सूर्य मावळून थोडाच वेळ झाला होता. काळोख पडायला हळूहळू सुरुवात झाली होती.पावसाचे दिवस असल्याने सगळ्या खदखदणार्या भवतालावर एक घट्ट झाकण ठेवल्यासारखं वाटत होतं. वार्याची झुळूक नव्हती तरी उकडतही नव्हतं. बंगल्याच्या गेटवर चढलेला जुईचा वेल दमून झोपून गेला असला तरी त्याच्या मंद श्वासोच्छ्वासातून गोडसर अत्तर घमघमत होते. वैजू रोजच्यासारखीच गच्चीत आली
होती. दिवसभर झगमगत असलेला हा देखावा हळूहळू बंद होताना बघणं हा आता तिचा नेमच
झाला होता. युगानुयुगं अखंड चालू असलेल्या या नाटकाचे आपण फक्त प्रेक्षक. नाटक
चालूच राहील, कदाचित उद्या आपणच नसू!
याच संधिप्रकाशात तिला आजवर किती कविता सुचल्या. वीरदा बरोबर झालेल्या गप्पा.. एखाद्या क्षणी त्याची प्रगल्भता, शास्त्रनिष्ठा, प्रत्येक घटनेकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन अचानक चमकून आपल्याला नवं काहीतरी शिकवून जात असे. त्याच्या समुद्रासारख्या अथांग डोळ्यातून काठोकाठ भरुन राहिलेलं बुध्दीचं तेज! आजवर वीरदासोबतच्या चर्चेमध्ये आपण केवळ थक्कच होत आलो. त्याचं सखोल वाचन,सारासार विचार करुन स्वतःचं मत मांडण्यातला आत्मविश्वास हे किती हवंहवंसं होतं आपल्याला. कविता नीट जमली नाहीये हे कळलं असूनही प्रोत्साहन देण्याचा त्याचा उत्साह पाहून कौतुक वाटायचं. वीरेंद्र आपला मोठा भाऊ आहे याचा नुसताच अभिमान नव्हता. त्याच्याबद्दल अजूनही बरंच काही वाटायचं. ते नक्की काय काय होतं हे आजही शब्दात मांडता येत नाही आपल्याला. पण आपण त्याच्यासारखे कधी होणार असं लहानपणापासून वाटत आलेलं आठवून तिनं एक खिन्न उसासा सोडला.
श्रेयसची आणि आपली ओळख झाली ती सुध्दा वीरदामुळेच. त्याचा जीवच श्रेयसमध्ये अडकलेला. कॉलेज कँटीनमध्ये ओळख झाली अन तारा जुळल्या. अनाथाश्रमातून आलेला श्रेयस मेरिटवर शिकत इथवर आला आहे, हे कळल्यावर तर वीरदाने आपली सावलीच त्याला दिली. त्याला हुशारीचं, बुध्दीच्या जोरावर कर्तृत्व करुन दाखवणार्यांचं अपार कौतुक. माझ्यासाठी दिव्यत्व हेच आहे आणि तेथे हात जोडायला मी कधीच मागेपुढे पाहणार नाही, तो नेहमी म्हणायचा. प्रेमाच्या ओलाव्याची सवय नसलेल्या श्रेयसला वीरदाच्या ऊबदार सोबतीने सुरुवातीला बुजल्यासारखं व्हायचं.पण मग भरीला होतेच आई बाबा. नकळतच श्रेयस आपल्या घरातलं पाचवं माणूस झाला.
ज्या दिवशी श्रेयसनं आपल्याबद्दल वीरदाला सांगितलं तेव्हा तर तो अक्षरशः त्याला खांद्यावर बसवून घेऊन आला होता घरी, अर्थात हे मागून कळालं श्रेयसकडूनच. 'तुम्ही एकमेकांना प्रपोज करण्याचा, 'हो' ऐकण्यासाठी प्राण कानात गोळा होऊ देण्याचा आनंद मला हिरावून घ्यायचा नाहीये. रीतसर होऊ द्या तुमचं!' श्रेयसच्या खांद्यावर थाप मारत म्हटला असेल तो. इतका बिलंदर की पुढे तीन महिने आपल्याला या
खेळाचा पत्ता नाही. जेव्हा श्रेयसनं आपल्याला प्रपोज केलं तेव्हा दोन दिवस नुसती घालमेल. कशात लक्ष नाही. हे पाड,ते सांड. आई वैतागली तेव्हा यानंच पाठीशी घातलं. शेवटी धीर करुन संध्याकाळी त्याला गच्चीत बोलावलं. इथेच या खांबाला टेकून हाताची घडी घालून उभा होता. काहीच माहीत नसल्याचा कोरा चेहरा ठेवून. त्याला कसं सांगावं हा विचार करण्यातच वेळ चालला होता. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर पुन्हा शांतता. जीभ रेटत नव्हती. धड्धडीने काळीज फुटून बाहेर पडेल की काय असंच वाटत होतं. वीरदाला पण आपल्याला नीट सांगता येत नाहीये का काय? हे काय करुन ठेवलं या श्रेयसनं? आवेगानं रडूच कोसळलं. तेव्हा खेळ संपल्यासारखा जवळ घेऊन डोक्यावर थापटत म्हणाला, 'वैजू, श्रेयसनं विचारलं ना तुला? मला माहीत आहे सगळं. तू काहीही निर्णय घे आमची कुणाचीही हरकत नसेल. श्रेयसचीही.' अचानक सगळे ताण सैल पडले. तो मोकळेपणा, ते स्वातंत्र्य त्या क्षणीच नकोसं झालं. असं वाटलं पुन्हा एकदा दाला विचारावं, 'तूच सांग, काय करु?' पण तो नव्हताच सांगणार. हे निर्णयाचं ओझं मला झेपणार नाही. सायकल शिकवताना हळूच मागे कॅरियरला लावलेला हात सोडून मजा बघावी तसं हसू येत होत त्याला. आपल्याला मात्र या उगाचच मोठं होण्याचे आणखी उमाळे येत राहीले. त्यानं मोकळं होऊ दिलं.
काही दिवस त्या प्रश्नाचं भिजत घोंगडं तसंच ठेवून दिलं. श्रेयसनंही पुन्हा टोकलं नाही. मनामध्ये हिंदोळे चालू होतेच. अख्रेरीस एका क्षणी झोका थांबला. सापडलं उत्तर. वीरदाला सांगितलं तेव्हा म्हणाला, "माझी वैजू बरोबरच निर्णय घेईल याची खात्री होती मला." त्यारात्री श्रेयस आणि आपण डिनरला गेलो तर वेड्यासारखे दोघं किती वेळ वीरदाबद्दलच बोलत बसलो! अर्थात आमच्या एकत्र येण्याला तोच तर
जबाबदार होता. दोन्ही बाजू पक्क्या ठाऊक असतानाही त्यांना उगाचच घाई करुन एकमेकांसमोर उभं न करण्याचा जो संयत शहाणपणा त्यानं दाखवला त्यानं दोघंही भारावून गेलो होतो. मला म्हणाला होता - 'वैजू, आपल्याकडे लोक वेळ महत्त्वाचा आहे म्हणून कमीत कमी वापरतात. उलट, तो जास्तीत जास्त देणं महत्त्वाचं असतं कधीकधी!'
दीड वर्षं आनंदात उडून गेलं. आई बाबांनाही कळालं तेव्हा त्यांनाही आनंदच झाला. लग्नाची तारीख काढायची चर्चा सुरु झाली. कशात नाव ठेवायला जागा नाही म्हणता म्हणता गालबोट लागलंच. अचानक- तो काळा दिवस आला आणि आपल्या घरादाराचे रंग पुसून गेला. त्या भीषण आठवणीने आताही वैजूचं काळीज चरकलं. तो आकांत आठवला की डोळ्यासमोर काळोख गरगरतो. कितीही दडपून टाकायच्या म्हटलं तरी काही घटना तीव्र चरे उमटवून जातात. इतरांसाठी तो उरतो फक्त व्रण पण त्या जखमेची वेदना
आठवणीतूनही भळभळते.
वीरदाचं मुंबईला काहीतरी काम होतं. एकट्यानं जाण्यापेक्षा दोघं मस्त गप्पा मारत जाऊ म्हणून श्रेयसलाही सोबत घेऊन गेला. आणि ते गेल्यावर अडीच तासातच आला तो पोलीसांचा फोन. एक्स्प्रेस हायवेवर अॅक्सिडेंट झाला आहे ताबडतोब या. नक्की काय झालंय, किती लागलंय काहीच कल्पना नसताना आई बाबा आणि आपण तिथवरचं अंतर कसं कापलं हे आजही आठवत नाही. त्या दोघांचेही मोबाईल लावण्याचा वेडा प्रयत्नही केला. नॉट रीचेबल.
तिथे गेल्यावर उघड्या डोळ्यांना जे भीषण दृश्य दिसलं ते आता पुन्हा मिटल्या डोळ्यांनाही सहन होत नाही. कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. लाल थारोळ्यात वीरदा आणि हायवेच्या डिव्हायडरवर श्रेयस फेकला गेला होता. अॅम्बयुलन्सनं हॉस्पिटल गाठताना सारं गोठून गेल्यागत झालं होतं. एकाचवेळी पायाखालची जमीन सरकावी आणि आभाळही फाटाव? हाहाकार होऊनही डोळे,शब्द थिजून गेले होते. पुढचं सारं यंत्रवत झालं. कुणीतरी मदतीसाठी वीरदाच्या मित्रांना बोलावलं. ते श्रेयसचेही मित्र होतेच. त्यांनीच पुढाकार घेऊन भराभर हालचाली केल्या. वीरदा हाती लागला नाहीच. श्रेयसला तर काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली. कारच्या काचा डोळ्यात घुसल्याने त्याचे डोळे गेले. हे ऐकल्यावर उरलेलं अवसानही गळून पडलं. आकांत झाला. निष्फळ,आर्त टाहोनं सारं वातावरण बधिरलं. कुणी कुणाला सावरायचं? एका क्षणात एका फुलाच्या पाची पाकळ्या इतस्ततः विखुरल्या. आता काहीच शिल्लक
नव्हतं. सारं काही आकसून गेलं.आई बाबांकडे पाहायचा धीरही होत नव्हता. प्रेमाचं,आठवणींचं,अपेक्षांचं,स्वप्नांचं,मनामनातलं भावविश्व एका फटक्यात जमीनदोस्त झालं होतं. काय झालं,कसं झालं,कुणामुळे झालं या प्रश्नांना आता खरोखरीच काही अर्थ नव्हता. जे घडलं ते असं होतं आणि ते स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्ग तरी काय होता?
तसेच एका बाकावर सुन्न बसलेली असताना पराग आला. तो बरंच काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता पण कानातून मेंदूपर्यंत शब्दच पोचत नव्हते. शेवटी त्यानं एक पेपर पुढे केला सहीसाठी. कॉलेजमधल्या कसल्याश्या कँपेनमध्ये वीरदाच्या या ग्रुपनं पूर्वीच कधीतरी नेत्रदान केलं होतं. श्रेयससकट. आणि आता वीरदाचे डोळे श्रेयससाठी उपयोगात येणार होते! दैवयोग म्हणावा की नियतीचा खेळ? श्रेयसला
कसलीही कमी पडू देणार नाही अशी शपथच घेतली होती ना वीरदानं? नेत्रदान झालं. वीरदाला आडवं बाहेर आणलं तेव्हा त्याची उंची पहिल्यांदा जाणवली. आता तर तो फारच उंचावर गेला होता. नॉट रीचेबल.
घराची घडी मोडली ती पुन्हा बसणार नाही आता कधीच. श्रेयससाठी हॉस्पिटलच्या फेर्या सुरु होत्या. अजून जखमा,फ्रॅक्चर्स,टाके भरायला एक दीड महिना तिथेच ठेवावे लागणार होतं. आई तर कोणत्या बळावर सारं रेटत होती कोण जाणे. हॉस्पिटलमध्ये दिवसच्या दिवस अवाक्षर न बोलता बसून राहयचो आपण. वीरदाच्या आठवणी,समोर झोपलेल्या श्रेयससोबतचे अलवार क्षण. अंतरंग ढवळून निघाल्यागत वाटत होतं. जे घडलं ते खरं नाही असं खूपदा वाटायचं पण रस्त्यावरचं ते वीरदाच्या रक्ताचं थारोळं,काट्याकुट्यातून श्रेयसला सोडवून बाहेर काढताना होणारी गडबड, अॅम्ब्युलन्स,एक्सप्रेसवे वर थिजलेलं ट्रॅफिक,त्या हॉस्पिटलचा वास,नंतर दावर झालेले सोपस्कार,घरातलं सुतक त्या कशाचाच विसर पडू द्यायचं नाही.
'उद्या डोळ्यांची पट्टी काढणारेत हं पेशंटची.'नर्सनं सांगितलं. माझा श्रेयस उद्या मला बघेल! इतके दिवस शब्दातून,स्पर्शातून मी आहे,एवढंच त्याला जाणवत होतं. उद्या मी त्याला प्रत्यक्ष दिसणार. रोज हॉस्पिटलला येताना उद्ध्वस्त मी पावलं ओढत यायचे. निदान उद्या तरी श्रेयसला आपण नीट दिसायला हवं. वीरदाबद्दल त्याला अजून काहीच माहीत नाहीये. आपल्या उदास अवतारानं त्याला अचानक नको
समजायला. मुळात तो कशातून बाहेर पडलाय याचीही अजून त्याला नीट कल्पना नाहीय. हा दु:खाचा डोंगर नकोच दिसायला त्याला. धीर करुन सांगायला हवंय. उद्याचा दिवस पार पडू दे. दुसर्या दिवशी
वैजूनं वाढदिवसाला त्यानंच घेतलेला गुलाबी ड्रेस घातला. डॉक्टरांनी त्याच्या कलानं घेत,हळूहळू पट्टी काढली. त्यानं पहिल्यांदा बघितलं ते वैजूलाच. त्याच्याकडे पाहून हसताना तिच्या डोळ्यातून अश्रू निखळलेच.
अन, अचानक तिचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती हबकून गेली. बधीरतेने तिच्या तोंडातून शब्द फुटेना. डोक्यात प्रश्नांचं काहूर उठलं.
तीच शांत,स्निग्ध, दिलासा देणारी नजर! अथांग! डोळ्यांत काठोकाठ ओसंडणारं बुध्दीचं तेज!
वीरदा??
तोच.
श्रेयसच्या डोळ्यात नाचणारे ते अल्लड, खेळकर भाव कुठे हरपले? कित्येक संध्याकाळी त्याच्या नजरेत नजर मिसळवून गुलाबी स्वप्नं बघितलेले डोळे आपल्याला नक्कीच माहितीयेत. हे ते नाहीत. आपल्याकडे बघतोय तो नक्की कोण? श्रेयस की वीरदा??पोटात कालवाकालव होऊन तिला क्षणभर भोवंडल्यासारखं झालं. चेहर्यावर काही न दाखवता ती थोडा वेळ श्रेयससोबत थांबून घरी निघून आली.
हा कसला विचित्र पेच आपल्यापुढे? वीरदा आणि श्रेयस दोघं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्वाचे. त्यांच्याशिवाय आपल्या असण्याला अर्थच उरत नाही. दाचं आणि माझं; फक्त आमचं असं एक जग होतं. जे पुढेही माझ्या आठवणीत जिवंत राहणार आहे कायम. श्रेयसचं आणि माझं तर आयुष्यच एक होऊन गेलं होतं. हे दोन वेगळे आणि हवेहवेसे रंग होते आयुष्याला. पण मग या दोन्हीची इतकी सरमिसळ व्हावी की
डोळ्यांना कुठलाच रंग ओळखू येऊ नये?आज आपण नीटनेटकं,त्याला आवडेल असं आवरुन गेलो ते श्रेयससाठी. पण तिथे आपल्याला भेटला,दिसला तो वीरदा. दाशी बोलावं तसं आपण बोलायला लागलो तर हातात हात धरला श्रेयसनं. त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तरी नक्की कुणाचे होते? प्रचंड गुंता. हे नवे हेलकावे घ्यायला आता खरंतर शक्तीच उरली नाहीये आपल्यात. असं का झालं रे वीरदा?उशीत ओक्साबोक्शी रडतच वैजू झोपून गेली.
त्यानंतर मग श्रेयसशी बोलताना वैजूला नजरेला नजर मिळवणं अवघड वाटायला लागलं.. न जाणो आपल्या नजरेत श्रेयससाठीचे अपार ओढीचे भाव उमटले आणि ... अर्थात,त्याची या लग्नाला कधीच हरकत नव्हती. मात्र वीरदा तिचा साक्खा मोठा भाऊ होता अन श्रेयस प्रियकर, भावी नवरा. श्रेयस आणि आपलं, भावी नवराबायकोचं हे जे अत्यंत तरल आणि म्हणूनच खाजगी आयुष्य आहे तिथे तिसर्या कुणालाच जागा नाही. ते गुलाबी क्षण हे फक्त त्या दोघांचे असायला हवेत. त्यावर फक्त श्रेयसचा अधिकार आहे. श्रेयसच्या जवळ जावं, त्याच्या मिठीत शिरून सारं जग विसरून जावं म्हणून ती पुढे झाली की श्रेयसचे डोळे अन त्यात उमटणारी दाची नजर तिचं मनोराज्य उलथवून टाकत असे. तिची घालमेल होऊ लागली. तिचं भावविश्व हळूहळू उद्ध्वस्त होत आहे हे समजूनही ती काहीच करू शकत नव्हती. ही हतबलता तिच्यातला उत्साह, जीवनरस शोषून घेऊ लागली होती. हा पेच तिला स्वस्थता लाभू देत नव्हता. इतक्या जीवघेण्या संकटातून वाचलेल्या श्रेयसला आता फक्त सुख आणि सुखच द्यायचं असं मनोमन ठरवूनही ती त्याच्याकडे पूर्वीच्याच प्रेमळ, आतूर नजरेने पाहूदेखील शकत नव्हती.
श्रेयसला हळूहळू सारं समजलं होतं. वीरेंद्रमुळे आज आपल्याला दृष्टी मिळाली, एका अर्थाने नवजीवन मिळालं. नाहीतर त्या अंधकाराच्या गर्तेत दीर्घायुष्य जरी लाभलं असतं तरी ते जगण्याचं बळ नव्हतं. आजवर कित्येक हालअपेष्टा सोसल्या, परिस्थितीवर मात करत इथवर पोचलो. वीरुसारखा दोस्त लाभला आणि लोखंडाचं सोनं झालं. कॉलेजमध्ये एकमेकांच्या नादाने केलेल्या एका छोट्याशा चांगल्या कामाचा आपल्यासाठीच असा उपयोग झाला या योगायोगाचं त्याला नवल वाटलं. वीरेंद्रच्या जाण्यानं त्याच्या
आयुष्यात कधीच भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली होती. पण वैजूच्या तुटक वागण्याचाही त्याला अर्थ लागत नव्हता. आई बाबा तर मुलाच्या जाण्याचं दु:ख सोसत त्याच्यासाठी झटत होते. त्यांच्या प्रेमाची उतराई तो होऊच शकत नव्हता. पण वैजूचं लांब लांब राहणं त्याला अस्वस्थ करत होतं. नक्की काय झालंय? वीरच्या जाण्याचं दु:ख मलाही आहेच. पण ही माझ्यापासून दूर का राहते?नकोशा वाटणार्या कोणत्यातरी अवघड प्रश्नाची चाहूल देत होतं. हे बोलायला,मन मोकळं करायला त्याला वीरदाची
तीव्रतेनं उणीव भासली. सगळयांच्या मायेत गुरफटलेला असूनही आतल्या आत तो अगदी एकटा, एकाकी पडला होता.
अखेर एक दिवस त्यानं वैजूकडे विषय काढलाच.
'वैजू, तुला काही त्रास होतोय का? मी गेले काही दिवस बघतोय, तू माझ्याशी
पूर्वीसारखी बोलत नाहीस, हसत नाहीस.'
'छे रे, कुठे काय. व्यवस्थित आहे मी.'
तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला,
'माझ्याकडे बघ, वैजू. तू काहीतरी लपवते आहेस. माझ्याकडे बघून बोलता येऊ नये असं
काय घडलंय?'
वैजूचा श्वासच अडकला. ही वेळ कधीतरी येणार हे तिला ठाऊक होतं. पण तिला तोंड देण्याचं धारिष्ट्य आपल्यात नाही हे ही तिला माहित होतं. तिनं श्रेयसकडं पाहिलं. दुखण्यामुळे, सतत हॉस्पिटलच्या वातवरणानं किती कोमेजून गेला होता त्याचा चेहरा. अशक्त, थकलेला वाटत होता तो. तीच शांत, स्निग्ध नजर! त्याच्या हातातल्या तिच्या हाताला घामाचा ओलावा आला. आता या क्षणी आपण इथून पळून जावं
असं तिला होऊन गेलं. तिची उलघाल जाणवून श्रेयसनं तिचा हात आणखी घट्ट धरला.
'मला सांग वैजू! काय झालंय तुला?
या अपघाताला, सत्यानाशाला मीच जबाबदार आहे असं तर तुला वाटत नाहीये ना?
की.. की.. या साऱ्या प्रकारात माझ्यात काही व्यंग..?'
'नाही, नाही रे श्रेयस. असे काहीच नाही. प्लीज मला चुकीचे समजू नकोस.'
' मग मला सांग सारे. मी काहीही सहन करेन, पण तुझे असे तुटक वागणे नाही सहन होत.'
त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. ते बघून अगतिकतेनं तिलाही रडू फुटलं.
'वैजू, तुझ्या प्रेमाची मला सवय झालीये गं. आधी या जगात मला माझं असं कुणीच
नव्हतं ते मी मान्य केलं, सोसलं. पण वीरु,तू,आई बाबा भेटलात. मला माझं असं घर
मिळालं. तुझी आणि माझी तर सात जन्मांची गाठ आहे ना? मग का अशी दूर राहतेस? या
अॅक्सीडेंटमुळे आपल्या आयुष्याचा एक तुकडाच निखळला आहे वीरुच्या जाण्यानं. माझा तर श्वास होता तो. आधीच त्यानं मला इतकं भरभरून दिलय आयुष्यात. आई बाबा मिळाले, तू मिळालीस! आणि आता जाताना आपले डोळेही मला देऊन गेला. त्याचं हे देणं कसं फेडू मी? तुला, आई बाबांना सुखात ठेवूनच ना? आठवतं तुला, आपण त्याला पार्टी दिली होती तो दिवस? किती आनंदात होता तो. माझ्या
वैजूला खुश ठेवले नाहीस तर घरात घेणार नाही म्हटला होता मला. आणि आता तर,
इतक्या दूर जाऊनही तो आपल्यातच आहे.. आपल्याकडे बघतो आहे.. माझ्या
डोळयातून..!!'
बोलता बोलताच श्रेयसला आपला आपणच सारा उलगडा झाला. आता वैजूही अनावर होऊन
त्याच्या छातीवर डोके ठेवून हमसाहमशी रडत होती. दुखरी नसच दाबली गेली होती नेमकी.
एक निर्वात शांतता पसरली. एका शब्दानंही न सांगता श्रेयसला वैजूचं दु:ख उमगलं होतं. नाईलाज, निरुपाय काय असतो हे आज त्याच्या आयुष्याने पुन्हा एकदा त्याला दाखवून दिलं.हताश होऊन श्रेयस हरल्यासारखा तिला थोपटत राहिला.
'वैजू.. i am sorry! मला खरंच नाही कळले गं.किती सोसलंस माझ्या बबड्या! एकटीने!'
'मला थोडा वेळ दे श्रेयस.' रडता रडता वैजू म्हणत होती.
आणि आज श्रेयसला डिस्चार्ज मिळणार होता. आई बाबा त्याला घेऊन घरी येणार होते. त्यांची वाट बघत वैजू गच्चीत उभी होती. त्यादिवशी श्रेयससमोर रडू फुटल्यानं तिच्याही नकळत तिचं ओझं उतरलं होतं. मन हलकं झालं होतं. श्रेयसवर आपलं मनापासून प्रेम आहे. जीवावर बेतलेल्या संकटातून आज तो सुखरुप बाहेर पडलाय. वीरदानं जाता जाता आपल्या पदरात आयुष्याचं दान दिलंय. ते नाकारण्यासाठी तोच कारणीभूत ठरतोय, हे जर त्याला कळलं असतं तर किती यातना झाल्या असत्या त्याला?आयुष्यभर आपल्याला,आपल्या सुखाला फुलासारखं जपणार्या वीरदाला त्याच्या जाण्यानंतरही आपण असह्य वेदनाच देतो आहोत. आई बापाविना वाढलेला श्रेयस. त्याच्या आयुष्यात आता कुठे चार दिवस सुखाचे
आले होते. हे सारं घडलं,यात त्याचा काय दोष?त्याला का ही शिक्षा?आणि ती शिक्षा देणारे आपण कोण? वीरदाला तर आपण दुखावलंच पण त्याचा जीव ज्याच्यात अडकला आहे,आपल्या सुखाची भाषा असलेल्या श्रेयसला पण? आपल्याला आवडणारे वीरदाचे डोळे त्याला मिळाले यापरतं दुसरं भाग्य कोणतं? त्याच्या डोळ्यात आपण कधीही दाला बघू शकतो हे नशीबच नाही का? पण ती नजर,त्यात उमटणारे भाव हे केवळ श्रेयसचे आहेत. एका शस्त्रक्रियेला आपण असं भावनेचं आवरण चढवून सत्यच नाकारतोय. आपल्या
निर्णयावर नेहमीच विश्वास होता दाचा. बुध्दीचा,शास्त्राचा उपासक असलेल्या त्याला हे कधीच आवडलं नसतं. दु:खातिरेकानं आपण वाहवत गेलो. पण आता यापुढे नाही. आता सगळं स्वच्छ दिसतंय. पाऊस पडून गेल्यावर सगऴं निर्मळ, नवं वाटतं तसं. आता येतोय तो फक्त श्रेयस. आपला श्रेयस. वैजू,श्रेयस आणि वीरेंद्र या त्रिवेणी संगमातला वीरेंद्र सरस्वतीसारखा लुप्त झालाय. पण तो असणार आहे, सदैव. त्या दोघांच्या अंतरंगात.
आवडली.
आवडली.
छान.
छान.
आवडली.
आवडली.
छान लिहीली आहेस.
छान लिहीली आहेस.
आशु, नेहमीप्रमाणे मस्तच.
आशु, नेहमीप्रमाणे मस्तच. आवडली.
सुंदर...
सुंदर...
आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली.
छान! आवडली!
छान! आवडली!
फारच छान
फारच छान
खुपच सुंदर . असा विरदा
खुपच सुंदर . असा विरदा सर्वांना मिळावा.
आशूडी, सुरेख लिहिली आहेस.
आशूडी, सुरेख लिहिली आहेस. सुरुवातीचा पॅरा अतिशय सुंदर आणि नंतरची कथेची संयमित मांडणीही सुंदरच
आधी वाचतावाचता नेत्रदानात प्रत्यारोपणासाठी फक्त cornea च वापरतात ही टेक्निकल गोष्ट त्रास देत होती. पण मग शेवटाकडे येता येता उलगडा झाला की हे सगळं आपल्या मनात आहे हे वैजूला समजतंच आहे. तिचं त्या दोघांमधलं गुंतलेपण आणि मग पडलेला भावनिक तिढा ह्यामुळे ही घालमेल होतेय. सुरुवातीला वीरदाच्या शास्त्रनिष्ठेचा ( विज्ञान शब्द जास्त योग्य राहील का ? ) उल्लेख का आला होता ते ही कळलं मग. लिहीत राहा गं ...
हॅट्स ऑफ!
हॅट्स ऑफ!
सुरेख लिहिलियेस !
सुरेख लिहिलियेस !
सुरेख लिहिलियेस !
सुरेख लिहिलियेस !
कथा छान आहे.
कथा छान आहे.
सुरेख!
सुरेख!
धन्यवाद सर्वांना. खरंतर हा
धन्यवाद सर्वांना.
खरंतर हा प्रसंग जेव्हा मनात आला तेव्हा खूप फिल्मी वाटला होता. लिहावी की लिहू नये या विचारात असतानाच डोक्यात आलं की, निगेटिव्ह शेड्स थोड्या बाजूला ठेवल्या तर 'फिल्मी' हा सुद्धा एक विशिष्ट प्रकार असू शकतो. मग तसं आपल्याला लिहीता येईल का? ते वाचून कुणाचे थोडा वेळ तरी रंजन होईल का? आणि मग लिहायला घेतली. विषय तसा रंजितच होता त्यामुळे मांडणीही आकर्षक पाहिजे. फिल्मीच लिहायचं तर त्यालाही पूर्ण न्याय देता यायला हवा.कथा वेगवान असायला हवी होती शिवाय बांधणीही पक्की असती अजून तरी हरकत नव्हती. पण या कसनुशा प्रयत्नाचे तुम्ही कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
शेवट आवडला..... मध्यंतरी
शेवट आवडला.....
मध्यंतरी संवाद कोण कुणाला म्हणतोय हे पटकन कळत नाहीय.....
एकदम फिल्मी नाहीये. "हयवदन"
एकदम फिल्मी नाहीये. "हयवदन" नाटकाची आठवण झाली. तुझा प्लॉट पुर्ण वेगळा आहे पण साम्यस्थळे आहेत.
<<<वीरदाला आडवं बाहेर आणलं
<<<वीरदाला आडवं बाहेर आणलं तेव्हा त्याची उंची पहिल्यांदा जाणवली. आता तर तो फारच उंचावर गेला होता. नॉट रीचेबल.>>> काळजात चर्रर्र... झालं अगदी.
खूप छान कथा. आवडली
मस्तच
मस्तच
छान आहे. आवडली!
छान आहे. आवडली!
कथा आवडली पण फिल्मी, मसालेदार
कथा आवडली पण फिल्मी, मसालेदार वगैरे काही वाटली नाही.. प्रयत्न कमीच पडले म्हणायचे..
वाचल्यावर पहिला शब्द मनात आला
वाचल्यावर पहिला शब्द मनात आला तो 'फिल्मी' हाच होता आशू.
कुठल्यातरी निर्मात्याला नक्की दे.
निलिमा, हयवदन मी पाहिले
निलिमा, हयवदन मी पाहिले नाहीय, आता पाहीन.
पराग, रैना,
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना.
छान जमलीय. पु.ले.शु.
छान जमलीय. पु.ले.शु.
छान आहे...
छान आहे...
आवडली कथा! अगोला अनुमोदन.
आवडली कथा! अगोला अनुमोदन.
Pages