खुप दिवस झाले मी विचार करत होते ''ते'' लिखाण वाचायचा. पण वेळही मिळत नव्हता अन खरं तर वेळ असेल तरी मी ''ते'' वाचायचा कंटाळा करायचे. कारण नावावरून तरी मला ते एखाद्या गावंढळ शेतकर्याचं चित्रण किंवा एखाद्या दत्तक घेतलेल्या पोरट्याचं वर्णन असेल असं वाटायचं. अन काहीतरी चमचमीत मसालेदार वाचायच्या हव्यासापायी मी तिकडे दुर्लक्ष करायचे. पण आज मी ठरवूनच टाकलं की काही झालं तरी हे वाचायचंच. मनात विचार आला की एकदा बघूयातरी काय लिहिलंय ते, अन नाहीच आवडलं तर कुणी का आपल्यावर बळजबरी थोडीच करणारे??? त्यामुळे एक दिवस मी ते ''वानू'' नावाचं साहित्य वाचलं. अन काय सांगू हो? वाचायचं सोडून देणे तर दूरच पण मी ते सर्वच्या सर्व लिखाण एका दमात वाचुन काढलं. त्यांच्या त्या वानू नावाच्या कुत्र्याबद्दल वाचताना अक्षरशः तोंडात रूमाल कोंबून रडले मी! ते वाचत असताना आमच्या घरातल्या एका सदस्याची अगदी प्रखरतेने आठवण झाली. ती म्हणजे आमची ''मनी''. आठवण झाली म्हणजे मी तिला विसरले अशातला भाग नाही काही! पण वानूबद्दल वाचताना तिचा चेहरा अन तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून तरळून गेला. आपण १४-१५ वर्षाचे असताना आपल्याला सुद्धा मनीबद्द्ल लिहावसं वाटलं पण तेव्हा आपण ते फारसं मनावर घेतलं नाही अशी एक बोचरी जाणीव मात्र त्यावेळी दुखावून गेली..............मग आता कुठे वेळ गेलीये??? असं वाटलं अन मग मात्र राहवलंच नाही. माबोची विंडो ओपन केली अन बसले लिहायला! आमच्या मनीबद्दल हे माझे अविस्मरणीय अनुभव मी आजवर मनाच्या कोपर्यात जपून ठेवलेत ; ते माझ्यासाठी खूप अनमोल आहेत, आज्जीच्या पोटमाळ्यावर ठेवलेल्या जुन्या पेटार्यातल्या निरनिराळ्या आकर्षक वस्तूंसारखे! ते सर्व मी आज तुमच्या सोबत शेअर करतेय. खुप समाधान वाटतंय अन आनंदही होतोय! आवडेल ना वाचायला माझ्या मनीबद्दल????
------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनी : पहिली भेट: माझे आजोबा पुर्वी गावी हॉटेल चालवत असत. काही काळानंतर त्यांनी हॉटेलचा धंदा बंद केला अन ती जागा एका परिचित मेडिकलवाल्याला भाड्याने दिली. माझे बाबा बीएमसी मध्ये वाहनचालक आहेत. मी तिसरीत असेपर्यंत आम्ही धामणगाव पाईपलाईन येथे बीएमसीची वसाहत आहे, तिथेच राहत असू. तिथल्या क्वार्टर्समध्ये आमचं अडीच खोल्यांचं घरकुल होतं. ह्या खोल्या प्रशस्त होत्या. तसेच आमच्या घरात अधिक फर्निचर नसल्याने जागेची अडचण कधीच भासली नव्हती. दोन्ही बाजूला मोठे अंगण होते. पहिलंच घर आमचं असल्याने घराच्या उजव्या बाजुस भरपूर रिकामी जागा होती जिथे आम्ही छोटीशी बाग फुलवली होती. या बागेत जास्वंद्, टगर, गुलाब, सदाफुली, कर्दळ्,आबोली, सोनचाफा, रातराणी, झेंडू इत्यादी फुलझाडे आणि लिंबू, केळी, पपई, बोर, जांभूळ, सिताफळ, रामफळ इत्यादी फळझाडे होती. तसेच काही शोभेची झाडेपण होती. आता तुम्ही म्हणाल की ही बया मनीबद्दल सांगतेय की घराबद्दल???? पण या घराचा व बागेचा पण मनीशी खुप घनिष्ट संबंध आल्याने इथे उल्लेख करणं अपरिहार्य आहे. घरात मम्मी, पप्पा, दिदी व मी असे चारजण रहायचो. मला आठवतंय ते थंडीचे दिवस होते. मी तिसरीत होते. दिवाळीची पहाट होती. आईची आम्हा दोघींना उटणं लावून देणे, दारी रांगोळ्या घालणे अशी लगबग सुरु होती. पप्पा बाहेर अंगणात काहीतरी करत होते. एवढ्यात त्यांनी मला जोरात आवाज दिला.
''नेडे लवकर बाहेर ये...माऊ दाखवतो तुला!'' ,,,,,,,मी तशीच अर्धवट उटणे लावून बाहेर आले. मला मांजरी भारी आवडायच्या हे सगळ्यांना ठाऊक होतं. अनेकदा आमच्या दाराबाहेर येणार्या सोनेरी मांजरीला मी पप्पांकडून पारलेची बिस्किटे व आईकडून दूध घेऊन खायला देत असे. तर त्यावेळी बाहेर येऊन आम्ही पाहिलं तर आमच्या अंगणातील तुळशीवृंदावनाजवळ एक छोटुकलं मांजरीचं पिल्लू त्याचे चारही पाय पोटाशी दुमडलेल्या अवस्थेत खुरमुंडी घालून बसलेलं होतं. ते इतकं लहान अन नाजूक होतं की नाजुक सुळे असलेला जबडा ते उघडत तर होतं पण त्यातून येणारा ''म्याव'' असा आवाज मात्र अगदी सूक्ष्म होता. त्याला खुप थंडी वाजत असावी कारण त्याच्या अंगावरचे केस पूर्ण उभे राहिले होते. मला त्याची खुप दया आली. मी धावतच गेले अन ते पिल्लू उचलून दोन्ही हातात चेहर्यासमोर धरलं. नकळत तंद्री लागल्यासारखी मी त्याचं निरीक्षण करू लागले. काळा, पांढरा अन सोनेरी असे तीनही रंगांचे मिश्रण असलेल्या चट्ट्यापट्ट्यांचं कातडं, फारसे केस नसलेली छोटी टणक शेपूट, इवलंसं ओलं नाक, त्यावरच्या छोट्या मिश्या, करंगळीएवढे पाय अन त्यांचे गुलाबी पंजे, आणि ग्रेईश डोळे! किती सुंदर होतं ते पिल्लू! मी त्याचं निरीक्षण करत होते अन मम्मी, पप्पा, अन दिदी माझं! मी भानावर आले अन त्यांच्याकडे पाहिलं.
'' अय्या दी कित्ती गोड आहे नै पिल्लू???'' इती मी.
''हं''.......... दिदी अन मम्मीचा एकत्रित सूर!
''मग आता ह्याला आपल्याकडेच ठेवायचं ना पप्पा?'' पप्पांच्या लहरी स्वभावाची कल्पना असल्याने मी बिचकतच आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला. कारण तेवढ्यापुरती मांजर दाखवणं वेगळं अन तिलाच कायमचं घरात ठेवून घेण वेगळं. पण माझ्या आशेभरल्या डोळ्यातला उत्साह पाहून असेल बहुधा, पप्पा चक्क हो म्हणाले! मग या दोघींची काय बिशाद होती मला रोखण्याची? मी सरळ त्या पिलाला घेऊन पुढच्या छोट्या खोलीत गेले अन तिथल्या सेठीवर त्याला बसवलं बिच्चारं अजूनपण कुडकुडत होतं. मी मग तिथलंच एक पोतं उचललं , मागच्या अंगणातून एक रिकामा खोका आणला, त्या खोक्यामध्ये पोत्याची दुहेरी घडी करून अंथरली. आता त्या पिलाला त्यात बसवलं. थोडी हुडहुडी कमी झाल्यासारखी वाटली त्याची. आता मात्र आईने डोळे वटारले.
''अगं पुरेना आता त्याचा सरंजाम. किती वेळ दवडशील त्याच्यामागे?'' असं म्हणत तिने मला अंघोळीला पिटाळलं. अंघोळ झाल्यावर पटापट आवरून मी पुढच्या खोलीत आले.तर ते पिल्लू तर झोपूनही गेलेलं. पण मलाच चैन पडेना. मी आईच्या नकळत तिच्या शिलाई मशीन जवळची चिंध्यांची पिशवी उचलून आणली. अन त्यातल्या मोठाल्या चिंध्या निवडून त्या पिलाभोवती गादीसारख्या पसरवल्या. तो खोका उचलून मी एका सुरक्षित कोपर्यात नेऊन ठेवला. आता कुठे माझं समाधान झालं अन मग मी दिवाळेचे फटाके उडवायला अन फराळावर ताव मारायला निघून गेले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मनी: बारसं: दुपारपर्यंत कॉलनीतल्या टग्या मित्रमैत्रीणींसोबत हुंदडून मी घरी आले अन दारात पाय ठेवताच पुन्हा त्या पिलाची आठवण झाली. मी त्या खोक्यात डोकावून पाहिलं, पिल्लू जागं तर झालं होतं पण खोका त्याच्या उंचीच्या मानाने जास्त उंच असल्याने ते बाहेर पडू शकत नव्हतं. मी आता मम्मीच्या मागे त्याला काहीतरी खायला दे म्हणून धोशा लावला. तिने एका वाटीत दूध भरुन त्यात बिस्किटं कुस्करुन दिली. मी ती त्याला खाऊ घातली. त्याचं ते डोळे मिचकावत नि घाबरत घाबरत खाणं मी अगदी जवळून न्याहाळलं. आता त्या पिलाचं मला भारी कौतुक वाटायला लागलं. त्याची आई कोण असेल?? तो अंगणात कसा आला असेल ? आत्ता त्याची आई कुठे असेल? हा मिळत नाही म्हणून रडत असेल का?? एक ना हजार प्रश्न विचारून मी घरच्यांना हैराण केलं अन जेवणं आटोपल्यावर त्याला घेऊन आतल्या दिवाणवर येऊन बसले. एवढ्यात पप्पा आले अन मला दिवाण वर असं त्या पिलाला घेऊन तंद्री लागलेली पाहून मिश्किलपणे म्हणाले, '' काय नेडूताई कसला गहन विचार चालू आहे सध्या ??''
''अहो पप्पा या छोटुकल्या पिलाच नाव काय ठेवायचं तेच सुचत नाहीये मला.'' मी.
''ह्या, एवढंच ना?? काहीही म्हण की त्याला सोन्या, टिल्लु, बोक्या वगैरे''
''पण पप्पा त्याचं नाव ठेवायला आधी तो मुलगा आहे की मुलगी हे कळायला हवं ना??''
माझ्या या वाक्यावर दी अन मम्मी हसत बाहेर आल्या अन मम्मी ने ते पिल्लू उचलून घेतलं अन त्याच्या पोटाकडचा भाग पाहून म्हणाली '' हा बोका नाहीये, मांजर आहे. तेव्हा आता मुलीचंच नाव ठेवा बरं आज्जीबाई!''
मम्मीच्या या वाक्यासरशी मी टुणकन खाली ऊडी मारून त्या पिलाला जवळ घेतलं अन म्हणाले, '' ठरलं तर मग आपण आजच याचं बारसं करूया. मी आत्ताच माझ्या मैत्रीणींना सांगून येते.'' एवढं बोलून मी बाहेर पळालेसुद्धा!
संध्याकाळी सगळ्या मैत्रिणी घरी आल्या अन आम्ही त्या पिलाचं बारसं केलं. अन अशी त्या पिलाची ''मनी'' झाली. मी दिवसभर विचार करून ठरवलेलं नाव सगळ्यांना भारीच आवडलं. बारश्याच्या मुहुर्तावर आम्ही मग फराळावर ताव मारला.
क्रमशः
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मस्त लिहले...टोके....
मस्त लिहले...टोके....
धन्स स्मितू.
धन्स स्मितू.
छान आहे.. नेहा.. मनी पण खुप
छान आहे.. नेहा.. मनी पण खुप गोड आहे..:)
ही मनी नव्हे राखी...खरं तर
ही मनी नव्हे राखी...खरं तर वाइट्ट वाटत की मनीचा फोटो मी का काढून ठेवला नाही. ती याहुन क्युट होती गं!
चेहरा अगदी हाच...पण शरीर अन
चेहरा अगदी हाच...पण शरीर अन रूबाब काही औरच होता तिचा!
छान लिहिलय. पुढच्या भागाची
छान लिहिलय. पुढच्या भागाची वाट बघतोय.
हो दिनेशदा. लवकरच टाकते.
हो दिनेशदा. लवकरच टाकते.
अरे व्वा.. तुम्ही पण
अरे व्वा.. तुम्ही पण मांजरप्रेमी खुप छान..:)
सह्हीच लिहलयसं..!! विषेशतः
सह्हीच लिहलयसं..!! विषेशतः पिल्लाचं वर्णन अगदी चपखळ.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..!!
मनी.......एक अविस्मरणीय
मनी.......एक अविस्मरणीय आठवण!----- >>> नेहा, माझ्यावर माझ्या मरणोत्तर लेख लिहिलास कि काय आतापासुन?
टोकु... मस्तं गं...
टोकु... मस्तं गं...
नेहाजी आमच्या भावंडाबद्द्लची
नेहाजी आमच्या भावंडाबद्द्लची तुमची तळमळ आवडली.
अशीच काळजी घेत रहा.
कथा आवडली, पुढील भाग लवकर पोस्ट करा.
मस्त
मस्त
मनी.......एक अविस्मरणीय
मनी.......एक अविस्मरणीय आठवण??????
मनी विसरुन कसे चालेल हनी?
बघ वरती सगळ्या लागल्यात म्याव म्याव करायला.
टोके... छान लिहीतेस
टोके... छान लिहीतेस
छान लिहलं आहे. आमच्याकडे
छान लिहलं आहे. आमच्याकडे एकावेळी असलेली सात मांजरांची पिल्लं डोळ्यासमोर आली.