बायकोची माया

Submitted by rkjumle on 1 October, 2011 - 10:52

, ‘माह्या नवर्‍याने काही केले नाहीजी... त्यांना नेऊ नकाजी...’ अशी ती बाई आर्त स्वरात त्या पोलिसाच्या समोर आडवी होत विनवणी करीत होती.
तो पोलिस नामदेवला इतवारच्या भर बाजारातून एखाद्या बैलाला वेसन धरुन जसा शेतकरी ओढून नेतो तसा तो घाणेरड्या शिव्या देत त्याची बखोटी पकडून ओढत नेत होता. त्या बाईची केविलवाणी स्थिती पाहून आम्ही सर्वच गर्भगळीत झालो होतो.
त्या बाईबद्दल मला फार कळवळा होता. कारण मी निळोण्याच्या शाळेत शिकत असतांना आम्हा चौधर्‍याच्या मुलांना मोठ्या आपूलकीने प्यायला पाणी द्यायची. कधी कधी तिच्या घराच्या आंगणात आम्ही दुपारच्या सुट्टीत भाकरी खात होतो.
आमची शाळा मारुतीच्या देवळात भरायची. हे देऊळ मोठं होतं. देवळाच्या मध्ये गाभारा होता. तेथे शेंदराने चोपडलेला एक मोठा दगड होता. त्याच्यावर शेंदराचे थरच्या थर जमा झाल्यामुळे चांगला फुगला होता. त्याला मारुती म्हणत असत. त्याच्या भोवताल बरीच रिकामी जागा होती. तेथे आमचे पहिलीपासून ते चवथीपर्यंतचे वर्ग भरत असत.
त्या गाभार्‍यात वर एक घंटी बांधली होती. शनिवारी मारुतीचा दिवस असल्यामुळे लोकं या दिवशी पुजा करण्यासाठी येत असत. सकाळपासून लोकं तेथे त्या आधिच चोपडे झालेल्या त्या दगडाला तेलात शेंदूर भिजवून आणखीच चोपडे करीत असत. त्यामुळे तो दगड तुकतुकीत दिसायचा. येतांना-जातांना घंटी वाजवीत. त्यामुळे त्यादिवशी देवळात गोंधळच गोधळ राहत असायचा. पुजा झाल्यावर नारळ फोडत व त्याचा एक लहानसा तुकडा आम्हाला खायला देत. त्यामुळे त्या दिवशी प्रसाद खाण्याची मजाच मजा व्हायची.
आमच्या जातीच्या मुलांना मात्र त्या गाभार्‍यात चुकून जाऊ देत नसत. त्यामुळे तो देव बाटतो असे ते सांगत असत. वारे... असा कसा तो देव... आमच्यामुळे बाटणारा ! हे कोडं मात्र उलगडत नव्हतं. ,
चारही वर्गाला आमचे बबन गुरुजी एकटेच शिकयायचे. एका वर्गाला पाढे पाठ करायला सांगत तर दुसर्‍या वर्गाला पाठ वाचायला सांगत तर तिसर्‍या वर्गाला गणिते करायला सांगत तर चवथ्या वर्गाला कविता पाठ करायला सांगत. अशी त्यांची मुलांना शिकविण्याची कसरत चालू राहायची. मध्येच कुणी खोडी केली, ओरडला, अभ्यास केला नाही तर त्याच्या हातावर छडी पडायची किंवा पाठीवर धपाटा, नाहीतर पोटाचा चिमटा घेत.
मला एकदाच मार बसला होता. आम्ही मोहल्ल्यातील सर्व मुलं तुळशीराम दादाच्या घराजवळील पडक्या घरात खेळायच्या नादात त्या दिवशी शाळेत गेलो नाही. गुरुजींनी दुपारी चौधर्‍याचे मुलं शाळेत कां आले नाहीत, ते पाहण्यासाठी एका बंजार्‍याच्या मुलाला पाठवीले. आम्ही खेळण्याचा मनमुरादपणे आनंद लुटत होतो. तेव्हा गुरुजींनी पाठविलेल्या त्या पोराला पाहून आमची धांदल ऊडाली. काय कारण सांगावे ते कळत नव्हते. प्रत्येकांनी काही ना काही कारणे चिठ्ठीत लिहून दिले. मी लिहिले होते की, ‘कोणीच मुलं आली नाहीत, मग मी एकटाच कसा येऊ ?’
दुसर्‍या दिवशी शाळेत गेलो तेव्हा गुरुजींनी आमची चांगलीच हजेरी घेतली. ते आमच्यावर खूप कातावले होते.
मला म्हणाले, ‘कारे रामराव, तू काय लिहिले चिठ्ठीत... मी एकटाच कसा येऊ? मलाच विचारतो? कसा येऊ म्हणून...’ असे म्हणून त्यांनी छडीने माझे हात लाल लाल करुन टाकले.
छडी लागे चमचम विद्या येई घमघम ! अशी त्यावेळेस एक म्हण होती. त्याची मला आठवण झाली. त्यामुळे आम्ही मुले निमुटपणे त्यांच्या छडीचा प्रसाद बाळकडूच्या रुपात घेत होतो.. त्यानंतर मात्र मी त्यांच्या हातचा मार कधी खाल्ल्याचं आठवत नाही.
शाळेच्या समोर मैदान होतं. तेथे आम्ही कबड्डी, खोखो, लंगडी, लगोर्‍या असे खेळ खेळत होतो. गुरुजी आम्हाला कबड्डी, खोखोच्या खेळाचा सराव तेथेच करुन घ्यायचे. मी पण या खेळात भाग घेत होतो. गुरुजी कवायती पण तेथेच शिकवीत असत.
शाळेच्या पाठीमागे परसात लहानसा बगिचा लावला होता. त्यात मोगरा, गुलाब, झेंडू, अशाप्रकारचे फुलझाडं होती. यवतमाळला उगम पावलेला एक ओढा शाळेच्या उताराच्या बाजुने थोड्याजवळून पुढे जाऊन वाघाडी नदिला जाऊन मिळत असे. त्या ओढ्याचं पाणी बालटीने आणून त्या झाडाला आम्ही देत असे. आमच्या शाळेच्या बाजुला एक चिंचेचं खूप मोठं, भोवताल साकारलेलं, पसरलेलं झाड होतं.
शाळेत आम्हाला लस टोचणारे लोकं आले की आमची घाबरघुंडी उडायची. कुठे पळून जावे की काय असे वाटत असे. लसीमध्ये कधी देविची... तर कधी कॉलर्‍याची ... आणखी कसल्या लसी होत्या काय माहीत ? हाताच्या दंडावर टोचायचे. ते टोचतांना हाताकडे पाहत नव्हतो. खूप आग होत असे. डोळ्याला पाणी येत असे. एका एकाचा नंबर लागत असे. ज्याला टोचले त्याचा तो रडवलेला चेहरा पाहिला की आमचीही पाचावर धारण बसायची. त्यावेळी तो जात्यात तर आम्ही सुपात आहोत असं वाटायचं. सुई टोचून झाल्यावर गुरुजी काहीतरी मजाक करुन त्याला हसवित असत.
आठ दिवसातून एकदा तरी आम्हाला शेणामातीने शाळा सारवावी लागत असे. ओढ्यातून बालटी्त पाणी भरुन दोन मुलं बालटीच्या कडीत लाकडाचं दांडूक टाकून दोन बाजूला पकडून आणीत असे. सारवण्याचं काम बहुदा शनिवारी किंवा सुट्टीच्या आदल्या दिवशी होत असे. मुली सारवण्याचं काम करीत असत. काही मुले तोपर्यंत बाहेर खेळत किवा बाहेर परसात जोराजोरात बे...एकं बे चा पाढा जोराजोरात घोकत राहायचे.
आमच्या गुरुजींचे घर यवतमाळला आठवडी बाजाराजवळ होते. वडगांवला जातांना ते आम्हाला एक-दोनदा त्यांचे घरी घेऊन गेले होते. म्हणून त्यांचे घर आम्हाला माहित झाले होते. आम्हाला असे कळले होते की, आमच्या गुरुजींचे वडील एक प्रसिध्द वैदर्भिय, वर्‍हाडी-ग्रामीण कवी आहेत. त्यांचे नांव पांडूरंग श्रावण गोरे होते. ते एकदा घरी बसलेले होते. त्यावेळी आमची त्यांनी विचारपूस केली होती.
त्यांनी खेडूतांच्या, शेतकर्‍याच्या, जीवनावर व वातावरणावर छान छान कविता रचल्या होत्या. रानातल्या मेव्यावर त्यांनी एक छान चांगली कविता केली होती. त्यांची कविता शाळेमध्ये शिकविल्या जात होती.
आमचे गुरुजी यवतमाळ वरून सायकलने रोज निळोण्याच्या शाळेवर जाणे-येणे करीत होते. शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे शुक्रवारी ते घरी न जाता शाळेतच थांबत असत.
परिक्षा जवळ आली की, गुरुजी आम्हाला थांबऊन रात्रिची शाळा घेत असत. अशा वेळेस आम्हाला जास्तीच्या भाकरी बांधून आणावे लागत असे .
आमचे गुरुजी आम्हाला खेळ खेळायला यवतमाळ जवळ असलेल्या वडगांव या गांवला बैलगाडीने घेऊन जात असत. वडगांवला सर्व शाळेच्या अंतर्गत खेळांच्या स्पर्धा व्ह्यायच्या. ते या खेळाचे पंच राहत असत. त्यामुळे आम्हाला फार अभिमान वाटत असे. खेळामध्ये कुणी चुकला किंवा बाद झाला की फुरकून शिटी वाजवित असत. खेळामध्ये एक डांव संपला की गुरुजी आम्हाला संत्र्याच्या गोळ्या खायला देत असत.
आमच्या गुरुजींनी एकदा हरिभाऊ गाडगे यांच्या नकलाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या काळात त्यांच्या नकला खूप गाजल्या होत्या. खेड्यापाड्यात त्यांच्या नकलांच खूप कौतुक व्ह्यायचं. ते नकलाच्या रुपाने मनोरंजनातून लोंकाचे प्रबोधन करीत असत.
खेड्यामधे कमालीची पसरलेली निरक्षरता, जातीभेद, शिवाशीव, अस्वच्छ्ता, अंधश्रध्दा, खोट्या रुढी आणि परंपरा इत्यादी अनेक विषयावर ते लोकशिक्षण करीत असत.
आदल्या दिवशी गुरुजींनी आम्हाला नकलांच्या कार्यक्रमाबाबत सांगितले होते. त्यामुळे संध्याकाळी आमच्या गांवचे काही लोकं पण कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते. माझा मोठा दादा सुध्दा आला होता. येतांना त्यांनी आमची भाकर बांधून आणली होती. कार्यक्रम संपल्यावर आम्ही त्यांचे सोबत घरी गेलो होतो.
शाळेच्या प्रांगणात एका बाजूला स्टेज टाकला होता. रात्रीला कार्यक्रम होता.
कार्यक्रमांतर्गत हरिभाऊ गाडगेंनी अनेक नकला सादर केल्या होत्या. परंतु त्यातील एक नकल मला चांगली आठवते. ती म्हणजे केळवालीची... लुगडं नेसलेली, भांग-पट्टा केलेली, नटखट, हुबेहुब एखाद्या बाईसारखी शोभणारी, काखेत केळाचं टोपलं घेऊन, केळवाली ऽऽऽ अशी ओरडत स्टेजवर अवतरत असते.
‘केळवाली ऽऽऽ केळं घ्या ऽ केळं ऽऽ एक आणा डझन...’ तिचं ते बाईचं सोंग पाहून सर्वजन क्षणभर अवाक् झाले.
आमचे गुरुजी माझ्यावर फार माया करायचे. असं काही कार्यक्रम असलं की ते मला पुढं करीत असत.
‘केळवाली स्टेजवर आली की तू जायचं. तिला एक पैसा देऊन केळ मागायच.’ गुरुजींनी याही वेळेस मला सुचना देऊन माझ्याकडून तसं प्रात्यक्षिक करून घेतलं होतं.
‘मावशीबाई हे घ्या पैसे. मला एक केळ द्या.’ मी स्टेजवर जाऊन तिला म्हणालो.
‘घेरे ... माह्या पोरा…कोणत्या वर्गात शिकतो... तु ?’
‘चवथीत आहे.’
‘तुझा मास्तर कोण रे…’
‘बबन गुरुजी...’
रडवेला चेहरा करून आर्त स्वरात सांगायला लागली. ‘मी तुझ्यासारखाच लहान होतो नं तेव्हा मी पण शाळेत शिकत होते. पण नंतर माह्या लहान भावाला राखण्यासाठी मला शाळा सोडावी लागली. म्हणून माह्यावर केळे विकण्याची पाळी आली. मुलींनो... आपल्या लहान भावाला किंवा बहिनीला राखण्यासाठी किंवा घरच्या, शेतीच्या कामासाठी शाळा सोडू नका. शिका... खूप शिका... डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे खूप शिका... शिकल्यावर आपल्या बबन गुरुजीसारखे तुम्हाला मास्तर बनता येईल. नाहीतर गांवातले पटवारी, ग्रामसेवक तरी बनता येईल.’
त्यावेळी खेड्यामध्ये मास्तर, पटवारी, ग्रामसेवक हेच खेड्यातील मोठे शिकलेले लोकं दिसत असत. त्यामुळे शिक्षणाबाबत त्यांचेच उदाहरण समोर येत असे. त्यामुळेच की काय खेड्यातील मुलांच शिक्षणाचं ध्येय अगदी मर्यादित राहत असे. ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत.’ म्हणतात तसं! त्यांचं विश्वच तेवढं असायचं. कारण त्या पुढील उच्च शिक्षण कसं घ्यावं. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, कलेक्टर व साहेब कसं बनांव हे त्याला काहीच कळत नव्हतं.
त्या नकलेत बाई सारखी हावभाव करुन काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी ती सांगत होती. त्यात गमती-जमती, हलका-फुलका विनोद असायचा. ते पाहून लोक खदखदा हसत होते. त्यांनी खरोखरच आपल्या कलेद्वारे ‘केळवाली’चे व्यक्ती चित्रन पाहणार्‍यांच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभे केले होते.
तिची ती पुर्ण नक्कल संपेपर्यंत मला तेथेच बसवून ठेवायची. एक केळ संपले की दुसरे खायला देत असे. पुढे बसलेले मुले माझ्याकडे मिष्किलपणे पाहून ‘मजा आहे तुझी...’ असे डोळ्याने खुनाऊन आपल्या असुयेच्या भावना व्यक्त करीत होते.
एकदा असंच त्यांच्या नकलाचा कार्यक्रम आमच्या गांवापासून दोन-तिनक मैल दूर पांढरी या गावला आयोजीत केले होते. आम्ही शाळेच्या मुलांनी त्यांच्या नकला आधीच पाहिल्या असल्यामुळे पुन्हा ते पाहण्याची उत्सुकता वाढली होती. त्यामुळे आमच्या गांवातील बरेच लोकं ते पाहण्यासाठी आले होते. मी सुध्दा गेलो होतो. मला त्या केळवाली मावशीबाईने ओळखले. तिच्या त्या केळवालीच्या नकलेमध्ये मलाच बोलावीले होते. मग माझी केळ खाण्याची त्यादिवशी सुध्दा मजाच मजा झाली होती.
केळावरुन आठवलं... आम्ही गणेशच्या बगिच्यातील जांब चोरुन खाल्ल्याची ती गोष्ट... शनिवारी सकाळची शाळा असायची तेव्हा आम्ही गांवाच्या शेजारच्या नदीच्या पलिकडे लागून असलेल्या जांबाच्या बगिच्यात जायचो. त्याला एखादा मुलगा चार आण्याचे जांब विकत मागायचा. ते झाडाचे तोडण्यासाठी त्याला, ‘हे नाही. त्या झाडाचे द्या.’ असे म्हणत दूर आंतमध्ये घेऊन जायचा. मग इकडे लपून बसलेले मुलं जवळच्या झाडाचे जांब तोडून दप्तरात भरायचे. तो येतांनाची चाहूल लागली की हे मुलं सुंबाल्या करीत होते. मग रस्त्याने घरी जातांना आम्ही ते जांब मस्त खात खात जात होतो.
शनिवारी सकाळची शाळा सुटल्यावर घरी आलो की, गांव कसं सुनं सुनं वाटत असे. कारण गांवातील सारे लोकं शेतात काम करायला जात होते. मग गांवात आमचंच राज्य असायचं.
पोमा लभानाच्या आवाराची कवाडी काढून त्याच्या कुपाचे कोवळे कोवळे कारले तोडून आणायचो. वहिनी स्वयंपाक करुन कामाला गेल्यावर चुलीत गरम गरम राख राहत होती. त्याच राखेच्या हुपीमध्ये बाई कारले भाजायची. त्याची तिखट, मिठ टाकून मस्तपैकी चटणी बनवायची. मग शिक्यात ठेवलेल्या दवडीतील भाकर काढून कारल्याच्या चमचमीत चटणीसोबत खाण्यात काही औरच मजा यायची.
मग आमच्या घरी चित्राबाई, सुदमताबाई, जनाबाई, सरस्वती, चांगोणा, वच्छलाबाई, सिताबाई, लक्ष्मी अशा मुलींचा रंगतदार खेळ सुरु व्हायचा. कधी बाहूल्यांचा खेळ तर कधी खेळभांडे, खडे फेकणे, काकणाचा खेळ, लगोर्‍याचा खेळ, टिकरचा खेळ, लंगडीचा खेळ असे अनेक प्रकारचे खेळ खेळ्ण्यात मुली गुंग होवून जात असत.
एकदा तर नवरीन, नवरदेवचा जिवंत खेळ खेळले होते. बाहूला-बाहूली ऎवजी मला नवरदेव व एका मुलीला नवरीन बनविले होते. आमच्या दोघांचं लग्न लावून देण्यात त्या रमून गेल्या होत्या. लग्नानंतरच्या नवरा-बायकोचा संसार आमच्याकडून मांडून घेतला होता. अशी त्या खेळाची मुली मस्त मजा घेत होत्या.
एकदा आमची शाळा सुटल्यावर खूप पाऊस आला होता. गुरुजी यवतमाळला जाण्यासाठी निघून गेले होते. पाऊस उघडण्याची काही चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे घरी जावे की नाही याच विवंचनेत आम्ही थांबलो होतो. वाघाडी नदीच्या जवळून आलेले लोकं वाघाडीला खूप पूर आल्याचे सांगत होते. रात्र पण वाढत चालली होती. म्हणून आम्ही मामाची शेती सोमा कोलाम वाहत होता, त्याच्या घरी मी बाई, चित्राबाई, व सुदमताबाई राहिलो होतो. बाकीची मुले आणखी कुठेतरी थांबले होते.
पावसामुळे त्यादिवशी थंडी पडली होती. थंडाव्याने हातपाय गारठून गेले होते. आम्हाला कोलामाच्या बायकोने हातपाय शेकण्यासाठी विस्तव पेटवून दिला. तिने भाकरी थापून आम्हाला दुरुनच जर्मनच्या कळकटल्या ताटात खायला दिले. रात्रभर तेथेच हातपाय गुंडाळून आम्ही शेकोटीजवळ झोपलो होतो. सकाळी आम्हाला वेगळ्या ठेवलेल्या फुटक्या बशीत चहा दिला होता. आमची राहणीमान त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली होती. तरीही हे लोकं आमचा विटाळ कां करीत होते? ते काही समजत नव्हतं. शाळा शिकत असतांना अशाही काही प्रसंगांना आम्हाला सामोरे जावे लागत असे.
शाळेतल्या मडक्यातलं पाणी बाटते म्हणून आम्हाला पिता येत नव्हत. दुपारची जेवण्याची सुट्टी झाली की त्याचवेळेस आम्हाला बाहेर जावून पाणी पिता येत होते. मग बर्‍याचदा आम्ही बाहेर कुणाकडे तरी भाकर खाण्यासाठी जात होतो.
म्हणून आम्ही बाईची वर्ग मैत्रीन निर्मला हिच्या घरी किंवा निर्मलाच्या घराच्या पलीकडे करंजीच्या झाडाजवळ सोमा कोतवालाचं घर होतं, तेथे जात होतो. त्यांच्या घरी दुकान असल्यामूळे त्यांचेकडून गोळ्या, बिस्किट किवा लेखणी विकत घेत होतो. तो आमच्याशी खूप जिव्हाळ्याने बोलत असे.
कधीकधी नदीला पूर असला तर आम्ही निर्मलाच्या घरी थांबत असे. तिने एकदा आम्हाला तिच्या शेतात नेले होते. तेव्हा तिच्या शेतात भुईमूंगाच्या शेंगा काढणे सुरु होते. त्यावेळी आम्ही मस्तपैकी शेंगा खाल्ल्या होत्या.
तसं नामदेव दुध्याचं घर शाळेजवळ पण चढावावर होतं. त्याची बायको घरी असली की आम्ही तिच्याकडे पण भाकरी खायला जात होतो. ती आम्हाला आवडत असे. ती दिसायला तशी काळसावळी पण नाकीडोळी चरचर होती. ऊंचपूरी होती. पाय झाकेपर्यंत चोपून-चापून लुगडं नेसत होती. त्यामूळे ती सडपातळ एखाद्या बरबटीच्या शेंगासारखे छान दिसायची.
शीदोरीचे फडके घरी जातांना वाघाडी नदीवर धूत होतो.
नामदेव दुधाचा धंदा करीत असे. यवतमाळला तो दुघ विकण्यास जात असे. त्याच्याकडे काही म्हशी पाळलेल्या होत्या.
त्याचं त्याच्या बायकोशी काय बिनसत होतं कोण जाणे,की तिच्या चारित्यावर शंका घेत होता की काय माहित पण तो तिच्या उरावर बसून मारत असल्याचे आम्ही बर्‍याचदा त्यांच्या घराच्या आंगणात पाहिले होते. ती बाई त्याचा मार कसा सहन करीत होती, याचे आम्हाला आश्चर्य वाटायचे. आम्हाला त्याच्या बायकोची फार किव यायची. तो दिसला की आम्ही त्याला थर्र भित होतो. तो दिसायचा तसाच! उंचीने बायकोपेक्षा थोडा बुटका होता पण कष्टानं कमावलेलं भरदार शरीर होतं. ‘माह्या नवर्‍याने काही केले नाहीजी... त्यांना नेऊ नकाजी...’ अशी ती पोलिसाला आर्तपणे विनवणी करीत होती.
त्याकाळी खेड्यात घरच्या बायांना माणसं खूप राबवून घेत असत. माणसं बाहेरचं कितीही मरणाचं काबाडकष्ट करतील, मनभर किंवा त्याही पलीकडे जाऊन लाकडं फोडतील, जिवापलीकडंच ओझं उचलून नेतील, ऊन-पावसात, थंडी-वार्यात मरमर राबतील, शेतीचं किवा मजूरीचे वाटेल ते कामे करतील, परंतु घरी आले की राजे बनत होते. घरातली पडलेली एक काडी सुध्दा उचलत नव्हते.
घरची बाई मात्र बाहेरचं शेतीचं किवा मजूरीचे कामं करण्याशिवाय सकाळी झाकटीला उठून शेणाचा सडा टाकतील, पोतार्‍याने घर सारवतील, झाडझूड करतील, विहिरीचं पाणी भरतील, खरकटे भांडे घासपुस करतील, चूल पेटवता पेटवता फुकणीने फुंकू-फु्कून, नाका-तोंडात जाणारा विस्तवाचा धूर झेलतील, चहा करुन आयतं कप माणसाजवळ नेऊन देतील, त्याच्या आंघोळीचं पाणी चुलीवर ठेवतील, तापलं की आंघोळीच्या गोट्यावर नेऊन देतील, लहान पोरांच हागलं-मुतलं काढतील, स्वयंपाक करतील, सर्वांना जेवणाच ताटं वाढून देतील, कपडे धुतील असे कितीतरी नानातर्‍हेचे कामे त्यांना करावे लागत होते.
त्या दिवशी यवतमाळच्या आठवडी बाजारात आम्ही कडूनिंबाच्या झाडाखाली उतार्‍यावर बसलो होतो.या उतार्‍यावर निळोण्याचे व चौधर्‍याचे लोकं बसत असत. तेव्हा तो प्रसंग घडला होता.
नामदेवने काय गुन्हा केला होता काय माहीत? पण तो पोलीस त्याला जबरदस्तीने ओढत नेत असल्याचे आम्ही सगळे लोक पाहत होतो. ते दृष्य पाहतांना सर्वजन हळहळ करीत होते. त्या माऊलीचा त्या मारकुंड्या नवर्‍याबद्दल किती लळा होता हे त्यावेळेस मला दिसले.
खरंच, एखादा नवरा कसाही असो, तो एखाद्या प्रसंगी हिंसक झाला, क्रुर झाला किंवा लहान मुलासारखा हट्टी, चवचाळ, खट्याळ, नाठाळ, घायाळ झाला तरी त्याच्या बायकोला सांभाळून घ्यावे लागते याची प्रचिती मला त्या बाईच्या वागणूकीत दिसून आले होते.
ती मायाळू बायको होती, यांत काही शंकाच नव्हती. तिची माया पाहून माझं मन द्रवलं होतं.

गुलमोहर: 

काय आहे हे?
प्रथम गावाची शाळा - नंतर गुरूजी, लोकशिक्षण, भातुकली आणि शेवटी कोण तो नामदेव आणि त्याची बायको. सगळचं विस्कळीत आहे.
आणि शिर्षक बायकोची माया... Lol

लेख विस्कळीत झालाय खरा.. लिहित असतांना एका आठवणीतून दुसरी आठवण निघत गेली असावी असे वाटले.
खास वैदर्भी टच आवडला.

विहंग आणि ज्ञानेश यांनी कथा विकळीत झाल्याचा अभिप्राय दिला आहे. मलाही तसेच वाटते.

ही कथा म्हणजे माझ्या जीवनात घडलेल्या काही आठवणीतील प्रसग आहेत. मी ते प्रसंग कथेत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. कथेची घडी निट बसविण्यासाठी मी जरुर प्रयत्न करीन.

तसेच चातक यांनी .शिर्षक बदलविण्याची सुचना केली आहे. या बाबत त्यांनी जर मला मदत केली तर मी आभारी राहीन.

चातक ला अनुमोदन...
शिर्षकाने घोळ झालाय अन्यथा मस्त लिहीले आहे...विस्कळीत असले तरी गप्पांच्या मैफिलीत बसून ऐकल्यासारखे वाटले...
तिथे असेच एकातून एक विषय निघत जातात...
फक्त शिर्षकाचे काही तरी करा

मस्त लिहिलेय.
अशाच आठवणी माझ्याही आहेत. Happy
आमची जिल्हा परिषदेची शाळाही शंकराच्या देवळाच्या धर्मशाळेत भरायची आणि आम्हालाही तेव्हा आमच्या जातीमुळे गाभार्यात जायला परवानगी नव्हती.गेल्यावर पुजारी वैगेरे ओरडायचे. (इयत्ता दुसरीत.)
नंतर मात्र त्याच मंदिराच्या उत्सवात १० वी,बारावीला गावात पहिलं आल्यावर आणि इतरही बरेच सत्कार झाले. त्यामुळे त्या मंदिराच्या पुजार्‍यांची पापे धुवून निघाली असावीत.

तेव्हा पुन्हा म्हणून शंकराच्या देवळात पाय टाकणार नाही असं ठरवलं होतं पण नवराच लिंगायत मिळाला मग काय जावंच लागतं घरच्यांबरोबर. "नवर्‍याची माया" दुसरं काय? Wink

कुमले, तुम्ही "आठवणींचे धागे" असं काहीतरी शिर्षक देऊन धागा १,धागा २ असं लिहा. लेखखाली संपादन असं येत असेल तिथे जाऊन तुम्हाला शिर्षकही बदलता येतं लेखाचं.

विहंग | 2 October, 2011 - 04:10 नवीन
काय आहे हे?
प्रथम गावाची शाळा - नंतर गुरूजी, लोकशिक्षण, भातुकली आणि शेवटी कोण तो नामदेव आणि त्याची बायको. सगळचं विस्कळीत आहे.
आणि शिर्षक बायकोची माया...

>> विहंग सर्व लेखनच "स्म्रुतीचित्रे" च्या शैलीतले आहे अशात बरेचदा सर्वात महत्वाच्या स्म्रुतीला लेखाचे नाव देण्यात येते. खेड्यातील बायकोचे कष्टमय जीवन ही यात ठळक स्म्रुती आहे म्हणुनच या भागाचे नाव.

मला सकाळी चारला उठुन अंधारात जंगलात जाणारी माझी कोकणातील काकी आठवली आता मोठ्ठी
आम्बराई आहे पण सकाळी ४ ते रात्री ११ काकी घरी आणि बाहेर अक्षरशः झिजली त्यामानाने शहरातले आमचे रहाणीमान फार सोपे होते. यामुळेच त्या काळात गावात कोण शक्यतो मुली द्यायला बघत नसत.

विहंग, चातक, निलीमा, साती
कथेच्या शेवट पहा. त्यात मी सुधारणा केली आहे. आता तरी शिर्षक पटते कां ते सांगा. धन्यवाद.

जुमलेसाहेब, खर तर निलिमा यांनी सांगितल्यानंतरच हे लेखन "स्म्रुतीचित्रे" च्या शैलीतले आहे असे कळाले. त्या दृष्टीने विचार केल्यानंतर आता लेख कळू लागलाय.
भावना दुखवल्या गेल्या असल्यास क्षमस्व.

विहंग,
खरंतर मला तुम्हा सर्वांचे मते आवडतात. त्यामुळेच मला कथेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची संधी मिळते. असेच आपण मोकळेपणे मते मांडावीत अशीच मी यापुढे अपेक्षा करीन. धन्यवाद...

छान लेखन.....

"बायकोची माया" हे शिर्षक लेखनानुसरुप नाही, त्याऐवजी
"बालपणीच्या आठवणी" हे शिर्षक उत्तम राहील. >>फक्त एक सुझाव<<

मी मनी म्यांऊ,
मी आता कथेची मांडणी बदलवली आहे. कथेच्या सुरुवातीला सुधारणा करुन त्याचा समन्वय शेवटासोबत केला आहे.
या कथेत बालपणीच्या काही आठवणी आहेत. बाकीच्या आठवणी मी इतर कथेत गुंफल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुचवलेल्या शिर्षकाशी इतर कथेशी मेळ बसवता येणार नाही. त्यामुळे मी या शिर्षकाबद्द्ल आग्रही आहे.
कथेची सुरुवात आणि शेवट पाहून तुम्ही सुध्दा माझ्या मताशी सहमत व्हाल अशी आशा आहे.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद...

स्मृतीचित्रे सदरांत योग्यच.. Happy
तुमचा एक लेख ०८ कि ०९ ऑक्टोबरच्या लोकसत्ता पुरवणीता आलीला मी वाचला.. मला वाटते तो तुम्ही इथेच टाकला होता.:)

हो रुपाली,
माझी 'बाबाची सही' ही कथा दिनांक ०८-१०-२०११ रोजी दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये प्रकाशित झाली आहे. धन्यवाद.