इरा

Submitted by बेफ़िकीर on 6 December, 2011 - 03:53

उंबर्‍यात बसताना पंधरा वर्षाच्या इराच्या मनात निरागसपणे एक विचार डोकावला. आपण जगाच्याही उंबर्‍यावरच बसलेलो आहोत. मागे, उंबर्‍याच्या आत बसलेली इराची आई शालिनी तिची वेणी घालत होती. वडील मेतण्णा आतमध्ये ध्यान लावून बसलेले होते. नारळाची झाडे, त्यातच मधेमधे उगवलेली काही स्वयंभू झाडे आणि काही लावलेली झाडे! बेळगावपासून काही अंतरावर असलेल्या एका लहान खेड्यात हे घर होते इराचे! बाहेरच्या मातीत पाय टाकून बसताना एक शीतल थंड जाणीव शरीरात जात होती. आपल्या दोन्ही हातात एक कोंबडीचे पिल्लू धरून इरा बसलेली होती. आईने केस ओढल्यावर चेहर्‍यावर उमटणारी वेदनेची मंद रेष आणि झटक्यात मागे जाणारी मान इतक्याच काय त्या तिच्या अस्तित्वाच्या आणि जिवंतपणाच्या खुणा होत्या. बाकी उरलेली इरा म्हणजे एक वस्तू ठरलेली होती. गेल्याच महिन्यात नववीच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली होती. समोर खेळणार्‍या काही कोंबड्या, दोन शेळ्या ज्यांच्या दुधावर घरातील सर्वांचा गूळ घातलेला चहा व्हायचा आणि एक म्हैस! रात्री घरासमोर अनेकदा साप निघायचे. साप चावल्यावर विष उतरवण्यासाठी गावात अर्थातच मेतण्णा होताच! आणि शालिनी त्याच्याहीपुढचे उपचार करायची. तिच्या अंगात यायचे. शालिनी ही पंचेचाळिशीची स्त्री कर्नाटकाला शोभणार नाही अश्या गोर्‍या रंगाची होती. लांबून येतानाही जाणवावे इतकी सुडौल आणि झगमगीत! त्या गावात मात्र तिला मान होता तो वेगळ्याच कारणासाठी! तिच्या अंगात तीन विभुती यायच्या. एक महाराज, एक स्थानिक देव आणि एक स्थानिक देवी! या तीनही विभुती वेगवेगळे प्रश्न सोडवायच्या. मुख्य विभुती म्हणजे महाराज! त्या महाराजांनी सांगितलेल्या औषधावर, पूजेच्या उपायांवर गावाचा विश्वास होता. मात गावात काही लग्नसराई वगैरे असली तर स्थानिक देव किंवा देवी अंगात यायचे आणि मान घ्यायचे. अनेकदा, किंबहुना आजकाल तर प्रत्येकदाच घरच्या कार्यात शालिनीच्या घरातील तिघांनाही बोलावून आहेर करण्याची व मानपान करण्याची जणू प्रथाच पडलेली होती.

अन्नाच्या शोधार्थ उडणार्‍या पक्ष्यांचा चिवचिवाट अचानक जाणवेल इतका वाढला तशी मेंगळटासारखी पडलेली दोन गावठी कुत्री कान तरारून उभी राहात कोठेतरी पाहू लागली. साहजिकच शालिनी उंबर्‍याबाहेर डोके काढून तिकडे बघू लागली आणि केसांना पडणारा ताण कमी झाल्यामुळे किंचित सुखावलेली इरा उंबर्‍यातूनच मागून घराकडे येणार्‍या वाटेकडे पाहू लागली.

वहिदा!

इराची मैत्रीण आली होती. सगळ्यांचे संभाषण हेल काढून उच्चारण्याच्या कानडीतच होते. वहिदाने विचारले.

"शाळेला येतीयस ना??"

इराने वहिदाकडे पाहिले. तिचा गणवेष मागच्याच वर्षीचा होता. पण वहिदा खुलून दिसत होती. टापटीपीत शाळेत चाललेली होती. दप्तर मात्र नवीन होते. असणारच, दहावीला बसायचे म्हणजे मिळणारच की नवीन दप्तर! आतल्या वह्या पुस्तकेही नवीनच असणार! इराने कावरीबावरी होऊन एकदा वहिदाकडे आणि एकदामागे वळून आईकडे पाहिले.

शालिनी कडाडली.

"शाळाबिळा काही नाही आता... आता गावची सेवा करणार इरा, गावचे प्रश्न सोडवणार"

दचकलेल्या वहिदाला इराच्या आईचा स्वभाव माहीत होता. गावात तिला आणि मेतण्णाला असलेले महत्वही माहीत होते. वहिदा लहानच होती, इराएवढीच! मान खाली घालून ती आल्या वाटेने निघाली तशी तिला ओळखणारी दोन्ही कुत्री तिच्यासोबत काही पावले गेली. जाताजाता वहिदाने चुटपुटत्या नजरेने मागे वळून इराकडे पाहिले तेव्हा इराच्या आईचे डोके पुन्हा उंबर्‍याच्या आत गेल्याने इरालाही क्षणभर वहिदाकडे पाहता आले.

इराच्या बिचारीच्या डोळ्यात अनेक विचार आणि अनेक भाव मिश्रित झालेले होते. आपल्याला शाळा का नाही, वहिदाला मिळते तसे शिक्षण आपल्याला का नाही, घरातील काम करायला आपण कुठे नको म्हणतोय, ही समोरची कोंबडी, हे कुत्रे, त्या शेळ्या आणि आपण यात फरक काय? आपल्याला बोलूच का देत नाहीत? आपलीच आई आणि आपलेच वडील आजवर आपल्यावर इतके प्रेम करत असताना आता असे कडक का वागत आहेत?

टच्चकन डोळ्यात आलेले पाणी पुसले तर आईला समजेल की आपण रडतो आहोत म्हणून कोंबडीच्या पिल्लाशीच काहीतरी बोलत त्याचा पापा घ्यायला म्हणून त्याला आपल्या तोंडाच्या जवळ आणून इराने आपले डोळे त्या पिल्लालाच पुसले. घाबरलेले ते पिल्लू सुटायची धडपड करत होते आणि आजवर मिळालेल्या दाण्यांबाबतची कृतज्ञता म्हणून समोरची कोंबडी आपले पिल्लू इराच्या हातात असतानाही मूकपणे नुसतीच बघत होती.

सकाळी नऊ वाजता तेथे निराशेने सूर्यकिरणांमध्ये मिसळत मिसळत सर्व प्रदेशावर ठसा उमटवलेला होता. तेलाने कच्च झालेल्या केसांची वेणी घालतानाही सारखा ताण पडत होता. पिल्लाला सोडून देत इराने एकदा मागे वळून पाहिले. शेवटचे पेर उरलेले दिसत होते. झाले एकदाचे! आज आंघोळ करताना कसेसेच वाटत होते. वयात आलेल्या मुलीची आंघोळ चालू असताना आईने तिथेच उभे राहून जप करावा का? कसला घाणेरडा प्रकार वाटतोय हा! आई स्वतः आपल्या अंगावर पाण्याचे तांबे रिकामे करत होती. अंगावर पडणार्‍या पाण्यात आपल्या डोळ्यातले पाणी वाहून जात होते.

वेणी झाल्यावर इरा उठली आणि टीचभर आरश्यात नेहमीप्रमाणे आपला चेहरा न्याहाळू लागली. आणि अचानक आतल्या खोलीतून आईची जरबदार हाक ऐकू आली. घाबरलेली इरा आत पोचली तेव्हा स्वयंपाकघरात चुलीपाशी बसलेली शालिनी एक उलथ्ने लाल करून इराला जवळ बोलावत होती. हा प्रकार काय असू शकेल याची अत्यंत अस्पष्ट अशी कल्पना इराच्या मनात डोकावली. आजवर एक धपाटाही न मारणारी आपली आई बहुधा आपल्या कोणत्यातरी चुकीसाठी आपल्याला शिक्षा करणार! डाग देणार!

पायातले बळच जाऊन इरा खाली बसली. पण उपाय दिसत नव्हता. मागून मेतण्णाने तिच्या बखोटीला धरून तिला बळजबरीने उभे केले आणि चुलीकडे ढकलू लागला. आई अजूनही कसलेतरी मंत्रच उच्चारत होती. वडिलांच्या अघोरी ताकदीपुढे अशक्त ठरल्याने किंचाळत इरा शेवटी चुलीपाशी पोचली. आई उलथ्ने घेऊन उभी राहिली आणि म्हणाली.

"लागेल, ओरडशील, भाजेल, कायमचा डाग पडेल, थोडीशी कुरूप होशील, पण हे बघ, हे बघ माझ्याही गळ्यावर असाच डाग आहे ना?? तो सासूबाईंनी दिला होता... आम्हाला मुलगा नाही... तूच आमचा मुलगा आहेस... थोडा वेळ त्रास होतो... नंतर कही वाटत नाही... आपल्यावर जबाबदारी आहे.. आपल्यावर गावाचा विश्वास आहे.. तुजहं लग्न करून टाकलं तर आम्ही म्हातारे झाल्यावर आम्हाला काय?? म्हणून हा निर्णय घेतला आहे... रडू नकोस... ओरडूही नकोस... कधीही कोणालाही सांगायचे नाही की हा डाग आईने दिला म्हणून... म्हणायचे महाराजांनी दीक्षा दिली... काय म्हणायचे??? महाराजांनी माझी पूजा स्वीकारली... आईच्या अंगात महाराज आलेले असताना त्यांनी स्वतः मला हा डाग दिला आणि मला अजिबात वेदना झाली नाही असे म्हणायचे.. समजलीस??... आजपासून सरावाला सुरुवात करायची... मी सांगते तसे करायचे... जगाशी आता तुझा संबंध गावातील एक मुलगी म्हणून उरलेलानाही... तसा ठेवायचाच नाही... आजपासून तुझ्या अंगात येऊ लागले असे आम्ही गावात जाहीर करणार आहोत... "

आपण काय ऐकतोय आणि समोरच्या लोखंडी वस्तूचे लालभडक झालेले टोक आपल्या जवळजवळ येत आहे या सर्व जाणिवांपलीकडे गेलेल्या इराच्या गळ्यावर जेव्हा ते उलथ्ने टेकले तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे दोन्ही हात धरून तिला दाबून धरलेले होते तरीही ती तडफडली. तोंडातून आवाज फुटेना! तिच्या दोन्ही पायांवर शालिनीने आपली पावले दाबलेली होती. थडाथड उडत असलेल्या इराला त्या पकडीतून सुटता मात्र येत नव्हते. आपल्याच घरातून आपण पळूनही जाऊ शकतो हे तिला माहीतच नव्हते..

कित्येक मिनिटे तशीच पडून राहिली ती! तिच्या गळ्यावरच्या भल्य मोठ्या डागावर पाणी ओतून कसलातरी लेप लावत तिची आई शालिनी घुसमटत्या आवाजात रडत आक्रंदत म्हणत होती...

"कसला नरक केलाय घराचा... सोन्यासारख्या मुलीला असं करावं लागतंय मला... महाराज... मी स्वर्गात जईन तेव्हा तुमचे हाल हाल करणार आहे... "

या बडबडीला काहीच अर्थ नव्हता. आपल्या आईला स्वतःलाच वाईट वाटत आहे हे पाहून मात्र इराच्या मनाचा बांध फुटला आणि ती आईलाच बिलगून खूप खूप वेळ रडली. गळ्याची वेदना सहनच होत नव्हती. पण आता मगाचपेक्षा जळ कमी झालेला होता. आई तिला थोपटत थोपटत तोंडातून फार मोठा आवाज काढू नकोस म्हणून आर्जवे करत होती. न जाणो कोणी गावकरी ते ऐकायचा आणि म्हणायचा काही महाराज वगैरे नसतात यांच्या अंगात! इराला दिसले, तिचे वडील मेतण्णाही डोळ्यातले पाणी पुसत आहेत.

संपूर्ण दुपार झोपून काढल्यावर संध्याकाळी पाचच्या सुमारास इराला तिच्या आईने गदागदा हालवून उठवले. जाग येताक्षणीच गळ्याची वेदना पुन्हा जाणवून चेहरा वेडावाकडाच झाला इराचा! पण तोंडातून शब्द फुटेना कारण समोर अप्पा बेळगावकर बसला होता. गावातला मोठा पैसेवाला सावकार असामी! विचित्र नजरेने मेतणा, शालिनी आणि इराकडे पाहात होता. इराला काय करायला हवे ते लगेच समजले. आई वडिलांकडे पाहात तिने अप्पाला नमस्कार केला. वाकताना पुन्हा गळ्याची वेदना जोरात झाली, पण तिने ब्र काढला नाही. अप्पाने तिला विचारले.

"काय झाले गळ्याला ?"

आप्पाचा आवाज काहीसा खुनशी आणि दमबाजीचाच होता. इराने पटकन आईकडे पाहिले. शालिनीचे डोळे मोठे झाले तसे तिला जाणवले की ह्या प्रश्नाचे उत्तर आपले आपणच द्यायचे आहे.

"महाराज ... महाराज आले होते... त्यांनी आपली मानली मला.."

या वाक्याचा पडसाद मिटण्याच्या आतच आप्पा खदखदून हासला. खिशातून काही नोटा काढून मेतण्णाकडे देत तो उठून दारात गेला आणि पाठीमागे वळून तिघांकडे बघत म्हणाला...

"पंधरा दिवसात तयार झाली पाहिजे इरा! घाटातल्या जंगलात तिसर्‍या वळणापासच्या वडामागे हजार रुपये पुरतोय मी! बरोब्बर सांगितले पाहिजे तिने एखाद्या माणसाला! आज मासे आणा आणि जेवा... क्काय??"

मेतण्णा आप्पाचे पाय धरायला धावला आणि माजात आप्पा हासतहासत निघून गेला. त्याक्षणी मात्र मेतण्णाने मुलीला जवळ घेतले आणि स्वतःच हमसून हमसून रडला आणि डाग दिल्याबद्दल माफी मागू लागला. शालिनी भिंतीकडे तोंड करून रडू लागली. इराला काही समजत नव्हतेच.

रात्री सार्‍या गावात निजानिज झाल्यानंतर शालिनीने इराला एका खोलीत नेले आणि दार आतून बंद करून घेतले. इरा मनातून प्रचंड घाबरलेली होती. आता काय करणार असतील असे तिला वाटत होते.

मात्र शालिनीने तिला घुमायला सांगितले. आपली आई अंगात आल्यावर कशी घुमते हे पाहिलेले असल्याने इराला तशी हालचाल करणे अगदीच अवघड नव्हते. ती मांडी घालून बसली आणि डोलत डोलत आईकडे पाहू लागली. कितीतरी वेगळ्यावेगळ्या डोलायच्या आणि उभे राहून अंगात आल्याच्या हालचाली करायला शिकवले आईने! जवळपास दोन तास इरा घामाघूम होऊन सराव करत होती. मेतण्णा डोळ्यात तेल घालून तिच्याकडे बघत होता, हालचाल चुकली किंवा तोल गेला की सुधारणा सुचवत होता.

मोजून बारा दिवस इराचा हा सराव झाला. पहाटे चारला उठून एक तास आणि रात्री अकराच्या पुढे दोन तास!

त्याचा एक वेगळाच परिणामही झाला.

प्रथम गळ्याच्या वेदनेबरोबरच सगळे शरीरच ठणकत असले तरी चौथ्या पाचव्या दिवसापासून उत्साह वाढायलाच लागला. हालचालीत डौल आला आईसारखाच! दिवसभर उत्साह वाटू लागला. अन्न जास्त जाऊ लागले. अंगात आल्याचा सराव करावा असे तिलाच वाटू लागले. ताकद वाढल्यासारखे वाटू लागले. आपोआपच काहीसा आत्मविश्वास संपादन करता आला. आणि तेराव्या रात्री सराव करताना आईने तिच्या कानात सांगितले.

"तुळजापूरची भवानी आहेस तू... सार्‍या गावावर राज्य करायचे आहेस उद्यापासून"

डोलता डोलताच ते वाक्य ऐकणार्‍या इराला समजले काहीच नसले तरी हल्ली हल्ली डोलता डोलता एक विशिष्ट लय साधता येऊ लागली होती. त्याचा परिणाम असा होत होता की संपूर्ण शरीरच थिरकत असल्याने एक प्रकारची धुंदी चढू लागलेली होती. डोळे फिरू लागलेले होते. ती अवस्था तिला स्वतःला नशीली अवस्था वाटू लागलेली होती. गळ्याची वेदना आता कमी कमी होत चाललेली होती. रोज व्यायाम आणि रोज माश्यांची तिखट आमटी खाऊन इराला बळ प्राप्त झाल्यासारखे वाटू लागले होते.

चौदाव्या दिवशी संध्याकाळी शालिनीने गावात अंगात आल्यासारखे दाखवत अत्यंत भयभीत नजरेने सांगून टाकले.

"आम्ही आता येऊ शकत नाही. प्रत्यक्ष भवानी माता आलेली आहे"

महाराजांवर अपार विश्वास असलेली भाबडी माणसे इराला बघायला धावली.

हिरवी साडी नेसलेल्या इराचे कपाळ हळद आणि कुंकवाने भरून गेलेले होते. तीक्ष्ण नजरेने ती समोरच्या जमीनीला जणू जाळतच होती. घुमता घुमता चित्रविचित हावभाव करत होती. समोर आलेल्या पहिल्या गावकर्‍याने नमस्कार केला तेव्हा इराच्या मनाच्या तारा जणू झंकारल्याह! आपल्या आई वडिलांनी आपल्यावर जणू उपकारच केले आहेत हे तिला पटू लागले. आपण खरच गावाच्या देवी होऊ शकू असे वाटू लागले. मनातून आनंदाची कारंजी बाहेर उडू लागली तरी तिने चेहरा आधीसारखाच ठेवला. बावरली नाही की लाजली नाही. घुमतच राहिली. मेतण्णा शालिनीकडे पाहून मंद हासला. एकागावकर्‍याने नमस्कार करून एक रुपया ठेवला तशी इरा अगाध सुखावली. रात्री दहापर्यंत अनेकांनी काही काही प्रश्न विचारले. इरा लहान होती. त्यामुळे अनेक प्रश्नांना काही उत्तरच देता येत नसल्याने तिने नुसत्याच खाणाखुणा करून दाखवल्या. मग लोक त्याचा अर्थ काढायचा प्रयत्न करू लागले. अर्थातच या कामी मेतण्णा आणि शालिनीची मदतघेऊ लागले. मग शालिनी इराच्या समोरच बसली. आई प्रत्यक्ष समोर बसल्याने इराला आपण देवी नसून एक लहान मुलगीच आहोत ही भावना दुपटीने जाणवली. मात्र तिने अजिबात चेहर्‍यावर तसे दाखवले नाही. शालिनी तिच्या खाणाखुणांचा अर्थ तिलाच विचारू लागली. हो किंवा नाही इतकेच उत्तर इरा देऊ लागली. मात्र आता हे सगळे अती झाल्यासारखे वाटत होते. दम लागत होता. रोजचा सराव वेगळा आणि प्रत्यक्ष परफॉर्मन्स वेगळा! पण उरलेल्या सहा जणांपैकी एकाने प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा मागे गर्दीत उभा असलेला आप्पा बेळगावकर हळूच पुढे येऊन लक्ष देऊ लागला. त्या माणसाचा प्रश्न होता:

"फार गरीब आहे देवी, तुम्हाला रोज साखर ठेवेन आणि नवस करून तो फेडेन, पण ही गरीबी घालवा, एवढी कृपा करा"

इरा केवळ क्षणभरच थबकली. तय थबकण्याच्या अवधीत तिने नजरेच्या कोपर्‍यातून आई आणि वडिलांची हालचाल पाहून घेतली. आणि अत्यंत वेगळ्या आवाजात चमत्कारिकपणे जोरात ओरडत म्हणाली...

"पुर्वजांनी गुप्त धन पुरले आहे हे माहीतच नाही तुला??? जा घाटात... तिसर्‍या वळणापाशी असलेल्या वडामागे खोद..."

वेळ रात्रीची होती. गाव मेतण्णा आणि शालिनीला घेऊन धावले. इकडे देवीच्या सुरक्षेसाठी काहीलोक थांबले. तीच हिरवी साडी तशीच ठेवून दमलेली इरा एका खोलीत झोपूनही गेली. तिकडेघाटापशी गेलेल्यांन पंधराच दिवसांपुर्वी झालेल्या खोदकामाची अंधारात नीटशी जाणीव झाली नाही. खोदल्यावर एका अत्यंत जुनाट भांड्यात हजार रुपये मिळाले. ते घेऊन तो माणूस नाचू लागला. त्यातले शंभर रुपये त्याने मेतण्णाच्या हातात ठेवून मेतण्णा आणि शालिनीला नमस्कार केला. गाव वेड लागल्यासारखे वागू लागले. प्रत्यक्ष भवानीमाताच अवतरल्यामुळे बेभान होऊन नाचत सगळे पुन्हा इराच्या घराकडे आले. झोपलेल्या इराला पाहून तसाच हात जोडून निघून गेले.

==================

आता आप्पा भवानीमातेच्या तोंडून वदवतो. त्यातून मिळालेले उत्पन्न मेतण्ना आप्पाच्या हवाली करतो आणि त्यातला काही भाग आप्पा मेतण्णालाच देतो. आप्पाच्या भीतीने मेतण्णा, शालिनी आणि इरा मुकाट अभिनय करत राहतात. उत्पन्न वाढले आहे कारण माहीत नसलेल्या महाराजांपेक्षा सुपरिचीत भवानीमाताच गावात अवतरलेली आहे. आता शालिनी आणि मेतण्णांच्या अंगात येतच नाही. भवानीमातेसमोर बारीकसारीक विभूती कशा येतील?

इराने नववीची सर्व पुस्तके एका गरीब मुलीला देऊन टाकलेली आहेत. तीही यात सर्वस्व अर्पण करत आहे. फक्त काल असे झाले की अचानक इराव्यतिरिक्त घरात कोणीच नसताना वहिदा तिथे आली आणि इराला म्हणाली...

"खरं सांग... तू देवी नाहीयेस ना???"

जिवलग मैत्रिणीने आपुलकीने केलेल्या चौकशीमुळे गहिवरून आलेल्या इराने रडत रडत तिला मिठी मारली हेच त्या प्रश्नाचे उत्तर!

==============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

या प्रथा कधी बंद होणारेत कुणास ठाऊक??? श्रद्धा- अंधश्रद्धेच्या पलिकडे जाऊन व्यावसायीकरण झाल्याने हे सगळ थांबेल अस वाटत नाही उलट वेगवेगळ्या रुपात वाढेलच. Sad

कथा चांगली रंगवलीत.

nice real story....

Befikirji, waiting more and more for ur "dressing room....." story too.

Please complete that too.

don't leave half way like " bana.." " kalachi ladhai..."

छान आहे कथा. आवडली.
श्रद्धा- अंधश्रद्धेच्या पलिकडे जाऊन व्यावसायीकरण झाल्याने हे सगळ थांबेल अस वाटत नाही उलट वेगवेगळ्या रुपात वाढेलच >>>>>> १००% अनुमोदन

aabasaheb यांना ड्रेसिंगरूमबद्दल अनुमोदन.

आवडली...अगदी सुन्न करून टाकणारी कथा...
छोटीशीच असली तरी सगळी पात्रे अगदी चपखल उतरली आहेत....

Pages