८८ हे काय वय होते का जायचे ?

Submitted by किंकर on 4 December, 2011 - 00:54

८८ हे काय वय होते का जायचे ?
सर्व साधारण आयुष्यमान,वाढते वयोमान विचारात घेतले तर याचे उत्तर होय असेच आहे. पण आज हा प्रश्न ज्यांच्या जाण्याचे संदर्भात विचारला गेला आहे त्यांच्या बाबत खरेतर हे काही जाण्याचे वय नव्हते हेच खरे. आपल्या सर्वांचे लाडके आणि अनेक तरुणींच्या मनातील'कॅटबरी चव' जिवंत ठेवणारे चॉकलेट हिरो देवानंद यांचे नुकतेच निधन झाले. त्यासंदर्भात मात्र नक्कीच त्यांचे जाण्याचे वय नक्कीच झाले नव्हते.आणि म्हणूनच आपल्या मायबोलीकारांपैकी मित यांनी म्हटल्या प्रमाणे ८८ हे काय वय होते का जायचे ! हे अगदी भाव पूर्णतेने म्हटले आहे असे मनाला नक्की पटते.
खरच एखादी बातमी एखादी घटना इतकी त्रासदायक असते कि, आपले मन आपल्यालाच सतत विचारत राहते कि असे का घडले आणि हो हे आताच घडायला हवे होते का ? पण तरीही याबाबत एक त्रिकालाबाधित सत्य गदिमा त्यांच्या एका अजरामर काव्य रचनेत सांगून गेले आहेत ती ओळ इथे लागू होते ती म्हणजे ...'अतर्क्य न झाले काही जरी अकस्मात'. आणि आत्ताच येवून धडकलेली हि बातमी अतर्क्य नसली तरी अकस्मात नक्कीच आहे.
पुण्यात माझे येणे कॉलेज शिक्षण संपल्यानंतर १९८० सालातील. जगण्याची धडपड सुरु करताना सुरवातीस केलेल्या नोकऱ्या देखील थोड्या रुटीनला सोडून.राहायला कोथरूड आणि नोकरी लक्ष्मी रस्त्यावर, दुपारचे दोन तीन तास कुठे काढायचे? हा त्या काळातील प्रश्न. बस प्रवासाचा खर्च दोनदा न परवडणारा. मग काय कधी अलका टॉकीज चौकातील रिगल किंवा डेक्कन वरील लकी हि वेळ काढण्याची ठिकाणे. त्यातील लकी हे सर्वाधिक आवडीचे ठिकाण.कारण देवानंद यांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात आपला वेळ असाच लकी मध्ये चहा पीत काढला होता. पुढे लकीची आठवण ठेवत देवानंद यांनी पुन्हा एकदा लकीला लकीली भेट पण दिल्याचे पुणेकरांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या आजही स्मरणात असेल. आज लकीही नाही आणि देवानंद आपल्यात नाहीत, पण लकी आणि लकी पडण्यापूर्वी काही वर्षे तेथे असलेले देवानंद याचे हसमुख पोस्टर जसेच्या तसे डोळ्यासमोर आहे.
त्यांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने माझ्या श्री.शिरीष पिंगळे या मित्राने त्यांच्या कलागुणांचा यथोचित गौरव करणारा लेख एका इंग्रजी दैनिकात लिहल्याचे आजही स्मरणात आहे. आज चित्रपट सृष्टी आणि चित्रपट पाहणे यातील सुलभता पाहता आम्ही वयाच्या सतराव्या वर्षी पहिला चित्रपट पहिला हे वाक्य आज अनेकांना खरेही वाटणार नाही, पण हे सत्य आहे आणि सर्व प्रथम जिल्ह्याचे ठिकाणी जावून पाहिलेला माझा पहिला चित्रपट होता जॉनी मेरा नाम ... हि देव साहेबांची दुसरी आठवण.
पल भर के लिये कोई हमे प्यार कर ले ! झुठाही सही.... असे म्हणत पुढे जीवन सुरु झाले. आयुष्यात प्रेम पुजारी होता आले नाही तरी प्रेम पुजारी या चित्रपटातील ...शोखीयोमे घोला जाये फुलोंका शबाब ह्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी आजही कणभरही कमी झालेली नाही. आज अमिताभ बच्चन किंवा अमीर , शाहरुख सलमान यांची कारकीर्द सुपरहिरो किंवा शतकातील नावाजलेले कलाकार म्हणून नोंदवली जाते, तरी अशी एक खांबी इमारत उभारण्याचे काम प्रथम देवजींनी केले. राज कपूर ,
दिलीपकुमार यांची छाप असलेला काळ असून देखील आपला वेगळा ठसा जनसामान्यांच्या मनात उमटवणारे देवानंदजी कायमच लक्षात राहतील.
जर का मी आता जातोय असे सांगत निरोप घेण्याची इच्छा देवानंद यांनी व्यक्त केली असती तर त्यांचा प्रत्येक चाहता आजही म्हणाला असता कि ....
अभी न जावो छोडकर कि दिल अभी भरा नही...
आणि त्यांच्या पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीला नतमस्तक होत श्रद्धांजली वाहताना मन म्हणेल .... लेना होगा जनम तुम्हे कई कई बार

गुलमोहर: 

आम्ही वयाच्या सतराव्या वर्षी पहिला चित्रपट पहिला हे वाक्य आज अनेकांना खरेही वाटणार नाही,
------ सत्तराव्या.... असे प्रथम वाचले... लेख आवडला.

देव आनंद - Sad

देव आनंद चिरतरूण होते. त्यांच्या सिनेमातील गाणी दूरदर्शनवर बघताना खूप आनंद मिळतो. त्यांच्या सिनेमातील संगीत हे खास असायचं.

जिंदगी का साथ छोड़ गए देव साहब

असा सार्थ मथळा दिलाय नवभारत टाइम्स ने वेबसाईट च्या पहिल्याच हेडलाईन मधे !!

सकाळी बातमी बघताना डोळे पाणावले. खरंतर अशा सेलीब्रेटिइजच्या जाण्याने वाईट वाटतं पण इतकं कधीच वाटलं नव्हतं. मी देव आनंदची जबरदस्त फॅन. आपल्याच इमेजवर इतकं प्रेम करणारा माणूस. नविन पिढी आपली थट्टा करते हे माहित असूनदेखील त्या पिढीच्या उत्साहाच्या शंभरपट उत्साहाने चित्रपट निर्मिती करणारा देव आनंद.

तिकडे वरती स्वर्गात हिरवाई झाली असेल आता.. शम्मी... देव.. एव्हरग्रीन आणि रोमान्सचे बादशहा. Happy

किंकर, आज सकाळीच, रंगोली, आणि त्यावरुन देव आनंद यांची आठवण झाली आणि ही बातमी कळली. फार वाईट वाटलं. आधी, शम्मी कपूर, आता देव आनंद Sad
लेना होगा जनम तुम्हे कई कई बार>>>>अगदी खर. हेच माझ्याही मनात आलं.

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने खरच मन भारावून गेले. एकेरी उल्लेख ... खरेतर काही बिघडले नसते पण मन धजावले नाही हेच खरे.पण फारएण्ड, नंद्या गैरसमज ठेवू नये.
उदय,सुजा,अनिताताई,उमा जोशी,श्रीकांत, नंदिनी,शोभा १२३, आपण व्यक्त केलेल्या भावनांशी पूर्ण सहमत. देवजींना परत एकदा सलाम.

देव आनंद यांच्या कांही बहारदार भूमिकांमुळे ते नेहमी स्मरणात राहतीलच. पण " मला जें करण्यात खरा आनंद मिळतो, तें मी आयुष्याच्या शेवटपर्यंत मनापासून करतच रहाणार; लोक हंसले तरी मला त्याची पर्वा नाही ", हा आपल्या आचरणातून त्यानी दिलेला संदेशही मौलिक आहे.
दुसरं, सुरैय्या ग्रेगरी पेकची फॅन होती म्हणून त्यालाच बरोबर घेऊन अचानक तिच्या दारात उभं रहाणं व तिला आनंदाश्चर्याचा धक्का देणं, या देवसाहेबांबद्दलच्या किश्श्यामुळें मला ते अधिकच आवडायला लागले.
त्याना मनःपूर्वक श्रद्धांजली.

भाऊ नमसकर, के.अंजली,धन्यवाद!
अंजली_१२- देवानंद - पंजाबमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यात २६ सप्टेंबर १९२३ रोजी जन्मलेल्या देव आनंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते धरम देव आनंद असे नाव असणाऱ्या या कलाकारास चेतन आनंद आणि विजय आनंद असे दोन भाऊ व शीला कांता कपूर हि बहिण असा परिवार असून,अभिनेत्री कल्पना कार्तिक मूळ नाव मोना सिंग ह्या त्यांच्या पत्नी होत.त्यांच्या मुलाचे नाव सुनील आनंद असून मृत्यू समयी ते देव साहेब यांच्या जवळ होते.
जिप्सी- शीर्षकाचे श्रेय अर्थात मित यांचे.
प्रज्ञा १२३ - धन्यवाद!

सकाळी जेव्हां भरत मयेकरांनी ही बातमी दिली तेव्हा पहिली उस्फूर्त प्रतिक्रिया होती ... अरेरे !

पण खरं तर वाईट असं वाटलं नाही. एका युगाचा अस्त झाला म्हणून तशी प्रतिक्रिया दिली गेली. देवने आयुष्य पुरेपूर कसं जगावं याचा वस्तुपाठ घालून दिला. मृत्यूने देखील अलगदच आपल्या बाहुपाशात घेतलेलं दिसतंय. त्याचं जगणंही सुंदर आणि मृत्यूही !

काल " अभी न जाओ छोडकर " हा लेख लिहायला घेतला होता, पण हा लेख पाहील्यानंतर एकाच विषयावर दोन धागे नकोत म्हणून स्थगित केला Happy ... पुढे मागे केव्हांतरी !

खरच तरुणांना लाजवणारी उर्जा होती त्या माणसामध्ये...त्यांचे वय ८८ होते, हे त्यांच्या निधनाच्या बातमीतून कळले. कधी त्यांच्या वयाचा विचारच मनात आला नाही. सुंदर लेख....अतिशय आवडला...

खूप छान आणि संयमित लेख लिहिलाय.

‘आय ऍम स्टील यंग.. जीवन ही माझी प्रेयसी आहे आणि माझा जीवनाशी रोमान्स अजून सुरूच आहे’, असे देव आनंद नेहमी म्हणत.

रुपेरी पडद्यावरचा आद्य ‘प्रेमी’ देवदत्त पिशोरीमल आनंद अर्थात देव आनंद यांना प्रणाम..

चैतन्यमय व्यक्ति..... आयुष्याच्या अखेरपर्यंत कामात गुंतलेला माणूस.
जाताना तो कदाचित असं म्हणाला असेल का ???

(ऐ कुदरत,) (यहाँ) "कैद माँगी थी रिहाई तो नहीं माँगी थी"

लकी मधला फोटो फारच छान होता! तिथे चहा घेत टाईमपास करत बसायला छान वाटायचं.
आता लकीही नाही आणि देव आनंदही नाही.

सखुबाई,@mit - माहिती अद्ययावत केलीत.धन्यवाद.
किरण्यके- आपण आपली लेख रुपी आदरांजली वाहिली असतीत तर बरे वाटले असते. विषय एकच असला तरी भावना व्यक्त होताना वेगळे विचार पुढे येतात.
सावली, राजनदेशपांडे, जो_एस,वेताळ_२५,उल्हास भिडे,विशाल कुलकर्णी, ऋयाम - आपण व्यक्त केलेल्या भावनांशी पूर्णतः सहमत.
रावी - धन्यवाद!