तांबडा घोडा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

एके दिवशी त्याच्या गावात आली विजय सर्कस.
करकचून बांधलेल्या बोचक्यांवर टांग टाकून बसलेल्या मालकांचा आणि भरतकाम केलेल्या रंगीबेरंगी पण कळकट-मळकट कपड्यांतील मालकीणींचा भार सांभाळत कसेबसे पाऊल टाकू शकतील अशी तीस-पस्तीस तांबडी घोडी.
आपल्या मालकांची वीस-पंचवीस नागडी-उघडी बारकी बारकी पोरं वाहणारी दहा-बारा गाढवं.
त्यांच्या आसपास चालणार्‍या काही पाऊलजोड्या.
गावात पारालगत मधोमध मोठ्ठं पटांगण आणि त्या पटांगणाला लागून उपटसूंभासारखं एक मोठ्ठं पडीक वावर.
हा भरगच्च तांडा गावात शिरला आणि वावरात जमा झाला.
वावरात घोड्या-गाढवांच्या पाठी पटापट हलक्या झाल्या आणि बघता बघता बारके-बारके तंबू वावरात उभे राहिले. घोडी-गाढवं आसपास पांगली.
सगळ्यात पुढच्या तंबूच्या पुढ्यात भूईत रोवलेल्या एका काठीवर एक गुंडाळलेला फळा उलगडला गेला आणि लाल, पांढर्‍या, हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगातली पाटी झळकली -
'विजय सर्कस'

पाटीवर बारकी बारकी चित्रेही काढलेली होती. डोक्यावर चुंबळीचा जाळ करून त्यावर उकळत्या पाण्याचा टोप घेऊन बसलेली त्याच्याच वयाची मुलगी होती, जमिनीवर झोपलेल्या बाईच्या छातीवर मोठा दगड ठेवून तो फोडण्यासाठी पहारीचे घाव घालीत उभा असलेला माणूस होता, दातांवर अख्खी नांगरी तोलणारा दाढीधारी पुरुष होता, बाईच्या डोक्यावर कुर्‍हाडीने नारळ फोडणारा माणूस होता, दोरीत बांधलेल्या मोठ्या दगडाची दोरी दातात धरून तो दगड दातानेच उचलून मागे भिरकावणारा माणूस होता, आगीतून चालणारी बाई होती, ढगळ इजार घालून उंचच्या उंच लाकडी पायांवर चालणारा विदुषक होता...

घटकेपूर्वी पटांगणाच्या दुसर्‍या कडेला असलेली त्याची शाळा सुटली होती. आणि त्या आनंदात वर्गाबाहेर पडून आरोळी ठोकतानाच गावात शिरणार्‍या या तांड्यानं वेशीत उडवलेल्या धुरळ्यानं त्याचं लक्ष रोखून धरलं होतं.
तेव्हापासून ते आतापर्यंत त्याचे दोन डोळे या तांड्यावर खिळले होते.
त्याच्या डोळ्यांत नोंद होणारी त्या तांड्याची प्रत्येक हालचाल त्याच्या छातीत कमालीचा आनंद आणि त्याच्या दुप्पट उत्सुकता भरीत होती.
सर्कशीची पाटी बघितल्यावर त्यांचं हृदय आनंदानं फुटायचं बाकी राहिलं.

तांडा वावरात जवळजवळ स्थिरावला होता.
सहज म्हणून त्यानं वळून पुन्हा वेशीकडं एक नजर टाकली आणि त्याची नजर पुन्हा चमकली.
संध्याकाळच्या कोवळ्या सोनेरी उन्हात चमकणारा झुबकेदार आयाळीचा आणि त्यापेक्षा भरगच्च शेपटीचा आणखी एक तांबडा घोडा सावकाश गावात शिरत होता.
सावकाश?
की तो लंगडत होता?

तो लंगडत होता. म्हातारा दिसत होता.

आणि तरीही त्याच्यावर ओझं लादलं होतं? वर माणूस बसला होता?
खुरडत खुरडत घोडा डोळ्यांखालची वाट कमी करीत होता.
नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्या घोड्यावर बसलेली व्यक्ती म्हणजे ओघळलेल्या छातीची, गळ्यावर आणि चेहर्‍यावर जड, झिजलेल्या जुन्या अलंकारांबरोबरच दाट सुरकुत्या वागवणारी म्हातारी आहे, हे त्याच्या लक्षात आले.

वावरात येऊन तांबडा म्हातारा लंगडा घोडा क्षणभर या तांड्यासमोर थांबला.
त्या तंबूंमधून पटकन कोणी पुढे येऊन त्या घोड्याचे आणि त्याच्या मालकीणीचे स्वागत करून त्यांना उतरायला मदत करील अशी त्याची अपेक्षा होती.
पण तांड्याने या घोडेस्वारणीची दखल घेतलीच नाही.
काही मिनिटांपूर्वी यांच्या आगमनावर खूष झालेल्या त्याला तांड्याचा राग आला.

केविलवाण्या नजरेने घोडा तांड्याकडे बघत राहिला.
आणि मग काहीही न बोलता मालकीणीने केलेल्या टाचेच्या क्षीण इशार्‍याने खुरट्या चालीने तांड्याला वळसा घालून तो मागच्या बाजूला जाऊन उभा राहिला. मालकीण त्याच्या पाठीवरून खाली घसरून जमिनीवर उतरली. बोचके खाली ओढून ती त्यावर तिथेच बसली. तिला कोणी तंबूत बोलावले नाही. तिने स्वतःचा तंबू टाकला नाही.

अंधार पडू लागल्यावर त्याने आपला मोर्चा नाइलाजाने घराकडे रेटला. तोंड घराकडे वळल्यावर हे सगळं आजीला सांगायची अधीरता त्याला घराकडे ओढू लागली.

सकाळ झाली.
रात्री मोठा पाऊस झाला.
वावरात चिखल झाला असेल का?
पावसात तांडा, त्यांचा कपडालत्ता भिजला असेल?
जेवताना त्यांच्या भातात पावसाचे पाणी गळाले असेल?
तंबूच्या कापडातून पाऊस आत जातो का?

आणि
तो तांबडा म्हातारा लंगडा घोडा? त्याची म्हातारी, आगतिक नजरेची मालकीण?
ती तर नक्कीच भिजली असणार. तिने तंबूच टाकला नव्हता. ती कुठे झोपली असेल? चिखलात? घोड्यावर?
ती त्यांची कोणीच नसेल? तांड्यात तिचा मुलगा, मुलगी, सून कोणीच नाही? ती कोणाची आजी नसेल? शेजारी? (यांना शेजारी असतील? प्रत्येक गावात त्याच तंबूचा शेजार की वेगवेगळा?)
त्यांच्यात काय बिनसले होते? की आता त्यांच्या सर्कशीत हिचे काही कामच उरले नव्हते?
म्हातारी यांच्या मागे मागे कधीपर्यंत फिरणार?
त्या घोड्याला इतर घोड्यांनी आपल्यात मिसळून घेतले असेल?

सर्कस होईल का?
की पावसाने तांडा सकाळी उठून गेला असेल?
तो तांबडा म्हातारा लंगडा घोडा आणि म्हातारी तरी आपण पोहचेपर्यंत असतील?

भर्रकन आवरून दफ्तर काखेत मारून तो निघाला.

तांडा अजून तिथेच होता.
वावरात फार चिखल झाला नव्हता याचा अर्थ रात्रीचा पाऊस त्याला वाटला तितका मोठा झाला नव्हता.
'तो'घोडा आणि त्याची मालकीणही मागच्या बाजूला पहुडले होते.
सकाळच्या उन्हात चमकणारा तो एवढा मोठा तांडा त्या दोघांवर उलटण्यासाठी दबा धरून बसल्याचा याला भास झाला.

त्या दिवशी संध्याकाळी गावात सात सजवलेल्या घोड्यांवरून सर्कशीच्या जाहिरातीची मिरवणूक निघाली. गावातली सारी पोरे तडतडणार्‍या ताश्यांबरोबर त्यामागे उधळत राहिली.
पण याच्या मनात त्या मिरवणूकीतही बोचक्यावर बसलेली ती म्हातारी ठाण मांडून बसलेली.

आज रात्री सर्कस होणार!
जेवणे आटोपून गाव हळुहळू पटांगणाभोवती जमा होऊ लागला. पटांगणाच्या कडेला चार मोठे विजेचे दिवे लावण्यात आले होते. जसजसा गाव जमू लागला तसतशी त्या पटांगणाच्या हवेतली उत्सुकता टिपरीच्या लयीबरोबर शिगेला पोचली. मग एकेक कसरत सुरू झाली.
सर्कशीतला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री विजेच्या दिव्याच्या प्रकाशात सुंदर दिसत होती.
प्रत्येक क्षणाला श्वास रोखायला लावणार्‍या त्या एकेका कसरतींनी भरपूर टाळ्या आणि शाबासकी मिळवली. त्या पाटीवरच्या चित्रांतून त्याने जो कल्पनाविलास केला होता त्यापेक्षाही कितीतरी भन्नाट होती सर्कस. मनमुराद आनंद देणारी.

सर्कस संपली.
परतताना पुन्हा तो तांबडा लंगडा म्हातारा घोडा आणि त्याची मालकीण त्याच्या मनात उभे राहिले. ती दोघे जागेच असतील का अजून? की झोपली असतील? अंधारातून काहीच दिसत नव्हते.

दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा उत्सुकतेने तो पारावर आला.
तांड्याची आवराआवर चालली होती.

घोड्यांवर ओझी, पोरं लादली जात होती. एकेक घोडा आणि गाढव ओझ्याच्या थरासरशी दबले जात होते.
इतक्यात ती म्हातारी आणि एका माणसांत चाललेला अगम्य भाषेतला संवाद त्याच्या कानावर पडला.
म्हातारीचा आवाज कमीच ऐकू येत होता. आणि भाषा कळत नसली तरी त्यांच्यातले बोलणे हे ख्यालीखुशालीचे नव्हते हे कळत होते. तो माणूस म्हातारीवर जोरजोरात खेकसत होता. ओरडत होता. म्हातारी नेटाने उत्तरं देत होती. माणसाच्या बाजूने अजून दोन बायका आणि एक पुरुष आला. सगळ्यांची तोंडं म्हातारीवर सुटली. बघता बघता सगळा तांडा एका बाजूला आणि त्या तांबड्या लंगड्या म्हातार्‍या घोड्याची मालकीण दुसर्‍या बाजूला असे दृश्य उभे राहिले. सग़ळे त्या एकटीवर तुटून पडले.

एकाने राग अनावर होऊन त्वेषाने पायातला जोडा काढला आणि म्हातारीच्या दिशेने भिरकावला. म्हातारीच्या कानामागे तो दणकन आदळला आणि म्हातारी कोलमडली.

शाळेची भरण्याची घंटा झाली.
आता साडेबाराच्या लहान सुट्टीशिवाय बाहेर पडता येणार नव्हते. बाहेरचा गोंगाट मधूनच वाढत होता आणि मधूनच कमी होत होता. बर्‍याच वेळाने तो हळुहळू कमी होत गेला.

लहान सुट्टीची घंटा झाली तेव्हा तांडा जवळजवळ मार्गस्थ झाला होता. शेवटचा घोडा वावरातून बाहेर पडून वेशीकडे तांड्याच्या मागोमाग लागला होता.

म्हातारी आणि तांबड्या घोड्याच्या जागी कोणीच नव्हते.

तांड्यात लंगडा घोडा दिसत नव्हता.

तांडा नजरेबाहेर जाईपर्यंत तो त्या दिशेने बघतच राहिला.
तांडा दिसेनासा झाल्यावर प्रश्नांनी भरलेल्या डोक्याने तो वळला आणि पारावर जाऊ लागला.
पाराच्या खालच्या बाजूच्या पाणंदीत त्याची नजर गेली. पाणंदीच्या दुतर्फा असलेल्या झाडांतल्या एका झाडाच्या जाळी-जाळीच्या सावलीत तांबडा म्हातारा लंगडा घोडा आपली ओकीबोकी पाठ घेऊन एकटाच उभा होता. त्या तांबड्या म्हातार्‍या लंगड्या घोड्याच्या म्हातार्‍या मालकीणीचे काय झाले हे त्याला कधीच कळले नाही.

विषय: 
प्रकार: 

लहान मुलाच्याच भावविश्वात जाऊन लिहीली असल्याने कथा वाचतानाहि "त्या लहान शाळकरी" मुलाच्या नजरेनेच वाचायची आहे. तशी वाचत गेले अस्ता, म्हातारी व तिचा लन्गडा घोडा, मनात खोलवर रुतून बसतात.
छान लिहीले आहे.
(फक्त मालक वा मालकीण हे शब्द थोडेसे का होईना, अस्थानी वाटत राहिले, पण दुसरे नेमके शब्द मलाही सुचत नाहीयेत)

वाह! अप्रतिम लिहीले आहेस. काही काही शब्द-समूह सुरेखच! जसे की- 'खुरडत खुरडत घोडा डोळ्यांखालची वाट कमी करीत होता.'
वाट कमी करत होता- एकदम आवडून गेले.

ह्या गोष्टीला वर केलेले सर्व वर्णन दाखवेल असे रेखाटन हवेच होते, असे तीव्रतेने वाटले.

गजानन, 'त्या म्हातार्‍या मालकीणीचे काय झाले' हा कथेतल्या लहान मुलाच्या मनातला अनुत्तरीत प्रश्न वाचकाच्याही मनात रेंगाळत ठेवण्यात कमालीचा यशस्वी झालायस.

सुरेख कथा ! Happy

सहज आणि सुंदर भाषेतील कथा. खरंतर सगळंच डोळ्यासमोर जसच्या तस्स उभं राहिलं. छान गजानना, असा नेमाने का नाही लिहित?