गोष्ट एका टिव्हीची

Submitted by -शाम on 25 November, 2011 - 21:50

ठवडाभर आधीच गावात थडकलेल्या बातमीने वातावरण चांगलच तापलेलं होतं. बायाबापे, पोरंसोरं, म्हतारीकोतारी.....सगळा गावच नानासोनाराच्या घरासमोर जमला होता. घरात नाना आणि परिवाराची लगबग चालू होती. दारात दाराबाहेरून दिसू शकेल असं एक टेबल ठेवलेलं होतं. गर्दीची उत्सूकता शिगेला पोहचली होती.

"बंड्याssss जरा इकडं ये बगू"

कोपरीचा खिसा चाळतचाळत नानासोनारानं अंगणातल्या गर्दीतून बंडयाला हाक मारली.

बंड्या म्हणजे गावातलं अत्यंत आज्ञाधारक पात्र. गावातल्या कोणीही, कधीही आणि कोणतही काम बंड्याला नि:संकोच सांगावं आणि त्याने ते पार पाडांवं.

दुसर्‍यांची अशी कामं करण्यात त्याला कोण धन्यता वाटायची. पण तितकाच आगाऊ होता.

"काय वो नाना?"

"हे आप्रेटरचं बराचं येळ चालल तवर टपरीतून अर्धा शिवाजी आण बगू"

त्याच्या हातावर दिड रुपए टेकवीत नाना खुर्चीत रेलला.

"अर्धा कम्हून? त्यो काय चांगला दिसतोय व्हय?...ना हात, ना पाय...त्या परीस आख्खा आणू का?.. घोड्यासकट..?"

" व्हय..व्हय... आख्खा आण. आन माह्या बोकांडी घाल भडब्या..आरं बिड्या आण...अर्धा बंडल..शिवाजीच्या"

"ऑ....शिवाजीच्या बिड्या आजून हायती?"

"च्यायला जातो का आता?"

नानाचा घोडा पुढच्या पायावर येताच बंड्या गर्दीतून दिसेनासा झाला.

गर्दीचं सगळं लक्ष मात्र नानाच्या घरात नव्याने आलेल्या टिव्हीच्या खोक्यावर होते. गावातला हा पहिलाच टिव्ही होता. या आधी टिव्हीचं तोंड पाहिलेली माणसं सुध्दा गावात मोजकीच होती. त्यांनी आपल्या टिव्हीयअनुभवाने आठवडाभर रान पेटवल्यामुळे प्रत्यक्ष टिव्ही आल्यावर नानाच्या अंगणात ही गर्दी झाली होती. खोक्यासोबत आलेला ऑपरेटर अँटेनाची जुळवाजुळव करत होता. अधून मधून तोंडात धरलेली तंबाखूची गुळणी थुंकण्यासाठी तो बाहेर जायचा आणि पुन्हा घरात येऊन काम सुरू...

पण बाहेर जाणं आणि आत येणं काही सोपं नव्हतं. शेवाळलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा तसा तोल सावरत आणि दाराबाहेर बसलेल्या माणसांच्या मांड्या वाचवत तो जा ये करत होता. मधेच एखाद्याला

" रस्ता सोडाsss"

म्हणताना त्याच्या बोळकंभर साचलेल्या लाळेचा संयम सुटत होता. बाहेर बसलेली सगळी गर्दी माना उंच करून त्याच्या सुक्ष्मातीसुक्ष्म हालचाली टिपत होती.

"टिव्हीत जिवंत माणसं चालतात बोलतात" या बापूतात्याच्या गर्दीत फेकल्याला वाक्याने उपस्थितांची उत्सूकता चांगलीच ताणली होती. आजूबाजूची पिलावळ चुळबूळ करून वातावरण सातत्याने ढवळून ठेवत होती.

अँटेनाची जोडणी पूर्ण झाल्यावर ऑपरेटरने तो बाहेर आणून भिंतीला उभा केला.

"मी सांगेन तेंव्हा असा हळूहळू फिरवायचा हा पाईप" नुकत्याच विड्या आणलेल्या बंड्याला आता ऑपरेटरने जुंपले होते.

अलीबाबाच्या गुहेची चावी आपल्या हातात मिळाल्याच्या आनंदात पाईप धरून मिचमिच्या डोळ्यांनी बंड्या गर्दी निहाळत उभा राहिला.

आता मुख्य प्रसंग टिव्हीच्या अनावरणाचा होता. खोक्याच्या पट्ट्या सोडून टिव्ही टेबलावर ठेवताना

"रामान्हाई आलाय का?" असा प्रश्न नानाने अंगणातल्या संसदेत मांडला.

"याला आत्ता हजामत करायची का काय?" असा प्रतिप्रश्न गर्दीतून उगवत असतानाच.

"आलोय आलोय" असं म्हणत हात वर करून लांबूनच राम्याने हजेरी दिली. दुतर्फा गर्दीची डोकी चोळतं तो आत प्रवेशता झाला.

"पुजेचं काही सामान आणलंय का?"

नानाच्या प्रश्नाने राम्याला बोलावण्याचे कारण स्पष्ट झाले.

राम्या गावात न्हावी कम पुजार्‍याचे काम करायचा. गावात ब्राम्हण नसल्याने आणि राम्याच्या बर्‍याच आरत्या, मंगलाष्टके, श्लोक वगैरेंचे पाठांतर असल्याने लग्नापासून दहाव्या पर्यंतचे गावातले सर्व धार्मिक विधी राम्या यथासांग पार पाडायचा. नानानेही टिव्हीच्या पुजेसाठीच त्याला बोलावले होते.

"व्हय व्हय आणलय की, आधी एक ताट मागवा बरं" असं म्हणून त्याने धोकटीतून एक एक वस्तू काढायला सुरूवात केली.

वाटी,साबण,ब्रश,वस्तरा,कात्री....

"आरं बास बास, यानी पुजा करायची का काय?"

"नाना आवो पुजेचं सामान खालीये, पुजा काय रोज रोज आस्ती व्हय सामान वर ठेवायला?"

राम्याचं हे वाक्य संपेपर्यंत कापूर, अगरबत्ती, गुलाल्, तांदूळ आदी वस्तू ताटात आल्या होत्या.

टिव्हीवर सुपारीचा गणपती मांडून काचेवर कुंकवाचे छान स्वस्तिक काढले गेले. ताटातला कापूर पेटवून ताट यजमानांकडे सोपवत राम्या "सुखकर्ता दुखहर्ता आळवू लागला... सुमारे अकरा आरत्यांनंतर लोटांगण घालून खडीसाखर अंगणात आली आणि तीची गोडी चघळत चघळत गर्दी बसती झाली.

तांत्रीक जोडणी झाल्यावर ऑपरेटरने बटन फिरवले..

खर्रर्रर्रर र र र र sssss असा मोठा आवाज झाला आणि गर्दीने आनंदाने टाळ्या वाजवल्या, पिलावळ उड्या मारू लागली...आपल्या कुठल्याशा पराक्रमाची नोंद कुठल्याशा जागतिक विक्रमांच्या वहीत झाल्याच्या अविर्भावात नाना हात उंचावून गर्दीला दाद देऊ लागला.

बटणांच्या फिरवाफिरवी नंतर "अँटेना फिरवा" असा ऑपरेटरी आदेश बंड्याला मिळाला.

कामाचे गांभिर्य लक्षात घेऊन आज्ञाधारकपणे बंड्याने प्रथम गर्दीला मग अँटेनाला आणि मग आभाळातल्या देवाला की सॅटेलाईट्ला, पण नमस्कार केला आणि फिरवायला सुरुवात केली.

अजून थोडा पुढे, थोडा मागे... पुढे ..मागे...

अशी दहा मिनिटे कसरत झाल्यावर पंक्चरवाल्या बाळूचे तत्त्वज्ञानी विचार बंड्याला आठवले,

की "चाक जितके जोरात फिरवावे तितका डायनोमाचा उजेड तिव्र होतो" ....हे ही तसेच काही असावे असा विचार करून बंड्याने ताकात रवी घुसळावा तसा पाईप फिरवायला सुरुवात केली. पहिल्या फेर्‍यात वायर तोडून अँटेना पंख्यासारखा गरगर फिरू लागला..

ऑपरेटर आतूनच "अजून थोडा...अजून थोडा" असे ओरडत होता आणि क्षणाक्षणाला पंखा वेग घेत होता.

गर्दी टिव्हीवर खिळली होती. बंड्या घामाघूम झाला होता. दिशेचा अंदाज घेण्यासाठी ऑपरेटर बाहेर आला आणि तो पंखा पाहून त्याने स्वतःचेच बोटं स्वतःच्या तोंडात घातले.

..........................................................................................

"आलं आलं "...टाळ्यांच्या गजरात टिव्हीवरच्या त्या पहिल्यावहिल्या चित्राचं स्वागत झालं.

काही जाहिरातींनंतर समोर आलेल्या बाईच्या "नमस्कार मंडळी" या वाक्याला "नमस्कार" असा सामुहीक प्रतिसाद गर्दीने दिला.

बाईच्या संवादावर प्रतिसंवाद होत होते. पण बाई आपलं काही ऐकतच नाही हे लक्षात आल्यावर बारकू शिंपी उठला.

"नाना, बाई आम्च काय ऐकना ब्वा..सवताचच घॉडं दामटतीया..तुमीच सांगा एखादं गाणं म्हणाया आण उल्सं नाचली त् बगा"

"ये बावळ्याहो तिला काय आप्ल बॉल्न समजातय व्हय, गप बगा की"

लोक शातंतेत पाहू लागले. .....आणि पुन्हा एकदा 'खर्र र्र र्रर्रर्रर्रर्रर्र्'

सगळ्या नजरा कधी ऑपरेटर कधी अँटेना पाहू लागल्या.

"नाई नाई आता वरूनच काहीतरी झालं आसलं"

ऑपरेटरचे शब्द कानावर पडताच बंड्या लगबगीने मागच्या बाजूने जावून नानाच्या घरावर चढला.

"च्यायला इथतं काहीच नाई..पण आपरेटर ख्वाटं काम्हून बोलल?" बंड्याचं स्वगत चालू असतानाच त्याला पत्र्यावर एक मांजर दिसलं.

"या मांजरानेच काहीतरी केलं असावं"....रागारागाने पायातली चप्पल काढून त्याने मांजराच्या दिशेने भिरकावली, काय तो बंड्याचा नेम सांगावा.

मांजर, चप्पल, आणि चपलेच्या ठोक्याने अँटेना एकाच वेळी गर्दीत कोसळले.

आयवssssss...बयव..

बाबो..ssssssss अशा आवाजांनी बंड्याला परिस्थितीचा अंदाज आला..आणि त्याने पत्र्यावरून उडी मारून मागच्या मागे पलायन केलं.

बाहेर अंगणात आरडाओरडा ....... पळापळ सुरू झाली. काही माणसं थेट नानाच्या घरात शिरली...कोण कोणाला तुडवित होते काहीच कळत नव्हतं...

बराच वेळ चाललेल्या गोंधळानंतर गर्दी निवळू लागली आणि अंगणात चिल्लरपार्टी अँटेनाच्या काड्यांनी लुटूपुटूची लढाई खेळताना पाहून नानाने कपाळाला हात लावला.

............................................................................................................................................................................................ शाम.

गुलमोहर: 

मस्त!

शाम अतिसुंदर म्हणजे व्वा व्वा च
आगदी वेचुन पंच टाकलेयत Happy

अवांतर = अम्याचेही धन्यवाद लेका तु जर बोलला नसतास तर हे मिसलं असतं की Happy

शाम मस्ताय रे, पण थोडी अर्धवट संपवल्यासारखी वाटली.

>>बाईच्या संवादावर प्रतिसंवाद होत होते. पण बाई आपलं काही ऐकतच नाही हे लक्षात आल्यावर बारकू शिंपी उठला.

Rofl

कथा खुप आवडली. बर्‍याच दिवसानी अशी खुमासदार कथा वाचायला मिळाली त्याबद्द्ल धन्यवाद.

बर्‍याच दिवसानी अशी खुमासदार कथा वाचायला मिळाली त्याबद्द्ल धन्यवाद. << प्रचंड अनुमोदन.

अशा कथा हल्ली दुर्मिळ झाल्यात. हल्ली कथेत उगाच ओढून - ताणून आणि बाळबोध विनोद भरले जातात (हे माझ्या बाबतीतपण लागू.. उगाच अंगावर येऊ नये.) ही वस्तुस्थिती आहे. निखळ विनोद राहीला नाही आता.