"मनोहर" भाग - १

Submitted by शाबुत on 10 December, 2011 - 00:37

रोजचीच ड्युटी,
एकच कंपनीत, एकाच मशीनवर अन् एकाच पार्टवर, एकाच प्रकारचं ऑपरेशन करायचं, त्यासाठी मशीनमधे ठरलेला एकच प्रोग्राम, अन् तो रन होण्यासाठी ठरलेली दाबायची, हिरवी, पिवळी, लाल.
शेवटी वेळही ठरलेला,
पार्टवरच्या ऑपरेशनचा, तसचं कंपनीतल्या ड्युटीचाही.
कंपनीनं आधीच ठरवुन दिलेला टार्गेटचा आकडाच तेवढा महत्वाचा.
तेव्हा -
एकाच प्रकारचं उत्पादन काढायचं आणि जास्तीत जास्त उत्पादन काढायचं एवढाच काय तो उद्देश!
मशीनचा अन् माणसाचाही.

आजचा दिवसही रोजच्या सारखाच, मशीनच्या गती सोबत बरोबरी साधत, स्वत:च्या शरीराची ठरलेली हालचाल करत होतो, आपल्या मशीनकडुन काम काढत होतो. मशीनच्या गतीनं असं काम करणं, नोकरीच्या सुरुवातीच्या किती कठीण गेलं, काही केल्या टार्गेट पुर्ण होईना, नंतर तेच-तेच काम करुन सवय झाली, आता तर सवयीच्या पुढचं, जे अशील ते, मला नक्की शब्द आठवत नाही
अन् तो एखाद्या डिक्शनरीतही सापडणार नाही!
काय करणार?
गेली दहा वर्ष, एकच मशीन चालवतोय, त्यात काहीच बदल नाही. बदलतो काय तर टार्गेटचा आकडा
तो वाढवुन दिल्याशिवाय, कंपनी पगार वाढवुन देत नाही.

हातानं पार्ट फिक्चरमधे बसवला, त्याआधी पायाखालचं बटन दाबलं, नंतर सेफ्टी-गार्ड ऑटोमॅटीक बंद झालं, बोटानं पॅनल बोर्डवरची बटणं दाबली, ती आधीच ढिली झाली होती. मी कालच तर मेंटनंन्सला सांगितलं होतं, हे पॅनल दुरुस्त करायला, का केलं नाही अजुन? अन् ह्या धातुच्या बर्सही तशाच पडलेल्या, किती घाण साठलीय मशिनमधे अन् बाहेरही?
सकाळी मशीन चालु करण्यापुर्वीच, त्या साफ होयाला हव्या होत्या, ह्या अनकुचीदार बर्स हाताला टोचतात, बुटात रुतुन बसतात, नंतर खालुन पायाला टोचत राहतात.
"सफाई करणारा आज कुठं मेला, अजुन नाही आला?" माझ्या डोक्यात शब्द उमटले.

आजचा सफाईवाला नवीन असावा, म्हणून हे काम राहुन गेलं. त्यांचं काय, ते नेहमीच बदलत असतात अन् एवढ्याशा कारणानं मशीन नाहीना बंद ठेऊन चालत!
कारण शिफ्टच्या शेवटी टार्गेटचा प्रश्न?
एवढ्या मोठ्या मशीन शॉपमधे, वेगवेगळ्या मशीन, वेगवेगळे आवाज काढणार
मग, आपल्या मशीनचा आवाज कसा बंद ठेऊन चालणार?
मशीनमधील बर्स मीच हाताने इकडे-तिकडे केल्या तेव्हाच मनात मात्र, सफाईवाल्याला खडसवण्याचा बेत आखु लागलो. असं काही केलं की, दुसर्‍या दिवशापासुन मशीनवर येण्याआधीच, ते साफ झालेलं असतं. हेही अनुभवातुन मिळालेलं ज्ञान, यात आणखी दुसरं काही नाही.

नंतर कामाच्या धुंदीत तो कधी आला, अन् मशीन बाजुची सफाई करायला लागला, मला कळालचं नाही.
तो नवीनच होता! पण तो जेव्हा मला दिसला, तेव्हा त्याला खडसावण्याचा बेत, ........नुकत्याच ग्राडींग केलेल्या गरम पार्टवर कुलंट टाकल्यावर, तो जसा झटक्यात थंड होतो, एकदम तसाच थंड झाला.

तो म्हणायला सफाई करणारा पण, अंगात स्वच्छ कपडे, त्याची व्यवस्थित शर्टीग, पायात चांगले बुट, डोळ्यावर चष्मा, कदाचित तो नंबरचा असावा. त्याची झाडु मारण्याची विलक्षण हालचाल, हि नेहमीच्या पाहण्यातली नव्हती. आपल्या कामाशी कमालीची एकरुपता त्यातुन जाणवत होती. मला तो चांगल्या घरातला वाटत होता, चेहर्‍यावरुन बराच शिकलेला दिसत होता.

चांगल्या घरातला, सुशिक्षित तरुन झाडु मारायला आला?

त्यानं मशीनच्या आजुबाजुला झाडु मारुन घेतला, सगळ्या बर्स एका ठिकाणी गोळा केल्या. पत्र्याच्या टपणात उचलुन तो त्याच्याजवळच्या बादलीत टाकु लागला. एकदाचा कचरा उचलुन संपला, जाता-जाता त्यानं डोळ्यावरचा चष्मा बरोबर करत माझ्याकडे पाहीलं, आपल्या श्रीमंत चेहर्‍यावर त्यानं स्मित पसरवलं.
मीही त्याला हसुन प्रतिसाद दिला.

तो दिसायला सावळाच होता, तरी काही माणसांना निटनेटकं राहायची सवयचं असते. मीच त्याला हटकलं, कारण तो चेहर्‍यावरुन पंचकुशीतला वाटत नव्हता.
त्याचं नाव विचारलं तर "मनोहर" अन् गाव विचारलं तर "गडचिरोली". एवढचं बोलुन तो चालता झाला. नंतर मशीननं सायकल पुर्ण केल्याचा आवाज केला. मी आतला पार्ट बाहेर काढला, बाहेरचा आत टाकला, नेहमीची बटनं दाबली, आतमधे त्यावर ऑपरेशन चालु झाली.
* * * * *

अजुन उजाळलं नव्हतं, धुक्यातुन रोडवरुन जाणारी प्रत्येक बस, ही आपल्याच कंपनीची बस आहे, असं समजुन आम्ही वेगानं जाणार्‍या वाहणाचं शॉर्टिंग करत होतो. काहीही झालं तरी आज बस चुकायला नको, कारण आज महीन्याचा शेवटचा दिवस, या महीन्यात आजवर एकही खाडा नाही, पुर्ण पगार निघायला पाहीजे.

"आज थंडी जास्तच जाणवतेय!" माझ्या स्टॉपवरच्या कंपनीतल्या माणसाला मी बोललो.
"हं, हिवाळा आहे, तर थंडी ही बोचणारच." त्यानंही नेहमीच्याच पठडीतलं उत्तर दिलं, म्हणुन मी पुढचा संवाद आटोपता घेतला.

खरचं पोटाचा खड्डा भरायला, एवढा पगार लागतो?
माझ्या डोक्यात उत्तर उगवयाच्या आधीच बस तिथं उगवली, आम्ही आत चढलो, मी खिडकीजवळ जावुन बसलो. माझी रात्री चांगली होती म्हणुन आता झोपण्याचा प्रश्न नव्हता, पण बाकीचे वेळ वाया न घालता लगेच झोपी गेले. कंपनीपर्यंत रोजचा पाऊन तासाचा प्रवास आहे, हा वेळ का वाया घालवायचा, कंपनी थोडीच या वेळेचे पैसे देते?.

दुर क्षितिजावर सोनेरी कडा उजळली. सुर्यकिरण आपला पसारा पसरवित होते, अंधाराला पांगवित होते. सुर्योदयाचं हे दुश्य मी पाहत होतो. नाहीतरी या रोडंनं दररोजचं येणं-जाणं म्हणुन रोडवरचे सगळे वळणं, चौक तसचं खड्डेही पाठ झाले होते. आणखी नविन काय दिसणार?
तेही खरचं आहे म्हणा, शेतं, झाडं, नद्या, टेकड्या, रस्ते आपल्या जागा थोडीच बदलतात, तरीही मी खिडकीतुन पाहत होतो. एवढ्या थंडीतही कोणीतरी ओळखीचा रोडच्याकडेनं धावतोय असं मला जाणवलं, धुक्यातही त्याची आकुती मला स्पष्ट दिसल्यासारखी झाली, मनाला कुठेतरी वाटलं?
"हा मनोहर तर नाही?"
नाही-
मी बसल्याजागीच नकाराअर्थी मान हलवली.
"तो कशाला येईल एवढ्या लांबुन धावत, तेही एवढ्या थंडीत!"
मी परत खिडकीतुन बाहेरचा निसर्ग न्याहळत बसलो.

बसमधुन उतरुन मेन-गेटच्या आत गेलो, आधी पंचिग मारलं, लॉकर रुममधे ड्रेस चेंज केला, नंतर कॅटींगमधे सगळ्या सोबत नास्ता केला, त्यानंतर सगळे वर्कशॉपकडे निघाले. मी मशीनजवळ पोहचलो तेव्हा मनोहर तिथं झाडु मारत होता.

"तु झाडु बाकी छान मारतो."
मीच स्वतःहुन काहीतरी बोलायचं म्हणुन बोललो, त्यावत त्यानं काहीच प्रतिसाद दिला नाही, मग मी मुख्य विषयाला हात घातला.
"कारे, सकाळी रोडच्या कडेनं तुच पळ्त येत होतास?"
आता मात्र त्यानं होकारार्थी मान हलवली.
"अरे, मग सिटीबसनं का आला नाही, बरीच माणसं येतात तिनच येतात, नाहीतर हात दाखवुन येयाचं एखाद्याच्या टु-व्हीलरवर लटकवुन."
यावर मनोहर काहीच बोलला नाही, फक्त माझ्याकडे पाहुन दुसरं मशीन साफ करायला निघुन गेला. नंतर मलाही वाटलं की मी सकाळी-सकाळी उगाच सल्ले देत बसलो तरी मनोहर मला प्रसन्न व्यक्तीमत्वाचा माणूस वाटला.
* * * * *

दुपारी कॅटींगमधे जेवतांना आमच्या टेबलावर मनोहरचाच विषय होता. कोणीतरी माहीती आणली होती, तो बी.ई. झालाय, पण पोरीच्या लफड्यात झाडु मारायला आलाय, त्यासाठी त्याला आपला गडचिरोलीचा बंगला सोडुन, आता बाजुच्या एका खेड्यात पत्र्याच्या एका खोलीत तिच्यासोबत भाड्यानं राहतोय. यावर आम्ही जेवन करता-करता हसायला लागलो, त्याच्या विषयावर वेगवेगळे विचार मांडायला लागलो.
कंपनीत काय! कोणताही विषय टाईमपाससाठी चालतो.

मी जेवणानंतर मशीनवर आलो, काम चालु केलं तरी मनोहरचा विषय डोक्यातुन जात नव्हता.
काय आज-कालची पोरं निघालीत, कोणाचाच विचार करत नाहीत, अगदी, जन्म देणार्‍या आई-वडीलांचा देखील.
कोणोचेही आई-वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतांना, त्याच्या भविष्याची किती गोड स्वप्न पाहतात, साधं चालता-बोलता येत नाही तेव्हा पासुन तर, काहीतरी काम करुन पैसे मिळवता येण्यापर्यंतचा काळ किती मोठा असतो, पण आपल्या मुलांना वाढवतांना तोही नाही आठवत.

आपल्या मुलांना चांगलं खाणं, चांगले कपडे हवे, चांगल्या शाळेत मोठी फी भरुन शिक्षण हवं, आयुष्यभर मुलाच्या उज्वल भविष्यासाठी, कोणाचेही आई-वडील किती तरतुदी करुन ठेवतात, अगदी आपल्या पोटाला चिमटा देऊन.
मुलं मात्र, दोन पैसे कमविण्याची अक्कल आली की आपल्या मनाने वागु लागतात. बरं तसंही वागा, पण आई-वडीलांनी उपसलेल्या कष्टाची जाणिव तर ठेवायला हवी, त्यांच्या अपेक्षांचा आदर करायला हवा, त्यांना त्याचं काहीच कसं वाटत नाही?
आता हा मन्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवुन आला असेल?
"लोफर साला, ..... भेटु दे त्यांना परत."

आता त्या मुलीचे आई-वडील, बापरे, त्यांना तर रस्त्याने मान वर करुन चालणंही, आता मुश्कील झालं असेल,
सहज विचारणार्‍याला ते काय उत्तर देत असतिल? आता तर त्यांच्या शेजार्‍यांना संधिच मिळाली असेल, त्यांच्या घराची निंदा करायची.
आता किती तणावाखाली वावरत असतिल दोघांच्याही घरातले माणसं, सगळीकडे ह्यानांच शोधत असतील नाही?

अन् हे प्रेमविर,
तुरुणपणात, काहीतरी वेगळं करुन दाखवण्याच्या करामतीत येऊन बसले, हजार किलोमिटर दुरवर.
कोणी विचारलं तर मनोहर सरळ सांगेल,
"अहो, प्रेम करतो आम्ही."
"आम्हा दोघांना एकत्र राहायचं होतं, लग्न करायचं होतं, त्यालाच घरच्यांचा विरोध होता."
मग माझ्या डोक्यात विचार उमटला, आता जावु द्या, तिन-चार वर्ष, नंतर एकत्र राहिल्यावर मग कळेलच.
संसार काय असतो ते, अन् प्रेम काय असतं तेही.
माझं काल चालुच होतं,
मशीनसमोर उभा राहुन मी माझा भेजा उकळत होतो.

आता या मनोहरला काय सांगावं,
- प्रेमाची कथा.
मीही तरुणपणात प्रेम केलं, माझ्या शेजारी राहणार्‍या मुलीवर, आमच्या सगळ्या गंमती झाल्या, पण अगदी गुपचुप, कोणालाही त्याची खबर लागु दिली नाही की, कोणालाही त्याचा त्रास नाही. लग्नानंतर ती तिच्या घरी, मी माझ्या.
कोणं म्हणतं आमचं प्रेम नव्हतं म्हणुन? पण, प्रेमानंतर पुढचे कार्यक्रम आवाक्यातले वाटले नाहीत
मग दिलं सोडुन, आजही ती माहेरी आली की बघते, त्याच प्रेमळ नजरेनं.
आता आणखी काय पाहीजे?

माझं प्रेम यशस्वी झालं नाही, पण आता मला त्याचं काहीच वाटत नाही, कारण ते वय आता राहलं नाही, अन् ती मनातली भावना कधीच विरुन गेली. माणसाचं वय जसं वाढत जातं, त्यासोबत समाजातले चांगले-वाईट अनुभव वाढत जातात, खरं तर चांगल्यापेक्षा वाईटच जास्त. आता तर सारं जगचं व्यवहारी वाटतं, कधीतरी फिरुन त्या अनुभवाकडे पाहीलं तर वाटतं, तोही एक व्यवहारच झाला.

मग आता या मनोहरला,
एवढा पराक्रम करायची काय गरज होती?
हा मीच मला प्रश्न विचारत होतो, तो परत भेटला की चांगला धारेवर धरण्याचा बेत मनात आखत होतो.
"भेटु दे त्याला उद्या सकाळी?"
"कि आताच जावु, तो सफाई करत असेल तिथं?"

* * * * *
- शाम

गुलमोहर: