----- वेड्याच गाणं ------

Submitted by Ramesh Thombre on 15 November, 2011 - 00:40

तो तसा पागल आहे
डोळ्यावर त्याच्या गॉगल आहे
कधी कधी हसत नाही
रिकामाही बसत नाही.

हातात घेऊन एक काठी
वन-वन फिरत असतो
शांत सावलीत कधी बसून
उन्हा सारखा झुरत असतो.

त्याची कहाणी कळत नाही,
धागा सुद्धा मिळत नाही.

जाता जाता तो एकदा
सिनेमाला जाऊन आला.
येता येता तशीच एक
मैत्रीण सोबत घेऊन आला.

ती हि तशीच पागल असते
मधून मधून उगीच हसते .
हसनारीही पागल आहे
दिसणाराही पागल आहे !

दोघांची आता यारी आहे
ती त्याची प्यारी आहे .
दोघे खूप फिरत असतात,
चौपाटीवर चरत असतात.

तरीही तो पागल असतो
डोळ्यावर त्याच्या गॉगल असतो
कधी कधी रुसत नाही
मान लटकून बसत नाही.

आता त्याची ओळख पटली,
तशी खून सुद्धा थोडी पटली.

तो तिलाच पाहत होता
म्हणून वेड्या सारखा राहात होता

दोघे आता भेटल्यावर
रोज नव गाणं गातात,
गाणं आता संपल्यावर
पुन्हा दोघे एक होतात.

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२६ ऑक्टोबर ०९