अनुदान मिळणार्‍या महाराष्ट्रातील सरकारमान्य शाळांमधून शालेय खर्चासाठी पैसे कसे उभारले जातात?

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 October, 2011 - 04:46

पुण्यातील एका अनुदान मिळणार्‍या शाळेतून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सरकारमान्य शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पगार शासनातर्फे होतो + शाळेला कर्मचार्‍यांच्या एकूण वार्षिक पगाराच्या ६% रक्कम ही शालेय खर्चासाठी (जसे बाक-दुरुस्ती, रंगरंगोटी, नव्या उपकरणांची खरेदी, शालेय साहित्य इत्यादी साठी) शासनाकडून दिली जाते.

इ.स. २००४ पासून ही ६% रक्कमही सरकारकडून शाळांना मिळालेली नसल्याचे समजते.

अशा परिस्थितीत कोणकोणत्या मार्गाने व कशा प्रकारे अनुदानित सरकारमान्य शाळा या वरील खर्चांसाठी व सुधारणांसाठी पैसे उभारतात त्याची माहिती हवी आहे.

एक मिळालेली माहिती अशी की लोकनिर्वाचित प्रतिनिधी (नगरसेवक, आमदार, खासदार) यांच्या स्वतःच्या मंजूर निधीतून ते अशा शाळांना साहित्य खरेदीसाठी रक्कम देणगी म्हणून देऊ शकतात अथवा त्या त्या वस्तू विकत घेऊन देऊ शकतात.

याव्यतिरिक्त अन्य कोणते मार्ग अवलंबिले जातात त्याची माहिती असल्यास कृपया द्यावी.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन उपाय :
ज्यांनी हे अनुदान अडविले असेल त्यांचे घरदार विकून अगदी सगळे कपडे सुद्धा Angry
(तरी खुप कंट्रोल ठेवून खुप सौम्य उपाय सांगितला आहे.)

महेश, हा प्रश्न जेन्यूईनली विचारलाय हो. कारण माझ्या माहितीतल्या काही शाळा शालेय खर्चाचे सरकारी अनुदान न मिळाल्यामुळे सध्या अडचणीत आहेत. त्यांचे माजी विद्यार्थी शाळेसाठी काय करता येईल याचा अंदाज घेत आहेत. निधी उभारत आहेत. त्यात जर उपयुक्त माहितीची भर पडली तर चांगलेच आहे.

अशा परिस्थितीत कोणकोणत्या मार्गाने व कशा प्रकारे अनुदानित सरकारमान्य शाळा या वरील खर्चांसाठी व सुधारणांसाठी पैसे उभारतात त्याची माहिती हवी आहे.

बहुतेक बाक-दुरुस्ती, रंगरंगोटी, नव्या उपकरणांची खरेदी, शालेय साहित्य इत्यादी गोष्टींवर खर्च करायचे अशा शाळा (व कॉलेजे) टाळत असावीत. मुलीच्या कॉलेज प्रवेशानिमित्त (अनुदानप्राप्त) रुपारेल कॉलेजमध्ये जेव्हा गेले तेव्हा वर्ग कोंदट वाटले, भिंत बांधल्यानंतर रंगाचा पहिला हात देऊन झाल्यावर रंग कायमचाच संपलेला असेही वाटले, बाकांची रचना अशी होती की मला त्यावर बसणे आणि नंतर उठुन बाहेर पडणे कठिण गेले (मी काही अतिविशाल नाहीय, माझी मुलगी जी आता रोज त्या बाकांवर बसते ती साधारण माझ्याच आकाराची आहे आणि तिच्या वर्गात तिच्यापेक्षा जास्त आकारमानाच्या मुलीही आहेत. या सगळ्या मुली त्या बाकांवर पाठीला रग न लागता कशा बसतात माहित नाही). कॉलेजच्या वेळापत्रकात शारिरीक शिक्षणाचे आठवड्याला ६ तास आहेत. पण जोवर नोटिस लागत नाहीत तोवर शाशिचे तास होणार नाहीत असे सांगण्यात आलेय. आता सहामाहीची वेळ होत आलीय तरी अजुन नोटीशीचा पत्ता नाही. परवाच मुलगी एका तासानिमित्ताने एका दुस-या वर्गात गेलेली तिथे एक पुर्ण भिंत मस्त हिरवीगार झालेली. वर्गशिक्षिका आणि मुले मिळून तासभर त्या भिंतीवर कोणाला कसलेकसले आकार दिसताहेत हा खेळ खेळले.

हे सगळे पाहुन कॉलेजला एकतर दुरुस्ती परवडत नसावी किंवा ती करावी असे त्याना वाटत नसावे असे मला तरी वाटले.

ह्म्म्म परिस्थितीच जेव्हा जेन्यूईन रहात नाही तेव्हा उपाय सुद्धा जालिम योजावे लागतात.
कॉर्पोरेट जगामधे (मोठमोठ्या कंपन्यांमधे) याची माहिती देऊन त्यांना शाळेला मदतीचे आवाहन करणे आणि / किंवा शाळा दत्तक घेण्याची विनंती करणे.

शासकीय व्याख्येत याला

शासकीय व्याख्येत याला 'वेतनेतर अनुदान' असे म्हटले जाते. याचा विनियोग 'मेन्टेनन्स' अंतर्गत येणार्‍या अनेक बाबीवर {तुम्ही उल्लेख केलेल्या बाबीशिवायही अनेक घटक असतात} या अनुदानाची रक्कम खर्च केली जाते.

अरुंधतीताई म्हणतात तशी २००४ सालापासूनची 'निधीअभावी' अनुदाने फ्रीझ झाली आहेत. मात्र याचा अर्थ त्या त्या शाळांची ही थकीत बाब बुडालेली नाही. फक्त २०१२ मध्ये द्यायचीच झाल्यास ती टप्पा-अनुदानपद्धतीने 'रीलिज' केली जातील.

ही झाली वस्तुस्थिती. पण असे असले तरी त्या शाळांकडे 'मेन्टेनन्स' साठी निधी नाहीच अशी अवस्था नसते. पटावरील विद्यार्थ्यांना शासनाकडून जी इबीसीची सवलत मिळते त्यातील 'ट्यूशन फी' चा भाग हा शासकीय कोषागारात 'वेतन' खात्यावर वर्ग होतो पण अन्य घटकांची फी (उदा. लायब्ररी फी, लॅबोरेटरी फी, जिमखाना फी, एस.ए.फंड, टर्म फी आदी) ही थेट त्या शाळेच्या 'वेतनेतर अनुदान' खात्यावर जमा केली जाते. शिक्षण खात्याकडून ऑडिट होतानाही शेवटी मेन्टेनन्स पोटी जी काही रक्कम (वेतनाच्या ६%) वर्ग होणे गरजेचे असते तीमधून ही इबीसी खात्यावरील जमा झालेली रक्कम वजा केली जातेच.

म्हणजेच शाळेच्या अकौन्ट बूकमधील हा घटक 'शून्य' बॅलन्स कधीच दाखवित नसतो. या बरोबर हे मान्यच की, जी काही रक्कम अशा मार्गाने जमा झालेली असते ती खर्चाच्या सर्वच बाजू समाधानकारक मिटवू शकते असे होत नाही. त्यामुळे शाळेचे लोकल मॅनेजमेन्ट बोर्ड खर्चांची प्राधान्यतः ठरविते. उदा. शिपायांचा गणवेश आणि त्यावर होणारा वार्षिक खर्च या वर्षी न करता तो पुढील वर्षाच्या खर्चाच्या बाबीत धरणे, लॅबोरेटरी इक्विपमेन्ट खरेदी, फर्निचर दुरुस्ती प्रथम स्थानावर आणली जातात, तर रंगकाम दुसर्‍या क्रमांकावर जाते. डेडस्टॉकची खरेदी होत नाही तसेच क्रिडा साहित्याबाबतही अशीच उदासिनता.

लोकनिर्वाचित आमदार देणगी देऊ शकतात का ?

याचे उत्तर 'फसव्या' अशा प्रकारच्या होकारार्थी उत्तरात आहे. म्हणजेच 'अ' नावाचा आमदार जरी त्या शाळेला आपल्या निधीतून (जी खरे तर शासकीय तिजोरीतूनच मिळते) काही रक्कम देऊ इच्छित असेल तर ती रक्क्म 'दुरुस्ती' वा 'रीनोव्हेशन' खात्यासाठी असत नाही. तर ती असते १. कॉम्प्युटर खरेदी, २. स्पोर्टस इक्विपमेन्ट्स, ३. ऑडिओ-व्हिज्युअल एड्स. यासाठीही शिक्षण विभागाकडे त्या त्या शाळेने अगोदर रितसर अर्ज करावा लागतो (काहीशी वैतागाची आणि किचकट प्रक्रीया आहे ही).

वस्तूरूपाने ग्रंथालयासाठी फक्त 'पुस्तके' खरेदी करून दिली जातात. त्यासाठीही एक स्वतंत्र समिती असते.

जर 'क्ष' व्यक्ती [माजी विद्यार्थी गट म्हणू या] कडून समजा १/- लाख रुपयांची रक्कम देणगी स्वरूपात आली तर मॅनेजमेन्ट ती रक्कम जाणीवपूर्वक 'अमुक एका कारणासाठी' म्हणून स्वीकारेलच असे नाही [अपवाद फक्त 'शिष्यवृत्ती']. जास्त विस्ताराने सांगायचे झाल्यास "अरुंधती कुलकर्णी यानी हुजूरपागा शाळेस एक लाखाची देणगी देताना ती रक्कम शाळेच्या प्रांगणात टाईल्स बसविण्यासाठी वापरावी' किंवा '१०० बेंचिस खरेदी करण्यासाठी उपयोगात आणावी' अशी अट घातली तर तशी देणगी त्या शाळेचे व्यवस्थापन स्वीकारेलच असे नाही. त्याला कारण असे की हे एक लाख रुपये प्रथम त्या व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जातील आणि मग शालेय अकांउन्ट्कडे वर्ग करताना ते 'वेतनेतर अनुदान' खात्यावर घेणे गरजेचे असते. असे झाले तर 'अनुदान पडताळणी' समयी 'ती लाखाची जमा' ते पथक थकीत विनाअनुदान रकमेतून "वजा' करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

~ हे जर टाळायचेच असेल तर मग श्रीमती कुलकर्णी वा त्यांचा गट थेट 'वस्तू रूपा'त त्या शाळेस तेवढ्या रकमेच्या टाईल्स देणगी देऊ शकतो, ज्याच्या व्हॅल्युएशनसंदर्भात शासन शाळेच्या व्यवस्थापनाला विचारू शकत नाही. [मात्र यात आज एक अशी गोची होते की, त्या एक लाखाच्या टाईल्स बसविण्याचा खर्च करण्याचीही शाळेची तयारी नसेल तर देणगीदारही हतबल होतो.]

नाट्यप्रयोग/संगीत जलसा

~ शाळेच्या कलाकार मुलांमुलींनी [यात माजीही येऊ शकतात] व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी झालेले एखादे नाटक बसवून वा संगीत जलसा सादर करून त्या पोटी विशिष्ट रकमेच्या प्रवेशिका छापून घेणे आणि त्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना त्या मागील कारण पटवून त्याना खरेदी करण्यास उद्युक्त करणे आणि कार्यक्रमाचा खर्च वजा जाता आलेले उत्पन्न शाळेस मेन्टेनन्स खर्चापोटी देणे, हे होऊ शकते. याला शासन मान्यता असते. [फक्त वारंवार असे प्रयोग केले जात नाही, हा एक या प्रकारातील तोटा. पण जे काही प्रयोग होतात त्याद्वारे अगदी साईझेबल अमाऊंट संस्थेकडे जमा होते.]

असो. इतक्या माहितीनंतर हेही सांगणे गरजेचे आहे की, जरी २००४ पासून विनाअनुदान वेतन मिळाले नसले तरी ते आता मिळणारच नाही असेही नसते. फक्त एकरकमी मिळणार नाही, इतकेच.

अशोक पाटील

धन्यवाद अशोक व महेश!

अशोक, विस्तृत स्वरूपाच्या उत्तराबद्दल विशेष आभार. ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

आम्ही माजी विद्यार्थी शक्यतोवर शाळा कमिटीला विचारतो की तुम्हाला सध्या काय हवे आहे?

मग शाळा सांगते की बुवा भूगोल प्रयोगशाळेसाठी उपकरणे हवी आहेत किंवा वाचनलयाला नविन क्ष पुस्तके हवी आहेत, लॅबमध्ये २ कॉम्प्यूटर, १ युपीएस हवे आहे.

मग शाळेच्या नेहमीच्या/बांधलेल्या वेंडरकडून आम्ही त्या त्या वस्तू घेऊन देतो.

कधी कधी शाळा पोळी भाजी फंडसाठी, गरीब विद्यार्थ्यांच्या पुस्तकसंचांचे, गणवेशाचे असे डोनेशनही घेते.

जर आपले नाव कुठेही येणे आवश्यक नसेल तर शाळा क्ष वर्गांना रंग, नविन बाक, नविन फळा अशा गोष्टीपण सांगते. १ लाखाच्या टाईल्सपेक्षा १ लाखात होतील तितक्या टाईल्स शाळेला हव्या तिथे लावून देणे खरेतर शाळेसाठी बरे पडते नाही तर मजूरीसाठी पुन्हा हात पसरणे Sad

मला महाराष्ट्रातल्या शाळांबद्दल काही माहीती नाही. पण आमच्या इथे अनुदानित शाळातून बहुतेक गरीब मुलंच
शिकतात. त्यामुळे पालकांना विश्वासात घेऊन काही आर्थिक मद्त मिळण्याची शक्यता नसते. पण काही शाळांतून असा प्रयत्न होतो कि ज्यामुळे थोडा अर्थिक फायदा शाळेला मिळतो. ते मुलांकडून गणपती करून घेतात. संस्थेचे मोठे लोक आपल्या संपर्कातल्या सर्वांना गणपती विकत घ्यायला सांगतात. लोक ते जास्त किमतीत विकत घेतात कारण गरीब मुलांनी केलेले आहेत म्हणून. राख्या करवून घेतात ग्रीटिंग कार्ड बनवून घेतात. हे सगळं करवून घेताना सामग्री देण्यासाठीही काही लोक पुढे येतात. त्या बदल्यात ज्या मुलांकडून हे काम करवले जाते.त्यांची फी माफ केली जाते. किंवा मग काही लोक त्यांना दत्तक घेतात आणि वर्षभराची फी पुस्तकं सगळं बघतात. अर्थात त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. पण मुलं हुशार असली तर ती अभ्यास करून हे सगळं करतात. ज्या शाळा अनुदानित असूनही त्यात सुस्थितितली मुलं आहेत त्या शाळातून दोन पावत्या फाडल्या जातात. एक सरकारी फीची पावती दुसरी इतरेतरची पावती. पैसे मिळू शकतात पण ते खरच शाळेची सुधारणा करण्यासाठी वापरतात का? हा मोठा प्रश्न आहे.

माजी विद्यार्थी शाळेला देणगी देऊ शकतात. शाळेला दिलेली देणगी करमुक्त असल्यास देणगीदारासही थोडासा फायदा होतो. माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनातून चांगली आर्थिक मदत मिळते हा खूप ठिकाणी आलेला अनुभव आहे. ज्या शाळेत आपलं बालपण गेलं तिच्याशी भावना निगडीत असतात. ती शाळा अडचणीत आल्याचे समजल्यावर प्रत्येकाला दु:खं होतंच...

काही शाळांना अनुदान असूनही विकासनिधी घेतला जातो. तर काही शाळांमधे मुलांकडे देणगीपुस्तकं दिली जातात. हे मात्र चुकीचे मार्ग आहेत. पालक सभेत आवाहन केल्यास सुस्थितीतले पालक देणग्या देऊ शकतील. पण ज्यांची मुलं सध्या शाळेत आहेत त्यांचा या आवाहनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण निराळा असतो. पालकांना इतरही खर्च असल्याने आणि भावनिक नातं अजून निर्माण होत असल्याने पालक संघाकडून तितकीशी मदत होत नाही हा अनुभव असला तरी तो काही थंब रूल नाही. शाळेकडून सर्व प्रयत्न केले गेले पाहीजेत.

मोठ्या उद्योगांकडूनही चांगली मदत मिळते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, सीआयआयआय सारख्या संस्थांकडे चौकशी केल्यास माहीती मिळू शकेल. शाळेचं रेप्युटेशन मात्र चांगलं हवं आणि आर्थिक स्थिती डबघाईला येण्याची कारणं सध्याच्या संचालकांच्या धोरणांशी निगडीत नसावीत !!

@ सुरेखा ~

"पैसे मिळू शकतात पण ते खरच शाळेची सुधारणा करण्यासाठी वापरतात का? हा मोठा प्रश्न आहे."

~ पैसे मिळू शकतात; पण मी स्वानुभवाने सांगू शकतो की व्यक्तीगत अशा रकमा [किती ते गौण आहे] देणारी मंडळी जाणवण्याइतपत आता विरळ होत चालली आहेत. कालपर्यंत निदान १० वी/१२ वी बोर्डाच्या मेरीट लिस्ट जाहीर झाल्यानंतर त्यातील गुणवान विद्यार्थ्याना सत्कार समारंभ प्रसंगी रोख रक्कम तसेच संबंधित शाळेलाही कौतुकाचा एक भाग म्हणून आर्थिक निधीस सहाय्य त्या त्या शहरातील धनकोंकडून जाहीर होत असे. पण आता 'मेरिट लिस्ट' च जाहीर होत नसल्याने ही रीतही बंद झाली आहे. शिष्यवृत्त्या आहेत आजही, पण त्यांची नावेही 'पब्लिक' पातळीवर जाहीर होत नसून थेट त्या शाळेला रुक्ष भाषेतील निवेदनाद्वारे बोर्डाकडून पाठविले जाते. मग केव्हातरी दोनतीन महिन्यानंतर तो दोन-तीनशे रूपयाचा चेक शाळेच्या दप्तरी जमा होणार तो पर्यंत मेरीट लिस्टमधील तो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अन्यत्र गेलेलाही असतो.

शासनाच्याच अशा कोरड्या वृत्तीमुळे 'देणगी' देणे समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून शाळेला वेळोवेळी व्यवसाय-फायद्यातील एक विशिष्ट हिस्सा देण्याची जी एक परंपरा ५०-६०-७० च्या दशकात प्रकर्षाने दिसत होती ती या जेट युगात त्याच वेगाने लुप्त होत चालली आहे.

विषादाची गोष्ट म्हणजे इकडे शाळा-महाविद्यालयांना मेन्टेनन्सपोटी देणग्या मिळत नसताना दुसरीकडे 'देवस्थाना' वर किलोच्या हिशोबात सोने आणि जडजवाहिरांचा पाऊस पाडला जात आहे. पण हा वेगळा विषय होईल.

वर एक प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे माजी विद्यार्थ आस्था दाखवून तसेच एक ग्रुप तयार करून आपल्या शाळेची आर्थिक अडचण काही प्रमाणात निश्चित सोडवू शकतात.

अशोक, समाजात शाळा-कॉलेजांनाही मेन्टेनन्ससाठी देणगी लागू शकते याचाच अवेअरनेस / जागरूकता कमी झाली आहे असे माझे निरीक्षण सांगते. सरकारमान्य शाळांना जे अनुदान मिळते ते पुरेसे असते का, संकलित / जमा निधीचा विनियोग संस्थाचालकांकडून कसा होतो हा तर वेगळाच विषय आहे. शिवाय संस्थाचालकांचे शाळा चालू राहण्यासाठी देणग्या मिळवणे, देणगीदारांशी व्यवहार, अ‍ॅटिट्यूड हेही आहेच! सध्या पुण्यासारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अनुदानित शाळा तोट्यात दाखवून बंद पडण्याचे / पाडण्याचे विषचक्र सुरू आहे ते वेगळेच! बंद पडलेल्या शाळांच्या जागा नंतर कोठे, कशा हस्तांतरित होतात.... तिथे कोणत्या ''देखण्या'' इमारती उभ्या राहणे अथवा ती जागा अन्य कारणांसाठी वापरली जाणे हेही चालू आहे.

परंतु या सगळ्यात ज्या निम्न आर्थिक स्तरातील विद्यार्थी या शाळांमध्ये येतात त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते. वर अनेकांनी व तुम्हीही म्हटल्याप्रमाणे माजी विद्यार्थी याबाबत बरेच काही करू शकतात.

यावरून आठवले की सध्याच्या विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये यापुढे २५ टक्के प्रवेश हे राखीव ठेवले जाण्याचा नवा नियम कानावर आला. ह्या जागा शासनातर्फे आरक्षित असतील, तिथे आर्थिक / सामाजिक दृष्ट्या दुर्बल वर्गातून येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील व त्या विद्यार्थ्यांचा खर्च (अनुदानित शाळातील फीच्या हिशेबाने) सरकारकडून विनाअनुदानित खासगी शाळांकडे जमा होईल. याविषयीचा जी आर मी अद्याप पाहिलेला नाही, परंतु परवाच ही बातमी कोणीतरी सांगितली.

आमची शाळा दरवर्षी पाचवीला आणि आठवीला एक तुकडी पालिका शाळेतील हुषार्/होतकरू विद्यार्थ्यांची घेते. त्यासाठीच गणवेश/पुस्तक/पोळी भाजी फंड राबवले जातात.

गेल्या आठवड्यात पट तपासणी झाली.. त्यात राज्यात ३० लाख विद्यार्थी अनुपस्थीत मिळाले. हे सर्व बोगस विद्यार्थी आहेत असा अंदाज आहे.. या विद्यार्थ्यांसाठी नेमलेले शिक्ष, त्यांचा पगार व इतर अनुदान हा सगळा पैसा शिक्षक व संस्थाचालक याना मिळाला आहे.

@ अरुंधती ~

"यावरून आठवले की सध्याच्या विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये यापुढे २५ टक्के प्रवेश हे राखीव ठेवले जाण्याचा नवा नियम कानावर आला."

~ पटलावर हा विषय तब्बल सात वर्षापासून आहे. श्री. हसन मुश्रीफ हे ज्यावेळी शालेय शिक्षण मंत्री होते तेव्हा याचे सुतोवाच झाले होते. आज त्यांचे खाते गेले व ते आले आहे श्री.राजेन्द्र दर्डा यांच्याकडे. मूळ प्रस्तावाप्रमाणे आजमितीला ज्या काही विनाअनुदानित खासगी शाळा शासन दप्तरी नोंदीत आहेत, त्यांच्यासमोर २५% चा प्रश्न महत्वाचा नाही. पण खरा कळीचा मुद्दा हा आहे की, ज्या "बिग बॉस" शाळा शासनाचे 'अनुदान'च घेत नाहीत तिथे हा २५% चा पलिता प्रकाश पाडू शकतो का ? त्याला उत्तर आहे ~ कठीण आहे.

या 'एलिट' शाळा स्थापनेपासूनच शासन धोरणाशी फटकून वागत आल्या आहेत. कारण एकदा का त्या संस्थेने शासन अनुदान स्वीकारले की मग साहजिकच नैसर्गिक नियमानुसार झेड.पी.चा अध्यक्षच काय पण शिक्षण सभापतीही यांच्यावर वेळोवेळी गुरगुरायला सोकावतो, आणि नेमके हेच या गबदुल शिक्षणसंस्थांच्या व्यवस्थापन मंडळास नको असतो. अनुदान घेत नाहीत याचा अर्थ ते पालकांच्याकडून मन मानेल ती फी घेण्यास मोकळे असतात. मुंबई-पुणे-नागपूर-नाशिक सारखी मल्टी-लेव्हल शहरांची तर बातच नको, पण आता जिल्हाजिल्हा पातळीवरदेखील अगदी ज्युनिअर केजीसाठी लाखलाखांच्या देणगी-पावत्या फाडण्यास पालक तयार असतात. काय दर्शविते ही स्थिती ? [एका संस्थळावर नुकताच चिंचवडमधील एका पालकाने 'अमुक एक शाळा ज्युनि.केजीत माझ्या मुलीला प्रवेश देण्यासाठी 'चिंचवडमधील एक शाळा नव्वद हजार रुपये' मागत आहे, तेही पावतीशिवाय, तर काय करावे?" अशा हताश स्वरात धागा टाकला होता. हे उच्चशिक्षित पालक एम.एन.सी. मध्ये अगदी एक्झेक्युटिव्हच्या पदावर असून जर त्यांची ही अवस्था तर मग किरकोळ गण्यागंप्यांशी काय अवस्था असेल याची कल्पना आपण करू शकतो. मग अशा शाळेने उद्या २५% आरक्षणाची अट स्वीकारलीच तरी त्यांच्या तिजोरीतील गल्ल्यावर कसलाच फरक पडणार नाही.]

असा पैसा जर विनातक्रार संस्थेकडे जमा होत असेल तर मग कशाला ही मंडळी आपल्या कारभाराला शासन चौकटीत बद्ध करून घेतील? त्यामुळे २५% चा प्रस्ताव उद्या जरी पारीत झाला तर त्याची [काटेकोरपणे] अंमलबजावणी करणे शासकीय अधिकार्‍यांना दुरापास्त होणार आहे.

"राज्यात प्रस्थापित असलेल्या आणि मान्यताप्राप्त सर्व विनाअनुदानित शाळांमधून" अशी शब्दरचना त्या जी.आर.मध्ये आल्यास शासनाला अपेक्षित असलेला परिणाम उमटण्याची [अंधुकशी] शक्यता आहे.

अशोक पाटील

महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण ते आठवी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही. त्याने फक्त नववीचे वर्ष कोणत्याही मार्गाने पास करून दहावीची परिक्षा द्यावी. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी खाली दिलेली जाहीरात बघावी....(सॉरी मला केंब्रीज युनव्हर्सीटीची जाहीरात नाही मिळाली

आहे ना मज्जा Lol

जामोप्या, याच धर्तीवरचा भ्रष्टाचार लातूर भागात झाल्याच्याही बातम्या होत्या मध्यंतरी. ..... टाळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय हे शिकावे तर अशा लोकांकडून!

अशोक.... एकीकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचे करताना निम्न स्तरातील लोकांना ज्या शाळांमधून असे शिक्षण घेणे परवडते त्या शाळा वेगवेगळ्या कारणांनी बंद पडणे / पाडणे आणि त्या शाळांतील इच्छुक विद्यार्थ्यांची अंशतः 'सोय' सरकारी अंकुश नसलेल्या व मनमानी करणार्‍या खासगी विना-अनुदानित शाळांत करणे, अनुदानित शाळांच्या अनुदानातील पैसे खाणे हे सर्व थांबणार कसे आणि कोठे हा तर प्रश्न आहेच!

वर जाईजुईने म्हटल्याप्रमाणे शाळेने स्वेच्छेने पालिकेच्या एका तुकडीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, त्यांसाठी उपक्रम राबविणे हे करायला हवे. त्यासाठीची इच्छाशक्तीही संस्थेकडे पाहिजे.