वांग्यांच कच्चं भरीत

Submitted by योकु on 5 December, 2011 - 08:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. २ ते ३ जांभळी, पांढरी भरताची वांगी. (फोटो लवकरच टाकेन)
२. २ पातीचे कांदे, पातीसकट बारीक चिरून
३. १ वा २ हिरवी मिरची, चिरून
४. हवा असल्यास एखादा टमाटो
५. हिरवे मटार
६. कोथिंबीर
७. तेल, मीठ, मोहरी, हवी असल्यास हळद, लाल तिखट

क्रमवार पाककृती: 

१. वांगी स्वच्छ धूवून, कोरडी करावीत. सुरीने टोचे मारून, तेलाचा हात लावून गॅसवर वा असल्यास निखार्‍यांवर भाजावीत. टमाटो घेतला असल्यास तो सुद्धा भाजावा (टोचे मारून).
२. वांगी जरा थंड झाल्यावर, साल काढावे. वांग्याला सुटलेलं पाणी सुद्धा घ्यावे. जाडसर मॅश करावे. टमाटो असेल तर, साल काढून बारीक चिरावा.
३. हे सगळं एका मोठ्या बाऊल मधे घ्यावे
४. पातीसकट बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी.
५. मटार घालावेत. मीठ घालावं. व्यवस्थित एकत्र करावं
६. आता जरा जास्त तेलाची फोडणी करावी. मोहरी, मिरच्या घालाव्यात, हवं असेल तर, हळद, लाल तिखट घालावं. ही फोडणी भरतावर ओतावी. छान कालवून घ्यावं. भरीत तयार आहे. गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर वा लोणी + बाजरीच्या भाकरीबरोबर हाणावं!

वाढणी/प्रमाण: 
भरपूर! कारण पातीचा कांदा जनरली कोणी खात नाही तो यानिमित्ताने खाल्ला जातो. थंडीतच या वांग्यांना चव असते, त्यामुळे जरूर करावं.
अधिक टिपा: 

मी कधी मुंबईत असली वांगी पाहीली नाहीत, आता आईला विचारून फोटो मागवीन आणि मग टाकीन! बहुदा पुण्यात मिळावीत... बट आय अ‍ॅम नॉट शुअर! Sad

माहितीचा स्रोत: 
आई, आजी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ नलिनी- नाही, ही ती वांगी नाहीत. ही भरली वांगी करायसाठी ची वांगी आहेत. फोटो डिलीट नको करूस कारण इतर लोकांना पण कळेल की ही 'ती' नव्हेत.

योगेश, आजच्या दोन्ही रेसिपीज ( मिरचीचा ठेचा & भरीत) एकदम यम्मी ! दोन्ही माझ्या फेवरिट आहेत.
(एकीकडे मिळमिळीत आणि गिळगिळीत ओट्स पॉरिज खाताना अशा देसी झणझणीत रेसिपीज वाचलं कि काय तळमळायला होतं. उफ्फ ! Sad )

योगेश, यातली कुठली? कि यापैकी कोणतीही? स्मोक करायची असतील तर जाड लागतील ना? म्हणजे ती काळी दिसणारी किंवा जांभळं-पांढरं डिझाइन असलेली. :कन्फ्युजड:

तेलाचा हात लावून गॅसवर वा असल्यास निखार्‍यांवर भाजावीत. टमाटो घेतला असल्यास तो सुद्धा भाजावा (टोचे मारून).
<<< 'कच्चं भरीत' टायटल जरा कनफ्युजिंग आहे. भाजून मॅश केलय म्हणजे कच्चं नाहीये :).

मी कालच आणली आहेत भरीतासाठीच. मी वेगळ्या पद्धतीने बनवते त्यात दही आणि कांदा, शेंगदाणा कुटही घालते. केल्यावर टाकेनच रेसिपी. तुमची पाकृती वेगळी आणि छानच आहे.

छान आहे.
मिनोती ने लिहिली होती (पण त्यात हिरवी वांगी होती)
आणि मुंबईत सगळ्या प्रकारची वांगी मिळतात.

काही ठिकाणी वांगी भाजून त्यात कच्चा कांदा, कोथिंबीर हि. मिरची, मीठ आणि कच्चं तेल घालून(खरं म्हणजे ओतून) खातात. तेही मस्त लागतं.

चांग्ली आहे रेसेपी. Happy वर दीपा. म्हणते तसे, वांग भाजलय म्हणजे कच्च नोहे, तेव्हा टायटल बदलले तर बरे Happy कोवळी कांद्याची पात कच्ची चांगली लागते. लसणाची पातही थोडी घालेन.. Happy

काहीवेळेला भरीत फोडणीत परतूनही केले जाते. तसे नसल्याने 'कच्चे भरीत' असे नाव दिले असावे.