जगजीत सिंग - श्रद्धांजली

Submitted by बेफ़िकीर on 10 October, 2011 - 02:15

गझलगायकांपैकी जगजीतसिंग हे माझ्या यादीत खरे तर पंकज उधास व गुलाम अली यांच्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर होते. पण तरीही हा लेख लिहावासा वाटत आहे कारण गझल गायकीला त्यांनी एक वेगळी पातळी नक्कीच दिली.

खरे तर जाडा भरडा आवाज असूनही काही वेळा तो सॉफ्ट व्हायचा आणि गझलेतील काफियाचे सौंदर्य खुलवण्याची विलक्षण हातोटी या गायकाकडे होती.

अमीर मीनाईच्या 'सरकती जाये है रुखसे नकाब आहिस्ता आहिस्ता' या गझलेमुळे जगजीत सिंग यांना मोठीच प्रसिद्धी मिळाली.

इन्शा ( इब्ने इंशा - एक उर्दू शायर) यांच्या 'कल चौदहवी की रात थी, शबभर रहा चर्चा तेरा' या गझलेला जगजीत सिंग यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारे पेश केले. हीच गझल गुलाम अली यांनीही गायली आहे व अशाच 'एकच गझल दोन भिन्न प्रकृतीच्या गझलगायकांनी गाणे' या प्रकारामुळे दोघांमधील जातकुळीचा खरा फरक समजतो. इन्शा यांची ती गझल ज्या मूडमध्ये आहे त्याच मूडमध्ये जगजीत सिंग यांनी पेश केली. वास्तविकपणे ती गझल साधारण दर्जाचीच आहे. पण ते शेर सादर करताना जणू स्वतः इन्शाजीच सादर करत असावेत असे वाटणे हे जगजीत सिंग यांचे यशच! असा प्रकार फक्त किशोर कुमार करू शकायचे. (देव आनंद, धर्मेंद्र, नवीन निश्चल, संजीव कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ यांना आपण भिन्न भिन्न प्रकारचा आवाज दिला पाहिजे याबाबत किशोर कुमार प्रयत्नशील असायचे हे सगळे जाणतातच.) जगजीत सिंग कधीही आवाज बदलू शकले नाहीत मात्र अनेक गझलांच्या मूडप्रमाणे त्यांनी त्या गझला सादर केल्या. (गझलेला एक प्रकृती असते हे अगदी गैरमुसल्सल गझलेबाबतही मान्य व्हावे.) 'कल चौदहवी की रात' या गझलेच्या मक्त्यात 'इन्शा तेरा' असे काफिया रदीफ आहेत, मला जेव्हा माहीत नव्हते की इन्शा हे शायर आहेत तेव्हा 'इन्शा म्हणजे काय' याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. नंतर समजल्यावर मक्त्याची फारच मजा आली.

जगजीत सिंग यांनी नवीन शायरांच्या गझलांना स्थान अधिक दिले. जाँ निसार आणि कतील शिफाई यांच्या गझला त्यांच्या आवाजात ऐकायला मिळतात. असे असले तरी महाकवी गालिब यांची 'हजारो ख्वाहिशे'
ही गझल त्यांनी पेश केलीच! त्या गझलेला मात प्रवृत्तीनुसार नीटसा न्याय मिळाला नाही असे वाटते.

चित्रपटात त्यांनी अनेक गझला गायल्या. तुमको देखा, तुम इतना जो, तसेच सरफरोशमधील सुंदर गझलही!

'हुजूर आपका भी एहतराम करता चलू', ' इतना ना मुझसे प्यार करो, मै नशे मे हूं' या त्यांच्या गझला सुश्राव्य तर आहेतच पण लाईव्ह कन्सर्टमध्ये त्या डोक्यावरही घेतल्या गेल्या.

जगजीत सिंग हे एक 'पॉलिश्ड' गायक होते. पॉलिश्ड या शब्दाचा येथे अभिप्रेत असलेला अर्थ त्यांचा वावर!

जगजीत सिंग यांनी गायलेली 'तुम नही, गम नही, शराब नही' ही गझल उत्कृष्ट गझल गायकीचा नमुना ठरावी. त्यातील 'गाहे गाहे इसे पढा कीजे, दिलसे बेहतर कोई किताब नही' हा शेर माझा आवडता शेर!

श्रोत्यांनी फर्माईश करावी, गझल समजून त्याला उत्स्फुर्त दाद द्यावी आणि अक्षरशः नाचावे हे बहुधा या एकाच गझल गायकाबाबत झाले असावे. अर्थात, पंकज उधास यांच्या 'चांदी जैसा रंग' आणि इतर कित्येक गझलांना / गीतांना असाच अनुभव येत असला तरी 'प्रेयसी व प्रेम' ही गझलांची प्रामुख्याने निवड करणार्‍या जगजीत सिंग यांचा चॉइस श्रोत्यांना नेहमीच अधिक दर्जेदार वाटला यात नवल नाही. गुलाम अलींच्या उर्दूचा भरणा अधिक असलेल्या गझला आणि पंकज उधास यांनी मुलायम आवाजात केलेले मद्यपानाचे उदात्तीकरण या पार्श्वभूमीवर जगजीत सिंग यांचा खर्जातला आवाज आणि गझलांची निवड अधिक भावायची.

'किसका चेहरा' आणि 'तेरे खुषबूमे बसे खत' ही गीते ऐकून अंतर्मुख व्हायला व्हायचे यातील किमान पंचवीस टक्के तरी यश गायकाचे आहेच असे म्हणावे लागेल, उरलेले आशयाचे!

श्रोत्यांनी त्यांची अनेक पंजाबी गीतेही अक्षरशः डोक्यावर घेतली.

त्यांचे हमिंग किशोर कुमार यांच्या हमिंगच्या खालोखाल किंवा जवळपास तसेच ठरावे. गळ्यातून सर्वात खालच्या पट्टीतला सूर काढण्याचे त्यांचे कसब (पुन्हा एकदा) 'कल चौदहवी की रात थी' या गझलेत दिसून येते.

विक्रमी खप झालेल्या त्यांच्या अनेक सीडीज सर्वांकडे असतातच!

विशेषतः एकटे असताना गाडीत त्यांची एखादी गंभीर गझलांची सीडी लावली तर माणूस पूर्णपणे वेगळ्याच मनस्थितीत जाऊ शकतो.

अशा या महान गझल गायकाला, ज्याच्या गझलगायकीमुळे एक प्रचंड मोठा श्रोतावर्ग पुन्हा एकदा गझलेकडे वळला, सर्वांतफे विनम्र श्रद्धांजली, त्यांनीच गायलेल्या दोन द्विपदींमध्ये!

तुम चले जाओगे... तो सोचेंगे
हमने क्या खोया, हमने क्या पाया

बेदर्द सुननी है तो चल, कहता है क्या अच्छी गझल
आशिक तेरा, रुसवा तेरा, शायर तेरा, 'इन्शां' तेरा

==============================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

खुप खुप वाईट वाटले बातमी ऐकल्यावर. तसेही हॉस्पिटलात ठेवलेय ऐकल्यावर अंदाज आला होता तरीही दिवसभर चुटपूट लागुन राहिली. दिवसभर 'कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यु है' आणि 'तेरे खुशबू मे बसे खत मै जलाता कैसे...' मनात घोळत राहिले.

चित्राची आज काय मन:स्थिती असेल ह्याचा विचार करुन काटा येत होता अंगावर. आज पुर्णपणे एकाकी पडली ती. Sad

आज जगजीत सिंग गेल्याने, दोन पाकीस्तान्यांनाही अतिव दु:ख झाल्याचेही मी पाहीले...त्यांनी दोन शब्द प्रार्थनेचे बोलुन दु:ख व्यक्त केले...! काही गझलही गायल्या.!!

इथे सांगण्याचं कारण की, खरंच प्रेमाला 'सिमा' नसते..... जगजीत सिंग यांच्या मधुर वाणीने सर्वच 'मुग्ध' होते....त्यांचा या जगात नसण्याचा परीणाम अगदी शत्रु राज्यत ही जाणवतो.

बेफिकीरसाहेबांनी सुरेख आणि हृदयस्पर्शी लेख लिहिला आहे. धन्यवाद.
"हमभी शराबी, तुमभी शराबी" ही चित्राजींच्याबरोबर त्यांनी गायलेले युगलगीत मला फारच आवडते. त्यातले कडव्यांमध्ये वापरलेले वाद्यसंगीतसुद्धा (Instrumental music) फारच झकास आहे. हे गीत ऐकले नसल्यास जरूर ऐकावे.
जगजीतसिंगना सादर श्रद्धांजली.

*

जगजित सिंघ ह्यांच्यां गझले बरोबरच आम्ही लहानाचे मोठे झालो.

अजुनही कुठेही जगजित सिंघ यांची एखादी गझल समोर आली की मन झररकन त्या काळात त्या विश्वात अलगदपणे शिरते व तिथेच रेंगाळते.

जगजित सिंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

मनःपूर्वक श्रद्धांजली

भारतीय गझलगायकीचा आवाज हरपला असे मी म्हणेन.

अलिकडच्या काळात जगजीत ह्यांच्या गायकीत एकसुरीपणा आला होता ही गोष्ट खरी आहे परंतु त्यांचे 'अनफॉरगॉटेबल', 'एन्कोअर', 'लाईव्ह अ‍ॅट रॉयल अल्बर्ट हॉल' हे अल्बम ऐकले की त्यांच्या गायकीची ताकद दिसून येते.

विशेषतः 'जिगर' ह्यांची 'इश्क की दास्तान है प्यारे' ही एनकोअर मधली गझल केवळ अप्रतिम गायली आहे.

हजारो ख्वाईशे बद्दल लेखातील मताशी सहमत.....

काही वर्षांपूर्वी मेहदी हासन आजारी होते आणि त्यांना आर्थिक चणचण होती तेव्हा जगजीत ह्यांनी काही लाखांची मदत त्यांना पाठवली होती ह्यातून त्यांच्यातल्या माणूसकीचे दर्शन घडते.

अत्यंत वाईट बातमी. त्यांना अ‍ॅडमीट केल्यावरच मनात पाल चुकचुकली होती , भिती खरीच ठरली.
भावपूर्ण श्रद्धांजली .
बेफिकीरजी किती गाणी , गझला आणी शेरांचे उल्लेख करणार ? तुमच्या प्रतिसादामध्ये कागज की कश्ती राहिले असे लिहिलेत म्हणुन.
प्यार का पहला खत , आदमी आदमी को क्या देगा , आणी अशा बर्‍याच. Diffrent Strokes हा अल्बम.
जगजीत पुढच्या पिढित देखिल ऐकला जाईल. एक चमेली के मंडवे तले हे त्यांच्या आवाजातलं माझ्या
मुलाला देखिल फार आवडतं.
जगजीत तु भुला न पायेगा.
अलविदा.

माझे फेवरीट टेन
१. तेरी आखोंमें हमने क्या देखा
२. गम बढे आते है
२. बात निकलेगी तो फिर
४. तेरी खुशबु में बसे खत
५. अपनी आंखो कि समंदर मे उतर जाने दे
६. बहोत पेहले से इन कदमोंकि आहट
७. किया है प्यार जिसे हमने जिंदगी कि तरह
८. सरकती जाये है रुख से नकाब
९. दुनीया जिसे केह्ते है जादु का खिलौना है
१०..दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला (संगीतकार जगजीतजी -गायिका लतादिदी)

आमचे आयुष्य एनरिच करणारया गायकाला मनःपूर्वक श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रध्दांजली !
चित्रपटांमध्ये खरे तर त्यांच्या वाट्याला जास्ती गाणी आली नाहीत.. जी आली त्याचे त्यांनी सोने केले.
त्यांचे लाईव्ह कार्यक्रम, मैफिली जास्ती अधिक लोकप्रिय होत्या कारण त्यात त्यांच्यातील "गायक" सर्वंगाने अधिक खुलून प्रकट होत असे.
जगजीत साहेबांचा "खर्ज" सूर हा एकमेव आहे, त्यासारखा दुसरा नाही.

(गेले तीन चार महिन्यात अनेक महान कलावंत वा लोकप्रिय व्यक्ती कालवश झाल्या आहेत.. Sad )

Pages