आमचं बी डर्टी पिक्चर.. सतीचं व्हाण ( भाग पहिला )

Submitted by Kiran.. on 5 December, 2011 - 09:26

चट्ट्यापट्ट्याची खाली घसरणारी विजार नाडी आवळत धरून मी त्वेषाने टायपिंग करत होतो. भोक पडलेल्या बनियनमधे बोटं घालून चिरंजीव मला त्रास द्यायचा प्रयत्न करत होते. त्याला एक कानाखाली दिल्यावर ही फणका-याने त्याला आत घेऊन गेली. जाता जाता "बघावं तेव्हा सदा न कदा कॊंप्युटर आणि ते दळभद्री इंटरनेट" असं काहीसं पुटपुटत ती निघून गेली ते आता सवयीचंच झालं होतं. जरा निवांत झाल्यावर समोरच्या स्क्रीनवर अक्षरं उमटू लागली..

निळ्या डोळ्यांची नायिका माझ्यावर लट्टू होऊन एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यांचे विभ्रम कुणालाही वेड लावणारे असले तरी मी तिला घास डालणे शक्यच नव्हतं. मी माझ्या फेरारीत बसायच्या आधी तिच्याकडे न पाहता सिगारचा एक कश घेतला आणि उरलेला बुटाच्या टाचेखाली चिरडून टाकला. मी फेरारीत बसलो केव्हां, ती चालू झाली केव्हां आणि दीडशेच्या स्पीडने ती धावू लागली केव्हां हे तिलाच काय गर्दीलाही समजले नव्हते. तिथं असलेला प्रत्येक जण दिमाखात जाणा-या फेरारीकडे पाहत होता.

"अहो, स्कूटरवर जाऊन दळण घेऊन या लवकर. गिरणी बंद होईल "

मी मनात चडफडलो. कुठं फेरारी आणि कुठं ती बंद पडणारी खटारा.. लेखकाला कल्पनाविलासासाठी जो निवांतपणा हवा तो हा बायको नावाचा प्राणी कधीच मिळू देणार नाही याबद्दल माझी खात्री होत चालली होती.
तिला साहीत्यात जरा म्हणजे जरा रूची नव्हती. एखादी भन्नाट कल्पना सुचत असताना तिनं सुतकी चेह-याने समोर यावं आणि शाळेची फी राहीलीय, ट्युशन वाल्या बाईंचा पण फी द्या म्हणून तगादा लागलाय असे असाहीत्यिक डायलॊग्ज मारावेत, वेळ मारून न्यायचा प्रयत्न केल्यास नेहमीप्रमाणे शेजारीपाजारी ऐकू जाईल इतपत आवाज चढवावा आणि त्या कल्पनांना बाल्यावस्थेतच मारून टाकावं हे तिला बरोब्बर जमत असे. मध्यमवर्गीय मराठी लेखकाच्या नशिबी अशी घरापासूनच अवहेलना आणि उपेक्षा असेल तर त्याने करायचं तरी काय ? कल्पनाविलासासाठी पैसे लागतात का असं कुणी म्हणत असेल त्याने माझ्या घरी यावं असा विचार करत पिशवी घेऊन मी दळण आणायला निघालो.

अरेच्चा..! मी कोण हे तुम्हाला माहीत नाही ?
काय म्हणता ?
म्हणजे मी प्रस्तावना दिलीच नाही का ?
ओह नो..

मंडळी नमस्कार,
एक मिनिट हं...
तर मी एक ब-यापैकी यशस्वी लेखक आहे. असं आपलं माझं मत आहे. टोकदार भाला या संकेतस्थळावर माझे अनेक लेख (आपोआपच) प्रकाशित होत असतात. गझला, कविता, ललितं, स्फुटं.. सर्व क्षेत्रात माझा ठसा टोभा वर उमटलेला आहे. अं.. हो हो..हो ,माझं नाव ना .. एक मिनिट. सांगतो ! तसंही कुणीतरी हज्जारदा म्हटलंयच ना ? नावात काय ठेवलंय.. पण नावालाच तर जग फसतं. वेल.. माझ्याबद्दलच का बोलतोय बरं आपण ? ऍक्चुअली मला तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगायच होतं...

सांगू का ?

नुकताच डर्टी पिक्चर नावाचा पिक्चर येऊन गेला. धो धो चालला. त्याचं यश बघून बॉलीवूडमधे सगळ्यांनाच असे पिक्चर्स बनवावेसे वाटू लागले. थांबा, असं नाही, स्टार्टिंगपासूनच सांगतो सगळं !

एक मिनिट अजून हं .. हे गूगल अर्थ बंद करतो. माऊस बघा नेमका मुपो टगेवाडीवर आलाय. टगेवाडी म्हणजे बड्या धेंडांचं गाव. ऊसाचा कारखाना, बारमहा पाणी आणि शहर जवळ. तर या टगेवाडीच्या बाळासाहेब ढेकणे यांचा प्रॉब्लेम जरा निराळा होता. त्यांनी पिक्चर काढला खरा पण त्यांनी पिक्चर कसा काढला आणि मी त्यात कसा ओढला गेलो हे जरा आता फूटेज खात खात सांगतो. अति संपर्कातून माझी म-हाटी सुधारली आणि पुण्याची वरणभात भाषा जा‌ऊन त्याला मातीचा वास चढला तो या कथेत अपरिहार्यपणे डोकावून दोन्ही भाषांचं खंडग्रास मिश्रण त्यात आलय ते हिंग्लिश किंवा मिंग्लिश सारखंच चालवून घावं अशी नम्र विनंती !

प्रस्तावना संपली.

_______________________________________________________________

प्रकरण एक
========

टगेवाडीत सध्या जागा विकायची लाट आलेली होती. श्री बाळासाहेब ढेकणे यांनी देखील त्या लाटेत आपली जागा विकल्यामुळं त्यांच्या खिशात ब-यापैकी पैसे खुळखुळत होते. आजूबाजूच्या गुंठेपाटलांनी पैसे मिळाल्याबरोबर स्कॉर्पि‌ओ बुक करून, रेबॅनचे गॉगल्स आणि हातात सोन्याचं कडं घालून हायवेला एकेक हाटेल टाकलं होतं. हाटेलात गावातलेच टोळभैरव येत असत. त्यांच्यासमोर गल्ल्यावर बसतांना मनास अत्यंत गुदगुल्या होत असत. काही दिवसातच गुंठेपाटलांचे पैसे संपले आणि हाटेलवर लैच कर्जपाणी झाल्यानं आपल्याच जमिनीत उभ्या राहणा-या बांधकामावर वॉचमनची नोकरी मिळवण्यात ते यशस्वी झाले होते.

श्री ढेकणे यांनी यातलं काहीच केलं नाही. त्यांनी "मी यशस्वी होणारच" " यश मिळवायचे आहे ?" असे शोज अटेण्ड केलेले होते. आपल्याकडचे पैसे कुठेतरी गुंतवले पाहीजेत असं त्यांना वाटू लागलं होतं. काहीतरी वेगळं केलं पाहीजे याबद्दल त्यांच्या मनात कुठलीही शंका नव्हती. रिस्क घेतल्याशिवाय धंदा नाही हे ही त्यांना कळून चुकले होते. लवकर पैसे देणारा धंदा कुठला याच्याबद्दल त्यांच्या डोक्यात विचार घोळत होते. काही पोरांनी जमिनीचे गुंठे पाडायचा व्यवसाय सुरू केलेला होता. एक दोघं त्यातल्या त्यात शानी निघाली होती. त्यांनी बिल्डर बनायचं ध्येय पूर्ण केलं होतं आणि स्कीम टाकली होती. गाव आपलचं असल्यानं वाट्टल तेव्हढा एफएसआय होता. पण कुठं माशी शिंकली कळंना. तलाठी आणि ग्रामसेवकाच्या सारख्याच फे-या चालू झाल्या आणि पोलीस पण येऊ लागले. काहीतरी झालं आणि बांधकामच बंद पडलं. गावातल्या पवनशेठ मारवाड्याच्या दुकानावर तहसीलदारांसोबत एक दोनदा मिटींगा झाल्या. पवनशेठ तसा कनवाळू माणूस. त्याला सरकारी माणसांनी गावातल्या पोरांवर बेकायदेशीर कारवाई करावी हे बघवलं नाही. त्याने रात्रंदिवस वरपासून खालपर्यंत पोरांसाठी फोनाफोनी करून त्यांचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलं होतं. वर अशी कामं मराठी माणसानं करू नयेत असा सल्ला द्यायलाही तो विसरला नव्हता. पुढं बांधकामाच्या साईटवर सावकाश पवनशेठचा बोर्ड लागला ते वेगळ ! पण म्हणूनच रिस्क घेणं म्हणजे आत्महत्या करणं नव्हे हे बाळासाहेबांना कळत होतं.

गावात या घडामोडी घडत असतानाच सिंघमच्या यशाचे लेख पेप्रात छापून येत होते. आठवड्यात ८० कोटी, दोन आठवड्यात दीडशे , तीनशे कोटी असे आकडे बघून त्यांचे डोळे गरगरायला लागले होते. रोबोटच्या यशाने तर त्यांचे डोळेच दिपले. मराठी शिनेमे पण मागे नाहीत असं त्यांना नुकतंच समजलं होतं. भेकरवाडीच्या त्यांच्या मेव्हण्याने पण एक पिक्चर काढायचं ठरवलं होतं तेव्हापासून घरातून पिक्चर काढण्याबद्दल आग्रह होतच होता.

पिच्चरच काढला तर ?

पण कसला काढावा ? कुटची ष्टोरी हिट हो‌ईल याबद्दल त्यांच्या मनात शंकाच होती. मांजरी बुद्रुकचा शाम्या उर्फ घनःशाम हगवणे हा पिच्चरमधे काम करतो असं पंचक्रोशीत फेमस होतं. म्हम‌ईवरून आला कि शाम्या लैच भाव खायचा. त्याचं त्यावेळचं पांढरं शुभ्र बेलबॉटम, वर नक्षीचं जाकिट आणि मोठ्ठ्या फ्रेमचा गॉगल असं त्याला (त्याच्या) जवानीत पाह्यलेला. दिवाळसणाला यायचा तो. त्याला भाव दिला कि एकेक किस्से सांगायचा. त्यातून प्रकाश मेहरा एकदा अडचणीत आलेले असताना त्यांनी कसं घनःशामभा‌ईला बोलवून घेतलं होतं आणि घनंशामभा‌ईच्या सूचनेनुसार जंजीरमधे कसा अमिताभ बच्चन आला होता हे त्यांना समजलं होतं. सलीम जावेदला जेव्हा ष्टोरी सुचत नसे तेव्हां ते घनःशामभा‌ईला फोन करत असत. अमिताभ बच्चन तर शॉट कैसा दिया घनःशामभाय असं नेहमी चिंताग्रस्त चेह-याने विचारत असे. मजबूर शिनेमात अमिताभच्या कानामागून घाम येतो असा शॉट आहे. ती अ‍ॅक्टींग काही बच्चनला जमतच नव्हती, तेव्हां घनःशामभा‌ईच्या घरी निर्मात्याने इंपाला कार पाठवली. मग घनःशामभा‌ईने कशी ती अ‍ॅक्टिंग बच्चनला शिकवली आणि बच्चनने कशी त्याला मिठी मारली हे किस्से ऐकताना तेव्हाच्या बाळ्याच्या भिवया वर गेलेल्या वरच राहत...

पिच्चर काढायचा तर इतका योग्य माणूस दुसरा कोण असणार ?

------------------------------------------------------------------------------------------------------------
( तर लैच फुटेज खाल्लं. थांबा वाईच ;), पिच्चर सुरू हुतंया तवा पैल्यांदा बैग्रा‌ऊंड नगं दावायला ? Wink
तर पुढचा शॉट - बाळासाहेब ढेकणे यांच्या घरी घनःशामभाय यांचं आगमन आणि चर्चेस सुरूवात )
------------------------------------------------------------------------------------------------------------

"कसं असतंय बाळूशेठ " ( बाळासाहेबांना आताशा कुणीच बाळू म्हणत नसे, पण घनःशाम पडलं मोठ्ठं व्यक्तीमत्व ! )
"पिच्चर काडणं इतकं सोप्पं नाय. पैले झुट तुम्हाला काय करायचं ते माहीत असायला पायजे "
"पिच्चरच काडायचंय आपल्याला ."
शामभायने यावर काय येडं का खुळं असा एक कटाक्ष ढेकण्याकडे टाकला..
" काय करायचं म्हंजी.. अ‍ॅक्षन, मुजिकल, फॅमिली , हॉरर, सस्पेन्स का हॉट .."
" हॉट ?"
"हा हा हा ! पैल्या झुट हॉटच !!! लैच तयारीचा गडी !!"
" हे हे हे.... कसच कसचं " बाळासाहेबांना काहीच न कळून ते काहीतरी बोलायचं म्हणून बोलले.
" हॉट बाजुला राहुंद्या. पैल्या झुट आपण धार्मिक पिच्चर बनवायचा. बजेट जास्त नसतं अन गल्ला बी जोरात ! असं दोन चार धा पिच्चर बनवलं कि मंग त्या धार्मिक पुण्या‌ईवर हॉट पिच्चर बनवायचं. असं स्टेप बाय स्टेप जायाला लागतं "
"पटलं... बजेट किती लागतं ?"
"काळजीच करायची नाय.. हिंदी पिच्चरच्या येका गाण्याच्या बजेटमधी असलं धारा बारा पिच्चर बनत्यात.. हा का ना का . एका कोप-यात खुट्टिला कॅमेरा टागला कि सासू अन सून येव्हढंच आर्टिस्ट लागत्याल."
" पन नवरा आन बाकिचं पब्लिक ?"
" त्यांना एक दिवसात उरकून घेता येतंय. कामच काय असतंय ? एक नाहीता दोन नाईटचं पैसं द्यायचं . अन बाकिचं देवदर्शन तर आपलंबी होतंय नव्हं ?"
" ते बी हाय !" घनःशामभाई बाळासाहेबांच निरीक्षण करू लागले. बाळासाहेबांच्या चेह-यावर आनंदाचे भाव दिसू लागले होते. पिच्चर निघणार याबद्दल शाम्याची खात्री झाली होती.

" शामराव , येक इचारू का "
" धा इच्चारा कि "
" नाय , राग नका ये‌ऊं द्ये‌ऊ...."
" तुमी कुटल्या पिच्चर मदी काय काम केलंया ?"
" हे राम ! हे म्हण्जी आयुष्यभर गुरामागं राबल्यावर दूध कसं काढत्यात ते इचारल्यासारकं झालं.."
"तसं नव्हं. आमाला दिसलं न्हा‌ई कुटं "
"त्रिशूल पाह्यला ? पाप को जला कर राख कर दुंगा.... झालंच तर.. आग का गोला पायले ? "
" त्रिशूल व्हय.. डोळ्याची खाचरं झालती त्यात तुम्हाला शोधून. येकदा विडियो आन्ला तवा पॉज करून करून बघितला. ते फायिट हानल्यावर तुमी पान्यात पडल्यालं त्योच शॉट न्हवं ?"
" हा हा !! "
" बसं येवडंच ?"
" बाळूशेट, कसं असतंय. पेपर वाचता न्हवं ?" समजावणीच्या सुरात शामभाई बोलले.
"त्यात मुख्य कोन असतंय लिवनार ?"
" मालक "
" अवो मालक म्हण्जी निर्माता.."
". ?????????????????????"
" कसं असतंय.. मुख्य असतु त्येला संपादक म्हंत्यात... काय म्हंत्यात ?? आंग अश्शी . आता येवड्या मोठ्या पेप्रात त्याच्या किती ला‌इनी छापत्यात ? चार दोन ...."
" तिच्यायला.. तरीबी मेन तेच व्हंय ?"
" तेच तर.. त्येला पेप्राचं समदं बगाया लागतं. स्पेलिंग मिष्टेक, टायपिंग, खिळं, पेपर, शाई, कागद, मशीन अन छपा‌ईबी. एकट्याला इतकी कामं असत्यात.. समदी जबाबदारीची. पेपर अडकला, मशीन नाय चालली, खिळं उलटंच्या सुलटं लागलं म्हंजी झाली का बोंब .. तसंच पिच्चरमधी बी असतंय. बच्चनला काय , शॉट संपला चालला...
पन कॅमेरा कसा लावायचा, क्रेन कुटली आनायची, शॉट कसा घ्यायचा हे बघना-याला अ‍ॅक्टिंगला येळ देता यील का ?"

"..............................."

"नाय ना ? तर आम्ही महत्वाची मानसं. हिरोच कधी कधी लैच गळ्यात पडतु, शामशेठ , एक शॉट तो हमारे साथ करो.. बहुत कुच सीखनेकु मिल्ता है..म्हनुन करावं लागतं बाळूशेट "

बाळुशेटला म्हटलं तर पटलं म्हटलं तर नाही. पन दुसरं नाव पण डोळ्यासमोर नव्हतं. म्हा‌ईतच नव्हतं तर काय करणार ? पण एक नक्की कि पिक्चर काढायचं नक्की होत चाललं होतं. बैठकावर बैठका होत होत्या. शामरावच्या ओळखी नाही म्हटलं तरी होत्याच. एक कुठुनसा दिग्दर्शक पकडून आणला होता त्याच्याबरोबर डिस्कशन चाललं होतं. धार्मिक अंगानं जाणारं फॆमिली पिक्चर बनवायच हे नक्की होत चाललं होतं.

दिग्दर्शक म्हणवून घेणारा इसम दिसायला अत्यंत बेरकी वाटत असला तरी फिल्म इंडस्ट्रीत असंच रहावं लागतं हे बाळासाहेबांना ठाऊक होतं. त्याचं नाव रंगराज मोहीते असलं तरी रंगातात्या या नावानेच त्यांना ओळखलं जात होतं. अनेक दिग्दर्शकांच पान त्याच्याशिवाय हलत नव्हतं हे गप्पांमधून समजलं होतं. धाकटी जाऊ या शिणेमाचं त्याने स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलं होतं पण नाव लागलं नव्हतं. अशिष्टंट म्हणून काम केल्याचे अनेक पुरावे तात्यांकडं होते. माहेरची गाडी या शिणेमाच्या रौप्यमहोत्सवाची सर्टिफिकेटं तात्यांकडं होती. मानलेली बायको हा सुपरहीट शिणेमा तर तात्यांनीच डायरेक्ट केला होता पण कुणीतरी निर्मात्याचे कान फुंकले आणि दिग्दर्शक म्हणून कुठल्यातरी प्रथितयश दिग्दर्शकाच्या नावावर पिच्चर खपवलं गेलं. इंडस्ट्रीतली धंद्याची गणितं अशीच असतात हे माहीत असल्यानं तात्यांना काहीच बोलता आलं नाही. सख्खा नवरा या शिणेमाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता पण दुर्दैवाने त्याला वितरकच मिळाले नसल्याने तात्यांच्या टॆलेंटची कदर झाली नाही ही रूखरूख त्यांना होतीच. तेव्हा संधी मिळाल्यास आख्खा महाराष्ट्र तोंडात बोटं घालेल असा शिणेमा बनवायचा अशी प्रतिञा त्यांनी केली होती ही माहिती घनंशामभाइंनी पुरवली. त्यावर आपल्या शिणेमासाठी इतका योग्य माणूस मिळणे शक्य नाही असं बाळासाहेबांना वाटून गेलं. नाव झालेल्या दिग्दर्शकांना खूप माज असतो आणि ते उगाचच अव्वाच्या सव्वा मानधन घेतात हे त्यांचं पक्क मत बनलं होतं.

घन:शामभाईंनी आणलेल्या पाचसहा ष्टो-यांची एव्हाना पारायणं झाली होती. १९८० च्या दशकातल्या मराठी शिणेमाच्या त्या ष्टो-या होत्या. प्रत्येक शिणेमात नायिकेवर संकटांचा डोंगर कोसळून नंतर ती देवदर्शनाला निघत असे. एकदा का देवदर्शन झालं कि दुष्टांना शिक्षा, सुष्टांना मेवा आणि वाट चुकलेल्यांचं हृदयपरिवर्तन असा एकजात मामला होता. ष्टोरी ऐकून झाली कि रंगातात्या डोळे मिटून नकारार्थी मान हलवत राहत. त्यानंतर खिडकीपाशी जाऊन गुटख्याची पिंक टाकून येत आणि खालचा ओठ एटीएम मशीन मधून नोट बाहेर यावी तसा बाहेर काढून नाक आणि भिवया आक्रसून नापसंती दाखवत..

पसंती नापसंतीच्या या घोळात तात्यांच म्हणणं असं पडलं कि अलिकडच्या काळात असे शिणेमे मराठीत बनणं बंद झालंय. हल्लीच्या प्रेक्षकांना पटेल, आवडेल अशी ष्टोरी आणा. यावर बराच खल होऊन बाळासाहेबांना ही सूचना अगदीच पसंत पडली. हल्लीचा प्रेक्षक म्हटला तर, सोशल नेटवर्किंग, इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यातला तरूण प्रेक्षक आपल्या शिणेमाला आला पाहीजे हे तात्यांचं म्हणणं शंभर टक्के खरं होतं. तेव्हा आता या प्रेक्षकाला आवडेल अशी ष्टोरी लिहीणारा लेखक शोधायला पाहीजे यावर एकमत झालं. तात्यांनी मग थ्री इडीयटसचं उदाहरण दिलं. आमीर खानने कसं तरूण पब्लिकला अपील होईल अशी ष्टोरी निवडली आणि कसा पिच्चर सुपरहीट झाला ते समजावून सांगितलं.

घन:शामभाई तसा मोठा हिकमती माणूस. त्याच्या सगळ्या थरात ओळखी असल्यानं त्यानं डायरेक्ट नव्या पिढीच्या भावी प्रेक्षकांना काय आवडतं याची माहिती काढायचा सपाटा लावला. त्य़ातून त्याला जी माहीती मिळाली त्याप्रमाणे हल्लीचं पब्लीक नेटवरच कथा, कादंब-या वाचतं, पिच्चर बघतं, गाणी ऐकतं आणि नेटवर कथा लिहीणारे लेखक पण उदयाला आलेले असून त्यातले काही तर लैच पॊप्युलर आहेत असं त्याला कळालं. ही माहीती मिलाल्यानंतर बाळासाहेब, तात्या आणि घन:शामभाईंनी अशी संकेतस्थळं शोधून काढली आणि सर्वात जास्त हिटस असणा-या टोकदार भाला या संकेतस्थळाकडं आपला मोर्चा वळवला.

इथं त्यांना कथा, कादंब-या, ललितं लिहीणारे बरेच लेखक सापडले. त्यातल्या पॉप्युलर असणा-या लेखकांची त्यांनी यादी बनवली , त्यातून फुकटात मिळू शकणा-या लेखकांची नावं वेचून काढली आणि टोभाच्या सदस्यांपैकी जे ओळखीचे होते त्यांच्य़ाकरवी या लेखकांचा पत्ता फोन नंबर इत्यादी माहीती त्यांनी मिळवली.

यापैकीच कुणाची तरी कथालेखक म्हणून नियुक्ती करायचा विचार नक्की झाला होता. तर आता घरी जाऊन थेट मुलाखतीचा सोपस्कार पार पाडल्यानंतर ष्टोरीच्या कामाला सुरूवात होणार होती.

-------------------------------------------------------------------------------------------------------------
तर मंडळी पुन्हा एकदा नमस्कार,

आपल्याला आठवतच असेल कि मी दळण आणायला स्कूटरवर चाललो होतो. विसरला होतात का ? हरकत नाही. दळण होईपर्यंत टाईमपास म्हणून तुमच्य़ाशी गप्पा मारत होतो. तर मंडळी आता दळण घेऊन मी घरात प्रवेश करत आहे. आता पुढे.. Wink

दुतर्फा चाळी असलेल्या त्या उखडलेल्या रस्त्यावर एक माझी खटारा स्कूटर सोडली तर बाकी सगळ्यांकडच्या नव्या को-या मोटरसायकली दिमाखात उभ्या असत. त्याआधी कित्येक वर्षे मोपेड्स आणि सायकली हेच या रस्त्याचं भूषण होतं. असं असलं तरी कोप-यावरच्या बबनशेठ बोलबच्चनची रिक्षा वगळता या चाळीने दोन चाकांपेक्षा अधिक चाकांचे वाहन अनुभवले नव्हते. नाही म्हणायला समोरच्या चाळीतल्या परब्याकडे एकदा प्रिमीअर पद्मिनीतून कुणी नातेवाईक आले होते तेव्हां तो छाती काढून चाळभर "आमच्याकडे आलेत " असं सांगत फिरत होता. ते गेले तरी परबांच्या घरचे महिनाभर तो-यातच होते. आजही त्य़ा प्रिमीअर पद्मिनीची आठवण निघतेच. त्यानंतर चारचाकी कुठलंही वाहन चाळीत आलेलं नव्हतं. सामान हलवायलाही तीन चाकी टेम्पोच येत.

गिरणीकडून येणा-या चाळीच्या दुस-या तोंडातून मी आत शिरलो खरा, पण ही गर्दी पाहून धस्सच झालं. काय झालं म्हणून पाहतो तर आमच्याच घराकडे गर्दीचं केंद्र होतं. स्कूटर निमूट पार्क करून शेट्टीच्या कट्ट्यावर चढून पाहीलं तर माझ्या घराच्या बाहेर बीएमड्ब्ल्यू कार्स उभ्या होत्या आणि हे दृश्य सवयीचं नसल्याने आजूबाजूच्या सगळ्याच चाळीची ही गर्दी उसळली होती. परबाचं सगळं कुटुंबही चेहरा पाडून उभं असल्याचं दिसलं. तिकडे लक्ष न देता मी घराकडे जाऊ लागलो पण गर्दीमुळे आत घुसणं काही शक्य होईना. दळणाची पिशवी वर धरून मुरारबाजीसारखा गर्दी भेदण्याचा प्रयत्न करताना माझे केस आणि चेहरा पांढराशुभ्र झाला होता. अशा अवतारामुळे आणि पीठ अंगावर सांडण्याच्या भीतीने एक झालं , कष्टाने का होईना रस्ता बनत होता आणि यमुनेच्या पात्रातून डोईवर कृष्णाला घेऊन चाललेल्या वासुदेवासारखा मी गोकुळात पोहोचलो.

मी आत जाणार तोच झाडू हातात घेऊन गर्दीला हटवणारी सतीसावित्री उर्फ माझी धर्मपत्नी दारात उभी राहिली. रावणाच्या लंकेत शिरणा-या हनुमानाळा रोखणा-या राक्षसिणीच्या नजरेने तिने माझ्याकडे पहात फक्त नजरेनेच आत कुठं चाललात असा प्रश्न विचारला. ती टेकू पाहत असलेल्या बीएमडब्ल्यू कारच्या चकचकीत पेंटमधे माझा चेहरा मला दिसला मात्र, माझ्या प्रवेशबंदीचं कारण मला कळालं. पापण्या, केस, मिशा यातलं पीठ झटकत सुहागरात्रीला घुंगट हटवून आपल्या मुखचंद्राचे दर्शन देणा-या नववधूप्रमाणे माझा चेहरा दाखवून मी आत प्रवेश मिळवला . पण आत घुसतानाच "एक काम नीट जमत नाही, दळण आणायला सांगितलं तर त्यात नको त्या वेळी लोळून आले , कधी नीटनेटकेपणा नाहीच अंगात " असं पुटपुटलेलं ऐकू आलं म्हणून चमकून पाहीलं तर "पहिलं मोरीत जाऊन हात पाअ धुवून नीट कपडे करा. मोठे पाहुणे आलेत आपल्याकडे " अशी दमदाटीवजा सूचना कानावर पडली.

या बाईचं नाव पाळण्यात का होईना सती असं का ठेवावंसं वाटलं हे तिच्या घरच्यांना विचारण्याचा अनेकदा झालेला मोह आत्ताही दाबून टाकून मी निमूटपणे मोरीत शिरलो. दरवाजा आणि सोफा यामधे ही उभी असल्याने आलेले पाहुणे मला आणि मी पाहुण्यांना दिसणे शक्यच नव्हतं. एखादं कापड उडत आत गेल्यासारखं वाटलं असेल जास्तीत जास्त त्यांना.

एकदाचा नीटनेटका होऊन स्वच्छ बनियन आणि भोकं नसलेली चट्ट्यापट्ट्याची विजार अशा घरगुती पोषाखात मी बसायच्या खोलीत आलो तेव्हां हिच्या चेह-यावर नापसंतीची छटा स्पष्टपणे उमटून गेली. तिची नजर माझ्या बनियन आणि विजारीचा वेध घेत होती. च्यायला हल्लीच्या अंडरवेअर्स आणि बनियान्सना ही भोकं लवकर का पडतात हे आत्ता कळालं.

हॉलमध्ये चेह-यावर कॉंग्रेसी हास्य असलेलं एक ऐसपैस व्यकिमत्त्व पांढ-याशुभ्र कडक इस्त्रीच्या खादीत बसलेलं होतं. शेजारी एक चमको व्यक्ती बसलेली होती. त्यांच्या त्या अस्तित्वाने बसण्याची खोली अगदीच अंग चोरून अवघडल्यासारखी वाटू लागली. तिला हॉल किंवा बैठकीची खोली म्हणण्याचं धाडस कधीच झालं नव्हतं. हॉल हा शब्द उच्चारायलाही टोल पडत असावा अशी आपली माझी समजूत आणि बैठकीची खोली ही ब-यापैकी मोठी असते हे चित्रपटीय ज्ञान बालपणापासून होतेच.

" अहो, हे आपल्याकडे आलेत. तुमच्यासाठी थांबून राहीलेत. त्यांचा फार खोळंबा करत नका बसू "
" असू द्या , असू द्या, आपणच का ते लेखक महाशय ? " द ग्रेट खली येणार म्हणून आवई उठवावी आणि प्रत्यक्षात गणपत पाटलाचं आगमन व्हावं असे भाव त्यांच्या चेह-यावर अगदी स्पष्ट होते आणि त्यांनीही ते लपवायचे कष्ट घेतले नव्हते.
" हो हो. पण काय काम ... माझ्याकडे... समजलो नाही " मी चाचरतच विचारलं. कथा आवडली हे सांगायला बीएमडब्ल्यू कार घेऊन कुणी घरी येईल यावर माझा विश्वास बसला नसताच. त्यातच ईमेल द्वारे तुमचं लिखाण थांबवा अशी काही धमकीचीही पत्रे येत त्यामुळे शंका घेणं स्वाभाविकच होतं.
" असं आहे.. " वाटच बघत असलेल्या त्या चमकोने संभाषणाचा ताबा घेत ओळख करून द्यायला सुरुवात केली. त्य़ावरून चमको व्यक्ती म्हणजे चित्रपटसृष्टीतलं एक बडं प्रस्थ असून त्यांचं नाव शामराव असल्याचं समजलं. शेजारचा बगळा म्हणजे बाळासाहेब ढेकणे हे लक्षात आलं. बगळ्याच्या पलिकडेही एक झब्बा आहे हे ओळख परेडमधे लक्षात आलं आणि ते म्हणजे दिग्दर्शक महाशय होते. ही मंडळी आपल्याकडेच का ? या प्रश्नाने डोक्यामधे असंख्य वादळं उठत होती. काही केल्या त्यांच्या येण्याचं प्रयोजन ध्यानात येत नव्हतं आणि मग शामरावाने हळूच तो बॉंब टाकला ज्याच्या हीट वेव्हज पडताक्षणी बाहेरच्या गर्दीला जाऊन थडकल्या आणि पंचक्रोशीत माझ्या कथेवर एक चित्रपट निघतोय ही बातमी वा-यासारखी पसरली.

मी सुन्न झालो होतो. कधीही अपेक्षा न केलेला प्रसंग आलेला होता. अशा वेळी काय बोलायचं असतं हे न समजल्याने तोंडातून फक्त बुडूख बुडूख, बुहूहू असे निरर्थक ध्वनी निघत राहीले. मग नॉर्मलला आल्यावर मी उत्सुकतेनं विचारलं " कुठल्या कथेवर चित्रपट काढावासा वाटतोय ?"
"तशा तुमच्या सगळ्याच कथा आवडल्यात. कुकूच कू, ,!, नाईट शिफ्टचा संसार, निळ्या डोळ्यांची साम्राज्ञी इत्यादी आम्ही बरंच काही वाचलं. पण पहिलं पिक्चर जरासं धार्मिक अंगाने जाणारं पाहीजे असल्यानं तुमची "पतिव्रतेची लढाई" ही कथा आम्हाला सिलेक्ट केली. तुमची काही हरकत नसेल तर आम्ही या पिक्चरची तयारी चालू करतो. तुम्हाला फक्त एका कागदावर सही करावी लागेल. "
त्यावर बगळा पुन्हा कॉंग्रेसी हास्य धारण करत " लेखकसाहेब, कागदकारवाई काय, ती तर चालत राहील हो. ते आम्ही बघून घेऊ. पण तुमची परवानगी मिळणं हाच आमच्यासाठी मोठा सन्मान आहे बघा "

या वाक्यानंतर बगळ्याने केलेल्या गडगडाटी हास्यात माझं चेपलेल्या शब्दातलं "कसचं कसचं" हे मलाच ऐकू आलं नाही. बायको दाराजवळ भिंतीला टेकून उभी असणार आणि या माणसाला बोलायला कसं जमत नाही याबद्दल दात ओठ खात असणार याबद्दल माझी पक्की खात्री होती. एक दिवस ही आतली भिंत हिच्या वजनाने पडेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नव्हती. खरं म्हणजे चित्रपटासाठी आपण लिहीलेली कथा निवडली जावी आणि त्य़ासाठी परवानगी मागायला कुणी तरी बडा माणूस घरी यावा हे सगळं कल्पनातीत होतं. परवानगीची गरजच काय असं मी म्हणून गेलो असतो पण भिंतीला आलेला फुगवटा पाहून मी ते रद्द केलं आणि शक्यतो व्यवहारज्ञान प्रदर्शित होईल अशाच संवादांवर भर देत राहिलो.

" हल्लीच माझ्या कथांसाठी काही लोक आले होते. सगळे हक्क मागत होते, पण त्याला मी तयार झालो नाही. ही कथा आवडली म्हणताय, तर करार करून टाकू " मी स्वत:वरच खूष होत व्यवहाराचं बोललो.

" काळजी नका करू लेखकसाहेब. बाळासाहेब म्हणजे शब्दाचा पक्का माणूस. " चमकोने निर्वाळा दिला.

आता पहिल्यांदाच झब्बा सावरून बसला. आपल्या बुल्गॆनिन दाढीवरून उगाचच हात फिरवत त्याने माझ्याकडे रोखून पाहीलं.
" तुमची कथा घेतोय खरी, पण जसजसं चित्रपटाचं काम पुढे जाईल तसे काही किरकोळ बदल करावे लागतील, कदाचित करावे लागणारही नाहीत आणि त्य़ासाठी तुमची संमती आवश्यक आहे. चित्रपट आणि साहीत्य या दोन्हीतला फरक आता आम्ही तुम्हाला काय सांगणार ?"

" हॉ हॉ ! ते तर आहेच. त्यात काय, जे बदल आवश्यक आहेत त्यासाठी माझी ना नसेलच "
"आपण संपर्कात राहूच. तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी, चॅटींगसाठी कुठली सेवा वापरता हे लिहून द्या. तुमच्या कथेवर चित्रपट निघतोय त्याबद्दल अभिनंदन ! "
मी मानधनाचं विचारणार होतो पण आताच ते बरं दिसलं नसतं म्हणून गप्प बसलो. पहिला चित्रपट तर निघू द्या, मग बाहेर रेट कार्ड लावावं असा सूज्ञ विचार करून मी मानधनाचा विचार गिळला.

पाहुणे जसे अचानक आले तसे अचानक निघालेही. "अहो, पोहे टाकलेत " अशी हिची आरोळी घुमेपर्यंत बीएमडब्ल्यू कार्समधे ते बसलेही !

पाहुणे गेले आणि आमच्या घराचा ताबा दोन्ही चाळीतल्या बायकांनी घेतला. मी म्हणजे जणू काही सलीम जावेद असल्यासारखा माझ्यावर प्रश्नांचा मारा होऊ लागला.

" पाहिल्यावर वाटत नाहीत हो, इतके छुपे रुस्तम असतील म्हणून .." मिस छाया सावंत म्हणाली. हिला म्हणे कुठल्याशा निर्मात्याने शाहीद कपूरची लीड हिरोईन म्हणून काम करणार का अशी ऒफर दिली होती, पण करीनाशी नुकताच ब्रेक अप झाल्याने तिला वाईट वाटेल म्हणून तिने तो रोल नाकारला होता. आजूबाजूच्या चाळीतले अनेक शाहीद, सलमान तिच्या मागे झुरत होते. अशा त्या थोर मिसने माझ्याशी लगट करायचा चालवलेला प्रयत्न पाहून ही तिच्या पुढ्यात येऊन थांबली.

" सकाळपासून आई शोधतीय तुझी, कुठं हिंडत बसतेस गं भवाने? भेटली का आई ??" असा बिनतोड सवाल टाकून हिने छायाला कटवलं. माझ्याकडे बघत " बसलात काय शुंभासारखे ? पक्याभावजींकडे जाणार होतात ना आता ? " असं विचारत मला बुचकळ्यात पाडल. मी पक्याकडे का जाणार होतो याचा विचार करत मी अंगात शर्ट चढवला आणि माझ्यामागे घरात चाळीतल्या बायकांचं राज्य राहीलं.

कमशः

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेम्स बॉन्ड Proud

(ही प्रतिक्रिया लेखावरील प्रतिक्रियेवर असल्याने ती एक प्रकारे लेखाबाबत आहे असे माझे मत स्वीकारले जाईल ही आशा आहे व त्यामुळे ही प्रतिक्रिया मी संपादीत करत नाही आहे.) - 'बेफिकीर'!

दिनेशदा | 31 October, 2012 - 14:42

छान,

( एक आगाऊ सूचना.... बाहेर पडताना AXE लावून बाहेर पडला, असतात तर !!! )<<<

ही आगाऊ सूचना अवांतर आहे असे मूळ लेखकास वाटत नसल्याने मात्र त्यावर आधारीत माझी प्रतिक्रिया अवांतर असल्याचे मी स्वतःच आधीच प्रोअ‍ॅक्टिव्हली मान्य करून स्वतःहून कोणी सांगण्याआधीच दिलगिरी व्यक्त केल्याने पण तरीही ती पुरेशी न मानली गेल्याने मी माझी मूळ प्रतिक्रिया स्वसंपादीत करत आहे.

-'बेफिकीर'!

बेफि, आगाऊ लावून नाही, आगाऊ होऊन.. बाहेर पडायचे !

( आगाऊ लावून... म्हणजे आधी मी आग लावून असे वाचले, मनी वसे ते नयनी दिसे !! )

दिनेशदा | 31 October, 2012 - 15:02
बेफि, आगाऊ लावून नाही, आगाऊ होऊन.. बाहेर पडायचे !

( आगाऊ लावून... म्हणजे आधी मी आग लावून असे वाचले, मनी वसे ते नयनी दिसे !! )<<<

या प्रतिक्रियेवर निव्वळ फिदीफिदी हासण्याचा एक स्मायली देणे हे अवांतर आहे याच्याशी सहमत. त्यामुळे माझे तसे हासणे मी स्वसंपादीत करत आहे.

जेम्स बॉण्ड - प्रयत्न करतो लवकर द्यायचा. खरंतर दिवाळी अंकासाठी द्यायचं होतं पण कामात अपूर्ण राहून गेलं. चिमुरी, झ्कासराव, आबासाहेब, अनघा, विशल्या, दिनेशदा मनापासून धन्यवाद.
उदयन - कसचं कसचं Lol

खालचा ओठ एटीएम मशीन मधून नोट बाहेर यावी तसा बाहेर काढून

कष्टाने का होईना रस्ता बनत होता आणि यमुनेच्या पात्रातून डोईवर कृष्णाला घेऊन चाललेल्या वासुदेवासारखा मी गोकुळात पोहोचलो.

एखादं कापड उडत आत गेल्यासारखं वाटलं असेल जास्तीत जास्त त्यांना.

परवानगीची गरजच काय असं मी म्हणून गेलो असतो पण भिंतीला आलेला फुगवटा पाहून मी ते रद्द केलं
>>>>>>>>>>>>> Rofl

सह्हीच लिहितोयस. पुढे वाचायची प्रचंड उत्सुकता ...... Happy

>>>>> असं असलं तरी कोप-यावरच्या बबनशेठ बोलबच्चनची रिक्षा वगळता या चाळीने दोन चाकांपेक्षा अधिक चाकांचे वाहन अनुभवले होते. >>>> 'होते' ऐवजी 'नव्हते' करायला हवं.

लेखाशी संबंधित नसलेल्या आदरणिय बेफिकीरजी यांच्या पोस्टस उडवण्यासाठी अ‍ॅडमिनना नम्र विनंती. पुढचा भाग लवकरच देईन Happy

Kiran झणझणीत | 2 November, 2012 - 10:16 नवीन
लेखाशी संबंधित नसलेल्या आदरणिय बेफिकीरजी यांच्या पोस्टस उडवण्यासाठी अ‍ॅडमिनना नम्र विनंती. पुढचा भाग लवकरच देईन <<<

हां आता कसं नांव लिहिलंत, बाकी आदरणीय वगैरे जाऊदेत. अहो तुमचे माझे एकमेकांवर इतके प्रेम आहे की नुसते विपूत म्हणाला असतात तरी मी स्वतः पोस्ट्स उडवल्या असत्या.

उडवतो पोस्ट्स, डोन्ट वरी Happy

(मी अशी विनंती कधीही करत नाही हे आपले नमूद करून ठेवतो)

-'बेफिकीर'!

बेफिकीर
लेख वाईट आहे अशी प्रतिक्रिया चालली असती मला Happy अ‍ॅडमिन या पोस्टसहीत इतर सर्व असंबद्ध पोस्टस उडवाव्यात प्लीज.

दिनेशदा | 31 October, 2012 - 14:42<<<

माझ्या सर्व अवांतर पोस्ट्सचा ट्रिगर या पोस्टमध्ये आहे असे मी म्हणणार नाही कारण दिनेश आणि किरण दोघेही मित्रच आहेत.

लेखाबद्दल -

लेख आवडला नाही असे मुळीच नाही, फक्त एकदाही हसू आले नाही आणि लेख विनोदी लेखनात असल्याने हसू येईल अशी स्वतःच्या मनात अपेक्षा ठेवलेली होती. बाकी मूळ लेखकाचे प्रतिसादपटूत्व माझ्या धाग्यांवर अनेकदा दिसल्यामुळे तेथील उदाहरणे कॉपी पेस्ट न करता माझे येथील प्रतिसाद थांबवत आहे.

-'बेफिकीर'!

बेफि
बास का. ते जशास तसं होतं. गंभीर समीक्षक, चातक वगैरेंच्या चाळ्यांना Wink बाकि काय, मला काहीच प्रॉब्लेम नाही. माझेच प्रतिसाद वाढतील. हाकानाका Lol

Pages