अनपेक्षीत

Submitted by कवठीचाफा on 3 December, 2011 - 19:05

तशी ती रात्र काही खास वगैरे नव्हतीच रामजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असलेल्या त्या इमारतीत तरी नक्कीच नाही. तेच रोजचेच थकलेले, कण्हणारे पेशंट, जनरल वॉर्डची जी दशा सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये दिसते तशीच.
नेहमीच्या प्रघाताप्रमाणे निवासी डॉक्टर राणेंसोबत चार इंटर्न्स , शिकाऊ डॉक्टर्स आजच्या रात्री उपस्थित होते.
काम तसं काहीही नव्हतंच, निवासी डॉक्टर राणे नुकतेच त्यांचा राउंड संपवून परत गेले होते. नुसतंच पेशंटकडे नजर टाकणं, मध्येच एखाद्या पेशंटच्या पायथ्याशी असणार्‍या त्याच्या कंडिशन आणि ट्रीटमेंटचा चार्ट नजरेखालून घालणं असंच नेहमीच्या सरावलेल्या यांत्रिक पद्धतीनं आपला राउंड संपवून ते गेले होते.

मथुरेश पंजवाणी, निखिल बेडेकर, श्रीकांत चित्रे आणि सलिल मुखर्जी असे चौघेजण आज रात्रपाळीला आलेले होते. आता पंजवाणी आणि मुखर्जी नावाने जरी महाराष्ट्रीयन वाटत नसले तरी जन्मानं होते, त्यामुळे त्यांच्या कडून अपेक्षित असलेले सिंधी आणि बंगाली टोन त्यांच्या मराठी बोलण्यात किंचितही डोकावत नसत. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला एकत्रच असल्याने मैत्रीही चांगलीच जमलेली होती.

एखाद्या कंपनीतली रात्रपाळी आणि हॉस्पिटलमधली रात्रपाळी यात बराच फरक असतो. आता सरावाने तो जाणवेनासा होतो हे खरंय, पण या चौघांकडे अजून या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी बराच वेळ होता.
शिकाऊ डॉक्टरांना केबीन वगैरे देण्याचा प्रघात अजून तरी सुरू झालेला नसल्यानं सगळाच वेळ एकतर बाहेर वॉर्डमध्ये किंवा आत कपडे बदलण्याच्या खोलीत काढावा लागायचा. त्यापेक्षा शिकाऊ डॉक्टरांची जास्त पसंतीची जागा एकच, जनरल वॉर्डच्या एका बाजूला असलेलं लहानसं नर्सिंग स्टेशन. या लहानशा खोलीला हे नांव का दिलं गेलं हे कुणालाच सांगता आलं नसतं पण एकूणच सगळ्यांच्याच तोंडात ते नांव पक्कं बसलं होतं. तिथे असलेल्या पाच-सहा खुर्च्या, एक स्वयंपाकघराला असतो तसा असलेला कट्टा, तिथे गॅसही होता, वेळी अवेळी गरज पडणारं गरम पाणी करण्यासाठी आणि बहुतेक वेळा रात्रपाळीला असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेस ना चहा करण्यासाठीसुद्धा त्याचा वापर व्हायचा. या सगळ्यासाठी लागणारं साहित्य बाजूच्या काचेचे दरवाजे असलेल्या लाकडी कपाटात व्यवस्थित ठेवलेलं असे आणि ते तसं राहावं म्हणून सगळेच काळजी घ्यायचे, कारण रात्रपाळी कुणालाच चुकणार नव्हती.
डॉक्टर राणे असेपर्यंत चौघांच्यात असलेली जी प्रासंगिक शांतता होती ती डॉक्टर राण्यांसोबतच निघून गेली. आणि नेहमीच्या हास्यविनोदाची सुरवात झाली अर्थात ती नर्सिंग स्टेशनच्या भिंतींच्या आतच. आळीपाळीने एखादी चक्कर वॉर्डमध्ये टाकणे या पलीकडे काहीच काम म्हणून नव्हतं. हॉस्पिटलच्या नवीन नियमानुसार रात्रपाळीला एकही नर्स नसायची एकच वॉर्डबॉय जो बहुतेक वेळा वॉर्डच्या शेवटच्या टोकाला ठेवलेल्या बाकावर आडवा पडलेला असायचा. त्याची फारशी गरजही नव्हती कारण जास्त काळजी घ्यावी लागतील असे पेशंट जनरल वॉर्डमध्ये कधीच नसायचे. साहजिकच टेन्शन नावाचा प्रकार नव्हता.

" चल बे मथ्थ्या, सो जायेंगे " आळस देत श्री म्हणाला.
" तुला झोपायचं तर झोप, साला इथे असल्या वासात आपल्याला झोप नाय यायची." हॉस्पिटलमध्ये जो स्पिरिटचा वास पसरलेला असतो त्याला सगळेचजण सुरुवातीला नावं ठेवतात मथुरेश पंजवाणी अपवाद कसा असणार ?
" काय रे, श्री तुला झोपायला पार्टनर लागतो ? बहुत दोस्तांना लगता है " हात विचकत निखिल म्हणाला. यावर एक हलकीशी हास्याची लाट तिथे उसळली.
" माझं ठीकाय रे, मला झोपायला पार्टनर लागतो पण तुला तर साल्या आता धार मारायला जायची तरी पार्टनर लागेल." श्री ने आपली बाजू सावरायचा प्रयत्न केला.
" हळू हसा रे ! उगीच पेशंटना डिस्टर्ब करू नका " पुस्तकात खुपसलेलं डोकं वर घेत सलिल मुखर्जी म्हणाला. त्याचं असंच होतं रोजच सुरुवातीला तो त्यांच्यापेक्षा वेगळं असल्याचा आव आणायचा आणि थोड्यावेळाने त्यांच्यातलाच एक होऊन जायचा त्यामुळे कुणीच मनावर घेतलं नाही. गप्पा आणि हशा त्याच पट्टीत चालू राहिल्या.
मध्यंतरी किती वेळ गेला हे पाहायचे कष्ट कुणीच घेतले नाहीत. घड्याळाच्या काट्याने एव्हाना लहान मोठा असे दोन्ही हात दोन दिशांना पसरले. डॉक्टर राणे आता परत राउंडला येणार नाहीत याची चौघांनाही खात्री झाली.

" ए, बोअर झालो यार चला एक डाव टाकू." निखिलने कपाटावर घडी घालून ठेवलेला बुद्धिबळाचा पट काढून म्हटलं
" चेस नको यार, कुणीतरी दोघंच खेळत राहणार आणि बाकी दोघं पाहतं राहणार यात कसली मजा ?" पंजवाणीने नकाराचा सुर लावला.
" खरंच यार, आपण चेस खेळणार आणि बघत बसलेला हा मथ्थ्या मध्येच चाली सांगून कुणालाच धड खेळून देणार नाही" नेहमीचीच तक्रार मांडत मुखर्जी म्हणाला.
एका अर्थी त्याचंही बरोबर होतं बुद्धिबळ हा असा खेळ आहे की खेळणार्‍यापेक्षा जास्त तो पहाणार्‍यालाच कळतो आणि मग उगीचच चाली सांगितल्या जाऊन खेळातली मजा जाते.
" अबे, हा चेसबोर्ड आणून ठेवलायस तर एखादा कॅट का आणला नाहीस ? चौघे तरी खेळलो असतो " श्री ने हळहळ मांडली.
" काय खेळलो असतो ? पाच पैसे पॉंईंट ? " पंजवाणीने असं विचारताच बाकीच्या दोघांनीही दात काढले.
" साला श्री , तुला तुझ्या आईबापानं काय जुगारात जिंकला होता काय रे " पंजवाणीला आणखी उकळ्या फुटल्या.
" रड्या, जुगार खेळायलाही काळीज लागतं लल्लू-पंजूचा खेळ नाय तो " श्री ने पंजवाणीची खेचली.
" मरू दे रे ते चेस आणि कार्डस काही तरी हटके करू यार " मुखर्जीने आपलं घोडं दामटवलं.
" आता काय पेशंटच्या कॉटखाली शिरून लपाछपी खेळायची का ? " निखिलनं टिप्पणी केली.
" निखल्या, असले फालतू जोक मारण्यापेक्षा एखादा राउंड मारून ये की वॉर्डमध्ये" श्री नं दरडावलं नाहीतरी एव्हाना एखादा राउंड व्हायलाच हवा होता.
मग बरेच दोषारोप झाल्यावर श्री स्वतःच राउंड मारायला निघून गेला.
मग विषय असेच मेडिकल कॉलेजचे दिवस कॉलेज मधल्या मुली यांच्यावर रेंगाळत राहिले. कुणाची किती अफेअर्स झाली यांचे हिशेब सुरू झाले. यातही तसा बर्‍यापैकी वेळ गेला असावा. कारण श्री एव्हाना राउंड संपवून परत आला होता.
" काय श्री राउंड पुरा केला ना ? की इथेच दारात थांबला होतास ?" खिदळतच निखिलनं विचारलं.
" आयला, जिवंत माणसांनी भरलेला वॉर्ड आहे हा मोर्ग नाही घाबरायला " श्री नाही म्हटलं तरी वैतागलाच.
" हो रे , आता असलेली माणसं जिवंतच आहेत पण आधी कितीतरी माणसं इथेच दगावलीत त्यांचं काय ?"
" असतील ती पण इथेच पण त्यांना तपासायची मला गरज नाही ना ! " श्री ने प्रतीटोला मारला.
" एय, गप करा रे , असल्या गोष्टी आता करायची काही गरज आहे का ?" पंजवाणी चिरकला.
" च्यायला, हा मथ्थ्या बघ, लेका तू उद्याचा डॉक्टर ना ? असला टरकू असून कसं चालेल ? " मुखर्जीला जोर आला
" डॉक्टर असण्याचा आणि भिती वाटण्याचा काय संबंध ? " पंजवाणीला खरंच प्रश्न पडला.
" नाही, म्हणजे एखाद्या गचकलेल्या पेशंटचा आत्मा आलाच विचारायला तुला तर तुझ्या पँटचा रंग बदलेल ना ! "
यावर सगळेच खिदळले.
" ए तू गप हां " पंजवाणी यापुढे आणखी काहीच बोलू शकला नाही.
" कूल रे मथ्थ्या, हे भूत बीत काही नसतं" श्री ने समजूत काढली.
" भूत नसेल पण आत्मा तर असतो की नाही " निखिलनं कुशंका काढली.
" आत्मा असतोच याला काही खात्रीलायक पुरावा आहे का ? " श्री ने विचारणा केली.
" अरे ? मग माणसाच्या शरीराची इतकी मोठी गुंतागुंतीची यंत्रणा चालवतं कोण ? " मुखर्जीनं मुद्दा उपस्थित केला.
" ओह, कमॉन मुखर्जी, एक मेडिकल स्टुडंट असून असली विधानं करतोस ? "
" अरे, याचा आणि मेडिकल स्टुडंट असण्याचाच संबंध काय ? " मुखर्जी करवादला
" तुला माहीताय ऑक्सिजन, ब्लड, ग्लूकोज यावर शरीर चालतं ते " अर्थात श्री ने थोडक्यात सांगितलेला हा फॉर्म्युला होता पण बर्‍यापैकी प्रसिद्ध होता हे खरं.
" अरे पण त्यांचं काम सुरळीत कोण ठेवत ? "
" अर्थातच ह्दय, बावळट मुद्दे काढू नको मुखर्ज्या "
" हार्ट ला पंपींग पॉवर कुठून मिळते ? आता यावर ऑक्सिजन असं मूर्ख उत्तर देऊ नको " मुखर्जी ऐकायला तयार नव्हता.
" या पलीकडे काय उत्तर देणार तुलाही माहीताय की टिशूजच्या लाईफ सायकलबद्दल, एखाद्या कॉम्प्युटरला फीड केल्यासारखी प्रोसेस आहे रे ती "
" पण मग या कॉम्प्युटरला प्रोग्रॅम कोण करत ? "
" मुर्खा, जेव्हा पहिली टिश्यु तयार होते तिथूनच हे सुरू होतं जेनेटीकल आहे की हे "
" असेल तरी मला सांग आजवर इतकं संशोधन झालं तरी आपण शरीराबाहेर एखादा सब्जेक्ट का वाढवू शकत नाही ? सगळी सर्क्युलेशन मशीन्स आपल्याकडे आहेत तरी " मुखर्जीनं नवाच मुद्दा उपस्थित केला.
" हे बघ हे सगळे वेगळे इश्यू आहेत तू मुद्दा सोडू नको "
" ठीक आहे, मग मला सांग मन नावाचा अवयव आहे का रे शरीरात ? " मुखर्जी आणि श्रीकांतच्या वादात आता निखिलने भाग घेतला.
" नाही, पण हे प्रुव्हन आहे की मन म्हणजे मेंदूची विचार करण्याची सिस्टम किंवा जागा, म्हणजे मन आणि मेंदू हे वेगळे नाहीत "
" म्हणजे तुला म्हणायचेय की आपल्या भगवतगीतेतही चुकीची माहिती दिलेय ? " निखिल उसळला.
" माहिती चुकीची नसेल आपण कदाचित समजण्यात चूक करत असू "
" चल बाकी सोड, पण एक सांग शरीरात ऊर्जा असते जी शरीर चालवण्यासाठी वापरली जाते हे नक्की "
" अर्थात "
" मग मला सांग माणूस मेला की शरीरक्रीया बंद होतात मग ही ऊर्जा जाते कुठे ? लॉ ऑफ एनर्जी कंझर्वेशन हा मुद्दा विचारात घे. ऊर्जा जर अक्षय आहे तर मेलेल्या शरीरातली ही ऊर्जा जाते कुठे ? "
निखिलच्या या मुद्द्यावर नाही म्हटलं तरी श्री विचारात पडला.
" पण इथे चर्चा चाललेय ती आत्म्याची एनर्जीची नाही " आपलं घोडं दामटत श्री म्हणाला.
" त्याच एनर्जीला लोक आत्मा म्हणत असले तर ? " मुद्दा योग्य होता.
" तसं असेल तर आत्मे असतात ? "
" असायलाच हवेत "
" आत्म्याचं अस्तित्व जाणवत असेल असं एखादं तरी उदाहरण देऊ शकशील ? ते ऐकीव नको अनुभवलेलं किंवा सायंटीफीकली मान्य असायला हवं "
" प्लँचेट ? हे तर जगभरात मान्य असलेलं उदाहरण आहे की "
" असेल पण मी नाही मानत, त्यातही काहीतरी ढोंगीपणा आहे हे कित्येकदा सिद्ध झालंच आहे की "
" पण तरीही शंभरटक्के खात्रीनं कुणीच त्याला चूक म्हणत नाही "
" नसेल, पण मी आजवर अनुभवच घेतला नाही तर विश्वास तरी का ठेवावा ? "
" मग बघ करून कधीतरी आणि घे अनुभव " निखिलनं निर्णायक फटका हाणला.
काही वेळ शांतता तशीच अभंग राहिली पण ती भंग झाली ती श्रीच्याच आवाजाने.
" कधीतरी का ? आताच करूया की " श्रीच्या वाक्यानं पुन्हा एकदा चुळबुळती शांतता प्रस्थापित झाली. चुळबुळती याचसाठी की आतापर्यंत चाललेला वाद गप्प बसून ऐकणार्‍या पंजवाणीला अस्वस्थ वाटायला लागलं त्यामुळे त्याची चुळबूळ सुरू झाली.
" ए, नाय हॉ नाय, हे असलं काही करायचं नाही " श्री ला थियरीवरून प्रॅक्टिकलवर घसरताना पाहून पंजवाणी कळवळलाच.
" तू गप रे मथ्थ्या, बोल निखिल करायचं प्लँचेट ? आपण चौघं आहोत इथे प्लँचेटसाठी इतके बस ना ! "
" अरे ए भाऊ निखिल, तू तरी ऐक ना त्याचा, त्याची सटकलेय " पंजवाणीनं निखिलला समजवायचा प्रयत्न केला.
" चालेल चौघे बस झाले पण प्लँचेटसाठी लागणारं साहित्य ? ते कुठाय ? " निखिलनं `चालेल' म्हटल्यावर रोखून धरलेला श्वास पंजवाणीने साहित्याबद्दल ऐकल्यावर सोडला.
" मला वाटलंच तू माघार घेणार, तुझं प्लँचेट जर खरं असेल तर त्याला काय लाकडाचं प्लँचेट टेबलच हवं काय ? बाहेरच्या स्टीलच्या स्ट्रेचरवर ते होणार नाही ? असले मुद्दे मांडून तुम्ही लोक पळ काढता. " श्री अजूनही हेका सोडायला तयार नव्हता.
" पण बाकी साहित्य ? "
" काय बाकी ? तो औजा की कुठलातरी बोर्ड तोच ना ? इथे रबरशीट पडलंय त्यावर लिहू की ए ते झेड अक्षरं आणि नंबर्स, एक वाटी लागेल ती साखरेच्या डब्यात नक्की मिळेल आहे तयारी ? "
" माझी काहीच हरकत नाही " निखिल म्हणाला.
" ए बॉ, हरकत नाही कशी माझी आहे ना हरकत मी नाही करणार असलं काही " पंजवाणी जोरदार निषेध करण्याच्या आविर्भावात चिरकलेल्या आवाजात म्हणाला.
" तुला नसेल झेपणार तर तू बाहेर जा, टेक्निकली रूममध्ये हजर प्रत्येक व्यक्ती प्लँचेटमधे सामील असावी लागते" श्री ने पंजवाणीला झटकला.
" ए भाई मुखर्जी तू तरी काही बोल, हे येडे कायपण करतायत " गंमत बघत बसलेल्या मुखर्जीला पंजवाणीने गळ घातली. मुखर्जीचं काळीज असल्या फालतू गोष्टींनी थरकापणारं नव्हतं.
" मथ्थ्या मी प्लँचेट करणार तुला हवं तर तू बाहेर जा "
पंजवाणीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली, इथे थांबावं तर यांचा काहीतरी भयानक करायचा प्रयत्न चाललेला, बाहेर जावं तर तिकडे मंद उजेडात पांढर्‍या कपड्यात बिछान्यात कूस बदलणार्‍या पेशंटची हालचाल बघावी लागणार. वॉर्डबॉयला हाक मारावी तर तो नवटाक मारूनच त्या बाकड्यावर पडला असणार त्याचा काय भरवसा ? एक तर असली मध्यरात्रीची वेळ, त्यांतून हॉस्पिटलची इमारत वस्तीच्या बाजूला शांतता मिळावी म्हणून बांधलेली, जवळच `मोर्गची' कोल्डरूम. वॉर्डचे दरवाजे जरी बंद असले तरी उघड्या खिडकीतून दिसणारी ....... नकोच तास -दोनतास बाहेर राहण्यापेक्षा आतच राहिलेलं बरं नाहीतरी तो निखिल म्हणतोय तसं या लोकांकडे औजाबोर्ड वगैरे नाहीच आहे तर यांचा प्रयत्न फसण्याचीच शक्यता जास्त. त्यातून जर यांचा प्रयत्न फसला आणि आपण बाहेर राहिलो तर उद्यापासून आपली होणारी टिंगल ? .........
पंजवाणीला त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घ्यावा लागला.
इकडे पंजवाणीला निर्णय घ्यायला जितका वेळ लागला तेवढ्या वेळात उरलेल्या तिघांनी साहित्याची जमवाजमव सुरू केली होती.

कठीण वाटत असलं तरी बाहेरचं स्टीलचं स्ट्रेचर ओढाताण करून नर्सिंग स्टेशनवर आणलं गेलं. तेवढ्यावेळात श्री ने रबरशीटवर औजा बोर्ड तयार केला. साखरेच्या डब्यातली वाटी बाहेर काढून ठेवली. सगळ्यांनी मिळून रबरशीट स्ट्रेचरवर अंथरलं, आजूबाजूच्या खुर्च्या सरकवल्या. खर्‍या कसोटीची वेळ आता आली होती.

" तयारी तर झाली पण आता पुढे काय करायचं ? " मुखर्जीचा प्रश्न तसा योग्यच होता, या पैकी कुणाकडेच प्लँचेटचा अनुभव नव्हता.
" आता काय ? जसं ऐकलं वाचलं तसंच प्रत्येकानं आपापलं बोट वाटीवर ठेवायचं आणि आत्म्याला आवाहन करायचं" श्री नं सरळच मुद्दा मांडला.
" ते ठिकाय, पण बोलवायचं कुणाला ?" म्हटलं तर निखिलही रास्तच बोलला.
" कुणालाही मृत व्यक्तीला, पण हो आपल्या जवळची हवी म्हणजे खात्री पटवायला बरी " श्री नं बाजू मांडली.
" अरे पण आपल्यापैकी कुणाचं जवळचं माणूस इतक्यात गेलंय " एरव्ही निखिल `गेलंय' ऐवजी `गचकलय' म्हणाला असता.
" मथ्थ्या तुझे आजोबा गेले ना रे मागच्याच महिन्यात ?" श्री चा प्रश्न.
" होय, प..पण त्यांना नका रे बोलावू " पंजवाणीचं भित्रं उत्तर.
" त्याला पर्याय नाही मथ्थ्या, दुसर्‍या कुणाचंच कुणी गेलं नाहीये इतक्यात "
" अरे तरी पण... "
" नाव काय रे त्यांचं कांतीलाल ना ! " थेट निर्णयच घेतला श्री नं .
" ... "
" मला माहीताय कांतीलालच, चला रे बोट ठेवा वाटीवर " वाटी बोर्डवरच्या स्टार्टच्या वर्तुळात उपडी ठेवत श्री नं हुकूम सोडला.
" आणि एक, नाव मनापासून घेत राहायचं आणि मुख्य म्हणजे काहीही झालं तरी वाटीवरचं बोट काढायचं नाही कळलं " पुस्ती जोडत श्री नं योग्य वाटतील त्या सूचना दिल्या.
एव्हाना प्रत्येकाच्याच मनात थोडासा का होईना भितीनं शिरकाव केला होताच, पण आता मागे हटणं शक्य नव्हतं त्यामुळेच पुढच्या हालचाली चालू होत्या.
एक एक बोट हळूच त्या वाटीवर ठेवल्या जायला लागलं, पहिलं बोट अर्थातच श्री चं होतं, त्याच्या बोटाला किंचित कंप सुटलेला दिसत होता कदाचित तो पुढच्या उत्सुकतेमुळेही असेल. मग हळूहळू बाकीची आणि सगळ्यात शेवटी अर्थातच पंजवाणीचं बोट त्यात सामीलं झालं.

काही सेकंद दाट शांतता पसरलेली आणि नंतर श्री नं घनगंभीर आवाजात कांतीलाल नावाचा जप सुरू केला, डोळ्यांच्या हालचालीनं बाकीच्यांनाही त्यात सामील व्ह्यायला भाग पाडलं
त्या तसल्या रात्री सारं जग गाढ झोपेत असताना इकडे रावजी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डच्या कोपर्‍यातल्या त्या लहानश्या खोलीत ते प्लँचेट सुरू झालं.
सुरुवातीला चौघांच्याही उच्चारात बराच फरक जाणवत होता स्वर मागे पुढे होतं होते. पंजवाणीची मनापासून इच्छा होती की त्याच्या आजोबांनी तिथे येऊ नये म्हणून तो तर सरळसरळ नाटक करत होता, पण जसा जसा वेळ सरकायला लागला तसा त्यांच्या उच्चारात ताल आला सगळ्यांचेच स्वर एकाच लयीत यायला लागले. बराचवेळ एकच उच्चार करत राहिलं तर असं होतंच अगदी देवाचा जप करतानाही पाहिल्याच मण्यापासून कुणाचीच समाधी लागत नाही पण १०८ व्या मण्यापर्यंत ती चांगलीच लागते.

वेळ सरकत चालला एकसुरीपणात तेच तेच उच्चारून घशाला कोरड पडल्याची भावना व्हायला लागली. सगळ्यांच्याच मनात एव्हाना प्रयोग फसल्याची भावना यायला लागली. निखिल ती शब्दात मांडणार इतक्यात काहीतरी घडल्याची जाणीव आधी हाताच्या बोटांना आणि मग मनाला झाली. नकळतच सगळ्यांचंच अंग शहारलं.
मघापासून बोट धरून ठेवलेल्या वाटीखाली काहीतरी होतं वाटी एका बाजूला ओढ बसल्यासारखी सरकू पाहतं होती. चमकून सगळ्यांनीच एकमेकांकडे पाहिलं आणि बाकीच्यांनाही तीच जाणीव होतेय हे जाणवताच प्रत्येकाच्याच मणक्यातून शीरशिरी गेली.
लवकर सावरला तो श्री ..
" कांतीलाल ? तुम्हीच आहात का ? होय किंवा नाही उत्तर द्या " शांततेत अचानक आलेल्या श्री च्या आवाजानं नाही म्हटलं तरी बाकीच्यांना दचकवलंच उगीचच दिवे मंद होऊन पुन्हा प्रखर झाल्याची भावना मनात येऊन गेली.
श्री च्या प्रश्नावर काही सेकंद गेले असतील, चौघांच्याही बोटांना ती ओढ जाणवली, वाटी सावकाशपणे YES कडे सरकत होती.
पुन्हा ती स्टार्टवर आल्यावर श्री ने खात्री करून घेण्यासाठी विचारून टाकलं.
" तसं असेल तर तुमचं पूर्णं नांव सांगा, आणि इथे असलेल्या तुमच्या नातवाचं नाव सांगा "
यावेळी बोटांना जाणवलेली ओढ जोरदार होती, ती वाटी वेग जाणवेल इतक्या वेगात अक्षरांवर फिरत होती. एक एक अक्षर मिळून शब्द तयार होत होता. शेवटचा मथुरेश हा शब्द तयार होईपर्यंत पंजवाणीच्या चेहर्‍यावर घाम साचला होता. एव्हाना त्याचा चेहरा चांगलाच पांढरा पडला होता.
" याचा अर्थ आपल्या हाकेला प्रतिसाद आला आहे, योग्य ती व्यक्तीच आपल्यासमोर आहे, विचारा प्रश्न विचारायचे ते " श्री सगळ्यांना उद्देशून असं बर्‍याच वेळानं म्हणाला.
यावर खरंतर श्री ची खात्री पटवण्याचं निखिलच उद्दिष्ट पूर्णं झालं होतं, पण तो ही इतक्या आत्यंतिक रोमांचित अवस्थेत होता की त्याला ते लक्षातही आलं नाही. निखीलनं, मुखर्जीनं श्री नं जमतील तसे प्रश्न विचारून टाकले आणि त्यांची बरोबर येणारी उत्तरं पाहून चकित होत राहिले.
" अरे आत्म्यांना भविष्यात डोकावता येतं म्हणे चला त्यांना भविष्य विचारून पाहू" मुखर्जीला प्रयोगात आणखी रस आला.
मग सुरू झाले भविष्य जाणून घेण्याचे प्रयत्न. मी पास होणार का ? माझं क्लिनिक चालणार का ? एक ना अनेक बर्‍याच प्रश्नांचा भडिमार तिथे झाला, मघाच्या तणावाचा एक शतांश हिस्साही आता जाणवत नव्हता अर्थात यात पंजवाणीला गृहीत धरलं नाही तरच कारण मघापासूनच त्यानं हा प्रकार संपवण्यासाठी विनवण्या चालू ठेवलेल्या होत्या.
समोरच्या वाटीखाली असलेल्या कांतीलाल अर्थात जर तेच असतील तर त्यांनी आताच्या काही प्रश्नांची उत्तरं ठीक दिली पण नंतर मात्र त्या वाटीचा वेग मंदावला एका क्षणी तर वाटी `येस' `नो' चा रस्ता सोडून बाजूला वळली आणि काही अक्षरावरून भराभर फिरायला लागली.

S......O........M.........E..........O...........N.........E.............H..........A...........V...........E..........T............O..............D..............I.............E.....
सुरुवातीच्या एखाद्या खेपेला त्यांची अक्षरातून शब्द बनवण्यात गल्लत झाली, पण जेव्हा त्यांना त्या अक्षरांचा खरा अर्थ लागला तेव्हा मात्र प्रत्येकाच्याच घशाला खरोखरची कोरड पडली. नक्की अर्थ काय घ्यावा याचा ?
मघापासून मनातून बाजूला पडलेली भिती जागा मिळताच जोरदार उसळी मारून वर आली आणि सगळ्या मनांवर व्यापून राहिली.
काय असेल याचा नक्की अर्थ ?

त्यातूनही हा प्रकार थांबवण्यासाठी चटकन जे सुचलं ते निखिलनं उच्चारून टाकलं.
" कांतीलाल ? तुम्ही आता परत जाऊ शकता, ऐकलंत आजोबा ? तुम्ही आता परत जाऊ शकता वाटी मूळच्या जागी परत आणून आम्हाला इशारा द्या " जीव ओतून निखिल म्हणत राहिला आणि वाटी तरीही त्याच त्याच अक्षरावरून फिरत राहिली.
प्रत्येकाचीच अवस्था आता बिकट झाली होती, कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवत ते एकमेकांकडे पाहतं राहिले. घामेजलेल्या चेहर्‍यांमधून भितीनं डबडबलेल्या नजरा एकमेकांचा वेध घेत राहिल्या.
सर्वात बिकट अवस्था होती ती पंजवाणीची, एकतर हा असला भयानक प्रकार त्याने कधी टि.व्ही. सिनेमात सुद्धा पाहायचा टाळला होता. आज नकळत का होईना तो या प्रकारात सामील होता. त्यात समोर दिसणारा हा अघटित प्रकार त्यांतून मिळणारा संदेश, पंजवाणीच्या भितीनं टोक गाठलं होतं छातीतले ठोके एव्हाना डोळ्यांना जाणवायला लागले होते. किती वेळ चालणार हा प्रकार ? सकाळपर्यंत ? शक्य होतं कारण सकाळच्या वेळेत असले अमानवीय प्रकार बंद होतात असं त्याच्या तरी माहितीत होतं ... पण सकाळ व्हायला अजून बराच अवकाश होता तोपर्यंत कुणी बोट काढलं तर ? आत असलेलं जे काही होतं ते बाहेर येईल ?
कल्पनेनंच पंजवाणी थरकापला ..

शांतता बराचवेळ तशीच राहिली की तिच्यातही एक प्रकारचा दाटपणा येतो अश्यावेळी एखादा लहानसा आवाज झाला तरी टिपायला कान तयार असतात. इथे तर आपल्याच ह्दयाचे ठोके आपल्यालाच ऐकायला येतील इतके जोरात पडत होते.

" खड्ड्यात जाऊ दे ते प्लँचेट, वाटी उचलून डब्यात ठेवूया चला " थरथरत्या आवाजात श्री म्हणाला.
" आता ते शक्य नाही श्री वाटी पुन्हा स्टार्टच्या वर्तुळात येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही " निखिलचा आवाज खोल कुठून तरी उमटल्यासारखा आला.
" अरे नसेल जात तर आपण ढकलू ना तिला त्या वर्तुळात " श्री बहुदा हबकला असावा.
" नाही असं करता येणार नाही, आपल्याला थांबावंच लागेल "
" अरे पण दुसरा काही मार्ग नाही का ? " मुखर्जीला प्रश्न होताच.
" वाट पाहणे आणि देवाचा धावा करणं इतकाच मार्ग आपल्यापुढे मोकळा आहे"
" उडत गेलं तुझं वाट पाहणं मी हातानं धरून ही वाटी स्टार्टवर आणतोय " असं म्हणत श्री नं वाटीला हात लावला सुद्धा.
" श्री वेडेपणा नको आपल्या जीवावर बेतेल तो माझं ऐक " निखिल समजूत घालायच्या प्रयत्नात म्हणाला.
" एय श्री ,ऐक रे त्या निखिलचे भलताच वेडेपणा करू नको " पंजवाणी कळवळला एव्हाना तो भितीच्या शेवटच्या टोकाकडे पोहोचला होता.
" बाकीच्यांना काय करायचं ते करा मी ही वाटी हालवणारच " वेडेपणाचा झटका आल्यासारखा श्री बोलला आणी खरंच त्यानं ताकद लावून ती वाटी खेचली.
`खर्रर्रर्रर्रर्र' आवाज सगळ्यांच्याच अंगावर काटा आणत गेला आणि या ओढाताणीत पंजवाणीचं बोट वाटीवरून सरकून खालच्या रबरशीटवर आपटलं.
अविश्वासानं त्यानं एकदा वाटीकडे आणि आपल्या बोटाकडे पाहिलं तिरप्या होतं जाणार्‍या वाटीतून हलकेच डोकावणारा तो काळा भाग त्याला त्या गुलाबी रबरशीटवर प्रकर्षाने जाणवला आणि आता पर्यंत कसाबसा तोल सावरलेल्या त्याच्या मनाचा भीतीने कडेलोट झाला आणि पंजवाणी उभ्याउभ्याचं मागे कोसळला.

लोकांच्या आरड्याओरड्याकडे, ओढाताणीकडे दुर्लक्ष करत श्री नं ती वाटी उचलली आणि सरळ सुलटी केली.
सुलट्या केलेल्या वाटीतला तो लोहचुंबकाचा काळा वेडावाकडा तुकडा दाखवत श्री म्हणत होता
" म्हणे प्लँचेट, हबंगं.. इतक्याश्या चुंबकाच्या आणि या लोखंडाच्या तुकड्याच्या जिवावर इतकावेळ मी तुम्हालोकांना नाचवलं, मघाशी राउंडला गेलो तेव्हाचं तिकडे एका पेशंटच्या कॉटला लावलेलं सापडलं मला हे चुंबक म्हटलं जरा गंमत करावी म्हणून चर्चेतून विषय इकडे फिरवला आणि तुम्ही चकलात आणि हा मथ्थ्या..... " असं म्हणून श्री नं जिथे पंजवाणी असायला हवा त्या जागे कडे पाहिलं. त्याची जागा रिकामी दिसताच त्याच्या नजरेत काळजी डोकावली. दुसर्‍याचक्षणी ती खाली पसरलेल्या पंजवाणीवर गेली मघाशी जी ओढाताण झाली त्यात पंजवाणीकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं होतं खरं
" अरे मथ्थ्या, काय झालं ? " जोरजोरात त्याला हालवत मुखर्जी विचारत होता.
" अरे मुखर्जी तू .....बाजू हो आधी " स्टेथेस्कोप सावरत पुढे होतं निखिलं म्हणाला आपण डॉक्टर असल्याची जाणीव त्याला आधी झाली म्हणावं लागेल. दुसर्‍याच क्षणी श्री ने पंजवाणीचा हात हातात घेत नाडी शोधली.
" ओह गॉड ....... नो पल्स " निखिल पुटपुटला. दचकून त्याने पंजवाणीच्या छातीला कानही लावला.
हात सोडून श्री ने पंजवाणीच्या मानेजवळची शीर पाहिली मेंदूचा रक्त पुरवठा तिथेच जाणवतो ती ही शांत झालेली.
" कमॉन, गिव्ह हिम सी.पी.आर. " तो ओरडला कृत्रिम श्वसन देण्याची कल्पनाही निखिललाच सुचली.

वन.. टू... थ्री... फोर... फाईव्ह... सिक्स.... निखिलने जीव खाऊन पंजवाणीच्या फुफ्फुसात हवा भरली..
नो रिप्लाय .... अगेन वन .... टू....
जिवाच्या आकांताने दोघे जण प्रयत्न करत राहिले, मुखर्जी धावत पळत बाहेर गेला, डॉक्टर राणेंना फोन करून खाली बोलावून घेतले आणि कार्डीअ‍ॅस्टीक युनीट वापरण्याची विनंती करून घेऊन आला.

एव्हाना बर्‍यापैकी वेळ वाया गेला, दरवाज्यातच उभं राहून डॉक्टर राणे ओरडले
" मूर्खांनो पाहताय काय ? त्याला स्ट्रेचरवर घालून घेऊन चला ताबडतोब" त्यांच्या आवाजातली जरब जाणवत होती.
तिघांनी पंजवाणीला उचललं आणि स्ट्रेचरवर ठेवणार तोच.....
तिघेजण अजूनही पंजवाणीला स्ट्रेचरवर ठेवत नाहीत असं पाहून आणखी चिडलेल्या डॉक्टर राण्यांनी त्यांच्याकडे रागाने पाहिलं आणि मग त्यांच्या नजरेच्या रोखाने स्ट्रेचरकडे .......

मघाची पसरलेली रबरशीट अजूनही तशीच होती आणि त्यावर पालथी पडलेली ती वाटी भराभर अक्षरांवर फिरत होती.
.........I.......A.....................M....................H..........................E......................R......................E....

त्या पुढेही काही अक्षरं ती वाटी भराभर जोडतंच होती पण वाचायला कष्ट घ्यायची गरज नव्हती ती अक्षरं मथुरेश पंजवाणीची आद्याक्षरंच होती हे नक्की.

नर्सेस स्टेशनमध्ये शांतता पसरलेली.......
....... स्मशान शांतता.

गुलमोहर: 

काल रात्री आधी प्रतिकीया वाचल्या, त्यामुळे रात्री न वाचता सकाळी मस्त नाश्टा करत करत वाचली.... त्यामुळे भीती नाही वाटली, कारण हल्लीच मी मायबोलीवरील "अमानवीय ?" या धाग्यावरील सर्वांचे अनुभव वाचले होते, काय एकेकांनी भयानक अनुभव दिले आहेत तेव्हापासुन अश्या भुताखेतांच्या गोष्टी दिवसाच वाचते, रात्री वाचल्या तर रात्र उगाच भितीदायक वाटते,

पण तुम्ही वर्णन चांगले केले आहे, बिचारया त्या पंजवाणीचा हकनाक बळी गेला...... रच्याकने हे प्लँचेट खरे असते का? माझ्या शेजारी रहाणारया एका मुलीने तिचे परीक्षेचे टक्के असेच मैत्रिणींबरोबर प्लँचेट करुन विचारले होते व तिच्या म्हणण्यानुसार ते बरोबर सांगितले होते...... खरे खोटे काय माहीत.....

एकदम झक्कास.....

रच्याकने

आता झी-मराठीत शीरकाव झालाच आहे तुमचा... तर तुमच्या रहस्य कथांच्या सीरीयल चं प्रपोझल देवुन टाका... तुम्ही, धुंद रवी, कौतुक... सगळे आहात एक तयारीचे लेखक... मग काय होउन जाउदे......

जबराट!!!
बिचारा पंजवाणी... हकनाक बळी गेला त्याचा!

प्लँचेट बद्दल मीही बरे वाईट वाचले आहे...
कोणी प्रयोग केलाय का? Wink Biggrin

दंडवत कचा! __/|\__ ! मेडीकल स्टुडंट्सवर अशा हॉरर कथा वाचल्या आहेत म्हणुन घाबरले नाही. पण सॉल्लीड कथा!

रच्याकने हॉस्टेलवर असतांना गंमत म्हणुन केलेल्या प्रयोगाची आठवण झाली.

आवड्या मेरे कु ..
हात विचकत निखिल म्हणाला>>
दात विचकतात ना Proud
विनिता.झक्कास तुमचे अनुभव सांगा ना . प्लँचेट खरा असतं का ? ह्यात भूत लोकातलेच आत्मे येतात का ? दुसर्या लोकात गेलेल्या किवा मुक्ती मिळालेले आत्मे येत नसतील ना .