... 'चैत्या, अरे तुम्ही चेन्नईत असून किती रे भाग्यवान?' अशा वाक्याने बंगलोरमधली एक मैत्रीण मला पुढे एकही अक्षर उच्चारू न देता फोनवर सुरू झाली ! मागच्याच आठवड्यात शुभा मुद्गलांचं गाणं ऐकायला गेल्याचं मी तिला सांगितलं होतं. आणि तिने मला या आठवड्यात चेन्नईत होणार्या श्रीमती वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली यांच्या 'सह-गान' बद्दल सांगायला फोन केला होता.
माझ्या पत्रिकेत त्या दोन आठवड्यात 'संगीत-घबाड' योग असणार खास ! (संगीत-घबाड हा शब्द माधव यांच्याकडून साभार :))
आधीच्या आठवड्यातली शुभा मुद्गलांची चांगली अडीच तास रंगलेली मैफल अजून कानात घुमत होती. मैफलीच्या शेवटी भैरवीत गायलेलं कबीराचं निर्गुणी भजन 'रस गगन गुफा में अजर झरे' हे तर मैफलीनंतर कित्येक दिवस कानात रुंजी घालत होतं आणि त्यात या आठवड्यात हा 'सह-गान' कार्यक्रम !
शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात करायच्याही आधीपासून कुमारांवर नितांत श्रद्धा! अर्थात, त्यांच्या 'उड जायेगा हंस अकेला' मुळे.पूर्वी दूरदर्शनवर रविवारी एक 'यूजीसी' प्रोग्राम लागायचा, त्याच्या आधी, एक नाव पाण्यातून चालली आहे आणि तिचं वल्हं पाणी कापतंय असं चलच्चित्र असायचं. पाण्यावर सूर्याचे किरण चमकायचे आणि वल्ह्याचा 'चुबुक' असा आवाज येत असायचा. त्याच्या बरोबर हे 'उड जायेगा हंस अकेला' असायचं. वल्ह्याचा आवाज त्या भजनी ठेक्यात मिसळून असायचा.ह्या सगळ्या दृक्श्राव्य परिणामामुळे असेल, पण 'उड जायेगा हंस अकेला' हे खास आवडीतलं. जसजसं शास्त्रीय संगीत अधिक ऐकलं जाऊ लागलं तसं त्या क्षेत्रातल्या या जादुगाराबद्दल अधिकच आकर्षण निर्माण झालं. कुमारांची राग मांडण्याची पद्धत, रागातल्या स्वरांबरोबरच शब्दांमधलंही सौंदर्य दाखवण्याची तरलता ह्या सगळ्याच गोष्टी श्रोत्यावर गारूड करतात. या बरोबरच कुमारांचा वक्तशीरपणा, मैफलीबद्दलचा काटेकोरपणा इ. बद्दलही ऐकायला वाचायला मिळून कुमारांवर प्रेम जडलं. पु. लं च्याच भाषेत सांगायचं तर कुमारांच्या स्वरांचं हे 'न उतरणारं भूत' आहे!'
"कुमारांचं गाणं प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही ह्याची खंत भरून काढता येईल"अशा विचाराने कार्यक्रमाला गेलो आणि तुडुंब प्रसन्न झालो. तिकिटं कार्यक्रमस्थळीच मिळणार होती म्हणून वेळे आधीच तिथे पोहोचलो. कार्यक्रम अगदी वेळेत सुरू झाला. खास निमंत्रितांसाठीच्या रांगेच्या बरोब्बर मागच्या रांगेत जागा मिळाली. अशा मोठ्या कलाकारांना त्यांची कला सादर करत असताना जवळून बघायला मिळणं ही माझ्या दृष्टीनं नशिबाची गोष्ट आहे. वसुंधराताई आणि कलापिनी यांनी संध्याकाळच्या वेळेला साजेसा 'मारु-बिहाग' निवडला होता. वसुंधराताईंचं वय ८१ आहे, हे त्यांच्या गाण्यात जाणवतही नव्हतं. मारू-बिहागाच्या आलापात वसुंधराताईच बाजी मारत होत्या. 'रसिया हो ना जाओ बिदेस' अशी मारू-बिहागातला विरह अधिक प्रकट करणारी विलंबित एकतालातली रचना त्यांनी सादर केली आणि मग 'सुनो सखी सैय्या जोगिया बन जाय' अशी द्रुत तीनतालातली रचना आणि शेवटी अजून एक द्रुत एकतालातली रचना त्यांनी सादर केली. साधारण तासभर तरी मारूबिहाग रंगला असेल. मैफलीत पुढे त्यांनी 'गौड मल्हार' गायला. यूट्यूबवरती कुमारांनी गायलेली एक गौड मल्हारातली चीज आहे (सह्याद्रीच्या पाऊलखुणा कार्यक्रमातली) तीच कलापिनी कोमकलींनी सादर केली.
'आमरैय्यन के बिरखन के-
-पातन पर पटभेजन बूंदरिया चमके |
तर तर झरना झरवन लागी
नजर पडी ललचैयन के |
ताल पे दादुर डूंगर मुरवा
डार पे कोयल बोले शोकरंग
भूम हरी अरु पात भरी,
रितू बरखा रंग लैयन के |
आहाहा, बरखा रितूचं इतकं सुंदर वर्णन आणि तितकंच गौड मल्हाराच्या स्वरांचं एक वेगळंच रूप डोळ्यासमोर उभं राहिलं. जी गायनशैली कुमारांची, तीच तंतोतंत कलापिनी कोमकलींची. डोळे मिटून ऐकलं तर क्षणभर तरी का होईना, कुमार गातायत असंच वाटतं.
यानंतर त्यांनी एक दादरा गायला.
त्याचेही शब्द सुंदर होते. 'मै तोड लायी राजा, आम तोड लायी राजा' वसुंधराताईंच्या गाण्यावरून असं वाटत होतं की त्या मिटलेल्या डोळ्यांसमोर त्यांचा 'राजा' त्यांना दिसत असेल खास ! तो नक्कीच ऐकतोय, या भावनेनं त्या गाताहेत असंच वाटलं.
कुमारांचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व पाहता, त्यांनी माळवा प्रांतातल्या लोकसंगीताचा केलेला अभ्यास आणि त्याचा वापर हा दुर्लक्षिला जाऊच शकत नाही. या कार्यक्रमात त्या माळव्याच्या लोकसंगीताची एक झलक म्हणून 'तीज का गीत' ही ऐकायला मिळालं. फार आकर्षक चाल, तितकेच हृदयाचा वेध घेणारे शब्द (शब्द नीट उमगले नाहीत पण अर्थ समजला) एक अतिशय रम्य अनुभव.
'दळ रे बादळ बीज चमक्यो हे तारा
सांझ परे पियू लागे प्यारा |' असे ते शब्द होते.
नायिकेचं नायकाबरोबर काही शाब्दिक भांडण झालं आणि तो रागानं निघून गेलाय. त्यात आभाळ भरून आलं आणि नायिका अजूनच अस्वस्थ झाली. इतक्यात त्या भरून आलेल्या आभाळात तिला एक तारा दिसला आणि तिला आपल्या 'प्रिया'ची अजूनच तीव्रतेनं आठवण आली. मग ती स्वतःलाच कोसत असं म्हणते की (इथे ती नायिका म्हणते की तिच्या सख्या तिला म्हणतात हे ठाऊक नाही)
क्यो रे जबाब करो सजणा संग?
ज्वाबे करोनी तो पापे भरोनी | (तू अशी का भांडलीस त्याच्याबरोबर? आता भोग हे पाप... असा काहीसा अर्थ असावा)
हे गीत संपूच नये असं वाटावं इतका त्याचा ठेका आणि ती चाल वेधक होती. पण शेवटी वेळेची मर्यादा असल्याने कलापिनी कोमकलींनी मैफलीच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात केली; 'निर्गुणी भजन'!!
कुमार=निर्गुणी भजन असं समीकरण व्हावं इतकं अद्वैत कुमारांचे स्वर आणि कबीर, गोरखनाथ आदींच्या शब्दांचं आहे.
भजनी ठेका किंवा कहरवा हा कुमारांनी निर्गुणी भजनासाठी फारच वेगळ्या वजनात वापरला. काही वेळा तो ठेकाच त्या भजनाच्या 'निर्गुणत्वा'ची पूर्ण जाणीव करून देतो.
निर्गुणी भजनात त्यांनी एकूण ३ निर्गुणी भजनं थोडी थोडी गायली.
१- निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, गाऊंगा
२- गुरुजी मै तो एक निरंजन ध्याऊ जी
३- धुन सुन के मनवा मगन हुवा रे
हे सगळं 'स्वर-कौमार' कानात साठवत घरी गेलो. अतिशयोक्ती वाटेल, पण 'निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा' हे निर्गुणी भजन, 'दळ रे बादळ बीच' हे लोकगीत आणि 'आमरैयन के बिरखन के' हा गौड मल्हार नंतरचे अनेक दिवस कानात घुमत होते. (आजही घुमतायत) इंटरनेटच्या कृपेने कुमारांचं आणि वसुंधराताईंचं एकत्र गायलेलं 'निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा' हे भजन यूट्यूबवर मिळाल. तोही दुवा येथे देईनच. ते ऐकलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे, ज्याच्यासमोर मृत्यू उभा आहे असा एक निस्पॄह योगी. मृत्यू समोर असूनही तो 'निर्भय' आहे. कारण त्याने 'निर्गुण' जाणलंय.
आणि तेच तो मृत्यूसमोरही गाणार आहे! जितका मृत्यू शाश्वत आहे तितकीच त्या योग्याची 'निर्भयता' सत्य आहे.तितकाच त्याच्या आत्म्यापर्यंत भिनलेला सूर सच्चा आहे!
- चैतन्य.
छान
छान
चैतन्य, सुरेख लिहिलं आहेस..
चैतन्य,
सुरेख लिहिलं आहेस..
व्वा!! सह्हीच अनुभव!! छान
व्वा!! सह्हीच अनुभव!!
छान लिहीलय चैतन्य.
कलाकारांना प्रत्यक्ष ऐकण्यात खास मजा असते....
चैतन्य, तुझा हा लेख
चैतन्य,
तुझा हा लेख कलापिनीताईंना पाठवला होता. त्यांना तो अतिशय आवडला. त्यांच्या गाण्यातला 'भाव' तू लेखनात आणला आहेस, असं त्या म्हणाल्या.
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
चिनूक्स,
तू कलापिनीताईंना हा लेख पाठवून खूपच छान 'सरप्राइझ' दिलंस.
त्यांना कसा काय पाठवलास लेख तू? त्या तुला ओळखतात का?
तसं असेल तर तू नशीबवान आहेस !!
तुला यासाठी धन्यवाद देणं खूपच औपचारिक ठरेल.
मस्त चैतन्य!! अशीच एक मैफल
मस्त चैतन्य!!
अशीच एक मैफल ह्या वर्षी नाशकात "पाडवा पहाट" ला झाली
मुकुल शिवपुत्र(आयोजकांचा जीव टांगणीला लागला होता तो भांड्यात पडला :D) आणि भुवनेश कोमकली ह्यांची.
केवळ अप्रतिम होती तीही!!
चैतन्य, फार सुरेख लिहिलं
चैतन्य, फार सुरेख लिहिलं आहेस.
कार्यक्रम नाही तरी निदान
कार्यक्रम नाही तरी निदान तुझ्या शब्दांनी थोडीफार त्याची अनुभूती तरी घेता आली.
वसुंधराताईंना कधी सोलो नाही ऐकले. पण कुमारजींनी काही निर्गुणी भजनं त्यांच्या साथीने गायली आहेत. कुमारजींच्या एक्ट्याने गायलेल्या भजनापेक्षा मला ती फार सुंदर वाटतात. त्यांची साथ म्हणजे एखाद्या रंगलेल्या मैफिलीतील सुंदर लागलेल्या तंबोर्याच्या साथीसारखी असते. वातावरण भारून टाकणारी पण गायकावर कधीच कुरघोडी न करणारी. पण ती इतकी महत्वाची असते की त्याशिवाय गायकाचे गाणे रंगूच शकणार नाही. त्यांच्या अशा दमदार पण निर्गुणी साथीवर कुमारांनी केलेली कलाकुसर - अप्रतिमच!
सुरेख! 'निर्भय निर्गुण
सुरेख! 'निर्भय निर्गुण रे'वरची सारटिप्पणी फार आवडली.
अरभाट, +१
अरभाट, +१
वा वा मस्तच एकदम...
वा वा मस्तच एकदम...
चैतन्य अनुभव छान मांडलास!
चैतन्य अनुभव छान मांडलास!
छानच.
छानच.
मस्तच अनुभव
मस्तच अनुभव
सुंदर लेख. या कलाकारांचे
सुंदर लेख.
या कलाकारांचे गाताना तल्लीन होणे बघताना, आपलेही भान हरपते.
सुरेख .. सुरेख !
सुरेख .. सुरेख !
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार!
माधव,
वसुंधराताईंनी कुमारांना केलेल्या साथीचं यथोचित वर्णन केलंत.
खूप आवडलं.
सुरेख!
सुरेख!
चैतन्य , वसुंधराताई आणि
चैतन्य , वसुंधराताई आणि कुमारांच्या भजनाच्या दुव्याबद्दल अनेक धन्यवाद !
>>ज्याच्यासमोर मृत्यू उभा आहे असा एक निस्पॄह योगी.
ठळक केलेला भाग पटला नाही. माझ्या [पुस्तकी] माहितीनुसार ही साधनेतला प्रवास दाखवणारी रचना आहे असे माझे मत. जरा समजावशील का?
चैतन्य, सुरेख लिहिलं आहेस.
चैतन्य, सुरेख लिहिलं आहेस. दुव्याबद्दल धन्यवाद.
सुंदर!
सुंदर!
नंद्या, मीही थोडा विचारात
नंद्या,
मीही थोडा विचारात पडलो तुझ्या प्रश्नामुळे.
पण थोडा असा विचार करून पाहिला तर?
- सामान्य माणूस सगळ्यात कुठल्या गोष्टीला घाबरत असेल तर तो 'मृत्यू'.
पण योगी त्याच्या साधनेच्या जोरावर हे जाणतो की 'मृत्यू'ला घाबरण्याचं काहीच कारण नाही.
म्हणूनच तो 'निर्भय' होतो. त्यामुळेच तो म्हणतोय कदाचित, की 'मृत्यू जरी समोर आला, तरी मी निर्भयपणे निर्गुणाचं गुणगान करीन.'
तू म्हणतोस तसं हे सगळंच 'साधनेतला प्रवास' असल्याने कदाचित मृत्यूच समोर असेल असं नाही.
पण मग मृत्यू नसेल तर अजून दुसरं काही असेल ज्यामुळे साधनेत खंड पडत असेल (काम-क्रोधादि षड्रिपू)
आणि कदाचित, साधनामार्गावरचा नवखा माणूस अशा कामक्रोधांना (कदाचित) घाबरतही असेल.
पण या रचनेतला योगी 'निर्भय' आहे.
आणि वर लिहिल्याप्रमाणे, 'निर्भय' या शब्दावर जोर देण्यासाठी, सगळ्यात जास्त ज्याची भीती, तो 'मृत्यू' माझ्या डोक्यात आला.
चैतन्य, सही रे, मैफल अगदी
चैतन्य, सही रे, मैफल अगदी डोळ्यांपुढे उभी राहिली. कुमारांची काही निर्गुणी भजने माझ्याकडे आहेत अनेक वर्षांपासुन त्यामधे "निर्भय निर्गुण गुणी रे" पण आहे. (आत्ता ही पोस्ट लिहिताना तेच ऐकत आहे)
त्यामधे एक "कौन ठगवा नगरीया लुटलं हो" छान आहे. आणि त्याचा अर्थ "मृत्यु" आहे.
अजुन काही ओळी "आये यमराजा पलंग चढी बैठा, नैनन आसुआँ छूटलं हो"
बाकी कोमकल्यांचे गायन अद्याप ऐकलेले नाही.
धन्यवाद चैतन्य.
धन्यवाद चैतन्य.
सुरेख लिहिलं आहेस !
सुरेख लिहिलं आहेस !
सुंदर !!
सुंदर !!
सुरेख लिहिलं आहेस
सुरेख लिहिलं आहेस
सुंदर!
सुंदर!
ऊत्कृष्ट!!!!
ऊत्कृष्ट!!!!