाचली आहे, पण त्याचा व्हीडिओ मात्र नेटवर मिळाला नाही.
हे गाणे. याच चालीवर मराठीतही आहे.

२० ) ना दिर दीम ताना देरे ना

भरत नाट्यम मधला तिल्लाना ज्या रागात म्हणजे गौड सारंग (या रागाचे नाव गौर सा रंग असल्याचे
वाचले.) सहसा असतो त्या रागातली हि रचना. भारत आणि रशिया यांच्या सहकार्याने हा चित्रपट, परदेसी बनला होता.
नायकाच्या भुमिकेत रशियन कलाकार होता.

पद्मिनीने इथे एक सुंदर नृत्य पेश केलय. या चित्रपटाची मुख्य नायिका नर्गिस होती.

२१) तू है मेरा प्रेम देवता

कल्पना चित्रपटातले पद्मिनी आणि रागिणी या दोन बहिणींनी सादर केलेले हे आवेशपुर्ण नृत्य.
मोहम्मद रफ़ी आणि मन्ना डे मुख्य गायक असले तरी, बोल गाणारे गायक वेगळे आहेत.
ललित रागातले हे गाणे ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केले आहे.

भरतनाट्यम आणि कथ्थक याबरोबरच काही लोकनृत्यांचीही झलक यात दिसतेय. प्रदिर्घ शॉट्समधे
दिसणारे दोघींचे सामंजस्य अप्रतिम आहे.

मला अशी अनेक गाणी आठवताहेत. हि आवडली तर अवश्य कळवा, मग आणखी
लिहिन.

गुलमोहर: 

दिनेश मस्त आहेत गाणी. मला आता बघता येत नाहीयेत पण घरी गेल्यावर बघेन.

१९>> हे तेच गाणे का की ज्यात राजश्रीने शरीराची कमान केली आहे?

मला आवडणारी आणखी काही -

१. अपलम चपल्म - आझाद
२. मनभावन के घर जाये गोरि - चोरी चोरी
३. बागड बम बम - कठपुतली
४. तू न आया और होने लगी शाम रे - आशा
५. आधा है चंद्रमा - नवरंग

दिनेशदा, सुंदर लेख जमला आहे Happy

मला आवडणारी आणखी काही गाणी म्हणजे आम्रपाली मधील - वैजयंतीमाला वर चित्रीत झालेली , गाईड मधली वहीदा वरची Happy Happy Happy

मस्त लेख!
गाणी प्रचंड आवडीची आणि कित्येक वर्षांनी ऐकली.
धन्यवाद दिनेशदा!
काहे को झूटी.............महमूदवर चित्रित आहे ना?
माझ्या मते हा बागेश्री नसून भैरवीच आहे.

दिनेशदा, नवीन वर्षीची तुमची ही भेट खुपच सुरेख आहे.
अतिशय सुंदर लेख.. गाणी सवडीने ऐकीन. Happy हेलन नी कथ्हक वर पण नाच केला आहे हे प्रथमच समजले.

जामोप्या,मानुषी
सुधारणा केली, बाकिचे राग पण बघून घ्या.
माधव, अगदी परतपरत बघावीशी गाणी आहेत ही.
इथेही प्रतिसादात अश्या लिंक्स आणि वर्णन मिळाले,
तर मूळ लेखातच ती गाणी देता येतील.

मंदार, गाण्यानुसार चेहर्यावरचे हावभाव हा घटकच दुर्मिळ झालाय.

दिनेशदा, माधव - अपलम चपलम ह्या यादीत नाही हे बघून मलाही आश्चर्य वाटलं. बाकी आपल्याला नाचातलं काही कळत नाही म्हणा. दिनेशदा, लेख मात्र सुरेख.

सौतेला भाई मधला लताबरोबरचा आवाज मीना कपूरचा आहे का ? त्या सिनेमातली दुसरी गाणी तिने गायलीत. (लागी नाही छुटे राम- लताबरोबर आणि आहा पिया काहा करु- मन्ना डे बरोबर )