मनी.......एक अविस्मरणीय आठवण!-----२.

Submitted by टोकूरिका on 12 December, 2011 - 04:42

मनी: बालपणीची सोबतीणः मी आणि मनी अम्ही दोघी आता एकत्र मोठे होऊ लागलो होतो. मी एक शाळा सोडली तर सगळीकडे तिला सोबत नेत असे. अनेकदा आईची बोलणी खाऊन मी तिला सोबत न्यायचा हट्ट करायचे.काहीवेळेस मारही खायचे. त्या मुक्या जीवाशी माझं नातच तसं होतं! लहानपणापासूनच माझ्या भांडणातल्या कारणाने ओढवलेल्या इवल्या दु:खात मी मनीला सहभागी करून घ्यायचे, आईने रागवल्यावर तिला सगळं सांगायचे , माझं चुकलं असेल तर कबुलीही द्यायचे. तीही मिचमिचे डोळे करून माझ्याकडे पाहायची. हलकेच ''म्याव'' करायची. जणू ''सगळं कळतय गं नेडू मला!'' असंच म्हणत असावी. Happy मनी दिसायला रूबाबदार होतीच पण तिचं मनही मोठं होतं. तिने कधीच कुणाला त्रास नाही दिला. मनी जसजशी मोठी होत गेली. तिचं रूप आणखी खुलत गेलं. शेपटीवर आता भरपूर केस आले होते.;)
मनीला मला फारसं काहीच शिकवावं लागलं नाही. रात्री बाहेर फिरून यायला उशीर झाला की उडी मारून ती दरवाज्याची कडी वाजवत असे. सकाळी दूधवाला आला की ती स्वतः स्वयंपाकघरात जाऊन आईच्या पायात घुटमळायची. आई पातेलं घेऊन , त्यात दूध घेऊन येऊन त्यातला तिचा वाटा तिला मिळेपर्यंत ती आईचा पाठपुरावा करत असे.तिने कधीच कुणाच्या ताटात तोंड घातलं नाही. भले मग काही हवं असेल तर ''म्याव म्याव'' असं सतत ओरडून डोकं उठवूदेत! माझं खाणंपिणं चालू असताना ती जवळ बसायची. मी एका हाताने तिला कुरवाळत दुसर्‍याने जेवायचे. काही वेळेस लाडात आली की माझ्या मांडीवर पण येऊन बसायची ती! माझ्या मांडीवर बसणे जणू सिंहासनावर बसणे असावे असे काहीसे वाटत असेल बहुतेक तिला Proud कारण तिला तिथून उठवणे फार कठीण जायचे. मी अभ्यास करतानाही तिचा हट्टं असायचा की तिला मांडीत बसू दिले जावे.:) मग मी तिला तशीच बसू द्यायचे. अन ती झोपी गेली की मग अलगद ऊचलून तिला खाली गादीवर ठेवायचे. दीदी, मम्मी, पप्पा सगळेच आता तिला माया लावू लागले होते. तिच्या हरवलेल्या आईची जागा आता आम्ही घेतली होती. इतकी की आता तिलाही इथून बाहेर पडावसं वाटत नसेल. तिचं मी बनवून दिलेलं खोक्याचं घर एव्हाना तिला कमी पडू लागलं होतं त्यामुळे ती फक्त झोपण्यापुरतीच त्या खोक्यात जायची, बाकीचा वेळ कॉलनीतल्या वेगवेगळ्या किचनमध्ये डोकावणे अन बागेत हिंडण्यात स्पेंड करायची ती. मनी इतकी गोड होती की शेजारीही ती घरी आल्यावर तिला काही ना काही खायला द्यायचे. चाळीतल्या लहानग्यांची तर '' एंटरटेनमेंट चॅनल'' झाली होती मनी! शाळेतपण मी सगळ्यांना तिचे किस्से सांगून बोअर करत असे :P. एवढच नव्हे मी आमच्या बाईंकडेसुद्धा ''तिला बघायला चला ना'' म्हणून तगादा लावलेला. एके दिवशी मी घरात शिरले तेच बाईंना घेऊन. तर आई अवाक! तिला बिचारीला वाटलं की मी काहीतरी पराक्रम केले की काय शाळेत! Proud पण बाईंचा खुलासा ऐकल्यावर मात्र तिचा जीव भांड्यात पडला. मला अजूनही आठवतं बाईनी त्यावेळी मला दहा रूपये बक्षीस म्हणून देऊ केले होते, कशाबद्दल काय विचारताय???? ते शाळेत नै का शिकवतात ''प्राणीमात्रांवर प्रेम करा'' ते मी प्रत्यक्ष आयुष्यात केल्यामुळे आमच्या बाई सेंटी झाल्या. Proud त्यादिवशी मला अन मनीला आईच्या हातचे कळीचे लाडू खायला मिळाले. मी बाईंनी दिलेल्या बक्षीसाचा उपयोग मनीला खाऊ आणण्यासाठी केला, हे सांगणे न लगे! अशा छोट्यामोठ्या प्रसंगातून मनी अन माझं नातं रूजत होतं, एव्हाना मनी आमच्या घरची सदस्य बनली होती.!!

गुलमोहर: