मनी.......एक अविस्मरणीय आठवण!-----३.

Submitted by टोकूरिका on 31 December, 2011 - 01:31

मनी माझा हक्काचा विरंगुळा : मी आणि मनी ही एव्हाना आमच्या चाळीतच नव्हे तर अख्ख्या कॉलनीत टवाळ जोडगोळी म्हणून प्रसिद्ध झालो होतो. मला आता जसा काय मनीला बकोटीला धरून दोन्ही हाताच्या घडीत बसवून, कॉलनीत हिंडायचा छंदच जडला होता! मनीच्या रूबाबदार व्यक्तीमत्वामुळे Happy सगळी बच्चेकंपनी मला टरकून असायची....कारण माझ्याशी पंगा घेतला तर मी त्यांच्या अंगावर मनीला सोडेन अश्या धमकीवजा सूचना मी त्यांना फ्रिक्वण्टली देत असे...:P अर्थात मला तसे कधीच करावेसे वाटले नाही, कारण मुळात मनी विनाकारण कधीच कुणाला नखोड्या बिखोड्या ओढत नसायची अन चावतही नसायची!.....उलट तिच्याशी खेळताना मी मुद्दाम माझा हात तिच्या तोंडाजवळ नेऊन जबरदस्तीने तिचा जबडा उघडून तिचे अणकुचीदार दात मोजायचे...तेवढाच काय तो वाघाचे नै पण त्याच्या मावशीचे दात मोजल्याचा फील! Wink मग तिच्या खरखरीत जीभेने ती माझा हात चाटत असे.....जणू, ''तू मला कितीही त्रास दिलास तरी मी तुझ्यावर प्रेमच करणार!'' असे सांगत असावी....मनी असं काही सांगत्येय, असं मी अनेकदा इमॅजिनलं आहे, पुढेही जेव्हाजेव्हा रागाच्या भरात, आई किंवा पप्पांनीही तिला घराबाहेर काढलं तेव्हातेव्हा मी तिला जवळ घेतलेलं आहे, तेव्हा ज्या मायेने ती कुशीत शिरायची ते मी शब्दांत वर्णू शकत नाही हेच खरं! तेव्हा मला तिच्या डोळे भलते उदास वाटत, अन हलकेच उच्चारलेलं ''म्याव'' म्हणजे, ''मला नाही जायचं गं इथून , प्लीज!'' अशी विनंती वाटायची! अशा वेळी मला मांजरांना अप्पल्पोट्या म्हणणार्‍यांचा प्रचंड राग येत असे...
मनीच्या सवयी भलत्या राजेशाही होत्या, रोज सकाळी मी उठेपर्यंत महाराणी उठून आमच्या बागेतल्या गवतात दोन्ही पाय ताणून, सकाळची कोवळी उन्हं अंगावर घेत ,कान टवकारलेल्या अवस्थेत डोळे मिटून पहुडलेल्या असायच्या! माझा आवाज येताच ती उठून माझ्या पायात घुटमळू लागे, माझ्या चहाबिस्किटांसोबत तिच्याही खादूमोदूची सोय होत असे. Happy मग मी शाळेत गेले की उनाडक्या करायला ही मोकळी! मनी खाण्यापिण्याच्या बाबतीत भारी हेल्थ कॉनशिअस होती हां मात्र! जरी कुणी खायला दिलं, तरी ते वास घेऊन, आवडलं तरच खाणार! शिळं अन्न तिला चालत नसे...सुके बोंबिल, सुकट, जवळा इत्यादी तिला जाम आवडत असत....बिस्किटांपासून ड्रायफ्रूट्सपर्यंत आणि वेफर्सपासून काजु कतलीपर्यंत सग्गळ्ळे पदार्थ तिने आवडीने खाल्ले.......घरात तिचा शाही सरंजाम असल्याने उंदीर पकडायला क्वचितच जायची.....पकडला तरी मी तिला तो घरात आणू देत नसे...मग ती बाहेरच्या बाहेरच त्याचा फडशा पाडून येत असे! कधीकधी मनी काहीच न खातापिता नुसती शांत बसून राहायची, मध्येच उठून बागेतल्या दुर्वा कुरतडून खायची.....मला कळायचं नाही ती अशी का करते...मग मी मम्मीला पिडायचे...'मनीला काय होत असेल गं??? आणि घाणेरडी दुर्वा काय खाते?? तिला तू आज खायला दिलं नाहीस का?'' तेव्हा एकदा मम्मीने सांगितलेलं की तिच्या पोटात दुखत असेल तर ती अशीच दुर्वा खाते म्हणून! तिची ही सवय तेव्हा मला नव्याने कळली...मग मी ती काय खाते, काय नाही याकडे जास्तच लक्ष देऊ लागले...कारण आपण तरी बोलू शकतो...पण माझ्या मुक्या मनीला तर तिचं दुखणं सांगताही येत नसेल!
मनीच्या गुबगुबीत, स्वच्छ अश्या अंगावरून हात फिरवताना मला फार मजा यायची.........बाहेरून फिरून आल्यावर मनी कायम स्वतःचे अंग चाटून साफ करायची....अस्वच्छ राहणे तिला आवडायचे नाही! मला बर्‍याचदा तिला पिडायची लहर येई,,,मग मी हळूच एखादे जळमट तिच्या मिश्यांत गुंतवत असे, अन ती ते काढण्यासाठी काय काय करते ते पहात बसे! मी एखादी दोरी घेऊन ती मुद्दाम मनीच्या डोळ्यासमोर हलवत असे तेव्हा ती दोरी पकडायला ती जी काही धडपड करी अन उड्या मारी की ते बघुन मला खदखदा हसू फुटायचे........:) अश्या अनेक प्रसंगातून मनी माझी करमणूक करायची! Happy

गुलमोहर: 

छान लिहल्यात आठवणी मनीच्या.
बाकी मांजरांना सातासमुद्रापलीकडे सोडले तरी ते बरोबर संध्याकाळी परत घरात येते हे खर आहे का.?
एक फु.स. लेखनात स्माईलजचा वापर कमीतकमी अथवा टाळत चला.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
©º°¨¨°º©!!! सर्व मायबोलीकरांना इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!! ©º°¨¨°º©

आभार स्मितू, पजो Happy

गिरी खरंच वेळ नै मिळत रे टायपायला,,,..म्हणून मग मोठे भाग पेंडिंग न ठेवता छोटे छोटे भाग टाकतेय....वेताळ २५ धन्स...:) हा घ्या अजून एक स्मायली Proud

छान लिहिलय,
मला स्वतःला मांजरे एवढी आवडत नहईत, कुत्रे जास्त आवडतात.
लेकिची मात्र मांजर आहे, लेकिबरोबर तिचेही लाड करावे लागतात.
तिचे नाव सोनु द सेकंड.. कारण पहिली पळून गेली.

दिनेशदा इथेपण पार्ट २ ?????
Happy
लेकीला माझे अनुभव नक्की सांगा गोष्टीच्या स्वरूपात...:)

बाकी मांजरांना सातासमुद्रापलीकडे सोडले तरी ते बरोबर संध्याकाळी परत घरात येते हे खर आहे का.?>>>>>> असेल असेल...माझी मनी कित्येकदा अशी लांब सोडलेले असताना परतली आहे...

<< बाकी मांजरांना सातासमुद्रापलीकडे सोडले तरी ते बरोबर संध्याकाळी परत घरात येते हे खर आहे का.?>>
यावरुन सरदारजीचा विनोद आठवला. घरातील मांजराला तो पिशवीत लपवुन लांबवर सोडुन देतो व घरी येतो तर मांजर त्याच्या अगोदर घरी. दुसर्‍या दिवशी मांजराला तो आणखी लांब जाऊन सोडुन देतो व घरी फोनकरुन कळवतो. सरदारची मजेत रमत गमत घरी जाण्याअगोदरच फोन यतो मांजर घरी आले आहे तुम्ही लवकर घरी या. तिसर्‍या दिवशी सरदारजी ठरवतो आता याला काळ्या पिशवित बंद करुन आणखी लांब सोडायचे. चालत चालत सरदारची खुपच लांब येतो. आता येथुन मांजर परत घरी जाऊच शकत नाही असा त्याचा ठाम विश्वास असतो. मांजर सोडुन थोडे चालल्यावर त्याच्या लक्षात येते आपण रस्ता चुकलो आहोत. सरदारजी घरी फोन करुन कळवतो मी रस्ता चुकलो आहे मांजराला लवकर पाठवुन द्या.

छान.