लहानसा प्रवास

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2011 - 03:16

"रेलिंगे"

कंडक्टरला पैसे देऊन तिकिट घेऊन एस टी मधील दोन तीनपैकी एका जवळच्या मोकळ्या सीटवर उदय टेकला. हातातील लहान पिशवी वर टाकून मोठी बॅग पायाशेजारी पॅसेजमध्ये ठेवून त्याने आजूबाजूला पाहिले. अनेक प्रवासी झोपलेलेच होते. मात्र त्याच्याशेजारी असलेली एक पन्नाशीची बाई आणि तिच्यापलीकडची तिची वीस एक वर्षांची मुलगी या दोघी जाग्याच होत्या. उदयलाही प्रवासाचा शीण आलेला होता. नागपूरहून पार बीड जिल्ह्यातील या अतिशय लहानश्या गावी केवळ कोणतीतरी वनस्पती होती जिच्या अभ्यासासाठी तो आलेला होता. आणि त्याचे त्याला काही पैसे मिळणार होते. रेलिंगे हे गाव कसे आहे आणि तेथे काही सोय तरी आहे का हेही माहीत नव्हते. चौकशीतून जी माहिती मिळाली ती निराशाजनक होती. मुख्य स्टॅन्डला एस टी मिळते, तिला रेलिंगे अगदी साठच किलोमीटरवर असले तरी तेथे पोचायला तीन तास लागतात. कारण मधे असलेला प्रचंड घाट! आणि प्रत्यक्ष रेलिंग्यात एक पाटील आणि एक सधन शेतकरी सोडले तर बाकीच्यांची घरे म्हणजे दिड दोन खोल्यांची खुराडीच! राहायची सोय झालीच तर पाटलांकडे किंवा महानोर शेतकर्‍यांच्या घरी! आणि त्यांनाच थोडे पैसे वगैरे देवून तेथेच जेवायचे. बाकी गावात काहीही नाही. रुक्ष, ओसाड जमीन आणि जेमतेम एक विहीर! बास! एक शाळा आहे, जी फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी गलबलते. गावात मुख्य व्यवसाय असा काहीही नाही. लोक सहसा बीडलाच येऊन काहीतरी करतात. मात्र लांबून एक ओढा वाहतो तो उन्हाळ्यात बंद पडतो. सात आठ महिने त्याला पाणी असते. त्यातच मासे वगैरे पकडतात.

कंडक्टरने सुट्टे पैसे आणून दिले तेव्हा रात्रीचे दहा वाजलेले होते. इतकी भरलेली एस टी यावेळेस कशी काय रेलिंग्याला जात आहे म्हणून त्याने शेजारच्या बाईंना विचारले.

"आत्ता एवढी गर्दी कशी काय बसमध्ये?? रेलिंग्याला काही जत्रा वगैरे??"

" माहीत नाही... मी पण पहिल्यांदाच चालले आहे... "

"गाव तर लहान आहे असं ऐकलं... "

यावर ती बाई काहीच बोलली नाही. मात्र उदयला किळस आली होती. कुजल्यासारखा वास येत होता ती बोलल्यावर!

धक्के खात खात एस टी निघाली आणि दिवे बंद झाले.

आता उदयच्या लक्षात आले. त्या बाईच्या तोंडाला वास येत नसावा. बाहेरच्या हवेलाच तसा वात येत होता बहुतेक! किळस आली त्याला! रुमाल तोंडावर धरून तो जोप येते का हे पाहू लागला.

अचानक एक जोरात आवाज आला. जणू एखादा लोखंडाचा ड्रम दुसर्‍या मजल्यावरून खाली पडावा तसा! फटाफट दिवे लागले. उदयसकट सगळ्यांनीच मागे वळुन पाहिले. एक माणूस त्याची पडलेली बॅग वर ठेवत होता. दुसर्‍याच दोन माणसांनी आपापले डोके धरलेले होते. त्यांना बॅग डोक्यावर पडल्याने भयानक लागलेले दिसत होते. ड्रायव्हर आणि कंडक्टर मागे वळून पाहताना हासले तसा मात्र उदय भडकला. पण मनातच चिडला. काही बोलला नाही. त्याच्यामते कंडक्टरने निदान त्या दोघांना किती लागले आहे हे तरी बघायला पाहिजे होते. पुन्हा दिवे बंद होऊन एस टी चालायला लागल्यावर अचानक शेजारच्या बाईने उदयला हासत हासत विचारले...

"टाळकीच फुटली असतील नाही दोघांची??"

चीड आल्यामुळे उदय सरकला आणि त्याने विचारले..

" हासता काय?? कसले लागले असेल... "

"हो ना... फारच लागले असेल बाई.. "

पाच एक मिनिटांनी मागे अचानक शिवीगाळ आणि ओरडाआरडा ऐकू आला.

पुन्हा दिवे लागले. आता मात्र उदयने ठरवले होते की जे काय असेल ते सेटलच करायचे एकदम! तसा तो भाई माणूस होता. दमबिम द्यायला त्याला काहीच वाटायचे नाही.

मागे पाहिले तर ज्यांना बॅग लागली होती ते दोघे मागे वळून शिव्या देत देत त्या बॅग ठेवणार्‍याला जीवे मारत होते. आता मात्र कंडक्टर धावला. त्याबरोबर उदयही धावला. दोघांनी त्या दोघांना आवरले. उदयला एकाच्या डोक्यावरची जखम दिसली. रक्त भळभळा वाहात होते.

"या माणसाला अ‍ॅडमीट करायला हवा आहे..."

"हॉस्पीटल आहे कुठे रेलिंग्याला??? हॉस्पीटल बीडला.."

कंडक्टर म्हणाला तसा उदय उसळला...

"अहो बीडला आहे तर बीडला न्यायला पाहिजे ना यांना?? तसेही बीडच जवळ आहे ना??"

तो माणूस म्हणाला की 'ठीक आहे. रक्त थांबेल.'

ते ऐकून उदय चकीत झाला आणि त्याच्याकडे बघत बघत आपल्या जागेवर येऊन बसला. ती बाई म्हणाली..

"तू कशाला उठलास बे??"

"ओ मावशी... अरे तुरे काय करताय?? कशाला उठलास म्हणजे?? मारला असता त्याला त्या दोघांनी"

मावशी हासल्या पुन्हा!

त्यानंतर एक तास काहीही झाले नाही. घाट सुरू होण्यापुर्वी मात्र बस थांबली. पेंगुळलेल्या ड्रायव्हरला चहा प्यायचा होता.

रात्री एक टपरी मुद्दाम याच बससाठी उघडी असायची.

चालक उतरल्यावर वाहक आणि हळूहळू सगळेच उतरले. उदयही उतरला आणि त्या डोक्याला लागलेल्या माणसाची वाट पाहू लागला. त्यानंतर तो माणूस, लाग्ले होते तो दुसरा माणूस आणि बॅग ठेवणारा असे तिघेही उतरले. भांडणे मिटलेली होती. डोक्याच्या जखमेतून रक्त ठिबकत असले तरी कमी झालेले उदयने पाहिले.

चहा मात्र भारी होता. आले घातलेला वाफाळता चहा घेऊन मस्त वाटले.

दहा मिनिटांनी सगळे गाडीत बसले आणि गाडी सुरू झाली.

नुकताच चहा घेतल्यामुळे आता उदयला झोप येत नव्हती. त्याला टेन्शन होते मध्यरात्री रेलिंग्याला पोचून थांबायचे कुठे याचे.

अचानक पुढच्या सीटवरून एका स्त्रीची खच्चून आवाजात मारलेली किंचाळी ऐकू आली तसा मात्र उदयसारखा उदयही हादरला.

काय एकेके प्रकार चालले आहेत असे म्हणून तो उभा राहिला तर मावशींनी त्याला ओढून पुन्हा खाली बसवले.

"तिला लागलेले आहे... म्हणून ती ओरडतीय.. लक्ष देऊ नकोस... भयंकर लागले आहे तिला... "

तोवर पुन्हा दिवे लागले होते. ती स्त्री आता मात्र नॉर्मल दिसत होती. कंडक्टर तिच्याकडे आणि तिच्या नवर्‍याकडे बघून जोरजोरात हासत म्हणाला...

"प्वाट फाडल्यागत वराडतीय जनू"

त्याबरोबर तो माणूस आणि ती स्त्रीही हसू लागले. मग सगळ्याच गाडीतून हासण्याचा आवाज आला. ड्रायव्हरने हासत हासत दिवे बंद केले आणि गाडी पुढे जाऊ लागली.

विचित्र मनस्थितीमुळे झोपू न शकणार्‍या उद्यला अचानक पुन्हा शेजारून मावशींचा आवाज आला.

एखाद्या वेडीने खिजवणार्‍या आवाजात विचारावे तसे मावशींनी विचारले.

"रेलिंग्याला जायचंय??? सगळ्यांनाच जायचंय... "

असे म्हणून मावशी हसू लागल्या. अंतर कमी असल्यामुळे उदयला स्पष्ट दिसले. मावशींचे डोळे पूर्ण बाहेर आलेले होते. दातांचे सुळे झालेले होते.

बसल्याजागी घाम फुटला त्याला! तोवर गाडीतून अचानक किंकाळ्या सुरू झाल्या. ऐकवेनात अशा किंकाळ्या!

सामान पडू लागले. अंधारच होता. गाडी चालली मात्र व्यवस्थित होती.

आता दिवे लागले. हादरलेल्या उदयने सगळीकडे पाहिले. किंकाळ्या मारणारे सगळेच हासर्‍या चेहर्‍याने किंकाळ्या मारत फक्त उदयकडेच बघत होते. सामान अस्ताव्यस्तपणे पडलेले होते. सर्वच प्रवाश्यांना प्रचंद जखमा झालेल्या होत्या. रक्त वाहू लागले होते. काहींचे अवयव तुटलेले होते. शेजारची मावशी आणि तिची मुलगी आता भेसूर आवाजात हासत होत्या. मागे वळावेही न लागता ड्रायव्हर १८० मध्ये मान मागे वळवून हासत हासत गाडी मात्र पुढेच चालवत होता. कंडक्टर मात्र मरून पडलेला होता. आणि अचानक ड्रायव्हर म्हणाला...

"आलं रे... ते वळण आलं... "

किंकाळ्यांचा आवाज आता दहापट वाढला. सर्व प्रवासी उभे राहून किंकाळू लागले. उदय गोठलेल्या देहाने काय होत आहे ते फक्त पाहूच शकत होता.

आणि पुन्हा ड्रायव्हर ओरडला.

"घालतो रे खाली गाडी... आज सहा वर्षे झाली... नेम चुकला नाही माझा.... "

सहा वर्षापुर्वी याच स्पॉटला एक एस टी दरीत कोसळलेली होती. तेच सर्व प्रवासी त्याच रात्री अशीच एक एस टी घेऊन एकच नवा प्रवासी घ्यायचे. गेली पाच वर्षे दरीत त्याच तारखेच्या दुसर्‍या सकाळी एक अनोळखी प्रेत मिळायचे इतकेच!

===================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Mastay

Pages