सत्यवचनी++ प्रायव्हेट लिमिटेड

Submitted by बेफ़िकीर on 19 October, 2011 - 07:18

पित्रेने घरात पाय टाकला आणि समोर पाहतो तर सोफ्यावर एक माणूस बसलेला! आकाशी शर्ट आणि डार्क निळी पॅन्ट घालून बसलेल्या त्या माणसाचे लक्ष एका भिंतीकडे होते आणि तो कोरड्या ठण्ण चेहर्‍याने भिंतीकडे पाहात होता. पित्रे आल्याचे त्या माणसाला काहीही वाटले नव्हते. आपल्याच घरात एक माणूस संध्याकाळी येऊन बसलेला आहे आणि आपल्याकडे बघतही नाही आहे याचा पित्रेला फार राग आला. एक तर ऑफीसमधून आल्यावर जरा आरामात टीव्ही पाहात पाय पसरून बसावेसे वाटते. कोणी आलेले असले की वैताग येतो. पण हा माणूस नुसताच आलेला नव्हता तर पित्रेकडे ढुंकून न बघता समोरच्या भिंतीकडे बघत बसला होता. आता पित्रेला कितीही राग आलेला असला तरी घरी आलेल्याशी नीट बोलायला लागते म्हणून शूज काढताना पित्रे हसून म्हणाला...

"नमस्कार......"

"........."

"आपण????"

"...."

"हॅलो???"

तो माणूस ढिम्म होता. पित्रेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता तो भिंतीकडे टक लावून पाहात होता. त्यातच पित्रेला जाणवलेली बाब म्हणजे त्या माणसाची पापणी लवतच नव्हती.

"अहो... आपण कोण??"

पित्रेने अजूनही आवाज नॉर्मलच ठेवलेला होता. याहीवेळेस तो माणूस काहीही बोलला नाही मात्र पित्रेची पत्नी अनु स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिला पित्रेची चाहुल लागली होती.

"अहो.. काय झालं?? असं काय बघताय??"

"हे कोण आहेत??"

"हे???... हे यंत्र आहे... "

दमलेला पित्रे सोफ्यावर बसून खूप हासला. अनु त्याच्याकडे बघत शांतपणे उभी होती.

"चहा ... चहा कर... आणि हे बघ... मी ऑफीसमधून खूप दमून येतो... मला आल्या आल्या इतकं हासणं जमत नाही... यांचं आडनांव काय??

"यंत्राला आडनांव असतं का??"

पित्रे सोफ्यावर आडवा होऊन हासला. डोळ्यात पाणी येईपर्यंत हासून झाल्यावर त्याने विचारले.

"बर चल थट्टा खूप झाली... आता चहा कर... कोण आहेत हे???"

अनु आत गेली आणि एक मोठे ब्रोशर घेऊन बाहेर आली आणि ते ब्रोशर तिने पित्रेसमोर आपटले.

त्या ब्रोशरवर आकाशी शर्ट आणि डार्क निळी पँट घातलेल्या अनेक पुरुषांचे फोटो होते. त्यावर शीर्षक होते:

'सत्यवचनी रोबो सप्लायर्स प्रायव्हेट लिमिटेड'

खाली माहिती दिलेली होती.

'आमच्याकडे विविध वयाचे, विविध आकारमानाचे सत्यवचनी रोबो मिळतील. ते माणसासारखेच दिसतात व वीजेवर चालतात. त्यांना सांगितलेली कामे ते निष्ठेने करतात. त्यांना मन नसते मात्र बुद्धी असते. ते फक्त खरे बोलतात. खोटे वचन ऐकल्यास ते धाडकन जमीनीवर पडतात व बंद होतात. मात्र ते प्रचंड कामे करू शकतात. त्यांना अन्न व पाणी लागत नाही. ते स्वतःहून काहीही बोलत नाहीत. विचारले तर मात्र हवे तितके बोलतात. त्यांच्यात आम्ही त्रेचाळीस हजार विविध भाषांमधील गीते इन्स्टॉल केलेली आहेत. ती ऑन केली की हे रोबो हात हालवून रागात गाऊ लागतात. एक काम करून संपले की त्यांना त्या कामाची दिलेली इन्स्ट्रक्शन ऑफ करावी लागते. अन्यथा ते तीच अ‍ॅक्शन करत राहतात. ते झोपत नाहीत. एका कोपर्‍यात कितीही वेळ उभे राहू शकतात. रात्री ते लिव्हिंग रूमच्या एका कोपर्‍यात उभे करून ठेवता येतात. महिन्याला एक हजार अशा अत्यंत अल्प मूल्याने हे रोबो भाड्याने मिळतात. यांना वॉरंटी मात्र नाही. एक रोबो बिघडल्यास पैसे परत मिळणार नाहीत. दुसरा रोबो उपलब्ध असल्यास मिळू शकेल. या रोबोंमध्ये सोळा संस्कृतींच्या नृत्याच्या कमांड्स आहेत. ते नाचू शकतात! सत्यवचनी रोबो घरी न्या व आयुष्य सुखी करून घ्या - संपर्क करण्यासाठी आमचे नंबर्स' वगैरे वगैरे!

पित्रेने ते ब्रोशर पाच वेळा वाचले. प्रत्येकदा वाचले की तो एकदा त्या रोबोकडे पाहायचा. रोबो शांत होता.

"अनु... हे काय केलंस तू??"

"अहो बाई काम सोडून गेली... शेवटी आपण पैसा आपल्या सुखासाठीच कमवतो ना?? म्हणून मी हे यंत्र आणलं आहे. "

"अगं पण काय हे??... तो असा का बसलाय??"

"अजून चालू नाही केला तो... अहो... करा ना चालू???"

"हॅ! काहीतरी काय... देऊन टाक ते परत..."

"अहो... मी तुम्हाला न सांगता एक गोष्ट केली आहे.. मी त्यांचे हजार रुपये देऊन टाकले.. "

"मग देतील की ते परत??"

" नाही देत... तशी अट आहे.."

"अनु... मला विचारायचंस तरी??"

"सॉरी अहो... पण हे यंत्र उपयोगी पडतं म्हणे.. "

" प्रॉब्लेमच आहे... हे चालू कसं करायचं??

"ही वायर घ्या... जोडा... "

"मग तूच का नाही जोडलीस??"

"श्शी! ती त्याच्या कंबरेला जोडायचीय... मी कशी जोडीन??"

"आयला तो काय माणुस आहे होय?? "

पित्रेने वायर रोबोत घुसवली. स्विच ऑन केले आणि दोघेही दहा फूट अंतरावर जाऊन घाबरून उभे राहिले. रोबो हालेचना!

"अहो... चालू का नाही झाला हो तो?? "

"भारनियमात बनवलेला असेल.."

"अहो काहीतरी करा ना??"

"ह्यॅ! आपण नाही जाणार जवळ... च्यायला उडलं बिडलं म्हणजे काय एकदम??"

अचानक रोबोचे एक हिरवे बटन लागले.

"झाला झाला... चालू झाला... " पिक्चर चालू झाल्यासारखे अनु बोलली.

डोळे फाडून दोघे रोबोकडे लांबून बघत होते.

"मला काम सांगा.... मला काम सांगा... मला काम सांगा... मला काम सांगा... "

रोबोने याच वाक्याचा जप सुरू केला. तो काम सांगायला सांगत आहे हे पाहून पित्रे आणि अनुने एकमेकांकडे हर्षातिरेकाने पाहिले.

"अहो... सांगा ना त्याला काम"

"काय सांगू???"

"अं?? ... भांडी आवरायला सांगा... "

"ए... ए चमन... जरा भांडी आवर.."

रोबो एकेक पाऊल पुढे टाकत किचनमध्ये जाऊ लागला. हे दोघे भेदरून बाजूला झाले त्याच्या वाटेतून! रोबो ओट्यापाशी गेला व काही सेकंद थांबला.

त्याच्यातून आवाजही आला.

"चेकिंग द पोझिशन... चेकिग द पोझिशन..."

मागे कोणाच्या तरी घरात त्याने भांडी आवरायचे काम केलेले असल्याने तोच अनुभव आत्ता कामाला आला. त्या घरात भांडे हातात घेऊन समोर असलेल्या शेल्फमध्ये ठेवायचे असे काम त्याने दोन महिने केलेले होते. येथेही त्याने एक भांडे उचलले. पित्र्यांच्या घरातील शेल्फ उजव्या बाजूला होते. समोर नव्हते. समोर खिडकी होती आणि पित्र्यांचे घर सहाव्या मजल्यावर होते. रोबोने मोजून तीन पातेली खिडकीतून बाहेर टाकून दिली. तोवर हे दोघे धावले होते. आता पित्रेने रोबोला धरले. तरी रोबोच्या शक्तीपुढे त्याचा निभाव लागेना! रोबो भांडी उचलून खिडकीपाशी नेतच होता. पित्रेच्या बायकोने प्रसंगावधान राखून रोबोचे कनेक्शन काढले.

बंद झालेल्या रोबोला पित्रेने लाथा घातल्या. सत्यवचनी रोबो या कंपनीला त्याने फोन लावला.

" बोला???"

"हां सत्यवचनी का??"

"बोला??"

"मी पित्रे बोलतोय...."

"बोला???"

"हे कसलं यंत्र आहे तुमचं??? भांडी खाली फेकतंय???"

"बोला???"

"अहो तुमचा एक रोबो आम्ही घेतलाय तो भांडी आवरायचे काम दिल्यावर भांडी उचलून खाली फेकून देतोय खिडकीतून"

"बोला???"

"अहो बोला काय बोला??? हे यंत्र बदला... "

"बोला??"

पित्रेने भडकून फोन बंद केला तसे पत्नीने विचारले.

"काय झाले हो??"

"फोन घ्यायलाही रोबो ठेवलाय त्यांनी.."

"आता काय करायचं हो???"

"आता विचारतीयस?? हे डबडं आणायच्या आधी नाही सुचलं तुला???"

"गेले का हो आता पैसे???"

"मग काय आता?? हे यंत्र नीट चालवता तर आलं पाहिजे... "

"अहो... ह्याने आत्ता भांडी खाली फेकली ते काम अगदी कचरा खाली फेकण्यासारखं होत की नाही???"

पित्रेने चमकून अनुकडे पाहिले. पित्रेला पुन्हा एकदा अनुच्या बुद्धीमत्तेची स्तुती कराविशी वाटली.

"हुषार आहेस..."

अनु सुखावून रोबो ढकलत टेरेसमध्ये न्यायला लागली. तेवढ्यात बेल वाजली. एक म्हातारा उपटला होता दारात.

"कोण पाहिजे???"

"थोबाड फोडू का??"

"आँ?? ओ काका... काय बोलता??"

"हरामखोरांनो वरून भांडी फेकता??? माझ्या डोक्याला पोचे आलेत... "

ते एक निराळंच भांडण झालं! त्या म्हातार्‍याला नुकसानभरपाई म्हणून चहा पाजून आणि शंभर रुपये देऊन पित्रेने कटवले तरीही आमच्याकडे रोबो आहे हे सांगितले नाही. नाहीतर शेजार्‍यांची रांग लागली असती ही त्याला भीती होती. भांडी मात्र घेतली त्याने म्हातार्‍याकडून!

तोवर अनु रोबोला ढकलत टेरेसमध्ये घेऊन गेली होती.

तेथे तिने तो रोबो ऑन करेपर्यंत पित्रेही जाऊन पोचला. रोबो ऑन झाला. मगाचची भांडी आवरायची इन्स्ट्रक्शन तशीच ठेवलेली असल्याने ऑन झाल्या झाल्या त्याने पित्रेला उचलले आणि पित्रे टेरेसवर तरंगला तेव्हा अनुने रोबो बंद केला. आता रोबोच्या पकडीत पित्रे आणि तोही टेरेसच्या बाहेर तरंगतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. पित्रे मृत्यूच्या भीतीने आवाजही काढू शकत नव्हता.

या परिस्थितीत काय करावे हेच समजत नसल्याने अनुने शेजारच्या बाबी काकांना आक्रोश करून बोलावले. हे बाबी काका पुर्वी तालमीत जायचे असे त्यांनी सांगितलेले होते. आता ते विविध महान लोकांची मुलाखत घ्यायचे काम करायचे एका मासिकासाठी! हा पित्रेचा प्रकार पाहून मात्र ते हादरले. त्याच अवस्थेत ते पित्रेला म्हणाले..

"तुमच्या या निर्णयाला कोण जबाबदार आहे असे तुम्हाला वाटते???"

"तुझा नाना... " पेटलेला पित्रे संतापून ओरडला..

" मरण्यापुर्वी तुम्हाला या जगाला काही संदेश द्यायचा आहे का??"

"होय... मरण्यापुर्वी मला उतरवून टेरेसवर घ्या असा संदेश द्यायचा आहे... "

अनु व बाबी काकांनी कसाबसा पित्रेला टेरेसवर उतरवला. उतरवल्यावर प्रथम पित्रेने छातीवर दोन्ही हात ठेवून पाच मिनिटे श्वास घेतला. नंतर तो उभा राहिला आणि तारस्वरात बाबी काकांना म्हणाला..

"थेरड्या... निघ माझ्या घरातून"

थेरडा निघाला.

इकडे पित्रेने रोबोला उचलून खाली टाकायची अ‍ॅक्शन सुरू करताना त्याला अनुने आवरले तसा पित्रे अनुवरच खवळला.

दोघांचे दहा मिनिटे भांडण झाल्यानंतर अनुने पुन्हा एकदा रोबोचे फायदे पित्रेला पटवले तसे मग दोघांनी रोबोला आणून पुन्हा सोफ्यावर बसवले. बराच वेळ भकास नजरेने पित्रे नुसता रोबोकडे बघत बसला होता, जणू घरात भानामतीच आली असावी तसा!

"हे तू कुठून आणलंस अनु??"

तोवर अनुने ते ऑन करून त्याची भांडी आवरायची इन्स्ट्रक्शन बंद केली. आता रोबो 'मला काम सांगा, मला काम सांगा' असे बडबडत राहिला.

"काय काम सांगू भडव्या तुला आता??? आमचे जीव घे???" संतापलेला पित्रे खवळून म्हणाला..

रोबो ताडकन उठला आणि पित्रेकडे धावला. पित्रेला काही समजायच्या आत त्याने पित्रेचा गळा दाबायला सुरुवात केली.

अनुने पुन्हा एकदा तो रोबो बंद केला.

आता मात्र अती झालं होतं!

पित्रे आता क्रोधाची परिसीमा झाल्यामुळे रोबोवर तुटून पडला. लाथा बुक्यांनी मारत त्याने त्या रोबोला बाहेर काढले. बाहेर काढले तर तो रोबो शांतपणे जमीनीवर पडून राहिला. तो माणसासारखाच दिसत असल्याने पित्र्यांच्या घरात काहीतरी भयंकर घडल्यासारखे आजूबाजूच्यांना वाटेल असे वाटून दोघांनी पुन्हा तो आत फरफटत आणला.

"अहो.. हा आपण परत देऊन टाकायचा का??"

"अरे वा?? अरे वा?? आली वाटतं अक्कल??? आं???"

"अहो रागवू नका ना प्लीज...???"

"रागवू नको??? मग काय करू??? कावळा बनून माझंच पिंड शिवू दहा दिवसांनी?? हा कोणीतरी तुझा कॉलेजमधला आशिक असणार... रोबो कसला आलाय??"

"तुम्ही असे बोललात तर मी निघून जाईन.."

"अवश्य... पण याला घेऊन जा..."

काही वेळ भांडण झाल्यावर दोघे पुन्हा विचार विनिमय करू लागले.

"तुला मी एक सांगतो अनु... त्याला आपण कामच सांगायचं नाही..."

"मग त्याचा उपयोगच काय??"

"मी कधी असा दावाच केलेला नाही की तू आणला आहेस त्या रोबोचा काही उपयोग होईल.."

"आता सरळ बोला की?? याला केर काढायला सांगू का??"

"नको...मला जमीनीवरून फरफटवेल तो..."

"ऑन करू का??"

"आधी ऑन केलास की ती इन्स्ट्रक्शन काढ... नाहीतर तुझा गळा धरेल..."

अनुने ऑन करताच रोबोचे हात अनुच्या गळ्याशी सरसावतच होते तितक्यात अनुने इन्स्ट्रक्शन बंदचे बटन दाबले. पुन्हा तो रोबो 'मला काम सांगा, मला काम सांगा' म्हणू लागला.

कंटाळून अनुने तो बंद करून टाकला. शेवटी उद्या हा रोबो पुन्हा देऊन टाकायचा असे ठरले आणि दोघांनी तो कोपर्‍यात उभा करून ठेवला.

आता शांतपणे दोघे रोजचे व्यवहार करू लागले. पित्रेने टीव्ही पाहायला सुरुवात केली. अनुने भाजीला फोडणी दिली.

तेवढ्यात बेल वाजली. अनुने दार उघडले आणि आनंदाने चीत्कारली.

"अय्या... अहो... आई आणि बाबा आलेत..."

बोंबललं!

पित्रेला उगाच घरी आलो असे वाटू लागले. सासरे आत आले ते सरळ पित्रे आणि टीव्ही यात मधे उभे राहून कोपर्‍यातल्या रोबोकडे बघत म्हणाले..

"बसा की हो?? तिकडे का उभे आहात??"

आता त्या रोबोने केलेले प्रताप जर या सासर्‍याला सांगितले तर हा मिनिटभरही इथे टिकणार नाही हे पित्रेच्या लक्षात आले. त्याला तो एक चांगला उपाय वाटला.

त्याने सासर्‍यांना सांगितले.

"हे खरे तर एक अतिशय उपयोगी मशीन आहे... "

सासूबाई आणि अनुही आता तेथे येऊन उभ्या राहिल्या. पित्रेने रोबो ओढत मधोमध आणला हॉलच्या!

आणि केला ऑन! रोबो बोंबलू लागला. 'मला काम सांगा, मला काम सांगा'!

अनु मनातून हादरलेली होती, पण हे यंत्र आई वडिलांना दाखवून तिलाही कौतुक करून घ्यायचंच होतं!

पित्रेने रोबोला उद्देशून सांगितले.

"हे बघ.... या मॅडमच्या आई... हॅलो म्हण??"

रोबो 'हॅलो' म्हणाला..

"हं... आता हे बघ... हे मॅडमचे वडील... ह्यांना हॅ..."

धाड!

रोबो खाली कोसळला होता.

सासरे उद्गारले.

"बॅटरी संपली वाटतं??"

"बॅटरी नाही संपली... नीतीमत्ता संपलीय जगातली.. " पित्रेने अनुकडे पाहात विधान केले.

अनु हमसून हमसून रडत स्वयंपाक घरात धावली व मागोमाग तिची आई!

"काय गं??... काय झालं??? रडतीयस का??"

आत्तापर्यंत सासरे आणि पित्रेही किचनमध्ये पोचले होते. अनु रडत रडत म्हणाली...

"खोटे ऐकले की ते मशीन खाली पडते... हे माझे बाबा नाहीत"

अनुची आई चपापली. अनुचे वडील डोळे विस्फारून तिघांकडे आळीपाळीने पाहू लागले.

झालेल्या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सासू सासरे निघून गेले तसा पित्रे सुखावला व त्याने रोबोला उठवून सोफ्यावर बसवले. अनु अजून कोसळल्यासारखी रडतच होती. पण पित्रे तिच्या रडण्याकडे ढुंकून पाहात नव्हता.

पित्रे रोबोची पाठ वगैरे थोपटू लागला. रोबो खोटे ऐकून कोसळला म्हणजे बंद पडला असे त्याला वाटत होते. रोबो चालूच होता.

पित्रे सासूबाबत रोबोला म्हणाला...

"बघितलंस ना कसं तोंड पाडलं त्यांनी??"

रोबोने खट्टकन आपली हनुवटी आपल्या छातीला टेकवून तोंड पाडून दाखवलं!

"सांग बरं एम डी म्हणजे काय??"

"महेंद्र धोनी, मशीन डिझाईन, मर्दोंकी दुनिया, मारुतीचे देऊळ"

"बास बास... "

अनु रडत रडत बाहेर आलेली होती.

पित्रेने अभिमानाने व नुकताच तिच्या आई वडिलांवर सूड उगवता आला असल्याने आनंदात तिच्याकडे व नंतर रोबोकडे पाहिले व रोबोला विचारले...

"एम डी पित्रे हे माहीत नाही तुला???"

"नाही" रोबो उत्तरला..

"अरे एम डी पित्रे म्हणजे मी... माधव दामो..."

दामोदर चा 'दामो' बोलून व्हायच्या आत रोबो पुन्हा कोसळला.

=======================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मज्जा नाही आली...अजुन धमाल यायला पाहीजे होती...हे म्हणजे तो जुना जोक वाढवून त्याची कथा केल्यासारखे वाटले

ह्यॅ! आपण नाही जाणार जवळ... च्यायला उडलं बिडलं म्हणजे काय एकदम??">>>

"कोण पाहिजे???"

"थोबाड फोडू का??">>>

Biggrin

मी मायबोलीची अगदी नियमीत वाचक आहे. तुम्ही चांगलं लिहिता हो पण लिखाणात चीपनेस जास्तच होत चाललाय. शेवट अगदीच फालतू!

मस्त