झपाटलेला वाडा-१

Submitted by सचिन७३८ on 28 October, 2011 - 01:47

एके दिवशी सकाळीच एक एस.टी धुरळा उडवीत 'रांजुर्ले' गावाच्या पाटीजवळ येऊन थांबली. क्षणार्धात त्या बसमधून बूट घातलेली दोन पावले ऐटीत खाली उतरली. ती पावले होती अर्चित जाधव याची. थोड्याच वेळात तो त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी बघणाऱ्या गावकऱ्यांकडे ढुंकूनही न बघता सरळ समोरच्या टी स्टॉलकडे गेला आणि तेथे जाऊन स्टॉलमालकाला विचारले, "घोटेवारांचा वाडा कोठे आहे"? ते ऐकताच स्टॉलमालक थोडा वेळ शून्यात हरवल्यासारखा अर्चितकडे पाहू लागला. लगेच स्वत:स सावरून तो म्हटला, "गावात नवीन दिसतायेसा." अर्चितने मानेनेच होकार दिला. तेव्हा स्टॉलमालकाने त्यास सांगितले, "थकला-भागला असाल, तवा जरा च्या पिवा अन् मग जावा फुडं." अर्चितने जरा नाराजीनेच होकार दिला आणि तो तेथील एका लाकडी खुर्चीवर बसून चहा येण्याची वाट पाहू लागला. त्याने सभोवार एकदा पाहिले, तेव्हा त्यास जाणवले कि आजुबाजूचे गावकरी त्याच्याकडे खुळ्यागत बघत आपापसात कुजबुजत होते. अर्चितला तो प्रकार जरा खटकला. तेव्हढ्यात "गरमागरम चाय" अशी आरोळी ठोकत स्टॉलमालकाने त्याच्या पुढ्यात चहा आणून ठेवला. अर्चितने चहा पीता-पीता आजुबाजूला बघतांना त्याला जाणवले कि ते गावकरी अजूनही त्याच्याकडे बघून आपापसात चर्चा करतायेत. "विचित्रच असतात जरा खेडेगावातील माणसे" अर्चित स्वत:शीच पुटपुटला. चहा संपवून त्याने स्टॉलमालकाला बिल चुकते करण्याकरिता पैसे दिले आणि त्याच्याकडून सुट्टे घेतांना स्टॉलमालकाच्या डोळ्यांत दिसलेली विचित्र चमक अर्चितच्या नजरेतून सुटली नाही. त्यानंतर त्याने स्टॉलमालकास घोटेवारांच्या वाड्यासंबंधी पुन्हा एकदा विचारणा केली. "टांग्यातून जावे लागेल", असे त्रोटक बोलून स्टॉलमालक पुन्हा एकदा आपल्या कामात गढून गेला. मग अर्चितने समोरच उभ्या असलेल्या ३-४ टांगेवाल्यांकडे घोटेवारांच्या वाड्याकडे चालण्यासाठी विचारले. त्या टांगेवाल्यांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केले. त्याचा अर्थ अर्चितला समजला नाही. तो तसाच स्तब्ध उभा राहून टांगेवाल्यांकडे पाहत होता. तेव्हढ्यात एका टांगेवाल्याने पुढे येऊन होकार दर्शविला. अर्चित लगेच समान घेऊन टांग्यात बसला. आता टांगेवाला टांगा हाकू लागला आणि थोड्याच वेळात टांग्याने जोर पकडला. अर्चित आजुबाजूस कानोसा घेत टांग्याचे निरीक्षण करू लागला. काहीतरी चुकतेय असे त्याला तत्क्षणी जाणवू लागले. त्याने आठवायचा खूप प्रयत्न केला कि काय चुकतेय पण ते त्यास उमगेना. मग त्याने टांग्यातून बाहेर डोकावून बघून गावाचा अंदाज घेण्यास सुरुवात केली. इथेही काहीतरी चुकतेय असे त्याचे मन सांगू लागले. पण तेही त्याला आठवत नव्हते. मग त्याने तोही नाद सोडून दिला. तेव्हढ्यात टांगेवाला ओरडला, "घोटेवारांचा वाडा." अर्चित त्या अवचित आलेल्या आवाजाने थोडा दचकला. पण पुढच्याच वेळी स्वत:स सावरून तो, "अं, हो हो, आला का वाडा"? असा उच्चार करून टांग्यातून खाली उतरला. "दहा रुपये" टांगेवाल्याने म्हटले. अर्चितने सुट्टे त्याच्या हातावर टेकविले, आणि तो वाड्याकडे जाण्यासाठी मागे वळला.
वाडा? त्याला वाडा म्हणणे चुकीचे होईल. राजवाडा म्हणावे एव्हढा तो वाडा (?) भव्य होता. आपण त्याला सोयीसाठी वाडाच म्हणूयात. बाहेरून एकदम शांत भासणारा तो वाडा आणि त्याची भव्यता पाहून अर्चितच्या तोंडातून नकळतच, "वॉव" निघून गेले. अर्चित लगबगीने आपले सामान सांभाळत त्या वाड्याच्या दिशेने मार्ग आक्रमू लागला. वाड्याच्या प्रवेशाचा दरवाजाही भव्य म्हणजे दहा फुट भरेल एव्हढा होता. दरवाज्यालाही कुलूप असे नव्हतेच. कडीही नव्हती. नुसतेच ते दार लोटलेले वाटे. अर्चित ते दार उघडण्यासाठी पुढे जाणार एव्हढ्यात सोसाट्याचा वारा आला आणि दार आपोआप (कि वाऱ्याच्या झोताने) उघडले गेले.
अर्चित मनाशीच नवल करीत वाड्याच्या पटांगणात प्रवेश करता झाला. जवळपास २५-३० पावलांवर तो वाडा शांत उभा होता. तो मागे वळून प्रवेशद्वार लावण्यासाठी वळला आणि त्याने दार लोटून घेतले. क्षणभर तो चमकला कारण बाहेरून जरी दारास कडी नसली तरी आतून मात्र कडी होती. ह्याचे आश्चर्य करताच त्याने कडी लावली. तेव्हढ्यात त्यास आठवले कि मघाशी आपले काय चुकले होते. टांग्यात एकाही देवाचा फोटो नव्हता आणि टांग्यातून बाहेर गाव न्याहाळून बघतांना त्याला निदान एकतरी मंदिर दिसले नव्हते.

क्रमशः

गुलमोहर: 

मला लिखाणाचा काहिच अनुभव नाहीये. माझा हा पहिलाच प्रयत्न. तरी काही चुका असतील तर माफ कराव्यात.

मलाही आवडला हा पहिला भाग! आपल्याला अनेक शुभेच्छा! Happy

काही निरिक्षणे:

१. टांग्याचा उल्लेख झाल्याने 'काही प्रमाणात' काळ निश्चीत होऊ शकेल. (अर्थात, अजूनहि काही गावात टांगे असतील हे कबूल, पण प्रामुख्याने पाहिले तर एक जुना काळ निश्चीत होईल.)

२. भागाची लांबी थोडी वाढल्यास अधिक आवडेल असे वाटले.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

chhaan ahe

laambi. vaadhvaa....ani gudh...aaramaat yeu dya jast vel rahudyat...shevat ghatnaa todun karaa....

last and imp...... LAVAKAR PUDHCHAA BHAAG LIHAA.. Happy

मस्त लिहित आहात. पहिला भाग आवडला.
काही सूचना कराव्याशा वाटतात -
१.घटनेनुसार परिछेद बदललेत तर वाचताना एक प्रकारचा flow येईल. ज्याने कथा अजून रंजक होईल.
२.>>निदान एकतरी मंदिर दिसले नव्हते>>> ऐवजी "एकही मंदिर दिसले नव्हते" हे जास्त समर्पक वाटते का?
३. काही वाक्यात कथेपेक्षा प्रसंगवर्णन वाटते आहे. उदा - >>क्षणार्धात त्या बसमधून बूट घातलेली दोन पावले ऐटीत खाली उतरली. ती पावले होती अर्चित जाधव याची. थोड्याच वेळात तो त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी बघणाऱ्या गावकऱ्यांकडे ढुंकूनही न बघता सरळ समोरच्या टी स्टॉलकडे गेला>> हेच "बसमधून अर्चित खाली उतरला. आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी बघणाऱ्या गावकऱ्यांकडे ढुंकूनही न बघता सरळ समोरच्या टी स्टॉलकडे गेला." असे काहीतरी केले तर जास्त सहज वाटेल.

(ही झाली माझी मते. आपल्या चुका काढायचा इरादा अजिबात नाही आणि असेच लिहा असा आग्रहही नाही)

पु.ले.शु.

खुप छान झाला आहे पहिला भाग
नविन आसुन सुद्दा छान जमल आहे
लिहित रहा सवयीने आजुन छान जमेल
आपल्या पुढील लेखनाला खुप खुप शुभेछा!