चक्रावळ बद्दल मी काही सांगण्यासारखे राहीलेलं नाही ते आधीच विशल्याने सांगून टाकलेय त्यामुळे थेट कथाच पोष्ट करतोय, अर्थात आणखीही काही सांगण्यासारखं आहे ते प्रतिसादात केंव्हातरी....
****************
चक्रावळ
दिवसभराच्या दगदगीनं वैतागलेला निखिल शेवटी न जेवताच ताईच्या घरातून निघून रेल्वे स्टेशनवर आला. संध्याकाळपासून ज्या काही गोष्टी त्याने पाहिल्या होत्या त्या खरंच त्रासदायक होत्या. एरव्ही कधीही त्याने असा थिल्लरपणा चालू दिला नसता पण.. शेवटी हे घर त्याचं नव्हतं त्याच्या मोठ्या बहिणीचं होतं ती आणि तिचे पती ज्या गोष्टी योग्य समजतील तशाच तिथे घडणार होत्या. नकळतच त्याच्या मनात दिवसभराच्या घटनांची पुनर्मांडणी होत होती नाहीतरी चर्चगेट स्टेशन दूर होतं आणि इच्छीतस्थळी पोहोचेपर्यंत मनाला काही चाळा हा लागलेलाच असतो, ते आपलं स्वतःला कशात तरी गुंतून घेतच राहणार होतं
संध्याकाळी.. म्हणजे नेमका संध्याकाळी म्हणता येणार नाही. साधारणता चार साडेचारच्या दरम्यान त्याला ऑफिसमध्ये तो फोन आला होता.
ताईच्या मोठ्या मुलीला पुन्हा झटका आला होता. ही बहुदा चौथी पाचवी वेळ असेल, गेल्या सहाच महिन्यांत तिला असे झटके येऊन गेले होते. अशावेळी ती पार बेफाम व्हायची, अगदी वेळप्रसंगी तर चरा-चार धडधाकट माणसांना ती आवरत नसे. घरातून बाहेर पळायचा प्रयत्न करायची.
पाहिल्यावेळी जेव्हा हा प्रकार घडला तेव्हाच त्यांच्या फॅमेली डॉक्टरांनी वरवर अंदाज लावत तो तिच्या वयातल्या स्थित्यंतरामुळे घडू शकणारा एखादा तात्पुरता परिणाम असल्याचा तर्क करत ताईला तिला घेऊन मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला होता, पण `माझ्या मुलीला काय वेड लागलंय ! ' असलं काहीतरी अजब तर्कट लावत ताईने तिकडे दुर्लक्ष केलं होतं.
थोड्याथोड्या अंतराने हाच प्रकार जेव्हा पुन्हा घडला किमान तेव्हा तरी ताईने डॉक्टरांचा सल्ला मानायला हवा होता असं निखिलचं प्रांजळ मत होतं. ताईकडे प्रकार मात्र भलताच चालू होता. अंगारे, भस्म, ताईत असल्या गोष्टींचा त्या बिचार्या मुलीवर मारा चालू होता, साहजिकच त्याच प्रकाराची पुनरावृत्ती ही होणारच होती, ती आज झाली.
आज मात्र प्रकार जरा जास्त पुढे गेला होता. मुलीला झटका येताच ताईने ताबडतोब मांत्रिकाला बोलावलं कदाचित त्यांनी ते आधीच ठरवलं असू शकेल, पण या सगळ्या प्रकारात निखिलंची साक्षीदाराची भूमिका त्यांना का महत्त्वाची वाटत होती देवच जाणे.
फोन येताच ताबडतोब निखिल चर्चगेटला ताईच्या घरी पोहोचला होता. घरात आणि ते ही असल्या फ्लॅटमध्ये चाललेले ते प्रकार त्या कुंकवाच्या चित्रविचित्र आकृत्या, तो धडधडणारं पत्र्याचं होमकुंड आणि भरीस भर म्हणून अत्यंत किळसवाण्या वेषात असलेला तो मांत्रिक. निखिलचं पित्त खवळलं नसतं तरच नवल. चार शब्द बोलावेत म्हणून त्याने आपलं तोंड उघडलंही होतं पण नजरेनंच ताईनं त्याला गप्प बसायची खूण केली. त्यानंतर समोर चाललेले ते अघोरी उपाय.....
निखिलच्या सहनशक्तीबाहेरचा प्रकार होता तो. त्याच्या मते ही एक सरळ साधी स्किझोफ्रोनीयाची केस होती योग्य त्या उपचाराने त्यातून त्याची भाची सहज बरी झाली असती पण ....
सगळे सोपस्कार उरकेपर्यंत जो वेळ गेला त्यावेळात निसर्गानं आपलं काम चोख केलं होतं तो बिचारा इवलासा जीव एव्हाना ग्लानीत गेला होता आणि घरातल्या मंडळींना हा मांत्रिकाचा पराक्रम वाटत होता.
याच गोष्टीवरून निखिल आणि ताईचा खटका उडाला होता आणि इतक्या उशीरा तो घरी परत निघाला होता. वास्तविक त्याने आज ताईकडे राहतं असल्याचा फोनही घरी केला होता, पण आता त्याला त्या घरात क्षणभरही थांबायची इच्छा राहिली नव्हती.
विचारांच्या आणि भावभावनांच्या उसळलेल्या कल्लोळात चर्चगेट स्टेशन केव्हा आलं हे देखिल कळलं नव्हतं. त्यानं एक नजर घड्याळात टाकली अकरा चाळीस म्हणजे त्याला आता विरारसाठी फास्ट लोकल नक्की मिळणार होती. कदाचित तीच समोर थांबलेली असू शकत होती.
प्लॅटफॉर्मवरच्या पाट्या झळाळल्या आणि रात्रीच्या शांत वेळेत रेल्वे अनाउंसरचा आवाज पहिल्यांदाच स्पष्ट असा ऐकायला आला. तीन तीन भाषांच्या घोकंपट्टीनंतर त्याने जे काही ऐकलं होतं त्याचा मथितार्थ इतकाच होता की आता विरारला निघणारी लोकल ही फास्ट ऐवजी स्लो करण्यात आली होती.
क्षणभर त्याने लोकलकडे जाण्यासाठी उचललेला पाय अडखळला इतका कंटाळवाणा प्रवास ? मनं काही सेकंद विचलित झालं तेवढ्यात दुसर्या एका ट्रॅकवरुन आलेल्या गाडीच्या दिव्याने त्याची नजर दिपवून टाकली. डोळ्यात प्रखर प्रकाश पडला की मेंदूही काही क्षण गोंधळतो. सेकंदभर निखिलची नजर मंदावली डोळ्यांच्या बाहुल्या नीटश्या अॅडजस्ट होईपर्यंत समोरच्या गाडीने निघण्याचा हॉर्न वाजवला आणि नकळतच निखिलनं समोरच्या डब्यात प्रवेश केला.
उशीराची आणि त्यातून स्लो लोकल असल्याने डब्यात गर्दी सोडाच पण फारशी माणसंही दिसतं नव्हती. पंख्याचा वारा लागेल अशी जागा पकडून निखिल बसला. गाडी तीच्या वेगात जातच होती. एखाद स्टेशन पर्यंत तो जागा होता पण पंख्याच्या हवेचा आणि दिवसभराच्या थकव्याचा परिणाम म्हणून निखिलची डुलकी लागली.
चुकून म्हणा किंवा मनातल्या जाग्या राहिलेल्या एखाद्या संवेदनेमुळे म्हणा निखीलची झोप चाळवली. डोळे उघडत असतानाच स्पष्ट जाणवलेली गोष्ट म्हणजे समोर बसलेल्या व्यक्तीचं त्याच्याकडे एकटक पाहणं. या गोष्टीला योगायोग म्हणा किंवा आणखी काही पण आपण झोपलेलं असताना जर कुणी आपल्याकडे एकटक पाहतं राहिलं तर आपली झोप चाळवतेच.
निखिलला जागं होत असल्याचं पाहिल्यावर समोरच्या माणसाच्या नजरेत थोडं ओशाळेपण आलं खरं पण तो भासही असेल.
जागं होतं निखिलनं समोरच्या व्यक्तीकडे एक अनोळखी स्मित केलं. समोरच्या व्यक्तीकडूनही तितक्याच तत्परतेनं प्रतिसाद आला पण ते स्मित अनोळखी माणसाकडे पाहून केलेलं नव्हतं, निखिलला तो फार जवळून ओळखत असल्यासारखं होतं.
" आपण निखिल भुस्कुटे का ?" समोरच्या व्यक्तीने प्रश्न केला.
" हो, पण आपण या पूर्वी कधी भेटलोय का ? "
" ते कसं शक्य आहे हो ? "
" नाही म्हणजे ऑफिसमध्ये किंवा प्रवासात वगैरे " कधी कधी अश्या ओळखी मनातून चटकन पुसल्या जातात.
" नाही हो, तुम्ही मला ओळखत असणं कसं शक्य आहे ? मी एक सामान्य माणूस "
नाही म्हटलं तरी निखिल या वाक्यानं गडबडलाच.
" अहो पण मी ही सामान्य माणूसच आहे की, तुमच्यासारखाच"
" तो तुमचा मोठेपणा झाला, नाहीतर तुमच्यासारख्या थोर अर्थतज्ज्ञाने असं म्हणणं कसं शक्य आहे ?"
आता मात्र निखिलची झोप उडालीच. हा कदाचित समोरच्या माणसाला झालेला भ्रम असावा किंवा लूटमार करण्याची नवी पद्धत तरी.
" मी आणि अर्थतज्ज्ञ ? मी एक साधा अकाउंटंट आहे हो" निखिलनं आपला सामान्यपणा समोरच्या व्यक्तीच्या समोर अगदी स्पष्ट केला, हो उगीच काहीतरी गैरसमजातून हा माणूस आपल्यामागे असला तर ?
" छे हो, तुमच्या अर्थशास्त्राच्या लेखांबरोबर प्रसिद्ध होणारी तुमची कित्येक छायाचित्र पाहिलीयत ना मी"
" अहो, पण तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असावा मी निखिल भुस्कुटे नक्की आहे पण कुणी अर्थशास्त्रातला तज्ज्ञ वगैरे नाही तर साधा अकौंटंट आहे" क्षणभर निखिलच्या डोळ्यासमोर त्याची भूतकाळातली महत्त्वाकांक्षा उभी राहिली
काही सेकंद समोरचा माणूस निखिलकडे निरखून पाहतं राहिला आणि नंतर मान डोलवत हसत म्हणाला
" असेलही कदाचित, पण तुमच्या आणि त्यांच्या चेहर्यात खूपच साम्य आहे खरं, आणि पुन्हा नावही सारखंच"
" अहो नावं काय कित्येक असतात एक सारखी पण व्यक्तिमत्त्व भिन्नच असतात की. आमच्या ऑफिसातल्या पोर्याचं नावं शरद पवार आहे पण म्हणून का तो मोठा होतो " समोरच्या व्यक्तीच्या मोकळेपणामुळे निखिलही जरा मोकळा झाला.
" अहो पण तुमचा चेहराही चांगलाच साम्य दाखवतोय की"
" चेहर्याचं काय घेऊन बसलात, माझी आजी म्हणायची की जगात एकाच चेहर्याच्या सात व्यक्ती असतात म्हणून"
" असेलही, असो योगायोगानं आपली ओळख व्ह्यायची होती तर, माझं नांव प्रल्हाद बेहेरे मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे क्वांटम फिजिक्स हा माझा खास विषय "
" माझं नाव... अरे हो माझी ओळख तर तुम्हाला आधीच करून दिलेय नाही का ? " अडखळत निखिल म्हणाला त्याला या प्रल्हाद बेहेरेंचा प्राध्यापकीचा विषय पार डोक्यावरून गेला होता. त्यात त्याला रसही नव्हता की गम्यही.
एकमेकांचा परिचय झाल्यावर साहजिकच कुठून आला कुठे चालला वगैरे प्रश्न निघतातच. बेहेरेंनी तो प्रश्न विचारताच निखिलचा दिवसभर झालेला मनाचा कोंडमारा उफाळून आला. समोरच्या व्यक्तीचा आपला परिचय किती, कसा याचा विचार न करता त्याने आपल्या मनातलं सारंकाही बेहेरेंच्या कानावर घातलं. बेहेरेही शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत होते कदाचित प्राध्यापक असल्यानं त्यांच्या मनात सहनशक्ती होती.
" म्हणे भूत बसलंय, या असल्या भंपक गोष्टींचा विचारतरी कसा करू शकतात ही माणसं ? " आपलं बोलणं संपवताना निखिलनं शेवटचा संतापी विचार मांडला.
" खरं आहे हो, आजकालच्या जगात विज्ञानाने इतकी प्रगती केली असताना लोकांचे विचार इतके मागासलेले नसायला हवे, पण काय करणार मनुष्यजात, अविचारी असायचीच "
" बघा ना, आजकालच्या वृत्तपत्रातच काय पण न्युजचॅनलनाही भुतं पाहिल्याचा दावा करणारी विधानं प्रसिद्ध होताना दिसतात, शास्त्र पुढे चालले असताना माणूस मात्र मागेच चाललाय"
" खरंच असं काही न्युजचॅनल दाखवतात ? मी तरी आजवर काही पाहिलं नाहीय, अर्थात टी.व्ही. पाहायला वेळ मिळायला हवा"
ओळख झाली गप्पांना विषयही मिळाला साहजिकच गप्पा भुतं या विषयावर पुढे सरकत राहिल्या. घड्याळाचे काटे फिरतंच होते.
त्यातूनच मग मेलेली माणसं दिसणे या विषयावर गप्पांची गाडी घसरली. इथे मात्र बेहेरेंची काही मतं निराळीच निघाली.
" काय म्हणता ? प्राध्यापक असूनही तुम्ही मेलेल्या व्यक्तींची भुतं दिसण्यावर विश्वास ठेवता ?"
" इथे आपला थोडा गोंधळ होतोय, म्हणजे पहा, की मी व्यक्ती दिसण्यावर वस्तू नाहीशी होण्यावर खात्रीनं बोलू शकतो पण याचा अर्थ मी भुताखेतांवर विश्वास ठेवतोय असा नाही ?"
बेहेरेंच्या या परस्पर विरोधी बोलण्याने निखिलचा गोंधळ उडाला.
" आहो, पण मेलेली व्यक्ती मेली म्हणजे या पृथ्वीवरून तिचं अस्तित्व पुसल्या गेलं की मग ती परत कशी दिसेल ? "
" शक्य आहे, काही विशिष्ट परिस्थितीत ते शक्य आहे. "
" याचा अर्थ तुम्ही भुतांवर विश्वास ठेवता"
" नाही, म्हणजे असं की मेलेल्या व्यक्तीचं अस्तित्व हे एका जगातून पुसल्या जाईल पण सगळ्याच जगांमध्ये असं होईलच असं नाही ना ! "
बेहेरे काय म्हणाले हे निखिलच्या डोक्यात एक शतांशही गेलं नाही. त्याच्या नजरेत तो असमंजस भाव बेहेरेंना दिसलाही असेल.
" आहो भुस्कुटे, मला असं म्हणायचंय की एका जगातील मेलेली व्यक्ती ही त्याच जगातून नाहीशी होईल नाही का ? "
" अर्थात " अजूनही निखिलला काहीही कळले नव्हते.
" पण दुसर्या जगात ती कदाचित त्या नंतरही अस्तित्वात असू शकेल नाही का ?"
" दुसरे जग ? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की दुसरंही एक जग अस्तित्वात आहे ? कोणतं ? मृत्यूपलीकडलं की काय " आता निखिलच्या शब्दात उपहास होता.
" हो दुसरं जग पण मृत्यूनंतरचं नाही एक वेगळंच जग जे आपल्या जाणीवे पलीकडे आहे"
" असं एखादं जग आहे ? मग अद्याप त्याची माहिती कशी मिळाली नाही, आणि सगळी पृथ्वीतर मानवानं पालथी घातलीय मग तुमचं ते दुसरं जग आहे कुठे पृथ्वीच्या पोटात ? "
" नाही पृथ्वीच्या पोटात नाही याच पृथ्वीवर, पण वेगळ्या मितीत आणि असं एक नाही अशी अनंत विश्वे असावीत असा अंदाज आहे "
" असं ? मग आपल्याला का नाही दिसत ही जगं ? "
" त्याचं असं आहे, आपण फक्त तीनच मिती ओळखतो लांबी, रुंदी आणि उंची प्रत्यक्षात आणखी काही मिती असतील तर आपल्याला ते माहीत नाही सध्यापुरतं जर एक चौथी मिती म्हणून काळ धरला तर सगळीच गणितं बदलतात."
" ती कशी काय, काळ तो काळ भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ की यापेक्षा चौथा आणखी एखादा काळ आहे प्राध्यापक साहेब ?" निखिल जरी उपहासाने म्हणाला असला तरी एव्हाना बेहेरेंमधला प्राध्यापक जागा झाला असावा
" म्हणजे बघा, एखादी घटना घडते ती समजा तशीच न घडता वेगळी घडली असती तर कदाचित तिचे परिणाम वेगळे दिसले नसते का ? "
" म्हणजे ? "
" साधं उदाहरण घ्या जर आता तुम्हाला किंवा मला ही गाडी मिळाली नसती तर आपली ओळख झाली असती का ? "
" अर्थातच नाही, पण गाडी मिळाली आहे म्हणजे मिळाली नसती हा भूतकाळ झाला"
" बरोब्बर" एखाद्या हुशार विद्यार्थ्याने प्रश्नाचे उत्तर बरोबर दिल्यावर जसे उत्साहित होतील तसे बेहेरे आता उत्साहात आले होते. " पण गाडी न मिळणे हा आपला भूतकाळ झाला पण जर एखाद्या जगाचा स्पेस टाइम आपल्यापेक्षा वेगळा मागे असेल तर ? त्यांच्यासाठी हा आता वर्तमानकाळ असेल "
" म्हणजे ? आपण आणखी एका जगात एकमेकांना अनोळखी असे दुसर्यांच लोकलने प्रवास करत असू ? कसं शक्य आहे ? "
" का शक्य नाही ? आता पहा आपण काळ कसा पाहतो ? तर पृथ्वीच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्यावर बरोबर ? पण हे आपल्या त्रिमित परिमाणानं आपण ठरवलं आहे पण जर समजा काळ ही चौथी मिती धरली तर आपल्या पुढे आपल्या मागे काही मिलीसेकंदाने का होईना दुसरे एखादे त्रिमित विश्व असू शकेल की नाही ? "
" तसं शक्य वाटतंय खरं " निखीलनं आपलं मत काही कळल्याने दिलं होतं की उगीचच हे कळायला मार्ग नव्हता.
" मग तसं शक्य आहे, तर या जगात मेलेली व्यक्ती दुसर्या एखाद्या जगात निश्चीत जिवंत असू शकेल की नाही ? म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू ज्या कारणाने झाला ते तिथे कदाचित टाळले गेले असू शकेल "
" मला समजलं नाही " आता निखिल हतबल होता.
" समजा एका व्यक्तीने जीव देण्यासाठी नदीत उडी मारली तर ? या आधीच्याही शक्यता आहेत पण आपण इथून विचार करू काय होईल ? "
" काय होणार ? ती व्यक्ती मरेल "
" पण ही सुद्धा एक शक्यता आहेच की त्या व्यक्तीला कुणीतरी वाचवेल नाही का ? "
" अर्थात "
" मग नेमक्या याच शक्यतेमुळे आपल्या जगात नदीत उडी मारून जीव देणारी व्यक्ती दुसर्या जगात नक्कीच जिवंत असेल की नाही ? "
" असायला हवी "
" बस्स, म्हणजे तुम्हाला ही शक्यता पटते तर आता विचार करा की ज्या कारणाने त्या व्यक्तीवर आत्महत्या करण्याची वेळ आली ते कारणही एखाद्या शक्यतेत बाद होत असेल अश्या अनेक शक्यतांचा भविष्यकाळ म्हणजे समांतर विश्व."
" पण हे शास्त्राला मान्य आहे ? "
" अर्थात, समांतर विश्व ही संकल्पना ह्युज एव्हरीट यांनी १९५७ च्या आसपास पहिल्यांदा मांडली आणि आजवर त्यात अनेक शोधांची भर पडत आहे, आज ही संकल्पना इथवर पोहोचली आहे."
" पण तरीही एक प्रश्न राहतोच, मघाचेच उदाहरण घेऊ आपल्या जगातल्या त्या व्यक्तीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने ती मरण पावली पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे दुसर्या विश्वात ती जिवंत आहे बरोबर ? "
" एकदम "
" मग मला सांगा आपल्या विश्वात मेलेली व्यक्ती आपल्याच विश्वात पुन्हा दिसते त्यालाच भूत म्हणतात बरोबर ? "
" बरोबर "
" मग असले भूत दिसणे याचा त्या दुसर्या विश्वाशी काय संबंध ? " निखिल विजयी स्वरात म्हणाला.
" ते ही सांगतो, कधी कधी कालप्रवाहात काही अडथळे येतात आणि त्याचा वेग मंदावतो अशावेळी कोणत्याही दोन विश्वांची एकमेकांत सरमिसळ होते अगदी सगळीच नाही पण थोड्याफार प्रमाणात, याच नेमक्या वेळी आपल्याला ती व्यक्ती दिसण्याची शक्यता निर्माण होते आणि जे दिसतं आपण त्याला त्या व्यक्तीचं भूत म्हणतो. "
" म्हणजे ? "
" आणखी सोपं करतो, माणसांची भुतं नेहमी त्यांच्या मृत्यूच्या स्थळाच्या आसपासच का दिसतात ? "
" कारण तिथे त्यांचा आत्मा घोटाळत असतो "
" पण आपल्या माहिती नुसार आत्मा पुन्हा जन्म घेतो नाही का ? "
" पण काही काळ तो तेथे घुटमळतही असेल"
" पण जर आत्माच पुन्हा जन्म घेतो असं म्हटलं तर मला सांगा पृथ्वीची आत्ताची लोकसंख्या किती ? "
" असेल काही अब्ज "
" मग अगदी मागे पृथ्वीच्या इतिहासात जर पाहिलं तर ही लोकसंख्या कमी होती, मग आता जी लोकसंख्या वाढली त्यासाठीचे आत्मे आले कुठून ? "
" ... " इथे निखिल निरुत्तर झाला
" असो, आत्मा हा आपला विषय नाही तर मुद्दा हा की मृत व्यक्तीचे भूत त्याच्या मृत्युस्थळीच जास्तवेळा दिसते कारण मघाशी सांगितलेले आहेच की एका विश्वात ती त्याच स्थळावरून जिवंत परत गेलेली असते आणि आपण समोर जी व्यक्ती पाहतो ती त्या विश्वातली जिवंत व्यक्ती असते "
" मग तसं असेल तर भुताचं अचानक गायब होणंही तर्क संगत आहे "
" म्हणून मी म्हणतो की भुतं नसतात पण मृत व्यक्ती आपल्याला दिसू शकतात "
" अच्छा असं आहे तर ? " निखिलनं हे शब्द उच्चारायला आणि गाडी विरार स्थानकात शिरायला एकच वेळ
साधली.
प्राध्यापक बेहेर्यांचा निरोप घेऊन निखिल खाली उतरला, काही क्षणातच गाडी धडधडत पुढे निघून गेली आणि प्लॅटफॉर्म सुना सुना झाला.
प्राध्यापक बेहेर्यांच्या लेक्चरमुळे निखिलच्या डोक्यात बराच गोंधळ उडाला होता त्याच तंद्रीत त्याने रिक्षा केली आणि घरी आला.
बिल्डिंगमध्ये एव्हाना सामसूम झालेली होती गेटजवळचा वॉचमन आजही कुठे गायब झालेला दिसत होता. एकामागोमाग एक जिने चढत निखिल आपल्या फ्लॅटजवळ पोहोचला. मघापासून त्याच्या मनात काहीतरी चुकल्याची जाणीव होत होती खरी पण नक्की काय हे त्याला कळत नव्हतं
" शीट, या बेहेर्यांनी डोक्याचं दही करून टाकलं आणि गेले निघून " घराकडे पावलं टाकताना तो नकळतच स्वतःशी म्हणाला आणि दचकला.
मघापासून जी चुकल्याची भावना मनात होती तिचं उत्तर त्याला सापडलं
विरार लोकल विरारवरुन पुढे निघून जाते ? शेवटच स्टेशन असतानाही बेहेरे गाडीतून उतरत नाहीत ? चरकलेल्या मनात प्रश्न उमटले,
नकळत हाताने बेल वाजवण्याचं काम केलं जात होतं .
विरार लोकल विरारच्या पुढे ? काय असावं भास की स्वप्न ?
घराचं सेफ्टी डोअर उघडल्याचा आवाज आला आणि त्याने पाहिलं समोर कुणीतरी अनोळखी स्त्री त्रासलेल्या चेहर्याने उभी होती.
" कोण हवंय ? " तिचा त्रासिक प्रश्न
" तुम्ही कोण ? आणि माझ्या घरात काय करताय ? माधवी SSSS " निखिलनं आपल्या पत्नीला हाक मारली.
" काय झालं ? कोण हवंय ? " त्या त्रासलेल्या स्त्रीच्या मागून एक राकट चेहर्याचा माणूस उगवला.
" हे बघा कोण ते ! म्हणे माझ्या घरात काय करता ? " स्त्रीने त्या राकट चेहर्याला तक्रार केली.
" काय हो ? काय पाहिजे ? असे रात्री अपरात्री लोकांच्या घराचे दरवाजे कसले ठोकता ? " हमरीतुमरीवर यायच्या तयारीत तो राकट चेहरा म्हणाला. एव्हाना मेन डोअरही उघडलं होतं.
" लोकाच घर ? आहो मी या घराचा मालक आहे ही पहा नेमप्लेट, वाचा `निखिल भुस्कुटे' " त्याला दाखवण्यासाठी निखिलने हात नेमप्लेटकडे नेला आणि तो थबकला इथे दुसर्याचं कुणाचं तरी नांव दिसत होतं.
बिल्डिंग तीच विंग तीच फ्लोअर तोच फ्लॅटनंबरही तोच मग नाव कस बदललेलं ?
" ओ, जास्त शहाणपणा करू नका नाव वाचलंत ना ? हे माझंच घर आहे, च्यायला कुठूनही येतात..." असं म्हणत त्याने धाडकन दरवाजा बंद केला.
" आणि नावं पण काय काढलं तर म्हणे निखिल भुस्कुटे इतक्या मोठ्या इकॉनॉमीक एक्स्पर्टचं नाव बेधडक ठोकून देतात लोक " सेफ्टी डोअर बंद करता करता तो राकट पुटपुटला.
निखिलच्या डोक्यात विजा सळसळल्या, मी आणि अर्थतज्ज्ञ ? मघाशी तो बेहेरेही हेच म्हणालेला, पण मी कधी अर्थशात्रात इतकी प्रगती केली ? करायची तर होती पण मला तर बाबांच्या मृत्यूमुळे शिक्षण अर्धवट टाकून नोकरी करावी लागली ...........
काय म्हणाले होते प्राध्यापक बेहेरे ?..... शक्यतांचं विश्व ?..... जर माझे बाबा गेलेच नसते तर .......
.
.
.
.
.
हताशपणे निखिल खाली जायला वळला, जमलंच तर त्याला अर्थतज्ज्ञ निखिल भुस्कुटेंची भेट घ्यायची होती
त्याहूनही जास्त त्याला आता प्राध्यापक बेहेरेंना शोधायची गरज होती इथून परत जायचा एखादा मार्ग असेल तर तो कदाचित त्यांनाच माहीत असणार होता.....
अरे वा, मी पहिला. खुप
अरे वा, मी पहिला.
खुप दिवसांनी तुझी कथा वाचायला मिळतेय.
कचा, अभिनंदन ! तुझी पहिला
कचा, अभिनंदन ! तुझी पहिला क्रमांक मिळवलेली कथा माबोकरांसाठी खुली झाली तर. वेगळाच विषय आहे. मजा आली वाचायला.
तुझ्या आणि आसा.च्या कालप्रवाहाचे वेग वेगवेगळे आहेत का रे? तुझ्या कालप्रवाहाचा वेग मंदावला आहे आमच्या कालप्रवाहापेक्षा. तारिख बघ ना. तु २०११ मधे टाकलेली कथा आम्हाला २०१२ मधे दिसते आहे आणि आम्ही ४ महिन्याने प्रतिसाद देतो आहे.
बेस्ट.... मस्त जमलीय इच्छा
बेस्ट.... मस्त जमलीय इच्छा असेल तर हीच कथा पुढे वाढवुन एक छान लघुकादंबरी होइल... अभिनंदन
समांतर विश्व ही संकल्पना>>>>> नारायण धारपांनी यावरच एक कथा लिहिली होती का? त्यात एक स्त्री काहितरी आनायला बाहेर जाते आणि येताना ती दुसर्याच विश्वात जाते वगैरे.. कोणाला ही कथा आठवली तर नाव नक्की सांगा...
मने, हुशार आहेस हो
मने, हुशार आहेस हो
आसा, कसचं कसचं !
आसा, कसचं कसचं !
तुझ्या आणि आसा.च्या
तुझ्या आणि आसा.च्या कालप्रवाहाचे वेग वेगवेगळे आहेत का रे? तुझ्या कालप्रवाहाचा वेग मंदावला आहे आमच्या कालप्रवाहापेक्षा. तारिख बघ ना. तु २०११ मधे टाकलेली कथा आम्हाला २०१२ मधे दिसते आहे >>>
अरे खरंच की.
असं कसं...
कथा भन्नाट आहे. पण चौथी मिती, समांतर विश्व या संकल्पना या आधीही एका कथेत वाचल्या होत्या. घटना साधारण अशाच होत्या बहुदा. फक्त त्यात व्यक्तिमत्त्वांची अदलाबदल होते असं काहीसं होतं. कवठीचाफाचीच कथा होती का ती? काही आठवत नाहीये.
मस्त रे!!! मने, खरच हुश्शारेस
मस्त रे!!!
मने, खरच हुश्शारेस हो
गुरुजी, पार्टी ?
गुरुजी, पार्टी ?
अभीनंदन चाफ्या कथा मस्तच
अभीनंदन चाफ्या
कथा मस्तच जमलीये. तुझा आवडता प्रांत म्हटल्यावर काय
कथा भन्नाट आहे. पण चौथी मिती,
कथा भन्नाट आहे. पण चौथी मिती, समांतर विश्व या संकल्पना या आधीही एका कथेत वाचल्या होत्या. घटना साधारण अशाच होत्या बहुदा. फक्त त्यात व्यक्तिमत्त्वांची अदलाबदल होते असं काहीसं होतं. कवठीचाफाचीच कथा होती का ती? काही आठवत नाहीये.
सेम याच संकल्पनेवर नारायण धारपांची एक कथा वाचली होती ..
त्यातही लोकल हाच विषय होता . तो माणूस कुर्ल्याहून सुटणाऱ्या लोकल मधून चढायचा..
आणि वेगळ्या मितीत जायचा
हि गोष्ट सरळ सरळ ढापलेली आहे, आणि तरीही पहिला क्रमांक.. वा रे वा
मस्त.........................
मस्त..........................अभिनन्दन
खुप मस्त रे मला वाचताना
खुप मस्त रे
मला वाचताना थोडीशी भिती वाटतं होती भयकथा निघतेय की काय
पण हुश्श !
भन्नाट कथा आणि मनापासून
भन्नाट कथा आणि मनापासून अभिनंदन आशिषभाऊ... पण या कथेचा पुढचा भाग तर बनतोच बनतो... वाट पाहतोय..
हि गोष्ट सरळ सरळ ढापलेली आहे,
हि गोष्ट सरळ सरळ ढापलेली आहे, आणि तरीही पहिला क्रमांक.. वा रे वा>>
बन्या, ना.धा.ची अशी एक कथा आहे हे खरेय, पण त्या कथेची संकल्पनाच वेगळी आहे., प्रत्येक प्रसंगातून पुढच्या प्रसंगाची निर्मिती अशी ती संकल्पना आहे. चाफ्याच्या या कथेचा गाभा निराळा आहे.
चांगली आहे. मला
चांगली आहे.
मला साजिरेश्वराच्या जुन्या दोन कथा आठवल्या. [इन्व्हाइट आणि चेक आऊट ]
सगळ्यांचे एकत्रित धन्यवाद !
सगळ्यांचे एकत्रित धन्यवाद !
@ बन्या : हि गोष्ट सरळ सरळ ढापलेली आहे, आणि तरीही पहिला क्रमांक.. वा रे वा >>>>> शक्य असल्यास मूळ कथेचं नांव आणि उपलब्धता सांगावी. मी स्वतः मीमराठीला विनंती करून पारितोषिक मागे घ्यायला सांगेन. नारायण धारपांच्या सगळ्याच कथा मी वाचलेल्या आहेत, समांतर विश्वावरची त्यांची एकच कथा आहे त्यातलं कथाबीज पूर्णपणे वेगळं आहे. खरंतर मला वाद आवडत नाहीत पण सरळसरळ साहीत्यचोरीचा आरोप केल्यावर सहन होणार नाही.
विशालने लिन्क दिल्याने तिकडे
विशालने लिन्क दिल्याने तिकडे पण वाचली. आवडलीच.
अभिनंदन. व मस्त कथा. भन्नाट.
अभिनंदन. व मस्त कथा. भन्नाट. बाकी ते कथा पोस्टण्याच्या व प्रतिसादाच्या तारखेचे कोडे काही सुटले नाही बॉ
चौथी मिती, समांतर विश्व या
चौथी मिती, समांतर विश्व या संकल्पना या आधीही एका कथेत वाचल्या होत्या. >>>
मी ही पोस्ट टाकल्याने उगीचच वादाला चालना मिळतेय का? समान विषयावरील कथा आठवली होती. तिथून ढापलेली आहे असे म्हणायचे नव्हते.
कवठिचाफा, उगीचच वाद-विवादांना तोंड फोडणार्या प्रतिसादकांकडे दुर्लक्ष करा प्लीज. (:खेद व्यक्त करणारी बाहुली:)
छान कथा. अवांतरः शाळेत
छान कथा.
अवांतरः
शाळेत असताना चौथ्या मितीवरची एक नारळीकरांची कथा वाचली होती सायन्स टुडे मधे- ' Rare Idol of Ganesha' नावाची.
बाकी ते कथा पोस्टण्याच्या व
बाकी ते कथा पोस्टण्याच्या व प्रतिसादाच्या तारखेचे कोडे काही सुटले नाही बॉ>>>> इथेच आधी लिहीली असेल कथा. मग स्पर्धेसाठी पाठवल्याने इकडे प्रकाशित करणे योग्य न वाटल्याने अप्रकाशित ठेवली असेल. आता स्पर्धा पार पडली आहे, निकालही लागला आहे. त्यामुळे, कथा प्रकाशित केली असेल.
कथा छान आहे. नेहमीप्रमाणेच.
बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन.
उगीचच वाद-विवादांना तोंड
उगीचच वाद-विवादांना तोंड फोडणार्या प्रतिसादकांकडे दुर्लक्ष करा प्लीज >>>> निंबूडा, सहमत.
बा़की प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
प्राची : अंदाज एकदम बरोबर आहे
मस्त आहे कथा. आवडली.
मस्त आहे कथा. आवडली.
चाफा...... आवडली. आधी
चाफा...... आवडली. आधी सांगितल्याप्रमाणे अजून मोठी सुद्धा छान झाली असती, पण स्पर्धेत होती म्हणजे अगदी योग्य आहे. अशा कन्सेप्ट नीट मांडणारे लिखाण सहजासहजी वाचायला मिळत नाही...... तू ती कमी इथे भरून काढलीस.
आता अवांतरः
चाफ्या...... लेका त्याच्या प्रतिसादापेक्षा तुझा वाचून वाईट वाटले........ असल्या जनतेकडे लक्ष नाही द्यायचे हे मी तुला सांगायला पाहिजे का आता????हा काही तुझा पहिला लेख नाही. इथे जनता तुझ्या लिखाणाशी परिचित आहे. असल्या लोकांकडे लक्ष देऊन यापुढे आजिबात प्रतिसाद देत जाऊ नकोस.
बेफाट आहे, मजा आली एकदम!
बेफाट आहे, मजा आली एकदम!
निखिलशी १००% सहमत
निखिलशी १००% सहमत
निश, मी तेच लिहिलं त्याला
निश, मी तेच लिहिलं त्याला गगोवर. बघ परत ' ग्रेट माईंडस...' आणि परत तुला भाव खायला वाव कि तु आधी लिहिलंस म्हणुन ग्रेटर माईंड..
छानच जमलीय कथा ! लिहित रहा...
छानच जमलीय कथा ! लिहित रहा...
<<परत तुला भाव खायला वाव कि
<<परत तुला भाव खायला वाव कि तु आधी लिहिलंस म्हणुन ग्रेटर माईंड.. >> छे...... मी असे कधीच म्हणू शकणार नाही......आता तू म्हणत आहेस तर नाईलाजाने मान्य करावे लागेल.......
मस्त!!!
मस्त!!!
Pages